ए सेपरेशन - आजच्या घडीचा सिनेमा

>> Sunday, January 22, 2012

माझा अनुभव असा आहे ,की चित्रपट महोत्सवाचा व्याप जेवढा मोठा तितकी त्यात चांगल्या फिल्म्स असूनही एकूण चित्रपटांच्या भाऊगर्दीत , त्या आपल्याला सापडण्याची शक्यता कमी. मुळात चित्रपट बरेचसे नवे  असल्याने उपलब्ध माहिती मर्यादित, मित्रमंडळाच्या परस्परविरोधी सल्ल्यांमुळे होणारा गोंधळ, पाहायच्या शॉर्टलिस्ट मधले चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या प्रेक्षागृहात लागल्याने तेही सारे पाहाता न येणं , या गोष्टी नित्याच्या. मुंबईचा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव मुंबईतल्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक मानला जातो . जरी तो चित्रपटसंख्येत सर्वात मोठा नसला , तरी चित्रपटांचा दर्जा आणि जागतिक चित्रपटांमधल्या आशियासारख्या एका वैशिष्ट्यपूर्ण विभागाचा त्यात घेण्यात आलेला आढावा, हा नेहमीच पाहाण्यासारखा असतो. त्याचा एकूण आकार आणि मांडणीदेखील चित्रपटसंख्येपुढे हतबल न होता पाहाण्यासारख्या चित्रपटांचा माग ठेवण्यायोग्य असते ,हादेखील एक फायदाच. यावर्षीचा , दहावा ’थर्ड आय’ देखील या परंपरेला अपवाद नव्हता. एफ टी आय आय मधून रीतसर चित्रपटशिक्षण घेतलेल्या केतन मेहता/अदूर गोपालकृष्णन/ गिरीष कासारवल्ली यासारख्या प्रथितयश दिग्दर्शकांचे चित्रपट, टागोरांच्या साहित्यकृतींचं सत्यजित राय /तपन सिन्हा आदींनी केलेलं चित्रपटरुपांतर, यासुजिरो ओझू / ताकेशी किटानो सारख्या अभिजात आणि आधुनिक जपानी मास्टर्सचं काम अन त्याचबरोबर आपल्याकडल्या सुजय डहाके, राजेश पिंजाणी सारख्या नव्या लक्षवेधी दिग्दर्शकांचा सिनेमा अशा सर्वकालीन , सर्वप्रांतीय चित्रसंस्कृतीचं दर्शन या महोत्सवात झालं.मला विचाराल, तर अनेक चांगले चित्रपट पाहूनही प्रत्येक महोत्सवात एक चित्रपट असा असतो की जो तुमच्यासाठी, तुमच्यापुरता ,तो महोत्सव डिफाईन करतो. महोत्सव संपल्यावरही तो तुमच्याबरोबर राहातो. कदाचित कायमच. या महोत्सवात माझ्यापुरता असा चित्रपट होता महोत्सवातला सेन्टरपीस,  इराणचा ’ ए सेपरेशन’ . २००९ च्या ’अबाउट एली’ मुळे चर्चेत आलेल्या असगर फरहादी, या दिग्दर्शकाचा.
मी इराणी चित्रपटांचं महत्व जरुर मानतो पण मी त्यांचा डाय-हार्ड चाहता नाही. त्यामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय फेस्टिवल सर्किट मधला दर सिनेमा कौतुक करण्याजोगा असतो हेदेखील मला मान्य नाही. मात्र सेपरेशन काही सांकेतिक ईराणी फॉर्म्युलांचा आधार घेणारा चित्रपट नव्हे. किंबहूना त्याच्या रचनेत अन तर्कशास्त्रात काही प्रमाणात पाश्चात्य विचार आहेत. नावात सुचवल्याप्रमाणे त्याच्या मुळाशी एक सेपरेशन , एका जोडप्याचं विभक्त होणं जरुर आहे, पण केवळ घटस्फोटासारखी एक कौंटुंबिक घटना दाखवणं हा त्याचा अजेंडा नाही.  कुटुंबसंस्था ,सामाजिक नीतीमूल्य,न्यायव्यवस्था ,राजकीय असुरक्षितता, वर्गभेद , धर्मविषयक कल्पना अशा अनेक गोष्टींचं आजच्या इराणमधलं अन काही प्रमाणात जागतिक स्थान हा चित्रपट तपासू पाहातो. त्याबरोबरच सत्य, स्वातंत्र्य, प्रामाणिकपणा अशा आपल्या आयुष्याशी जोडलेल्या काही मूलभूत संकल्पनांचा विचारदेखील तो करु पाहातो.
सेपरेशनला इतक्या गोष्टी आपल्यापुढे मांडायच्या आहेत ,की सुरुवातीला तो वातावरणनिर्मिती करण्यात वा पात्रांची प्रसंगानुरुप ओळख करुन देण्यात जराही वेळ काढत नाही. पहिलाच प्रसंग घडतो तो फॅमिली कोर्टात, जिथे सिमिन (लीला हातामी) आणि नादेर (पेमान मोआदी) यांच्या घटस्फोटाच्या केसची सुनावणी सुरु आहे. या प्रसंगाचा थेटपणा , या दोन्ही व्यक्तिरेखांचं मुद्द्याला हात घालणं आपल्यापर्यंत तातडीने पोचतं आणि आपण कथेत गुरफटले जातो. हा प्रसंग स्थिर ठेवलेल्या कॅमेरासमोरचा वन शाॅट सीन आहे. इथे कॅमे-याची जागा हीच न्यायमूर्तींची जागा आहे. अर्थात प्रत्यक्ष न्यायमूर्ती आपल्याला दिसत नाहीत , केवळ त्यांचा आवाज ऐकू येतो. समोर बसलेली पात्र आपापली बाजू कॅमेरात पाहून , म्हणजे एका परीने प्रेक्षकांसमोरच मांडतात. अभिनय न जाणवणारा, जवळजवळ उस्फूर्त वाटणारा हा प्रसंग कथानकाला जम्पस्टार्ट देतो आणि पार्श्वभूमी मांडून संघर्षाला तोंड फोडतो.
मुळात सिमिन आणि नादेरला घटस्फोटाची फार गरजच नाही. उच्च मध्यमवर्गातली ही दोघं सुशिक्षित आहेत, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे,एकमेकांचा अधिकार ते मानतात. अकरा वर्षांच्या मुलीवर , तेरमेवरही (सरीना फरहादी) दोघांचं प्रेम आहे. तिला चांगलं शिक्षण मिळावं अशी दोघांचीही इच्छा आहे. जो काय वाद आहे तो या मुलीच्या भवितव्यावरुनच. तिच्या मते देशातलं वातावरण हे मुलीसाठी पूरक नाही अन तिच्या भविष्याचा विचार करुन कुटूंबाने एखाद्या पुढारलेल्या देशात स्थलांतर करणं आवश्यक. त्याला हा विचार मान्य असला तरी अल्झायमर असलेल्या वडिलांची त्याच्यावर जबाबदारी आहे. त्यांना सोडून तो येऊ शकत नाही. न्यायाधीश हे कारण क्षुल्लक म्हणून धुडकावून लावतात ,मात्र सिमिन बाडबिस्तरा गुंडाळून घर सोडते. अर्थात , सारा वेळ घरी राहाणं शक्य नसलेल्या नादेरला त्यांची काहितरी व्यवस्था लावणं भाग पडतं. समाजाच्या खालच्या स्तरातली गरोदर रझिये (सारे बायात) आपल्या भडक डोक्याच्या नव-याला, हौजातला (शबाब होसैनी) न सांगताच कामावर यायला लागते. पण पहिल्या दोन तीन दिवसातच गोष्टी भलतंच वळण घेतात. रझियेला काही कारणाने वडिलांना एकटं सोडून बाहेर पडावं लागतं, अन ते धडपडतात. त्यामुळे ,अन तिने पैसे चोरल्याच्या संशयावरुन भडकलेला नादेर तिला घराबाहेर ढकलून देतो आणि एका वेगळ्याच नाट्याला सुरुवात होते.
सेपरेशनचा विषय हा जवळजवळ पूर्णपणे सामाजिक वळणाचा आहे आणि त्याची मांडणी ही जवळजवळ पूर्णपणे रहस्यपटासारखी केलेली आहे. या पध्दतीचं , प्रकाराचं नाव घेताच मला काही वर्षांपूर्वी गोव्याच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात पाहिलेल्या '4 मन्थ्स, 3 वीक्स अँन्ड 2 डेज' या रोमेनिअन चित्रपटाची आठवण झाली .’4 मन्थ्स ’ १९८० च्या दशकात रोमेनिआत अवैध असणारा गर्भपात करुन घेताना एक गरोदर तरुणी अन तिची मैत्रिण यांना सामोरं जायला लागणा-या दिव्याविषयी होता , अन त्यातली अनपेक्षित वळणं , वाढता तणाव हा कोणत्याही रहस्यपटाहून कमी नव्हता. मात्र त्याची शैली ही सेपरेशनपेक्षा खूप वेगळी होती. त्यात एका घटनेला सामाजिक अन्यायाचा प्रतिनिधी करुन तिच्याकडे तपशिलात पाहाण्यात आलं होतं. रहस्य अप्रत्यक्ष, केवळ वातावरणनिर्मिती अन व्यक्तिरेखांच्या वागण्यातून येणारी अनपेक्षितता यांवर आधारित होतं. सेपरेशन मधलं रहस्य अधिक पारंपारिक बाजाचं अन तरीही कठोर सामाजिक वास्तवाशी बेमालूम जोडलेलं आहे. चित्रपटाचा वेगदेखील ईराणी चित्रपटांत सहजी न दिसणारा ,भरधाव आहे. चित्रपट निवेदनात  प्रयोग करणं टाळतो , अन घटना सरळ रेषेतच घडल्या तशा मांडतो. अर्थात , रहस्याशी संबंधित दोन प्रसंग मात्र तो लपवतो, जे चित्रपटाच्या उत्तरार्धात पटकथेतला ताण वाढवत नेण्यासाठी उपयुक्त ठरतं.
नेहमीच्या रहस्यपटांत न आढळणारी ,पण इथे वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी गोष्टं म्हणजे इथली कोणतीही व्यक्ती प्रत्यक्ष गुन्हेगार नाही. प्रत्येकाला आपली बाजू आहे , आपल्या वागण्याचं तर्कशास्त्र आहे. खासकरुन नादेर आणि रझिये जे कितीही बिकट प्रसंगात आपलं म्हणणं सोडत नाहीत. दोघे कायमच योग्य वागतात असं नाही. उदाहरणार्थ नादेरची सत्याची व्याख्या थोडी फ्लेक्झीबल आहे आणि रझिये नव-याच्या चुकांवर भीतीपोटी पांघरुण घालत राहाते. तरीही  त्या दोघांचाही एका अंतिम न्यायावर विश्वास आहे. त्याचा आधुनिक दृष्टीकोनातून ,तर तिचा पारंपारीक . हा विश्वासच यातलं बहुतेक नाट्य घडवतो. काही प्रमाणात तोच यातला तिढा सोडवतोदेखील.
सर्वांच्याच दृष्टीने ’ए सेपरेशन’ हा या महोत्सवातला सर्वोत्कृष्ट चित्रपट असेलसं नाही, खासकरुन मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इतर अनेक दर्जेदार चित्रपटांचा साठा त्यांना इथे उपलब्ध झाला असताना. मात्र या चित्रपटाने या घडीचा जागतिक चित्रपट काय प्रकारचा ,कोणत्या वळणावरचा ,कोणती मूल्य मानणारा आहे याची जी जाणीव करुन दिली ,ती वादातीत आहे. बर्लिन आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरल्यापासून अनेक पारितोषिकं मिळवणा-या या सिनेमावर गोल्डन ग्लोबची मोहरही लागली आहे. आता तो ऑस्कर पारितोषिकांतही हजेरी लावताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
-गणेश मतकरी


