ढाच्यात न बसणारा ‘जून’

>> Tuesday, June 29, 2021

 


विशिष्ट ठिकाणचा सिनेमा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे आपोआप एक ढाचा तयार होतो, आणि समोर आलेला चित्रपट आपण त्या ढाच्याशी तुलना करुन जोखायला लागतो. बॉलिवुड फिल्म म्हणजे अमुक प्रकारची फिल्म, अनुराग कश्यपची फिल्म म्हणजे तमुक प्रकारची, सेवन्टीजमधला समांतर सिनेमा असा, नाईन्टीजच्या हॉलिवुड फिल्म तशा, वगैरे. जर आपण पहात असलेला सिनेमा आणि हे ढाचे यात जर साम्य सापडलं नाही, तर आपल्याला उगाचच काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागतं. या ढाच्यांपलीकडे असणाराजागतिक सिनेमानावाचा एक प्रकार आहे, पण तो नक्की काय याबद्दलही आपल्या मनात संभ्रम असू शकतो. आपण या वर्गातलं जे पाहातो, त्यांनी आपलं त्याबद्दलही एक विशिष्ट प्रकारचं मत बनवून दिलेलं असू शकतं. तर त्यावर उपाय काय? की सिनेमा हा कसल्याही फूटपट्ट्या लावता एक सिनेमा म्हणून पहाण्याचा प्रयत्न करावा. अवघड असलं, तरी त्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न सोडून. हे सांगितलं एवढ्याचसाठी, की सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांचाजूनहा असा ढाच्यात बसवण्यासारखा सिनेमा आहे. मराठीत अलीकडच्या काळात अनेक वेगळे प्रयत्न झाले आहेत, पण त्यातल्याही एखाद्या परिचित ढाच्यात बसणारी ही फिल्म नाही. ती कशाविषयी आहे? तर अनेक गोष्टींविषयी. ती मैत्रीविषयी आहे, नैराश्याविषयी आहे, परस्परांना समजून घेण्याविषयी आहे, औरंगाबाद शहराविषयी आहे, किंवा एखादं स्थळ आणि तिथली माणसं यांमधे जे धागेदोरे तयार होतात त्यांच्याविषयी आहे, ती नील आणि नेहा या दोन व्यक्तीरेखांविषयी आहे आणि त्यांना जोडणारा जो एक पूल त्यांच्याही नकळत तयार होत जातो त्याविषयी आहे


चित्रपटाला गोष्ट म्हणाल तर फारशी नाही. शहरातला आपला फ्लॅट सोडून नेहा ( नेहा पेंडसे ) औरंगाबादला अभिजीतच्या, तिच्या पतीच्या जुन्या रिकाम्या फ्लॅटवर काही काळासाठी येते. तिचं आणि अभिजीतचं काहीतरी बिनसलं असावं, ते काय हे आपल्याला त्या क्षणी कळत नाही. तिचं शहरी वागणं, सिगरेट ओढणं, पुरुषांशी बरोबरीच्या नात्याने हुज्जत घालणं, या सोसायटीतल्या लोकांना आवडत नाही. सोसायटीतच रहाणारा नील ( सिद्धार्थ मेनन ) पुण्यातल्या इंजिनीअरींग कॉलेजमधे नापास होऊन घरी परत आलाय. त्याच्या घरच्यांना याचा धक्का बसलेला. नीलही एका विचित्र मनोवस्थेतून जातो आहे. तो कोणाशी धड बोलत नाही, अस्वस्थ असतो, निक्की ( रेशम श्रीवर्धन ) या आपल्या गर्लफ्रेंडशी क्षुल्लक कारणांवरुन भांडतो. विपरीत मनोवस्थेतून जाणारी ही दोघं एकमेकांच्या संपर्कात येतात, आणि त्यांच्यात एक नातं तयार होत जातं.


जूनया दोघांमधल्या नात्याला क्लासिफाय करायला जात नाही, आणि आपणही चित्रपटाला विशिष्ट वर्गात बसवू नये. ही रॉमकॉम नाही. काही गंमतीदार जागा, निरीक्षणं असली, तरी मुळात हा गंभाीर सिनेमा आहे. प्रत्येक वळणावर या घटना खऱ्या घडल्या तर काय होऊ शकेल याचा चित्रपट बराच विचार करतो आणि त्यानुसार मार्ग निवडतो. नेहा आणि नील यांचे प्रश्न सहज सुटणारे नाहीत, आणि चित्रपट ते सुटू शकतील या भ्रमात नाही. शेवटाकडे तो थोडा सकारात्मक होत असला, तरीही चित्रपटाच्या भाषेतल्या हॅपी एंडींगपेक्षा, त्याची दिशा वेगळी रहाते


सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या दोघांचा हा प्रयत्न पहिलाच असूनही धीट आहे, कारण निखिल महाजनची संहिता चित्रपटाला अनपेक्षित ठिकाणी घेऊन जाते. चित्रपट ओळखीच्या वाटेवरुन जाईलशा अपेक्षेने त्याकडे पहाल, तर तुम्हाला काही जागा खूपच अनकम्फर्टेबल करण्याची शक्यता आहे. ही अस्वस्थता चुकून आलेली नसून, ती योजनेचा भाग आहे. यातल्या व्यक्तीरेखांना पडणारे प्रश्न लुटुपुटीचे, सहज सोडवता येणारे नाहीत, तर जीवनमरणाचे आहेत. आणि या प्रश्नांवर चित्रपटाने काढलेले मार्गदेखील सोपे नाहीत, ते आपल्यालाही आपल्या जगण्यातल्या काही मुलभूत गोष्टींचा पुनर्विचार करायला भाग पाडतात. ‘जूनमधल्या काही दृश्यांमधेही आपल्या सेन्सॉर बोर्डाला दचकवण्याची शक्यता असली, तरी सुजाण प्रेक्षकाला त्यात काही खटकू नये. त्यातला दृश्य भाग हा प्रसंगाला जाणूनबुजून प्रक्षोभक करण्याच्या दृष्टीने आलेला नाही, तर तो मांडल्या जाणाऱ्या आशयाशी सुसंगत आहे. तो अधिक सोपा, अधिक सूचक, करता आला नसता का ? आला असता, पण कशाला करायचा ? गेल्या काही वर्षात आपल्याला उपलब्ध झालेल्या जगभरच्या चित्रपटांना पाहून आपली थोडीतरी बौद्धिक वाढ झाली असणं अपेक्षित आहे.


चित्रपटातला औरंगाबादबद्दलचा भाग आपण स्मॉल टाऊन मानसिकता, या अर्थाने घ्यायला हवा. आणि मी लहानपणापासून मुंबईसारख्या शहरात वाढलो असलो, तरी संकल्पनेच्या पातळीवर हा प्रश्न समजून घेऊ शकतो. आपल्या राहत्या जागेने आणलेली बंधनं, त्यातून बाहेर पडल्यावर जाणवणारा मोकळेपणा, आणि फिरुन त्या जागी परतल्यावर होऊ शकणारा कोंडमारा हा जसा औरंगाबादेतून मुंबईत आलेल्याला जाणवेल, तसाच तो मुंबईतून न्यू यॉर्कला गेलेल्या व्यक्तीलाही जाणवू शकतो. ही एक वैश्विक भावना आहे, आणि तिच्याकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहाता येईल. ही कोंडमारा होणारी जागा जसं आपलं शहर असू शकते, गाव असू शकते, तसच आपलं घरही असू शकते. त्याही पलीकडे जाऊन पाहिलं, तर आपल्या व्यक्तीमत्वावर लादलेल्या जाणीवाही आपल्याला गुदमरुन टाकू शकतात. शेवटी आपली मुक्तता ही आपल्या भवतालाइतकीच आपण कोण आहोत याच्याशीही जोडलेली आहे. या सगळ्याबद्दलचं चिंतन, चित्रपटाच्या संवादांमधून ठळक रीतीने येऊन जातं


चित्रपटाचा बराचसा परिणाम हा सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे, यांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे, कारण चित्रपटात इतर पात्र असली, तरीही एकूण डोलारा पेलणारे हे दोघं आहेत. दोघांनीही ही जबाबदारी उत्तम पेललेली आहे, पण थोडं उजवं डावं करायचं, तर मी म्हणेन, की सिद्धार्थ मेननने उभा केलेला नील किंचित अधिक प्रभावी आहे. त्याला स्क्रिप्ट कारणीभूत तर आहेच, पण त्याने स्वत:नेही अतिशय ताकदीने ही अवघड भूमिका उभी केली आहे. मेनन हा कोणत्याही भूमिकेत भरवशाचा म्हणण्यासारखा अभिनेता आहे, पण इथलं त्याचं काम नक्कीच करीअर बेस्ट म्हणता येईलसं आहे. या दोघांच्या खालोखाल रेशम श्रीवर्धनची निक्की लक्षवेधी आहे. तिच्या भूमिकेची लांबी कमी असली, तरी तिला ग्राफ आहे. नीलच्या भूमिकेला या भूमिकेचा सतत संदर्भ असल्याने कथानकात तिला महत्व आहे. इतरांमधे त्यातल्यात्यात कन्वेन्शनल व्यक्तीरेखा म्हणायचं तर नीलेश दिवेकरचा जैस्वाल हा उगाच खलनायकी सोसायटी सभासद, आणि किरण करमरकरांनी साकारलेले नीलचे वडील म्हणता येतील. या बहुतांशी ओळखीच्या वाटतात त्या संहितेतल्याच मांडणीमुळे, शिवाय इतर व्यक्तीरेखांशी तुलना झाल्याने त्या खूपच नेहमीच्या वाटायला लागतात


जूनहा चित्रपट प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय ही गोष्ट चांगली आहे, आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे तो आहे तसा काटछाटीविना प्रदर्शित होईल. त्याशिवाय तो जरी १८ वर्षापुढल्या मुलांसाठी रेकमेन्डेड असला, तरी माझ्या मते पालकांनी तो पंधरा सोळा वर्षावरच्या मुलांनाही दाखवायला हरकत नाही असं मला वाटतं, कारण त्यातला काही महत्वाचा भाग विद्यार्थीदशेतली मुलं आणि पालक, यांच्याबद्दल महत्वाचे विचार मांडणारा आहे. ( पालकांनी आधी पहाणं रेकमेन्डेड ). अशी १८ वर्षाखालच्या मुलांनी पहाण्याची सोय थिएटरला झाली नसती. त्यामुळे त्या दृष्टीने त्याचं ओटीटीवर येणं ही इष्टापत्ती आहे. त्याशिवाय इथे शोच्या वेळा, सोयीची थिएटर्सनोकरीच्या वेळांबरोबर होणारे क्लॅश , या भानगडीत तो अडकल्याने अधिक मोठ्या प्रमाणात पाहिला जाण्याचीही शक्यता आहे


तरीही, कोणताही गंभीर सिनेमा हा थिएटरमधे अधिक परिणामकारक वाटतो. तिथे आपल्याला त्याच्याशी अधिक समरस होता येतं, आणि आजूबाजूची गडबड, फोन्स, अंधार नसल्याने लक्ष केंद्रीत होणं, असल्या भानगडींपासूनही आपली सुटका होते. जर दोन्ही शक्यता उपलब्ध असत्या तरजूनबाबतही मी चित्रपटगृहात जाण्याचाच सल्ला दिला असता. असो. सध्याच्या परिस्थितीत तो रिलीज होतोय, ही गोष्टच चांगली म्हणायला हवी

 

- गणेश मतकरी

 

 



Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP