टेनेट - एक रचनात्मक प्रयोग

>> Tuesday, December 15, 2020

 


( काही स्पॉयलर्स असू शकतील. ) लॉरा - डोन्ट ट्राय टू अन्डरस्टॅन्ड इट. फील इट

(टेनेट)


नील - व्हॉट्स हॅपन्ड, हॅपन्ड.

(टेनेट)


मार्टी मॅकफ्लाय - ओह, धिस इज हेवी, डॉक. आय मीन, इट लाईक आ वॉज जस्ट हिअर येस्टर्डे.

डॉ एमेट ब्राऊन - यू वेर हियर येस्टर्ड, मार्टी.

(बॅक टु फ्यूचर )


तुम्ही टेनेट पाहिलात. त्याच्याबद्दलच्या अपेक्षांचं ओझं तुमच्या खांद्यावर आधीपासूनच होतं. मुळात तुम्ही क्रिस्टफर नोलनचे चाहते असल्यामुळे. शिवाय टेनेट आपल्या कितीतरी आधी इतर देशांमधे प्रदर्शित झाल्यामुळेही. टेननेटबद्दल उलटसुलट परीक्षणं आधीपासूनच येत होती, ट्रेलरमधून त्याची  स्पेक्टॅक्युलर झलक आपण आधी पाहिलेली होतीच. जेव्हा अपेक्षा अशा रितीने उंचावतात, तेव्हा बहुतेकदा त्या अपेक्षांच्या विपरीत प्रकारची प्रतिक्रिया होण्याची शक्यता अधिक असते. याही वेळी तसं झालं. ते झालं यात आश्चर्य काहीच नाही. ते केवळ अपेक्षांमुळेच झालं का, तर तसंही नाही. नोलनचे चित्रपट इमानेइतबारे पहाणारे प्रेक्षक इतके दूधखुळे नक्कीच नाहीत जे केवळ अपेक्षांवर चित्रपटाचा निकाल अवलंबून ठेवतील. ज्यांना चित्रपट आवडला नाही त्यांनी मांडलेल्या निरीक्षणांमधे, दिलेल्या मतांमधे तथ्य जरुर आहे. पण त्यावरुन हा चित्रपट दुर्लक्ष करण्याजोगा आहे असं मी मुळीच म्हणणार नाही


आणखी एक गोष्ट. मी एखादा अपवाद वगळताटेनेटमधल्या साऱ्या वैज्ञानिक संकल्पनांचं स्पष्टीकरण देणार नाही. तुम्हाला तसं स्पष्टीकरण देणारे अनेक व्हिडीओ, किंवा क्लिकबेट लेख सहज गुगलवर सापडतील. पण मला विचाराल, तर  चित्रपट पहाताना या संकल्पनांमागचं हार्ड सायन्स तुम्हाला कळण्याची काय आवश्यकता आहे ? त्या साधारण काय आहेत, आणि चित्रपटात त्यांचा काय पद्धतीने वापर होतो हे कळणं सध्यासाठी पुरे आहे. आणि  नाही कळल्या काही गोष्टी तरी हरकत नाही. कथारचना लक्षात येण्याला खरं महत्व आहे आणि ती लक्षात येण्याइतकी माहीती चित्रपट पुरवतो. अर्थात, आपण आपल्या मनात चाललेला चित्रपट पहाता पडद्यावरलाच चित्रपट पहात असणं त्यासाठी गरजेचं आहे


टेनेटहा क्विन्टेसेन्शीअली नोलनचा चित्रपट आहे. हाय कॉन्सेप्ट चित्रपटांसाठी नोलनची प्रसिद्धी आहेच. खासकरुन निवेदनशैलीचा वेगळा विचार, आणि जानरं चित्रपटांबद्दल विशेष प्रेम, यांनाही त्याच्या कामात महत्वाचं स्थान आहे. ‘फॉलोईंग’ , ‘मेमेन्टो’, किंवाप्रेस्टीजया साध्या रहस्यांच्या गोष्टी नाहीत, त्या गडद आशयाला आपलं म्हणणाऱ्या निओ न्वार फिल्म्स आहेत.  ‘इन्सेप्शनही हाईस्ट फिल्म आहे, ‘इन्टरस्टेलरसाय फाय, तरडन्कर्कहा युद्धपट आहे. पण हे सारेच चित्रपट त्या त्या चित्रप्रकारांशी साधर्म्य साधूनही त्यांच्यापासून इतके वेगळ्या पद्धतीचे भासतात, की सुपरहिरो फिल्मगटात मोडणाऱ्याडार्क नाईट त्रयीला वगळता, नोलनच्या चित्रपटांना आपण जानरं चित्रपटांच्या गटात स्थानच देत नाही. पण त्या तशा आहेत. मगटेनेटचं जानरं कोणतं ? तर जेम्स बॉन्डच्या धर्तीवरल्या हेरपटाचं


आताटेनेटचित्रपट बॉन्ड फिल्म सारखा वाटतो, हे समजण्यात काही रॉकेट सायन्स नाही. नियमितपणे व्यावसायिक इंग्रजी चित्रपट पहाणाऱ्या कोणाच्याही ते सहज लक्षात येईल. मग त्यात विशेष सांगण्यासारखं काय आहे, तर ते हे, की त्याचं जानरं आपल्याला कळणं त्यातल्या एका महत्वाच्या गोष्टीशी जोडलेलं आहे.’टेनेटची तुलना चटकन केली जाते तीइन्सेप्शनआणिइन्टरस्टेलरशी, आणि असं म्हंटलं जातं, कीत्यातही कथा वैज्ञानिक संकल्पनांशी जोडली होती, पण त्यांच्यासारखा हा जमला नाही. आम्ही पहाताना चित्रपटाशी भावनिकदृष्ट्या जोडले गेलो नाही.’ आता हे जे दोन्ही चित्रपट होते, ते ज्या चित्रप्रकारांशी नातं सांगतात, त्यांमधे निश्चितपणे नायकाशी, प्रोटॅगनिस्टशी आपण भावनिकदृष्ट्या जोडलं जाणं हा महत्वाचा मुद्दा आहे. ॲक्शन हेरपटांमधे तसं होणं अपेक्षित नाही. आता बॉन्डपटात तसं होतं असं कोणी म्हणेल, तर ते तितकंसं बरोबर नाही. डॅनिएल क्रेगच्या बॉन्डपटांमधे ते आहे, कारण त्यांची ट्रीटमेन्ट ही परिचित बॉन्डपटांसारखी नाही. क्रेगचे सगळे चित्रपट कथेच्या एका धाग्यात विणले गेले आहेत, आणि त्या एपिसोडीक साहसकथा नाहीत. पण त्या आधीचे चित्रपट आठवलेत तर लक्षात येईल, की बॉन्ड ही व्यक्तीरेखा फार वरवरची आहे. तो एक नायक , एक प्रोटॅगनिस्ट आहे, पण त्या पलीकडे त्याला आगापिछा नाही. चित्रपटही ही व्यक्तीरेखा व्यक्ती म्हणून रंगवण्यावर फार भर देताना दिसलेले नाहीत. याउलट एका साहसातून दुसरं साहस, आणि त्या साहसांना आधार म्हणून एक नायकया तऱ्हेची ही रचना आहे. ‘टेनेटत्या प्रकारच्या रचनेचाच आधार घेतो, पण गंमत ही, की हा फक्त आधार आहे. या पद्धतीची रचना डोळ्यांसमोर आणत तो त्यात वैज्ञानिक संकल्पना आणून मिसळतो, आणि मग या संकल्पना ज्या प्रकारे मूळ फॉर्म्युला बदलत नेतील तसा तो फॉर्म्यूला बदलू देतो. त्यामुळेच सुरुवातीचा भाग जरी बॉन्डपटांसारखा वाटला, तरी पुढला भाग या नव्या मिश्रणातून बराच वेगळ्या प्रकारे घडत जातो. मुद्दा हा, की नोलनने निवडलेला जानरं, त्याने वापरलेलाभावनिक गुंतवणूक टाळणाराचित्रपटाचा ढाचा, ही जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे. गेल्या सिनेमात ते जमलं, पण इथे नाही, असा हा अपघाती प्रकार नाही


टेनेटचा नायक हाप्रोटॅगनिस्टएवढच नाव लावतो. त्यापलिकडे आपण त्याच्या व्यक्तीगत आयुष्यात डोकवू शकत नाही. त्याला भविष्यात संभवणारा जगाचा विनाश टाळायचाय आणि या विनाशाचाकाळया संकल्पनेशी काहीतरी संबंध आहे, एवढच आपल्याला सुरुवातीला कळतं. मग नायक मुंबईत येतो आणि त्याची गाठ नीलशी (रॉबर्ट पॅटीसनपडते. ते दोघं प्रिया( डिंपल )ला भेटतात आणि बॉन्ड स्टाईल वेगवेगळ्या देशांमधे घडणाऱ्या जोडसाहसांची मालिका सुरु होते. जग संपवू पहाणारा सेटर (केनेथ ब्रनागआणि त्याची पत्नी कॅट ( एलिजबेथ डेबिकी) या देखील बॉन्डपटात शोभण्यासारख्या व्यक्तीरेखाच आहेत. पूर्वार्धात ऑपेरा हाऊस, विमानतळावरला प्रसंग, हायवे चेज असे नेत्रदीपक प्रसंग येत जातात, पण जसजसा वैज्ञानिक कल्पनांचा पगडा वाढत जातो, तसतशी ही रचना एकरेषीय रहाता, तिचा एक बंद लूप तयार होत जातो. आपला प्रवास जिथे सुरु झाला, तिथेच तो संपणार असं दिसायला लागतं.


बॉन्डपटांपलीकडे जाउन पाहिलं तरीहीटेनेटचित्रपटाची रचना, ही लक्षवेधी आहे. चित्रपटाने एकाच वेळी काळात पुढे आणि मागे जाणं, ही क्लुप्ती नोलनने आपल्यामेमेन्टोया दुसऱ्याच चित्रपटात करुन दाखवली होती, त्यामुळे अशी वेगळी निवेदनशैली त्याच्यासाठी नवीन नाही. पण इथे हा दोन दिशांनी चाललेला प्रवास वेगळ्या पद्धतीने समोर येतो. कालप्रवास, हा आपण हॉलिवुड आणि जगभरातल्या अनेक चित्रपटात पहातो आहोत, आणि टाईम पॅरॅडॉक्सेस, समांतर विश्व, ऑल्टरनेट टाईमलाईन्स, यांच्याशी आपला परिचय आहे. पणटेनेटमधली विशेष गोष्ट ही, की तो एकच टाईमलाईन वापरतो. तो समांतर विश्वाची शक्यता नाकारत नाही, पण प्रत्यक्ष चित्रपटात आपला प्रवास एकाच विश्वातल्या एकाच कालक्रमानुसार होतो. त्यामुळे प्रोटॅगनिस्ट ( जॉन डेव्हिड वॉशिंग्टन) जेव्हा उलटा प्रवास करतो, तेव्हा तो त्याच कालप्रवाहात उलटी वाटचाल करत असतो. कालप्रवासाशी संबंधित चित्रपटातले नायक जेव्हा एखादा बदल करतात, तेव्हा भविष्यात त्याचे पडसाद उमटतात, पण या चित्रपटात तसं होत नाहीभूतकाळात ज्या गोष्टी घडून गेल्या त्या बदलत नाहीत, तर तशाच रहातात. किंबहूना, नायकानेही त्या बदलू नयेत अशीच अपेक्षाही आहे, हे नील च्याजे घडलं, ते घडलं,’ या विधानातही दिसून येतं. नीलला पुढल्या घटनांबद्दल माहीती असतानाही, तो नायकाला त्यांबद्दल अधिक माहीती देत नाही, यावरुनही त्याचा कालप्रवाह बदलू नये याबद्दलचा प्रयत्न दिसतो. हे जे कालक्रम टिकवून ठेवणं आहे, ते चित्रपटाच्या सिमेट्रीकल रचनेला कारणीभूत आहे. अन्यथा ही रचना एक मूळ घटना, आणि पुढे तिला फुटणारे फाटे, या पद्धतीची झाली असती, जेइथे आढळत नाही.  ‘टेनेटहे नाव पॅलिनड्रोम आहे. म्हणजे ते उलटसुलट कसंही वाचलं तरी ते बदलत नाही, म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर या शीर्षकातही सिमेट्री आहे. मधलं अक्षर हा TENET या शीर्षकाचा मध्य धरला तर उजव्या बाजूची अक्षरं, ही डाव्या बाजूच्या अक्षरांचं प्रतिबिंब आहेतइन्वर्जनचं प्रतीक म्हणूनही याकडे पहाता येईल, तसच ही सिमेट्री, चित्रपटाच्या रचनेतही दिसते. तिला कथासूत्राचं पूर्वसूचन समजता येईल. बऱ्याच पोस्टर्समधूनही हे सुचवण्यात आलेलं आहे


या चित्रपटातला कालप्रवास हा आपण इतर चित्रपटात पाहिलेल्या कालप्रवासापेक्षा वेगळा आहे. नोलनचे सर्वच चित्रपट पाहिले, तर तो अवघड संकल्पनांना, वास्तववादी रितीने मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतोएखादी गोष्ट जर प्रत्यक्षात घडायची असेल, तर ती भौतिकशास्त्राच्या नियमांशी प्रामाणिक रहात काय प्रकारे घडू शकते, असा विचार, आणि त्याची त्या दृष्टीकोनाशी प्रामाणिक मांडणी ही त्याच्या प्रत्येक चित्रपटात दिसते. डार्क नाईटमधल्या सुपरहिरोंच्या व्याकरणापासून इन्टरस्टेलर मधल्या ब्लॅक होलच्या शास्त्रशुद्ध चित्रणापर्यंत या प्रकारची विपुल उदाहरणं आपण पाहू शकतो. त्यामुळेचबॅक टु फ्युचरप्रमाणेटेनेटमधल्या व्यक्तीरेखा कालप्रवाहातल्या विशिष्ट क्षणाला उडी मारत नाहीत, तर त्यांना हा उलट्या दिशेचा प्रवास स्वत: करावा लागतो, एका अर्थी स्वत:चच प्रतिबिंब बनून. कालप्रवाह इथे बदलत नाही, थांबत नाही, वेगळ्या दिशेने वळत नाही. तर जग सरळ दिशेने जात रहातं. उलट जाणाऱ्या व्यक्ती या प्रवाहाशी झगडत उलटा प्रवास स्वत: पार पाडतातहेइन्वर्जनआणि या उलट्या प्रतिबिंबाचा प्रवास हा चित्रपटातल्या दृश्यचमत्कृतींना बराचसा जबाबदार आहे. काही वेळा, काही प्रेक्षकांना तो समजायलाही थोडा कठीण पडू शकतो, आणि तो शंभर टक्के विज्ञानाला धरुन आहे का, हेदेखील मी छातीठोकपणे सांगू शकणार नाही. पण संकल्पनेचा वास्तवाच्या चौकटीत होणारा विचार, या दृष्टीने तो अतिशय योग्य आहे. रंजक चित्रपटाच्या आवरणाखाली क्रिस्टोफर नोलन हे करु शकतो, हेदेखील आश्चर्यकारक आहे


दृश्य परिमाणाबाबत मला वाटतं कोणाची तक्रार नसावी. मला यातला हायवे चेज पाहूनमेट्रिक्स रिलोडेडमधला प्रदीर्घ पाठलाग आठवला. ‘टेनेटमधला पाठलाग त्याच्याइतका गुंतागुंतीचा नसला, तरी इथल्या इन्वर्जनच्या घटकानेतो विशेष वाटतो. इतर दृश्यही योग्य त्या प्रमाणात थक्क करणारी आहेत, पणटेनेटवापरत असलेले घटक हेइन्सेप्शनवाइन्टरस्टेलरप्रमाणे मानवी  अनुभूतीपलीकडचे नाहीत, त्यामुळे तुलना केल्यास ते कमी वाटण्याची शक्यता आहे. व्हीएफएक्स आणि भव्य दृश्यांनी विषयाच्या, संकल्पनेच्या वरताण ठरु नये असं मला मुळातच वाटत असल्याने, आणि तरीही ही दृश्य पुरेशी भव्य असल्याने मला तरी ती योग्य वाटली.


टेनेटआवडावा किंवा आवडावा, हे अर्थातच व्यक्तीगत मत आहे, आणि मी असं कधीही म्हणणार नाही, की दुसऱ्यांच्या मतावर विसंबून एखादा सिनेमा ( वा इतर कला/साहित्यकृती) आवडून घ्यावा. पण मी असं मात्र म्हणेन, की चित्रपट काय प्रकारचा आहे हे समजून घेताना आपली दृष्टी पुरेशी मोकळी आणि स्पष्ट हवी. नोलनचा सिनेमा हा प्रेक्षकांना कधीही मूर्ख समजत नाही. त्याच्या बाजूने तो अवघड, आव्हानात्मक विषय निवडतो आणि हाती असलेल्या साधनांमधून, आजवरच्या कथनशैलीच्या , दृश्यात्मकतेच्या मर्यादा ताणत तो या चित्रपटांना पडद्यावर आणतो. त्याची एखादी निर्मिती दुसऱ्यापेक्षा कमीअधिक असली, तरी ज्या गांभीर्याने तो हे काम करतो त्याकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही. हे गांभीर्यटेनेटमधे आहे, याबद्दल कोणतीही शंका मनात असू नये

 

- गणेश मतकरी


Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP