वास्तवाची पुसट सीमारेषा आणि मेट्रिक्स
>> Monday, June 28, 2010
आपण ज्या जगात वावरतो आहोत, त्याचं काहीतरी बिनसलंय, बिघडलंय असं तुम्हाला कधी वाटलंय? भोवताली घडणा-या गोष्टी वरवर नैसर्गिक वाटल्या तरी त्या तशा घडण्यामागे कोणाचा तरी हात आहे, असा विचार कधी तुमच्या डोक्यात आलाय ? जर आला असेल तर `मेट्रिक्स` चित्रपट मालिकेच्या चाहत्यांमध्ये तुमचा समावेश करायला हरकत नाही. १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या `मेट्रिक्स`ला न भूतो न भविष्यती असं यश मिळेल असं ना वॉर्नर ब्रदर्सला वाटलं होतं, ना दिग्दर्शक बंधू वाचोस्कींना. पण त्यातली `आजूबाजूचं जग खरं नसून अद्ययावत संगणकांनी निर्माण केलेली प्रतिमा आहे, अन् माणसं या यंत्रांचे गुलाम आहेत` ही कल्पना अचानक मोठ्या प्रमाणात जगभर उचलून धरली गेली आणि चित्रपट मालिकेला जोरदार सुरुवात झाली. जवळजवळ मसीहा असलेला यातला नायक निओ (किआनू रीव्हज) हा त्याच्या निद्रिस्त अवस्थेतून जागा केला जातो. मॉर्फिअस (लॉरेन्स फिशबर्न) आणि ट्रिनिटी (कॅरी अँन मॉस) या दोघांबरोबरच इतरांच्या सहाय्याने तो `मेट्रिक्स` या संगणकीय प्रणालीच्या आणि पर्यायाने यंत्राच्या तावडीतून मानवजातीची सुटका करण्यासाठी कसा झगडतो हा `मेट्रिक्स`चा कथाभाग आहे.
मुळात मेट्रिक्स हा विज्ञानपट असला, तरी तो विज्ञानपटाच्या नेहमीच्या व्याख्येत बसत नाही तो त्याच्या एकाचवेळी विचारप्रवर्तक, अॅक्शनपॅक्ड आणि स्पेशल इफेक्ट्सने भरलेला असल्याने, शिवाय यात नेहमीच्या अवकाशातली युद्धं, यानं, यंत्रमानवांचे ताफे वैगैरे मसाला आढळत नाही. सर्वच बाजूंनी `मेट्रिक्स` हा एक नवीनच प्रकार होता, आहे असं म्हणायला हरकत नाही. मेट्रिक्स रिलोडेड हा या मालिकेतील दुसरा चित्रपट मूळ चित्रपटाइतका ताजा नाही. मात्र तो कथासूत्राला एक पायरी वर चढवतो हे मात्र खरं.
मेट्रिक्सचा एक गोंधळ म्हणजे संगणकाची पार्श्वभूमी असलेल्या मंडळींना तो खूप आवडतो,पण ज्यांचा संगणकाशी फार संबंध नाही, अशांना तो त्याच्या गुंतागुंतीच्या तांत्रिक बडबडीने गोंधळात पाडायला कमी करीत नाही.
मेट्रिक्स हा नवा प्रकार होता, हे जरी मान्य केलं, तरी त्याच्या केंद्रस्थानी असलेली कल्पना, जी वास्तवाला खोटं ठरवू पाहते. मात्र ती शंभर टक्के नवीन होती, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. गेली अनेक वर्षे हळूहळू पण निश्चितपणे हॉलीवूडमध्ये अशा चित्रपटांची लाट येते आहे जे भोवतालच्या वास्तवाबद्दल शंका घेतात आणि ख-या खोट्याचा ताळमेळ लावत बसतात. माणसाचं स्थान, त्याची ओळख, त्याचा आगापीछा, त्याचं जग हे जसं तो समजतो तसंच आहे, की हा आहे एक निव्वळ भ्रामक पडदा, जो फाटला तर काही वेगळंच सत्य बाहेर येईल? असा प्रश्न हे चित्रपट विचारताना दिसतात. या चित्रपटांचा रोख जरी मेट्रिक्सप्रमाणे थेट संगणकांकडे नसला, तरी आधुनिक जगाचा कोरडेपणा, यांत्रिकता, माणुसकीचा अभाव यांच्याकडेच आहे, असं म्हणायला हवं.
मेट्रिक्स चित्रपट प्रदर्शित झाला तो १९९९मध्ये. पण त्याआधीच म्हणजे १९९८ मध्ये या प्रकारचे तीन चित्रपट पडद्यावर पोहोचले होते. यातला सर्वात गाजलेला होता तो `द ट्रूमन शो`. इथे वास्तवाचा खेळ होता तो केवळ ट्रूमन या जिम कॅरीने उत्तमरीत्या साकारलेल्या व्यक्तिरेखेभोवती गुंफलेला. इथला ट्रूमन आयुष्य जगत होता ते टीव्हीवरच्या एका पात्राचं. जन्मापासून याची वाढ झाली ती या त्याच्यासाठी खास उभारलेल्या सेटवर आणि त्याचं आयुष्य ही झाली एक चित्रमालिका. चोवीस तास चालणारी. बिचा-या ट्रूमनला माहीतही नाही की तो त्याच्या निर्मात्याच्या हातातलं खेळणं बनून टीआरपी रेटिंगसाठी आपलं आयुष्य दवडतो आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं ते ट्रूमन आणि त्याच्या कार्यक्रमाचा निर्माता यातलं नातं. कलाकृतीचा तिच्या कार्यापासून वेगळं, स्वतंत्र अस्तित्त्व असू शकतं का यासारख्या प्रश्नांबरोबरच तो देव किंवा नियती आणि माणूस यांमधला संबंधही उलगडून पाहण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याच वर्षीच्या `स्लायडिंग डोअर्स`मध्ये थोडा वेगळा प्रयोग होता तो म्हणजे ऑल्टरनेट रिअॅलिटीचा. एखाद्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण अमूक गोष्ट करायला हवी होती. कदाचित तशी ती केली गेली असती, तर आपलं आयुष्य बदललं असतं. स्लायडिंग डोअर्सच्या नायिकेची अशी दोन आयुष्य आपल्याला पाहायला मिळतात. ज्यातलं कुठलंही खरं असू शकतं. पण या दोन चित्रपटांबरोबर आलेला त्या वर्षीचा सर्वात महत्त्वाचा प्रयत्न मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिला. तो होता डार्क सिटी. गंमत म्हणजे याचं कथासूत्र मेट्रिक्सच्या अतिशय जवळचं होतं. मात्र संगणकाचा संदर्भ पूर्णतः सोडून. म्हणजे संगणकीय विश्व आणि त्याच्या रक्षक एजंटऐवजी येथे आहेत, परग्रहवासी आणि त्यांनी उभारलेलं प्रायोगिक विश्व. नायकाची भूमिका, तिचा आलेख आणि रहस्यभेद या सर्वच बाबतीत डार्क सिटी जवळजवळ मेट्रिक्सचंच दुसरं रुप आहे.
वास्तवाबद्दल संशय घेण्याची ही प्रथा केवळ हॉलीवूडपुरती मर्यादित होती हे म्हणणंही तितकंसं बरोबर नाही. कारण स्पॅनिश चित्रपट `ओपन युवर आईज` (ज्याचा पुढे व्हॅनिला स्काय नावाने हॉलीवूड रिमेक केला गेला.) देखील याच सूत्राच्या आधारे विचार करताना दिसतो. त्यातल्या रहस्याचा मी इथे उलगडा करून टाकत नाही, पण स्वप्नावस्था आणि यंत्रयुग यांचा वास्तवावर पडणारा प्रभाव इथेही स्पष्ट दिसतो.
हे आणि असे अनेक चित्रपट जर आज सत्य आणि स्वप्न यांच्या सीमारेषेवर अडकलेले दिसतील, तर त्याचा नक्की अर्थ काय समजावा ? मला वाटतं रोजच्या आयुष्यातले ताण दिवसेंदिवस वाढत जात असताना, हे चित्रपट काही एका प्रमाणात प्रेक्षकाला त्याच्या पुढचे मार्ग दाखवून निवड करायला सुचवतायत. व्हर्चुअल रिअँलिटीच्या शोधानंतर माणसाला एकलकोडा बनवणारे अनेक पदार्थ आज तयार होताहेत. स्वतःच्या एका सुखद स्वतंत्र यांत्रिक कोशात राहणं आज शक्य होतंय. यंत्रांचं अतिक्रमण हे आज अतिक्रमण वाटेनासं झालंय. आज आपण खरोखरीच माणसांकडे पाठ फिरवून यंत्रावर अवलंबून राहायला लागलोय. ही एकप्रकारची फसवी अवस्था आहे, असंच हे चित्रपट सांगू पाहताना दिसतात. स्वप्नं, गुलामी ही केवळ रुपकच असली, तरी त्यांच्यामागच्या मूळ संदेश फारसा धुसर नाही.
हे चित्रपट वैचारिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना असंच सुचवायचं की आपल्या आयुष्याचं काय करायचं हे ज्या त्या व्यक्तीच्या हातात आहे. आजच्या यंत्रयुगात तत्कालिन सुखाचे अनेक सोपे मार्ग उपलब्ध आहेत. पण प्रत्येकाने निर्णय घेताना आपण केलेल्या निवडीमागे दूरगामी परिणाम लक्षात घेणं इष्ट आहे. केवळ आजचा क्षण नाही.
- गणेश मतकरी
(साप्ताहिक सकाळ २००३ मधील लेखांमधून.) Read more...