द इल्युजनिस्ट'- एक काव्यात्म आविष्कार

>> Sunday, January 29, 2012

प्रत्येक माध्यम , प्रत्येक शैली ,ही आपले गुणविशेष , आपल्या त्रुटी , आपली बलस्थानं सोबत घेऊन येते , आणि अनेकदा समर्थ कलावंताच्या हातात अशा माध्यमांचा,अशा शैलीचा आविष्कार हा चमत्कार घडवणारा ठरु शकतो. अशा वेळी या आविष्कारांवर आपल्या पूर्वनियोजित कल्पना न लादता , एका मोकळ्या , स्वच्छ दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहाणं श्रेयस्कर ठरतं. 'अ‍ॅनिमेशन'कडे केवळ मुलांसाठी असणा-या 'कार्टुन फिल्म्स' म्हणूनच पाहाण्याची पध्दत
आपल्याकडे रुढ झालेली आहे. आजच्या काळात हा दृष्टिकोन किती अपुरा आहे हे सिध्द करणा-या उदाहरणांना तोटा नाही. मुलांइतक्याच किंवा त्याहूनही अधिक प्रमाणात मोठ्याना गुंगवणा-या पिक्सारच्या फिल्म्स, जपानी अ‍ॅनिमेटर मियांझाकीचा सिनेमा, प्रौढ प्रेक्षक काही प्रमाणात गृहीत धरणारी अ‍ॅनिमे
शैली किंवा  रेनेसान्स, वेकिंग लाईफ, वॉल्ट्झ विथ बशीर सारखे धीट प्रयोग या सगळ्यातून या चित्रशैलीचं अष्टपैलूत्व एव्हाना लक्षात यायला हवं. पण ज्याना आणखी एखाद्या पुराव्याची आवश्यकता वाटत असेल, त्यानी  सिल्वेन शोमेचा 'द इल्युजनिस्ट' (२०१०) जरुर पाहा़वा.
चित्रपट घडतो तो १९५० च्या आसपास. नावात सुचवल्याप्रमाणेच , इल्युजनिस्टच्या केंद्रस्थानी आहे एक जादूगार.मध्यमवयीन ’टाटिशेफ’ आपल्या
कामात ब-यापैकी पारंगत आहे ,पण काळच असा आलाय की त्याच्या परीचित जादूच्या प्रयोगात कोणालाच फारसा रस नाही.पिढी बदलतेय, आवडी बदलतायत, आदर्श बदलतायत आणि अनेक छोट्या मोठ्या रंगमंचांवर हजेरी लावूनही त्याला यश मिळताना दिसत नाही. ही व्यथा त्याची एकट्याची नाही . पारंपारीक करमणूकीत हमखास हजर असणारे विदूषक , बोलक्या बाहुल्या खेळवणारे , अशा अनेक कलाकारांना बदलत्या परिस्थितीनुसार बदलणं ,वा संपून जाणं असे दोनच पर्याय उरलेले दिसतात.चेहरा निर्विकार ठेवत पण काहीशा विमनस्क अवस्थेत असणारा टाटिशेफ कामाच्या शोधात स्कॉटलन्डमधल्या एका छोट्या खेड्यात पोहोचतो आणि तिथे त्याची गाठ एका सोळा सतरा वर्षांच्या मुलीशी पडते. शहरी चलाखीपासून दूर असणारी ही मुलगी त्याला खरोखरीचा जादूगार समजते आणि त्याच्यासोबत शहरात येऊन पोचते.त्याच्या जादूकडे कुतूहलमिश्रीत आदराने पाहाणारी ती, अन व्यक्तिगत अडचणींना तोंड देतानाही तिच्या नजरेत आपली प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न करणारा तो, यांच्यात हलकेच एक नातं तयार होतं. मात्र बदलत्या काळात हा नाजूक धागा फार काळ टिकण्याची चिन्ह दिसत नाहीत.
'द इल्यूजनिस्ट'च्या पटकथेचा आराखडा हा गाजलेले चित्रकर्ते जाक टाटी (मूळ नाव टाटिशेफ)यांनी लिहिलेला, तोही चित्रपट घडतो त्याच काळात. त्यातली प्रमुख व्यक्तिरेखा ही त्यांच्या स्वत:वरच बेतलेली, त्याशिवाय चित्रपटातले काही महत्वपूर्ण घटकही आत्मचरित्रात्मक. त्यामुळे चित्रपट
जरी जुन्या काळात घडणारा असला तरी त्याचं स्वरूप स्मरणरंजनात्मक, नॉस्टाल्जिक नाही. पटकथाकार त्याच्या तत्कालिन मनस्थितीविषयी, तत्कालीन निरीक्षणांविषयी लिहीत असल्याने, त्यात एक ताजेपणा आहे.या काळातली त्याला होणारी कलाक्षेत्रातून बाहेर फेकलं जात असल्याची जाणीव किंवा चित्रपटातलं त्याचं पहिलं मोठं यश ( मि. हुलॉट्स हॉलिडे)दूर असल्याने आलेलं नैराश्य ,हे सारं अस्सल आहे. मात्र त्याहून अधिक जाणवणारं आहे ते जादूगार अन मुलगी यांमधलं अव्यक्त नातं ,जो आपण दुर्लक्ष केलेल्या अनौरस मुलीविषयी असणा-या भावनांना शब्दात पकडण्याचा टाटीने केलेला प्रयत्न आहे. ही सारी पार्श्वभूमी , जी प्रेक्षकाला माहीत असेलशी अपेक्षा नाही- तशी गरजही नाही , केवळ आपल्या असण्यातून या चित्रपटाला एक अस्सलपणा आणून देते.टाटीनी हा चित्रपट कधीच बनवला नाही. अर्थात तेव्हा तो लाइव्ह अ‍ॅक्शनच बनता, अ‍ॅनिमेटेड नाही.मूळ संदर्भ माहीत नसलेल्या वा लावण्याची इच्छा नसलेल्या प्रेक्षकासाठी मात्र ही गोष्ट सेल्फ कन्टेन्ड आहे. चित्रपटाला जे सांगायचंय ते त्यात पूर्णपणे आलेलं आहे.
प्रत्यक्ष चित्रपट हा जवळजवळ काव्यात्म परिणाम साधणारा आहे. पारंपारिक 2-D अ‍ॅनिमेशन शैली आणि संगणकीय 3-डी यांचा एकत्रित वापर असूनही इथे त्याचा अंतिम प्रभाव हा हाती रंगवलेल्या अन अत्यंत मेहनतीने काढलेल्या चित्रांसारखा आहे. प्रत्यक्ष खूप तपशील न भरताही रंगछटांचा तरबेज
वापर,छायाप्रकाशाचा खेळ आणि खोली दाखवण्यातली हातोटी यातून उभी राहाणारी निसर्गदृश्य आणि अभिजात वास्तुकलेचे नमुने पाहात राहाण्यासारखेच आहेत.शोमेचा २००३ चा चित्रपट , ' द ट्रिपलेट्स आॅफ बेलव्हिल ' खूप यशस्वी ठरला होता अन ते यशच ही संहिता त्याच्याकडे पोचण्यासाठी कारणीभूत ठरलं. मात्र इथे गती आणि आशय या दोन्ही गोष्टी त्या चित्रपटाहून अगदीच वेगळ्या पध्दतीने , तरल बनून येतात. अ‍ॅनिमेशनच्या वापरासाठी तडजोडी केल्या जात नाहीत.आशय सोपा करण्याचा प्रयत्न होत नाही, विनोदाला मूळ पटकथेत अपेक्षित मर्यादेपलीकडे जाऊ दिलं जात नाही आणि विषयाची संवेदनशीलता टिकवली जाते. इल्यूजनिस्ट मधे संवाद जवळपास पूर्णपणे गैरहजर आहेत, निदान अर्थ पोहोचविण्याच्या दृष्टीने. अधेमधे पात्र इंग्रजी, फ्रेन्च वा इतर भाषात माफक बोलतात , मात्र ते प्रामुख्याने उद््गारवाचक प्रकारचं. आपल्याला ते कळण्या ,न कळण्याने फरक पडत नाही.भावना आणि अर्थ पोचतो तो बोलण्याच्या पध्दतीवरुन.

इल्युजनिस्ट ही उघडच प्रेमकथा आहे, मात्र ते प्रेम रोमान्सच्या सांकेतिक कल्पनांवर आधारलेलं नाही. किंबहूना ,यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांमधे तयार होणारं नातं काहीसं व्याख्येपलीकडे जाणारं आहे. वात्सल्याकडे झुकणारं. मात्रं केवळ या नात्याचं उलगडणं म्हणजेदेखील हा चित्रपट नव्हे . एका विशिष्ट स्थलकालाची गोष्ट तो मांडतो. त्याचबरोबर आधुनिकतेपुढे परंपरेची होणारी पिछेहाट दाखवतो, वयात येणं म्हणजे काय हे सांगू पाहातो , सत्य आणि आभास यांमधली सीमारेषा शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याला शोकांतिका किंवा सुखांतिका ठरवणंही तितकंसं सोपं नाही, प्रत्येक प्रेक्षक त्याकडे कोणत्या नजरेने पाहातो यावर ते अवलंबून राहील. कदाचित या प्रेक्षकापुरती सर्वात महत्वाची ठरणारी व्यक्तिरेखा त्याचा चित्रपटाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन ठरवेल, कदाचित त्याचा अनुभव ,किंवा कदाचित त्याचं वयदेखील !
- गणेश मतकरी
 (दीव्य मराठीमधील सदरातून.)

1 comments:

attarian.01 January 29, 2012 11:31 PM  

Thanx........i will find and watch.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP