Monday, February 21, 2011

चौकटीबाहेरची कुटुंबकथा

                                                          आय अ‍ॅम ओन ए लोनली रोड अ‍ॅण्ड आय अ‍ॅम ट्रॅव्हलिंग,


                                                              लूकिंग फॉर द की टु सेट मी फ्री,


                                                            ओह द जेलसी, द ग्रीड इज द अनरॅव्हलिंग,


                                                           अ‍ॅण्ड इट अनडझ ऑल द जॉय दॅट कुड बी’

                                                                                                     - जोनी मिचेल, ऑल आय वॉन्ट

------------------------------------------------------------------------------------------------------

जोनी मिचेलची गाणी तिच्या गाण्याच्या शैलीसाठी अन् तिच्या आवाजासाठी जितकी नावाजली जातात, तितकीच अर्थपूर्ण शब्दरचनांसाठीही! तिच्या ‘ब्लू’ या अल्बममध्ये येणारं ‘ऑल आय वॉन्ट’ हे गाणं प्रेम आणि दुराव्याबद्दल अतिशय सोप्या, पण थेट व मनाला भिडणाऱ्या शब्दांत सांगून जातं. या गाण्याचा काही भाग आपल्याला ऐकवला जातो तो ‘द किड्स आर ऑल राईट’ या चित्रपटात, त्यातल्या निक आणि पॉल या दोन प्रमुख पात्रांच्या तोंडून. मात्र ते महत्त्वाचं ठरतं ते त्यातून मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे; जे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत.
अमेरिकेत समांतर सिनेमाच्या जागी असलेला इन्डिपेन्डन्ट किंवा ‘इन्डी’ सिनेमा हा ठरावीक वर्तुळात जरूर पाहिला जातो, पण त्याला ब्लॉकबस्टरी परंपरेसारखा प्रेक्षकांचा पाठिंबा नाही. ‘सनडान्स’ हा या इन्डी चित्रपटांना प्राधान्य देणारा, या चित्रकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा चित्रपट महोत्सव नेहमीच वेगळ्या चित्रपटांच्या शोधात असलेल्या रसिकांसाठी लक्षवेधी ठरतो. गेल्या वर्षी या महोत्सवात कौतुकपात्र ठरला तो ‘द किड्स आर ऑल राईट’ हा लिजा कोलोडेन्को दिग्दर्शित चित्रपट. मात्र त्याचं यश हे ‘सनडान्स’पुरतं किंवा मोजक्या चित्रपटगृहांमध्ये हजेरी लावणाऱ्या खास प्रेक्षकांपुरतं मर्यादित राहिलं नाही. चित्रपट त्यापलीकडे पोचला. तो चालतो आहे हे लक्षात येताच तो अधिक ठिकाणी प्रदर्शित केला गेला. आणि सर्व स्तरांतल्या अनेक प्रेक्षकांनी तो पाहिला. इन्डी चित्रपटांना मान्यता देणाऱ्या इन्डिपेन्डन्ट स्पिरीट अ‍ॅवॉर्डसाठी तर त्याला अनेक नॉमिनेशन्स आहेतच, वर गोल्डन ग्लोब पुरस्कारात तो विजेता ठरला आणि आता ऑस्कर स्पर्धेतही त्याचं नाव मानानं घेतलं जातं.
या चित्रपटाला पुरस्कार मिळाले वा नाही हे महत्त्वाचं नाही, पण त्याची सर्वत्र पसरलेली लोकप्रियता दाद देण्यासारखी आणि विचार करण्याजोगी आहे. कारण त्याची मांडणी हीच आताआतापर्यंत टॅबू मानल्या जाणाऱ्या विषयाभोवती केलेली आहे.
‘द किड्स आर ऑल राईट’च्या केंद्रस्थानी प्रेमाचा त्रिकोण आहे. निक आणि जूल्स यांचा अनेक वर्षांचा अजूनही प्रेम टिकवून धरणारा संसार. त्यांना दोन मोठी मुलं. मुलगी अठरा वर्षांची, तर मुलगा पंधरा वर्षांचा. आता अचानक त्यांच्या आयुष्यात एक नवं पात्र येतं, ते म्हणजे पॉल. पॉलच्या येण्याने क्षणात सगळी गणितं बदलतात आणि घराचं पूर्ण स्वास्थ्य हरवण्याची लक्षणं दिसायला लागतात.
आता कोणी विचारेल की, या विषयात टॅब म्हणण्यासारखं काय आहे? या प्रकारचे प्रेमत्रिकोण तर अनेक नाटक-सिनेमांत नित्याचे आहेत. पण या त्रिकोणात एक वेगळेपणा आहे. निक आणि ज्यूल्स या दोघीही स्त्रिया आहेत. मुलं या दोघींचीच आहेत, स्पर्म डोनरच्या मदतीने झालेली. आजवर या घराला अपरिचित असणारा हा स्पर्म डोनर आहे पॉल, जो खरं तर या दोन्ही मुलांचा- जोनी अन् लेजरचा बाप आहे.
आजवरचा चित्रपटांचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की, कोणताही व्यावसायिक सिनेमा हा काही प्रमाणात होमोफोबिक असतोच. साहजिक आहे. व्यावसायिक चित्रपट हे अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहणे अपेक्षित असल्याने त्यातली मतं, विचार, संकेत हे समाजाच्या आवडीनिवडीचा लसावि काढूनच मांडलेले असतात. समाजाचा मोठा भाग ‘स्ट्रेट’ असल्याने गे अन् लेस्बियन घटक दुर्लक्षित राहिल्यास आश्चर्य ते काय? आपल्यापेक्षा मोकळा असूनही, अमेरिकन समाज या नियमाला पूर्णपणे अपवाद नाही. १९९० च्या दशकापर्यंत तरी हॉलीवूड फारच सनातनी होतं. पुढे मात्र माय ओन प्रायव्हेट आयडहो (१९९१), फिलाडेल्फिआ (१९९३), टु वाँग फू, थँक्स फॉर एव्हरीथिंग, ज्युली न्यूमार (१९९५), बर्डकेज (१९९६) अशा चित्रपटांतून हे घटक डोकवायला लागले. प्रेक्षकही थोडा चौकटीबाहेरचा विचार करून चित्रपटांना हजेरी लावायला लागले. २००६ च्या ब्रोकबॅक माऊन्टनने तर ऑस्कपर्यंत धडक मारून होमोसेक्शुअ‍ॅलिटीला प्रस्थापित केलं. मात्र अजूनही या प्रकारच्या चित्रपटांचं तुरळक प्रमाण पाहता चित्रकर्त्यांचं अन् प्रेक्षकांचं बिचकणं कमी झालेलं दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर ‘द किड्स आर ऑल राईट’चा बोलबाला हा उल्लेखनीय आहे. चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकाला पाहावासा कधी वाटतो, जेव्हा तो बारकाव्यावर, तपशिलावर, वर्गवारीवर न रेंगाळता त्यापलीकडे जाणारं एखादं मूलभूत विधान मांडेल. जात, धर्म, सामाजिक स्तर, सेक्शुअ‍ॅलिटी यासारख्या वर्गीकरणात न अडकता माणुसकी, तत्त्वज्ञान, मानसिकता याविषयी काही वैश्विक स्वरूपाचं भाष्य करेल, असं जेव्हा होतं तेव्हा या व्यक्तिरेखा त्या कथेपुरत्या, विशिष्ट प्रसंगापुरत्या मर्यादित न राहता प्रातिनिधिक होतात. आणि प्रेक्षकही आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीला बाजूला ठेवून त्या भाष्याकडे पाहू शकतो. त्यानंतर या व्यक्तिरेखा त्याला आपसूक जवळच्या वाटायला लागतात. ‘किड्स आर ऑल राईट’मध्येही काहीसं हेच होतं.
निक (अ‍ॅनेट बेनिंग) आणि जूल्स (जुलिअ‍ॅन मूर) हे लेस्बियन कपल आणि पॉल मुळे (मार्क रफालो) निर्माण होणारा संघर्ष प्रेक्षक सहज मान्य करू शकतो. कारण दिग्दर्शिका सेक्शुअल प्रेफरन्सेस, स्पर्म डोनेशनसारख्या गोष्टी तपशिलापुरत्या वापरूनही विषयाचा भर त्यापलीकडे जाणाऱ्या, कोणालाही सहजपणे जवळच्या वाटणाऱ्या गोष्टींवर देते. चित्रपटात महत्त्व येतं ते कुटुंबपद्धतीला अन् कुटुंबातल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांवर होणाऱ्या बाह्य आक्रमणाला. निक आणि जूल्सच्या लग्नाला अनेक वर्षे झालेली आहेत. त्यांचं प्रेमही शाबूत आहे, पण सरावाने त्यात तोचतोचपणा, कृत्रिमता आली आहे. प्रेम व्यक्त न झाल्याने कुटुंबाला आपली कदर नसल्याची भावना या दोघींच्याही मनात आहे आणि त्यातल्या एकीने आपल्या मानसिक क्लेशावरला तात्पुरता उपाय म्हणून पॉलकडे आकर्षित होणं, हे कुटुंबासाठी न्याय्य नसेल कदाचित, पण तिची ती नैसर्गिक गरज आहे. जूल्सचं हे पाऊल घरातल्या कर्त्यां पुरुषाच्या (नव्हे व्यक्तीच्या) जागी असणाऱ्या निकला अन् दोन्ही मुलांना हादरवून जातं. या प्रकारचा विश्वासघात, कुचंबणा, कुटुंबसंस्थेवरचा आघात हा प्रेक्षक सहज समजून घेऊ शकतो आणि निक तसंच जूल्सकडेही सहानुभूतीने पाहू शकतो.
या प्रकारच्या रचनेत दोन गोष्टी सहजशक्य होत्या. त्या म्हणजे पॉलला खलनायक म्हणून उभा करणं किंवा चित्रपटाला गडद, शोकांत नाटय़ाचं स्वरूप देणं. दिग्दर्शिका लिजा कोलोडेन्को या दोन्ही गोष्टी टाळते. पॉलच्या व्यक्तिरेखेला ती अतिशय सावधपणे, पण सहानुभूतीनेच रंगवते. पॉल जूल्सकडे आकर्षित होतो, तिला प्रतिसाद देतो आणि निक किंवा मुलांचा अपराधी ठरतो, पण त्याच्या दृष्टीने ही आपल्या हातून गमावलेलं काही परत मिळवण्याची संधी असते, कदाचित अखेरची! आतापर्यंत नाती टाळून स्वैर आयुष्य जगलेल्या पॉलला हे कुटुंब आपलं वाटतं (त्यातली दोन मुलं तर त्याचीच आहेत) आणि स्वातंत्र्याची काय किंमत आपण देऊन बसलो, हे त्याच्या लक्षात येतं. त्या कुटुंबाच्या जवळ येताना जो ताबा ठेवायला हवा, तो पॉल ठेवू शकत नाही इतकंच.
कदाचित अखेरच्या पंधरा-एक मिनिटांचा अपवाद वगळता चित्रपटाचा टोनही कॉमेडी आणि ड्रामा याच्यामधला राहतो. तो खो-खो हसवत नाही, पण त्यातले संवाद अन् काही प्रसंगदेखील गमतीदार आहेत. हा विनोद ओढूनताणून न येता स्वाभाविकपणेच रोजच्या बोलण्यात आल्यासारखा येतो. खास म्हणजे यातलं नाटय़ अन् विनोद इथल्या प्रत्येक पात्राच्या वाटय़ाला येतो. कोणीही दुर्लक्षित राहत नाही. सर्व व्यक्तिरेखा त्यांच्या योग्य त्या उत्कर्षबिंदूपर्यंत जातात. बेनिंगला बॉडी लॅन्ग्वेज आणि संवादातून कुटुंबप्रमुख उभा करायचा असल्याने तिला थोडा-अधिक वाव (अन् अधिक पुरस्कार) मिळणं शक्य होतं इतकंच.
आतापर्यंत हॉलीवूडच्या चित्रपटातल्या गे-लेस्बियन व्यक्तिरेखा, एक प्रकारची क्युरिऑसिटी असल्यासारख्या समाजाबाहेरच्या, पण कथानकाच्या सोयीसाठी असल्याप्रमाणे होत्या. ‘द किड्स आर ऑल राईट’ हा त्यांना जराही वेगळी ट्रीटमेन्ट न देता समाजाचाच घटक असल्याप्रमाणे दाखवतो. एक प्रकारची प्रतिष्ठा आणून देतो. कदाचित पुढल्या काळातला चित्रपट अधिक मुक्त विचारसरणीचा करणारं हे महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल.


- गणेश मतकरी ( लोकसत्तामधून)

No comments:

Post a Comment