टुरींग टॉकीज- अस्सल असल्याचा आभास

>> Monday, April 22, 2013सामान्यत: चित्रपटाचा प्रेक्षक आणि परीक्षक यांच्यात टोकाचे मतभेद होऊ नयेत कारण दोघांनीही तोच चित्रपट पाहिलेला असतो. अखेर परीक्षक देखील एक प्रेक्षक असतो आणि प्रेक्षक परीक्षक. फरक एवढाच की दोघांची एकेक बाजू ही  आपापल्या भूमिकेप्रमाणे स्पष्टपणे कार्यरत असते तर दुसरी थोडी सबकॉन्शस पातळीवरुन हे सारं पाहात असते. शेवटी अंतिम निकाल हा अवधानाने वा अनवधानाने दोन्हीच्या संगनमतातूनच तयार होत असतो. तरीही वेळोवेळी असं दिसून येतं की मतं केवळ तपशीलातच नाही तर एकूण गुणवत्तेबद्दलच्या मूलभूत मुद्द्यांवरही संपूर्णपणे वेगळी असू शकतात. मग यात केवळ अप्रामाणिकपणा असतो का? कोणत्याही एका बाजूचा? तर तो नसतो किंवा नसावा असं मला मनापासून वाटतं . माझ्या मते चित्रपट पाहाताना ती ती व्यक्ती कोणत्या गोष्टीना अधिक महत्व देते याचा बराचसा परीणाम त्यांच्या दृष्टीला पडणा-या अंतिम निकालावर होत असावा. या शुक्रवारी लागलेला टुरींग टॉकीज पाहाताना झालेलं माझं मत आणि वर्तमानपत्रांमधून या चित्रपटावर व्यक्त झालेली, परीक्षक, समीक्षक या अधिकारातून व्यक्त करण्यात आलेली माझ्या वाचनात आलेली मतं , यांमधे असाच जमिन अस्मानाचा फरक होता.
 टुरींग टॉकीज बद्दलचे दोन मुद्दे वादातीत आहेत. पहिला म्हणजे त्याचा विषय. हा विषय उत्तम आहे ,आणि वरवर पाहाता त्याचं कथासूत्र, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत एका टुरींग टॉकीजच्या तरुण मालकिणीने आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यात तिला एका अगदी वेगळ्या वळणाच्या चित्रप्रकारा़त रुजलेल्या दिग्दर्शकाकडून झालेली प्रामाणिक मदत, हेदेखील वाईट नाही. त्यात रचनेच्या दृष्टीने नवीन काही नसलं तरी ते तपशीलातून श्रीमंत होऊ शकेलसं नक्कीच आहे. दुसरा मुद्दा आहे तो त्यासाठी अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी मनापासून केलेली मेहनत. निर्माती आणि प्रमुख भूमिका पार पाडणारी तृप्ती भोईर, सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, संकलक बल्लू सलूजा ,पडद्यामागले इतर अनेक जण, आणि अभिनेते किशोर कदम, सुबोध भावे, इत्यादी सा-यांनीच अतिशय मन लावून काम केलं आहे. हे दोन मुद्दे सिध्द आहेत, यावर दुमत नाही. आता दुमत असलेल्या भागाकडे वळू.
चित्रपटात दिग्दर्शकाची भूमिका काय हा प्रश्न चित्रपट माध्यमाविषयी चर्चा करताना नेहमी विचारला जातो. कारण ही व्यक्ती अमुक एक तांत्रिक बाजू सांभांळत नाही. ती प्रत्येकाला आपापली भूमिका , मग ती पडद्यापुढली असो वा मागची, करु देते,मात्र ती करताना हा प्रयत्न एका पूर्वनियोजित आणि निश्चित दिशेने जातो आहे ना हे पाहाते. अनेकदा ,हे दिशानियंत्रण सोपं जावं म्हणून दिग्दर्शक लेखनाची बाजूही स्वीकारतात मात्र हा निर्णय कधी फसण्याचीही शक्यता असते. लेखन आणि दिग्दर्शन हे स्वतंत्र सर्जनशीलता दाखवून करणारे लेखक/दिग्दर्शक जरुर आहेत, मात्र प्रत्येक दिग्दर्शक हा चांगला लेखक असतो( वा लेखक चांगला दिग्दर्शक) असं नाही. बहुधा दिग्दर्शक हा चांगल्या दृश्ययोजना , ढोबळ उठावदार संकल्पना ,प्रेक्षकावर थेट प्रभाव टाकणारे प्रसंग याच्याभोवती विचार करतो, तर लेखक त्यातल्या आशयाला प्रमुख स्थान देतो. त्यामुळे बहुधा हे दोन उद्योग दोन वेगळ्या व्यक्ती करत असल्या तर चित्रपट अधिक समतोल होण्याची शक्यता असते. टुरींग टॉकीजला लेखक ( पटकथा आणि संवाद) आणि दिग्दर्शक एकच आहे, त्यामुळे असा समतोल तिथे न राहाणं आश्चर्याचं नाही. आश्चर्याचं आहे ते या चित्रपटाचं दिग्दर्शक असूनही तो नसल्यासारखं भरकटणं.
 गजेंद्र अहिरे हे आपल्याकडले पारंगत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या चित्रपटांचे विषय नेहमीच लक्षवेधी असतात. त्यांच्या चित्रपटांची चाळीशी जवळ आहे वा कदाचित उलटूनही गेली असेल.  त्यांना राष्ट्रिय पुरस्कारही ( मला वाटतं दोनदा) मिळालेला आहे.त्यामुळे केवळ त्यांचा अनुभव पाहूनही या ढिसाळ कामगिरीचं आश्चर्य वाटतं. ज्यांनी त्यांचे इतर चित्रपट पाहिले असतील त्यांना अहिरेंच्या  चित्रपट निर्मितीकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनातल्या त्रुटी सहज लक्षात याव्यात, ज्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावंसं खूप आहे, आणि ज्या नसत्या तर अहिरे नक्कीच मराठीतले महत्वाचे दिग्दर्शक ठरू शकले असते. असो. आता मी त्याकडे वळणार नाही. सध्या हा एक चित्रपट पुरे आहे.

अहिरेंनी या चित्रपटाविषयी केलेलं आणि काही परीक्षकांनी उचललेलं भाष्य चित्रपटाचा घोळ वाढवणारं आहे. आणि ते म्हणजे 'हा चित्रपट दिग्दर्शकापेक्षा संकलकाचा आहे.'हे गौडबंगाल काही मला कळलेलं नाही. हा अगदी नॉर्मल चित्रपटासारखा चित्रपट आहे. त्यात काही प्रयोग नाही, इम्प्रोवायजेशन नाही, प्रचंड फूटेज मधून चित्रपटाचा आकार करणं नाही, काही नाही! थोडक्यात, संकलकाने जरुरीपेक्षा अधिक भार उचलल्याचा पुरावा नाही. सरळ प्रसंग लिहिलेले आहेत. त्याप्रमाणे व्यक्तिरेखांची कामं आहेत. नाही म्हणायला जत्रेचं बरंचसं फूटेज आहे ,पण ते चांगल्या पध्दतीने वापरल्याने संकलक चांगला , अगदी उत्तम आहे हे सिध्द होईल, पण त्याने चित्रपट संकलकाचा कसा होईल? आणि जर झाला, तर या तर्कशास्त्राने प्रत्येकच चित्रपट संकलकाचा असतो, मग एकूणच दिग्दर्शक दुय्यम असतो असं अहिरेना म्हणायचंय का?

 कथानकात आपल्याला कळतं, म्हणजे सांगितलं जातं, की टुरींग टॉकीजच्या उद्योगाला कशी वाईट परिस्थिती आहे, मात्र प्रत्यक्षात दिसतो तो भयंकर गर्दीत चाललेला सिनेमा. चित्रपट फुल जातोय, लोक तिकीटाला गर्दी करतायत, थिएटर मालकीण चांदी ( भोईर) नेहमीपेक्षा अधिक खेळ लावूया म्हणतेय, मग हा तोट्यात चाललेला उद्योग कसा? यानंतर तिला येणारी अडचण ही कोणालाही, कोणत्याही आणि कितीही तेजीत चाललेल्या उद्योगात येणारी आहे. ती म्हणजे जुगारी बापाने थिएटर पैशासाठी गहाण ठेवणं. आता या अडचणीचा टुरींग टॉकीजशी काय संबंध आहे? मल्टीप्लेक्स आल्याने टुरींग टॉकीजचा उद्योग बसला किंवा तत्सम अडचण ही विषयाला धरुन झाली असती. पण ही निव्वळ चिकटवलेली आहे. उद्या त्यांचं टुरींग टॉकीज नसून जुएलरी शॉप किंवा रेस्ताँरा असतं आणि बापाने ते गहाण ठेवलं असतं तर ते उद्योगही तोट्यातले म्हणता आले असते का? बरं हा एकच चांगला चालणारा चित्रपट आहे असंही नाही. कारण यानंतर चांदी घेते तो प्रायोगिक वळणाचा ,आर्ट फिल्म प्रकारातला अविनाश ( भावे) या होतकरु महान दिग्दर्शकाचा सिनेमा आणि तोही थोड्याफार हातचलाखीनंतर तितक्याच जोरात चालवून दाखवते. इतक्या जोरात चाललेला तोट्यातला उद्योग मी तरी दुसरा पाहिलेला नाही.
 आता दुसरा प्रश्न हा, की अविनाश मुळात आपला प्रायोगिक सिनेमा पन्नास हजार अँडव्हान्स देऊन टुरींग टॉकीज मधे का लावणार असतो? या प्रकारच्या चित्रपटाचा तो योग्य प्रेक्षकवर्ग आहे? का त्याच्या नजरेत तसा तो लावून पाहाणं ,हा प्रयोग आहे?का त्याला इतर कोणतही थिएटर उभं करत नाही इतका हा रद्दी सिनेमा आहे?का  त्याची पैशांची अडचण आहे? यातलं एकही कारण अविनाश नीटपणे देत नाही. केवळ अहिरेना वाटलं की प्रायोगिक चित्रपट आणि टुरींग टॉकीज यांची सांगड नाट्यपूर्ण वाटेल हेच कारण. बरं ,हा जत्रेतला प्रेक्षक आनंदाने पाहातो असा प्रायोगिक सिनेमा आहे तरी कसा? तर तेही कळत नाही. चांदी काही छापील वाक्य बोलून दाखवते पण त्याने काही कळत नाही. तिला सिनेमा बरा वाटला एवढं कळतं. तरी प्रेक्षकांना आकर्षित करायला ती त्याचं नाव बदलते. पोस्टर बदलते. नव्या पोस्टरवर भरत जाधव आणि सिध्दार्थ जाधव असतात.म्हणजे हे मुळातच या कलात्मक चित्रपटात ,ज्याला पुढे बर्लिन फेस्टीवलला अवॉर्ड मिळतं , त्यात होते ,का केवळ पोस्टरवर प्रेक्षकांसाठी, कोणाला माहीत! पण असावेत. अन्यथा प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या असत्या. ( बर्लिन बर्लिन राहिलं नाही हेच खरं !!) बरं एवढ करुन चांदी थांबत नाही, तर एका पॉइंटला मधेच़ एक्स रेटेड सीन जोडते. का ? सिनेमा तर आधीच चालायला लागलेला असतो. किंबहुना सगळे सिनेमे इथे प्रचंड गर्दीतच चालतात. हल्ली रिकामी मल्टीप्लेक्स चालवणा-यांनी जर जाऊन टुरींग टॉकीज काढली तर मला वाटतं सगळाच प्रश्न सुटेल.
मुळात या सा-याचा उगम हा तृप्ती भोईरच्या पहिल्या चित्रपटाच्या अनुभवावर ,आणि तो चित्रपटगृहात फसल्यावर टुरींग टॉकीजमधे तो चालावा यासाठी तिने घेतलेल्या प्रयत्नांमधे आहे. पण हे जरी गृहीत धरलं तरी तिचा चित्रपट हा साधा मराठी चित्रपट होता. इतर चार चित्रपटांसारखा, कौटुंबिक जिव्हाळ्याचा वगैरे. शिवाय तिने केलेले बदल हे निर्माती म्हणून होते. कलेबिलेला त्यात थारा नव्हता. या ठिकाणी केवळ नाट्यपूर्णतेसाठी आणलेली अविनाशच्या कलात्मक दिग्दर्शक असण्याची जागा ही पूर्णपणे फसवी आहे. या प्रकारचा दिग्दर्शक अशा ठिकाणी जाऊन या प्रकारच्या तडजोडी करणं हे मुळातच अशक्य आहे.
'टुरींग टॉकीज' क्लिशेजचा एक्स्टेन्सिवली आणि अनावश्यक वापर करतो. त्यात मुलासारखी राहाणारी ( का? कोणाला माहीत, पण या विषयावरला 'देवाने दिलेली वजनं ' असा फेमिनिटीचा भयंकर प्रतिकात्मक वापर करणारा एक अफलातून (!!)डायलॉग तिच्या तोंडी आहे. ) नायिका आहे, तिचं सुंदर नायिकेत इन्स्टन्टली होणारं रुपांतर आहे ( 'पिग्मॅलिअन' ते 'ती फुलराणी' पर्यंत क्लासिक्समधे अशा रुपांतरासाठी  एवढा वेळ का काढतात कोणाला माहीत, इथे ते सिंडरेला प्रमाणे नव्या कपड्यांपासून शुध्द उच्चारांपर्यंत सर्व बाबतीत तत्काळ होतं . खरं तर मी इथे अलंकारीक भाषेपर्यंत असं म्हणणार होतो. पण इथे प्रमुख भूमिकांपासून सटर फटर पात्रांपर्यंत सारेच त्याच शैलीच्या अलंकारिक भाषेत म्हणजे 'तुझ्या आभाळाला माझे हात पोचत नाहीत',किंवा' तंबू नाही प्रियकर आहे माझा' , या छापाचं बोलतात, त्यामुळे तसं म्हणणं शक्य नाही ,असो) त्याशिवाय हिंदी सिनेमातली वाक्य बोलणारा जुगारी बाप आहे, सुंदर नायिकेकडे दुर्लक्ष करुन पुरुषी गेट अप मधल्या मुलीच्या प्रेमात पडणारा दिग्दर्शक आहे, शहरी संस्कारांना मूर्ख ठरवणारं फिल्म हिरॉईनचं पात्र आहे, पैसे लाथाडून ईमानदारी मानणारा विश्वासू सेवक आहे, अचानक जगप्रसिध्द होणारा नायक आहे आणि तद्दन खोटा सुखांत शेवट आहे. यातलं सारं आपण अनेकदा पाहिलेलं आहे.

चांदी आणि अविनाश यांची चित्रपट माध्यमाशी लॉयल्टी हा एक मोठा विनोद आहे. चांदी चित्रपटाचं नाव बदलते, चावट पोस्टर करते, त्यात एक्स रेटेड सीन घालते, पण भावाने एका चित्रपटाचं पोस्टर फाडलेलं तिला सहन होत नाही. अविनाश वेगळ्या प्रकारचे चित्रपट करु पाहाणारा , बर्लिन महोत्सवाची स्वप्न पाहाणारा ,आदर्शवादी दिग्दर्शक आहे. पण चांदीने चित्रपटाचं नाव आणि पोस्टर बदलणं त्याला चालतं. गर्दी जमवायला नायिकेचं प्रदर्शन मांडलेलं त्याला चालतं . त्याच्याच कलाकृतीत एक्स रेटेड सीन घातला तरीही त्याला फार फरक पडत नाही. दिग्दर्शक कसा असावा यावरचं त्याचं भाषण फारच विनोदी आहे. गावात प्रोजेक्टर चालवणा-या मुलाला दिग्दर्शकाला कला आणि साहित्याची जाण हवी पण निर्मात्याच्या बजेटचं भान हवं वगैरे कळणार आहे का? मग हे कोणासाठी आहे?

'टुरींग टॉकीज' पाहून आपण या उद्योगाच्या सद्य पररिस्थितीवर विचार करावा असं वाटत असेल तर आणखी एका बाजूकडे पाहाणं गरजेचं होतं आणि ते म्हणजे या तंबूंमधला प्रेक्षक. जो चित्रपटाला येत नाही असं आपण ऐकतो पण ज्याचा पुरावा चित्रपटात दिसत नाही, जो सवंग आणि कलात्मक चित्रपट (म्हणे) त्याच उत्साहाने पाहातो, त्याची या बिकट परिस्थितीतल्या उद्योगावर काय प्रतिक्रीया ,त्याची काय बाजू, हे आपल्याला कुठेच का कळू नये? खासकरून  उद्योगाचा -हास हाच तथाकथित विषय असताना. पण तसं होत नाही खरं.
हे सारं प्रामुख्याने होतं ते चित्रपट दिशाहीन असल्याने. त्याला काय वातावरण आहे हे माहीत आहे , काय प्रकारच्या व्यक्तिरेखा असाव्यात हे माहित आहे, त्याप्रमाणे त्यांना पटकथेत अंतर्भूत करण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर या परिस्थितीचा जो खरोखरचा विचार आवश्यक आहे ,तो इथे दिसत नाही. प्रत्यक्षात या मंडळींच्या समस्या काय आहेत?प्रेक्षक प्रतिसाद किती आहे? कमी असल्यास का कमी आहे? त्यांच्यापुढे मार्ग कोणते? शहरी सिनेमा आणि ग्रामीण सिनेमा यांच्यात तफावत किती आणि का आहे? या उद्योगातल्या लोकांना काय परिस्थितीत जगावं लागतंय? त्यात काही राजकारण आहे का? कायदा या सा-यांकडे काय दृष्टीने पाहातो? हे सारं इथे दिसायला हवं होतं. आणखी एक गोंधळ म्हणजे चित्रपट कोणाच्या दृष्टिकोनातून सांगितला जातोय हा ! दृष्टीकोन चांदीचा की अविनाशचा? चांदीचा असेल तर मधेच पार्श्वसंगीतात इंग्रजी गाण्यांचा वापर का? चांदी एका बुडत्या उद्योगाची प्रतिनिधी मानली तर शेवट सुखांत कसा असू शकतो? आणि चित्रपट अविनाशच्या नजरेतून पाहायचा तर तो त्याच्या येण्यापासून सुरू हवा. त्याचा या सगळ्यांकडे आणि परिस्थितीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, त्याची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. इथला त्याच्या व्यक्तिरेखेने सुचवलेला मार्ग हा उद्योगाशी जोडलेला नसून व्यक्तिरेखांशी जोडलेला आहे. या प्रकारचा नायकाला 'नाईट इन ए शायनिंग आर्मर' करणारा शेवट कोणत्याही चित्रपटाचा असू शकतो. मग तो याच विषयावरल्या चित्रपटाचा का?
हे सारं स्पष्ट असून प्रेक्षका परीक्षकांपासून कधीकधी लपू शकतं ते चित्रपटाचं बाह्य रुप ,दृश्य रुप अचूक असल्याने. सारेच कलावंत आणि मुख्यत: सध्या डिजिटल छायाचित्रणाचा बेन्चमार्क बनलेल्या अमोल गोळेच्या कामाने चित्रपट एक ठाम लुक पकडतो, जो हे सारं अस्सल असल्याचा आभास निर्माण करायला काही अंशी जबाबदार आहे.
 वुडी अँलनच्या नावावरला पहिला चित्रपट 'व्हॉट्स अप, टायगर लिली?' (१९६६)या संदर्भात आठवावासा वाटतो. पाहिला नसल्यास जरुर बघा. त्यासाठी त्याने एक ( मोठ्या आवृत्तीत दोन) जेम्स बाँड छापाचा जपानी चित्रपट घेतला आणि तो पुनर्संकलित करुन त्यात काही प्रसंग वाढवून, संवाद पूर्णपणे वेगळे डब करुन त्याची नवी आवृत्ती केली. टुरींग टॉकीजचही खरं तर असच काही करायला हवं. त्याचा जमलेला दृश्य भाग आणि जमेल तितका अभिनय शाबूत ठेवून त्याचं प्रत्यक्ष कथानक, आशय आणि विचार असलेल्या नव्या आवृत्तीत रुपांतर करता आलं तर किती बरं होईल. एका अर्थी मग तो खरंच संकलकाचा सिनेमादेखील ठरेल.
- गणेश मतकरी

Read more...

आँब्लिव्हिअन- कधी जमणारा, कधी फसणारा

>> Sunday, April 14, 2013


मी सायन्स फिक्शनचा जुना फॅन आहे. केवळ चित्रपट नाही, तर पुस्तकांचादेखील, किंबहुना पुस्तकांचा थोडा अधिक,कारण ब-याचदा जर संकल्पना खरोखर गुंतागुंतीच्या असतील, किंवा कथानकाची विस्तृत मांडणी ही त्यामागचा विचार पोचवण्यासाठी आवश्यक असेल, तर आशय सिनेमात पुरेशा प्रभावीपणे उतरणं कठीण असतं. त्यामुळेच क्लार्क, अँसिमोव्ह, ग्रेग बेअर, लेम यांसारख्या संकल्पनांवर भर देणा-या मोठ्या लेखकांच्या कामातला अत्यल्प भाग पडद्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. संकल्पना उत्तम असताना पडद्यावर नियमितपणे येत राहाणारा लेखक म्हणजे फिलीप के डिक, पण त्याला या संकल्पनांइतकच कारणीभूत आहे ते त्याच्या पुस्तकांमधलं रहस्यमय, कारस्थानं आणि भ्रष्टाचाराने व्यापलेलं वातावरण. जे चित्रपटांसाठी उपयुक्त ठरु शकतं.
सर्वसाधारण लोकप्रिय विज्ञानपट हे संकल्पनांइतकंच महत्व प्रत्यक्ष घटना किंवा अँक्शन आणि  स्पेशल इफेक्ट्स सारख्या दृश्यात्मकतेत भर घालणा-या गोष्टी यांना देतात. टर्मिनेटर, टोटल रिकॉल,मेट्रिक्स , ट्वेल्व्ह मन्कीज  अशी या प्रकारची बरीचशी उदाहरणं आहेत. मात्र याचबरोबर इतरही काही प्रकार विज्ञानपटांत पाहायला मिळतात. २००१ : ए स्पेस ओडिसी सारखे चित्रपट हे व्यक्तिरेखांना दुय्यम ठेवत वैज्ञानिक संकल्पनांनाच महत्व देताना दिसतात, किंवा  प्रायमर, सोलरीस, मून यांसारखे व्यक्तिरेखा प्रधान विज्ञानपट अँक्शनला अनावश्यक मानत काही मूलभूत तत्वचिंतनात्मक मुद्द्यांना हात घालतात. या सा-यातला विशिष्ट दृष्टीकोन  बरोबर आहे असं मी म्हणणार नाही कारण या सा-याच प्रकारात यशस्वी आणि अयशस्वी ( केवळ आर्थिक दृष्टीने नाही) अशी दोन्ही वळणाची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकारांबद्दल एवढ्याचसाठी बोललो की जोसेफ कोजिन्स्कीचा ' आँब्लिव्हिअन' हे या सा-याच प्रकारांचं काहीसं अनिश्चित आणि कधी जमणारं तर कधी फसणारं मिश्रण आहे.
'आँब्लिव्हिअन' हा कोजिन्स्कीच्या अप्रकाशित ग्राफिक नॉव्हेलवर आधारीत असल्याचं सांगितलं जातं आणि तसा तो असेलही. मात्रं हे नॉव्हेल फारसं नव्या स्वतंत्र कल्पना न मांडता बराच भर रिसायकलिंग वर ठेवणारं असावं. कारण आँब्लिव्हिअन हा अनेक चित्रपटांच्या आठवणी जाग्या करतो. कुब्रिकचा २००१ : ए स्पेस ओडिसी हा तर विज्ञानपटांचा दृश्य संदर्भग्रंथ असल्यासारखा आहे आणि  त्याचा प्रभाव एकूण विज्ञानपटांवर सर्वत्र आहे. त्यामुळे इथेही तो असणं स्वाभाविक ,खरं तर अपेक्षित. मात्र इतर अनेक  प्रभाव ,उदाहरणार्थ टेरी जिलीअमचा ट्वेल्व्ह मन्कीज आणि तो ज्यावर आधारित आहे तो फ्रेन्च लघुपट ' ल जेटी' ,किंवा डन्कन जोन्सचा एक किंवा फारतर द्विपात्री म्हणण्यासारखा अन अाॅब्लिव्हिअन वर सर्वाधिक प्रभाव असणारा 'मून', सोडरबर्गच्या 'सोलरीस'मधलं वातावरण आणि सेटींग हे सारं इथे आहे. त्याखेरीज विज्ञान साहित्यात दिसणारे काही घटक ,जशी डिकच्या विज्ञानकथांमधली कारस्थानं, लेमचं तत्वज्ञान, क्लार्कची इमेजरी ,हे सारंच इथे उपस्थित आहे. या सा-या प्रभावांना चित्रपटाने बेमालूमपणे इन्टर्नलाईज केलय अस म्हणता येत नाही, त्यामुळे ब-याच अंशी त्यांचं असणं जाणवत राहातं , दिसत राहातं.
पृथ्वीचा विनाश वा मानवजातीने घेतलेला तिचा निरोप  हा गेली अनेक वर्षं विज्ञानपटांचा आवडता विषय आहे. लगेचच काही दिवसात येणा-या श्यामलनच्या 'आफ्टर अर्थ' मधेही अशीच मानवरहित पृथ्वी आहे. मात्र आँब्लिव्हिअन मधल्या पृथ्वीची अवस्था एकूणच अधिक बिकट आहे.  साठेक वर्षांपूर्वीच्या परग्रहवासीयांच्या हल्ल्यानंतर भग्नावशेष म्हणून उरलेला चंद्र, त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर आेढवलेल्या आपत्ती, लवकरंच आलेलं अणूयुध्द, या सगळ्यातून पृथ्वी राहाण्याच्या उपयोगाची उरलेली नाही. सार््या पृथ्वीवासीयांना इथून यापूर्वीच हलवून एका सुरक्षित ग्रहावर हलवलेलं आहे. जॅक हार्पर (टॉम क्रूज) आणि व्हिक्टोरिआ ( आंद्रेआ रीजबरो) ही जोडी पृथ्वीवर अजून कार्यरत असणार््या मोजक्या मानवी तंत्रज्ञांत मोडते आणि त्यांचा मुक्काम पृथ्वीच्या पृष्ठभागाहून कितीतरी उंचावर बांधलेल्या एका वसतिस्थानात आहे. पृथ्वीवर अजूनही काही परग्रहवासी शिल्लक आहेत आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरल्या मानवजातीने ठेवलेल्या यंत्रसामुग्रीला बंद पाडण्याचे त्यांचे कसोशीचे प्रयत्न आहेत.
जॅक मॅकॅनिक आहे आणि त्याचं काम पृथ्वीवरल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचं आहे, तर व्हिक्टोरीया वर बसल्या जागूनच त्या तांत्रिक मदत आणि सल्ला देते. तिच्या डोक्यावरल्या सॅलीला ,ती संगणकामार्फत सारं रिपोर्ट करते. एकदा जॅक एका यानाचा अपघात पाहातो आणि त्यातून जुलिआ (ओगा क्युरीलेन्को) या तरुणीची सुटका करतो. जॅक तिला ओळखत असतो, मात्र प्रत्यक्ष भेटीमधून नाही, तर त्याला वारंवार पडत असणा-या आठवणवजा स्वप्नांतून. या स्वप्नाचं स्पष्टीकरण जॅकला लवकरच मिळतं, पण ते खरं मानलं तर त्याच्या आयुष्याचा अर्थच बदलणार असतो.
मी हा जो सांगितलेला भाग आहे तो कथानकाच्या एक चतुर्थांश असेल-नसेल ,मात्र यापुढे काही सांगणं हे कथानक मुळातच सांगून टाकण्यासारखं होईल. तसाही, साय-फाय च्या नेहमीच्या प्रेक्षकाला मी सांगितलेल्या चित्रपटांच्या संदर्भावरुन अर्थ लागण्याची शक्यता आहेच. त्यामुळे अधिक कथानक सांगण्यात निश्चितच मुद्दा नाही. तरीही, चित्रपटाच्या एकूण रचनेवर बोलणं शक्य होईलच.
रिकामा ग्रह, अपरिचित वातावरण, मर्यादित पात्रं आणि तात्विक शक्यता असणारं संभाषण हे उघडच स्टॅनिस्लाव लेम च्या सोलरीसची पण शैलीत तारकोवस्कीपेक्षा सोडरबर्ग आवृत्तीची आठवण अधिक करुन देणारं आहे. चित्रपटात खूप गोष्टी घडण्याची शक्यता असली,तरी इथे त्यातल्या ब-याच गोष्टी या प्रत्यक्ष न दाखवता सुचवल्या जातात. उदाहरणार्थ पहिला ,युध्दाची हकीकत सांगणारा भाग केवळ निवेदनात आणि काही अंगावर शहारे आणणा-या दृश्यसंकल्पनांमधे येतो. प्रत्यक्ष युध्द दिसत नाही. ही शैली पुढे नियमच होऊन बसते आणि वेळ अँक्शनवर न घालवता पात्रांवर घालवण्याचा निर्णय चित्रपट घेतो. तेवढ्यापुरतं पाहायचं तर या निर्णयात ना काही चूक नाही, मात्र तसं करताना पात्रं पूर्ण तपशिलात रंगवण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर येऊन पडते, जे त्याला फार झेपत नाही. यामुळे अॅक्शनचा भाग फुटकळ आणि व्यक्तिचित्रण ढोबळ, वरवरचं असं दोन्ही पातळ्यांवर असमाधानकारक चित्र दिसायला लागतं. मग चित्रपट सावरण्याची जबाबदारी येते ती कथानकातली वळणं आणि आशयाची प्रगल्भता यांवर. या दोन ठिकाणी मात्र  आँब्लिव्हिअनची कामगिरी बरीच सुधारीत आहे.
त्यातला रहस्याचा भाग हा नवा नसला तरी बराच चांगला आहे आणि त्यातला सैध्दांतिक विचारही पटण्यासारखा आहे. व्यक्तिचं सत्व, प्रेम, वागण्यामागची भूमिका, सर्व्हायवल इन्स्टिन्क्ट अशा विविध विषयांवर तो वेळोवेळी बोलतो, जे अर्थपूर्ण आहे. तरीही  आँब्लिव्हिअनच्या  शेवटाबद्दल माझं फार बरं मत नाही. होतं काय, की एकदा आपल्याला काय घडलय आणि आपण कोणत्या दिशेने जातोय हे लक्षात आलं की खरं तर या चित्रपटातला मुद्दा संपतो. मग पारंपारीक संकेताला धरुन भल्या विरुध्द बु-याचा ,इथे तर खासच अशक्य वाटणारा संघर्ष घडवायचा आणि त्यात नायकाला जिंकवायचं हे काहीसं बाळबोध वळणाचं आहे. बहुधा हे करण्यामागे टॉम क्रूजची लोकप्रिय नायकाची प्रतिमा डोळ्यापुढे ठेवण्यात आली असावी. काही का असेना, हा शेवट चित्रपटाच्या एकूण विचारधारेशी 'आँब्लिव्हिअस' असल्यासारखा वाटतो, हे मात्र खरं.
माझ्याबरोबर चित्रपटाला उपस्थित प्रेक्षक हा कोजिन्स्कीच्या 'ट्रॉन: लेगसी' चा आणि 'टॉम क्रूजच्या 'मिशन ः इम्पॉसिबल' चा प्रेक्षक होता. त्यामुळे तो सतत अँक्शनच्या शोधात आणि ती हव्या त्या प्रमाणात न दिसल्याने फसगत झाल्याची भावना असलेला होता. (खरं तर हा एक नित्याचा प्रश्न आहे. चित्रपट काय सांगतोय हे न पाहाता आपल्या डोक्यातल्या गोष्टी त्यात शोधणा-या प्रेक्षकांचा. समीक्षकांमधे तर त्याचं प्रमाण खूपच अधिक आहे. ) त्यातून चित्रपट विज्ञानपट असल्याने या अँक्शनप्रिय प्रेक्षकाच्या अपेक्षा अधिक वाढलेल्या होत्या.  बराच वेळ नाराज असलेला हा वर्ग शेवटाकडच्या अनावश्यक पण परिचित अँक्शन दृश्यांनी थोडा खूश झाला. बाहेर पडताना चित्रपटाचा शेवट हा अशाच असमाधानी प्रेक्षकांसाठी आहे अशी मी माझ्या मनाची समजूत करुन घेतली. माझ्यासाठी खरं तर तो कितीतरी आधीच संपलेला होता.
- गणेश मतकरी

Read more...

खोपकरांची जोडचित्रं- कलाप्रांताचा अद्भुत मागोवा

>> Sunday, April 7, 2013


गेली अनेक वर्षं ,मराठी चित्रपटसमीक्षेत एकच पुस्तक अढळपद मिळवून आहे आणि ते म्हणजे अरुण खोपकरांचं 'गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका'. सामान्यतः समीक्षेच्या नावाखाली गोष्टी सांगणा-या, किंवा परकीय संकल्पनाच्या भाषांतरांना समीक्षा मानण्याच्या, किंवा कलाभ्यासापेक्षा चरित्रामधे रमण्याच्या  आपल्या प्रथेत न बसणारं ,काही नवीन सांगून पाहाणारं, निश्चित वैचारिक बैठक असणारं हे पुस्तक. पुढे खोपकर प्रत्यक्ष निर्मितीच्या कामात अडकल्याने त्यांनी ब-याच कालावधीत नव्या पुस्तकाचा विचार केला नाही, आणि या पुस्तकाची लोकप्रियता माहीत असतानाही सोप्या चित्रपटविषयक लिखाणाचे मार्ग उपलब्ध असल्याने या प्रांतातल्या इतरांनीही असा गंभीर समीक्षेचा मार्ग टाळला. आता अनेक वर्षांनी खोपकरांची दोन नवी पुस्तकं उपलब्ध झाली आहेत. चित्रव्यूह आणि चलत्-चित्रव्यूह. ही पुस्तकं पाहताच आपल्या लक्षात येतं,की गुरुदत्तचं यश ,त्याचा वेगळेपणा हा केवळ त्या पुस्तकाच्या विषयात नव्हता, तर तो लिहिणा-याच्या दृष्टिकोनात होता.
 चित्रव्यूह आणि चलत्-चित्रव्यूह ही  दोन्ही पुस्तकं अमूक वर्गात बसणारी आहेत असं छातीठोकपणे सागणं अवघड आहे, कारण हे विविध गद्यप्रकारांशी नातं सांगणारं लिखाण आहे. कोणी त्यांना ललित लेख म्हणू शकेल, कोणी व्यक्तिचित्रांचा संग्रह म्हणू शकेल किंवा कोणी आत्मचिंतनात्मक आणि आत्मचरित्रात्मक लिखाणही म्हणू शकेल. मात्र यातली कोणतीही कसोटी लावली तरीही यात एक गोष्ट निश्चितपणे आहे आणि ती म्हणजे कलाविषयक सखोल विचार. जर याप्रकारची वैचारिक बैठक हा लेखकाच्या व्यक्तिमत्वाचाच भाग असेल, तर त्याला त्या पध्दतीने व्यक्त होण्यासाठी विशिष्ट प्रकारचं लिखाण असण्याची गरज पडत नाही. विचार हा सहजपणे त्याच्या लिखाणाचा अविभाज्य भाग बनून येतो, मग ते कोणत्याही वर्गात बसणारं का असेना.
लेखक सुरुवातीलाच सांगून टाकतो की ही दोन पुस्तकं ही जोडचित्रांप्रमाणे आहेत. स्वतंत्रपणे संपूर्ण असली, तरी एकमेकांच्या संदर्भाने अधिक अर्थपूर्ण होणारी. एकमेकांच्या सान्निध्यात एका विशाल कलाविश्वाचं चित्र आपल्यापुढे रेखाटणारी. या पुस्तकांमागे असणारी व्यूहरचना चटकन लक्षात यायची, तर आपल्याला चित्रव्यूहातल्या पहिल्या प्रकरणाकडे, 'चित्रव्यूहप्रवेश' कडे वळावं लागेल. यात खोपकर एका अशा व्यक्तीचं वर्णन करतात, जी बोटीच्या कॅबिनमधे बसून, बाहेर डेकवर ठेवलेल्या अनेक आरशांमधे दिसणारी भवतालाची प्रतिबिंब पाहाते आहे. वाटेतल्या अनेक आरशांनी थेट काही बघण्यापासून तिची वाट अडवली आहे, त्यामुळे तिला दिसतात केवळ विविध प्रदेश, रंग, स्थलकाल, निसर्ग यांना वेगवेगळ्या रंग, आकार, कोन आणि विस्तारात दाखवणारी आरशातली अंशचित्र. एखादा किंचित क्षण पकडण्यापासून , आपल्या अस्तित्वावरच प्रगल्भ भाष्य करण्यापर्यंत विविध प्रकारची क्षमता असणारी. लेखक या संग्रहातल्या लेखांची तुलना या अशा अंशचित्रांशी करताे. अंशतम असून पूर्णचित्राकडे निर्देश करणा-या आणि त्याचवेळी स्वतःतही संपूर्ण असणा-या चित्रांशी.
लेखकाने उभी केलेली ही आरशात भवतालाचे तुकडे न्याहाळणा-या बोटीतल्या प्रवाशाची प्रतिमा, ही या लेखनाच्या आत्मचरीत्रपर असण्यावर शिक्कामोर्तब करणारी आहे आणि ती एकाच पुस्तकात येऊनही, काही प्रमाणात दोन्ही पुस्तकांच्या रचनेवर बोट ठेवणारी आहे.
चित्रव्यूह आणि चलत्-चित्र व्यूह या दोन्हीमधे जशी साम्य आहेत तसे फरकही आहेत. साम्य यासाठी ,की दोन्हीमधे प्रामुख्याने दिसतं ते लेखकाचं अनुभवविश्व.  त्याला भेटणारी माणसं . विविध प्रकारची.  पु लं देशपांडे , मामा वरेरकरांसारख्या साहित्यिकांपासून बारा भाषा येणा-या पानवाल्यापर्यंत आणि जहांगीर साबावाला, भूपेन खक्कर यांसारख्या मोठ्या चित्रकारांपासून ऋत्विक घटक, के के महाजन यांच्यासारख्या महत्वाच्या चित्रकर्मींपर्यंत. यात मांडला जाणारा विचार हा केवळ या व्यक्तिंनी मांडलेला विचार नसतो,तर लेखकापर्यंत पोचलेला , त्याला प्रभावित करुन त्यावर चिंतन करायला भाग पाडणारा विचार असतो. हे लेख या व्यक्तिंचा मोठेपणा त्यांच्या कारकिर्दीच्या पाढ्यामधून मांडत नाहीत, तर प्रत्यक्ष संपर्कात लेखकाला आलेली प्रचिती, ही या लेखांमागची खरी प्रेरणा आहे.
पुस्तकांमधला फरक आहे तो दोन्ही पुस्तकांसाठी वापरलेल्या फॉर्ममधून आलेला. चित्रव्यूह मधले लेख हे तुलनेने लहान स्वरुपाचे, घटनांकडे किंचित अंतरावरुन पाहाणारे आहेत. यात मांडल्या जाणार््या घटनांमधेही खोपकरांचं स्थान आहे पण ते प्रामुख्याने निरीक्षकाचं. ही निरीक्षणं विविध प्रकारची आहेत. लहानपणी  रेडिओसाठी बसवलेल्या पेंडशांच्या 'हत्या' कादंबरीवर आधारीत नभोनाट्य मालिकेत प्रमुख भूमिका करताना केलेल्या पु ल देशपांडेंच्या दिग्दर्शनशैलीच्या निरीक्षणापासून   ते सध्या रहात असणार््या एकविसाव्या मजल्याबाहेर बांधलेल्या परातीवर लटकून काम करणा-या रंगा-यांच्या एकमेकांशी होणा-या संवादांपर्यंत, अनेक काळात, परिस्थितीत, पार्श्वभूमीवर आणि देशांमधे केलेली ही निरीक्षणं आहेत. त्यात अनेक परिचित व्यक्ती आहेत, पण त्या व्यक्ती हा या लेखांचा उद्देश नाही. उद्देश आहे तो या व्यक्तींच्या सान्निध्यात लेखकाचं एक माणूस म्हणून घडत जाणं.
'चित्रव्यूह' मधे समाविष्ट लेखांमधे सरसकट सारी व्यक्तिचित्रं आहेत असंही नाही. त्यात ' तांबड्या विटांची शाळा' हा बालमोहनच्या सुरुवातीच्या दिवसांवरला लेख आहे, 'बेगम बर्वे' हा आळेकरांच्या नाटकाचं महत्व थोडक्यात उलगडून सांगणारा लेख आहे , 'व्हेनिस: तीन क्षण' सारखा लेखकाच्या जगप्रवासी वृत्तीशी संबंधित पण सर्गेई आईझेनश्टाईन या महान रशियन दिग्दर्शकापासून तत्वज्ञ प्लेटोपर्यंत आणि भारतीय तसंच युरोपिअन चित्रकलेपासून   इटालिअन आॅपेरापर्यंत अनेकानेक दिशाना पसरलेला लेख आहे, आणि खोपकरांना अतिशय प्रिय असलेल्या आणि मृत्यूनंतर भूपेन खक्करसारख्या महत्वाच्या भारतीय चित्रकाराचा कलाविषय बनण्याचं नशीब लाभलेल्या ( हा संदर्भ येतो तो मात्र चलत्- चित्रव्यूह मधल्या संत भूपेन या लेखात) त्यांच्या 'कोश्का' या मांजरीवरचा लेखही आहे.
मला खास आवडणारा 'बरखा ऋतू आयी' हा लेख , त्यांच्या फिल्मअँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधे १९७४ साली घडलेल्या  एका छोटेखानी प्रसंगावर बेतलेला, परंतु विषयाची मोठी व्याप्ती असणारा. इन्स्टिट्यूट मधल्या एका पावसाळी दुपारी खोपकरांना झालेली अमीर खांसाहेबांच्या एका मैफिलीची आठवण, आणि त्यानंतर त्यांच्या वसतीगृहातल्या छोट्या खोलीत जमलेली आणि केतन मेहता, सईद मिर्जा यांसारख्या नंतर नावारुपाला आलेल्या सहविद्यार्थ्यांचा श्रोत्यांमधे समावेश असणारी अजब संगीतसभा हाच या घटनेचा एेवज. या लेखात खोपकरांच्या शैलीची अनेक वैशिष्ट्य आहे. मुळात कथनावर असणारं नियंत्रण, थोडक्यात आणि अचूक शब्दांमधे स्थळकाळ उभा करण्याची त्यांची हातोटी,  कलेकडे पाहाण्याची दृष्टी आणि इतिहासाचा संदर्भ या काही गोष्टींचा उल्लेख खास करण्यासारखा. अखेर येणारा धक्का हा तसा अपरिचित, नेहमी न येणारा, पण लेखाचं कथामूल्य वाढवणारा.
या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने दिलेलं 'विषयांतर हा माझ्या योजनेचा भाग आहे' हे हिरोडटस या ग्रीक इतिहासकाराचं उधृत, यातल्या लेखांच्या रचनेवर थोडा प्रकाश टाकणारं आहे. इथे अनेक लेख हे विशिष्ट ठिकाणी सुरु झाले तरी अखेर पर्यंत त्याच मार्गावर राहात नाहीत. मधे एखादा छानसा फाटा लागला तर तिथे फेरफटका मारायला त्यांना गंमत वाटते. बालमोहन वरल्या लेखात, शाळेच्या नव्या इमारतीमुळे आेढवलेल्या आंब्याच्या मृत्यूविषयी बोलताना खोपकर  शहरात वाढीला लागलेल्या या निसर्गावर अत्याचार करण्याच्या वृत्तीवर सरकतात, लच्छू महाराज या कत्थक शैलीतल्या ज्येष्ठ कलाकारांविषयी बोलताना कत्थक शैलीचे विशेष आणि भारतीय चित्रकलेतल्या मिनिएचर्सवर विवेचन करतात, सुधीर पटवर्धनांच्या चित्रकलेविषयी बोलताना  रनेसान्स दरम्यान वा इम्प्रेशनिझम मुळे झालेला चित्रकलेचा विकास यावर भाष्य करतात. 'व्हेनिस :तीन क्षण' किंवा 'भाषावार प्रांतरचना ' ही तर विषयांची कोलाजेस असल्यासारखीच आहेत. हे सारं अपघात म्हणून होत नाही. कलावंत, विचारवंत आणि अभ्यासक हे जसजसे आपल्या विषयात पारंगत होतात, तसतशी त्यांची नजर आपोआप रुंदावत जाते. त्याना एक 'बिग पिक्चर' दिसायला लागतं ,जिथे सारं काही एकदुसर््याशी जोडलेलं आहे. त्यामुळे केवळ एका ठिकाणी अडकणं, हे दिसणार््या जागांकडे दुर्लक्ष करण्यासारखं, जबरदस्तीने साधलेलं ,कृत्रिम. ते टाळणं, हाच दृष्टीकोन अधिक योग्य, वाचकासमोर नव्या दिशा खुल्या करणारा, त्याच्या समजून घेण्याच्या क्षमतेला कमी न लेखणारा.
'चित्रव्यूह' मधे लेखकाची माणूस म्हणून जडण घडण दिसते असं म्हंटलं तर 'चलत्-चित्रव्यूह' मधे एक कलावंत म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून दिसते असं म्हणता येईल. त्याच्या नावातच चित्रपटाचा संदर्भ असल्याने, आणि अरुण खोपकरांचा सर्व कलांशी संबंध येऊनही त्यांचं व्यक्तिगत काम या कलेशी जोडलेलं असल्याने हे लेख अधिक 'हॅन्ड्स-आॅन' असणार हेदेखील उघड आहे. यातले अनुभव हे अधिक जवळून आलेले आहेत. लेखकाने चित्रपट क्षेत्रात केलेल्या कामाशी तर त्यांचा जवळून संबंध आहेच, वर त्यांना मिळालेली दिशा, त्यांनी स्वतंत्रपणे केलेला या क्षेत्राचा विचार आणि त्यांचा क्षेत्रातला प्रत्यक्ष सहभाग, हे सारं इथे एकत्र आलेलं आहे.
चलत्- चित्रव्यूहमधले लेखही लांबीने अधिक मोठेे, संबंधित व्यक्तिचा शोध पूर्ण करणारे आणि त्या त्या कलावंताविषयी काही नवीन देणारे आहेत. सामान्य वाचकाला यातले सारेच कलावंत/तंत्रज्ञ माहीत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे एका परीने त्याच्यासाठी हे एका वेगळ्या जगाचं दार खुलं करणारं आहे. ढोबळमानाने पाहिलं तर या पुस्तकाचा पूर्वार्ध हा खोपकरांनी केलेल्या कामाशी संबंधित व्यक्तिंविषयी आहे. यांत चित्रकार जहांगीर साबावाला आणि भूपेन खक्कर आहेत, जाहिरात क्षेत्रात मानाने नाव घेतले जाणारे ग्राफिक आर्टिस्ट र.कृ. जोशी आहेत, खोपकरांची इच्छा असून ज्यांच्यावर माहितीपट बनवता आला नाही असे जानेमाने तमाशा कलावंत दादू इंदूरीकर आहेत, कवी नारायण सुर्वे आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात खोपकरांच्या चित्रपटशिक्षणात अमूल्य सहाय्य झालेले आणि फिल्म इन्स्टिट्यूटशी जवळून संबंधित असणारे चित्रपट रसास्वादाचे प्रणेते सतीश बहादूर, संगीतकार आणि संगीत अभ्यासक भास्कर चंदावरकर आणि सत्यजित राय यांच्या तोडीचे दिग्दर्शक ॠत्विक घटक आहेत. त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळ्या शैलीतल्या कलात्मक चित्रपटांसाठी गाजलेले दिग्दर्शक मनी कौल आणि छायाचित्रकार के के महाजन आहेत. यातला दरेक लेख हा लेखकाच्या या व्यक्तीसंबंधातल्या निरीक्षणांनी त्यांच्या कलेचं, कलाविषयक विचाराचं चित्र उभा करतो तसंच या सगळ्यांचं माणूस म्हणूनही चित्र रंगवतो.
साबावालांच्या ,त्यांना 'प्रकाश दिसल्याच्या' क्षणानंतर त्यांच्या आंतरीक प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास किंवा भूपेन खक्करने चित्रांत प्रकाशाचा एक स्त्रोत वापरण्याएेवजी प्रत्येक कथनकेंद्राकरता वेगळा स्त्रोत वापरण्याची पध्दत जशी खोपकर नोंदवतात तशीच साबावालांची खानदानी पार्श्वभूमी आणि व्यवस्थितपणा,किंवा भूपेनच्या स्वभावातला साधेपणा आणि सेन्स आॅफ ह्यूमरही नोंदवतात. रकृंच्या कामातल्या सौदर्याबरोबरच ते या कामातून रकृंना मिळणार््या आनंदाची दखल घेतात. सुर्व्यांच्या भाषेवर, भास्कर चंदावरकरांच्या विद्यार्थ्यांबरोबरच्या संवादावर किंवा ॠत्विकदांच्या जगण्यात आणि कलेत दिसणा-या वेदनेवरचं त्यांचं भाष्य हे नुसतं कोरडं निरीक्षण नाही, तर या व्यक्तींना आतून ओळखल्याचा पुरावा आहे. या अंतर्बाह्य ओळखीच्या लेखनशैलीला अपवाद एक, तो म्हणजे ' खंड क्रमांक शून्य' हा विख्यात वास्तूविशारद चार्ल्स कोरिआंवरचा लेख. इथे आपल्यापर्यंत त्यांच्या वास्तूंची भव्यता, संकल्पनांमधली कल्पकता आणि एकूण कामाची थोरवी पोचते, पण व्यक्ती लपलेलीच राहते. वास्तूशास्त्रावर मराठीत अतिशय मर्यादित प्रमाणात लेखन झाल्याने, आणि कोरिआ हे निःसंशय आपल्याकडले सर्वात महत्वाचे वास्तुविशारद असल्याने या लेखालाही महत्व आहेच, मात्र इतर लेखांच्या तुलनेत याचं असं व्यक्तीपासून हातभर दूर राहाणं जाणवणारं आहे.
खोपकरांच्या पुस्तकातली भाषा वाचणं हा एक आनंददायी अनुभव आहे. उत्तम मराठीचा हा नमुना आहे. जशी ती कुठेही अवजड वा क्लिष्ट होत नाही तशीच ती बाळबोध वा इंग्रजी धार्जिणीही होत नाही. कलेसारख्या विषयाचा पुस्तकांमधे मोठा भाग असताना, आणि देशीविदेशी संदर्भांची रेलचेल असतानाही ती परिभाषेत अडकत नाही आणि वाचकाला उपदेश केल्याचा थाटही आणत नाही. किंबहुना त्यांच्या या भाषेवरल्या प्रभुत्वात आणि वेळोवेळी दिसणा-या आपल्या संस्कृतीवरल्या आदरमिश्रीत प्रेमातच त्यांनी जागोजागी व्यक्त केलेल्या मराठी संस्कृतीच्या दिवसेंदिवस होणा-या अवमूल्यनाबद्दलचा संताप दडलेला आहे.'मराठी भाषेला झालेल्या खोट्या खोट्या भावविवशतेच्या मृत्यूलाक्षणिक कर्करोगावर' उघड टिका करणा-या 'भाषावार प्रांतरचना' या लेखात हे खूपच स्पष्टपणे येतं ,पण इतरत्रही 'मराठी कवितेला एका उथळ सुबकपणाची सवय झाली आहे', किंवा 'आमच्याकडे सार्वजनिक कला आणि सार्वजनिक शौचालय, यात शौचालय परवडले अशी कला असते', यासारख्या उधृतातून हे असमाधान जाणवत राहातं. अर्थात हा असंतोष विचार करु शकणा-या ,करु पाहाणा-या आपल्यातल्या अनेकांमधे असेल, त्यावर उपाय मात्र सहजी सापडण्यासारखा नाही.
दृष्ट लागेलसा आशय , विकास गायतोंडे या जाहिरातक्षेत्रातल्या मोठ्या कलावंताने अत्यंत तपशिलात जाऊन केलेली मांडणी, आणि लोकवाड़मयगृहाने केलेल्या अतिशय देखण्या पुस्तक निर्मितीत ,मला थोडी तक्रार करायला एकच जागा सापडू शकते ,आणि ती म्हणजे छायाचित्रांचा अभाव. खासकरुन चित्रकला आणि चित्रपट या दोन दृश्यकला यातल्या ब-याच लेखांशी संबंधित असताना असलेला. हे उघड आहे, की खोपकर आणि गायतोंडे या दोघांनीही घेतलेल्या या छायाचित्र टाळण्याच्या निर्णयामागे काहीतरी निश्चित विचार असणार. कदाचित व्यक्तिगत अनुभवांप्रमाणे असणा-या पुस्तकात स्टॉक छायाचित्र जाणार नाहीत असं कारण असू शकतं, किंवा सर्व लेखांसाठी सारख्या प्रमाणात एका दर्जाची छायाचित्र उपलब्ध होऊ शकणार नाहीत ही काळजीही असेल, कदाचित आणखीही काही. असं असूनही मला वाटतं की छायाचित्रांची गरज होती. तशा जागा आहेत. ज्या आता रिकाम्या आहेत.
ही एक गोष्ट सोडता ही जोडचित्रं किंवा जोडपुस्तकं यावर्षीच्याच नाही तर एकूणच कलाविषयक विचार करणा-या  पुस्तकांमधे महत्वाची भर आहे, हे लख्ख आहे
-गणेश मतकरी
(महा अनुभव मासिकामधून)

Read more...

बोस - एक लुटुपुटीचा इतिहास

>> Monday, April 1, 2013
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे क्रांतिकारक सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रपटाबद्दल प्रेक्षकांना अमाप कुतूहल होते. श्याम बेनेगल यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाची ३५ कोटींची ती महान कलाकृती असणार होती. पण चित्रपट पाहून अनेकांचा अपेक्षाभंगच झाला होता. प्रत्येक भारतीयाच्या मनात काळाने निर्माण केलेली नेताजींची प्रतिमा आणि चित्रपटातील सुभाषचंद्र बोस यांच्यात एवढे अंतर कसे पडले? कथासूत्र, व्यक्तिचित्र, इतिहास आणि सिनेमाची भाषा यांचा वेध घेतलेला साप्ताहिक सकाळमधील हा लेख... 

मी काही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्राचा अभ्यासक नाही. इच्छा असूनही त्यांच्या आयुष्यावर विश्वास पाटील यांनी लिहिलेली महानायक कादंबरीही अजून मी वाचलेली नाही, तरी त्यांच्याबद्दल जुजबी माहिती जरूर आहे. पाठ्यपुस्तकातून आणि इतर थोड्याफार वाचनातून भेटलेल्या या नेत्याची प्रतिमा सर्वांपेक्षा भिन्न, वेगळ्या विचारांची कास धरणारी आणि प्रभावी आहे. इतर प्रस्थापित नेत्यांना, प्रत्यक्ष महात्मा गांधींसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाला तात्त्विक विरोध करून सुभाषबाबूंनी आपल्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला वेग आणून द्यायचा प्रयत्न केला. सामोपचाराची बोलणी बाजूला ठेवून थेट कृती करण्याची वेळ आली आहे, अशी त्यांची धारणा होती; मात्र ही कृती नियोजित असण्याची गरज त्यांनी जाणली होती. महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांना विरोध असणा-या देशांची मदत घेऊन उठाव घडवता आला, तर देश लवकर स्वतंत्र होईल, या मताचे ते होते. आपल्या विचारांना मान्यता न देणा-या काँग्रेसला न जुमानता त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडला. या कामासाठी त्यांनी जगभर प्रवास केला, अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर वाटाघाटी केल्या. आपले विचार त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि अखेरपर्यंत आपल्या मताशी ते ठाम राहिले. त्यांच्या वादळी आयुष्याइतकाच त्यांचा विमान अपघातात झालेला मृत्यूही रहस्यमय आणि विवाद्य ठरला.
त्यांच्याबद्दल असणा-या या माहितीतून सुभाषचंद्रांचे एक तेजस्वी पण काहीसे धुसर चित्र डोळ्यांसमोर तयार झालेले होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोसः द फरग़ॉटन हीरो हा चित्रपट, त्या चित्रात तपशील भरून ते स्पष्ट करेल, अशी अपेक्षा होती. तसे झाले मात्र नाही.
या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला १९३९ मध्ये घडणा-या एका प्रसंगात सुभाषबाबू आपल्या योजना गांधीजींसमोर मांडताना दिसतात. गांधीजी त्यांना आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करतात आणि सुभाषबाबूंना सांगतात की, त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे. यावर प्रेक्षक म्हणून आपली अपेक्षा अशी होते की यानंतरच्या प्रसंगांमधून सुभाषबाबूंची विचारसरणी आपल्यासमोर उभी राहील आणि त्यांचे मनसुबे पूर्ण झाले नसले, तरीही त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने होत होते, आणि अंतिमतः त्यांनी निवडलेला मार्ग योग्यच होता, हे उघड होईल. प्रत्यक्षात मात्र चित्रपट संपताना आपण गांधीजींच्या विचारांशी सहमत झालेले असतो.
बोसमध्ये आपल्याला नायकाच्या आयुष्याची शेवटची, सुमारे पाच-एक वर्षे दाखविली जातात. ही वर्षे सुभाषबाबूंच्या कारकिर्दीतील महत्त्वाची वर्षे असली आणि त्यात बरीच अँक्शन असली, तरीही त्यांना पूर्णपणे समजून घ्यायला ती पुरेशी वाटत नाहीत. त्यांचा चळवळीतील इतर नेत्यांना विरोध असल्याचे आपल्याला सांगितले जाते; पण तो का, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे चित्रपट पार्श्वभूमी तयार न करता, मध्येच सुरू झाल्यासारखा वाटतो. त्याबरोबरच पुढील चित्रपटही जवळपास प्रवासवर्णनासारखा बोस कुठे जाऊन कोणाकोणाला भेटले याची जंत्री सांगत असल्याने या भागातही त्यांच्या विचारांमागची तात्त्विक बैठक आपल्यासमोर तयार होऊ शकत नाही. इथला कथाभाग १९३९च्या पुढला असला तरी त्याआधी जवळजवळ वीस-एक वर्षे सुभाषबाबू चळवळीत होते. उत्तम शिक्षण घेऊनही सरकारी सेवा त्यांनी नाकारली आणि स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतले ( याचा पुसट उल्लेख चित्रपटात आहे.) त्यानंतर पुढली अनेक वर्षे ते गांधीजी, नेहरुंसारख्या लोकप्रिय नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. त्यामुळेच एकेकाळी त्यांच्याच मताच्या असणा-या या तरुणाला पुढे काँग्रेसची विचारप्रणाली कमकुवत का वाटायला लागली आणि त्याचा परिणाम पुढे त्याने वेगळा मार्ग निवडण्यात का झाला, हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. आपल्याला दिसणा-या घटनाचक्राच्या मुळाशी असणा-या या प्रश्नांची उत्तरे पटकथा शोधतच नसल्याने आपल्याला ब-याचदा सुभाषबाबूंच्या वागण्याची तर्कसंगतीच लागू शकत नाही. याउलट क्वचित त्यांच्या बोलण्यात येणारे भूतकाळाचे उल्लेख प्रेक्षकाला माहिती पुरवण्यापेक्षा संभ्रमात अधिक टाकताना दिसतात.
चित्रपटाच्या नावातच जरी समाजाला सुभाषबाबूंचा विसर पडल्याचे सूचित केले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची एक प्रतिमा सामान्य प्रेक्षकाच्या नजरेत निश्चित आहे. ही प्रतिमा एखाद्या सेनापतीची आहे. त्यामुळे दुरदृष्टी, योजनाबद्ध हालचाल, पूर्ण तयारीनिशी पाऊल उचलणे यांसारखे गुणविशेष या प्रतिमेशीच निगडित आहेत. या चित्रपटात मात्र हे गुण अभावानेच पाहायला मिळतात. दुरदृष्टी आणि योजनाबद्धता तर सोडाच, इथे चित्रित केलेला सुभाषबाबूंचा स्वभाव, हा `काय होईल, ते नंतर पाहून घेऊ या` पठडीतला दिसतो. दोन-तीन स्वतंत्र प्रसंगांमध्ये त्यांच्या तोंडून `जो होगा देखा जाएगा` ही ओळ ऐकू येते. त्याखेरीज एका गाण्यातही ती ऐकायला मिळते. जो होगा देखा जाएगा, हे वाक्य नायकाने एका प्रसंगी म्हणणे हे आपण समजू शकतो. किंबहुना ती त्याच्या निडरपणाचीच खूण ठरेल. पण इथला त्या ओळीचा सततचा वापर हा ती नायकाची स्ट्रॅटेजी असल्याप्रमाणे भासतो. आपल्या वागणुकीच्या परिणामाची अनिश्चितता नायकाला जाणवते आहे, अशी शंका वाटायला लागते आणि कथाभागातील तपशीलही तेच दाखवितात.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात इंग्रजांनी सुभाषबाबूंना (सचिन खेडेकर) नजरकैदेत टाकलेले दिसते. त्यांचा स्वतःचा विचार असतो, तो या पहा-यातून पलायन करण्याचा आणि रशियाची मदत मिळविण्याकरिता मॉस्को गाठण्याचा; पण प्रत्यक्षात त्यांची तयारी एक दाढी वाढविण्यापलीकडे काहीच दिसत नाही. (इतर हिंदी चित्रपटांप्रमाणेच दाढी वाढविणे ही वेशांतराची परिसीमा असल्याचे या चित्रपटातील सुभाषबाबूंनाही वाटत असावे.) पुढे पोलिसांच्या अत्यंत मूर्खपणाने आणि इंग्रजांनीही जातीने लक्ष न पुरविल्याने सुभाषबाबू पळ काढतात.पण त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या सहका-यांनी मॉस्कोशी प्रत्यक्ष संपर्क साधलेला नसतो. त्यांच्या पठाण सहका-याबरोबर (राजपाल यादव) ते भारताबाहेर पडून काबूलला पोहोचतात; पण तिथेही रशियन वकिलातीशी संपर्क साधता येत नाही. मग रशिया नाही तर नाही; म्हणून ते जर्मनीशीच संपर्क साधतात. आता मला सांगा, रशिया आणि जर्मनी या शक्ती मुळातच एकमेकांच्या विरोधी प्रवृत्त्या असणा-या, त्यातून जर्मनीचा नेता हुकूमशहा हिटलर. बरे हिटलर किती धोकादायक आहे, हे सुभाषबाबूंच्या लक्षात आले नसणेही शक्य नाही; कारण दुस-या महायुद्धातील त्याच्या धोरणावरून, त्याच्या हेतूबद्दल शंका घ्यायला जागा तयार होते. त्याचबरोबर आपल्या माइन काम्फमध्ये त्याने काढलेल्या भारतविरोधी उदगाराची सुभाषबाबूंना चांगलीच माहिती असते ( तिच्या जोरावर ते हिटलरला चार शब्द सुनावतातदेखील) मग या परिस्थितीत केवळ जर्मन वकिलातीत घुसणे सोपे आहे, हे त्यांच्याशी हात मिळविण्याचे कारण होऊ शकते का?
बरे, यानंतरही वरवर संगती न लागणा-या गोष्टी करणे चालूच राहिलेले दिसते. मग जर्मनीतील युद्धकैद्यांना मुक्त करून आझाद हिंद सेना काढली जाते. जिला युद्धाच्या धुमश्चक्रीत जर्मनीतून बाहेरदेखील पडता येत नाही आणि पर्ल हार्बरसारख्या भयानक घटनेनंतर लगेचच, या घटनेत आपल्या योजनाबद्घ क्रौयाचे प्रदर्शन करणा-या जपानचे सहकार्य मागितले जाते.
माझा सुभाषबाबूंच्या चरित्राचा अभ्यास नसल्याचे मागे सांगितले ते एवढ्यासाठीच, की प्रत्यक्षात त्यांच्या आय़ुष्यात काही प्रेरणा असतीलही ( उदा. १९३३ ते १९३६ मधल्या त्यांच्या युरोपातील वास्तव्यात अनेक नेते आणि विद्वानांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या, ज्यांनी त्यांना पटवले होते, की परकी सत्तेची मदत घेतल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही.) किंवा त्यांच्या विशिष्ट प्रकारचे निर्णय घेण्यामागे काही कारणे असतील; पण चित्रपटात ती स्पष्ट होत नाहीत. अशा खटकणा-या प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना पडणारे प्रश्न एखाद्या व्यक्तिरेखेच्या तोंडून आले असते, तर सुभाषबाबूंना त्यांचा दृष्टिकोन सहज मांडता आला असता, पण चित्रकर्त्यांना तशी गरज वाटलेली दिसत नाही. याचा परिणाम असा होतो की चित्रपटात जे दिसते त्यावरून आपला सुभाषबाबूंबद्दलच आदर वाढायला मदत होत नाही. या उलट चुकीच्या लोकांशी हातमिळवणी, योजनाबद्धतेचा अभाव, गोंधळाची विचारसरणी, स्वतःच्या शक्तीचा अंदाज न घेता घेतलेले निर्णय, यांसारख्या अनेक घटकांतून हा चित्रपट सुभाषबाबूंची जनमानसातील चांगली प्रतिमा डागाळेल की काय अशी शंका मनात यायला लागते.
चित्रपटाचा शेवटही एका परीने विचित्र वाटतो. एकदा भारताबाहेर गेलेले सुभाषबाबू नंतर पुनरागमन करूच शकत नाहीत. आझाद हिंद सेना जर्मनीतच राहते आणि रासबिहारी घोष यांच्या इंडियन नॅशनल आर्मीचाही प्रभाव बेताचाच असतो. त्यामुळे ते स्वतः, सेना किंवा INA यांची सुभाषबाबूंच्या कथित मृत्यूपर्यंत स्वातंत्र्यलढ्याला थेट मदत झालेली दिसत नाही. सुभाषचंद्र बोसांचे विमान कोसळल्याची खबर येऊन गेल्यानंतरच्या मोजक्या प्रसंगांमधल्या एकात इंग्रजांमधील एक संभाषण ऐकायला मिळते. त्यात एकजण दुस-याला म्हणतो की किंवा INAला भारतीयांचा वाढता पाठिंबा आहे, म्हणजे आता आपले दिवस बहुधा संपुष्टात येणार. लगेचच पुढल्या प्रसंगात ब्रिटिश गेल्याचा उल्लेख येतो आणि निवेदन सुचवते की सुभाषबाबूंचे सैन्य नसते, तर स्वातंत्र्य मिळायला उशीर लागला असता. आता हे काही आपल्या फार पचनी पडत नाही. हे मान्य, की ही फौज इम्फाळमार्गे भारतात घुसली होती, पण जपान्यांनी माघार घेतल्यावर त्यांनाही परत फिरावे लागले होते. मग त्यांनी अशी काय भरगच्च कामगिरी केली, की ज्याने ब्रिटिशांना दहशत बसावी? आणि काँग्रेसचे जे इतर नेते स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्त्व शांततापूर्ण मार्गाने करत होते त्यांचे काय ? या विजयात त्यांचा वाटा किती ?
माझा असा अंदाज आहे, की चित्रपटात हे दोन सकारात्मक प्रसंग मुद्दाम घातले गेले असावेत, काऱण तोपर्यंतच्या चित्रपटाचा एकूण प्रभाव हा इतका नकारात्मक आहे, की चित्रपट सुभाषबाबूंच्या विरोधात असल्याचे बोलले गेले असते आणि अर्थातच वादांना तोंड फुटले असते. ते सगळे टाळण्यासाठी ही उपाययोजना असावी, शेवटच्या क्षणी करण्यात आलेली.
आपल्याकडल्या या प्रकारच्या चरित्रपटांची शोकांतिका ही आहे की, त्या सर्वांची तुलना रिचर्ड अँटनबरो यांच्या गांधी चित्रपटाशी होते आणि त्यात ते हमखास कमी पडतात. आंबेडकर, पटेल, सावरकर आणि आता बोस य़ांच्या गुणवत्तेत फरक असेल, पण अंतिम तुलनेत ते सर्वच गांधींपुढे फिके वाटतात. गांधींमध्ये असे काय होते जे या इतर चित्रपटांमध्ये नाही, तर अनेक गोष्टी; पण प्रामुख्याने दोन !  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानायकाचा मानवी चेहरा. या प्रकारच्या मोठ्या आवाक्याच्या आणि इतिहासातील मान्यवर व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपटाशी संबंधित हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा चित्रपटांची पटकथा करताना खूप अभ्यास केल्याचे आपण ऐकतो; पण प्रामुख्याने हा अभ्यास असतो तो त्या नायकाच्या कर्तृ्त्त्वाचा. त्याने अमुक अमुक गोष्टी केल्या, याची यादी तयार केली जाते आणि त्यातल्या शक्य तितक्या गोष्टी पटकथेत दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. पण माणूस म्हणजे केवळ कर्तृत्त्व नव्हे. जोपर्यंत त्याची ओळख एक माणूस म्हणून होत नाही, त्याची व्यक्तिगत जीवनपद्धती, त्याचे गुण-अवगुण, त्याचे आप्तांशी संबंध, त्याच्या भावभावना या सर्वांना जोवर पडद्यावर स्थान मिळत नाही, तोपर्यंत ही ओळख पूर्ण होऊ शकत नाही. अँटनबरोच्या चित्रपटात हा कर्तृत्त्व आणि वैयक्तिक चेहरा यातला तोल जमलेला होता. गांधींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण तर यात होतेच. पण कस्तुरबा,गांधीजींचे स्नेही, विदेशी पत्रकार यांच्याबरोबर असणा-या लहान-मोठ्या प्रसंगांतून आपल्याला गांधीजींची संपूर्ण ओळख झाली. त्यामुळे मग प्रेक्षक हा केवळ इतिहासाच्या पानांचा साक्षीदार ठरला नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी पूर्णतः समरस होऊ शकला. याचे श्रेय दिग्दर्शकाला जाते, ते त्याच्या दृष्टिकोनामुळे आणि पटकथाकाराला त्यांच्या तपशिलाच्या निवडीमुळे.
बोससाठी करण्यात आलेला अभ्यास सुभाषबाबूंच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा नसून, केवळ त्यांच्या कारकीर्दीतल्या, अमुक कालावधीतल्या घटनांचा आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या या घटनेनंतर ती घटना घडली हे कळते; पण मुळातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला तिसरी मिती येऊ शकत नाही. हा दोष प्रामुख्याने आहे, तो शमा झैदी आणि अतुल तिवारी यांच्या पटकथेचा; पण श्याम बेनेगल यांच्यासारखे ज्येष्ठ दिग्दर्शक या चित्रपटाशी संबंधित असताना त्यांनी पटकथाकारांवर अंकुश ठेवण्याची गरज होती. त्यामुळे त्यातल्या त्रुटी सुधारण्याची शक्यता होती.
गांधीमध्ये जमलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळाचे आणि चळवळीचे हुबेहुब चित्रण. य़ातले अनेक प्रसंग आठवले, तर आपल्या लक्षात येते की त्यांचा परिणाम हा अक्षऱशः  इतिहास जिवंत झाल्याप्रमाणे होता. गांधी हत्येच्या दिवशी उसळलेली गर्दी, जालियनवाला बाग हत्याकांड, फाळणीच्या आधी गांधीजी उपोषणाला बसतात तो प्रसंग यांसारख्या ठिकाणी प्रमुख व्यक्तिरेखा आणि जनसमुदाय यांचा करण्यात आलेला अचूक वापर आपल्याला संपूर्ण अकृत्रिम अनुभव देणारा ठरला. आपल्याकडल्या चरित्रपटांमध्ये या अनुभवाचा खरेपणा हा कमी जास्त ठरलेला दिसतो. याचे प्रमाण त्यातल्या त्यात अधिक होते ते सरदारमध्ये. बोसमध्ये मात्र ते चिंताजनक वाटण्याइतके कमी आहे. इथले अनेक प्रसंग हे व्यावसायिक हिंदी चित्रपटांहूनही कमी प्रभावी वाटतात आणि लुटुपुटीचे.
उदाहरणार्थ या चित्रपटात जेव्हा जेव्हा नोकर किंवा ड्रायव्हर्सची पात्रे दिसतात, तेव्हा ती हमखास ब्रिटिशांची हेर असतात. त्यातून ही हेरगिरीगदेखील ते इतक्या उघडपणे करतात, की ती हास्यास्पद ठरावी. इथले इंग्रजांचे प्रसंग हे त्यांनी नेमून दिलेल्या त्याच नेपथ्यावर घडणारे, एकसुरी आहेत. इथे अज्ञातवासातील बोस यांना मोठमोठ्य़ाने सुभाषबाबू म्हणून हाका मारणारे सहकारी आहेत, काबूलच्या रस्त्यावर केलेला अत्यंत बाळबोध पाठलाग आहे, हिटलरला उपदेश करणारे सुभाषबाबू, चुटकीसरशी जर्मनीतील भारतीय युद्धकैद्यांचे होणारे मतपरिवर्तन, पर्ल हार्बरचा विध्वंस सस्मित मुद्रेने जपान्यांबरोबर बसून पाहणारे सुभाषबाबू... या प्रसंगांना काय म्हणावे हेच कळत नाही. हे सर्व कमी म्हणून की काय पार्श्वभूमीला मोठमोठ्याने चालणारी गाणी आपल्याला पडद्यावर लक्ष केंद्रितच करू देत नाहीत. चित्रपटाच्या उत्तरार्धातील आयएनएची कामगिरी जितकी निराशाजनक आहे, त्याहून किती तरी अधिक निराशाजनक आहे, ती या युद्धप्रसंगांच्या चित्रिकरणातील दिग्दर्शकाची आणि छायाचित्रकाराची कामगिरी. एका नदी किना-यावर ब्रिटिश सैन्याशी आयएनएने दिलेल्या टकरीचे कौतुक ब्रिटिश अधिकारी करताना दिसतात. पण प्रत्यक्षात या सैनिकांच्या कामगिरीत विस्कळितपणा एवढीच गोष्ट दिसून येते. यापेक्षा कितीतरी दर्जेदार युद्धचित्रण त्यावेळी प्रदर्शित झालेल्या टँगो- चार्लीसारख्या कमी गंभीर प्रयत्नांतही पाहायला मिळते.
स्पेशल इफेक्ट्सचा वापर हा परिणामकारक तेव्हाच समजला जातो, जेव्हा तो वापर केल्याचे पाहणा-याच्या लक्षात येत नाही. बोसमध्ये हा वापर उघड आहे. यू बोटीने शत्रूची बोट उडविण्याच्या प्रसंगात ही मॉ़डेलमधील बोट आहे, हे ज्वालांच्या प्रमाणावरून सहज लक्षात येऊ शकते. त्याचबरोबर युद्धप्रसंगातील आगी संगणकीय आहेत, हे समजण्यासाठीही कुणा तज्ज्ञाची गरज नाही. हे स्पेशल इफेक्ट्स त्या मानाने क्षुल्लक आहेत आणि इतर देशांमध्ये ते वर्षोनुवर्षे यशस्वीपणे वापरले जात असल्याची उदाहरणे आहेत. आपल्याकडे इतक्या मोठ्या विषयावरच्या आणि ब-यापैकी बजेट असणा-या चित्रपटातही ते जर योग्य रीतीने वापरता येणार नसतील, तर ही चिंतेची बाब आहे. या प्रकारची दर्जाहीन चमत्कृती दाखविण्यापेक्षा हे प्रसंग पूर्णपणे वगळता आले असते, तर कदाचित बरे झाले असते.
जेव्हा सुभाषबाबूंसारख्या महत्त्वाच्या नेतृत्त्वाबद्दल चित्रपट काही सांगतो, तेव्हा तो त्यांच्या बाजूने वा विरोधात काही ठाम विधान करील अशी अपेक्षा तयार होते. जेव्हा तो ती करू शकत नाही आणि केवळ घटनांचा पाढा वाचतो, तोही गुळमुळीतपणे, तेव्हा त्या चित्रपटाच्या प्रयोजनाविषयी शंका घ्यायला जागा तयार होते. बोसला सुभाषबाबूंविषयी काहीच सांगायचे नाही. बाजूने तर नाहीच नाही, पण विरोधात आहे तेदेखील बहुदा सत्याच्या विपर्यासाने. मग बोसच्या निर्मितीमागे प्रयोजन काय? आपल्याला विसर पडत चाललेल्या एका मोठ्या नेत्याची आठवण जागवायचा हा प्रयत्न आहे, असे गृहित धरले तर तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि वागण्यातील दोषच पुढे आणताना दिसतो; पण मग आपण सत्य नक्की कोणते मानायचे? इतिहासाच्या पुस्तकातून शिकविले जाणारे झुंजार बोस खरे, की बेनेगल यांच्या चित्रपटातील कोणत्याही ठाम योजनेविना चाचपडणारे बोस खरे?
घटनांच्या सत्यासत्यतेबद्दलही चित्रपट कोणतीही भूमिका घेणे टाळतो. त्याच्या सुरुवातीलाच एक सूचना दाखविली जाते.हा काल्पनिक चित्रपट ऐतिहासिक सत्यांवर आधारित आहे, असा तिचा गोषवारा असतो; पण म्हणजे नक्की काय?
ऐतिहासिक सत्यावर बेतलेला चित्रपट काल्पनिक असू शकतो, जर ही सत्ये केवळ आधारासाठी वापरलेली असली, तरी संपूर्ण चित्रपटात जर सत्य घटनांची रेलचेल असेल, तर त्यातला काल्पनिक भाग कुठला म्हणायचा? सुभाषबाबूंच्या वागण्याचा चित्रकर्त्यांनी लावलेला अर्थ हा तर तो काल्पनिक भाग नव्हे? का ही सूचना म्हणजे केवळ सर्व वादातून सुटण्याची सोपी पळवाट आहे?
बोसला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम नव्हता हे जाहीर आहे. बहुतेक वेळा अशा परिस्थितीत दोन ठिकाणी अपयशाचे खापर फुटते. एक म्हणजे प्रेक्षकांच्या माथी, तर दुसरे वितरकांच्या. प्रेक्षकांना अशा चित्रपटाचे महत्त्व कळत नाही, तो केवळ करमणुकप्रधान चित्रपटांच्या मागे धावतो, असे म्हटले किंवा वितरकांनी तो प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचेल याची काळजी घेतली नाही असे म्हटले की चित्रकर्त्यांची जबाबदारी संपली. बोसच्या बाबतीत वितरणातल्या त्रुटींचा मुद्दा काहीसा योग्य आहे. पण प्रेक्षकांना दोष देण्याआधी स्वतंत्रपणे चित्रपटाच्या गुणवत्तेचा विचार व्हायला हवा. गांधी देखील चरित्रपटच होता. त्याला पाहायला लोकांनी तुफान गर्दी केलीच ना? आणि प्रेक्षक मुळात चित्रपटगृहात येतो की नाही, इथपर्यंत वितरणाचा संबंध, पण एकदा का तो चित्रपटगृहात पोहोचला की मग त्याचा चित्रपटाला प्रतिसाद कसा आहे ते पाहण महत्त्वाचे. बोसच्या चित्रकर्त्यांनी एकदा चित्रपटगृहात सामान्य प्रेक्षकांबरोबर चित्रपट पाहिला असता तर त्यांना यशापयशाची कारणे देण्याची गरज पडली नसती.
बोस संपताना श्रेयनामावलीच्या दरम्यान आपल्याला प्रत्यक्ष सुभाषबाबूंचे थोडे फुटेज दाखविले जाते. या ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या प्रामुख्याने न्यूजरील फूटेजमध्ये आणि फोटोमध्ये जो जोरकसपणा आहे, तो या चित्रपटात कुठेही येऊ नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या सुभाषबाबूंच्या चेह-यावर चित्रपटातल्या सारखे प्रत्येक प्रसंगात दिसणारे बेगडी स्मित नाही, तर कठोर कर्तव्यबुद्धी आणि आत्मविश्वास आहे. या थोड्या फूटेजच्या निमित्ताने तरी आपली ख-या सुभाषबाबूंशी भेट होते, मग ती काही क्षणांपुरती का होईना. संपूर्ण चित्रपटापेक्षा हे मोजके क्षणच आपल्याला बरेच काही सांगून जातात.
आपल्या देशाच्या इतिहासाशी खरेखुरे नाते सांगणारा केवळ एवढाच भाग या चित्रपटात पाहायला मिळतो.
- गणेश मतकरी  

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP