वास्तवाची पुसट सीमारेषा आणि मेट्रिक्स

>> Monday, June 28, 2010


आपण ज्या जगात वावरतो आहोत, त्याचं काहीतरी बिनसलंय, बिघडलंय असं तुम्हाला कधी वाटलंय? भोवताली घडणा-या गोष्टी वरवर नैसर्गिक वाटल्या तरी त्या तशा घडण्यामागे कोणाचा तरी हात आहे, असा विचार कधी तुमच्या डोक्यात आलाय ? जर आला असेल तर `मेट्रिक्स` चित्रपट मालिकेच्या चाहत्यांमध्ये तुमचा समावेश करायला हरकत नाही. १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या `मेट्रिक्स`ला न भूतो न भविष्यती असं यश मिळेल असं ना वॉर्नर ब्रदर्सला वाटलं होतं, ना दिग्दर्शक बंधू वाचोस्कींना. पण त्यातली `आजूबाजूचं जग खरं नसून अद्ययावत संगणकांनी निर्माण केलेली प्रतिमा आहे, अन् माणसं या यंत्रांचे गुलाम आहेत` ही कल्पना अचानक मोठ्या प्रमाणात जगभर उचलून धरली गेली आणि चित्रपट मालिकेला जोरदार सुरुवात झाली. जवळजवळ मसीहा असलेला यातला नायक निओ (किआनू रीव्हज) हा त्याच्या निद्रिस्त अवस्थेतून जागा केला जातो. मॉर्फिअस (लॉरेन्स फिशबर्न) आणि ट्रिनिटी (कॅरी अँन मॉस) या दोघांबरोबरच इतरांच्या सहाय्याने तो `मेट्रिक्स` या संगणकीय प्रणालीच्या आणि पर्यायाने यंत्राच्या तावडीतून मानवजातीची सुटका करण्यासाठी कसा झगडतो हा `मेट्रिक्स`चा कथाभाग आहे.
मुळात मेट्रिक्स हा विज्ञानपट असला, तरी तो विज्ञानपटाच्या नेहमीच्या व्याख्येत बसत नाही तो त्याच्या एकाचवेळी विचारप्रवर्तक, अ‍ॅक्शनपॅक्ड आणि स्पेशल इफेक्ट्सने भरलेला असल्याने, शिवाय यात नेहमीच्या अवकाशातली युद्धं, यानं, यंत्रमानवांचे ताफे वैगैरे मसाला आढळत नाही. सर्वच बाजूंनी `मेट्रिक्स` हा एक नवीनच प्रकार होता, आहे असं म्हणायला हरकत नाही. मेट्रिक्स रिलोडेड हा या मालिकेतील दुसरा चित्रपट मूळ चित्रपटाइतका ताजा नाही. मात्र तो कथासूत्राला एक पायरी वर चढवतो हे मात्र खरं.
मेट्रिक्सचा एक गोंधळ म्हणजे संगणकाची पार्श्वभूमी असलेल्या मंडळींना तो खूप आवडतो,पण ज्यांचा संगणकाशी फार संबंध नाही, अशांना तो त्याच्या गुंतागुंतीच्या तांत्रिक बडबडीने गोंधळात पाडायला कमी करीत नाही.
मेट्रिक्स हा नवा प्रकार होता, हे जरी मान्य केलं, तरी त्याच्या केंद्रस्थानी असलेली कल्पना, जी वास्तवाला खोटं ठरवू पाहते. मात्र ती शंभर टक्के नवीन होती, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. गेली अनेक वर्षे हळूहळू पण निश्चितपणे हॉलीवूडमध्ये अशा चित्रपटांची लाट येते आहे जे भोवतालच्या वास्तवाबद्दल शंका घेतात आणि ख-या खोट्याचा ताळमेळ लावत बसतात. माणसाचं स्थान, त्याची ओळख, त्याचा आगापीछा, त्याचं जग हे जसं तो समजतो तसंच आहे, की हा आहे एक निव्वळ भ्रामक पडदा, जो फाटला तर काही वेगळंच सत्य बाहेर येईल? असा प्रश्न हे चित्रपट विचारताना दिसतात. या चित्रपटांचा रोख जरी मेट्रिक्सप्रमाणे थेट संगणकांकडे नसला, तरी आधुनिक जगाचा कोरडेपणा, यांत्रिकता, माणुसकीचा अभाव यांच्याकडेच आहे, असं म्हणायला हवं.
मेट्रिक्स चित्रपट प्रदर्शित झाला तो १९९९मध्ये. पण त्याआधीच म्हणजे १९९८ मध्ये या प्रकारचे तीन चित्रपट पडद्यावर पोहोचले होते. यातला सर्वात गाजलेला होता तो `द ट्रूमन शो`. इथे वास्तवाचा खेळ होता तो केवळ ट्रूमन या जिम कॅरीने उत्तमरीत्या साकारलेल्या व्यक्तिरेखेभोवती गुंफलेला. इथला ट्रूमन आयुष्य जगत होता ते टीव्हीवरच्या एका पात्राचं. जन्मापासून याची वाढ झाली ती या त्याच्यासाठी खास उभारलेल्या सेटवर आणि त्याचं आयुष्य ही झाली एक चित्रमालिका. चोवीस तास चालणारी. बिचा-या ट्रूमनला माहीतही नाही की तो त्याच्या निर्मात्याच्या हातातलं खेळणं बनून टीआरपी रेटिंगसाठी आपलं आयुष्य दवडतो आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं ते ट्रूमन आणि त्याच्या कार्यक्रमाचा निर्माता यातलं नातं. कलाकृतीचा तिच्या कार्यापासून वेगळं, स्वतंत्र अस्तित्त्व असू शकतं का यासारख्या प्रश्नांबरोबरच तो देव किंवा नियती आणि माणूस यांमधला संबंधही उलगडून पाहण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याच वर्षीच्या `स्लायडिंग डोअर्स`मध्ये थोडा वेगळा प्रयोग होता तो म्हणजे ऑल्टरनेट रिअ‍ॅलिटीचा. एखाद्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण अमूक गोष्ट करायला हवी होती. कदाचित तशी ती केली गेली असती, तर आपलं आयुष्य बदललं असतं. स्लायडिंग डोअर्सच्या नायिकेची अशी दोन आयुष्य आपल्याला पाहायला मिळतात. ज्यातलं कुठलंही खरं असू शकतं. पण या दोन चित्रपटांबरोबर आलेला त्या वर्षीचा सर्वात महत्त्वाचा प्रयत्न मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिला. तो होता डार्क सिटी. गंमत म्हणजे याचं कथासूत्र मेट्रिक्सच्या अतिशय जवळचं होतं. मात्र संगणकाचा संदर्भ पूर्णतः सोडून. म्हणजे संगणकीय विश्व आणि त्याच्या रक्षक एजंटऐवजी येथे आहेत, परग्रहवासी आणि त्यांनी उभारलेलं प्रायोगिक विश्व. नायकाची भूमिका, तिचा आलेख आणि रहस्यभेद या सर्वच बाबतीत डार्क सिटी जवळजवळ मेट्रिक्सचंच दुसरं रुप आहे.
वास्तवाबद्दल संशय घेण्याची ही प्रथा केवळ हॉलीवूडपुरती मर्यादित होती हे म्हणणंही तितकंसं बरोबर नाही. कारण स्पॅनिश चित्रपट `ओपन युवर आईज` (ज्याचा पुढे व्हॅनिला स्काय नावाने हॉलीवूड रिमेक केला गेला.) देखील याच सूत्राच्या आधारे विचार करताना दिसतो. त्यातल्या रहस्याचा मी इथे उलगडा करून टाकत नाही, पण स्वप्नावस्था आणि यंत्रयुग यांचा वास्तवावर पडणारा प्रभाव इथेही स्पष्ट दिसतो.
हे आणि असे अनेक चित्रपट जर आज सत्य आणि स्वप्न यांच्या सीमारेषेवर अडकलेले दिसतील, तर त्याचा नक्की अर्थ काय समजावा ? मला वाटतं रोजच्या आयुष्यातले ताण दिवसेंदिवस वाढत जात असताना, हे चित्रपट काही एका प्रमाणात प्रेक्षकाला त्याच्या पुढचे मार्ग दाखवून निवड करायला सुचवतायत. व्हर्चुअल रिअँलिटीच्या शोधानंतर माणसाला एकलकोडा बनवणारे अनेक पदार्थ आज तयार होताहेत. स्वतःच्या एका सुखद स्वतंत्र यांत्रिक कोशात राहणं आज शक्य होतंय. यंत्रांचं अतिक्रमण हे आज अतिक्रमण वाटेनासं झालंय. आज आपण खरोखरीच माणसांकडे पाठ फिरवून यंत्रावर अवलंबून राहायला लागलोय. ही एकप्रकारची फसवी अवस्था आहे, असंच हे चित्रपट सांगू पाहताना दिसतात. स्वप्नं, गुलामी ही केवळ रुपकच असली, तरी त्यांच्यामागच्या मूळ संदेश फारसा धुसर नाही.
हे चित्रपट वैचारिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना असंच सुचवायचं की आपल्या आयुष्याचं काय करायचं हे ज्या त्या व्यक्तीच्या हातात आहे. आजच्या यंत्रयुगात तत्कालिन सुखाचे अनेक सोपे मार्ग उपलब्ध आहेत. पण प्रत्येकाने निर्णय घेताना आपण केलेल्या निवडीमागे दूरगामी परिणाम लक्षात घेणं इष्ट आहे. केवळ आजचा क्षण नाही.
- गणेश मतकरी
 (साप्ताहिक सकाळ २००३ मधील लेखांमधून.)

Read more...

द व्हिजिटर- अकृत्रिम नाट्य

>> Sunday, June 20, 2010

हॉलीवूडचे स्वतःचे काही असे संकेत आहेत. व्यक्तिचित्रणात रंग भरण्यासाठी काय करावं? नाट्यपूर्णता अतिरंजीत ठेवूनही प्रेक्षकांच्या पचनी कशी पाडावी? संहितेच्या कितव्या पानावर अन् पडद्यावरच्या कितव्या मिनिटाला घटनाक्रमाला कलाटणी द्यावी? घटनांचा आलेख किती वर चढवावा? `हॅपी एन्डीन्ग`चा बेतीवपणा कसा लपवावा? या अन् अशा सर्व प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तरे आहेत. ती अचूकपणे पानावर उमटवणारे कथाकार, अन् पडद्यावर आणणारे दिग्दर्शक आहेत. लार्जर दॅन लाईफ असून सामान्य माणसांचं कात़डं पांघरणारे नट आहेत. खेरीज या सा-याला एक प्रचंड प्रेक्षकवर्गही आहे, जो या सर्व मंडळींची मेहनत कारणी लावतो; अन् बदल्यात आपल्या स्वप्नाकांक्षांना पडद्यावर का होईना, पण पूर्ण होताना पाहण्याचं समाधान मिळवितो.
मात्र हॉलीवूड जे करतं, ते सगळाच अमेरिकन सिनेमा करतो, असं म्हणता येणार नाही. अमेरिकन इन्डिपेन्डन्ट चित्रपटांमध्ये अनेक दिग्दर्शक या संकेतांना टाळताना, पडद्यावरही जीवनाचं प्रतिबिंब शोधताना दिसतात. त्यांचा चित्रपट `ब्लॉक बस्टर` होण्याची शक्यताच नसते. पण जो अभिरुचीसंपन्न अन् स्वतःचा विचार करू शकणारा प्रेक्षक आहे, तो या चित्रपटांना निश्चित हजेरी लावतो. २००७ चा थॉमस मॅकार्थी लिखित-दिग्दर्शित `द व्हिजिटर` याच प्रकारचा चित्रपट आहे.
मी व्हिजिटर पाहिला, तेव्हा त्यातला प्रमुख अभिनेता रिचर्ड जेन्कीन्स ऑस्करच्या तर जेन्कीन्स आणि मॅकार्थी दोघेही इंडीपेन्डन्ट स्पिरीट अ‍ॅवॉर्डच्या नामांकनात होते, अन मॅकार्थी विजेता ठरला, यापलीकडे मला चित्रपटाविषयी काहीही माहिती नव्हती. एका परीने ते योग्यच झालं. चित्रपटाच्या सुरुवातीची वळणं त्यामुळे माझ्यासाठी अनपेक्षित ठरली.अन् नायक वॉल्टर व्हेल (जेन्कीन्स) या व्यक्तिरेखेत मी नकळत गुंतत गेलो.
व्हिजिटर नक्की कशाविषयी आहे, हे आपल्याला कळायला काही वेळ लागतो. त्याची पटकथा शेवटाची दिशा लवकर धरण्यासाठी लगेचच विषयाला हात घालत नाही, तर पुढल्या क्षणी काय घडेल हे माहिती नसलेल्या आयुष्याप्रमाणे थोडी बिचकत, थोडी रेंगाळत पुढे सरकते.
वॉल्टरची बायको वारल्यापासून त्याचं कशात लक्ष लागत नाही, पिआनिस्ट पत्नीच्या आठवणीसाठी तो पिआनो शिकण्याचा प्रयत्न करतो, पण तेही ध़ड जमत नाही. कॉलेजमध्ये शिकवण्याच्या रुटीनचा त्याला कंटाळा आलाय. लंडनमधल्या मुलाबरोबर त्याचा विशेष संपर्क नाही. एकूण आयुष्यापासून तो डिसकनेक्ट झालाय. एकदा कनेक्टीकट मधलं राहतं घर सोडून न्यूयॉर्कमध्ये एका कॉन्फरन्सला हजेरी लावण्याची जबाबदारी वॉल्टरवर येऊन पडते. मॅनहॅटनमध्ये असणा-या आणि बराच काळ बंद असलेल्या आपल्या फ्लॅटमध्ये शिरताच, तिथे कुणीतरी राहत असल्याचं त्याच्या लक्षात येतं. लवकरच कळतं की धर्माने मुस्लिम असणा-या तारेक (हाज स्लेमान) अन् झेनाब (दनाय जेकसाई गुरीरा) या अफ्रिकन जोडप्याला कुणीतरी फसवून ही जागा भाड्याने दिली आहे. लगोलग रस्त्यावर आलेल्या या दोघांना वॉल्टर काही दिवस राहू देण्याची तयारी दाखवितो, अन् ही वॉल्टर पुन्हा माणसात येऊ लागण्याची सुरुवात ठरते.
