वन्स अपाॅन अ टाईम...इन हाॅलिवुड - एका चित्रपट उद्योगाची बखर

>> Sunday, August 18, 2019

क्वेन्टीन टेरेन्टीनोच्या नवव्या फिल्मचं नाववन्स अपाॅन टाईम...इन हाॅलिवुड’ ( किंवा जाहिराती म्हणतात तसंवन्स अपाॅन टाईम इन...हाॅलिवुड’) हे अर्थपूर्ण आहे, म्हणजे ज्या प्रकारेपल्प फिक्शनहे नाव अर्थपूर्ण म्हणता येईल, त्या प्रकारे आहेच, पण कदाचित त्याहून थोडं अधिकच. पल्प फिक्शनमधे या नावावरुन आपल्याला सिनेमा काय पद्धतीचा असणार हे लक्षात येतं, पण वन्स अपाॅन टाईम मधे शीर्षकाने अधोरेखित होणाऱ्या गोष्टी या कितीतरी अधिक आहेत

पहिली गोष्ट आहे तेवन्स अपाॅन टाईम इन वेस्ट’ (१९६८) या सर्जिओ लिओनेच्या स्पगेटी वेस्टर्न चित्रपटाच्या नावाशी असणारं या शीर्षकाचं साम्य. टेरेन्टीनोला असणारी वेस्टर्न चित्रपटाची आवड आणि आपल्या सिनेमात तो करत असलेला वेस्टर्न्सचा वापर हे आपल्याला माहीतच आहे. या चित्रपटातही त्याचा नायक रिक डाल्टन ( लिओनार्डो डिकाप्रिओ) हा वेस्टर्न्समधेच अभिनय करतो, आणि कामाच्या शोधात त्याच्यावरही पाळी येते ती इटलीला जाऊन तिथल्या स्पगेटी वेस्टर्नमधे काम करण्याची. त्यामुळे शीर्षकातला लोकप्रिय स्पगेटी वेस्टर्नचा संदर्भ अचूक. ( ज्यांना टॅरेन्टीनोच्या संदर्भजगात आणखी शिरायचं असेल त्यांच्यासाठी हेही लक्षात घेण्यासारखं, की रिकला मिळालेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे सर्जीओ काॅर्बुची, म्हणजेच मूळच्या जॅंगो चित्रपटाचा दिग्दर्शक.)

वन्स अपाॅन टाईमया आपल्याकोणे एके काळीच्या जवळ जाणाऱ्या शब्दप्रयोगालाही महत्व आहे. ते परीकथेचं सूचक आहे. जे आपल्याला दिसतय ते खरं नाही, ही एक प्रकारची रंजक, सुखांत, आणि बहुधा काल्पनिक निर्मिती असावी असं हा शब्दप्रयोग सुचवतो. ज्यांना चित्रपटातलं एक प्रमुख कथानक पोलन्स्की - टेट प्रकरण असल्याचं माहीत आहे त्यांना कदाचित हा शब्दप्रयोग खटकेल, किंवा चित्रपटाच्या मांडणीबद्दल थोडं अधिकही सांगून जाईल. नावात सूचक हेदेखील आहेच, की ही एका सरत्या विश्वाची कथा आहे. १९७० च्या दशकात हाॅलिवुड खूप बदललं, त्यामुळे जुन्या नव्याच्या सीमेवर घडणारा, एन्ड आॅफ ॲन इरा म्हणण्यासारखा काळ या चित्रपटात आहे. हे लक्षात घेऊन आपण  चित्रपटाचा शेवट पाहिला, तर तोही आपल्याला तो बरच काही सांगून जाईल. शेवटची आणि कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शीर्षकात म्हंटल्याप्रमाणे हा चित्रपटहाॅलिवुडबद्दलचा आहे. त्यातल्या पात्रांची ती गोष्ट आहेच, पण एका उद्योगाची, एका काळाची, एका विश्वाचीही ती गोष्ट आहे

टेरेन्टीनोच्या चित्रपटात संदर्भांचा खच असतो, आणि त्या सगळ्याविषयी बोलत राहिलं तर लेख किती लांब होईल कोणाला माहीत, पण सध्या गुगलच्या कृपेने ज्यांना याविषयी अधिक माहिती हवी असेल त्यांना ती सहज मिळू शकेल. या संदर्भांनी हा चित्रपटही खूपच गजबजलेला आहे आणि तुम्ही जितकं त्यात शिराल तितकं थोडच आहे. हे खऱ्या आणि काल्पनिकाचं बेमालूम मिश्रण करणारं जग केवळ पात्रांना पार्श्वभूमी म्हणून उभं रहात नाही, उलट सिनेमा या जगाचाच आहे आणि कथानक हे मुळात हे जग उभं रहाण्यासाठी असलेला एक आधार म्हणून वापरलं जातं. जर कोणाला या चित्रपटात फार घडत नाही असं वाटत असलं ( जे फारसं खरं नाही, पण ते वाटू शकतं) तर त्यामागे हेही एक कारण आहे. चित्रपटातली पात्रं ही काही घडवण्यासाठी जगत नाहीत, तर त्यांचं जगणंच चित्रपट दाखवतो. त्यांचं राहणीमान, त्यांना भेडसावणाऱ्या चिंता, त्यांच्यातले हेवेदावे, स्टेटसनुसार येणारे स्तर, यशापयशाच्या कल्पना, हे सगळं यात आपल्याला दिसतं. रिक डाल्टनसारख्या करीअरच्या शेवटाकडे जाणाऱ्या स्टारचं आयुष्य आणि त्याला जाणूनबुजुन समांतर दिसणारं आणि विरोधाभास दर्शवणारं शॅरन टेट ( मार्गो राॅबीया उगवत्या तारकेचं आयुष्य हे महत्वाचं आहे कारण ते या झगमगत्या जगाबद्दल काही विचार मांडतं

प्रत्यक्ष कथानकाबद्दल बोलायचं, तर यात कथानकांचे दोन धागे आहेत. पहिलं कथानक आहे, ते रिक डाल्टन आणि त्याचा स्टन्ट डबल कम ड्रायव्हर कम मित्र असलेला क्लिफ बूथ ( ब्रॅड पिट) या दोघांचं. एकेकाळी चांगले दिवस पाहिलेल्या रिकला आता मिळतील ती छोटीमोठी कामं करावी लागतायत. आपले दिवस कसे पालटतील या काळजीत तो त्रस्त आहे. क्लिफ बूथ तसा हॅपी गो लकी माणूस आहे. तो त्या क्षणापुरता जगतो. उद्याचा फारसा विचार करत नाही. यांचं कथानक हे दोन स्तरांवर घडतं. पहिला स्तर आहे तो रिकच्या प्रत्यक्षात चाललेल्या कामांचा, ज्या निमित्ताने टॅरेन्टीनो आपली हाॅलिवुडबद्दलची अनेक लहानमोठी निरीक्षणं मांडतो. दुसरा स्तर आहे तो क्लिफचा, ज्याचा बहुतेक वेळ इकडेतिकडे फिरण्यात जातो. क्लिफच्या पत्नीचा खून त्याने केला असल्याचा त्याच्यावर संशय आहे. तो त्याने खरच केला असेल का याबद्दल चित्रपट भाष्य करत नाही ( जरी एका दृष्यात तो ते करण्याच्या फार जवळ पोचतोपण कदाचित केलाही असेल, असं वाटण्यासारखं त्याचं व्यक्तिमत्व आहे. क्लिफ सहजच पुसीकॅट ( मार्गारेट क्वाली ) या हिप्पी मुलीला ती रहात असलेल्या स्पान रान्चपर्यंत लिफ्ट देतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. आपण चित्रपट आजच्या काळात पहात असल्याने आपल्याला  चार्ल्स मॅन्सन या विकृत कल्ट लीडरचे अत्यंत धोकादायकअनुयायीत्या रान्चवर रहात असल्याचं लक्षात येतं, पण क्लिफला ते कसं कळणार?

दुसरं कथानक आहे ते रिकच्या शेजारच्याच बंगल्यात रहाणाऱ्या शॅरन टेटचं. तिचा नवरा आणि प्रख्यात दिग्दर्शक रोमन पोलन्स्की आपल्याला इथे दिसतो पण त्याचा कथानकात फार सहभाग नाही. शॅरन यशाच्या उंबरठ्यावर आहे आणि ती एक सुंदर, स्वप्नवत जीवन जगते आहे. चित्रपटाचा बराचसा भाग १९६९ च्या फेब्रुवारीतल्या दोनतीन दिवसांच्या कालावधीत घडतो, ज्यात ती भविष्याबद्दल उत्सुक असलेली सुंदर तारका म्हणून आपल्याला भेटते. त्याच सालच्या आॅगस्ट महिन्यात तिच्या बंगल्यात घुसून मॅन्सन फॅमिलीच्या माथेफिरुंनी शॅरनची हत्या केली हे आज आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आनंदी शॅरनचं आयुष्य आपल्याला अधिकच अस्वस्थ करतं. चित्रपटही सहा महिन्यांची उडी घेउन आॅगस्टमधे पोचतो तेव्हा तर फारच

लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून, अशा दोन्ही ठिकाणी टॅरेन्टिनोचं क्राफ्ट जाणण्यासारखं आहे. जर तुम्हाला चित्रपट हिंसक नाही, म्हणून तो टिपिकली या दिग्दर्शकाचा नाही असं वाटत असेल तर तुम्ही त्याचे चित्रपट एका विशिष्ट चष्म्यातून पहाता असं म्हणावं लागेल. कारण हा अगदी खासच त्याच्या कामात शोभण्यासारखा, चपखल बसणारा सिनेमा आहे. विशिष्ट रचनेला धरुन रहाणारा, गांभीर्य आणि विनोद यांची अद्भुत सरमिसळ करणारा, काळ आणि इतिहास याचं अचूक भान असणारा, झपाटून टाकणारे संवाद असलेला, आणि चिरकाळ स्मरणात रहातीलसे सेट पीसेस वापरणारा.

या चित्रपटात अनेक संस्मरणीय क्षण आहेत. ब्रूस ली आणि क्लिफ बूथ यांच्यामधला सामना, ट्रूडी फ्रेजर ही चिमुरडी बालनटी आणि रिक डाल्टन यांच्यातली अभिनयविषयक चर्चा, लॅन्सर मालिकेच्या चित्रीकरणाचे तुकडे, शेवटची हाणामारी अशा अनेक जागा आहेत. पण मला यातल्या दोन जागा अतिशय महत्वाच्या आणि जवळजवळ हा सिनेमा डिफाईन करणाऱ्या वाटल्या. यातली एक आहे, ती भविष्याच्या सुंदर कल्पना डोक्यात घोळवत शॅरनने घालवलेली रम्य दुपार, आणि दुसरी आहे, ती क्लिफची रान्चवरची फेरी. शॅरनचा दिवस हा आनंदात चाललेला दिसत असतानाही भविष्याच्या शक्यता आपल्या अंगावर येत रहातात. क्लिफच्या प्रसंगात प्रत्यक्ष मारामारी आहे ती किंचित आणि एकतर्फी. पण हा पूर्ण प्रसंगच अतिशय तणावपूर्ण आणि जवळपास एखाद्या भयपटात शोभेलसा, आणि चित्रपटाचा हायलाईट झाला आहे

न्याय या संकल्पनेला टॅरेन्टिनोच्या चित्रपटात खास जागा असते. एकेकाळी हा न्याय चित्रपटातल्या व्यक्तिरेखांपुरता मर्यादित होता, पण पुढे एका चित्रपटापासून तो टॅरेन्टीनोसाठी अधिक व्यापक झाला. इतका व्यापक, की काय घडलं, यापेक्षा काय घडायला हवं यालाही त्याच्या दृष्टीने महत्व आलं. वन्स अपाॅन टाईम मधे हे घडणं केवळ एखाद दुसऱ्या पात्रापुरतं मर्यादीत नाही, तर ते एका उद्योगाला, एका समाजाला मिळणाऱ्या विशिष्ट दिशेशी संबंधित आहे. कोणी असंही म्हणेल की चित्रपटातल्या महत्वाच्या घटना, आणि टॅरेन्टीनोची वास्तवाकडे पहाण्याची लवचिक दृष्टी पहाता , या सिनेमाच्या शेवटाचा ( कोणाताही स्पाॅयलर देणारा रिव्यू वाचतादेखील ) आपण अंदाज बांधू शकतो. यात काही आश्चर्य नाही, पण शेवटाचा अंदाज बांधता आल्याने सिनेमा कमी ठरत नाही. हा रहस्यपट नाही आणि रहस्याचा उलगडा त्याच्या अंतिम प्रभावावर परिणाम करु शकणार नाही. उलट मी तर म्हणेन की चित्रपट पहायला जाताना तुम्हाला पोलन्स्की - टेट प्रकरणाची पूर्ण माहीती हवी ( जी बहुतेक पाश्चात्य प्रेक्षकांकडे आहेच ). ती जर नसेल, तर तुम्ही या चित्रपटाला जे म्हणायचय ते पूर्णपणे समजूनच घेऊ शकणार नाही. कदाचित ही एक फारसं कथानक नसलेली काॅमेडीच आहे असा तुमचा समज होईल, जो योग्य असणार नाही

वन्स अपाॅन टाईम ...इन हाॅलिवुड हा एका महत्वाच्या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे हे तो पहाताना लक्षात घेणं गरजेचं आहे. ‘मला जे दिसलं तेच खरंयापेक्षाआपल्याला जे दाखवलय ते कोणत्या अर्थाने दाखवलं असेलअशी भूमिका घेणं मला प्रेक्षक म्हणून नेहमीच आवश्यक वाटतं. ती भूमिका हा चित्रपट पहाताना गरजेची आहे.ती नसली तर तुम्हाला गोष्ट कळणार नाही, असं नाही. पण चित्रपट म्हणजे नुसती गोष्टच असते, असं कोणी सांगितलय


- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP