रोबोपोकॅलिप्स मधे यंत्रांनी मानवजातीशी युध्द पुकारल्याची कल्पना आहे तर वर्ल्ड वाॅर झी मधे होणारा हल्ला हा झाॅम्बी वा तशी लक्षणं दाखवणा-या रोगग्रस्त माणसांचा आहे. प्रत्यक्षात झाॅम्बींशी लढावं लागत असल्याने त्यात युध्दाच्या हिंसक इमेजरीला स्थान असलं तरी हे पारंपरिक अर्थाने युध्द नसून भयानक रोगाची साथ आहे. त्याचं या प्रकारचं चित्रण हे झाॅम्बींंना त्यांच्या भयाच्या कवचातून बाहेर काढतं आणि त्याच्या कथनाचा नोंदवहीसारखा दृष्टिकोन, त्याची शैली परिचित भयकथांच्या जवळ जाऊ देत नाही.
पुस्तकाबद्दल एवढं सांगितल्यावर हेही सांगायला हवं की मार्क फाॅस्टर दिग्दर्शित 'वर्ल्ड वाॅर झी' चित्रपट हा पुस्तकाहून खूपच वेगळा आहे. पुस्तकाला म्हणावा असा नायकच नाही. आहेत त्या सुट्या घटना आणि त्यांमधून तयार होणारा एक आलेख. या घटनांमधे स्वतंत्रपणे नाट्य जरुर आहे, किंबहुना त्यातल्या काही तर कथा म्हणून उत्कृष्ट वाटतीलशा आहेत, पण त्यांना एकत्रितपणे बांधणारी प्रातिनिधिक नायक व्यक्तिरेखा, त्यात नाही. अशा व्यक्तिरेखेखेरीज या चित्रपटाला अस्तित्व असणं कठीण असा व्यावसायिक विचार निर्मात्यांनी ( ज्यात ब्रॅड पिट स्वतःही आहे) केला असावा. मग यावर मार्ग काय, तर अशी एक व्यक्तिरेखा तयार करणं, जी नायकसदृश असेल, आणि तिच्या आधारे चित्रपट जागतिक वारी करु शकेल.
हा नायक आहे जेरी लेन ( ब्रॅड पिट) . एकेकाळी यु एन साठी काम करणारा अधिकारी पण सध्या निवृत्त. चित्रपट जेरीला धरुन राहातो आणि त्याची उपस्थिती कायम ठेवत कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटातले पहिले दोन सिक्वेन्सेस अतिशय चतुर पटकथेचे नमुने आहात. पहिला आहे तो केवळ एक प्रसंग ज्यात आपल्याला जेरीच्या कुटुंबाची आणि कौटुंबिक जीवनाची थोडक्यात आेळख करुन दिली जाते. चित्रपटाचा अवाका मोठा असल्याने त्याला बिनमहत्वाच्या गोष्टींवर घालवायला वेळ नाही. मात्र बराच काळ जेरी एकटा राहाणार हे उघड असल्याने प्रेक्षक भावनिकरीत्या समरस होण्यासाठी त्याला एक तो पैलू असणंही आवश्यक. या प्रसंगात थोडक्यात तो कोण आहे याची थोडक्यात पण पूर्ण आेळख करुन दिली जाते जी संपूर्ण चित्रपटात कामाला येते.
दुसरा सिक्वेन्स मोठा आहे. तो म्हणजे जेरीशी आणि प्रेक्षकांशी होणारी झाॅम्बीजची पहिली आेळख. ही प्रसंगमालिका सुरू होते, ती गाडीच्या अंतर्भागात,आनंदी जेरी आपली पत्नी आणि दोन मुलींबरोबर ट्रॅफिक मधे अडकला असताना आणि शेवट होतो तो हेलिकाॅप्टरमधून निघालेला, पुढल्या क्षणाची खात्री नसलेला जेरी हेलिकाॅप्टरमधून खालच्या उध्वस्त शहराकडे पाहात असताना. यातला विनाश हा मायक्रोपातळीवर, पोलिसच्या बाईकने जेरीच्या गाडीचा आरसा तोडण्यापासून सुरु होतो आणि संपतो तो मॅक्रो पातळीवर, संपूर्ण शहराचं रणभूमीत रुपांतर झाल्यावर. इथे आपल्याला झाॅम्बींपासूनचा खरा धोका कळतो, इतर चित्रपटांहून वेगळी असणारी झाॅम्बींची प्रचंड गती दिसते, ही साथ कशी पसरते हे दिसतं, विनाशाच्या विविध पातळ्या दिसतात, आणि एकूणच बर््याच गोष्टी स्पष्ट होतात. चित्रपट झाॅम्बी फिल्म चित्रप्रकारातला असूनही त्याची प्रकृती ही अधिक अॅक्शन थ्रिलर वळणाची असेल हेदेखील आपल्याला इथेच समजतं.
मला सामान्यतः क्राॅस जेनेरीक फिल्म्स आवडतात. मात्र त्या त्या चित्रप्रकाराची वैशिष्ट्य त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला तर अधिक आवडतात. वर्ल्ड वाॅर झी, हा हाॅरर, साय फाय आणि अॅक्शन थ्रिलर यांच्या तिठ्यावर उभा आहे, मात्र तो थ्रिलर्सची वैशिष्ट्य जितक्या प्रामाणिकपणे उचलतो तितकी इतर दोन प्रकारची घेत नाही. भयपटांवर या भानगडीत फारच अन्याय होतो. हा चित्रपट सामान्य भयपटांप्रमाणे केवळ प्रौढांसाठी असू नये असा चित्रकर्त्यांचा इरादा आहे, पण ते साधताना त्यांना अनेक गोष्टींमधे पाणी घालावं लागतं. रक्ताबिक्ताचं प्रमाण तर कमी करावंच लागतं पण झाॅम्बींनी इतर लोकांना मारणंही सूचक किंवा बर््याच प्रमाणात आॅफ स्क्रीन ठेवावं लागतं. यामुळे या चित्रप्रकाराचा प्रभाव पुरेसा उरत नाही. तरीही परिणामकारक ठरते ती झाॅम्बींची प्रचंड संख्या आणि गती. मी झाॅम्बी स्कूलच्या सर्वे सर्वा जाॅर्ज रोमेरोचे हल्लीचे काही चित्रपट पाहिले नाहीत पण सामान्यतः झाॅम्बींची गती खूप संथ असते. ती वाढवणारा आणि रोगाच्या साथीचं कारण पुढे करणारा डॅनी बाॅइलचा '२८ डेज लेटर' आला होता, आणि मथीसनच्या कादंबरीवर आधारीत 'आय अॅम लेजन्ड' मधेही त्याच्या छटा होत्या, पण त्यात ' झाॅम्बी' असणं नसणं इतकं महत्वाचं नव्हतं. इथे उघडच ते आहे.
या चित्रपटाची रचना ही प्रामुख्याने सेट पीसेसची बनलेली आहे. जेरीला विविध देशांत येणारे अनुभव ,ही थीम झाल्याने त्याला इलाज नाही. फाॅस्टरने याआधी बाॅन्ड सीरीजमधला 'क्वान्टम आॅफ सोलेस' केल्याने, ही रचना त्याला नक्कीच परीचयाची आहे. हे तुकडे स्वतंत्रपणे चांगले आहेत. मला स्वतःला यातला जेरुसलेमचा भाग खूप आवडला जो बराचसा सेल्फ कन्टेन्ड आणि मूळ पुस्तकाची आठवण करुन देणारा आहे. शेवटाकडचा रेझोल्यूशनकडे नेणारा तुकडाही असाच जमलेला पण भयपटाच्या अधिक जवळ जाणारा आहे. मात्र या तुकड्यांचा एकत्रित परिणाम मात्र जितका हवा तितका चढत नाही. गोष्टीची भव्यता राहाते, पण वर्ल्ड वाॅरची पातळी गाठते असं वाटत नाही. अशी शक्यता आहे, की चित्रपट एका टप्प्यापर्यंत आणून पुढल्या भागांमधे त्याला वाढवत न्यावं अशी कल्पना असेल. पण तसं असेल तर हा शेवट गरजेपेक्षा अधिक पुरा वाटतो.
शक्यता अशी आहे की मुळात प्रयोग असणार््या या कादंबरीच्या रुपांतरातही हा प्रयोग राहाता तर कदाचित ते रुपांतर अधिक प्रभावी ठरलं असतं. मात्र ब्रॅड पिटचं नाव जोडलं गेल्याने त्याच्या निर्मितीत अधिक खर्च करता आला आणि आता त्याला प्रेक्षकही अधिक मिळतील हेही तितकच खरं . शेवटी त्यालाही अमुक एका प्रमाणात महत्व आहेच !
पोस्ट स्क्रिप्ट - कदाचित या पुस्तकावर काॅल आॅफ ड्यूटी किंवा माॅडर्न काॅम्बॅट मालिकेसारखा गेम अधिक परिणामकारक झाला असता, ज्यात एकाएेवजी अनेक नायक असतील आणि खेळणार््याला वेगवेगळ्या भूमिकेतून खेळून कथाभाग पूर्ण करता येईल. सध्याच्या त्यांच्या टॅब्लेट/ फोन गेम मधे मात्र त्यांनी अशी योजना केलेली नाही. इथली मुख्य भूमिका जेरीची नसली ,तरी नायकाची व्यक्तिरेखा एकच आहे. असो, ही कल्पना गेम डेव्हलपर्सकडून सुटणारी नाही, त्यामुळे या नाही, तर वेगळ्या नावाने तिची अंमबजावणी होईलच हे नक्की.
-गणेश मतकरी.

धन्यवाद , तुमच्या कडून क्लासिक चित्रपट च्या अपेक्षा आहेत , परीक्षण आ च्या . ब्लॉग खरच अप्रतिम आहे . मी आसच ब्लॉग तीन चार वर्ष जाले शोदत आहे , पण सापडत नाहि . कमी लेखा मुले जुने ब्लॉग पुन्हा वाचावे लागतात . मजा येते . कमेन्ट सुधा वाचतो . कमेंट्स मुले सुधा नवी माहिती मिलते . तुमचा इनवेस्टमेंट कधी येतो ???
ReplyDelete--