तारेक हा ड्रमवादक असतो. वॉल्टरची अन् त्याची चांगली मैत्री होते. आणि हा अशा केवळ फीलगुड मैत्रीचा चित्रपट असल्याच्या भ्रमात आपण असतानाच तारेकला अटक होते. त्याचा गुन्हा संकेताप्रमाणे फार नाट्यपूर्ण नसतो, पण सामान्य माणसाचं जीवन बदलून टाकणारा. अमेरिकेत राहण्याचा परवाना नसल्याने तारेकला परत पाठवून देण्याची ही सरकारने चालवलेली तयारी असते.
व्हिजिटर हा प्रत्येक क्षणी शक्यतेच्या चौकटीतच विचार करताना दिसतो. त्यातले लोक अन्यायाने हतबल आहेत, पण हा अन्याय कुणा खलनायकाच्या हातून झालेला नसून निसर्ग, सरकारी यंत्रणा, सामाजिक भेदभाव अशा अधिक वास्तव गोष्टींमुळे तो ओढवलेला आहे. साहजिकच एका व्यक्तीचा काटा काढून या व्यक्तिरेखा सुखी होणार नाहीत हेही उघड आहे. त्यामुळे याप्रकारची सोपी अन् खोटी उत्तरं काढण्यापेक्षा व्हिजिटर खरंच अशा वेळी काय घडेल याचा विचार करतो.
सहवासाचं महत्त्व, हा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी येणारा मुद्दा आहे. सहवास अन् ताटातूट याचा विविध पातळ्यांवर विचार येथे केला जातो. मृत्यूपासून डिपोर्टेशनपर्यंत अनेक रुपात यातलं संकट विषद होतं. मात्र यातली पात्रं हार मानताना दिसत नाहीत. अडचणींवर मात करून पुढे कसं जाता येईल याचा सकारात्मक विचारच त्यांच्या डोक्यात सुरु असतो.
काही वर्षांपूर्वी या प्रकारचा संदेश असणारा चित्रपट येणं शक्य होतं, मात्र त्याला खरी भेदकता आणून दिली, ती ११ सप्टेंबर २००१च्या घटनेने. ९/११ची एक गडद सावली या चित्रपटाला व्यापून राहिली आहे, जी यातल्या दृश्यभागात अन् संवादातही अधेमधे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे डोकावताना दिसते. मुस्लीम व्यक्तिरेखांची गळचेपी, शहरातलं असुरक्षिततेचं वातावरण, वर्ल्ड ट्रेड सेंटरचा उघडपणे येणारा उल्लेख, इमिग्रेशनचा मनमानी कारभार अशा स्वरुपात तो वेळोवेळी आपलं डोकं वर काढताना दिसतो.
शहराची वेगवेगळी रुपं आणि मूड्स मॅकार्थीने फार छान पकडले आहेत. स्ट्रीट म्युझिशिअन्सचं कल्चर, पार्कमध्ये वाजवणारे वादक. कॉन्फरन्स हॉल/ब्रॉड वे सारख्या गजबजलेल्या जागा, अन् त्याविरुद्ध डिपोर्टेशनसाठी लोकांना ठेवतात त्या जागेजवळचं निर्मनुष्य/निरुत्साही वातावरण या सगळ्यांचा कथानकाशी समांतर जाणारा विचार केला गेल्याचं लक्षात येतं.
प्रत्यक्ष संगीताचंही हेच म्हणता येईल. संगीत ही व्हिजिटरमधील एक व्यक्तिरेखाच असल्याप्रमाणे ते वेळोवेळी आपल्याला भेटत राहतं. पहिल्या प्रसंगातल्या वॉल्टरच्या फसलेल्या पिआनोवादनापासून अखेरच्या प्रसंगातल्या उद्रेकी वादनापर्यंत विविध छटा त्यात दिसून येतात. प्रत्यक्ष भावना पोचवण्यासाठीही त्याचा वापर होतो. वॉल्टर अन् तारेकची मैत्री वाढण्यातला संगीताचा वापर रेस्टॉरन्ट बॅन्ड, पार्कमधलं डब्या अन् ड्रम्सवरचं म्युझिक, तारेकची आई मोना (हिआम अब्बास) खिडकी पुसत असताना पार्श्वभूमीला येणारा वॉल्टरच्या पत्नीचा पिआनो अशा कितीतरी जागा इथे सांगता येतील. मिक्सिंगमध्ये त्याचं कमी जास्त होणं, इतर प्रसंगांवर झिरपणं हेही ऐकण्याजोगं. द व्हिजिटर कसलाही आव आणत नाही. सांगून सवरून केलेलं मनोरंजन त्याला नको आहे. सुखांताकडे जाणारे सोपे रस्ते तो टाळतो, पण पूर्ण शोकांतही त्याला पसंत नाही. एका आपल्याच कोषात अडकलेल्या माणसाचा तो फोडून बाहेर येण्याचा, जगाकडे पुन्हा एकदा नव्याने पाहायला लागण्याचा प्रयत्न या चित्रपटात दिसतो. हे नाट्य उसनं नाही, वास्तवातलंच, अकृत्रिम आहे. कोणालाही गुंतवून ठेवेल, असंच.

-गणेश मतकरी.

Read more...

शटर आयलन्ड- २- एक मनोविश्लेषणात्मक चकवा

>> Monday, June 14, 2010

ऑर्सन वेल्स म्हणतो, ‘‘तुम्हाला जर शेवट सुखांत हवा असेल, तर तुम्ही कथानक कुठे संपवता, यावर ते अवलंबून राहील.’’ वरवर साध्या, अन् काहीशा गंमतीदार वाटणाऱ्या या वाक्यामागे ‘स्टोरी टेलिंग’बद्दलचं एक महत्त्वाचं सूत्र लपलेलं आहे.
कथाविष्काराशी संबंधित असणारं कोणतंही माध्यम हे ती कथा मांडणाऱ्याच्या नियंत्रणात कसं असू शकतं, ते इथे दिसून येतं. कथा सांगणारा ती कुठे सुरू करतो, कोणकोणते टप्पे घेतो, कोणत्या दृष्टीकोनातून ती कथा सांगतो, कोणता भाग सांगण्याचं टाळतो, अन अर्थातच शेवट कुठे योजतो हे त्या कथेला आकार देणारं ठरतं. त्या कथेला स्वत:ची विशिष्ट रचना, विशिष्ट दृष्टी देणं, हे कथा सांगणा-याने घेतलेल्या निर्णयावर संपूर्णपणे अवलंबून राहतं. तो या निर्णयांमध्ये चुकला, तर अपेक्षित वाचक-प्रेक्षकावर होणाऱ्या परिणामात जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो.
या प्रकारचा विचार अतिशय तपशिलात जाऊन केलेला एक चित्रपट पाहण्याची संधी सध्या उपलब्ध झाली आहे, ती डेनिस लेहेनच्या कादंबरीवर आधारित मार्टिन स्कोर्सेसी दिग्दर्शित ‘शटर आयलन्ड’मुळे. ‘शटर आयलन्ड’चं पोस्टर हे उघडच एखाद्या भयपटाच्या जाहिरातीसारखं आहे. पोस्टरच्या वरच्या भागात लिओनार्दो डि काप्रिओचा आगकाडीच्या उजेडात अर्धवट उजळलेला चेहरा काळ्या पाश्र्वभूमीवर उठून दिसतो, तर खालच्या भागात दिसतं, चित्रपटाच्या नावातलं शटर आयलन्ड, तेही एखाद्या वादळी रात्री दिसणारं. पोस्टरवरची टॅगलाईन सांगते ‘सम वन इज मिसिंग’.
या पोस्टरपलिकडे जाऊन आपण मध्यवर्ती कल्पना ऐकली, तर तीदेखील भयपटाला साजेशीच आहे. काळ आहे १९५४ चा. यु.एस. मार्शल, टेडी डॅनिएल्स (लिओनार्दो डिकाप्रिओ) आणि त्याचा सहकारी चक (मार्क रफालो) यांना शटर आयलन्ड नामक बेटावर पाचारण करण्यात आलं आहे. चित्रपट सुरू होतो तो शटर आयलन्डकडे निघालेल्या बोटीवरच.
बेटावर धोकादायक मनोरुग्णांसाठी असलेलं इस्पितळ सोडून काही नाही. कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या या इस्पितळातून, रेचेल सलान्डो या पेशन्टनं पळ काढलेला आहे. बाई तशी धोकादायकच, कारण तिने आपल्या तीन मुलांचा खून केलेला आहे.
रेचेलचं गायब होणं अधिकच रहस्यमय आहे, कारण ती कशी पळाली हे कोणालाच कळलेलं नाही. बंद खोलीतून, अनेक लोकांच्या पहा-यातून तिचं अदृश्य होणं, हे मार्शल्ससाठी आव्हान ठरणारं आहे. त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे इस्पितळाचे संचालक डॉ. कॉली (बेन किंग्जली) यांनी दाखवलेली पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी.
बेटावर येण्यामागे टेडीचा आणखी एक हेतू आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अँड्रय़ू लेडीसची भरती याच इस्पितळात असल्याचं त्याला कळून चुकलेलं आहे. या लेडीसचा छडा लावणं, अन् वरवर ‘सब ठीक’ वाटणाऱ्या इस्पितळाचा पर्दाफाश करणं अशी टेडीची योजना आहे. मात्र आपला बेत तडीला नेणं किती अवघड आहे याची टेडीला कल्पनाच आलेली नाही.
आता थोडक्यात पाहायचं तर चित्रपट भयपटाचे बरेच संकेत पाळताना दिसून येतो. दृश्य संकल्पनांपासून व्यक्तिचित्रणापर्यंत, अंधारं, गुदमरणारं वातावरण, अधेमधे दचकवणारे क्षण, रेचेल सलांडोचं बंद खोलीतून नाहीसं होण्यासारखं उघडच अतिंद्रिय शक्यता असणारं गुपित, वादळी रात्र, काहीतरी लपवत असणारी डॉक्टर मंडळी, वास्तव अन् आभासाच्या सीमेवर असणारा नायक, असं बरंच काही या संकेतांशी थेट नेऊन जोडता येतं. मात्र हा भयपट आहे का? या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक आहे.
‘कन्व्हेक्शन्स’ आणि ‘स्टिरीओटाईप्स’ हे दोन प्रमुख घटक ‘शहर आयलन्ड’मध्ये मुबलक प्रमाणात आहेत. मात्र चतुराई आहे, ती गोष्ट सांगणाऱ्यांनी, म्हणजे आधी कादंबरी लिहिणाऱ्या डेनिस लेहेननी अन् मग दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीनी, ते ज्याप्रकारे वापरले आहेत त्यात. हा चित्रपट भयपटाचा एक ढाचा आपल्या रचनेच्या मुळाशी ठेवतो, मात्र या ढाच्याच्या मर्यादेला कशी बगल द्यायची, ते लेहेन अन् स्कोर्सेसी चांगले जाणून आहेत.
लेहेनच्या साहित्यातला जवळपास अर्धा भाग हा डिटेक्टिव्ह फिक्शन लिहिण्यात खर्ची पडला आहे. केन्झी आणि जनारो या डिटेक्टिव्ह जोडीच्या कारवायांची त्याची पुस्तकं सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. मात्र या कादंबऱ्यादेखील केवळ रहस्याच्या उलगडय़ावर समाधान मानणाऱ्या नाहीत. समाजाचा एक विशिष्ट वर्ग, काळाचा संदर्भ, मनोविश्लेषणात्मक मुद्दे, सत्यासत्य/भलंबुरं यांच्या सांकेतिक संकल्पनांना आव्हान देण्याची तयारी या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्या लिखाणात दिसून येतो. एका विशिष्ट आराखडय़ाचा त्याच्या चौकटीबाहेर जाणारा वापर या साहित्यातही स्पष्ट आहे. त्याच्या कादंबऱ्यांवर आधारित क्लिन्ट इस्टवूड दिग्दर्शित ‘मिस्टीक रिव्हर’, बेन अ‍ॅफ्लेक दिग्दर्शित ‘गॉन, बेबी, गॉन’ (केन्झी-जनारो कथा) या चित्रपटांमध्येही लेहेनचा उद्देश केवळ ‘हूडनीट्स’ लिहून वाचकांना खूष करण्याचा नसून त्यापलीकडे जाणारा आहे. शटर आयलन्डमध्येही याच प्रकारचा प्रयत्न दिसून येतो. इथला ढाचा मात्र रहस्यकथेचा नसून भयकथेचा, गूढकथेचा आहे.
स्कोर्सेसीला या प्रकारच्या ‘ढाच्यांच्या’ वापराचं आकर्षण मुळातच आहे. स्वत:चे असे नियम आखून अमेरिकन चित्रसृष्टीने रूढ केलेली जॉनरं (पद्धती), अन् स्वतंत्रपणे सर्जनशील दिग्दर्शकांनी या फॉम्र्युलांच्या मर्यादा ताणून आपला वैशिष्टय़पूर्ण सिनेमा साकारण्याचा केलेला प्रयत्न, हा त्याच्या चित्रपट अभ्यासातला विशेष प्रिय भाग आहे. त्याच्या स्वत:च्या कामातही प्रामुख्याने गँगस्टर फिल्म्सच्या फॉम्र्युलाला त्याने वेगवेगळ्या प्रकारे वापरलेलं दिसतं. (उदाहरणार्थ, मीन स्ट्रीट्स, गुड फेलाज, कॅसिनो, द डिपार्टेड इत्यादी), त्याखेरीज म्युझिकल (न्यूयॉर्क, न्यूयॉर्क), कॉमेडी (द किंग ऑफ कॉमेडी), बायोपिक (द एव्हिएटर) अशा इतर चित्रप्रकारांचा अंतर्भावही त्याच्या कामात दिसून येतो. ‘भयपट’ मागे त्याच्या केप फिअरच्या रिमेकमध्ये काही प्रमाणात डोकावला होता. इथे मात्र त्याचा अधिक विस्तृत आविष्कार दिसून येतो. स्कोर्सेसीच्या चित्रपट इतिहासावरच्या प्रेमाचा अन सखोल अभ्यासाचा बहुधा या साहित्यकृतीच्या निवडीपासूनच फायदा झाला असावा. कारण शटर आयलन्डचंच रहस्य हे एका गाजलेल्या जर्मन एक्स्प्रेशनिस्ट चित्रपटाची खूपच आठवण करून देणारं आहे. त्याचं नाव मात्र मी सांगणार नाही, कारण त्यामुळे चित्रपट जाणकारांना शटर आयलन्डचा शेवट सांगून टाकल्यासारखंच होईल.
शटर आयलन्डची कथा ज्या दृष्टिकोनातून मांडली जाते तो खास आहे, अन् चित्रपटाच्या चकव्यासाठी महत्त्वाचाही आहे. ‘अनरिलाएबल नॅरेटर’ ही अनेक रहस्यपटांमध्ये वापरली जाणारी चतुर संकल्पना. या प्रकारचे चित्रपट प्रेक्षकाला मुळातच काही गोष्टी गृहीत धरायला भाग पाडतात अन् कालांतराने या मूळच्या बैठकीबद्दलच प्रश्न उपस्थित करतात. डेव्हिड कोपचा ‘सिक्रेट विन्डो’, क्रिस्टोफर नोलानचा ‘मेमेन्टो’ आणि श्यामलनचा ‘सिक्स्थ सेन्स’ ही या प्रकारच्या बेभरवशाच्या निवेदनाची सुप्रसिद्ध उदाहरणं. ‘शटर आयलन्ड’मधल्या रहस्यात या तीनही चित्रपटांच्या छटांचा समावेश आहे. मात्र थेट नक्कल नाही.
शटर आयलन्डमधलं रहस्य प्रभावी जरूर आहे. मात्र लेहेन किंवा स्कोर्सेसी यांना या रहस्यापलिकडल्याही गोष्टी अभिप्रेत आहेत. लेहेनचा भर आहे तो अधिक व्यक्तिसापेक्ष.‘टेडी डॅनिएल्स’च्या मनोविश्लेषणात त्याला अधिक रस आहे. चित्रपटातला गुन्हा, गुन्हेगार अन् परिस्थितीने साधलेला क्रूर विनोद हे त्याच्या दृष्टीने कथेचं केंद्रस्थान आहे. तर स्कोर्सेसीच्या दृष्टीने या कथानकाच्या स्थलकालाला अधिक महत्त्व आहे. चित्रपटाचा १९५४ चा काळ, महायुद्धाची छाया, समाजातली असुरक्षिततेची भावना, मानसशास्त्रात अन् मानसोपचारात या काळात होत असणारे बदल- प्रायोगिक दृष्टीकोन अन् अंधश्रद्धा हा दिग्दर्शकीय फोकस आहे. एक काळ तपशीलात उभा करणं हे स्कोर्सेसीच्या अनेक चित्रपटांना मध्यवर्ती ठरणारं आहे, त्यामुळे इथेदेखील तीच योजना असणं, हे सुसंगत आहे.
ज्या मंडळींना पटकथेत रस आहे, त्यांनी ‘शटर आयलन्ड’ एकापेक्षा अधिक वेळा जरूर पडावा. प्रथमदर्शनी आपण ज्या दृष्टीकोनातून चित्रपट पाहतो, तो यातल्या रहस्याच्या उकलीनंतर इतका बदलतो, की अगदी बारीकसारीक गोष्टींचा अर्थदेखील त्याबरोबर बदलून जातो. पात्रांच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव, छोटय़ा-मोठय़ा वाक्यांचे संदर्भ, इथपासून ते व्यक्तिरेखांच्या विशिष्ट प्रकारे वागण्याच्या कारणमीमांसेपर्यंत प्रत्येक गोष्ट इथे दुहेरी अर्थानं पाहणं शक्य आहे. अगदी पोस्टरवरचं ‘सम वन इज मिसिंग’ हे वाक्यही त्याला अपवाद नाही. समोर उघडपणे दिसणारं रहस्य लपवण्याची इथली चलाखी अभ्यासण्याजोगी म्हणावी लागेल.
या वैशिष्टय़पूर्ण पटकथेसाठी स्कोर्सेसीने चित्रणशैलीतला प्रयोग आणि ध्वनी यांचा फार उत्तम प्रकारे उपयोग केलेला दिसून येतो. चित्रण शैली क्वचित वास्तववादी पण बरेचदा एक्स्प्रेशनिस्ट अन सररिअलस्टिक वळणाची दिसून येते. खासकरून प्रत्यक्षातल्या काळोखी गडद छटा, ऊन आभासी स्वप्नांमधली कृत्रिम आकर्षक प्रकाशयोजना यांच्यातला विरोधाभास लक्षात राहाण्यासारखा. बदलत्या अवकाशाबरोबर ध्वनी अन् प्रकाशयोजनेत पडणारा फरकदेखील पाहण्यासारखा.
मुख्य वॉर्डमध्ये घडणारे प्रसंग, धोकादायक पेशंट असणाऱ्या सी वॉर्डमधले वीज गेल्यानंतरचे प्रसंग किंवा कॉलींचं घर अशा प्रत्येक स्थळासंबंधात बदलत जाणारा ऑडिओ व्हिज्युअल विचार दिग्दर्शकाचं अदृश्य पण तरबेज नियंत्रण अधोरेखित करतो. ‘शटर आयलण्न्ड’ला ट्विस्ट एन्डिंग असणार हे उघड आहे. मात्र यातला ट्विस्ट दुहेरी आहे. कादंबरीतला धक्का चित्रकर्त्यांनी तसाच ठेवून वर स्वत:चा एक नवीन धक्का आणून जोडला आहे. तोही संवादात केवळ एका वाक्याची भर टाकून. केवळ हे एक वाक्य देखील पटकथाकार लाएटा कालोग्रिदीसची निवड योग्य असल्याचं सिद्ध करतं. या वाक्याने चित्रपटाला रहस्यापलिकडला पल्ला गाठायला मदत होते. चित्रपटाचा शेवट एका नव्या टप्प्यावर पोहोचतो.
ऑर्सन वेल्सचं वाक्य सुखांताइतकंच शोकांतालाही लागू पडतं, त्याचा हा पुरावाच मानायला हवा.


- गणेश मतकरी

(रविवार लोकसत्तामधून)

Read more...

शटर आयलन्ड १ - आणखी एक कोडे

>> Sunday, June 6, 2010

`यू नो, धिस प्लेस मेक्स मी वन्डर, विच वुड बी वर्स, टू लिव्ह अ‍ॅज अ मॉन्स्टर, ऑर टू डाय अ‍ॅज अ गुड मॅन. -टेडी डॅनिअल्स, शटर आयलन्ड`
कादंबरीकार डेनिस लेहेन अन् चित्रपट दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी ही दोन्ही नावं अमेरिकन कलासृष्टीत महत्त्वाची मानली जाणारी. त्यांच्या कामाची ढोबळ जातकुळी ब-याच अंशी `थ्रिलर` या वर्गवारीत येणारी असली, तरी वाचका-प्रेक्षकाची केवळ करमणूक करणं, इतका मर्यादित अजेन्डा या दोघांचा नाही. स्कोर्सेसीचा व्यक्तिप्रधान अन् विशिष्ट स्थल-कालाशी जोडला गेलेला सिनेमा तर विख्यात आहेच. लेहेनच्या दोन कादंब-यांची हल्ली झालेली चित्रपटरुपं पाहता त्याचाही आवाका लक्षात यावा. क्लिन्ट इस्टवुडने केलेला `मिस्टिक रिव्हर` अन् बेन अ‍ॅफ्लेकने केलेला `गॉन, बेबी, गॉन` ज्यांनी पाहिले (किंवा मूळ कादंब-या वाचल्या) असतील त्यांना हे जाणवेल, की दोन्ही चित्रपटांमध्ये एक रहस्य अन् त्याचा उलगडा कथेचा अविभाज्य भाग असल्याप्रमाणे येत असूनही हे सांकेतिक रहस्यपट नाहीत. किंबहूना त्यांच्याकडे रहस्यपट म्हणून पाहणं हेच दिशाभूल करणारं अन् चित्रपटाचा प्रभाव कमी करणारं आहे.
लेहेन किंवा स्कॉर्सेसी यांच्या कामात एक सामाजिक जाणीव आहे, किंबहुना समाजातल्या एका विशिष्ट वर्गाभोवती त्यांचा आशय केंद्रीत झालेला दिसतो. तोही काहीसा रिअ‍ॅलिस्टिक पद्धतीने. शक्य तितकी अतिरंजीतता टाळून आणि समाजापुढे आरसा धरल्यासारखा. त्यामुळेच या वास्तववादी चौकटीच्या उघडच पलीकडे असणारा `शटर आयलन्ड`सारखा विषय या दोघांच्या कामाच्या आलेखात कसा अन् कुठे बसतो, हे पाहणं आवश्यक ठरतं.
शटर आयलन्डही वरवर थ्रिलर आहे. किंबहुना त्यापलीकडे जाऊन म्हणता येईल की रहस्यपट, भयपट अन् सायकॉलॉजिकल थ्रिलर या तिघांचं हे सारख्या प्रमाणात असलेलं मिश्रण आहे.
चित्रपट सुरू होतो, तो धुक्यातून बाहेर येणा-या बोटीपासून. बोटीवर आहेत टेडी डॅनिअल्स (लिओनार्डो डी काप्रिओ) अन् त्याचा सहकारी चक (मार्क रफालो) हे मार्शल्स. टेडी आणि चक एका कामगिरीवर निघालेत. `शटर आयलन्ड`वरल्या धोकादायक मनोरुग्णांसाठी असलेल्या इस्पितळातून रेचेल सलान्डो ही बाई गायब झाली आहे. तीदेखील अशीतशी नाही, तर बंद खोलीतून. अनेकांचा पहारा चुकवून. इस्पितळाचे संचालक आहेत डॉ. कॉली (बेन किंग्जली), जे वरवर तरी सर्व प्रकारची मदत करायला तयार आहेत.
टेडीचा बेटावर येण्यामागे आणखी एक हेतू आहे. त्याच्या पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असणारा अ‍ॅन्ड्रयू लेडीस याच इस्पितळात आहे. त्याचा शोध हादेखील टेडीसाठी महत्त्वाचा आहे. इस्पितळाच्या वरवर शांत वातावरणामागे काही भयंकर रहस्य दडल्याचा त्याचा होरा आहे. तो खरा वा खोटा हे मात्र काळच ठरवेल.
शटर आयलन्डमधलं वातावरण, त्यातल्या उघडपणे दिसणा-या कोड्याचं स्वरूप आणि त्यातल्या अनेक दृश्यचौकटी या भयपटांची आठवण करून देणा-या आहेत. या सगळ्याची आवश्यकता आहे, ती निवेदनाला प्रवाही ठेवण्यासाठी. एका विशिष्ट दिशेने प्रेक्षकाला घेऊन जाण्यासाठी. प्रत्यक्षात इथे आपल्याला प्रथमदर्शनी जाणवणा-या गोष्टी हा केवळ एक वरचा पापुद्रा आहे. मात्र तो तसा असल्याचं जाणवू न देणं हाच इथला सर्वात मोठा चकवा आहे.
रहस्य हे बहुधा सांगण्याच्या पद्धतीत किंवा निवेदनात दडलेलं असतं. सांगणारा किंवा चित्रपटासंदर्भात बोलायचं तर लेखक/दिग्दर्शक काय सांगतो, किती सांगतो अन् कोणाच्या दृष्टिकोनातून सांगतो हे त्या रहस्याला उथळ किंवा गहिरं करून जातं. अनरिलायबल नॅरेटर ही रहस्यपटांत अनेकदा वापरण्यात येणारी क्लृप्ती, जी कथानकातला मध्यवर्ती दृष्टिकोन हाच संदिग्ध करते आणि प्रेक्षकांना गोंधळात पाडते. शटर आयलन्ड ब-याच अंशी या क्लृप्तीचा आधार घेतो. अनरिलायबल नॅरेटर वापरणारे मला आवडणारे इतर तीन चित्रपट म्हणजे `सिक्रेट विन्डो`, `सिक्स्थ सेन्स` आणि `मेमेन्टो`. शटर आयलन्ड आपल्या प्रवासात या तीनही चित्रपटांशी ठळक साधर्म्य दर्शवतो, मात्र अंमल नाही.
चित्रपट अभ्यासूंनी शटर आयलन्ड दोनवेळा पहावा असा माझा सल्ला आहे. पहिल्यांदा पाहताना जाणवणारा यातल्या अनेक गोष्टींचा अर्थ हा रहस्याच्या उलगड्यानंतर बदलून जातो. हा बदल किती चतुराईने, अन् किती तपशीलात केला आहे, हे चित्रपट दुस-यांदा पाहिल्याखेरीज स्पष्ट होणार नाही. `हायडिंग इन प्लेन साईट` हा शब्दप्रयोग इथल्या रहस्यभेदाला अचूक लागू पडेल.
स्कोर्सेसीचा `शटर आयलन्ड` मधला इन्टरेस्ट हा समजण्यासारखा आहे. त्याला विशिष्ट व्यक्तिरेखा विशिष्ट काळात जिवंत करणं आवडतं. ती संधी त्याला इथेही मिळते. १९५४मधे घडणारं हे कथानक त्या काळातल्या सर्व भल्याबु-या तपशिलांसह जिवंत होतं. त्या काळाची रहस्यपटांची शैली, प्रत्यक्ष त्या काळाचे बारकावे, मानसशास्त्रीय उपचारांबद्दलचे समज-अपसमज-गैरसमज महायुद्धाची छाया या सगळ्यांबरोबर टेडी डॅनिअल्स या आव्हानात्मक व्यक्तिरेखेला स्कॉर्सेसी आपल्या सध्याच्या आवडत्या नायकाच्या मदतीने उभा करतो. रिअ‍ॅलिस्ट, सरिअ‍ॅलिस्ट अन् एक्स्प्रेशनिस्ट अशा तीनही शैलींचा वापर तो आपल्या दृश्य भागासाठी बेमालूम करतो. खासकरून भासमय स्वप्नदृश्य विशेष पाहण्याजोगी.
लेहेनच्या इतर कादंब-यांप्रमाणेच इथेही भर रहस्याच्या उलगडण्यावर नसून संबंधित व्यक्तिरेखांच्या विश्लेषणावर आहे. त्यामुळेच निव्वळ रहस्याची उकल ही आपल्याला समाधान देत नाहीत, तर या व्यक्तिरेखांची परिस्थिती अन् पुढे ओढवणा-या प्रसंगांची चाहूल आपल्याला अस्वस्थ करून सोडते. सांकेतिक रचनेवर बेतलेल्या रंजक कोड्यांपेक्षा या प्रकारची रहस्य ही नेहमीच अधिक परिणामकारक असतात. शटर आयलन्ड त्याला अपवाद नाही.
-गणेश मतकरी. (महानगरमधून)

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP