`फस गये रे ओबामा`- आजचा आणि अर्थपूर्ण

>> Sunday, December 26, 2010

आपल्या कॉमेडीजबद्दल नित्य करण्यात येण्याजोगी हमखास तक्रार होती, ती म्हणजे त्यांचं निर्वातात घडणं. (हीच तक्रार आपल्या इतर चित्रपटांबद्दलही करणं शक्य होतं, ही बॉलीवूडची खरी शोकांतिका, पण ते राहू दे !) कोणतेही सामाजिक, प्रांतीय, राजकीय संदर्भ नसल्याने इतर भाषिक, इतर देशीय चित्रपटांची नक्कल उतरवणं आपल्या निर्मात्या- दिग्दर्शकांना शक्य होई हा एक त्यांच्यापुरता फायदा, पण त्यामुळे प्रेक्षकांना आगापीछा नसलेल्या, वरवर हसवण्याचा प्रयत्न करणा-या बाळबोध चित्रपटांवर समाधान मानावं लागत असे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अभिषेक शर्माच्या `तेरे बिन लादेन`ने हे चित्र बदलण्याचा थोडाफार प्रयत्न केला, अन् नुकत्याच आलेल्या सुभाष कपूरच्या `फस गये रे ओबामा`ने या प्रयत्नावर शिक्कामोर्तब केलं.
`लादेन` आणि `ओबामा` .या दोन्ही चित्रपटात उघड साम्य असलेल्या अनेक गोष्टी नावापासूनच आहेत. अमेरिकन राजकारणाने चर्चेत आलेल्या नावांच्या या उल्लेखाबरोबरच समाजात अमेरिकेबद्दल असणारं सुप्त (वा उघड) आकर्षण, सध्याची तिथली परिस्थिती, अमेरिकन धोरणावरील टीका, थर्ड वर्ल्ड देशांवर त्यांचा होणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम, सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरलं करमणुकीच्या बुरख्याआड दडलेलं तिरकस भाष्य या सा-या गोष्टी दोन्ही चित्रपटांमध्ये आहेत. एकाच्या नावात अमेरिकेचा द्वेष्टा दहशतवादी तर दुस-यात लाडका राष्ट्राध्यक्ष असले तरीही दोन्ही चित्रपटांची जात ही केपर कॉमेडीसारखी, गुन्हेगारी वळणाने जाणारी आहे. दोन्ही चित्रपट फार्सिकल ढंगाचे असल्याने त्यांच्यात सत्यतेचा अंश अर्थातच नाही अन् अतिशयोक्ती भरपूर आहे, मात्र आजूबाजूच्या जगाचं प्रतिबिंब मात्र दोन्हीकडे स्पष्ट दिसून येणारं आहे.
या दोन्हीखेरीज आणखी एक गोष्ट दोन्हीकडे सारखी आहे, जी मात्र कौतुक करण्यासारखी नाही. दोन्ही चित्रपट हे मूळ कल्पनेच्या उत्तम असण्यावर समाधान मानणारे आहेत. एकदा का ती सुचली, की त्यापुढे ती फुलविण्यासाठी जे कष्ट घ्यायला लागतात, ते घेण्याची तयारी या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत नाही. साहजिकच दोन्ही चित्रपट हे उत्तरार्धात आपला जोश गमवायला लागतात. त्यांच्यात तोच तोचपणा यायला लागतो. आणि अखेर दोन्ही चित्रपट प्रेक्षकांची तडजोड केल्यासारखे जुजबी पळवाटेवर संपतात. कल्पनेला ज्या प्रकारच्या बोच-या विनोदी तरीही विदारक शेवटाची अपेक्षा आहे, तो दोन्हीकडे सापडलेला दिसत नाही. प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतो, तो पहिला दोन तृतियांश चित्रपट आवडल्याने. मी देखील हेच केलं.
तेरे बिन लादेनपेक्षाही फस गये रे ओबामा प्रेक्षकांना अधिक जवळचा वाटतो कारण त्याच्याशी संबंधित संदर्भ, हा त्यांना त्यांच्या मर्यादित परिघातही सतावणारा आहे. `रिसेशन` हा तो संदर्भ. आधी त्याचा अमेरिकेला बसलेला धक्का, अन् त्याचे जगभर उमटलेले पडसाद ही `ओबामा`ची पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी नसती, तरीही ओबामाचं कथानक जसंच्या तसं घडविता आलं असतं. मात्र तो मग जितका ताजा वाटतो तितका वाटला नसता आणि शेवट गुंडाळणं आपण चालवूनही घेतलं नसतं.
या चित्रपटाच्या रचनेचा आपल्या प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून एक प्रॉब्लेम म्हणजे त्याला नेमका प्रोटॅगनिस्ट, नेमका नायक नाही. त्यातल्यात्यात ओम मामा (रजत कपूर) ही भूमिकाच त्यामानाने मोठी, केंद्रस्थानी असलेली आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन अचूक पकडणारी आहे. मात्र ती पुरेशी वजनदार नाही. ती खूपशी पॅसिव्ह आहे. आणि तिच्या चातुर्यालाही फार मर्यादा आहेत. तिचं जगणं- वाचणं हे तिच्या हुशारीपेक्षा इतरांच्या बावळटपणावर, इतरांच्या प्रामाणिकपणावर आणि पटकथाकाराच्या मर्जीवर अवलंबून आहे. चित्रपट पाहताना आपण `सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ ` हे गृहीत धरतोच. मात्र इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडा अधिकच ताण द्यावा लागतो.
इथला ओम मामा हा एक एनआरआय `बिझनेसमन`  आहे, मात्र सध्या अमेरिकेतल्या रिसेशनमुळे त्याच्या बिझनेसचं वाटोळं झालंय. ओमला एक महिन्यांच्या आत एक लाख डॉलर उभे करायचे आहेत. युपीमधल्या एका गावातील आपली हवेली विकून पैसे उभे कऱण्यासाठी ओम भारतात परततो. मात्र भाईसाब (संजय मिश्रा) त्याचं अपहरण करतो. ओमकड़े पैसे नसल्याचं उघड होईपर्यंत किडनॅपिंग रॅकेटमधल्या मोठ्या माशांची नजर त्यांच्याकडे वळलेली असते. ओम या विचित्र परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवितो, आणि भाईसाबला विश्वासात घेतो. जिवावरच्या जोखमीतून जाऊनही आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं त्याने ठरविलेलं असतं.
एकदा का चित्रपटाचा पॅटर्न ठरला की ओबामात फार काही वेगळं घडत नाही. अपहरणकर्त्यांचे टप्पे अन् ओमच्या क्लृप्तीची पुनरावृत्ती असं लॉजिक ठरून जातं. तरीही हा चित्रपट आपण पाहत राहतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे इथल्या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारी फारच चांगली कास्ट. पटकथेच्या तपशीलावर इथे फार काम झालं नसलं तरी व्यक्तिचित्रपणाचा विचार खूप खोलवर जाऊन येथे करण्यात आला आहे. ब-याच हिंदी चित्रपटात विनोद हे कथानकाशी संबंधित नसलेले अन् केवळ शाब्दिक कोट्यांप्रमाणे असतात. (पहा- रोहीत शेट्टीचा कोणताही चित्रपट) इथले विनोद हे काहीवेळा प्रासंगिक पण बहुतेकवेळा व्यक्तिरेखांशी संबंधित आहेत. प्रत्यक्षात संवादात विनोद करण्याचा प्रयत्न नसूनही व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी इथे विनोद तयार करते. भाईसाबच्या व्यक्तिरेखेचा भाबडेपणा, मुन्नी (नेहा धुपिया)चा फेमिनीझम, अन्नी (मनू रिशी) ची सचोटी या सगळ्याचा या विनोदाला फायदा होतो. त्याबरोबरच आजच्या वातावरणाशी संबंधित असलेल्या आर्थिक परिस्थिती सूचित करणा-या जागा ओबामाच्या भाषणाचा (येस, वुई कॅन) वेळोवेळी येणारा संबंध अशा गोष्टी पाचकळपणा न करताही उपहास आणि विडंबनाला कथेत शिरकाव करू देतात इथे दिग्दर्शक रजत कपूर नसला, तरी त्याच्या कंपूने `रघू रोमिओ`पासून जो लो बजेट, प्रासंगिक विनोदावर भर असणारा, कथाप्रधान चित्रप्रकार आणला, त्यातलाच `फस गये रे ओबामा` हा पुढला प्रयत्न म्हणता येईल.
ओबामाला नायक नसल्याचं मी मघा म्हणालो. तसाच त्याला खलनायकही नाही. खलनायकीच्या थो़ड्या फार जवळ जाणारं पात्र म्हणजे अमोल गुप्तेने साकारलेला, अपहरणाचा व्यवसाय करणारा मंत्री धनंजय सिंग. गंमत म्हणजे यातली गुन्हेगारीलाच व्यवसाय मानणारी बरीचशी इतर पात्र ही भाबडी अन इमानदार आहेत. केवळ राजकारण्याचं पात्र हे चोरांचे
`उसूल` देखील न मानणारं आहे. चित्रपट ज्या प्रकारची तथाकथित श्रेष्ठांच्या विरोधातील भूमिका घेऊन कनिष्ठांना माफ करण्याचं धोरण दाखवितो (उदा यातील प्रत्यक्ष गुंडगिरी कऱणारी पात्र भारतात असली, तरी चित्रपट अधिक शक्तिशाली अमेरिकन अर्थकारणाला दोष देतो.) त्याच्याशी हे सुसंगतच आहे.
विनोदाच्या नावाखाली बॉलीवूडमध्ये जे काही चालतं, ते खरं तर हसवण्यापेक्षा राग आणण्यासारखं अधिक आहे. नीरज व्होरा, रोहीत शेट्टी, अनीस बाझमी यासारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट हे मोठ्या स्टार्सवर भरवसा ठेवणारे, पण दर्जाची बिकट अवस्था असणारे, साधारण आठ दहा वर्षाच्या मुलांना आवडतील, याप्रकारचे असतात. आपण मुळात त्यांच्याकडून अपेक्षाच ठेवत नसल्याने या चित्रपटांचं, दिग्दर्शकांचं फावतं. मात्र तेरे बिन लादेन, फस गये रे ओबामासारख्या चित्रपटांचं धोरण बरोबर उलट आहे. अपरिचित, परंतु अभिनयात बाजी मारणारा नटसंच, विनोदासाठी आशयात तडजो़ड न करण्याचा प्रयत्न आणि बजेटचं मुळात अवडंबर नसल्याने दिग्दर्शकाची बाजू पूर्णपणे पोहोचविण्याची मुभा असलेले हे चित्रपट आता अधिक प्रमाणात येण्याची गरज आहे. मल्टिप्लेक्स संस्कृती आणि कॉर्पोरेट कल्चरने उत्तेजन मिळालेले हे चित्रपट आपल्या पारंपरिक विनोदी सिनेमाला अधिक अर्थपूर्ण आकार देतील अशी शक्यता आज तरी दिसते.
-गणेश मतकरी. 

Read more...

`थ्री...एक्स्ट्रीम्स` - लघु-भयकथा

>> Sunday, December 19, 2010

आपल्याला अमेरिकन भयपट पाहण्याची फार सवय झालीय. कदाचित रामसे बंधूंनी मुळातच हा चित्रप्रकार हास्यास्पद करून सोडल्याने आपल्याकडे हाताळलाच न गेल्याचं हे बायप्रोडक्ट असेल, पण थिअ‍ॅट्रिकल रिलीज आणि पुढे होम व्हिडीओ या दोन्ही ठिकाणी चांगले भयपट पाहण्याची संधी आपल्याला हॉलीवूडने दिली हे खरंच. मात्र हॉलीवूडचा भयपट हाताळण्याचा आवाका हा मर्यादित आहे.त्यांचे भयपट प्रामुख्याने तीन प्रकारचे.  अतिमानवी,ऑकल्ट वा भूतखेतं असणारे (एक्झॉर्सिस्ट, रोजमेरीज बेबी, ओमेन,अ‍ॅमिटीविल) स्लॅशर्स (सायको,हॅलोविन पासून पुढे येणारे असंख्य वंशज) आणि हल्लीच्या काळात येणारे रिअ‍ॅलिटी हॉरर (ब्लेअर विच प्रोजेक्ट, पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी, इत्यादी) या सर्वांकडे पाहून एक लक्षात येईल, की चित्रपट म्हणून ते कमी अधिक प्रभावी असतील, पण लोकाना घाबरवण्यापलीकडे त्यांचा अधिक खोल जाणारा अजेंडा नाही. आपल्या मनात खोलवर दडलेली भीती बाहेर आणण्यापेक्षा अधिक उघडपणे समोर दिसणा-या, लोकप्रिय विषयांकडे त्यांचा ओढा आहे. संकल्पनेच्या पातळीवर काम करण्यापेक्षा, सादरीकरणातल्या शक्यता त्यांना आकर्षित करतात.
आशियाई भयपट जेव्हा जागतिक चित्रपटात दिसायला लागले, तेव्हा त्यांच्यामधून येणारी भीती ही अशा सादरीकरणाच्या पातळीवरून न येता अधिक मूलभूत पातळीवरून येणारी असल्याचं लक्षात आलं. `रिंग` किंवा `द आय`सारख्या चित्रपटांना जगभरात पाहिलं गेलं ते त्यामुळेच. या दोन्ही चित्रपटांच्या अधिक व्यावसायिक, श्रीमंती हॉलीवूड आवृत्त्या पुढे निघाल्या, पण केवळ निर्मितीमूल्य ही त्यांचा परिणाम वाढवू शकली नाहीत. मूळ चित्रपट हे आजही अधिक प्रभावी आहेत.
२००४मधे प्रदर्शित झालेला `थ्री...एक्स्ट्रीम्स` हा अशा प्रकारच्या आशियाई भयपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रातिनिधीक रूपात पेश करण्याचा उत्तम प्रयत्न होता. यातले दिग्दर्शक जागतिक चित्रपटांत आधीच स्थान तयार केलेले होते. आणि निवडतानाही तीन प्रमुख प्रांतांचं प्रतिनिधित्व होईल असं पाहिलं गेलं. फ्रूट चान (हाँग काँग), पार्क चान-वुक (दक्षिण कोरिआ) आणि ताकाशी मिके (जपान) या तीन दिग्दर्शकांच्या प्रत्येकी सुमारे चाळीस मिनिटं चालणा-या लघुभयपटांना एकत्र करणारा हा चित्रपट आशियआई भयपटांचा वेगळेपणा उत्तम पद्धतीने अधोरेखित करतो.
मला स्वतःला अ‍ॅन्थॉलॉजी हा प्रकार फारसा प्रिय नाही. वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केलेल्या कथा त्यांच्या शैलीतल्या फरकाने, अन् वेळेच्या मर्यादांमुळे एकसंघ परिणाम देण्यात ब-याचदा कमी पडतात असा अनुभव आहे. मात्र `थ्री...एक्स्ट्रीम्स`  आपली निराशा करीत नाही. त्यातली प्रत्येक गोष्ट सारखाच परिणाम करीत नाही. मात्र संकल्पना, कथानकाचे चढउतार, शैलीतला बदल या सर्वच बाबतीत त्यांचा समतोल हा एकत्रितपणे साधला जातो.
यातली पहिली गोष्ट आहे फ्रूट चानने दिग्दर्शित केलेली `डम्पलिंग्ज`. डम्पलिंग्ज ही शैलीत सर्वात साधी अन् संकल्पनेत सर्वात भयंकर म्हणावी लागेल. यातलं वातावरण, पार्श्वभूमी ही साधीशी, कोणत्याही देशात पाहायला मिळणारी आहे. किंबहूना तिचं परिचित असणं, हे यातली भीती अधिक गहिरी करणारं आहे. या गोष्टीतलं प्रमुख पात्रं (तिला नायिका न म्हणणंच बरं) टेलिव्हिजनवरची माजी तारका आहे. आता कोणा श्रीमंत उद्योगपतीबरोबर लग्न करून सुखात असलेली, मात्र वयाबरोबर तिचं सौंदर्य कमी व्हायला लागलंय. यावरचा उपाय म्हणून ती (मिरिअम युंग) एका कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्तीत राहणा-या मे (बाई लिंग) कडे जाते. डम्पलिंग्ज बनवणं ही मे ची खासियत. हे डम्पलिंग्ज खाताच तारकेला आपलं तारूण्य परत मिळेल याची गॅरेन्टी. मात्र ते डम्पलिंग्ज कशापासून बनवले जातात हे मात्र मी सांगणार नाही. कारण ते कळलं तर वाचकांपैकी कोणालाच हा चित्रपट पाहावासा वाटणार नाही.
डम्पलिंग्जमधली भीती वेगवेगळ्या गोष्टीतून तयार होते. एक तर त्यातल्या घटना या पूर्ण अशक्य कोटीतल्या नाहीत. आपल्या शहरी आवरणाखालच्या काही अघोरी जागा आपल्याला रोजच्या वर्तमानपत्रातूनही दिसत असतात. त्याच प्रकारची ही एक जवळची, मात्र कल्पनेपलीकडली. दुसरं म्हणजे या गोष्टी करण्याची या व्यक्तिरेखांना वाटणारी गरज. आपलं `स्कीन डीप` असणारं सौंदर्य टिकवण्याचा मोह ऑस्कर वाईल्डच्या डोरिअन ग्रेपासून स्टेम सेल विज्ञानाकडे डोळे लावून बसलेल्या आधुनिक स्त्रीपर्यंत अनेकांना पडलेला आहे. त्यासाठी सगळे कोणत्या थराला जाऊ शकतील, हा डम्पलिंग्जला पडलेला प्रश्न. मला यातली सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट वाटली ती `सवय` या गोष्टीची. यात डम्पलिंग्ज खाणा-या व्यक्तिरेखेच्या चेह-यावर सुरुवातीला असणा-या किळसवाण्या भावापासून अखेरच्या दृश्यापर्यंत होणारा बदल हा खरा विचार करायला लावणारा आहे. सवयीने आपली नितीमत्ता कशी वाकवली जाऊ शकते याचं हे विदारक चित्रण आहे. विचारपूर्वक पाहणा-याला या कल्पनेचे अनेक धागे आपल्या रोजच्या आयुष्यातही विणले गेलेले दिसतील.
दुसरी गोष्ट `कट` ही आपल्या शैलीला खूपच गंभीरपणे घेणारी आहे.  `जे.एस.ए`  किंवा  `ओल्ड बॉय`सारख्या चित्रपटांसाठी गाजलेल्या पार्क चान-वूक कडून ते अपेक्षितही आहे. इथला नायक (हा मात्र खरोखरच नायक म्हणता येईलसा.) चित्रपट दिग्दर्शक आहे. एके संध्याकाळी त्याला आपल्या घरातच बंदीवान केलं जातं. त्याचा गुन्हा, तो भला माणूस आहे हाच. त्याला सापळ्यात पकडणारा त्याच्याच चित्रपटातून काम करणारा एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट आहे. त्याच्या दृष्टीने श्रीमंत-यशस्वी माणसांकडे नसणारी पण गरीबांकडे असू शकणारी एकच गोष्ट म्हणजे भलेपणा. नायकाकडे इतर सगळं असल्याने तो तरी नसावा असं या माणसाला वाटतं. आता नायकाने ताबडतोब एखादी वाईट गोष्ट करावी, हा एकच सुटकेचा मार्ग. नाहीतर समोरच पिआनोच्या तारांनी बांधलेल्या त्याच्या पत्नीची बोटं दर पाच मिनिटाला एक, या गतीने छाटली जातील हे नक्की.
 `कट` मधला अपेक्षित विनोद ही त्याची सर्वात जमेची बाजू. भलेपणाच्या संकल्पनेचं पोस्टमार्टेम करीत असताना  `कट` अनेक ठिकाणी आपली यथेच्छ करमणूक करतो. यातला अतिरंजित खलनायक आणि त्याचा युक्तिवाद आपल्याला गोष्टीत गुंतवून ठेवतो.  `सॉ`सारखे चित्रपट पाहिलेल्यांना, हा एकाच जागी मृत्यूचा खेळ करण्याचा फॉर्म्युला परिचित आहे. मात्र त्यांनाही यातल्या आशयाचा टोकदारपणा पटावा. शेवटाकडे  `कट` थो़डी पळवाट जरूर घेतो, पण तोपर्यंतच्या चढत्या परिणामाला ही पळवाट धक्का लागू देत नाही.
ताकाशी मिकेची कथा  `द बॉक्स` त्याच्या जपानीपणाला जागून  `जे-हॉरर` नावाने प्रसिद्ध झालेल्या चित्रप्रकाराची आठवण करून देणारी आहे. अंधारात सावलीसारख्या वावरणा-या मुली, त्यांचा प्रमाणाबाहेर पसरलेला केशसंभार, जपानी चित्रकलेची आठवण करून देणारी कॉम्पोझिशन्स दाखविण्यापेक्षा लपवण्याला महत्त्व, अशा सर्व जपानी भयपटांच्या वैशिष्ट्यांना बॉक्समध्ये जागा आहे. इथली दोन लहान मुलींची गोष्ट क्रिस नोलानच्या `प्रेस्टीज` चित्रपटाची आठवण करून देणारी आहे.
या दोन मुलीतल्या एकीचा भयानक मृत्यू हा दुसरीच्या आयुष्याला दिशा देणारा ठरतो. मात्र हा मृत्यू खरा की खोटा, ही कथा स्वप्नं का सत्य, हे दिग्दर्शक चटकन कळू देत नाही. आपल्या कोड्याला तो अधिकाधिक अवघड करीत नेतो.
`द बॉक्स` मला स्वतःला सर्वात देखणी मात्र सर्वात कमी परिणामकारक वाटली. कदाचित ती अधिक कन्वेन्शनल असल्यामुळेच. याचा शेवट थोडा अनपेक्षित आहे, पण चित्रपट परिचित वाटतोच.
आपल्याकडे रामसेंचे अन् राम गोपाल वर्मांचे फसलेले प्रयत्न पाहून वाटतं की आपण केवळ दृश्यांच्या नकलेत समाधान का  मानतो. आशयात मुळातंच वेगळेपणा असणं आपल्याला दिसू का शकत नाही? `थ्री...एक्स्ट्रीम्स`सारख्या चित्रपटाचा वेगळेपणा आपल्या कलावंतांना काही सांगू शकत नाही का? एक गंमतीची गोष्ट म्हणजे या चित्रपटातल्या तीनही गोष्टीतील प्रमुख पात्रं ही कलावंत आहेत.डम्पलिंग्जमध्ये अभिनेत्री, कटमध्ये दिग्दर्शक आणि बॉक्समध्ये कादंबरीकार. कलावंतांना काही शिकवण्याची शक्यता असणारा हा चित्रपट कलावंतांच्या मर्यादांवरच आधारित असणं, हा योगायोग म्हणावा का?
-गणेश मतकरी. 

Read more...

`इझी ए`- अपेक्षित अन् अनपेक्षितही

>> Sunday, December 12, 2010

आपल्याकडे तथाकथित `तरूणाई`शी संबंध जोडणारे चित्रपट हे ब-यापैकी मोनोटोनस असतात, हे आपल्याला माहीतच आहे. क्वचित सोशिओ-पोलिटिकल छटा असणारे `दिल, दोस्ती एटसेट्रा`, `रंग दे बसंती` किंवा गुलाल सारखे चित्रपट सोडले, तर कॉलेजवयीन मुलांचे चित्रपट म्हणजे केवळ रोमान्स असा निष्कर्ष काढता येईल. पूर्वी वर्षानुवर्ष कॉलेजवयीन मुलांच्या भूमिका करणारे नायक जाऊन हल्ली खरोखरची तरूण मुलं आली, किंवा वाढत्या वयावर पळवाटा काढण्यासाठी बॅक टू स्कूल फॉर्म्युला वापरणं (मै हू ना) किंवा कॉलेजचं वय उलटल्याचं नायकाने मान्य करणं (रंग दे बसंती) असे उपाय सुरू झाले, किंवा निदान या भूमिका साकारण्यासाठी जीवतो़ड मेहनत करण्याची तयारी नायक दाखवू लागले (थ्री इडिअट्स) हीच काय ती प्रगती. मात्र मूळात कॉलेजला ख-या जगाचंच एक संक्षिप्त रूप मानून त्यात वेगवेगळे विषय आणणं आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसत नाही. याऊलट आपल्यालाच समांतर असणा-या अमेरिकन सिनेमात (यात हॉलीवूडबरोबर इन्डिपेन्डन्ट सिनेमा देखील आला.)मात्र ब-याच प्रकारे या तरुण मुलांचं विश्व हाताळलेलं दिसतं. त्यांच्याकडेही हायस्कूल कॉमेडीज हा सर्वात लोकप्रिय, अन् ब-यापैकी निर्बुद्ध प्रकार आहेच. मात्र अनेक दिग्दर्शकांनी त्यापलीकडे जाऊन त्यांच्या तरुणाईकडे पाहिलेलं आहे. हायस्कूलमधल्या राजकारणाला तिरकसपणे पाहणारा अलेक्झांडर पेनचा `इलेक्शन` (१९९९), शेक्सपिअरच्या ऑथेल्लोला हाय स्कूल बास्केटबॉलच्या पार्श्वभूमीवर सांगणारा टिम ब्लेक नेल्सनचा `ओ`(२००१), विनोदाच्या आवरणाखाली स्त्रीवादी भूमिका जपणारा रॉबर्ट ल्यूकेटीकचा `लिगली ब्लॉन्ड` (२००१) हायस्कूल शूटिंगसारख्या विदारक घटनेकडे कोणत्याही उपदेशाशिवाय पाहणारा गस व्हान सान्तचा `एलिफन्ट` (२००३). डिटेक्टिव्ह फिक्शन आणि फिल्म न्वारचे सर्व विशेष महाविद्यालयात आणणारा रायन जॉन्सनचा `ब्रिक`(२००५) अन् कुमारी मातेच्या प्रश्नाकडे अतिशय मोकळ्या नजरेने पाहणारा जेसन राईटमनचा `जुनो`(२००८) ही काही हल्लीची महत्त्वाची उदाहरणे पाहिली, तरी आपल्याला दिसेल की तरुणांचं जग किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं.
जुनोच्या पठडीतलाच मोकळा ढाकळा दृष्टिकोन घेऊन आलेला दिग्दर्शक विल ग्लुकचा `इझी ए`(२०१०) हा याच तरूण परंपरेतला पुढचा महत्त्वाचा चित्रपट म्हणता येईल.
मी जेव्हा `इझी ए`चं नाव ऐकलं, अन् तो हायस्कूलमधे घडणारा असल्याचं ऐकलं, तेव्हा नावातल्या `ए`चा अर्थ, मी अर्थातच ग्रेडशी लावला. प्रत्यक्षात मात्र त्याचा ग्रेडशी काही संबंध नाही. नेथॅनीएल हॉथॉर्नची `द स्कार्लेट लेटर` ही कादंबरी वाचलेल्यांना, किंवा निदान तिच्यावर आधारलेल्या चित्रपट पाहिलेल्यांना (`इझी ए`च्या नायिकेच्या सल्ल्यानुसार `ओरिजिनल, नॉट दी डेमी मूर व्हर्जन`) `ए` चा आणखी अर्थ माहीत आहे, जो इथे अपेक्षित आहे. किंबहूना असं सहज म्हणता येईल की, `द स्कार्लेट लेटर`  हे `इझी ए`मागचं इन्स्पिरेशन आहे, स्फूर्ती आहे. हे रूपांतर नाही, किंवा ओ प्रमाणे केवळ पार्श्वभूमी बदलण्याचा प्रयत्न नाही, मात्र दोन्ही ठिकाणी विचारण्यात आलेल्या नैतिक प्रश्नांमध्ये साम्य आहे, घटनाक्रमात नसलं तरीही.
चित्रपटाची नायिका ऑलिव्ह पेन्डरगास्ट (एमा स्टोन) एका चारित्र्यवान ओल्ड स्कूल शाळेची विद्यार्थिनी आहे. अतिशय साधी. कोणाच्या अध्यात वा मध्यात नसणारी. एकदा आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या समाधानासाठी ऑलिव्ह आपल्या
`सेक्शुअल एन्काउन्टर`ची काल्पनिक कथा सांगते. ही कथा शाळेच्या नीतीमूल्यांच्या वसा घेतलेल्या मेरीअ‍ॅनच्या कानावर पडते, अन् अक्षरशः क्षणार्धात (या अफवेचा शाळेतला प्रसार दाखविणारी छायाचित्रणातील क्लृप्ती उल्लेखनीय) ऑलिव्ह भलतीच लोकप्रिय होते. तीदेखील अगदीच चुकीच्या कारणांसाठी.
कशीही का असेना, पण ही लोकप्रियता ऑलिव्हला आवडायला लागते. आपल्या शब्दांचा वापर ती काही निरूपद्रवी मुलांना, त्यांच्याच विनंतीवरून, प्रकाशझोतात आणण्यासाठी करायला लागते. सुदैवाने तिचे पालक, हे जुनोच्या आदर्श पालकांप्रमाणेच अतिशय भले असतात, अन् आपल्या मुलीवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. याच सुमारास शाळेत अभ्यासाला लावलेल्या हॉथॉर्नच्या पुस्तकातल्या बदनाम नायिकेबद्दल तिला सहानुभूती वाटायला लागते. `अ‍ॅडल्टरी`चं प्रतीक म्हणून कादंबरीच्या नायिकेला आपल्या कपड्यांवर नाइलाजाने मिरवावा लागणारा `ए` ऑलिव्ह स्वतःहून स्वीकारायचं ठरविते आणि शाळेतल्या संस्कृतीरक्षकांच्या काळजाच्या ठोका चुकतो.
`इझी ए`चा विषय हा तितका सोपा नाही. एकतर तो रोमान्स किंवा कॉमेडी या दोन्हीचे संकेत पाळत नाही. दुसरं म्हणजे, तो स्कार्लेट लेटरसारख्या आजच्या नव्वद टक्के तरुण पिढीने न वाचलेल्या पुस्तकाचा (अन् पंचाहत्तर टक्के तरूण पिढीने न पाहिलेल्या चित्रपटांचा) आधार घेतो. तिसरं म्हणजे विनोद अन् नाट्य या परिचयाच्या गोष्टी त्यात असल्या तरी त्यातला आशय हा मुळात प्रगल्भ मुद्द्यांना स्पर्श करणारा आहे. पाप म्हणजे काय ? नीतीमत्ता ही दृष्टिकोनावर ठरू शकते का ? आजच्या समाजात प्रसिद्धीची किंमत कोणती ?  लोकप्रियता ही सर्व दुखण्यांवर इलाज ठरू शकते का ?  चेहरा आणि मुखवटा यांतलं श्रेष्ठ काय अन् ते ठरविण्याचं परिमाण कोणतं ?  असे अनेक प्रश्न या चित्रपटात विचारले जातात. चौथं म्हणजे... पण जाऊ दे. मुद्दा असा की, त्याचा विषय हा नेहमीच्या सरावाच्या प्रेक्षकांना पटकन झेपेलसा नाही.  मात्र लेखक बर्ट व्ही रॉयल यांनी ओळखीची भाषा आणि रचना वापरणा-या पटकथेतून आणि दिग्दर्शक विल ग्लुक यांनी स्मार्ट सादरीकरणातून हा परकेपणा लपवण्याचं काम यशस्वीपणे केलं आहे.
चित्रपटाचा स्मार्टनेस हा श्रेयनामावलीपासूनच सुरू होतो. शाळेच्या बाहेरच्या भागात जमिनीवर पसरलेल्या नावांमधून चाललेली विद्यार्थ्यांची धावपळ अन् त्याला लागून येणारं ऑलिव्हचं थेट प्रेक्षकांना उद्देशून केलेलं निवेदन हे आपल्याला लगेच चित्रपटात खेचून नेतं. गंमत म्हणजे ते प्रेक्षकांना उद्देशून नसूनही, तसं असल्याचा आभास आहे. प्रत्यक्षात ते तसं वाटण्याचंही उत्तम स्पष्टीकरण चित्रपटाच्या अखेरीस आपल्याला मिळतं. मात्र सुरुवातीला आपण गुंतण्यासाठी हा आभास योग्य ठरतो. ऑलिव्हच्या बोलण्यातला उपहास, त्यातले एकाचवेळी येणारे आधुनिक (इफ गुगल अर्थ वॉज ए गाय...) अन् सांस्कृतिक (हकलबरी फिन प्रकरण, स्कार्लेट लेटर) संदर्भ आपल्या निवेदनाची तिने प्रकरणात केलेली विभागणी अन् त्यांना दिलेली लांबलचक नावं (उदा द शडर इन्ड्युसिंग अ‍ॅण्ड क्लिशेड, हाऊएव्हर टोटली फॉल्स अकाउंट ऑफ हाऊ आय लॉस्ट माय व्हर्जिनिटी टू ए गाय अ‍ॅट कम्युनिटी कॉलेज), निवेदन केवळ ध्वनीरूप नसून नाटकातल्या स्वगताप्रमाणे (अन् अर्थातच वेबकास्टप्रमाणे देखील) दृश्य रुपातही असणं या सगळ्यांचा प्रेक्षकाची ऑलिव्हशी मैत्री
होण्यात महत्त्वाचा हात आहे. एकदा का ही मैत्री झाली की आपण ऑलिव्ह काय म्हणते, ते लक्षपूर्वक ऐकतो. ऑलिव्हची कथा ही फूलप्रूफ नाही. होणा-या गोंधळात तिचीही भरपूर चूक आहे. मात्र ती चूकच आहे, मुळात ही मुलगी फार सज्जन आणि थोडी हेडस्ट्राँग आहे, हे आपल्याला पटणं हे एकूण चित्रपटच आपल्याला पटण्यासाठी गरजेचं. एकदा हे झालं की, चित्रपटाने अर्धी बाजी मारलीच.
(`इझी ए` हा एकाचवेळी अपेक्षित अन् अनपेक्षित अशा दोन पातळ्यांवरून पुढे सरकतो. त्याच्या नायिकेचं निष्पाप, अन् कुमारिका असणं हे तसं कन्व्हेन्शनल आहे. (मुळात स्कार्लेट लेटरच्या नायिकेमधेही ते या प्रमाणात नाही.) ते जपण्यासाठी चित्रपट जंग जंग पछाडतो. त्याचवेळी संवाद,संदर्भ अन् प्रौढ व्यक्तिरेखांच्या वागण्या बोलण्यात तो फारच मोकळा आहे. होमोसेक्शुअ‍ॅलिटीकडे पाहण्याची नजर, ऑलिव्हच्या पालकांचा भूतकाळ, गायडन्स कौन्सिलरचा स्वैराचार अशा बाबतीत तो सर्व नियम मोडीत काढणारा आहे. मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वातला हा दुभंग आपल्याला प्रथमदर्शनी जाणवू न देणं ही त्याची हुशारी.
मी विकिपिडीआवर वाचलं की, पटकथाकार रॉयल यांनी अभिजात साहित्यकृतींचा आधार घेणा-या अन् एकाच हायस्कूलमध्ये घडणा-या तीन पटकथा लिहिल्या आहेत. स्कार्लेट लेटरचा आधार घेणारी `इझी ए` ही त्यातली पहिली. इतर दोन आहेत `सिरानो द बर्जराक` (आपल्याकडला साजन) अन् डिकन्सची अपूर्ण कलाकृती `द मिस्टरी ऑफ एडविन ड्रूड` एकाच शाळेत घडल्याने काही पात्रांची देवाणघेवाणही इतर दोन चित्रपटांमध्ये शक्य आहे. अर्थात हा प्रयोग अजूनतरी अपुराच आहे. जर पूर्ण झाला तर तो वैशिष्ट्यपूर्ण ठरेल हे नक्की. जरी झाला नाही, तरी या प्रयोगाच्या निमित्ताने `इझी ए`सारखा चांगला चित्रपट बनला हे काय कमी आहे.?
- गणेश मतकरी. (तरुणाईशी संबंध जोडणा-या सिनेमांचे पुढील लेख वाचायचे असल्यास कंसातील महिन्यांच्या ब्लॉग पोस्ट काढा अथवा गुगल सर्चला द्या. )
ब्रिक- शाळेच्या आवारात पोचवणारा (मार्च २००८)
जुनो - एक हट्टी मुलगी (मार्च २००८)
`एलिफन्ट` - हत्ती आणि आंधळे (मार्च २००८)
 `ओ`- हायस्कूलमधला ऑथेल्लो (एप्रिल २००८)
इलेक्शन- वर्मावर बोट ठेवणारा इलेक्शन (मे २००९)

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP