राशोमॉन आणि तलवारीचं रहस्य

>> Monday, October 12, 2015


जागतिक चित्रपटांसंदर्भात माहिती, जाण आणि इन्स्टीन्क्ट या साऱ्याच बाबतीत गोंधळलेल्या आपल्या सर्वभाषिक चित्रपट वृत्त/ समीक्षा संबंधित मिडीआने ६०/६५ वर्षापूर्वीच्या गाजलेल्या जपानी चित्रपटाचं नाव एका नव्या हिंदी चित्रपटाविषयी बोलताना सरसकट घ्यावं याबद्दल त्यांचं कौतुक ( हे नाव त्यांना सुचवलं गेलं असण्याची शक्यता गृहीत धरुनही ) करायलाच हवं. मात्र ते करताना हा संदर्भ या चित्रपटासाठी किती योग्य आहे, हा विचारही व्हायला हवा.

तलवार हा चित्रपट , हा ( बदललेल्या नावांसह) आरुषी तलवार- हेमराज यांच्या डबल मर्डर केसचा नव्याने विचार करतो. मूळ केस बहुधा सर्वांनाच माहीत असेल, पण कमी अधिक प्रमाणात. नॉयडा मधल्या एका बंगलीत तलवार कुटुंब , म्हणजे आरुषी आणि तिचे नुपूर आणि राजेश तलवार हे आई वडील रहायचे. हेमराज त्यांचा नोकर होता. एका सकाळी १४ वर्षाच्या  आरुषीची हत्या झाल्याचं लक्षात आलं. उघड संशय आला , तो घरुन गायब असलेल्या नोकरावर, हेमराजवर. पण पुढे त्याचाही मृतदेह मिळाला आणि संशयाची सुई आई वडीलांवर स्थिरावली. तपासाचं काम पुढे नं जाता वेगवेगळ्या अेजन्सीजकडे जात राहीलं, थिअरीज बदलल्या, संशयित बदलले, तपास करणारेही बदलले. पण पहिल्या, अत्यंत चुकीच्या प्रकारे केल्या गेलेल्या तपासाने आणि मिडीआत त्याला मिळालेल्या वारेमाप प्रसिध्दीने लोकांच्या मनात तिचे आई वडील हेच गुन्हेगार ठरले. आजच्या घडीला आरुषीच्या आई वडिलांना शिक्षा झालेली आहे, वरच्या कोर्टात त्यांचं अपील पेंडींग आहे.

कायदा आणि न्यायव्यवस्था याचा या केसमधे खेळखंडोबा झाला,  आणि कदाचित कोर्टासमोर आलेला पुरावा हा अंतिम सत्याकडे निर्देश करत नसेल, असं 'तलवार' चित्रपटाचं म्हणणं आहे. आता या चित्रपटाविषयी बोलताना, कोणालाही राशोमॉनची का आठवण व्हावी? तर कारण आहे ! तलवार आणि अकिरा कुरोसावाचा राशोमॉन (१९५०) या दोन्ही चित्रपटात एका अतिशय मूलभूत पातळीवर साम्य आहे. ते म्हणजे हे दोन्ही चित्रपट एका गुन्ह्याबद्दल, त्याच्या साक्षीपुराव्याबद्दल आहेत, आणि गुन्हा कसा झाला असावा याबद्दलच्या ऑल्टरनेट थिअरीज ते मांडतात. आता प्रश्न असा, की यामुळे तलवार राशोमॉनसारखा आहे, असं ठरतं , का नाही ?

राशोमॉन हा संकल्पनेच्या पातळीवरचा प्रयोग आहे. त्यातला गुन्हेगार आहे एक दरोडेखोर, जो एका उमरावाचा बळी घेतो, तोदेखील त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्यानंतर. त्यात आपल्याला घटनेची जी वेगवेगळी रुपं दिसतात, ती कोणी शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर समोर आलेली नाही, तर त्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्तींच्या, या  साक्षी आहेत. दरोडेखोर, मृत उमराव ( प्लॅंचेटच्या सहाय्याने) , त्याची पत्नी, या सर्वांची साक्ष कोर्टात होते, तर खटल्यानंतर एक साक्षीदार पुढे येऊन आपली बाजू मांडतो. हे सारं असं घडलं नाही हे उघड आहे, कारण साक्षी जुळत नाहीत. तरीही चित्रपट आपल्याला हे निवेदन दृश्य स्वरुपात दाखवतो.

कुरोसावाने हे सारं एक मुद्दा , संकल्पना मांडण्यासाठी घडवलेलं आहे. आणि ती म्हणजे सत्य हे व्यक्तीसापेक्ष असतं. 'पूर्ण सत्य' असा प्रकारच असू शकत नाही. राशोमॉनमधल्या आवृत्त्या या आपल्याला काय घडलं हे सांगत नाहीत, तर माणूस स्वार्थी असतो, असं सांगतात. तो प्रत्येक गोष्टीत आपला फायदा पहातो, सत्य आपल्यापुरतं बदलून घेतो, आणि आपल्यासमोर बाकी कशालाही दुय्यम मानतो अशी इथली थिअरी आहे. त्यामुळे या घटनेच्या भिन्न आवृत्त्यांना एक सरसकट स्पष्टीकरण चित्रपटात मिळत नाही, उलट ते नसणं हेच महत्वाचं ठरतं. राशोमॉनला जोडलेली फ्रेम स्टोरी तर त्याला आणखीही वेगळा पैलू जोडते . खटल्याच्या गोष्टी एेकून हताश झालेल्या, आणि मानवजातीवरचा विश्वास उडालेल्या एका धर्मोपदेशकाला मानवता म्हणजे काय याचा या शेवटामधून साक्षात्कार होतो आणि चित्रपट फारच वरच्या पातळीवर पोचतो.

या पार्श्वभूमीवर, तलवारचं सत्य घटनेवर आधारीत असणं, हेच त्याला मुळात राशोमॉनपासून दूर नेतं. राशोमॉनमधल्या आवृत्त्या हा सत्याचा शोध नव्हे, तर सत्य या संकल्पनेचा तकलादूपणा दाखवण्याचा मार्ग आहे. याउलट खरं काय झालं, हे शोधणं , त्याबद्दल बोलणं , हाच तलवारमागचा हेतू आहे. याबद्दल चित्रपटाची एक निश्चित भूमिका आहे. किंबहूना चित्रपटाला पटणारा या केसमधला सत्यशोधक ,सीबीआयच्या अरुण कुमार वर बेतलेला  - चित्रपटातल्या सीडीआय च्या पहिल्या तपासणीचा मुख्य अधिकारी आश्विन कुमार ( इरफान ) हाच इथे प्रेक्षकांचा प्रतिनिधी आहे. चित्रपट सुरु होतो तोही त्याच्यापासूनच. त्याच्या नजरेला जे पटतं, ते प्रेक्षकाना पटावं, अशी पटकथाकार विशाल भारद्वाज आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांची योजना आहे.

तलवार चित्रपट आपण अनेकवार तुकड्या तुकड्यात वाचल्या पाहिलेल्या या घटनेच्या बाजू आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो, पण पध्दतशीरपणे. केसची सुरुवात , छोट्या श्रुती टंडनचा मृतदेह मिळाल्यानंतरचा रमेश ( नीरज कबी) आणि नूतन ( कोंकोणा सेन शर्मा ) यांचा आक्रोश त्या घटनेची हृदयद्रावकता आपल्यापर्यंत पोचवतो , जी आपण मिडीआच्या भडक अंदाजात, आणि सेन्सेशनल हेडलाईन्समधे लक्षातच घेतली नव्हती. त्यानंतर तिन्ही तपास तो दाखवत जातो, आणि त्या निमित्ताने त्यातल्या घटनेच्या तिचा तपास करणाऱ्यांच्या नजरेतल्या आवृत्त्या दाखवल्या जातात, पण त्या तेवढ्यापुरत्या. राशोमॉनप्रमाणे त्या आवृत्त्या हाच सिनेमा, असं इथे  होत नाही.  गुन्हेगार कोण ( किंवा कोण नाही) हा निष्कर्ष तलवारसाठी महत्वाचा आहे, आणि ते ठरवण्याची जबाबदारी चित्रपट आपल्यावर सोडत असल्याचा आभास असला, तरी ते तसं नाही.

पटकथा ही किती चातुर्याने प्रेक्षकाला  विशिष्ट निष्कर्षापर्यंत नेऊ शकते, याचं तलवार, हे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला तीन तपास दाखवताना, त्यातला कोणता ग्राह्य मानायचा, याबद्दल प्रेक्षकाला सोप्याआणि चटकन जाणवणार नाही अशा  रीतीने मार्गदर्शन केलं जातं. आपण कोणत्या व्यक्तीरेखांना, का विश्वासार्ह्य मानतो ? चित्रपटभाषेत सत्यासत्याचे, निवेदनशैलीचे कोणते संकेत प्रेक्षकाकरवी चटकन स्वीकारले जातात? पडद्यावर युक्तीवाद लढवताना तो कोणत्या बाजूला कसा झुकवावा, हे इथे छान साधलेलं आहे. मेधना गुलजारचा हा आजवरचा सर्वात चांगला चित्रपट आहे यात वादच नाही, पण तिचं श्रेय भारद्वाजच्या पटकथेबरोबर विभागलं गेलं पाहिजे.

तलवार आणि राशोमॉन या चित्रपटांच्या मांडणीत म्हणण्यासारखं साम्य नाही. राशोमॉनची मांडणी सोपी आणि निष्कर्ष कॉम्प्लेक्स आहे, तर तलवारची मांडणी गुंतागुंतीची आणि निष्कर्ष सोपा. किंबहुना चित्रपटात एका व्यक्तीरेखेने चित्रपटातल्या मूळ पोलिस तपासावर केलेला आरोप इथे विरुध्द बाजूने वापरण्याजोगा , तो म्हणजे चित्रपटाने निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवूनच युक्तीवाद रचला आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे केवळ फॉर्मॅट , किंवा ढाचा, हा दोन कलाकृतींच्या तुलनेसाठी पुरेसा नाही. चित्रकर्त्यांचा हेतू, हा यात  महत्वाची भूमिका बजावतो. एका घटनेकडे निरनिराळ्या शक्यता तपासत पुन्हा पुन्हा पहाणं या क्लुप्तीची अनेक पाश्चिमात्य चित्रपटांमधे उदाहरणं आहेत, अगदी टॉम टीकरच्या जर्मन ' रन लोला रन' पासून किस्लोवस्कीच्या पोलिश 'ब्लाईन्ड चान्स'पर्यंत. पण त्यामुळे हे सारे चित्रपट राशोमॉनची रुपं ठरत नाहीत कारण दर चित्रपट ज्या कारणासाठी बनला, ते कारण वेगळं होतं. निर्मितीमागला दिग्दर्शकाचा हेतू महत्वाचा असतो, जो यातल्या दर चित्रपटात वेगळा होता.

तलवारच्या राशोमॉनबरोबर सतत केल्या जाणाऱ्या तुलनेने एक गोष्ट दुर्लक्षित राहिली आहे आणि ती म्हणजे, याच वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला रहस्य, हा चित्रपट. रहस्यमधे तलवार सारखा निवाड्याचा प्रयत्न नव्हता, मात्र त्यांनी मॉडेल म्हणून वापरलेला गुन्हा हा उघडच नॉयडा डबल मर्डर केस हाच होता. दिग्दर्शक मनीष गुप्ताने कायदेशीर ससेमिरा टाळण्यासाठी काही युक्त्या केल्या होत्या. संपूर्ण प्रकरण देखील नॉयडातून मुंबईत हलवलं होतं, पण साम्य कळण्यासारखं होतं. तसं ते कळलं, चिकार गडबड झाली, तलवार कुटुंबाने विरोध केला. मग थोडे कोर्टकज्जे करुन मध्यममार्ग निघाला, आणि रहस्य प्रदर्शित झाला. मला गंमत वाटते ती अशी, की गुन्हा तोच असूनही, त्याच्या उलगड्याकरता रहस्य हा चित्रपट परिचित अॅगाथा क्रिस्टी वळणाची रचना वापरतो. अगदी सर्वाधिक संशयमुक्त व्यक्तीच अखेर गुन्हेगार ठरवण्यापर्यंत. साहजिकच, आपल्याकडे फार नसलेल्या रहस्पटांमधे  तो एक चांगली भर मानता येईल. तरीही चित्रपटांच्या तुलनेत मात्र तलवार हाच उजवा ठरतो. कल्पनेपेक्षा सत्यच वरचढ ठरतं ते असं.

मी मध्यंतरी तलवारच्या एका समीक्षेत वाचलं होतं की तलवारचं नाव तलवार हेच असलं, तरी या नावाचा, गुन्हा झाला त्या कुटुंबाच्या आडनावाशी काहीच संबंध नाही ( कारण चित्रपटात कुटुंबाचं नाव बदललेलं आहे) . हे काही मला पटत नाही. चित्रपटात तलवार या शब्दाला वेगळा अर्थ निश्चित आहे, जो अगदी थातुरमातुर आहे असंही नाही. चित्रपट यासाठी संदर्भ घेतो, तो डोळ्याला पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याचा ज्याच्या हातात तराजूबरोबरच एक तलवारही आहे.  ही तलवार म्हणजे तपासयंत्रणा, किंवा पोलिस खातं असा अर्थ अभिप्रेत आहे, आणि त्या दृष्टीकोनातून चित्रपट आजच्या परिस्थितीवर उत्तम भाष्यही करतो. मात्र याचा अर्थ तो मूळ कुटुंबाचं आडनाव बाजूला ठेवतो, असा नक्कीच नाही. याउलट मी म्हणेन की कितीही चपखल असला तरी तलवारीचा सिम्बॉलिक अर्थ हाच दुय्यम आहे, किंवा मुद्दाम जमवून आणलेला आहे. चित्रपटाला हे नाव यासाठीच आहे, की तो या प्रकरणात आजवर दुर्लक्षित राहिलेला तलवार कुटुंबाचा आवाज पहिल्या प्रथम प्रेक्षकांसमोर आणतो. त्यांनाही एक बाजू आहे हे आपल्या लक्षात आणून देतो. त्याना तो कोर्टात न्याय मिळवून देऊ शकणार नाही, पण जनमानसातली या कुटुंबाची प्रतिमा तो नक्कीच उजळ करु शकेल, निदान काही प्रमाणात. त्यांना दोषी ठरवणाऱ्या मिडीआ ट्रायल नंतर हे हॅपी एंडींग म्हणता येणार नाही, कारण या विदारक कथानकाला सुखांत असूच शकत नाही. पण निदान शंभर अपराधी मोकळे सुटले तरी एकाही निरपराध्याला न पकडण्याचा दावा करणाऱ्या या व्यवस्थेत ,निर्दोष असण्याची खूप शक्यता असलेल्या दोन व्यक्ती खितपत पडल्या असल्याची जाणीव तरी तो आपल्याला नक्कीच करुन देतो, आणि ते खूप महत्वाचं आहे.

- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP