"कमीने' - भारतीय न्वार

>> Tuesday, September 29, 2009


"कमीने' हा चित्रपट न्वार चित्रप्रकारात मोडणारा असला तरी अस्सल भारतीय चित्रपट आहे. "कमीने' घडतो एका अतिशय असुरक्षित, गढूळलेल्या वातावरणातल्या मुंबईत, जे दुर्दैवाने खरोखरच्या वर्तमानातल्या मुंबईहून फार वेगळं नाही. विशाल भारद्वाजनं व्यावसायिकतेच्या चौकटीत उत्तम, वास्तववादी चित्रपट दिला आहे हे नक्की.

माझ्या सदरामधून मी वेळोवेळी फिल्म न्वार (Film Noir) नामक चित्रप्रकाराविषयी लिहिलेलं आहे. थोडक्‍यात "रिकॅप' सांगायचा तर 1940 अन्‌ 1950 च्या दशकातल्या प्रामुख्याने अमेरिकन गुन्हेगारीपटांना उद्देशून हा शब्दप्रयोग वापरला जातो. शब्दप्रयोग आहे अर्थातच फ्रेंच. या काळात जागतिक चित्रपटांवर महत्त्वाची टीका-टिप्पणी करणाऱ्या फ्रेंच समीक्षकांच्या लक्षात आलं, की या चित्रपटांमधून दृश्‍य अन्‌ आशय यांचा गडदपणा एकत्रितपणे साकारला जातो अन्‌ एकटादुकटा नसून या चित्रपटांची एक लाट तयार होतेय. जर्मन एक्‍स्प्रेशनिझमच्या छायेत यातल्या दृश्‍यरचना, कॅमेरा अँगल्स, अंधाऱ्या प्रकाश योजना यातून एक सावल्यांचं जग तयार होत होतं आणि हे अंधारं वातावरण या कथानकांमध्ये, व्यक्तिरेखांमध्ये उतरलेलं दिसे. भूतकाळाच्या छायेत वावरणारे नायक, रहस्यमय नायिका, सतत विश्‍वासघात अन्‌ फसवणुकीवर आधारलेली कथानकं यांची रेलचेल असणाऱ्या या चित्रपटात सज्जन व्यक्तिरेखेला स्थानच नव्हतं.
काही काळानंतर न्वार चळवळ संपुष्टात आली; पण 1974 मध्ये पोलन्स्कीच्या चायनाटाऊनमध्ये तिचं पुनरागमन झालं, निओ न्वार या नावाखाली. या प्रकारचे चित्रपट अन्‌ दिग्दर्शक अजूनही पाहायला मिळतात. क्वेन्टीन टेरेन्टीनो अन्‌ त्याचा कुठलाही चित्रपट किंवा रॉबर्ट रॉड्रिग्जचे "स्पाय किड्‌स' वगळता बरेचसे चित्रपट, ही याची हल्ली तेजीत असलेली उदाहरणं आहेत.
आता आपल्याकडे न्वार शैली पूर्ण नवी आहे अशातला भाग नाही. गुरुदत्तच्या आरपार, सी.आय.डी., जाल अशा काही चित्रपटांवर मूळ फिल्म न्वारचा ठसा आहे. निओ न्वार मात्र हल्ली-हल्ली इथं आलेलं दिसतं. 2007 मध्ये आलेले संजय खांदुरी दिग्दर्शित "एक चालीस की लास्ट लोकल' आणि श्रीराम राघवन दिग्दर्शित "जॉनी गद्दार' ही याची आपल्याकडली अलीकडची उदाहरणं आहेत.
हे दोन्ही चित्रपट मला आवडलेले आहेत. "एक चालीस' तर बऱ्यापैकी चाललाही होता आणि "जॉनी गद्दार' हे नाव ऐकूनही न घाबरलेल्या ज्या प्रेक्षकांनी तो पाहिला, त्यांना तो आवडला; पण त्यांच्या स्वतंत्र कामापेक्षाही एक अधिक महत्त्वाचं काम त्या दोन चित्रपटांनी केलं, असं मी म्हणेन. त्यांनी "कमिने'साठी प्रेक्षकांच्या मनाची तयारी केली.
"कमीने' या वर्षातला सर्वोत्तम चित्रपट आहे यात वाद असण्याची काही शक्‍यता नाही. मात्र, आपला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात या शैलीला अपरिचित असताना तो येता, तर कदाचित त्याचा मोठा धक्का बसता. आताही काही प्रमाणात धक्का बसेलच, तो त्यातल्या भाषेनं आणि हिंसेनं. तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या भुवया वर जातीलही. आपल्या सर्वांत मोठ्या संस्कृतिरक्षकांनी (काही जण गमतीनं त्यांना सेन्सॉर बोर्ड असंही म्हणतात) त्याला याआधीच "फक्त प्रौढांसाठी' असं सर्टिफिकेट देऊनही टाकलंय. एक लक्षात घ्यायला हवं, की भाषा किंवा हिंसा या दोन्ही गोष्टी या चित्रपटाच्या शैलीचा अपरिहार्य भाग आहेत. विशाल भारद्वाजचा "ओंकारा'मध्येही काहींना आक्षेपार्ह वाटेल अशी भाषा होती. मात्र, एकदा कानांना सराव झाला, की या भाषेचा वापर एक फ्लेवर म्हणून होतो. त्यापलीकडे शिव्यांना स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. हिंसाही एका टोकापलीकडे गेली, की तिचा कार्टून व्हायलन्स होतो. (टॉम अँड जेरीला "प्रौढांसाठी' सर्टिफिकेट देण्याचा कोणी विचार करेल का? त्यातल्या दोन व्यक्तिरेखांनी एकमेकांवर सतत चालवलेल्या जीवघेण्या हल्ल्यांना तमाम घरातली लहान मुलं आवडीनं पाहतातच ना? सेन्सॉर बोर्डाचं टीव्हीकडे फारसं लक्ष दिसत नाही!) टेरेन्टीनो हे तर्कशास्त्र आपल्या प्रत्येक चित्रपटात वापरतो आणि हे चित्रपट मुलांनी पाहू नयेत, असं मी अजिबात म्हणणार नाही. अर्थात, हा निर्णय प्रत्येक पालकानं स्वतंत्रपणे घ्यायचा आहे. पण हे माझं वैयक्तिक मत.
एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, की मी निओ न्वार आणि टेरेन्टीनोबद्दल काही बोललो, तरी "कमीने' हा अस्सल भारतीय चित्रपट आहे. (तसा भारद्वाजचा "ओंकारा' ऑथेल्लोवर आधारित असूनही अस्सल भारतीय होताच, पण हा त्याहून अधिक आहे.) न्वार पटाचं सार हे विशाल भारद्वाजनं आत्मसात करून या चित्रपटातून आपल्यापुढे सादर केलंय. तो पाहताना त्यावरचे परकीय प्रभाव हे ठळकपणे जाणवणारे नाहीत. "कमीने'च्या एका इंग्रजी समीक्षणात यातली "गिटार केस' ही "एल मेरीआची' या रॉड्रिग्जच्या पहिल्या चित्रपटातून आल्याचा उल्लेख वाचला. मात्र, केवळ गिटार केसमुळे या दोघांत तुलना करणं, हा शुद्ध मूर्खपणा होईल. केवळ सायकल असल्याने आपण "बायसिकल थीफ'ची तुलना "जो जीता वही सिकंदर'बरोबर करू का?
"कमीने' दोन भावांची गोष्ट सांगतो. निवेदक आहे चार्ली (शाहीद कपूर). चार्ली हा घोड्यांच्या रेसेस फिक्‍स करणाऱ्या बंगाली गॅंगस्टर्सकडे काम करतो. तो तोतरा आहे. म्हणजे त्याला "स' म्हणता येत नाही. "स'ला तो "फ' म्हणतो. (चित्रपटभर प्रत्येक "स' ला "फ' म्हणणं या एकाच गोष्टीसाठीही शाहीद कपूरला पारितोषिक घ्यायला हरकत नाही. अर्थात, या भूमिकेसाठी तो पारितोषिकप्राप्त ठरेल यात शंकाच नाही.) त्याचा भाऊ आहे सरळमार्गी गुड्डू (पुन्हा शाहीद). गुड्डू बोलताना अडखळतो. एनजीओमध्ये काम करणाऱ्या गुड्डूचं स्वीटी (प्रियांका चोप्रा)वर प्रेम आहे. स्वीटी गरोदर आहे आणि उत्तर भारतीय गुड्डूचा मेव्हणा म्हणून स्वीकार करणं तिच्या महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या पुढारी भावाला - भोपे भाऊला (अमोल गुप्ते) कधीही मान्य होणार नसतं. स्वीटी कोण आहे हे कळताच गुड्डू चपापतो; पण कसाबसा चोरून लग्नाला तयार होतो. भोपे आपल्या गुंडांना हे लग्न थांबवायला पाठवतो.
दरम्यान, चार्ली, ड्रग विक्रेते, त्याच्या व्यवसायातला फितूर आणि भ्रष्ट पोलिस यांदरम्यान एक प्रचंड गुंतागुंतीचा खेळ होतो, ज्याचा परिणाम म्हणून चार्लीच्या हातात दहा कोटींचे ड्रग्ज लपवलेली एक गिटारकेस पडते. चार्ली पळतो आणि पोलिस चुकून गुड्डूला पकडतात. इकडे भोपे भाऊ आणि त्याचे हस्तक चार्लीच्या टेपरीत येऊन पोचतात, गुड्डूचा माग काढत. यानंतर गोंधळ इतका वाढतो, की आतापर्यंतचा भाग सुबोध, सोपा, सरळ वाटावा.
"कमीने' घडतो एका अतिशय असुरक्षित, गढूळलेल्या वातावरणातल्या मुंबईत, जे खरोखरच्या वर्तमानातल्या मुंबईहून फार वेगळं नाही. परभाषकांचे रोजगारासाठी आलेले लोंढे, मुंबईत जन्मूनही वाडवडिलांमुळे मुंबईबाहेरचे मानले जाणारे इतर प्रांतीय, दर गोष्टीचा स्वार्थासाठी वापर करणारे राजकारणी, वाढती गुन्हेगारी, गरिबी, जागांचे प्रश्‍न, राजकीय अन्‌ सामाजिक भ्रष्टाचार, कायद्याची असमर्थता या सर्व गोष्टी मुंबईचं एक विदारक चित्र तयार करतात, जे दुर्दैवानं बरंचसं खरं आहे.
हे गढूळलेपण परावर्तित होतं ते चित्रपटाच्या दृश्‍य परिमाणात. सतत पावसाळी हवामान, कथानकाच्या गतीबरोबर येणारे हवामानाचे चढउतार, अंधाऱ्या खोल्या, खोपटं या सगळ्यांची मदत कथानकाची तीव्रता वाढवण्यासाठी होते. कॅमेराच्या फ्रॅन्टीक हालचाली, रंगांचा जाणीवपूर्वक वापर, बंगाली, हिंदी, मराठी, इंग्रजी अन्‌ इतरही भाषा सतत (आणि बहुधा सबटायटल्सशिवाय) बोलणारे लोक हे रसायन अधिक तीव्र करतात.
रामगोपाल वर्मा हा एके काळी आपल्या "गुन्हेगारीपटां'चा राजा मानला जायचा. सत्या, कंपनी, सरकारमुळे त्याचं नावही चिकार झालं होतं. मात्र, सत्या सोडता इतर दोन चित्रपट अन्‌ "सरकार' पाहता त्याचा भर अनावश्‍यक चमत्कृतीवर झालेला दिसतो. "कमीने'च्या चित्रीकरणातही दृश्‍य संकल्पना अन्‌ संकलनावर भर आहे, पण हे सगळं गरजेशिवाय, केवळ प्रेक्षकाला चकित करायला केलंय असं वाटत नाही, ही चित्रपटाची गरज वाटते. भारद्वाजचे मकबूल, ओंकारा अन्‌ आता "कमीने' पाहता, वर्माजींची आपल्या स्थानावरून हकालपट्टी करायला हवी, असं वाटतं.
"कमीने'ची शेवटची पंधरा-वीस मिनिटं जवळपास हाताबाहेर जातात. गोंधळ इतका पराकोटीला जातो, की छोट्या पडद्यावर कदाचित काय चाललंय हे कळूही नये. हा भाग बराचसा टेरेन्टीनो शैलीत जाणारा. म्हणजे घटक पाश्‍चात्त्य नव्हेत; पण वास्तव, मसाला, तांत्रिक चमत्कार, इतर चित्रपटांचे संदर्भ, संवादांचा बाज आणि टोकाची ऍक्‍शन यांचं मिश्रण करण्याची कल्पना हीच टेरेन्टीनो शैलीजवळ जाणारी. हा भाग किंचित अधिक गंभीर असता आणि शेवट इतका "बॉलिवुडीय गोड' नसता, तर मला किंचित अधिक आवडता; पण जर तरच्या गोष्टी करण्यात फार मतलब नाही. एकूण आवडलेल्या चित्रपटाबद्दल तर अजिबातच नाही.
-गणेश मतकरी

Read more...

`परफ्युमः द स्टोरी ऑफ मर्डरर' - नाकाची गोष्ट

>> Sunday, September 20, 2009

काळ, काम आणि वेगाची धावती त्रैराशिकं मांडणारा `रन लोला रन` ज्यांनी पाहिला असेल, त्यांचा `परफ्युमः द स्टोरी ऑफ मर्डरर' हा चित्रपट त्याच दिग्दर्शकाचा आहे यावर विश्वास बसणार नाही. अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटात कथासूत्रांची पुनरावृत्ती झालेली दिसून येते. पण निदान या चित्रपटाच्या बाबतीत तरी दिग्दर्शक टॉम टायक्वरने वेगळीच दिशा निवडलेली दिसते. परफ्युम हा तसा अगदी नवा चित्रपट आहे. नावावरून विषयाचा अंदाज न येऊ शकणारा, मात्र सुरुवातीपासूनच बेसावध प्रेक्षकाला जाळ्यात ओढणारा.
पॅट्रिक सस्कीन्डच्या ज्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे, ती लोकप्रिय जरूर आहे. मात्र माध्यमांतर करण्यासाठी अतिशय कठीण. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी ती वापरण्याचा प्रयत्न यापूर्वी करून रद्द केलेला आहे. पण टायक्वरने मागे न हटता हे जमवलेले दिसतं. रुपांतर कठीण आहे याचं कारण म्हणजे परफ्युममधील प्रत्येक गोष्ट ही गंधाशी संबंधित आहे. या चित्रपटाच्या नायकाचं नाक हे नको इतकं शक्तिशाली आहे आणि हे नाकच चित्रपटातल्या ब-याच घटनांच्या मुळाशी आहे. नायकाची गंधावरची आसक्ती आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी, ही लिहिण्यात येणं सोपं आहे. पण मितभाषी नायकाचे मनोव्यापार आणि त्याचा वासांशी असणारा संबंध, केवळ दृश्यांतून येणं कठीण.
परफ्युम मुळात सांगतो ती सतराव्या शतकातल्या फ्रान्समधली एका सीरिअल किलरची कल्पित गोष्ट. सीरिअल किलरवरचे चित्रपट अमेरिकेत लोकप्रिय असले तरी हा नेहमीच्या चित्रपटांत गणता येणार नाही. वातावरणापासून ते गुन्हेगारांच्या व्यक्तिमत्त्वापर्यंत आणि गुन्ह्यांमागच्या कारणांपासून ते शेवटाकडे अचानक बदलणा-या आशयाच्या रोखापर्यंत हा चित्रपट अनेक बाबतीत वेगळा आहे. जॅक द रिपर केसवर आधारलेल्या फ्रॉम हेलशी त्याचे थोडे साम्य आहे, पण ते अधिकतर दृश्यशैलीपुरतं मर्यादित.
अक्षरशः गटारात जन्मलेला ग्रेनॉल (बेन विशॉ) मोठा होतो तो दृष्टी किंवा स्पर्शाहून अधिक शक्तिशाली आणि सर्वव्यापी अशी वास घेण्याची ताकद असणारं घाणेंद्रीय घेऊनच. त्याला स्वतःचा असा कोणताच गंध नाही, कदाचित त्यामुळे उसन्या गंधांचं त्याला अप्रूप असेलही. टॅनरीमध्ये गुलामी करताना, तो एक काळ गाजवलेल्या बाल्दिनी (डस्टीन हॉफमन) या अत्तर बनवणा-याकडे कामाला राहतो आणि आपला गंधावरचा अंमल सिद्ध करतो. मात्र अशी कृत्रिम अत्तरं बनवण्यापेक्षा जिवंत गोष्टींचा अंश मिळवून त्यापासून एक नवा सुगंध बनवण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असते. ग्रास शहरी गेल्यावर ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा एक मार्ग त्याला सापडतो. तो म्हणजे खून. सौंदर्यवतींच्या शरीरातून त्यांचा अंश मिळविण्याचा हा प्रयत्न ग्रासमध्ये मोठीच घबराट पसरवतो. आणि नग्नावस्थेत सापडणा-या या मुलींवर काही अत्याचारही झालेले नाहीत, हे कळताच शहरवासी अधिकच गोंधळून जातात.
परफ्युमच्या आशयातला सर्वाधिक लक्षवेधी भाग आहे तो त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखेच्या मानसिक आंदोलनाचा. ग्रेनोलला भल्या बु-याची चाड नाही. केवळ हवं तसं अत्तर बनवणं एवढंच तो जाणतो आणि जे बनवण्यासाठी जी किंमत द्यावी लागेल ती देण्याची त्याची तयारी आहे. गुन्हेगाराचा वरवरचा प्रामाणिक हेतू आणि त्यात डोकावणारी अपरिहार्य विकृती यांचे इथले चित्रिकरण हे भयानक आहे. बेन विशॉच्या दिसण्यातल्या भाबडेपणा ही व्यक्तिरेखा अधिकच यंत्रवत आणि उमजण्यापलीकडे करून टाकतो.
वेळोवेळी जेव्हा नायकाच्या शक्तीचा वापर होतो आणि सामान्य माणसाच्या कुवतीपलीकडे जाऊन तो आपलं नाक वापरतो, तेव्हा दिग्दर्शकाचा कॅमेराही मुक्त होतो आणि नायकापर्यंत पोहोचणा-या वासांचा माग ठेवतो. स्वच्छंद वापर आपल्याला तो दाखवतो, जे केवळ शब्दात वर्णन करून अपुरं वाटेल. हा कॅमेराचा वापर आणि विषयाच्या ग़डदपणाला दिग्दर्शकाने पडद्यावर दिलेलं स्थान या दोघांना परफ्युमचा विशेष मानता येईल. ग्रासमधले अंधारे कोपरे, छायाप्रकाशाचा खेळ, तुटक प्रतिमांतून आणलेली गती यासारख्या घटकांतून टायक्वर जणू ग्रॅनोलच्या अंधा-या मनाला समांतर दृश्यरचना बांधतो.
नॉयडा हत्याकांड आणि बिअर मॅन यांच्या सनसनाटी बातम्यांमुळे आपल्याकडे सीरियल किलर हा विषय प्रकाशात आला. त्याचवेळी त्याचा विचारही नकोसा वाटणारा होता. परफ्युमचा असल्या विकृत सत्यघटनांशी काही संबंध नसला आणि गुन्ह्यांचा भरही शारीरिक गोष्टींपलीकडचा असला तरी त्याच्या नायकाची थंड योजनाबद्धता आणि मनाची जडणघडण आपल्याला कुठेतरी भोवतालच्या अस्वस्थ वर्तमानकाळाची जाणीव करून देते हेदेखील खरंच.
-गणेश मतकरी.

Read more...

प्रश्‍नांकित सिनेमा

>> Wednesday, September 16, 2009

चित्रपट म्हणजे काय? कला की करमणूक, असा एक वाद प्राचीन (म्हणजे चित्रपटाच्या तुलनेत प्राचीन) काळापासून चालू आहे. चित्रपट हे ते बनवणाऱ्या व्यक्तीच्या प्रतिभेचा आविष्कार असावेत, की ते पाहण्याकरता इमानेइतबारे तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांची निर्मिती केलेली असावी, असे दोन दृष्टिकोन इथे संभवतात. यांतल्या कोणत्याही एका दृष्टिकोनाला शंभर टक्के बरोबर मानून चालता येणार नाही. कारण सत्य हे या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. चित्रपटांना कला म्हणून आज मान्यता मिळालेली दिसते; पण केवळ व्यक्तिनिष्ठ कला ही तिचा रसास्वाद घेऊ शकणाऱ्या रसिकांशिवाय व्यर्थ आहे. त्यामुळे या कलेलाही रसिकांचा किंवा प्रेक्षकांचा काहीएक विचार हा लागतोच. प्रेक्षकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि तरीही यशस्वी असलेल्या किंवा दुर्लक्षित असण्यात समाधान मानणाऱ्या दिग्दर्शकांची उदाहरणं जरूर आहेत. मात्र, खरा उत्तम चित्रपट तोच मानला जावा, जो या माध्यमाच्या उत्तम कलाविष्कार असण्याकडे अन्‌ त्याबरोबरच त्याच्या रसिकप्रियतेकडेही लक्ष देईल.
याच प्रकारचा एक दुसरा वाद असतो तो आशय महत्त्वाचा की हाताळणी? बहुतेक समीक्षक मंडळी नेहमी या वादात बाजू बदलत राहताना अन्‌ संभ्रमात असलेल्या दिसतात. असा एक लोकप्रिय प्रवाद आहे, की चांगला प्रश्‍न मांडणारा चित्रपट हा ऑटोमॅटिकली चांगला चित्रपट. बहुतेकदा या प्रकारच्या चित्रपटांबाबत केलेलं बोलणं/ लिहिणं हे आपल्याला सांभाळून केलेलं आढळतं, जरी अनेकदा या चित्रपटांचा दर्जा उघडच बेताचा दिसला तरीही. याचं कारण म्हणजे चित्रपटाला केलेला विरोध हा ते मांडत असणाऱ्या विषयाला केलेल्या विरोधासारखा वाटण्याची भीती. मग त्यापेक्षा विरोधच न करण्याचा पवित्रा अधिक सावधपणाचा. जगमोहन मुंदरा या अश्‍लील चित्रपटांसाठी मान्यता पावलेल्या निर्माता/दिग्दर्शकाने परमार्थाचा आव आणून भंवरी देवी प्रकरणावर केलेल्या "बवंडर' किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या एका प्रकरणावर बनवलेल्या "प्रोवोक्‍ड' चित्रपटासारखी सुमार पण उत्तम परीक्षण मिळालेल्या चित्रपटांची उदाहरणं हा मुद्दा स्पष्ट करतील.
मुंदराचं या चित्रपटांसाठी कौतुक व्हावं ते एवढ्याचसाठी, की त्यानं आपल्या अनुभवाला साजेलशी अश्‍लील दृश्‍यं या चित्रपटात आणण्याचं टाळलं आणि स्वच्छ चित्रपट बनवले. (किंबहुना आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचाच हा एक प्रयत्न होता असंही म्हणता येईल.) नंदिता दास, रघुवीर यादव यांसारख्या अभिनयासाठी नावाजलेल्या आणि ऐश्‍वर्या रायसारख्या प्रतिष्ठित सौंदर्यवतीला इथं उपस्थित करून चित्रपटाच्या हेतूबद्दल शंकेला जागा आणू दिली नाही.
पटकथाही थेट विषयाला हात घालणाऱ्या होत्या. "बवंडर'मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या भंवरी देवी रेप केसची पार्श्‍वभूमी आणि कोर्टातला झगडा हा चित्रपटाचा अवाका होता, तर "प्रोवोक्‍ड'मध्ये खटल्याची अन्‌ पतीने चालवलेल्या छळाची गोष्ट होती. मात्र, विषयाला हात घालणं वेगळं आणि तो परिणामकारक पद्धतीनं पोचवणं वेगळं. जगमोहन मुंदराचे हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना कुठंही आपल्यामध्ये गुंतवून घेऊ शकत नाहीत. हे त्यांना कसं जमतं, हा एक अभ्यासाचा विषय व्हावा. कारण दोन्ही विषय हे उघड-उघड नाट्यपूर्ण आहेत.
"बवंडर' हा जवळपास एखाद्या माहितीपटासारखा होता; पण माहितीपटांमध्ये प्रत्यक्ष वास्तव दिसत असल्यानं त्याला जी विश्‍वसनीयता येते, ती नव्हती. पटकथेलाही कुठं जाणवण्यासारखे चढ-उतार नव्हते, टोकदारपणा नव्हता. केसचे कागदपत्र पाहून उतरून काढल्यासारखं त्याचं स्वरूप होतं. आता आपण नव वास्तववादासारख्या उदाहरणांवरून जाणून आहोत, की चांगल्या चित्रपटाला उसनं नाट्य लागत नाही; आजूबाजूच्या वास्तवाकडेच खोलात जाऊन पाहण्याची नजर लागते. दुर्दैवानं मुंदराकडे उसनं सोंग, असलेलं नाट्य पाहण्याची दृष्टीदेखील नव्हती.
"प्रोवोक्‍ड'मध्ये मोठी घोडचूक होती ती कास्टिंगची. ऐश्‍वर्या रायकडे कोणी बी-मूव्ही नायिका म्हणून पाहणार नाही हे खरं असलं, तरी तिचा अभिनय किती बेताचा आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. छळ असह्य होऊन पतीला जाळणारी स्त्री कचकड्याची वाटणार नाही अशी उभी करणं खरंच कठीण आहे. जी व्यावसायिक हिंदी चित्रपटातही अभिनयाचा पटण्याजोगा आविष्कार उभा करू शकत नाही, ती वास्तववादी अभिनय काय करणार? दिग्दर्शकाला ही जाण अपेक्षित आहे. सर्वांकडेच ती असते असं म्हणता येणार नाही अन्‌ चांगली कलाकृती देण्यापेक्षा आपल्या कारकिर्दीला रंगसफेदी करण्यात रस असणाऱ्या दिग्दर्शकाकडे तर ती नसण्याचीच खात्री.
करमणुकीपेक्षा काही एक प्रश्‍न मांडणारा चित्रपट हा नेहमीच आर्थिक जुगार असतो असं नाही. हे चित्रपट दोन प्रकारचे असू शकतात. प्रश्‍नाचा नाममात्र आधार घेऊन व्यवस्थित करमणूक करणारे चित्रपट किंवा प्रश्‍नाला पूर्णपणे समजून घेऊन त्याकडे तपशिलात जाऊन पाहणारे चित्रपट. पहिल्या प्रकारचे चित्रपट या मानानं सोपे आणि थ्रिलर्सना खाद्य पुरवणारे असतात. उदाहरणार्थ हिंदू-मुस्लिम ऐक्‍य किंवा दहशतवाद यांसारख्या विषयांना जर तोंडी लावणं म्हणून घेतलं तर प्रत्यक्ष विषयाच्या आधारे वेगळ्याच सुरस आणि चमत्कारिक कथा रंगवून सांगणं काही फार कठीण नाही. उदाहरणार्थ हल्लीच आलेले दहशतवादासारख्या अन्‌ मुंबई बॉंबस्फोटांसारख्या ऐरणीवरच्या प्रश्‍नांवर आधारलेले "आमीर' अन्‌ "वेडनसडे' हे प्रश्‍नाला दुय्यम लेखणारे अन्‌ मनोरंजनालाच पुढे आणणारे थ्रिलर्स होते. आता ते थ्रिलर्स म्हणून जरूर उल्लेखनीय होते; पण त्यामुळे ते प्रश्‍न उपस्थित करणारे चित्रपट म्हणून चांगले ठरणार नाहीत! याउलट निशिकांत कामतने बॉंबस्फोटांच्याच विषयावर रचलेला "मुंबई मेरी जान' हा घटनेनंतर निवळणाऱ्या, हळूहळू शांत होऊन आपल्या मार्गाला लागणाऱ्या शहराकडे अधिक वास्तव दृष्टिकोनातून पाहत असल्याने तो या प्रकारचा उत्तम प्रयत्न म्हणून पाहावा लागेल.
दहशतवादाकडेच अतिशय वेगळ्या नजरेने आणि एका जागतिक दृष्टिकोनासह पाहणारा चित्रपट होता तो स्टीवन गागानचा "सिरीआना'. केवळ दहशतवादाचं अस्तित्व हे त्याचं टार्गेट नव्हतं, तर तो कसा जन्माला येतो अन्‌ नजीकच्या भविष्यात त्याचं निवारण कसं अशक्‍य आहे, हे काही व्यक्तिरेखांना प्रातिनिधिक स्वरूपात ठेवून त्यानं दाखवून दिलं होतं. 2001 च्या अमेरिकेवरच्या हल्ल्यानंतर चित्रकर्त्यांचा दहशतवादाकडे केवळ रंजनाचा विषय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि काही अर्थपूर्ण चित्रपट तयार झाले. जागतिक राजकारण, त्यातले नफेतोटे, कॉर्पोरेट्‌सची वाढत चाललेली सत्ता, आंतरराष्ट्रीय हेरगिरी आणि दहशतवाद यांच्यात काही समीकरण असू शकतं का हे "सिरिआना' पाहतो आणि त्यातून एक अस्वस्थ करणारं उत्तर उभं करतो. या चित्रपटात सांकेतिक अर्थानं मनोरंजन नाही किंवा हा माहितीपटही नाही; पण एका प्रश्‍नाचे सर्व पैलू दाखवून देणारा अन्‌ हे करताना प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारा चित्रपट आहे.
कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव हादेखील "इश्‍यू बेस्ड सिनेमा'साठी चांगला विषय असल्याचं सिद्ध झालेलं आहे. मात्र, मघा म्हटल्याप्रमाणेच विषयाचं गांभीर्य आणि चित्रपटाचा दर्जा याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. वर्णभेद हा एक असाच लोकप्रिय विषय. 1967 च्या "इन द हिट ऑफ द नाईट'सारखे बेसिक थ्रिलर्स या मुद्द्यावर रचले गेले; तसेच 1988 चा ऍलन पार्कर दिग्दर्शित "मिसिसिपी बर्निंग' किंवा 1997 चा "अमिस्ताद' यांसारखे प्रश्‍नावर लक्ष केंद्रित करणारे चित्रपटही आले. मात्र, अशा वेळी दिग्दर्शक प्रश्‍नाला वजन किती देतो अन्‌ नाट्याला किती, याला खूप महत्त्व येतं. त्यामुळेच पार्करचा चित्रपट हा या प्रश्‍नावरल्या उत्तम चित्रपटांत गणला गेला, तरी स्पिलबर्गच्या नेत्रदीपक कामगिरीची पार्श्‍वभूमी असतानाही पटकथेतल्या प्रमाणेच संतुलन चुकल्याने "अमिस्ताद' पूर्णपणे यशस्वी झालेला दिसत नाही. वर्णभेदावर आधारित चित्रपटांचंच एक नव्या जमान्यातलं रूप म्हणजे एड्‌स आणि होमोसेक्‍शुऍलिटीने समाजात पसरवलेल्या संमिश्र समजावर आधारित चित्रपट. जोनाथन डेमने 1993 मध्ये पडद्यावर आणलेल्या अन्‌ टॉम हॅन्क्‍सचा अविस्मरणीय अभिनय असलेला "फिलाडेल्फिया' हे या विषयातलं आजवरचं सर्वोत्तम उदाहरण. सामाजिक अंधश्रद्धांचं वर्तमानातलं रूप दाखवणारा हा एक भेदक प्रयत्न.
आपल्याकडे प्रश्‍नाबिश्‍नाकडे पाहायला फार कोणाला फुरसत नसल्यानं हा चित्रप्रकारच तसा उपेक्षित. काही हिंदू-मुस्लिम ऐक्‍यावरचे चित्रपट, "फिलाडेल्फिया'ने प्रेरित "फिर मिलेंगे' किंवा "माय ब्रदर... निखिल'सारखे काही चित्रपट आणि क्वचित स्त्रीप्रधान दृष्टिकोन असणारे काही सोडता, आपल्याकडे एकूण कठीण "प्रकार.' त्यातल्या त्यात मध्यंतरी आलेल्या "टिंग्या' आणि हल्लीच्या "गाभ्रीचा पाऊस'मध्ये शेतकरी समाजाची अवस्था नेमकेपणाने दाखवण्याचे प्रयत्न हेदेखील सततच्या करमणुकीच्या माऱ्यापासून झालेला वेलकम चेंज म्हणावे लागतील. मात्र, आपल्या प्रेक्षकाची आवड पाहता, एक ट्रेन्ड म्हणून हे चित्रपट सातत्याने येऊ लागतील, यावर माझा विश्‍वास नाही. मात्र, जे थोडेफार येतील ते बातमीतला विषय चव्हाट्यावर आणून गल्ला जमवण्याचा प्रयत्न करणारे नसले तर त्यापासून काही फायदा संभवेल. हे शक्‍य होईल अशातला भाग नाही; पण आपण आशावादी असायला काय हरकत आहे?
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP