बिग नथिंग- न्वार कॉमेडी

>> Sunday, April 25, 2010

`It is not funny that a man should be killed, but it is sometimes funny that he should be killd for so little, and that his death should be the coin of what we call civilization`- Raymond chandler (The simple art of murder- an assay)

गुन्हेगारी साहित्याची दर्जात्मक हाताळणी आणि त्यातलं समाजाचं प्रतिबिंब यातला परस्परसंबंध विषद करणा-या चॅन्डलरच्या लेखातलं हे उधृत. सुसंस्कृत वाचकालाही दर्जेदार गुन्हेगारी साहित्य का मोहात पाडतं, या प्रश्नाचं अचूक उत्तर देणारं, एका परीने हे उधृत चित्रपटांनाही लागू आहे. खासकरून ज्या प्रकारच्या साहित्याविषयी चॅन्डलर लिहितो आहे, त्याला समांतर असणा-या चित्रप्रकारातल्या, अर्थात `फिल्म न्वार`मधल्या.
या विधानातला `फनी` हा शब्द काही सरसकटपणे `विनोदी` या अर्थाने वापरण्यात आलेला नाही, हे उघड आहे. मात्र काही चित्रपटांमध्ये मात्र तो खरोखरंच त्या अर्थाने वापरला जाऊ शकतो. २००६मध्ये आलेला `बिग नथिंग` हे त्याचं चपखल उदाहरण आहे. `बिग नथिंग` ही कोणत्याही एका विशिष्ट प्रकारात बसणारी फिल्म नसल्याने मी तिला `न्वार कॉमेडी` हे `फिल्म न्वार` अन् `ब्लॅक कॉमेडी` या दोन प्रकारांचं एकत्रिकरण साधणारं नाव देईन. न्वार या शब्दाचा थेट अर्थ `ब्लॅक` हाच असला, तरी फिल्म न्वार विषयी थोडीफार माहिती असणा-यांना सहज लक्षात येईल की चित्रपटांचे हे दोन प्रकार परस्परांपासून फार वेगळे आहेत. ब्लॅक कॉमेडीमध्ये त्याज्य विषयांना विनोदाने हाताळण्याची परंपरा आहे, तर फिल्मन्वार एका विशिष्ट शैलीतील गुन्हेगारी कथानकं, गडद दृश्यशैली अन् तितक्याच गडद आशयाच्या माध्यमातून मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. न्वार चित्रपटांमध्ये दृष्टिकोनांमधल्या विसंगतीतून येणारा विनोद असू शकतो, मात्र नायक-नायिकेपासून सर्वांना काळ्या रंगात रंगवणा-या न्वार चित्रपटांच्या वाट्याला प्रांसंगिक, संवादी विनोद क्वचित जातो. बिग नथिंगचा वेगळेपणा आहे, तो हाच.
चित्रपटाची सुरुवात ही `फिल्म न्वार` शैली ओळखता येईल अशा पद्धतीने होते. अंधा-या रात्री एक गाडी एका कड्यापाशी येऊन थांबते. आतून तीन व्यक्ती उतरतात. गाडीची डिकी उघडतात, थोड्याशा उजेडात आपल्याला असं दिसतं की या तिघांतले दोन पुरुष आहेत, तर एक बाई. डिकीत दिसणारी गोष्ट (अन् या प्रकारच्या चित्रपटात तिथे काय असणं अपेक्षित आहे, हे आपण जाणतोच.) त्यांना चकीत करते. वळणावळणाच्या रस्त्यांवरून गाडी परत जायला निघते. पार्श्वभूमीला नायकाचा आवाज येतो, `माय नेम इज चार्ली वुड. आय थिंक आय मेड ए बिग मिस्टेक.`
दृश्यातला प्रत्यक्ष अंधार, गुन्हेगारी चित्रपटांचा तपशील, नायकाचा व्हाईसओव्हर आणि त्यातून येणारा नकारात्मक सूर या सर्व गोष्टी चित्रपट न्वार पद्धतीचा असण्याकडे निर्देश करतात. मात्र त्याला विसंगत ठरवते ती एक गोष्ट. समोर दिसणारे नट. हे परिचित चेहरे आहेत सायन पेग (शॉन ऑफ द डेड, हॉट फझ) आणि डेव्हिड श्विमर (फ्रेंड्स मालिकेतला रॉस) या दोन गाजलेल्या विनोदी नटांचे, जे या वातावरणात दिसणं अपेक्षित नाही. ही विसंगत गोष्टच चित्रपटाचा पुढला भाग कसा असेल याची झलक दाखविते.
इथला नायक आहे चार्ली (डेव्हिड श्विमर), एक अयशस्वी लेखक. चार्लीची पत्नी पोलिसात आहे. मात्र तिच्या एकटीच्या पगारावर घर चालणं कठीण, म्हणून चार्ली एका कॉल सेन्टरमध्ये नोकरी धरतो. तिथे त्याची गाठ पडते गसशी (सायमन पेग). आपल्या मुलीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज असलेल्या गसची योजना असते, ती कॉल सेन्टरमधून मिळविलेल्या माहिती आधारे रेव्हरन्ड स्मॉल्सना ब्लॅकमेल करण्याची. या योजनेत तो चार्लीला आणि जोसी मॅकब्रूम (अ‍ॅलिस इव्ह) या वेट्रेसला सामील करून घेतो. खून-मारामारीविना पैसे मिळवायचे आणि उर्वरीत आयुष्य सुखात घालवायचं या कल्पनेने गसबरोबर जाणा-या चार्लीला, आपली , ` बिग मिस्टेक.` लवकरच ध्यानात येते. रेव्हरन्डपासून सुरूवात होऊन पडत जाणा-या बळींची संख्या वाढायला लागते, आणि आपल्या जीवावरही लवकरच बेतणार हे चार्लीला स्वच्छ दिसायला लागतं.
कथासूत्राच्या बाबतीत `बिग नथिंग` हा डॅनी बॉईलच्या शॅलो ग्रेव्हशी किंवा सॅम रायमीच्या `ए सिम्पल प्लान`शी साधर्म्य साधणारा आहे, मात्र पटकथेच्या ठेवणीत तो या दोघांपेक्षाही खूपच वेगळा म्हणावा लागेल. दिग्दर्शक आणि सहपटकथाकार जाँ-बाप्तिस आन्द्रेआ याने घटनांचा वेग आणि टप्पे हे एखाद्या फार्सला शोभण्यासारखे ठेवले आहेत. प्रमुख भूमिकांमध्ये विनोदी अभिनेत्यांना घेणंदेखील त्याच्या या योजनेशी सुसंगत. मात्र हा विनोद चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणा-या आशयाच्या गांभीर्याशी तडजोड करीत नाही.
दिग्दर्शनातील एक गोष्ट मात्र मला खटकली. सध्या अनेक चित्रपटांत कॅमेरा स्थिर ठेवायचा आणि कथानक आपल्या चालीने उलगडू द्यायला दिग्दर्शक कचरताना दिसतात. सतत काही हालचाल दिसली पाहिजे. दृश्य चमत्कृती जाणवल्या पाहिजेत असा अट्टाहास दिसून येतो. त्या पठड़ीला जागून इथेही दिग्दर्शक अधेमधे अ‍ॅनिमेशन किंवा स्प्लिट स्क्रीनचा वापर करताना दिसतो. पण इथे तो आवश्यक वाटत नाही. एम टीव्ही संस्कृतीने मुळात सुरू केलेला, अन टीव्ही उद्योगातून हळूहळू चित्रपटांत उतरलेला हा क्लुप्तीबाजपणा बहुतेकदा चुकीच्या गोष्टीकडे लक्ष वेधणारा, अन् परिणामाला मारक ठरण्याची शक्यता असते. सुदैवाने बिग नथिंगमध्ये त्याचा अतिरेक होत नाही.
रेमन्ड चॅन्डलरच्या म्हणण्याप्रमाणे चांगली गुन्हेगारी कथा ही गुन्ह्याला वास्तवाच्या चौकटीत आणून बसवते. तो घडवणारी माणसं, त्यांची पार्श्वभूमी, त्यांना तो करण्यासाठी भाग पाडणारी कारणं या सगळ्याला तत्कालिन समाजाचा एक संदर्भ आणून देते. `बिग नथिंग`मधे मला विशेष हाच वाटला की तो हे अमूक एका प्रमाणात का होईना करू पाहतो. रिसेशन, कॉल सेंन्टर्सचा अतिरेक, वैवाहिक समस्या, इन्टरनेट पोर्नोग्राफी अशा अनेक तुकड्य़ांमधून तो चित्रपटाच्या घटीताला एक कॉन्टेक्स्ट आणून देतो. मुळात वास्तववादाचा आव आणणारे चित्रपटही हे सातत्याने करू शकत नाहीत. मग उघडच कल्पितकथा मांडणा-या चित्रपटाने ते करावं हे कौतुकास्पदच ठरावं.


-गणेश मतकरी.

Read more...

टेरेन्टीनोचे बास्टर्डस

>> Sunday, April 18, 2010

अनेक वर्षांपूर्वी मी `लाईफ इज ब्युटीफुल` या ऑस्करविजेता इटालियन चित्रपटाच्या विऱोधात एक लेख लिहिला होता. अनेकांना मी तसं लिहिणं आवडलं नव्हतं, कारण अनेकांचा तो आवडता चित्रपट होता, आहे. मझा चित्रपटातल्या तपशीलाला विरोध नव्हता, तर तो होता त्यातल्या कॅज्युअल विनोदी सुराला. नाझी यातनातळावर एक बाप आपल्या मुलाच्या समाधानासाठी हे सगळं लुटपुटीचं असल्याचं नाटक करू शकेल, ही कल्पनाच यातनातळांच्या भयकारी वास्तवाला छेद देणारी होती. काही गोष्टींच्या वाट्याला विनोदाने जाऊच नये अशी माझी त्यावर प्रतिक्रिया होती. असं असूनही मला क्वेन्टीन टेरेन्टीनोचा `इनग्लोरीअस बास्टर्डस` आवडला. महायुद्धाची भीषणता शाबूत ठेवूनही त्यात टेरेन्टीनोने वापरलेला विनोद आणि शेवटाकडे इतिहासालाच दिलेली कलाटणी ही हिटलरच्या कारकिर्दीलाच दिलेली एक चपराक आहे. हा महायुद्धाचा सुखांत शेवट नाझींच्या अत्याचाराचा तिरस्कार करणा-या कोणालाही आवडण्यासारखा आहे.
बास्टर्डसच्या निमित्ताने टेरेन्टीनोने अखेर गुन्हेगारी जगताशी फारकत घेतली आहे. मात्र त्यामुळे त्याच्या चित्रपटाचा प्रकार फारसा बदललेला नाही. गुन्हेगारी आणि युद्ध .या दोघांमधलं साम्य असणारा हिंसाचार हा बास्टर्डसमध्ये मुबलक प्रमाणात आहेच,वर कथानकाला प्रकरणांमध्ये विभागणं, संवादांमध्ये पात्रांना अन् प्रेक्षकांना गुंतवणं, रिअ‍ॅलिझमला बाजूला ठेवून एक नाटकी, वरच्या पट्टीतला, पण परिणामकारक सूर पकडणं, व्यक्तिरेखांना त्यांच्या चमत्कृतींसकट प्रेक्षकप्रिय बनवणं या सर्व `टेरेन्टीनोएस्क` गोष्टी बास्टर्डसमध्येही आहेत.
टेरेन्टीनोची पटकथा पाहिली, तर लक्षात येतं की तो कथेच्या प्रवाहीपणापेक्षा सुट्या सीक्वेन्सेसना महत्त्व देतो. त्याच्या पहिल्या चित्रपटात, रिझरव्हॉयर डॉग्जमध्ये तर पहिला इन्ट्रो सिक्वेन्स सोडता उरलेला सर्व भाग एकाच ठिकाणी घडणारा, अन् टेरेन्टीनोचा प्रसंग हळूहळू चढवत नेण्याची संधी देणारा होता. मात्र त्याने आपल्या इतर चित्रपटातूनही खासकरून पल्प फिक्शन/किल बिल मध्येही प्रसंगांना किंवा प्रसंगमालिकांनाच अधिक महत्त्व दिलं. त्यांच्यामधलं जोडकाम हे त्याच्या दृष्टीने मह्त्त्वाचं नाही. ते असण्यानसण्याने त्याच्या चित्रपटांना काही फरक पडत नाही. किंबहूना त्यामुळेच त्याला कथानक लिनिअर असण्याचीही गरज वाटत नाही. शिवाय त्याच्या पटकथाही त्यामुळे वेगळ्या शैलीच्या होतात. छोटेछोटे अनेक प्रसंग नसून बराच काळ चालणारे लांबचलांब प्रसंग असणा-या.
बास्टर्डसमध्येही शैलीच कायम असणार हे पहिल्या प्रसंगातच स्पष्ट होतं. हा प्रसंग घडतो नाझींनी व्यापलेल्या फ्रान्समधल्या एका छोट्या गावात. एका शेतक-याने एका ज्यू कुटुंबाला आसरा दिल्याच्या संशयावरून `ज्यू हंटर` नावाने ओळखला जाणारा नाझी कर्नल हान्झ लान्डा (क्रिस्टोफ वॉल्टत्झ) या शेतक-याच्या घरी आलेला आहे. लान्डाची व्यक्तिरेखा बास्टर्डसमधली सर्वात लक्षवेधी व्यक्तिरेखा आहे, अन् सहायक भूमिकेतल्या अभिनेत्याची झाडून सर्व पारितोषिकं मिळवून वॉल्टत्झने ती अचूक रंगवण्यातील आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. या पहिल्या प्रसंगातच तो शेतक-याला ज्या प्रकारे गुंडाळून ठेवतो, त्यात त्याचा कावेबाजपणा, हुशारी आणि क्रौर्य मूर्तिमंत उभं राहतं. मात्र लान्डा खलनायक होत नाही. मनातल्या मनात आपण त्याच्या या हुशारीलाही दाद देतो.
बहुतेक चित्रपट हे इन्ट्रोमध्येच अ‍ॅक्शनपर्यंत पोहोचण्याची घाई करतात. टेरेन्टीनो तसं कधीच करीत नाही. इथेही, तो शांतपणे, आपल्या गतीने प्रसंग रंगवत राहतो. हीच पद्धत पुढेही अनेक प्रसंगात वापरली जाते. तळघरातल्या बारमध्ये रक्तरंजित फिनालेआधी, खूपवेळ रंगणारा कार्ड गेम, किंवा लान्डा आणि पहिल्या प्रसंगात त्याच्या तावडीतून सुटलेली शोशॅना (मेलनी लॉरेन्ट) पुढे आमनेसामने येतात त्या प्रसंगातील खाण्याच्या पदार्थांची चर्चा, या गोष्टी प्रसंगातला ताण कायम ठेवून तो रंगवण्यासाठी वापरल्या जातात.
पहिल्या प्रकरणातलं प्रास्ताविक संपून चित्रपट जेव्हा नीट सुरू होतो, तेव्हा तो प्रामुख्याने दोन धाग्यांवरून पुढे सरकतो. पहिल्या धाग्यात इनग्लोरिअस बास्टर्डस नावाने ओळखल्या जाणा-या अन् अ‍ॅल्डो रेन (ब्रॅड पिट) च्या नेतृत्त्वाखाली नाझींना दहशत बसवणा-या टोळीचा कथाभाग येतो, तर दुस-या भागात शोशॅना, तिच्या मालकीचं चित्रपटगृह आणि तिच्या प्रेमात पडणारा नाझी सैनिक/भावी सुपरस्टार फ्रेडरिक झोलर (डेनिएल ब्रूल) याचा कथाभाग येतो.
नाझी, महायुद्ध याच्याइतकाच हा चित्रपट आणखी एका गोष्टीविषयी आहे, तो म्हणजे फिल्ममेकींग आणि चित्रपटांचा इतिहास. चित्रपटाच्या सुरुवातीसुरुवातीकडे अ‍ॅल्डोच्या तोंडी मारहाणीची तुलना चित्रपटीय करमणुकीशी करणारं एक वाक्य येतं अन् पुढे चित्रपट या संदर्भांनी भरून जातो. इथे शोशॅनाच्या मालकीचं चित्रपटगृह आहे. ती फ्रेडरिकला पहिल्यांदा भेटते ती चित्रपटगृहाच्या मार्कीवरली जाहिरात बदलताना. चॅप्लीनपासून पॅब्स्टपर्यंत अनेक दिग्दर्शकांची नावं घेणा-या या संभाषणात शोशॅनाने मारलेला टोमणा (आय़ अ‍ॅम फ्रेन्च, वुई रिस्पेक्ट डिरेक्टर्स इन अवर कन्ट्री) तर जागतिक चित्रपटांची माहिती असणा-या प्रत्येक रसिकाच्या चेह-यावर स्मितरेषा उमटणारा ठरावा. पुढल्या भागातही, एका ब्रिटिश समीक्षकाची मोहिमेत सहभागी होण्यासाठी केलेली पाठवणी, जर्मन तारकेचं (डायएन क्रुगर) दोस्तांना सामील असणं, गोबेल्सने फ्रेडरिकला घेऊन चित्रपट बनवणं अशा मुख्य कथेसंबंधी घटकांमध्येही चित्रपट उद्योगाला स्थान दिलेलं आढळतं, त्याचबरोबर उफा आणि गोबेल्स यांनी जर्मन चित्रपटासंबंधात केलेली कामगिरी, तात्कालिन फिल्म, प्रोजेक्टर यासारखी सामग्री, या अन् अशा चित्रपट ट्रिव्हिआचा वापरही संवादामध्ये केलेला आढळतो.
शेवटी येणारा गोबेल्सच्या नेशन्स प्राईड सिनेमाचा प्रीमियरदेखील खास आहे. नेशन्स प्राईडमधली दृश्य आणि त्याचं लवकरच प्रत्यक्षात घडणा-या घटनांशी असणारं साम्य हा अपघात नाही. नेशन्स प्राईडमधे अन् इनग्लोरिअस बास्टर्डसमध्ये जवळ जवळ एकाच वेळी `माइन्डलेस व्हायलन्स` दाखवणं टेरेन्टीनोने केलेलं स्वतःच्याच शैलीचं विडंबन आहे. त्याचबरोबर काही प्रमुख व्यक्तिरेखांचा मृत्यू अन् त्याचवेळी त्यांचं पडद्यावर सुरू राहणारं अस्तित्वं हीदेखील चित्रपटाचं शाश्वत असणं, पडद्यावरल्या प्रतिमांना जीवनबाह्य, जीवनाहून वेगळं स्थान असणं स्पष्ट करणारं आहे.
इनग्लोरिअस बास्टर्डस हा पल्प फिक्शनच्याच वजनाचा अन् काही बाबतीत त्याहूनही सरस असणारा चित्रपट आहे. त्याचं नाव एका जुन्या चित्रपटावरून (स्पेलींग बदलून) घेतलेलं असलं तरी तो रिमेक नाही, पूर्णपणे स्वतंत्र आहे. (नाव उचलणं हादेखील टेरेन्टीनोच्या चित्रपटीय संदर्भ प्रेमाचाच एक भाग आहे, असं म्हणता येईल.)
गुन्हेगारीपटांची आपण स्वतःभोवती घालून घेतलेली चौकट ही आपली मर्यादा नाही हे टेरेन्टीनो आता दाखवून देतोय, तेदेखील आपल्या शैलीशी तडजो़ड न करता. आजवर त्याच्या चित्रपटात दिसलेल्या आत्मविश्वासासहीत. हा आत्मविश्वास चित्रपटातल्या अखेरच्या वाक्यातही जाणवण्यासारखा आहे.
वाक्य अ‍ॅल्डो रेनच्या तोंडी येत असलं, तरी हे दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटांविषयी प्रेक्षकांना उद्देशून केलेलं स्टेटमेन्टदेखील मानता येईल.`धिस जस्ट माईट बी माय मास्टरपीस` .या त्या वाक्याचा हाच अर्थ मला अधिक पटणारा आहे. बहुदा दिग्दर्शकालाही तोच अभिप्रेत असावा.

-गणेश मतकरी.

Read more...

बिल, ब्राईड आणि टेरेन्टीनो ( किल बिल-२)

>> Tuesday, April 13, 2010


तुम्ही टेरेन्टीनोचे चित्रपट पाहत नसाल, तर सुरुवात करायला ही उत्तम जागा आहे. हॉलीवूडमध्ये स्वतःची खास शैली असणारे अ‍ॅक्शन दिग्दर्शक फार कमी आहेत, अन् टेरन्टीनो हे त्यातलं महत्त्वाचं नाव आहे. केवळ शैलीला बिचकून त्याच्या चित्रपटांना बाजूला काढण्यात अर्थ नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------

काही चित्रपट असे असतात, ज्यांच्याबद्दलचं कुतूहल लोकांच्या मनात अनेक वर्षे तयार होत असतं. इतक्या कालावधीच्या विचारप्रक्रियेनंतर जेव्हा चित्रपट पाहायला मिळतो, तेव्हा त्यास मिळणारा प्रतिसाद हा एरवीपेक्षा अधिक कडक असतो. एकतर त्याला `इन्स्टंट क्लासिक` म्हणून डोक्यावर घेतलं जातं किंवा ताबडतोब कच-यात फेकून दिलं जातं. क्वेन्टीन टेरेन्टीनो या चमत्कारिक नावाच्या तितक्याच चमत्कारिक दिग्दर्शकाच्या चौथ्या चित्रपटाचं भाग्यही यातल्याच एका पर्यायात बसणारं होतं. टेरेन्टीनोने आजवर मोजके चित्रपट केले आहेत, पण त्याला स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे. `स्टार ट्रेक`पासून `कुंग फू` पटांपर्यंत अनेक गोष्टींचा प्रभाव असणारे हे चित्रपट आशयासाठी कोणी पाहत असेल यावर माझा विश्वास नाही. पण स्टाईल डिपार्टमेन्टमध्ये मात्र या माणसाचा हात धरणारा दिग्दर्शक विरळा. `रिझरव्हॉयर डॉग्ज`ने प्रकाशात आलेल्या टेरेन्टीनोला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली ती पल्प फिक्शनमुळे. त्यानंतरचा `जॅकी ब्राऊन` प्रेक्षकांनी आवडीने पाहिल्यावर जवळजवळ सहा वर्षे पठ्ठ्याचं काहीच पडद्यावर आलं नाही. मध्ये कधीतरी तो `किल बिल` नावाचा चित्रपट करीत असल्याचं कानावर आलं आणि लोकांना वाट पाहण्यासाठी एक नाव मिळालं. प्रदर्शन जवळ आलेलं असताना या किल बिलचे अचानक दोन भाग झाले आणि या विभाजनाच्या निर्णयावरून काही वाद झाले. होता होता पहिला आणि दुसरा भाग वर्षभराच्या अंतराने प्रदर्शित झाले.
टेरेन्टीनोचे चित्रपट पाहताना मला नेहमी पडणारा प्रश्न `किल बिल`ने उपस्थित केला, तो म्हणजे टेरेन्टीनोच्या शैलीबाज दिग्दर्शनाला अपरिहार्यता किती?
टेरेन्टीनोच्या सर्व चित्रपटांमध्ये सातत्यानं असणारं विश्व आहे गुन्हेगारीचं. मात्र वास्तववादाशी त्याचा काही संबंध नाही. अत्यंत श्रीमंती फॅशनेबल कपड्यात वावरणारे,कृत्रिम, वजनदार पण चटचटीत संवाद बोलणारे,खोटे परंतु आकर्षक असे हे गुंड नायक आणि खलनायक हे दोन्ही सारख्याच गडद छटांमधले. कथा कधीही सरळ पॉइंट `ए` पासून पॉइंट `बी` पर्यंत न जाणारी. प्रसंग मागे पुढे करीत, काही भाग पूर्ण वगळून तर काही भाग विविध व्यक्तिरेखांच्या नजरेतून पुन्हा सांगणारी. या तुकड्यांची रचना एखाद्या कथा कादंबरीप्रमाणे विविध प्रकरणांत केलेली. त्यांना चमकदार नावं दिलेली. `किल बिल`देखील याला अपवाद नाही.
टेरेन्टीनोच्या बहुतेक चित्रपटात येणा-या नॉन लिनीअर निवेदनाला कारण असतं. कधी त्याला अमूक भाग दुस-या एखाद्या भागाहून अधिक महत्त्वाचा त्यामुळे आधी आणावासा वाटतो, तर कधी सर्व भागांनी एकमेकांना वेगवेगळ्य़ा ठिकाणी जोडलं जाऊन सलग चित्र व्हावसं वाटतं, जे त्या चित्रपटाच्या पटकथेची रचना ठरवतं. `किल बिल`मध्येही ठरवलेल्या रचनेला ढोबळ कारणं आहे, ते फाफटपसारा वगळून एकामागून एक येणा-या मुद्दयांमध्ये सांगण्याचा. ही मुळात एक सूड कथा आहे. नायिका बिअ‍ॅट्रीक्स किड्डो (उमा थर्मन) जी पहिल्या भागात ब्राईड या नावाने ओळखली जाते. तिचं ब्लॅक माम्बा हे टोपणनावदेखील आहे. तर या नायिकेच्या लग्नसमारंभात घुसून बिल (डेव्हिड कॅराडिन) आणि त्याचे चार सहकारी सर्वांना खलास करतात. कोमात गेलेली ब्राईड चार वर्षांनी त्यातून बाहेर येते आणि एकेकाला मारत बिलपर्यंत पोचते, एवढंच हे कथानक.
आता रचना अशी, पहिला भाग सुरू होतो लग्नसमारंभातल्या हल्ल्यानंतर. त्यानंतर आपल्याला दिसतात ते बिलच्या दोन सहका-यांचे बळी. मध्ये तुकड्या तुकड्यात ब्राईडचं इस्पितळातून पळणं, बदल्यासाठी तलवार बनवून घेणं वैगैरे तपशील. दुस-या भागात उरलेल्या दोन सहका-यांचे बळी आणि अर्थात बिलशी सामना. इथे तुकड्यात येतो तो लग्नसमारंभातल्या हल्ल्याआधीचा फ्लॅशबॅक आणि नायिकेचं `पाय मे` या कुंगफू गुरूच्या हाताखाली झालेलं शिक्षण. म्हणजे फ्लॅशबॅक सोडले, तर कथानक ब-यापैकी क्रमवार आहे, मात्र ते क्रमवार वाटू नये यासाठी दिग्दर्शकाचे प्रयत्न आहेत. उदाहरणार्थ पहिल्या भागात ब्राईडने घेतलेल्या दोन बळींमध्ये नंतर घेतलेला बळी आधी दाखविला जातो. कारण काय, तर काहीच नाही.
वरवरच्या रचनाबदलाचा भाग सोडला तर या चित्रपटाच्या दोन भागांमध्ये एक लक्षात येण्यासारखा फरक जाणवतो. पहिला भाग हा अ‍ॅक्शनला अधिक महत्त्व देणारा आहे, तर दुसरा आशयाला. पहिल्या भागात टेरेन्टीनो आपल्या चित्रपटांचे सर्व गुणविशेष एखादी शोकेस असल्याप्रमाणे मांडतो. ओ-रेन इशी अर्थात कॉटन माउथशी (लुसी लिऊ) सामना करताना ब्राईडने शेकडो मारेक-यांवर केलेली रक्तरंजित लढाई, त्यातली कॉरिओग्राफी, विनोदाचा वापर आणि जपानी चित्रपटाच्या ऋणनिर्देशासाठी दीर्घकाळ स्मरणात राहील. त्याचबरोबर येथे ओ-रेन इशीचा भूतकाळ दाखवणारं एक प्रकरण चक्क अ‍ॅनिमे या जपानी शैलीतही दाखवलं जातं. मोठे अ‍ॅक्शन प्रसंग, रंगांचा आणि इतर तांत्रिक चमत्कारांचा मुबलक वापर यासाठी हा भाग लक्षात राहतो. पण कथेला पुढे नेणारे सर्व प्रसंग दुस-या भागात येतात.
ब्राईड कोण आहे इथपासून लग्नाच्या वेळी गर्भवती असणा-या ब्राईडच्या मुलीचं पुढे काय झालं इथपर्यंत कथानकाशी संबंधित जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं दुस-या भागात मिळतात. साहजिकच हा भाग अधिक अर्थपूर्ण वाटतो.
टेरेन्टीनोच्या शैलीत मुद्दे अधोरेखित करण्याची गंमत असली तरी प्रत्येक चित्रपटाला ती वापरण्याचा अट्टाहास कळत नाही. पल्प फिक्शनमध्ये तो बरोबर होता. कारण त्यातल्या गोष्टी एकाच वेळी स्वतंत्र आणि परस्परांना जोडलेल्या होत्या आणि हे जोडलेलं असणं गुन्हेगारी विश्वातल्या घाडामोडींचं एक सलग चित्र तयार करत होतं. किल बिलमधलं शैलीचं प्रदर्शन हे केवळ प्रदर्शनच आहे. माझ्यासारख्या या शैलीच्या चाहत्यांना या दोन्ही चित्रपटांतून एकत्रितपणे येणारा परिणाम हा आवडलेला आहेच, पण टेरेन्टीनोचा चित्रपट म्हणून न पाहता, केवळ एक चित्रपट म्हणून पाहणा-याला निदान या चित्रपटापुरती ही शैली खटकणारी आहे. कारण तिचा वापर हा मूळच्या साध्या कथेला विनाकारण गुंतागुंतीची करणारा आहे.
चित्रपटांविषयी पडणारा दुसरा प्रश्न म्हणजे त्याला दोन भागांत विभागण्याची गरज होती का?
चित्रपटाचे एकाहून जास्त भाग निघण्यामध्ये प्रामुख्याने दोन कारणं असतात. एक तर मूळ चित्रपट यशस्वी झाल्यावर त्या कथेला पुढे वाढविण्याची गरज चित्रकर्त्यांना वाटते. अशा वेळी कथेत तशा शक्यता असतात. पण अनेक वेळा शक्यता तयार केली जाते. किंवा त्या व्यक्तिरेखा घेऊन त्यांना वेगवेगळ्या कथानकात गुंफलं जातं. सुपरहिरोपदासारख्या काही वेळा या व्यक्तिरेखा आधीच प्रसिद्ध असतात, त्यामुळे वेगवेगळी साहसं तयार करून या मालिकांचे भागांवर भाग काढता येणं शक्य असतं.
अनेक भागांत चित्रपट विभागला जाण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांना असणारा अशा कथानकांचा आधार, ज्यांची लांबी ही खरोखरच एका भागात बसण्यासारखी नाही. लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या अनेक भागांबद्दल कोणीच आक्षेप घेणार नाही, कारण मुळात ती या कथेची गरज आहे. मात्र अशा चित्रपटांचे भाग करताना शक्य तर अशी काळजी घेतली जाते, की प्रत्येक चित्रपट हे स्वतंत्र प्रकरण असेल, ज्याची कथा तेवढ्यापुरती पूर्ण होईल आणि प्रत्येक चित्रपटाला उत्कर्षबिंदू असेल.
किल बिलसारख्या चित्रपटात हे शक्य होत नाही. कारण इथला दुसरा भाग हा पहिल्या भागाच्या कथेला पुढे नेत नाही, तर हे दोन्ही भाग मिळूनच एक चित्रपट पुरा होतो. म्हणजे याला सिक्वल न म्हणता इक्वल म्हणावं लागेल. इथला पहिला भाग हा संपूर्ण चित्रपटाच्या लांबच लांब ट्रेलरसारखा वाटतो, कारण त्यातली गोष्ट सर्वार्थाने अपूर्ण आहे. त्यातल्या कोणत्याच व्यक्तिरेखेला तिसरी मिती येऊ शकत नाही, कारण त्या व्यक्तिरेखांबद्दल आपल्याला फार माहिती मिळूच शकत नाही. त्यातल्या त्यात ओ-रेन एशीबद्दल मिळते, पण हे पात्र मुळी जात्याच पेपरथिन आहे. मग प्रश्न एवढाच उरतो, की हे कथानक खरंच इतकं लांब आहे का, की ते पुरं करायला दोन भाग लागावेत? याचं उत्तरही नकारात्मक आहेत. दोन्ही भाग मिळवून हा चित्रपट चालतो ते सुमारे तीन तास पन्नास मिनिटे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीतही संकलनावर भर देऊन ही लांबी तीन तासांवर सहज आणता आली असती, किंवा कथेत थोडी काटछाट करून आणखी कमी. तीन तासांचे चित्रपट कमी प्रमाणात असले तरी अगदीच दुर्मिळ नाहीत. टेरेन्टीनोच्या चाहत्यांनी आनंदाने हे तीन तास काढले असते. मग हे दोन चित्रपट कशासाठी ? तर उत्तर उघड आहे. आर्थिक फायद्यासाठी.
आपण जेव्हा म्हणतो, की या चित्रपटांचे दोन्ही भाग असण्याची गरज नव्हती, अन् शैलीचा वापरही इथे आशयाला महत्त्व आणण्यापेक्षा टेरेन्टीनोच्या हौसेखातर केला जातो. तेव्हा तिसरा प्रश्न असा पडतो की, मग हा चित्रपट पाहण्यालायक आहे का?
याचं थोडक्यात उत्तर हो असं आहे. किल बिल हा निवेदनातल्या कसरती आणि इतर उणिवा गृहित धरूनही पाहण्यालायक आहे. ज्यांना याप्रकारचे चित्रपट पाहण्याची सवय नसेल, त्यांना पहिला भाग अधिक खटकेल. पण एकदा का दोन्ही भाग पाहिले, की उभं राहणारं चित्र एका संपूर्ण चित्रपटाचा आनंद निश्चित देईल. टेरेन्टीनोच्या चाहत्यांना तर हाँगकाँग सिनेमाचा प्रभाव, क्लिंगॉन प्रोव्हर्बसारखे विचित्र संदर्भ, बिलच्या सुपरमॅन मिथविषयक संवादामागचा युक्तिवाद, कथानकाला जाणूनबुजून दिलेला दंतकथेचा सूर अशा आवडण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण इतरांनाही ही स्वतःला फारशा गंभीरपणे न घेणारी, तरीही स्वतःच्या तत्त्वांवर ठाम राहणारी सूडकथा आवडून जाईल. तुम्ही टेरेन्टीनोचे चित्रपट पाहत नसाल, तर सुरुवात करायला ही उत्तम जागा आहे. हॉलीवूडमध्ये स्वतःची खास शैली असणारे अ‍ॅक्शन दिग्दर्शक फार कमी आहेत, अन् टेरन्टीनो हे त्यातलं महत्त्वाचं नाव आहे. केवळ शैलीला बिचकून त्याच्या चित्रपटांना बाजूला काढण्यात अर्थ नाही. कारण त्याने आपल्या कलास्वादाला मर्यादा पडण्यापलीकडे काही होणार नाही.

-गणेश मतकरी.

Read more...

हॉलीवूडमधील नायिकाप्रधान चित्रपट (किल बिल-१)

>> Monday, April 5, 2010

स्त्री मुक्ती म्हणजे काय? तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळणं, सर्वच क्षेत्रात. मग या सर्वच क्षेत्रात चित्रपटसृष्टीही आलीच. नायिकाप्रधान चित्रपट आजवर आलेले नाहीत, असं म्हणणं चूक ठरेल. कारण नायिकांना चित्रपटात महत्त्वाचं स्थान आहेच. मात्र त्यांनी सर्वार्थानं नायकाची जागा घेणे हे तसे दुर्मिळ. स्त्रियांच्या बरोबरीने बहुतेक चित्रपटांत पुरुष पात्रांनाही महत्त्व असतं, असाच आजवरचा अनुभव आहे, मग नायिका कितीही अभिनयसंपन्न आणि नावाजलेल्या असल्या तरीही. त्यामुळे जसे संपूर्ण पुरूषप्रधान चित्रपट येतात, तसा संपूर्ण स्त्रीप्रधान चित्रपट विरळा. नाही म्हणायला या परंपरेचा एक मोठा अपवाद आहे. १९७९मध्ये रिडली स्कॉटने दिग्दर्शित केलेला एलिअन आणि पुढे १९८६ मध्ये जेम्स कॅमेरॉनने काढलेला त्याचा पुढचा भाग या दोन्ही चित्रपटांच नायकाची आणि नुसत्या नाही, तर अ‍ॅक्शन नायकाची सर्व वैशिष्ट्ये ऑफिसर रिपलीच्या भूमिकेत सिगर्नी विव्हरने पेलून दाखविली. पुरूष पात्रांना दुय्यम स्थानावर ठेवून श्वात्झनेगरसारख्याला लाजवेल अशा जोमाने कोणत्याही प्रसंगांना तोंड देणारी रिपली हॉलीवूडमधली पहिली स्त्री अ‍ॅक्शनहिरो ठरली.
गेल्या ब-याच वर्षांत मात्र एवढी हिंमतबाज कामगिरी दाखविणारी नायिका हॉलीवूडच्या पडद्यावर दिसलीच नव्हती. विक्षिप्त, हिंसक तरीही कलात्मक आणि दर्जेदार चित्रपट देणा-या क्वेन्टीन टेरेन्टीनोच्या किल बिलः व्हॉल्यूम वन चित्रपटात मात्र ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या खेपेस उमा थर्मनच्या रुपात. टेरेन्टीनोचे चित्रपट पाहणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. पण चित्रपटातून काही विशिष्ट संदेश मिळावा, त्यातून होणारं रंजन सर्व वयोगटासाठी असावं, असं वाटणारा प्रेक्षक त्याच्या वा-याला उभा राहणं कठीण. १९९२ साली आलेल्या रिझव्हॉयर डॉग्ज (आपल्याकडचा काँटे) या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्याने आपली अत्यंत स्टायलाईज्ड; पण रक्तरंजित पद्धत निश्चित केली आणि पुढे त्याच पद्धतीचाच सातत्याने अवलंब केला. त्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता पल्प फिक्शन. ज्यात त्याने उपहासात्मक विनोद, ठाम व्यक्तिचित्रण, काळाला न जुमानता मागेपुढे फिरणारे कथानक आणि ट्रेडमार्क हिंसाचाराच्या जोरावर आपल्या चाहत्यांना गुंगवून टाकलं. किल बिल हा त्याचा चौथा चित्रपट किंवा चौथ्या चित्रपटाचा पहिला आर्धा भाग म्हटलं तरी चालेल. किंचित अधिक लांबी सोडली, तर किल बिलला दोन भागात विभागण्याचं कारण फार काही दिसत नाही.
हा चित्रपट निव्वळ पाहण्याचा/अनुभवण्याचा चित्रपट आहे. त्याच्या गोष्टीला अर्थ नाही. एक भडक सूडकथा, एवढंच कथाविषयक सूत्र असण्याला टेरेन्टीनोने दिलेलं दृश्यात्मक परिमाण तर उल्लेखनीय आहेच, वर या चित्रपटाची पटकथाही अभ्यासण्याजोगी आहे. विविध प्रकरणांत विभागलेली, विविध पात्रांना कोणत्याही परिचयाशिवाय गोष्टीत आणून टाकणारी आणि तरीही सहज समजण्याजोगी, सोपी. टेरेन्टीनोचा हा चित्रपट म्हणजे एक शोकेस आहे. त्याला आवडणा-या अनेक चित्रपट प्रकारांना एकत्रपणे गुंफणारी. यात वेस्टर्न चित्रपट, समुराई चित्रपट, अँक्शनला प्राधान्य देणारी अ‍ॅनिम ही जपानी अ‍ॅनिमेशन शैली. याचा वापर टेरेन्टीनोने सोयीस्करपणे विविध प्रकरणांत केला आहे. काळाला झुगारून कथानक पुढेमागे करणं, रंगीत आणि श्वेतधवल चित्रणाचा आलटूनपालटून वापर करणं, अशा नेहमीच्या क्लृप्त्याही आहेत. हिंसाचाराचा भडकपणा अंडरप्ले न करता, त्याला वाढीव भडक स्वरूपात दाखवूनही त्यातलं गांभीर्य काढून टाकता येतं, हे त्यानं दाखवलं आहे. यातल्या नायिकेची ओरेन इशी (लुसी लू)च्या गुंडांबरोबरची तलवारबाजी हे याचं उत्तम उदाहरण ठरावं. हातपाय तुटणं, डोकी उडणं, रक्ताच्या चिळकांड्या या सर्व गोष्टी असूनही काही सवंग चाललं असल्याचा आभास प्रेक्षकांच्या मनात तयार होऊ न देणं खरं कौशल्याचं आहे.
स्त्रीलाच नायक म्हणून सादर करण्याचा यातला प्रयत्न मात्र खास कौतुकास्पद. उमा थर्मन साकारत असलेल्या यातल्या निनावी नायिकेवर झालेला जिवावरचा हल्ला आणि मग तिने एकेका खलनायकाला गाठून मारणं एवढीच कथा असणा-या या चित्रपटात नायिकेला आलेलं महत्व हे ओढूनताणून आणलेलं नाही. ते नैसर्गिक आहे; कथेच्या ओघात आलेलं आहे आणि म्हणूनच चित्रकर्त्यांचा दृष्टिकोन मांडणारं आहे. किल बिलच्या या पहिल्या भागात केवळ नायिकाच नाही, तर सर्वच महत्त्वाची पात्रं स्त्रिया आहेत. मायकेल मॅडसन दिसतो, पण त्याला काही काम नाही, आणि बिलचा तर चेहराही अजूनपर्यंत दिसलेला नाही. त्यामुळे इथलं जग हे प्रामुख्याने स्त्रियांचं आहे.
त्यातल्या धमक्या, हाणामा-या, क्रूर हल्ले, बचावाचे मुद्दे या सर्वच गोष्टी स्त्रिया सहजतेने करताना दिसतात. अन् यात आपल्यालाही वावगं वाटत नाही. किल बिलच्या यशात टेरेन्टीनोचा सिंहाचा वाटा आहे हे मान्य, पण यातली निनावी नायिका जिवंत करण्याचं काम मात्र उमा थर्मनचं. सहानुभूती मिळवायला कठीण असे अनेक प्रसंग यात तिच्या वाटेला आले आहेत. व्हर्निता ग्रीनचा काटा काढल्यावर सरळ चेह-याने तिच्या शाळकरी मुलीशी बोलून आपली बाजू मांडणं किंवा दरवाजामध्ये डोकं चेचून डॉक्टरला खलास करणं, अशा अनेक गोष्टी हास्यास्पद किंवा विकृत वाटू शकल्या असत्या आणि नायिकेचं महत्त्व त्या कमी करून गेल्या असत्या. थर्मन/टेरेन्टीनो द्वयीने मात्र या गोष्टींना दृश्य रुपात आणताना योग्य ती काळजी घेतली आहे, असंच म्हणावं लागेल.
स्त्रीला मुक्त करणा-या भूमिका म्हणून मी एलिअन किंवा किल बिल या अ‍ॅक्शन पटांकडे पाहतो आहे याला एक कारण आहे. सायलेन्स ऑफ द लॅम्ब्समधील मनोरुग्ण खुन्याला तुल्यबळ ठरणारी ज्युडी फॉस्टरची डिटेक्टिव्ह क्लॅरीस किंवा एरिन ब्रोकोव्हिचमधील न्यायासाठी लढणारी ज्युलिया रॉबर्ट्सची एरिन यासारख्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, हे मान्य. पण फरक हा की अशा प्रकारच्या भूमिका स्त्रिया आजवर करत आलेल्या आहेत. अ‍ॅक्शनपट हा एकच प्रांत गेली अनेक वर्षे केवळ पुरुषांची सद्दी समजला जात असे. आता इथे स्त्रिया बरोबरीने पाय रोवून उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. स्त्रियांचा शोभेची बाहुली म्हणून होणारा चित्रपटातला वापर काही वर्षात पूर्णतः संपुष्टात येईल, अशीच लक्षणं आहेत. ही नव्या शतकाची जादू म्हणावी का?

-गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP