स्कॅम १९९२ - एक आकर्षक चकवा

>> Wednesday, October 21, 2020

 (स्पॉयलर्स आहेत. शिवाय मुळात लेख हा मालिकाकर्त्यांच्या भूमिकेविषयी असल्याने, आधी मालिका पाहून मग वाचा. )परवाच एका पुस्तकांच्या फेसबुक ग्रुपवर चर्चा कम भांडण सुरु होतं. पोस्ट टाकणाऱ्याने रावणाला चरित्रनायक योजणाऱ्या एका पुस्तकाविरोधात लिहिलं होतं, की खलपुरुषाचं उदात्तीकरण योग्य नाही. रावण हा दानव होता. त्याच्या दुष्कर्मांबद्दल आपल्याला कल्पना आहे, आणि त्यामुळे त्याचं नायक म्हणून चित्रण होऊच शकत नाही. यावर अर्थात दोन्ही बाजूंनी बोललं गेलं. अर्ध्यांना हे पटत होतं. अर्ध्यांना नव्हतं. माझं म्हणणं अर्थातच पोस्टच्या विरोधी बाजूचं होतं. कोणतीही कथा जेव्हा सांगितली जाते तेव्हा ती कोणाच्या बाजूने सांगितली जाते यावर त्यातला खलनायक कोण हे ठरतं. ‘शोले’ जर गब्बर सिंगच्या बाजूने मांडला, गब्बर सिंगच्या कुटुंबावर झालेले जुलूम, त्याच्यावर पोलिसांनी केलेले अत्याचार, त्याच्या डाकू होण्याला सबळ कारणमीमांसा ही या बॅक स्टोरीमधून तयार झाली, तर आपण निश्चितच जय वीरुचं फूटेज कमी करुन, ‘शोले’ला गब्बर सिंगच्या आयुष्याची शोकांतिका असल्यासारखं मांडू शकू. का नाही ? पण त्यासाठी त्याने जे अत्याचार इतरांवर केले, ते जस्टीफाय होतील का ? आपण त्याला सहानुभूती दिली, तरी त्याची सर्व पापं धुतली जातील का ? तो करतोय ते योग्यच आहे, आणि त्याच्या विरोधातल्या लोकांचच चुकतय, असं आपल्याला म्हणता येईल का ?


हर्षद मेहता, हा अर्थातच गब्बर सिंग नाही, हिटलर नाही, निक्सन नाही. तो पांढरपेशा गुन्हेगार होता आणि त्याने कधी कोणाचा खून, कोणावर प्रत्यक्ष अत्याचार केले नाहीत, पण त्याच्यामुळे लोक देशोधडीला लागले हे सत्य आहेच. मग प्रश्न असा, की त्याने जे काही केलं ते आपण जस्टीफाय करु शकतो का ? अगदी त्याच्या बाजूने कथा सांगितली तरीही? वॉल स्ट्रीट मधला गॉर्डन गेक्को, ‘ वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीटमधला जॉर्डन बेलफर्ट, ‘बिलिअन्समधला बॉबी ॲक्सलरॉड, ‘सक्सेशनमधला लोगन रॉय, हे त्या त्या चित्रपटांच्या/ मालिकांच्या केंद्रस्थानी आहेत, आणि त्यांचे लेखक या पात्रांचा सहानुभूतीने विचार करतात हे निश्चितच, पण म्हणजे ते त्यांच्या साऱ्या वागण्याला फ्री पास देतात का ? तसा देता येईल का ? मला तसं वाटतं नाही. या साऱ्या उदाहरणांमधे आपण या पात्रांच्या बाजूने कथानक पाहू शकतो, पण त्यांनी केलेल्या गोष्टी योग्य आहेत, असं आपण म्हणू शकत नाही. मलास्कॅम १९९२या अदरवाईज उत्तम मालिकेत खटकलेली गोष्ट आहे ती हीच, की मालिका हर्षद मेहताच्या नकारात्मक बाजूवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करते, आणि तो नियतीच्या कचाट्यात सापडलेला सद्वर्तनी माणूस असल्यासारखं भासवते. कदाचित मालिका संपूर्ण काल्पनिक असती, तर मी ही नजरबंदी फार सिरीअसली घेतली नसती, पण तशी ती नसल्याने मी या मुद्द्याकडे पूर्ण दुर्लक्ष करु शकत नाही


हंसल मेहताशाहीदपासूनच माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी आहे, आणि इथेही त्याची कामगिरी प्रशंसनीयच आहे. त्याने वा लेखकांनी, कामात अजिबात कसर सोडलेली नाही. प्रमुख भूमिकांमधल्या प्रतीक गांधी (हर्षद) , श्रेया धन्वंतरी (सुचेता दलाल ) आणि हेमंत खेर ( आश्विन ) यांच्यासकट सर्वच कास्ट अचूक आहे, आणि मालिका आपल्याला गुंतवूनही ठेवते. यातल्या कशाबद्दलच माझी तक्रार नाही. त्यांनी कथा मांडताना जी भूमिका निवडली आहे, त्या भूमिकेतून त्यांनी आपलं काम चोख केलय. मला फक्त ती भूमिकाच फारशी पटलेली नाही.


हर्षद मेहताला नायक करायला अर्थातच माझी काहीच हरकत नाही. मालिका साधारण अर्ध्यावर पोचेपर्यंत तर मला जे दिसत होतं ते अगदीच पटण्यासारखं होतं. एका सामान्य घरातून आलेला माणूस कसा चढत गेला आणि त्याने कसं शेअर मार्केट काबीज केलं याची ही कथा खरोखरच अमिताभ बच्चनच्या एखाद्या मालिकेहून कमी उत्कंठावर्धक नाही. त्यानंतर मात्र मला प्रश्न पडायला लागले, ज्यांची समाधानकारक उत्तरं मला मिळाली नाहीत. पत्रकार सुचेता दलाल आणि देबशिश बसू, यांच्या स्कॅम: हू वन, हू लॉस्ट, हू गॉट अवेया पुस्तकावर ‘स्कॅम १९९२’ आधारीत आहे असं तिच्या कर्त्यांनी म्हंटलय, आणि मी काही पुस्तक वाचलेलं नाही. तरीही मालिकेतल्या दलाल/बसू या व्यक्तीरेखा पाहिल्या की आपण सेफली असं म्हणू शकतो, की पुस्तक स्कॅम बद्दलचं आहे, हर्षद मेहता व्यक्ती म्हणून कसा होता याच्याशी, त्याच्या व्यक्तीगत आयुष्याशी पुस्तकाचा फारसा संबंध नसावा. याउलट मालिका ही घोटाळ्यातले प्रमुख टप्पे घेत असली, तरी मुळात ती व्यक्ती म्हणूनच मेहताकडे पहाते. मग हा भाग कुठून आला ? तो मालिकाकर्त्यांना कोणी सांगितला, त्यावर रिसर्च झाला, की आणखी एखाद्या जागी हे तपशील आहेत ? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे मालिकेतली हर्षदची भूमिका ही अमिताभच्या लोकप्रिय भूमिकांसारखीच, म्हणजे वन डिमेन्शनल वाटते. चाळीतल्या छोट्याशा जागेत रहाणारा हा माणूस थोड्याच अवधीत शेअर मार्केटमधल्या मोठ्या माशांनाही धोकादायक वाटायला लागला, आणि देशाच्या पंतप्रधानांना लाच दिल्याचा आरोप करण्यापर्यंत त्याची मजल गेली हे आपल्याला दिसतं, पण काही कौटुंबिक तपशील वगळता मुळात हा माणूस नक्की होता कसा ? आणि त्याचा प्रवास कसा होता ? त्याला कधी कॉन्शन्सने छळलं का ?कधी त्याने आपण करतोय त्याचा पुनर्विचार केला का ? आपल्या पुढल्या पावलाबरोबर आपण शेकडो लोकांचं नुकसान करु शकतो याचा ताण त्याला कधी आला नाही का ? आपल्या भावाला त्याने कधीच विश्वासात का घेतलं नाही ? का घेतलं होतं ? या प्रश्नांची उत्तरं मालिका देत नाही. हर्षद ( त्याच्या डायलॉगबाजीसकट ) अमिताभसारखा आहे, हे प्रेक्षकांपुढे एक प्रतिमा उभी करण्यासाठी पुरे आहे, पण ती व्यक्तीरेखा खरेपणाने रेखाटण्यासाठी नाही. त्याच्या शेअरबाजारातल्या उलाढालीच्या फार तपशीलात आपण जात नाही, आणि ते ठीकच आहे. बरेच जणांसाठी ते खूप टेक्निकल होईल . पण हर्षद मेहताला इतके घोळ घालून रात्री शांत झोप लागत होती का , हा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा आहे ज्याचं उत्तर मला मिळत नाही. नंतरच्या काळात तो त्रस्त दिसतो, पण ते तो अडचणीत सापडल्याने, केसेसमुळे, लुबाडला गेल्याने. आपल्यामुळे झालेल्या इतरांच्या नुकसानाने त्याला धक्का बसल्याचं कुठे जाणवत नाही. त्याची सदसदविवेकबुद्धी दिसत नाही


हर्षद मेहताला सहानुभूती देण्यासाठी मालिकेने सतत वापरलेली एक क्लुप्ती म्हणजे हर्षदने काही नवीन केलं नाही , इतर लोक करायचे तेच तो करायचा, पण त्याला बाजूला करण्यात आलं कारण बॅंकींगमधे मुरलेल्यांना, उच्चवर्गीयांना, मार्केट आधीपासून खिशात असलेल्यांना तो नको होता, असं त्याच्या वागण्याचं आणि अडचणींचं स्पष्टीकरण ती वारंवार देत रहाते. आता हे स्पष्टीकरण तरी आहे का ? हर्षद सामान्य माणसांचा प्रतिनिधी कसा ? तो थोड्याच कालावधीत वर आला म्हणून त्याला दाबण्याचा प्रयत्न झाला हे खरं, पण तो खानदानी असता, श्रीमंत असता , तर त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला नसता का ? खरं सांगायचं, तर तो ज्या क्षणी कोटींच्या गोष्टी सहज बोलायला लागतो, त्या क्षणीच तो सामान्य उरत नाही. त्याच्या कथित शत्रूंसारखाच एक होऊन जातो. शिवाय तो जे करत होता, तेच इतर लोकदेखील करत होते का, ही व्हॉटअबाउटरी झाली. प्रश्नतो करत होता ते योग्य वा अयोग्यइतकाच आहे, ‘ इतर जे करत होते ते योग्य होतं का ?’ हा नाही. आणि जर को करत होता ते अयोग्य असेल, तर ते अयोग्य म्हणूनच मांडलं जायला हवं. त्यासाठी पदोपदी स्पष्टीकरणं कशासाठी ? पुन्हा नुसती स्पष्टीकरणंही नाहीत, व्यक्तीरेखांमधेही हर्षद सफेद वाटावा म्हणून इतरांचा रंग गडद केला जातोच. त्यामुळे जसा हर्षद पूर्णपणे खरा वाटत नाही, तसेच इतरही. शेअर मार्केट आणि बॅंकींगमधले त्याचे विरोधक , हे हिंदी सिनेमातल्या कारस्थानी खलनायकांसारखेच वाटायला हवेत का ? ती माणसांसारखी माणसं नसतील ? बरं हर्षदच्या विरोधातले सारेच खुनशी. मार्केटमधला मोठा मासा असलेल्या मनू मुन्द्रा ( सतीश कौशीक ) पासून, ते सीबीआय अधिकारी के माधवन (रजत कपूर ) पर्यंत. त्यांच्या संवादात, अविर्भावातही हा खुनशीपणा दडलेला. ही माणसं खरीच अशी खलनायकी वळणाची आहेत का ती मालिकेची सोय आहे ? मी आधी म्हणाल्यानुसार जर हे सारं काल्पनिक असते, तर हे प्रश्न पडण्याचं कारण नव्हतं. पण ही माणसं प्रत्यक्ष असताना, त्यांच्या तपशीलाला महत्व आहे