( रविवार लोकसत्तामधून) 

6 comments:

VIVEK THE GENIUS AMONG U. January 22, 2012 11:31 PM  

रहस्यपट हा चित्र प्रकार सामाजिक आशय असणाऱ्या चित्रपटात वापरावयास येऊ लागलेत त्यामुळे चित्रपट त्याच-त्याच साच्यात अडकून राहणार नाहीत. मला हे विचारायचं आहे कि आपल्या येथे हिंदीत किंवा मराठीत निर्माते याचा वापर का करत नाहीत? आपल्या येथे असंख्य दिग्दर्शक फिल्म फेस्टिवल्स मधून गंभीर आणि सामाजिक आशय असणारे चित्रपट सातत्याने बनवत आले आहेत. पण आपले दिग्दर्शक त्याच-त्याच जुन्या पद्धतीचे चित्रपट काढत आहेत. मला वाटता आता वेळ आली आली आहे कि सामाजिक आणि गंभीर आशय असणाऱ्या विषयांना रहस्य, गूढ अशा चाकोरीच्या बाहेरच्या चित्रचौकटींचा वापर करावा ज्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षक पण या चित्रपटांना हजेरी लावेल.

Suhrud Javadekar January 23, 2012 11:27 PM  

While the film keeps you engrossed throughout, don't you think the director should have devoted more time to the breakup of the couple rather than on the other conflict involving the maid-servant...the sub-plot here is given more screen time than the 'separation'! The impending divorce and its effect on the child should've been explored in greater detail, I thought...

Digamber Kokitkar January 24, 2012 3:36 AM  

Vivek, thanks to raise same question which came in my mind. But i am concerned about marathi film. Since i feel marathi cinema now days become more experimental & even handling different kind of subject.

ganesh January 24, 2012 9:44 AM  

suhrud and digambar , I don't think so. separation is not really about a single divorce , it is about the cracks in the system. the title can be easily read as a separation , a gap between the previledged and the needy. thats what makes the film what it is. the divorce is more of a subplot and not the other way round . think about it. Digambar , i am not at all sure about what marathi cinema is doing. there was a time, about 2 /3 years ago when i was very hopeful ,but now i don't know anymore. i am not very satisfied with the recent crop. including shala.

ganesh January 24, 2012 9:46 AM  

very true vivek. i believe that day is near. with directors like anurag kashyap around.

hussain January 26, 2012 1:37 AM  

Really very nice review about 'A Separation'. Are you going to write about 'The girl with the dragon tattoo' of David Fincher.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP