`रिअर विन्डो` - हिचकॉकचा नैतिक पेच

>> Sunday, January 8, 2012

आल्फ्रेड हिचकॉकचा `रिअर विन्डो` एका खिडकीपासून सुरू होतो. खिडकी आपल्याला दिसते, ती घराच्या आतून, त्यावर पडदा ओढलेला. ही खिडकी, जणू चित्रपटाचीच चौकट आपल्यापुढे ठेवते. कारण यापुढे या सिनेमात घडणारं नाट्य हे आपण याच खिडकीतून पाहाणार आहोत. पाय मोडल्याने चाकाच्या खुर्चीत अडकलेल्या या चित्रपटाच्या नायकाच्या नजरेतून. पहिल्या श्रेयनामावलीदरम्यान खिडकीवरला पडदा तुकड्यातुकड्यात वर सरकतो अन् या चित्रपटातील पात्रं आपल्यासमोर आकार घ्यायला लागतात.
वरवर पाहाता, रिअर विन्डोची रचना साधी वाटते. कॉमन सेन्सला धरून केल्यासारखी. त्याचा नायक हा तात्पुरता अपंग असल्याने हालचाल करू शकत नाही. म्हणजे थोडीफार करू शकतो, त्य़ाची केअरटेकर स्टेला (थेल्मा रीटर)च्या किंवा मैत्रीण लिजा (ग्रेस केली) च्या मदतीने, आधाराने. पण घरातून बाहेर पडू शकत नाही. जेफरी (जेम्स स्टुअर्ट) फोटोग्राफर आहे, एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणारा. त्याचं काम हे मुळातच इतरांच्या आयुष्यात डोकावण्याचं आहे, घडणा-या घटनांमधले नाट्यपूर्ण क्षण पकडणं हाच त्याचा उद्योग आहे. अन् आता आपल्या घरात बंदिस्त झाल्याने नाट्यपूर्ण क्षण तो शोधणार कुठे ? तर उघडच आपल्या खिडकीबाहेरच्या दृश्यात. त्याची स्वतःची इमारत अन् आजूबाजूच्या एक दोन इमारती मिळून एक बंदिस्त जागा तयार झालीय, अन् खिडक्या उघड्या टाकणा-या (अन् काही बंद करून घेणा-यादेखील) शेजा-यांच्या जीवनाचं दर्शन जेफरीला घरबसल्या होतंय. तो या मंडळीना जवळून ओळखत नाही. त्यांच्या वागण्यामागची कारणमीमांसा किंवा तपशील तो जाणू शकत नाही. तो केवळ तेच पाहतो, जे त्याच्यापुढे चुकून वा जाणीवपूर्वक उघड होतं. आणि अर्थातच तो त्यात नाट्य शोधतो. दिसणा-या प्रत्येक पात्राच्या व्यक्तिरेखेत आपल्या मनाने तपशील भरतो, स्वतःला दिसणा-या (किंवा न दिसलेल्याही) गोष्टींचे अर्थ लावायला लागतो. त्याच्यापुढे उलगडणारी सारीच कथानकं काही विशेष नाहीत. ब-याच पुरूषांना बोटावर नाचवणारी एक नृत्यांगना आहे, जोडीदार शोधणारी एक मध्यम वयाची तरुणी (?) आहे, कुत्र्यावर जीवापाड प्रेम करणारं जोडपं आहे, एक सेल्समन आहे, अन् त्याला (बहुदा) छळणारी त्याची पत्नी आहे. जेफरीची निरीक्षणं अन् त्यातून निघणारे, किंवा त्याने काढलेले निष्कर्ष त्याला सुचवतायत, की सेल्समनच्या आयुष्यात काहीतरी विशेष घडतंय. सेल्समनच्या रात्रीबेरात्री बाहेर होणा-या चकरा, घरात दिसणारी करवतीसारखी हत्यारं, अन् बायकोचं दिसेनासं होणं, या सा-याचा एकच अर्थ लागू शकतो, की सेल्समनने आपल्या बायकोचा खून केलाय. पण हे खरं, का केवळ नायकाचा अंदाज? आपल्या जीवनातून सध्या गेलेलं नाट्य पुन्हा आणण्याचा त्याचा प्रयत्न?
`वुई हॅव ऑल बिकम ए रेस ऑफ पिपिंग टॉम्स` असं यातील स्टेला, चित्रपटाच्या सुरुवातीलीच म्हणते आणि ही या चित्रपटाची प्रमुख संकल्पना मानावी लागेल. बदलत्या नितीमत्तेच्या कल्पना आणि आपल्या आयुष्यापेक्षा दुस-याच्या आयुष्यात डोकावण्याची वाढती निकड यांचा रिअर विन्डोला आधार आहे. ज्या काळात तो प्रदर्शित झाला, त्या काळात सामान्य माणूस चित्रपट आणि टेलिव्हिजन यांचा वापर, या परकायाप्रवेशासाठी करीत असे, मात्र आज इन्टरनेटने हे प्रमाण कितीतरी वाढवलंय. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स, ब्लॉग्स यांनी आज कोणीही दुस-याच्या जीवनात डोकावू शकतं. त्यामुळे आज हा चित्रपट अधिकच आशयघन अन् प्रेक्षकांनाच काही अवघड प्रश्न विचारणारा झाला आहे.
प्रत्यक्ष चित्रपटात दिसणारी मांडणीही प्रतीकात्मक रुपाने आजच्या वर्तमानाचंच स्वरूप मानता येईल. एका माणसाला घरबसल्या अनेक छोट्या चौकटीतून दिसणारे इतर सामान्य माणसांच्या आयुष्याचे तुक़डे, अन् त्यांच्यात प्रत्यक्ष सामील न होताही त्यांच्या अस्तित्त्वाशी नायकांचं हळूहळू जोडलं जाणं हे आजच्या इन्टरनेट संस्कृतीचंच दर्शन म्हणता येणार नाही का? दिग्दर्शकाची ही भविष्यात डोकावणारी दृष्टी आज आश्चर्यकारक वाटण्यासारखीच आहे.
एकदा का ही दृष्टी ध्यानात घेतली, की त्यानुसार होणारी घटनांची मांडणी समजण्यासारखी आहे. चित्रपटात दोन प्रकारची पात्रं आहेत. कथेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते नायक जेफरी, स्टेला, लिजा, जेफरीचा मित्र थॉमस (वेन्डेल कोरी). जरी ही सारी पात्रं महत्त्वाची असली अन् चित्रपट पुढे नेणारी असली, तरी त्या सर्वांचं काम केवळ निरीक्षकाचं आहे. कॅमेरा हा या निरीक्षकांबरोबरच अडकलेला आहे. तो स्वतःपलीकडच्या इमारतीत जाऊन गोष्टी धसाला लावू शकत नाही. कारण तो नायकाशी बांधलेला आहे. केवळ त्याचा दृष्टिकोन मांडण्याचंच काम तो करू शकतो. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी स्टेला अन् लिजा जेव्हा पुरावा शोधण्यासाठी बाहेर पडतात, तेव्हाही कॅमेरा त्यांच्याबरोबर जात नाही. ( काही शॉट्सचे अपवाद वगळता) तो नायकाची खिडकी सोडत नाही. नायकाची मर्यादित, निरीक्षकाची भूमिका, अन् इतर कोणतीही प्रत्यक्ष पावलं उचलण्याची असमर्थता, जणू हा कॅमेराच आपल्यापुढे मांडतो.
याउलट दुसरी, शेजा-यांची पात्रं, ही पूर्ण आयुष्य जगतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम, मतभेद, हेवेदावे आहेत. कधी विनोद, नाट्य, कारुण्य आहे. मात्र हे सारं नायकाप्रमाणेच आपल्यालाही जवळून पाहाता येत नाही. या मंडळीच्या आयुष्यात सहभागी होता येत नाही. चौकटीचा आकार, ध्वनीप्रक्षेपाची मर्यादा आणि नायकाने दरेक व्यक्तिरेखेवर घालविलेला कमी अधिक वेळ या स्वतंत्र कॅप्सूल कथानकांना एक विशिष्ट आकार देऊ करतो. या सा-यामुळे जी परिस्थिती निर्माण होते, ती मात्र सांकेतिक चित्रपटांच्या बरोबर विरुद्ध.
बहुधा चित्रपटातला नायक हा अ‍ॅक्शनच्या केंद्रस्थानी असतो, अन् दुय्यम पात्रं ही पार्श्वभूमीला येतात. इथे मात्र नायक हा जवळजवळ प्रेक्षकाची भूमिका घेतो अन नाट्य घडविण्याची जबाबदारी दुय्यम पात्रांवर येऊन पडते. चित्रपटाच्या शेवटल्या प्रसंगातही जेव्हा अ‍ॅक्शन स्वतःच जेफरीच्या दारात येऊन ठेपते. तेव्हाही तो आपली बघ्य़ाची भूमिका सोडत नाही.
रिअर विन्डोमधे दोन गोष्टी खास उल्लेखनीय आहेत. पहिली म्हणजे त्यातले संवाद हे काहीसे गंमतीदार आणि रोजच्या बोलण्यातून आल्यासारखे वाटणारे आहेत. पण प्रत्यक्षात ते चित्रपटाची वृत्ती आणि त्यातला युक्तिवाद ध्यानात ठेवून लिहिलेले आहेत. एकच उदाहरण घेतलं, तर हे स्पष्ट होऊ शकेल. सामान्यतः नायक हे सदगुणाचे पुतळे असतात. त्यामुळे इथला नायक हा सतत इतरांच्या चौकशा करताना दिसणं हे प्रेक्षकांना कसं पसंत पडेल, असा प्रश्न इथे विचारण्यासारखा आहे. त्यासाठी दिग्दर्शकाने एक प्रसंग रचला आहे. ज्यात नायक आपली बाजू मांडतो, अन् नायिका त्याला त्याच्या वागण्याबद्दल जाब विचारत राहते. इथे या प्रसंगापुरती नायिका ही प्रेक्षकांचं प्रतिनिधित्त्व करते अन् नायकाला आपल्या वागण्यामागची भूमिका स्पष्ट करावी लागते. प्रसंग संपेपर्यंत नायकाची बाजू तर पूर्णपणे मांडली जातेच वर नायिकादेखील आपल्या शंका बाजूला ठेवून त्याला सामील होते. हा भूमिकाबदल, इथे पूर्णतः शब्दांच्य़ा खेळाच्या स्वरूपात येतो. हिचकॉक फ्रेमिंगमध्ये आपली चतुराई दाखवितो, नाही असं नाही, पण प्रामुख्याने इथलं काम हे संवाद करतात. या अन् अशा अनेक प्रसंगात इथे संवादांना सहजपणे महत्त्व मिळून जातं.
रिअर विन्डोमधला खलनायक हा नावापुरता आहे, अन् बराच काळ त्याने काही केलं आहे, अथवा नाही, हे देखील स्पष्ट होत नाही, त्यामुळे नायकाची खात्री अन् प्रेक्षकांचं त्याला सामील राहणं यावरच कथेतल्या नाट्याचा भर आहे. इथे एक वेळ अशी येते, की नायकाचा पोलीस मित्र ठणकावून सांगतो की, नायक भ्रमात आहे, खून वैगैरे काही झालेला नाही. हे सारे मनाचे खेळ आहेत. आता मनाचे म्हणजे कोणाच्या ? केवळ नायकाच्या? त्याच्या अन् नायिकेच्या? आणि प्रेक्षक? त्याचं काय? गुन्हा घडूनही केवळ दिसलेल्या थोड्याफार घटनांवर विश्वास ठेवून एका निर्दोष माणसाला गुन्हेगार ठरवणारे नायक-नायिका जर दोषी असतील, तर त्याच वर्गात बसणा-या प्रेक्षकाचं काय? एरवीच्या सिनेमात नेहमी सत्याची पाठराखण करणा-या प्रेक्षकाला  अनपेक्षितरीत्या अडचणीत आणण्यासाठी हिचकॉक प्रसिद्ध आहे. त्याचाच हा एक नमुना.
रिअर विन्डोचं स्वरूप काही प्रमाणात बदलून, म्हणजे नायकाला खोलीत न अडकवता केवळ आपल्या घराच्या कंपाऊंडमधे अडकवून, अन् अनेक शेजा-यांची वर्णी न लावता केवळ गुन्हेगार शेजा-याला कथेत आणून २००७मधे रिअर विन्डोची एक आधुनिक आवृत्ती काढण्यात आली, डिस्टर्बिआ नावाने. हीदेखील चांगली अन् आजच्या अमेरिकन समाजाच्या वर्तवणुकीवर बोट ठेवणारी आवृत्ती होती. मात्र तिचा भर तरीही थ्रिलर म्हणून पटकथा रंगवण्याकडे होता. रिअर विन्डोचं एकाच वेळी थ्रिलर असणं आणि नसणं, सोपी अन गुंतागुंतीची कथारचना करणं, प्रेक्षकांना  विश्वासात घेऊनही पेचात पकडणं, पारंपरिक रहस्याभोवती भविष्यदर्शी कथानक रचणं, सांकेतिक मूल्यांबरोबरंच आधुनिक नैतिकतेचा हिशेब मांडणं या चित्रपटाला मोठं बनवतं.
मूळ स्वरूपातही तो आज पाहण्यासारखा आहे, कदाचित तत्कालिन प्रेक्षकांपेक्षा आज तो कळण्याची क्षमता असणारे अधिक रसिक अस्तित्त्वात असतील.
- गणेश मतकरी. 

7 comments:

alhadmahabal January 8, 2012 11:14 PM  

This is a must watch for me now!

VIVEK THE GENIUS AMONG U. January 9, 2012 10:16 PM  

दिस्तेर्बिया बघितला होता पण माहित नव्हतं कि रिअर विन्डोव्ची सुधारित आवृत्ती आहे. मला होल्लीवूडचा नेहमी राग येतो कि ते फक्त व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून चित्रपट काढतात. एखादा गंभीर विषय असलातरी त्याला थ्रिलर मध्ये पेश करून त्याचं गांभीर्य नष्ट करतात त्यामुळे रसभंग होतो.

ganesh January 9, 2012 10:56 PM  

vivek, sudharit nahi , adhunik. also aimed at a younger audience. i find it interesting when filmmakers try to remake acclaimed films for a larger spectrum of audience. original classics may be greater but this way ,the thought can reach more number of people. cases in point being soderberg version of solaris when Tarkovski had already made a film based on Lem's novel, and Paheli based on Duvidha. newer works should be appreciated for the thought and effort though one may find the originals superior.

VIVEK THE GENIUS AMONG U. January 10, 2012 10:54 PM  

Yes. I understand that but when comparing one with already a classic then obviously it is being under hammer to understand what the director wants to say.
I have seen Paheli and didn't come with an impression as there are several loopholes in the script and Amol's fascination for taking arty actor's such as Naseer and Ratna Pathak Shah couldn't gelled with me. Even, the story by the Rajasthani writer is considered among the best from regional literature. I haven't seen Duvidha so can't say anything about it.

ganesh January 11, 2012 2:03 PM  

U will get what i say only if u see duvidha.
Mani kaul's technique of slow deliberate cinematography is too arty for most people and almost feels like a slide show. Its one if those films which was relevant at the time though was for a limited audience and feels dated today. Though i agree about loopholes and dont agree with ending , it is still a thought provoking story for general audience which is good. I had done a cover story for saptahik sakal and had detailed out pros and cons at the time.

VINE January 14, 2012 10:48 AM  

have u done this movie
Man From Earth
if not please do

i would like to read ur opinion on this

its great movie

केदार January 15, 2012 11:39 PM  

मतकरी साहेब,

आपण चित्रपटासंदर्भात अचूक विधान केलेले आहे.
- आज इन्टरनेटने हे प्रमाण कितीतरी वाढवलंय. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स, ब्लॉग्स यांनी आज कोणीही दुस-याच्या जीवनात डोकावू शकतं.

आपल्या याहू किंवा जीमेलच्या चॅटखिडक्या म्हणजे हा चित्रपटच.

साप्ताहिक सकाळमध्ये आपले लेखन वाचले होते. आपल्याशी असा संवाद साधण्याचा योग प्रथमच येत आहे. बरं वाटलं.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP