सिस्टर- परका आणि आपला
>> Sunday, December 30, 2012
यंदाच्या बर्लिन महोत्सवात पुरस्कारप्राप्त ठरलेला उर्सुला मायर दिग्दर्शित चित्रपट 'सिस्टर' पाहाताना मला सर्वात इन्टरेस्टिंग वाटली ती त्यातल्या रहस्याची हाताळणी. चित्रपट रहस्यपटांच्या जातकुळीचा नसून सामाजिक आहे. जगभरात आढळणा-या वर्गभेद , खालच्या स्तरातल्या नागरिकांचं असुरक्षित राहणीमान यांसारख्या समस्या ,हे या चित्रपटाचं मूळ आहे. असं असतानाही ,या चित्रपटाच्या केंद्रस्थानी ,त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या सामाजिक अस्तित्वाशी जोडलेलं ,पण एक मोठंच रहस्य आहे. आता एकदा का हे रहस्य गृहीत धरलं की नवाच प्रश्न तयार होतो. रहस्य जर शेवटपर्यंत टिकवलं, तर चित्रपट कदाचित त्यातल्या रहस्यासाठी नावाजला जाईल, मात्र तो ज्या समस्यांकडे प्रेक्षकाचं लक्ष वेधू पाहातो आहे, त्या विसरल्या जाणार हे नक्की. आणि याउलट ते रहस्य जर आधीच उलगडून टाकलं, तर पटकथेत दिसत असणार््या शक्यता न वापरल्याचं पाप . अशा परिस्थितीत चित्रकर्ते कोणता निर्णय घेतील यावर चित्रपटाचा अंतिम परिणाम ठरणार हे स्पष्ट आहे. सिस्टरने यावर काढलेला तोडगा हा पाहाण्यासारखा आहे.
सिस्टर हे रहस्य शेवटापर्यंत ताणत नाही ,किंबहुना त्याच्या विदारक वास्तव पार्श्वभूमीमुळे ही रहस्याची जागाच ते उघड होईपर्यंत आपल्यापासून लपलेली राहाते. ते कळताच आपल्याला धक्का बसतो ,मात्र चित्रपट त्या धक्क्यावर अधिक रेंगाळत नाही. प्रेक्षकांपुढे आलेली नवी माहीती लक्षात घेऊन तो चित्रपटातलं नाट्य अधिक गहिरं करत नेतो. रहस्य टिकवण्याच्या प्रयत्नात ज्या जागा हातून सुटल्या असत्या त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रीत करत ,तो आशयाचं गांभीर्य अधोरेखित करत जातो.
चित्रपट घडतो ,तो प्रामुख्याने दोन ठिकाणी. श्रीमंत टुरिस्टांनी गजबजलेला बर्फाच्छादित डोंगरमाथ्यावरला एक प्रशस्त स्की रिजॉर्ट आणि त्याच्या पायथ्याशी असणारी कनिष्ठ वर्गाची वस्ती. ही दोन टोकं ,त्यांच्या भौगोलिक रचनेप्रमाणेच समाजाच्या अत्युच्च आणि तळागाळातल्या वर्गांमधे विभागलेली. चित्रपटाचा नायक सिमाॅन (केसी मोटेट क्लाईन) हा बारा वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीबरोबर, लुईस( ले सिडो) बरोबर कनिष्ठ वस्तीतल्या एका इमारतीतल्या छोट्याशा ( म्हणजे त्यांच्या स्टँडर्डने छोट्याशा ) घरात राहातो. लुईस मोठी असून अत्यंत बेजबाबदार आहे. अनेकांशी संबंध ठेवणं, कोणतीही नोकरी न टिकवणं ,जबाबदारीची जाणीव नसणं अशा अनेक वाईट सवयी तिला आहेत. साहजिकच भावाकडे आणि घराकडे तर तिचं लक्ष नाहीच . साहजिकच अशा परिस्थितीत सिमॉनलाच काहीतरी हालचाल करावी लागते. तो या परिस्थितीवर उपाय काढतो तो चोर््या करण्याचा. आणि या चो-या करण्यासाठी स्की रिजॉर्ट इतकी उत्तम जागा दुसरी कुठली?
'सिस्टर' मधल्या घटना या एका स्की सीझनच्या काळात घडणा-या आहेत. म्हणजे नुकताच सीझन सुरू होऊन प्रवाशांच्या वर्दळीत सिमॉनला आलेले सुगीचे दिवस आपल्याला सुरूवातीला दिसतात. दिवस अर्थात कायम सुगीचे राहात नाहीत ,आणि एका बंदीस्त जागेत ,त्याच त्या लोकांच्या़ सान्निध्यात कोणालाही जितक्या अडचणी येऊ शकतात तेवढ्या सिमॉनला येतात. कथा पुढे सरकते ती या अडचणींच्या सहाय्याने, वेळोवेळी सिमॉनचं रिजॉर्टवरलं आणि घरातलं आयुष्य प्रत्येक टप्प्यावर दाखवत. चित्रपट संपतो तो किंचित सकारात्मक वळणार . तो इतका आमुलाग्र बदल दाखवत नाही जो या विजोड जोडीचं आयुष्य मार्गाला लावेल, पण या दोघांच्या नात्यामधे तो एक नवीन जान फुंकतो हे नि्श्चित.
कथानकाच्या स्वरुपावरूनच लक्षात येईल की ते एपिसोडीक असावं, आणि तसं ते आहेच. एखाद्या घटनेवर फोकस ठेवून तणाव चढवत न नेता चित्रपट मोठ्या कालावधीत घडणा-या अनेक घटना आणतो. सिमॉनच्या पैसे मिळवण्याच्या युक्त्या, त्याचा हजरजबाबीपणा आणि चातुर्य, त्याला भेटणारी -त्याच्याकडे वेगवेगळ्या नजरांनी पाहाणारी विविध प्रकारची माणसं, त्याच्या आणि लुईसच्या नात्यातले ताणतणाव ,अशा विविध पैलूंनी चित्रपट गच्च भरलेला आहे. तो एका ठिकाणी लक्ष केंद्रीत करत नाही हे खरं असलं तरी अखेर हे सारे पैलू एकत्र आणून तो आपल्या गुंतागुंतीच्या प्रमुख व्यक्तिरेखांचं चित्रच तपशीलात रंगवत असतो, त्यामुळे त्याचं सुट्या प्रसंगांवर अवलंबून असणंही खटकत नाही. चित्रपट रेंगाळतोय असं वाटू देत नाही.
मी मागे याच ठिकाणी लिहीलेल्या डार्डेन बंधूंच्या 'किड विथ ए बाईक'ची आठवण हा चित्रपट पाहाताना होणं साहजिक आहे कारण दोन्ही चित्रपटांत अनेक साम्यस्थळं आहेत. चित्रणातला वास्तववाद, बालगुन्हेगारीला स्पर्श करणारं कथानक, बारा तेरा वर्षांचा मुलगा आणि तरूण मुलगी यांवर असणारा फोकस, अशा ब-याच गोष्टी दोन्ही चित्रपटांमधे पाहायला मिळतात. पण या चित्रपटांत एक गोष्ट अशी आहे जी 'किड विथ ए बाईक' मधे पूर्णपणे गैरहजर होती. आणि ती म्हणजे त्यातलं विनोदाचं स्थान. हा विनोद अजिबात ओढून ताणून आणलेला नाही. तो दरवेळी सकारात्मक आहे असं नाही , आणि अनपेक्षित तर तो दर प्रसंगात आहे. सिमॉनची हुशारी, व्यावसायिक जाण, अगतिकता , त्याच्या आणि बहिणीच्या नात्यातला विक्षिप्तपणा अशा विविध गोष्टी यातल्या विनोदामुळे लक्षात येतात. आपल्याला येणारं हसू हे प्रत्येक वेळी गंमत वाटल्याने असतं असंही नाही, आपल्याला या मुलाबद्दल वाटणारं कौतुकदेखील अनेक वेळा आपल्या हसण्यातून व्यक्त होत असतं.
सिस्टरमधलं बर्फाच्छादित वातावरण आणि स्की रिजॉर्ट सारखी जागा ,या अपरिचित मात्र प्रभावीपणे चित्रित केलेल्या घटकांमुळे चित्रपट निश्चितच पाहाण्यासारखा होतो, मात्र अंतिमतः त्याचा भर राहातो, तो व्यक्तिचित्रणावर. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा ,पण खासकरुन सिमाॅन तुमच्यापर्यंत जितका पोचेल तितका हा चित्रपट तुम्हाला जवळचा वाटेल. मग यातल्या वातावरणाचं परकेपण तुम्हाला जाणवणार सुध्दा नाही. तुम्हाला दिसत राहातील ती आपल्याच समाजात असणारी ,अकाली प्रौढ झालेली लहान मुलं जी अनिष्ट परिस्थितीतही आपल्या घराला सांभाळण्याचा प्रयत्न करताहेत. वरवर संपूर्ण वेगळ्या जगात वसलेल्या आशयाचं असं अचानक आपलं होउन जाणं हे इथे प्रकर्षाने जाणवणारं ख-या उत्तम जागतिक चित्रपटाचं लक्षण म्हणावं लागेल.
- गणेश मतकरी
Read more...