Saturday, December 21, 2019

स्कायवाॅकर सागाची अखेर

मी काॅलेजमधे असताना मुंबईतल्या लिबर्टी थिएटरमधे/ किंवा क्वचित स्टर्लिंगला मॅटिनी शोजना काही जुन्या चांगल्या फिल्म्स लागायच्या. म्हणजे खूप जुन्या नाही, पंधरा वीस वर्ष जुन्या. ज्या मुळात आल्या तेव्हा आम्ही खूपच लहान होतो, आणि पुढे पहाण्याची संधी आली नाही. या काळात व्हीसीआर होते, पण मोठा स्क्रीन तो मोठा स्क्रीन. मी आणि माझा एक मित्र जमेल तेव्हा जाऊन या फिल्म्स पहायचो. क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काईन्ड, रेडर्स ऑफ द लाॅस्ट आर्क, वगैरे फिल्म्स मी अशा पाहिल्या. यातच कधीतरी मला मूळ स्टार वाॅर्स (१९७७, एपिसोड ४- ए न्यू होप) पहायला मिळाला. फिल्मबद्दल मला फार कुतुहल होतं. त्याबद्दल काहीकाही वाचलेलं होतं, ‘इन्डस्ट्रीअल लाईट ॲन्ड मॅजिक’ ( ILM) या जाॅर्ज ल्युकसने स्टार वाॅर्सच्या निर्मितीच्या निमित्ताने काढलेल्या आणि पुढे हाॅलिवुड गाजवणाऱ्या संस्थेबद्दल ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीत असलेल्या जाडजूड पुस्तकाची पारायणं झाली होती,  अगदी आपल्याकडे ग्रह युद्धे नावाच्या वाईट्ट शीर्षकासह केलेलं त्याचं नाॅव्हेलायजेशन म्हणा, किंवा इंग्रजी नाॅव्हेलायजेशनचा अनुवाद म्हणा ( लेखक बहुधा अरुण ताम्हणकर ) पण मी शाळेत असताना मिळवून वाचला होता. फाॅर्चुनेटली आता तो अजिबात आठवत नाही.

आम्ही पाहिलेली प्रिन्ट फारशी बरी नव्हती, किवा प्रोजेक्शन तरी खूप खास नव्हतं. त्यामुळे अंधारं, जुनं काहीतरी पहात असल्याचा इफेक्ट होताच. तराही दृश्य परिणाम थक्क करणारा होता. हे नव्या छान प्रिन्टनिशी कधी पहायला मिळेल, असं वाटून गेलं. पण जिथे खराब प्रिन्टसहदेखील एपिसोड ५ आणि ६ पहायला मिळेनात, तिथे नव्या प्रिन्ट कुठल्या मिळायला ! पण ही इच्छा लवकरच पुरी होणार होती. ल्युकसने केलेली त्रयी ही सुरुवातीपासून गोष्ट सांगणारी नव्हती हे तर सर्वांना माहीत होतच,  त्याच्या आगे आणि मागे असलेला कथाभाग सांगण्याची त्याची इच्छाही माहीत होती, पण ए न्यू होप (१९७७), द एम्पायर स्ट्राईक्स बॅक (१९८०) आणि रिटर्न ऑफ द जेडाय ( १९८३)  ही मूळ त्रयी संपवल्यानंतर त्या विश्वात घडणाऱ्या ॲनिमेटेड मालिका, काॅमिक्स, असले उद्योग करुनही, तो मूळ कथानक पुढे ( आणि मागे )  नेणाऱ्या फिल्म्सवर काही करण्याची चिन्ह अनेक वर्ष नव्हती. मग अचानक स्टार वाॅर्स कॅंपमधे काहीतरी हालचाल दिसायला लागली. १९९७ मधे मला महानगरमधे चित्रपटसमीक्षा करण्याची संधी मिळाली, तेव्हा रिव्ह्यू करायच्या पहिल्याच सिनेमाचं नाव मला अत्यंत आनंद देणारं होतं. ती होती एपिसोड चारची स्पेशल एडीशन. लगोलग या तिन्ही फिल्म्स उत्तम प्रिन्टमधे, आणि नव्या सुधारित आवृत्त्यांमधे पहाता आल्या, आणि त्याबद्दल लिहिताही आलं. लवकरच येऊ घातलेल्या इतर फिल्म्सकडे पहाण्याची मनाची तयारीही झाली.

१९७७ मधे सुरु झालेल्या या ‘स्कायवाॅकर सागा’ मधली अखेरची फिल्म, ‘द राईज ऑफ स्कायवाॅकर’, काल प्रदर्शित झाली. तीन पिढ्यांचा इतिहास नऊ चित्रपटांमधून मांडणारी ही भव्य कहाणी  चार दशकांहून अधिक काळ घेत पडद्यावर उतरली. या चित्रपटांचा दर्जा क्षणभर बाजूला ठेवला, तरीही एकूण हा प्रकल्प पुरा करणं हे प्रचंड महत्वाकांक्षी काम आहे, हे कोणीही मान्य करेल. या मालिकेचे चहातेही काही पिढ्यांवर पसरलेले आहेत. काहींनी ते चित्रपट लागले तसे पाहिले , काहींनी केवळ नवी त्रयी मोठ्या पडद्यावर पाहिली, आणि आधीचा रिकॅप छोट्या पडद्यावर पाहून घेतला. काहिंनी चित्रपटाबरोबर कथा कादंबऱ्या, काॅमिक्स,मालिका यांमधून पसरलेल्या या विश्वाचीही माहिती करुन घेतली आहे. माझ्यापुरतं म्हणायचं, तर मी चित्रपटांचा फॅन आहे. ते सगळे  मी मोठ्या पडद्यावर पाहिलेले आहेत, आणि कालच्या चित्रपटाने स्कायवाॅकर कुटुंबाची कथा समाधानकारक रितीने शेवटापर्यंत आणली आहे, असं मी खात्रीने म्हणू शकतो.

या तीन चित्रत्रयींबद्दल ढोबळमानाने सांगायचं, तर म्हणता येईल की प्रिक्वल त्रयी ही प्रभावात थोडी कमी होती, विशेषत: त्यातला पहिला भाग, ‘एपिसोड १:  फॅन्टम मेनेस’ (१९९९)  , ज्यात छोट्या ॲनाकिन स्कायवाॅकरचं काम करणाऱ्या जेक लाॅईडवर खूप टिका झाली. त्याशिवाय जार जार बिन्क्स हे त्रासदायक ॲनिमेटेड कॅरेक्टर आणि एकूण चित्रपटाचा फार प्रभाव न पडणं, यामुळे फॅन्स नाराज ढाले. पण प्राॅडक्शन डिझाईनच्या बाबतीत चित्रपट ल्युकस आणि आयएलएमच्या किर्तीला शोभण्यासारखा होताच. कदाचित ल्युकस अनेक वर्षांनंतर , म्हणजे १९७७ च्या पहिल्या चित्रपटानंतर तब्बल बावीस वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळत असल्याचा हा परिणाम असेल, किंवा चाहत्यांच्या प्रचंड वाढलेल्या अपेक्षाही त्याला कारणीभूत असतील. पण ‘एपिसोड २: अटॅक ऑफ द क्लोन्स’ ( २००२ ) पासून गाडी वळणावर आली. असं असूनही, या तीनही त्रयी परस्परांपासून भिन्न भूमिका निभावतात, त्यामुळे अशी तुलना खरं तर करु नये या मताचा मी आहे. ल्युकसची मूळ गोष्ट ल्यूक स्कायवाॅकर ( मार्क हॅमिल), लिआ ( कॅरी फिशर ) आणि त्यांचा बेडर मित्र हान सोलो ( हॅरिसन फोर्ड)  , या तिघांनी एम्पायरविरोधात दिलेल्या लढ्याची आहे. वीर जेडाय योद्धे विरुद्ध क्रूर सिथ, या काळ्या पांढऱ्या बाजू या संघर्षातला महत्वाचा भाग आहे, आणि ‘फोर्स’ ही या विश्वात समतोल आणू शकणारी दैवी शक्ती आहे. पहिल्या त्रयीतच आपल्याला कळतं, की डार्थ व्हेडर हा एम्पायरचा प्रमुख सेनापती हाच ल्यूक आणि लिआचा बाप आहे, आणि डार्थ सिडीअस अर्थात पॅलपिटीनच्या हाताखाली तो विश्वावर कब्जा मिळवायचा प्रयत्न करतो आहे. स्कायवाॅकर भाऊबहीण आणि सोलो विरुद्ध एम्पायर, हा या संपूर्ण कथानकातला मध्यवर्ती संघर्ष आहे. पहिली त्रयी, ही ॲनाकिन स्कायवाॅकर या जेडायचं क्रूर डार्थ व्हेडरमधे रुपांतर कसं झालं याची गोष्ट सांगते, तर अखेरची त्रयी ही संघर्षाचा शेवट कसा झाला याबद्दलची आहे.

तिनही त्रयींमधे मधल्या चित्रपटांचं, म्हणजे अटॅक ऑफ द क्लोन्स (२००२, दिग्दर्शक जाॅर्ज ल्युकस ) , द एम्पायर स्ट्राईक्स बॅक (१९८०, दिग्दर्शक अर्विन कर्शनर) आणि द लास्ट जेडाय ( २०१७, दिग्दर्शक रायन जाॅन्सन ) या तीन चित्रपटांचं सर्वाधिक कौतुक झालय. यात आश्चर्य नाही कारण प्लान्ड ट्रिलजी असताना हे बहुतेकदा झालेलं दिसतं. पीटर जॅक्सनची ‘लाॅर्ड ऑफ द रिंग्ज’ त्रयी, हे आणखी एक, तसं अलीकडचं उदाहरण. कथा समजून घेण्याच्या दृष्टीने जरी मधले भाग अपुरे असले; कारण कथेची सुरुवात आणि शेवट हे दोन्ही त्यात दाखवले जात नाहीत, तरी परिणामात ते त्यामुळेच वरचढ ठरतात. व्यक्तीरेखांची ओळख, मूळ कथासूत्रांचा परिचय, सेट अप, यात ते वेळ घालवत नाहीत, आणि शेवट कथानक गुंडाळण्याचीही त्यांच्यावर जबाबदारी नसते. त्यामुळे हे चित्रपट एकाच वरच्या गीअरमधे भरधाव पुढे जातात. हाच न्याय जर आपण तीन त्रयींना लावला, तर पहिलीवर सेट अपची जबाबदारी आल्याने, तर अखेरची कथानक शेवटाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असल्याने किंचित मागे रहातात.४/५/६ भागांची मूळ त्रयी केवळ संघर्ष मांडत असल्याने अधिक प्रभावी वाटते.

मूळ त्रयी आणि अखेरची त्रयी यांमधे बरच साम्य आहे. कारण त्यातला संघर्ष बराचसा सारखा आहे. लिआ, ल्यूक , सोलो, या त्रिकुटासारखच इथे रे ( डेझी रिडली ) , फिन ( जाॅन बोयेगा ) आणि पो ( ऑस्कर आयझॅक ) हे त्रिकुट आहे. व्हेडर ऐवजी त्याचा नातू, लिआ आणि हानचा एम्पायरला सामील झालेला मुलगा बेन सोलो/कायलो रेन ( ॲडम ड्रायव्हर) आहे. यात लिआ आणि ल्यूक प्रमाणे भावाबहिणीची जोडी नसली, तरी कॅरेक्टर्स त्या प्रकारची आहेत. अडचण एवढीच, की व्हेडर ही व्यक्तिरेखा मुखवट्यामागे लपलेली आणि तिचा वापर कमी आणि प्रामुख्याने दहशतीपुरता होता. कायलो रेन मात्र सततच्या वावरामुळे आणि रेबरोबरच्या प्रसंगांमुळे अधिक प्रभावी ठरतो, आणि त्यामानाने फिन आणि पो दुय्यम वाटायला लागतात. नीट पाहिलं तर लक्षात येईल की पहिल्या त्रयीत नायकाचा ॲनाकिन ते डार्थ व्हेडर असा गडद होत जाणारा ग्राफ होता, त्याच्या बरोबर उलटा ग्राफ इथे आहे, कायलो रेन ते बेन सोलो असा प्रवास यात येतो. या पद्धतीने अनेक घटक या नऊ चित्रपटात आहेत, जे परस्परांना बॅलन्स करतात. तिन्ही त्रयींमधे असलेले C3PO, R2D2, चुबॅका, पॅलपिटीन, पहिल्या आणि दुसऱ्या त्रयीत असलेला व्हेडर, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रयीत असलेले ल्यूक, लिआ, सोलो,  हेदेखील कथेत एक प्रकारची संगती ठेवतात. कॅरी फिशरचा २०१६ मधे मृत्यू झाल्याने ती या भागात असेल का याबद्दल काही एक साशंकता होती. पण द फोर्स अवेकन्स आणि द लास्ट जेडाय या सातव्या आणि आठव्या भागातल्या चित्रपटात न वापरलेल्या दृश्यांमधून तिला या अखेरच्या चित्रपटातही स्थान मिळालं आहे.

‘द राईज ऑफ स्कायवाॅकर’ (दिग्दर्शक जे. जे. एब्रम्स)  हा अंतिम त्रयीचा अंतिम भाग, म्हणजे खरं तर एकूण कथानकाचा क्लायमॅक्सच आहे. त्यामुळे तसाही तो स्वतंत्र सिनेमा म्हणून पहाणाऱ्याला कळेल अशी अपेक्षा नाही. ज्यांनी आधीचे चित्रपट ( अगदी सगळे नसले तरी बरेच ) पाहिले आहेत, ज्यांना या व्यक्तीरेखा माहीत आहेत, त्यांनाच तो कळणार. असं असताना तो नुकत्याच आलेल्या ‘ॲव्हेंजर्स: एन्ड गेम’ प्रमाणे कथेला दुय्यम महत्व देऊन व्यक्तीरेखा आणि ॲक्शन यांना प्राधान्य देणारा असू शकला असता. पण स्टार वाॅर्सने आपल्या इतर चित्रपटांप्रमाणे बरीचशी मांडणी ठेवली आहे. त्यांच्या ठराविक पद्धतीप्रमाणे सीक्वल्स ही घटनांना सलग पुढे नेत नाहीत. दोन चित्रपटांमधे काळ गेलेला असतो आणि त्यातल्या घटना लिखित रिकॅप सारख्या चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जातात. मुख्य कथाभाग हा मोजक्या महत्वाच्या प्रसंगामधून उलगडतो. इथे कायलो रेन आणि पॅलपटीनची भेट होते, इथे चित्रपटाची सुरुवात होते. एका हेराकडून पॅलपटीनचा डाव बंडखोरांना कळल्यावर रे त्याच्या मागावर जायचं ठरवते, पण त्यासाठी वेफाईंडर, ही नकाशासारखी वस्तू सापडणं आवश्यक असतं. त्या वस्तूच्या मागे रे, फिन आणि पो जातात आणि त्यांचा सामना कायलो रेनशी होतो.

हा त्रयीचा अखेरचा भाग असल्याने चित्रपटात मालिकेत येऊन गेलेली स्थळं, व्यक्तीरेखा, वस्तू, प्रतिमा, आणि महत्वाच्या प्रसंगांची आठवण जागवणारे नवे प्रसंग यांची रेलचेल आहे. एका परीने ‘बेस्ट ऑफ स्कायवाॅकर सागा’ असं याला म्हणता येईल. मिलेनीअम फाल्कनच्या करामती, चुबॅकाचा चेससारखा खेळ, ल्यूकच्या ट्रेनिंगची आठवण करुन देणारं रेचं ट्रेनिॅग,  सेकंड डेथ स्टारवरच्या प्रसंगात होणारी ‘रिटर्न ऑफ द जेडाय’ची आठवण, टॅटूईनवरचा दुहेरी सूर्यास्त अशा अनेक जागा सांगता येतील.

फिन आणि पो हे त्रयीत एकूणच दुर्लक्षित होत गेलेले आहेत. या चित्रपटात मात्र हे प्रमाण खूपच आहे. कायलो रेनची इथली व्यक्तीरेखा आणि रेचं त्याच्याकडे ओढलं जाणं हे या चित्रपटासाठी विशेष महत्वाचं आहे. रेचं जन्मरहस्य उलगडून चित्रपट कायलो रेन आणि रेच्या जोडीला एक वेगळं वजनही आणून देतो. एका अर्थी तेच इथले नायक आणि नायिका असल्याप्रमाणे वाटतात, आणि खरं तर ते आहेतही. चित्रपटाचा शेवट सर्वांना समाधानकारक वाटेल असं नाही, आणि त्या विरोधात समीक्षकांची मतंही मी वाचली आहेत, पण फॅन्सकडून बहुधा चित्रपटाचं स्वागत होईल.

‘द राईज ऑफ स्कायवाॅकर’ हा ‘स्कायवाॅकर सागा’चा शेवट असला, तरी स्टार वाॅर्स विश्वाचा शेवट नक्कीच नाही हे रोग वन, आणि सोलो या स्वतंत्र चित्रपटांनी सूचित केलच आहे. टिव्ही आणि सिनेमा, या दोन्ही प्रांतात स्टार वाॅर्सचं विश्व पुढे बराच काळ टिकेल अशीच अपेक्षा आहे.
-  गणेश मतकरी

No comments:

Post a Comment