या टाईप्सच्या वापरापेक्षाही अधिक मोठा घोळ मला वाटला, तो सुचेता दलाल या व्यक्तीरेखेच्या चित्रणाचा, आणि तिच्या तुलनेत हर्षदची व्यक्तीरेखा जशी रंगवली जाते, त्याचा. एकूण कथाक्रमाच्या चौकटीत, या परस्परविरोधी व्यक्तीरेखा आहेत. प्रत्यक्षात तो एक घोटाळेबाज आहे, आणि ती पत्रकार आहे. अशी पत्रकार जिला आपल्या कामाचा अभिमान आहे, जी विकली जात नाही, जी कोणालाही काही सुनावण्याइतकी निर्भिड आहे. पण जेव्हा मालिका उलगडते, तेव्हा ती ( सुचेताच्याच पुस्तकावर आधारीत असून ) प्रत्येक गोष्टीत हर्षदची बाजू घेते आणि सुचेताला मात्र सूचक पद्धतीने नकारात्मक रंगवते. हर्षद मध्यमवर्गाचा भाग असल्यासारखा पुढे येतो, सर्वांबरोबर मैत्री करताना दिसतो, याउलट सुचेता प्रत्येकाला वापरुन घेतेय असं वाटतं. हर्षदच्या घरातले, सहकाऱ्यांबरोबरचे, हास्यविनोदाचे अनेक प्रसंग दिसतात, तिचे मात्र सर्वांबरोबरचे वादच समोर येतात. जेव्हा वाईट गोष्टी घडतात, तेव्हा हर्षदकडे जायला हवा तो दोषही त्याचे शत्रू, राजकारणी, मिडीआ यांच्याकडे जातो, आणि सुचेताला तिची चूक नसलेल्या गोष्टीबद्दलही संहिता दोषी धरते. फेरवानीच्या मृत्यूनंतरचा भाग पाहिला, तर हे कशा रितीने करण्यात येतय हे लक्षात येईल. या मृत्यूचा कुठलाच दोष खरा तिच्याकडे नाही, पण ज्या प्रकारे हे मालिकेत दाखवलं जातं त्यावरुन प्रेक्षक तिला अप्रत्यक्षपणे दोषी धरतो. याउलट जेव्हा हर्षदच्या मित्राची अत्यंत प्रेडीक्टेबल आत्महत्या येते, तेव्हाचं चित्रण आपल्याला हर्षदकडे सहानुभूतीने पहायला लावतं. पटकथा संवादात हे अतिशय कॅलक्युलेटेड पद्धतीने केलय, पण जर कॅलक्युलेशन अदृश्य राहिली, तरच ती प्रभावी ठरतात. आठव्या भागातला हर्षदच्या पत्नीचा भावनिक विस्फोटही असाच आहे. ती म्हणतेटेररिस्ट, क्रिमिनल्स करप्ट नेते यांना सीबीआय पकडत नाही, पण हर्षदच्या मागे लागली आहे.’ सुचेताला उद्देशून ती म्हणते ,’तुला माणसाचं नाही, तर बातमीचं अधिक महत्व आहे.’ ही दोन्ही विधानं हर्षदच्या पत्नीकडून येतात, त्यामुळे आपण ती तिच्या उद्रेकाचा भाग समजतो, जी ती आहेतही, पण प्रत्यक्षात ही वाक्य प्रेक्षकाच्या मनात हर्षदची आणि मिडीआची एक विशिष्ट प्रतिमा तयार करतात. सीबीआय हर्षदला पकडतेय हे काही चूक करतेय, त्यांचा भलता स्वार्थ यात आहे असं सूचित होतं. प्रत्यक्षात एवढा प्रचंड घोटाळा करणारा हर्षद हा मोठाच गुन्हेगार आहे. सामान्य माणूस आणि देश, या दोन्हीच्या विरोधात त्याने गुन्हा केलेला आहे. तो जर बाहेर आणला नाही, तर सगळं ठीकठाक रहाणार आहे का ? देशाची अर्थव्यवस्था कोलॅप्स होणार नाही ? आणि सुचेता तिचं काम करते आहे. तिचा यात काही अंतस्थ हेतू नाही. मग ती दोषी कशी ? पण हे पटकथा आणि संवादात अतिशय हुशारीने सुचवलं जातं. एकदा नाही, तर वेळोवेळी.


मालिकेत एक टाळीबाज वाक्य येतं , कीमेरा सबसे बडा क्राईम ये है की मै हर्षद मेहता हूं.’ वाक्य महत्वाचं आहे कारण ते त्याच्या मध्यमवर्गातून वर आल्याच्या प्रतिमेला साद घालतं. तो आउटसायडर असल्याने तो व्यवस्थेचा भाग असणाऱ्यांना मंजूर नाही, असं हे वाक्य सुचवतं, वरव्यवस्थेविरोधातला बंडखोर’ या हर्षदच्या प्रतिमेला खतपाणी घालतं. प्रत्यक्षात सीबीआय ने घेतलेली ॲक्शन ही कोणत्याही कायदाव्यवस्थेने सजगपणे केलेली कारवाई आहे. हर्षदचा क्राईम तो अमूक माणूस आहे हा नाही, तर भ्रष्ट लोकाशी हातमिळवणी करुन अर्थव्यवस्था रिग करणं हा आहे, आणि मिळणारी शिक्षा ही त्याचीच आहे. तो सामान्य माणसाचा प्रतिनिधी नाही, तर तो सामान्य माणसांना गोत्यात आणणारा आहे


मालिका लोकांना का आवडली, हे मी समजू शकतो. ती एक फॅन्टसी असल्यासारखी आहे. वर त्यात एक ‘what if’ घटक सामान्यांसाठी खुबीने पेरलेला आहे. हर्षदला स्वार्थी बॅंकांनी, धूर्त सीबीआयने बळीचा बकरा केल्याचा आभास निर्माण करत ही मालिका सुचवते, की पहा , या लोकांनी हर्षदला थांबवलं नसतं तर आपला सेन्सेक्स कुठच्या कुठे पोचला असता. देशाचं कल्याण झालं असतं. गोत्यात येईपर्यंत हर्षदने आपल्या गुंतवणूकदारांचं भलच केलं होतं, ते तसच राहिलं असतं, तर आपल्या सर्वांचच कल्याण झालं असतं. हे मालिका सुचवते, पण ते काही खरं नाही. हर्षद जो तयार करत होता, तो सुबत्तेचा आभास होता आणि आज ना उद्या जे झालं ते होणारच होतं. त्याने जे केलं ते त्याच्या फायद्याचं, आपल्या नाही. ते करतानाही त्याने मागचा पुढचा विचार केला नाही, काळजी घेतली नाही. जितक्या पटापट तो डोलारा उभा राहिला, तितक्याच पटकन तो कोसळलाही. त्याचा दोष त्याला मिळायलाच हवा


नकारात्मक प्रवृत्तीचा माणूस हा कथानायक नक्की असू शकतो, पण त्याचं नकारात्मक असणं मान्य करुन पुढे जाणं हे कथेला न्याय देणारं आहे. तो नकारात्मकच नव्हता असं कोणत्याही प्रकारे सुचवणं हा चकवा आहे. ‘स्कॅम १९९२हा असा चकवा आहे. तो रंजक आहे, वेगवान आहे, त्यात अनेक गुण आहेत. पण ते त्याचं चकवा असणं नष्ट करु शकत नाहीत.

 

- गणेश मतकरी. 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP