पुन्हा वासेपूर- दुस-या पिढीची गुन्हेगारी

>> Sunday, August 26, 2012

गँग्ज आँफ वासेपुरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी गर्दी तर केली ,पण झपाट्याने त्याविषयी एक असंतोषाचं वातावरणदेखील पसरलं. याला अर्थातच कारणं होती. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे याचं अपरिचित टेक्श्चर. सरळसोट कथानक रंजक पध्दतीने सांगितलं जावं अशी आपल्या प्रेक्षकांची आपल्या चित्रपटांकडून अपेक्षा असते आणि आपल्या चित्रपटांची कथाप्रधान परंपरा पाहाता त्यांच्या दृष्टिकोनातून ती रास्तदेखील मानता येईल. या अपेक्षेने अन पोस्टरवरल्या टिपिकल सूडपटांना शोभणा-या टॅगलाईन्स वाचून गेलेला प्रेक्षक चार पाच दशकांच्या कालावधीवर पसरलेलं हे गँगस्टरपट आणि माहितीपट यांचं मिश्रण ,तेदेखील अपूर्ण शेवटासह पाहून भांबावला असल्यास आश्चर्य नाही.पोस्टरवर हा चित्रपटाचा प्रथम भाग असल्याचा अजिबात उल्लेख नसल्याने तर ब-याच जणांना चित्रपटाअखेर येणारी ’ टु बी कन्टिन्यूड ’ही सूचनादेखील प्रतिकात्मक, हे गँगवॉर असंच सुरू राहाणार ,या आशयाची देखील वाटली. सुदैवाने कश्यप कंपूने एक गोष्ट उत्तम केली.दुस-या भागाच्या प्रदर्शनात फार वेळ काढला नाही. पहिला भाग , आणि त्याबद्दलच्या भल्याबु-या प्रतिक्रिया डोक्यात असतानाच आपल्याला पुढला भाग पाहायला मिळाला.
एक गोष्ट वासेपुरच्या दुस-या भागाकडे पाहाताना लक्षात ठेवायला हवी. आणि ती म्हणजे तो पारंपारिक अर्थाने दुसरा भाग नाही. तर एका लांब चित्रपटाचा ,तो उत्तरार्ध आहे. अनुराग कश्यपने पहिला भाग सेल्फ कन्टेन्ड करण्याचा प्रयत्नही केला नाही यावरुनही ते स्पष्ट होतं . त्याच्या दृष्टिने गँग्ज आँफ वासेपूर दोन भागात पाहाणंच न्याय्य आहे. असं असतानाही, चित्रपटाचे असे दोन तुकडे करणं ,केवळ लांबीमुळे आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण त्यात अगदी मूलभूत स्वरुपाचे काही फरक आहेत. पहिला आणि कदाचित सर्वात महत्वाचा म्हणजे पहिला भाग हा जवळजवळ सेट अप आहे ,तर दुसरा भाग मुख्य गोष्ट. दुस-या भागातल्या घटना घडण्यासाठी जी पार्श्वभूमी हवी ती तयार करण्याचं काम हे प्रामुख्याने पहिल्या भागाचं काम होतं. ही पार्श्वभूमी मुळातच इन्टरेस्टिंग होती आणि ती पुरेशा तपशीलात येण्यासाठी अडीच पावणेतीन तास आवश्यक होते असं आपण मानूनही चालू, मात्र हेदेखील तितकंच खरं, की चित्रपट पाहून असंतुष्ट राहिलेल्या प्रेक्षकांच्या असंतोषाचं खरं कारणही ,पहिल्या भागाच्या या गुणधर्माशीच संबंधित आहे. या प्रेक्षकांची चित्रपटाकडून जी अपेक्षा होती, त्या चौकटीत पहिला भाग नॉनस्टार्टर राहिला, आणि कथेचा खरा प्राण त्याने दुस-या भागासाठी राखून ठेवला. पहिल्या भागाचा एकूण अवाका, त्यात घडणा-या घटनांचा कालावधी ,चित्रपटातल्या नाट्यपूर्णतेचं आणि वास्तववादी वृत्तीचं प्रमाण हे सारंच दोन्ही भागात वेगवेगळं आहे. त्याशिवाय ज्या प्रकारे पहिला भाग उघड उघड अपूर्ण आहे, तसं दुस-या भागाचं नाही. नायकाच्या वडिलांच्या हत्येची बॅकस्टोरी असणारा हा जवळपास पूर्ण चित्रपट आहे. पहिला भाग पाहिला नसला तरी या चित्रपटाच्या प्रेक्षकाला फार फरक पडणार नाही.
वासेपुरच्या पहिल्या भागाविषयी लिहिताना मी या चित्रपटाची प्रेरणा अनुराग कश्यपला  कपोलाच्या ( आणि अर्थात पुझोच्याही ) गॉडफादर वरून मिळाली असावी असं लिहिलं होतं . मांडणी आणि तपशीलात जराही सारखेपणा नसूनही व्यक्तिरेखांचे टाईप्स ,घटनाक्रम उलगडण्यातलं वा कथानकाच्या रचनेतलं साम्य ,विशिष्ट दिशेने होणारा प्रवास , या बाबतीत दोन्ही चित्रपटात तुलना होण्याजोगी आहे.धोरणी डॉन व्हिटो कॉर्लिओनीची आठवण करुन देणारा सरदार खान (प्रथम भागातला मनोज बाजपेयी) , वडिलांवरल्या हल्ल्याने पेटून उठणा-या आणि आपल्या शीघ्रकोपीपणाचा बळी ठरणा-या सनीची आठवण करुन देणारा दानीश (विनीत कुमार) आणि काहीशा उप-या परिस्थितीत वाढलेल्या ,पण अचानक वडिलांच्या वारशाला जागणा-या आणि आपला बदला पूर्ण करणा-या मायकेलची आठवण जागवणारा फैजल (नवाझुद्दैन सिद्दिकी)ही पात्रं तर सहजच आेळखता येण्यासारखी.अर्थात वासेपुर द्वयीमधे सरदार आणि फैजल यांना अधिक वाव आहे, ते जवळजवळ एकेका भागाचे नायक आहेत. दानीशची थोडी भूमिका पहिल्या भागात असली ,तरी दुस-या भागात त्याला फारच कमी वाव आहे.वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रकरणात त्याचा लगेचच बळी जातो. फैजल आपला व्यसनीपणा थोडा बाजूला ठेवून गुन्हेगारांतल्या एकाचा त्वरीत आणि दहशत बसेलशा पध्दतीने बळी घेतो आणि आपला प्रमुख शत्रू रामाधीर सिंग (तिगमांशू धुलीया) ,याच्याबरोबर समझोत्याची बोलणी करुन सुलतान (पंकज त्रिपाठी) या दुय्यम शत्रूला दूर ठेवतो. अर्थात हा समझोता काही कायम टिकणार नसतो . त्याप्रमाणे सुलतान लवकरच त्यातून सुटण्याचा विचार करायला लागतो.
वासेपूरचा पहिला भाग न आवडलेल्यांनाही दुसरा आवडण्याची अधिक शक्यता आहे कारण तो उघडच अधिक रंजक आहे. पहिल्या भागाप्रमाणे इथेही गँगवॉर, राजकारण, बदलती सामाजिक परिस्थिती आणि हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव यांचं टेक्स्टमधे मिश्रण आहे ,पण हे कथानक थोड्या कमी कालावधीत घडणारं आणि मुख्य कुटुंबाकडे अधिक लक्ष देणारं आहे.पहिल्या भागात सरदार खान आणि रामाधीर यांच्यातलं वैर खूप ताणलं जातं पण फार काही घडत नाही. इतकं नाही ,की अखेर सरदार खानची सूडाची योजनाही अपूर्ण राहाते. त्याउलट इथे अनेक पात्र आहेत जी व्यक्तिचित्रणात खास आहेत आणि ती सतत आपल्या किर्तीला शोभणा-या गोष्टी करताना दिसतात. फैजलला तुल्यबळ भूमिकेतली त्याची पत्नी मोहसीना ( हुमा कुरेशी), फैजलचा ब्लेड चघळणारा भाऊ परपेन्डिक्युलर (आदित्य कुमार) आणि त्याचा बिकट प्रसंगी काढता पाय घेणारा मित्र टँजंट, फैजलचा सावत्र भाऊ डेफिनेट ( झीशान काद्री) असे अनेक जण चित्रपटात वेगवेगळ्या वेळी लक्षवेधी ठरतात. प्रत्येकजण केवळ गप्पा न मारता काहीतरी करताना दिसतो ज्यात आपण गुंतलेले तर राहातोच ,वर त्यांच्या उद्योगांच्या निमित्ताने दिग्दर्शकाला काही सेट अँक्शन पीसेस घालून आपली तंत्रावरची पकड दाखवण्याची संधी मिळते. परपेन्डिक्युलरवरचा जीवघेणा हल्ला, अडचणीच्या रस्त्यातून डेफिनेटने केलेला शमशाद आलमचा पाठपुरावा, इलेक्शन बूथ लुटण्याचा प्रसंग अशी कितीतरी उदाहरणं घेता येतील.
हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव हे पहिल्या भागातलं सूत्र इथे खूप विस्तृत पध्दतीने मांडलं जातं. मयतापासून (याद तेरी आएगी)आनंदसोहळ्यापर्यंत (माय नेम इज लखन)लाइव्ह आँर्केस्ट्रासह वाजणारी गाणी, फैजलने स्वत:च्या नाकर्तेपणाची शशी कपूर बरोबर केलेली तुलना आणि त्याने स्वत:ला सिध्द केल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात होणारा अमिताभ बच्चनचा संचार ,त्याच्या मोहसीनाबरोबरच्या प्रेमप्रकरणादरम्यान येणारे नव्या नायकांचे संदर्भ, परपेन्डिक्युलर आणि टँजंटची मुन्ना आणि सर्किट बरोबरची तुलना अशा या वेळोवेळी निदर्शनाला आणून दिलेल्या जागा आहेत, ज्या सहजपणे या सतत बदलत्या पण कायमस्वरुपी प्रभावाकडे निर्देश करतात.
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इथला विनोद. सामान्यत: ,टीपिकल नाट्यपूर्ण चित्रपट हे एका वेळी एका भावनेवर आपलं लक्ष केंद्रित करतात. गंभीर प्रसंगात विनोदाचा शिरकाव न होईलसं ते पाहातात. वासेपूर मात्र वेळोवेळी प्रसंगांची अँब्सर्डिटी समोर आणतो आणि विनोदाच्या जागा आपोआप तयार होतात. शोकसभेदरम्यान अत्यंत गंभीरपणे आणि संदर्भ सोडून गायल्या जाणा-या फिल्मी गाण्यापासून ते माणसाला मारायला जातेवेळी भाजीपाल्याच्या खरेदीवर केलेल्या चर्चेपर्यंत अशा अनेक जागा चित्रपटात आहेत ज्या केवळ करमणूक म्हणून विनोद करत नाहीत पण परिणामाला वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी करतात.
कश्यपचं पटकथेसाठी नाव असणा-या सत्या चित्रपटापासून आपल्या चित्रपटात दिसणा-या गुन्हेगारीचं रूप बदलायला , आणि वास्तवाच्या अधिकाधिक जवळ यायला सुरुवात झाली. गँग्ज या बदलाच्या प्रयत्नांतलाच एक महत्वाचा टप्पा मानावा लागेल. हा बदल सार्वत्रिक असेलसं वाटत नाही ,मात्र तरुण दिग्दर्शकांसाठी तो निश्चितच प्रेरक ठरेलसं वाटतं.
- गणेश मतकरी
(महाराष्ट्र टाइम्समधून)

Read more...

’अनदर अर्थ’ - बेस्ट ऑफ ऑल पॉसिबल वर्ल्डस ?

>> Tuesday, August 21, 2012




एखादा चित्रपट नक्की कशाविषयी आहे हे कसं समजायचं ? केवळ आपल्या परीचयाची काही कथासूत्र, संकल्पना , विचार हे एखाद्या विशिष्टं चित्रप्रकाराशी जोडलेले असणं ,हे ते असणारा दर चित्रपट त्याच चित्रप्रकाराच्या वर्गवारीत टाकण्यासाठी पुरेसं आहे का ? उदाहरणार्थ , चार्ल्स फॉस्टर केनने मृत्यूसमयी काढलेल्या उदगारामागच्या रहस्याचा चित्रपटभर पाठपुरावा केल्याने ’सिटिझन केन’ हा केवळ रहस्यपट होतो का? नाही , तो महत्वाकांक्षा आणि सत्तेच्या गुर्मीत ख-या आनंदाला मुकलेल्या एका बलाढ्य व्यक्तिरेखेची शोकांतिका ठरतो. जॉर्ज रोमेरोच्या परंपरेतल्या झॉम्बीजना पडद्यावर आणल्याने ’शॉन ऑफ द डेड’ हा केवळ भयपट होतो का? नाही, तो आज यंत्रवत होत चाललेल्या समाजजीवनावरची बोचरी पण अतिशय विनोदी टीका म्हणून पाहाता येतो. याच तर्कशास्त्राच्या आधारे पाहीलं , तर पृथ्वीसदृश दुस-या ग्रहाचा शोध , आंतरग्रहीय प्रवास यासारख्या घटकांचं अस्तित्व हे माइक काहील दिग्दर्शित ’अनदर अर्थ’ ला केवळ विज्ञानपट म्हणून ब्रँड करण्यासाठी पुरेसं आहे का? अर्थातच नाही.
’अनदर अर्थ’ हादेखील मिरांडा जुलाईच्या ’द फ्युचर’ सारखाच अमेरीकन इन्डीपेन्डन्ट सिनेमा, इन्डी चित्रपटांसाठी सुप्रसिध्द असणा-या सनडान्स फिल्म फेस्टीवलमधे यंदा पारितोषिक विजेता ठरलेला. लो बजेट, दिग्दर्शकाने स्वत:च छायाचित्रण आणि संकलनाची बाजू सांभाळून केलेला हा जवळजवळ द्विपात्री चित्रपट. त्यातल्या विज्ञानपटात शोभणा-या संकल्पनांचा कल्पक आणि वेगळा वापर करणारा, त्यांच्याशी निगडीत दृश्य शक्यतांना योग्य ते महत्व देणारा पण त्याच वेळी आपला पिंड सायन्स फिक्शन नसल्याची पुरेपूर जाणीव असणारा.
या चित्रपटाच्या नावातच असलेल्या ’दुस-या पृथ्वी’ला इथे महत्वाचं स्थान आहे. सुरुवातीलाच या प्रतिपृथ्वीचा शोध लागल्याचं आपल्याला सांगितलं  जातं आणि त्यानंतर येणा-या जवळपास प्रत्येक आउटडोअर चित्रचौकटीत दिसणा-या आकाशात ,या चंद्रापेक्षा कितीतरी मोठी जागा व्यापणा-या ग्रहाला प्रत्यक्ष दाखवलं जातं. एरवी सामान्य आयुष्य जगणा-या व्यक्तिरेखांच्या वास्तवदर्शी कथेत अन तशाच वास्तवदर्शी दृश्य रुपात, ही  फॅन्टसी प्रतिमा थोडा काव्यात्म अन काहीसा अचंबित करुन सोडणारा परिणाम साधते.
मात्र एक लक्षात ठेवावं लागेल, की इथलं दुस-या दुनियेचं अस्त्तित्व चित्रकर्त्याना काही वास्तववादी पध्दतीने सुचवायचं नाही. ते एक रुपक आहे. आयुष्याने आपल्याला देऊ केलेल्या संधी, आपण आयुष्यभर घेतलेले निर्णय , निवडलेली वाट ,याची चित्रपटातल्या पात्रांना ,अन आपल्यालाही , जाणीव करुन देण्याची एक क्लृप्ती आहे. आपण कसे जगलो याचा, अन कदाचित कसं जगायला हवं होतं याचाही विचार करायला भाग पाडणारं डिव्हाइस आहे. कदाचित त्यामुळेच, या ग्रहाच्या असण्यातून निर्माण होणा-या तात्विक अन तार्किक शक्यतांचा चित्रपट विचार करतो ,मात्र अशा प्रचंड ग्रहाच्या अचानक जवळ येण्यातून जी भौगोलिक संकटं उद्भवतील, त्यांचा विचार करणं पूर्णपणे टाळतो.
चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे -होडा विलीअम्स (ब्रिट मार्लिंग) ही हुशार अन उज्वल भवितव्याच्या शक्यता असलेली मुलगी. या शक्यता नाहीशा होतात जेव्हा ती थोड्या नशेत आणि नुकताच पृथ्वीच्या कक्षेत आलेला नवा ग्रह पाहाण्याच्या नादात एका गंभीर अपघाताचं कारण ठरते. एका कुटुंबातली पत्नी आणि लहान मुलगा ,या अपघातात जागीच मरतात, अन संगीतकार / प्राध्यापक असणारा पती, जॉन बरोज (विलीअम मेपोथर) कोमात जातो. काही वर्षानंतर सजा भोगून बाहेर आलेल्या -होडाचं आयुष्य पूर्वीपेक्षा पार बदलून जातं.डोक्याचा वापर करावा लागेलसं कोणतंही काम टाळून ती आपल्या जुन्या शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी धरते. बरोज जिवंत असल्याचं कळताच ती माफी मागण्यासाठी त्याच्या घरी पोहोचते ,पण खरं सांगायचा धीर न झाल्याने आपण घरकामासाठी माणसं पुरवणा-या कंपनीतर्फे मोफत साफसफाईची प्रमोशनल ऑफर घेउन आल्याचं सांगते.अजून माणसात न आलेला , काळवंडलेल्या गुहेसारख्या घरात एकटाच राहाणारा जॉन ऑफर स्वीकारतो आणि -होडा दर आठवड्याला त्याच्याकडे जायला लागते. माफिचा विचार बाजूला ठेउन त्याची सेवा करण्यातच पापक्षालन मानायला लागते. या सुमारास अर्थ -२ नावाने ओळखल्या जाणा-या नव्या ग्रहाबद्दल आश्चर्यकारक तपशील कळायला लागतात. हा ग्रह पृथ्वीची संपूर्ण प्रतिकृती असतो. तीदेखील माणसांसकट. सर्व पृथ्वीवासीयांची तर तिथे प्रतिकृती असतेच , वर ग्रहांना एकमेकांचा शोध लागेपर्यंत तर त्यांची आयुष्यही एकसारखी असतात. त्यानंतर मात्र त्यांचे मार्ग बदलण्या ची शक्यता असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज असतो. आता -होडाला आशा वाटायला लागते की निदान त्या ग्रहावर तरी आपल्या हातून घडलेला अपघात टळलेला असेल अन जॉनचं कुटुंब सुखी असेल. एव्हाना ब-याच सुधारलेल्या जॉनशी तिची चांगली मैत्री झालेली असते अन सत्याची कल्पना नसलेला तो, -होडाच्या प्रेमातही पडायला लागतो.
अनदर अर्थ मधली प्रेमकथा ही छोट्या आणि अनपेक्षित प्रसंगांमधून फुलंत जाते. दोघांनी बॉक्सिंगचा व्हिडीओगेम खेळण्याचा प्रसंग -ज्यात टिव्हीचा पडदा न दाखवता केवळ -होडा आणि जॉनच्या प्रतिक्रियांवर कॅमेरा स्थिरावतो, डोकं धरुन राहाणार्या जॉनला -होडाने सांगितलेली रशियन कॉस्मोनॉटची गोष्टं, मुळात संगीतकार असणा-या जॉनने आपल्या भावना व्यक्तं करताना केलेला करवतीमधून येणा-या सूरांचा वापर ,असे तपशील कथेला तोच तोचपणा येऊ देत नाहीत.
पटकथेकडे पाहून एक गोष्ट लगेच लक्षात येते आणि ती म्हणजे ,तिच्यात येणारे नाट्यपूर्ण टप्पे ,हे त्यातल्या वैज्ञानिक संकल्पनेशी थेट जोडलेले नाहीत. बरेच स्वतंत्र आहेत. चित्रपटाचं भावनिक केंद्र ,हे -होडा आणि जॉन मधल्या बदलत्या संबंधात आहे. प्रतिपृथ्वी ही जवळजवळ पार्श्वभूमीला राहाते आणि अखेरपर्यंत हे चित्र बदलत नाही.याचाच दुसरा अर्थ म्हणजे ,दुसरी पृथ्वी न दाखवताही हा चित्रपट पाउणहून अधिक प्रमाणात तसाच होउ शकला असता.मग तरीही ती दाखवून भावनिक नाट्यात अपरिचित असणारी विज्ञानपटात शोभणारी सूत्र घालण्यामागे कारण काय ,हा प्रश्न पडण्यासारखा आहे. त्याला कारण म्हणता येईल ते त्यामुळे कथानकातून दिसायला लागणा-या वैश्विक शक्यता हेच ,अशा शक्यता , ज्या कथेला विशिष्टं पात्रांपुरती अन एका घटनेपुरती  मर्यादित न ठेवता सार्वत्रिक स्वरुप देउ शकतात. मग संकल्पनेच्या पातळीवर ही कथा कोणाचीही असू शकते. आपल्या आयुष्यातली वळणं ही नेहमीच आपल्याला आश्चर्यचकीत करणारी अन आपण विशिष्ट वेळी घेतलेल्या निर्णयाबद्दल वा आपल्यापुढे येउन ठेपणा-या संधी  वा आपत्तीबद्दल पुढे कायमच आनंद वा खेद वाटायला लावणारी असतात.दुस-या दुनियेतल्या वेगळी पावलं उचलण्याची क्षमता असणा-या आपल्याच प्रतिकृती या त्या आनंदाला वा खेदाला पुन्हा आपल्यापुढे आणतात.हे सूत्रं अधोरेखीत होतं ते वेळोवेळी येणा-या निवेदनातून ,जे कथेशी थेट संबंधित नाही. त्रयस्थ आहे.
आयुष्यातल्या अनेक अन अनपेक्षित शक्यता दाखवणारा हा काही पहिला चित्रपट नाही. पोलिश दिग्दर्शक किसलोवस्कींचा ’ब्लाईंड चान्स’, जर्मन टॉम टायक्वरचा ’रन ,लोला,रन’ , अमेरिकन पीटर हॉविटचा ’स्लायडिंग डोअर्स’ अशी अनेक उदाहरणं जागतिक सिनेमात आपण पाहू शकतो, मात्र ही उदाहरणं हे बदलते रस्ते अधिक थेटपणे ,प्रसंगातून दाखवतात. ’अनदर अर्थ’ केवळ हे रस्ते सूचित करतो, त्यासाठी कथानकाला फाटे फोडणं टाळतो.
अभिनयाबरोबर इथे सहपटकथाकार आणि सहनिर्माती अशा इतर दोन महत्वाच्या भूमिका पार पाडणा-या मार्लिंगला या विषयाचं कुतुहल असणं स्वाभावीक आहे. चित्रपटात काम करण्यासाठी अर्थशास्त्रातल्या अधिक हुकूमी करियरवर पाणी सोडणं, अन केवळ बाहुलीवजा भूमिका नाकारुन अर्थपूर्ण भूमिकांच्या शोधात स्वत: पटकथाकार बनणं असे दोन मोठे बदल तिच्या स्वत:च्या आयुष्यातच घडलेले आहेत. तिच्या कल्पनेतल्या दुस-या दुनियेत कदाचित ती नावाजलेली अर्थतज्ञ वा अधिक मोठ्या बजेटच्या चित्रपटांत केवळ सुंदर दिसण्याचं काम करणारी स्टार झाली असेल कदाचित. मात्र तसं असूनही तिला हवं ते काम, हव्या त्या पध्दतीने करू देणारी ही दुनियाच तिच्यासाठी ’ बेस्ट ऑफ ऑल पॉसिबल वर्ल्डस ’असेल ,यांत शंका नाही.
- गणेश मतकरी 

(ब्लॉगमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे काढण्यात आलेले काही लेख या आठवड्यामध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहेत.त्यातला हा पहिला लेख)

Read more...

रेड: रिडेम्प्शन- पैसा वसूल अँक्शन

>> Sunday, August 12, 2012


'अवर मिशन इज सिम्पल. वुई एन्टर अँन्ड वुई टेक हिम आऊट’ ही ’द रेड: रिडेम्प्शन’ या इन्डोनेशिअन चित्रपटातल्या २० पोलिसांच्या तुकडीला उद्देशून सार्जन्ट जाकाच्या तोंडी येणारी वाक्य म्हणजे जवळपास या चित्रपटाचा संपूर्ण सारांश सांगणारी आहेत. या वाक्यांपलीकडे, चित्रपटाला कथानक नाही. नाही म्हणायला तपशील आहेत. कधी व्यक्तिचित्रणातले तपशील, कधी आधी दडवलेली माहिती उघड केल्यावर बसणारे धक्के वगैरे,वगैरे. पण तेवढच. वाक्यात उल्लेखलेला ’हिम’ आहे टामा रियादी (रे साहेटापी)हा आपल्या गब्बर सिंगच्या जातकुळीत बसणारा खलनायक. इतका, की त्याची ओळख घडवणारा प्रसंगदेखील ’कितने आदमी थे? ’ची चटकन आठवण करुन देणारा आहे. टामा डोंगरकपारीत मात्र रहात नाही. त्याऐवजी त्याचं वसतीस्थान आहे ,ते इंडोनेशियातल्या गुंड वस्तीतली एक पडिक वाटणारी उंच इमारत.इमारत त्याच्या माणसांनी आणि इतर गरीब,गुंड, व्यसनी मंडळींनी भरलेली. वरच्या मजल्यांमधे कुठेतरी टामाचा अड्डा आहे ज्यात बसून तो क्लोज सर्किट टिव्हीमधून आपल्या इमारतीच्या कोप-यानकोप-यावर नजर ठेवतो. मॅड डॉग (याहान रुहियान) आणि अँडी ( डॉनी आलामस्या) या आपल्या उजव्या डाव्या हातांच्या मदतीने सर्वांवर वचक ठेवतो. अर्थात ,सार्जन्ट जाकाला वाटली तितकी ही कामगिरी सोपी नसते हे निश्चित.ती नक्की किती कठिण आहे , हे लवकरच पोलीस तुकडीच्या लक्षात येतं.
मला कॉन्सन्ट्रेटेड नाट्य ही नेहमीच आवडतात.केवळ दृष्यभाषेच्या नादात पटकथा पसरट न करता सोपी कल्पना सर्व संभाव्य शक्यतांसह स्थळकाळाच्या मर्यादेत घडवून पाहिली ,तर परिणामकारक ठरते असं माझं प्रामाणिक मत आहे. जेनेरिक चित्रपटांनी या विचारसरणीचा खूप फायदा करुन  घेतल्याचं आपल्या लक्षात येईल.वाढत्या तणावाबरोबरच क्लॉस्ट्रोफोबिआला अस्त्रासारखं वापरणा-या भय, रहस्य, कोर्ट रुम ड्रामा अशा चित्रप्रकारा़त याप्रकारची मांडणी जरुर दिसून येते. ती जितकी सोपी आणि सिम्प्लिफाइड, तितका या चित्रपटांचा परिणाम अधिक. हे सूत्र सर्वसाधारण अँक्शनपटात वापरलं जात नाही कारण सर्व प्रकारची नेत्रदिपकता ,ही मुळातच अँक्शनपटांच्या अजेंड्यावर असते.त्यामुळे अँक्शन एका जागी कॉन्सन्ट्रेट न करता अधिकाधिक नावीन्यपूर्ण पार्श्वभूमीवर ती घडवण्याकडे त्यांचा कल असतो. रेड मात्र हे करून दाखवतो.
रेडच्या रचनेवर एक स्पष्ट कळण्याजोगा प्रभाव आहे आणि तो आहे व्हिडिओ गेम्सचा.एक स्थळ , एक मोठा खलनायक, काही मधले-छोटे खलनायक, चढत्या क्रमाने अवघड होणा-या लेव्हल्स (अर्थात मजले) आणि खेळणा-याचं (किंवा पाहाणा-याचं) प्रातिनिधित्व करणारा एक नायक. हे सारं काही इथे आहे.अनेकदा ,परिणामकारक व्हिडिओ गेम्स हे इन्टरअँक्टिव्हिटी हरवताच चित्रपट म्हणून कंटाळवाणे होतात. रेड यातल्या नायकाला गेम्सच्या नायकांप्रमाणे सर्वशक्तिशाली घोषित करत नसल्याने संघर्षाचं पारडं वर खाली होत राहातं आणि आपण गुंतून राहातो.
चित्रपटाची पहिली किंचित प्रस्तावना सोडता इतर सारं घडतं ते एकाच इमारतीत . रामा (इको योवेस)हा नवशिका तरूण इथे चटकन नायक ठरतो तो त्याच्या चटकन नवनव्या कल्पना काढण्यामुळे , इथे वापरण्यात आलेल्या इन्डोनेशिअन मार्शल आर्ट वरल्या़ त्याच्या उघड प्रभूत्वाने, आणि अर्थातच ,चित्रपटातलं एक रहस्य त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडलेलं असल्याने. या जीवघेण्या रेडमधून जे मोजके लोक वाचतात त्यात रामाचा सहभाग असण्यामागेही तेच रहस्य असतं. मात्र असं असूनही ,या रहस्याचं चित्रपटातल स्थान मॅकगफिन सारखं आहे. त्याचं असणं ,हे या व्यक्तिरेखांना मोटिव्हेशन देत असलं ,तरी प्रेक्षकाच्या दृष्टिने ते दुय्यम आहे.प्रेक्षकाचा खरा हुक आहे, तो इथली अँक्शन.
अनेक वर्षांपूर्वी ब्रूस ली ने विशिष्ट शैलीतल्या अँक्शनला पुढे करून वेगळ्या ब्रँडचे अँक्शनपट पुढे आणले, आणि पुढे अनेक आशियाई स्टार अभिनेत्यांनी त्याचं अनुकरण केलं.रेड:रिडेम्प्शनचा प्रकारही त्याच चित्रपटांसारखा आहे. इथला तरुण स्टार इको योवेस हा ’पेन्काक सिलात’या पारंपारिक मार्शल आर्ट तंत्रात पारंगत आहे. या चित्रपटाचा वेल्श दिग्दर्शक गॅरेथ इवान्स २००७ मधे या तंत्रावर माहितीपट करत असताना त्याचा इकोशी परिचय झाला. आपला पुढला चित्रपट ’मेरान्टो’ याच तंत्रावर आधारताना त्याने इकोलाच प्रमुख भूमिका दिली आणि टेलिकॉम कंपनीचा ड्रायवर इको स्टार बनला. इको आणि इवान्स यांचा हा नवा प्रयत्न आणि त्यांच्या आगामी चित्रपटांकडे पाहाता ,त्यांनी ब्रूस ली च्या पावलावर पाउल ठेवूनच पुढे जायचं ठरवलेलं दिसतं. या चित्रपटाप्रमाणेच त्यांचे आगामी चित्रपटदेखील मार्शल आर्ट बाबत पारंपारिक पण दृश्यात्मकतेत आधुनिक आणि पाश्चात्य प्रभावाचा वापर करतील अशी शक्यता दिसते.
रेड :रिडेम्प्शनची तुलना भयपटांबरोबर करता येईल ती तो फॉर्म्युलाचा वापर ज्या प्रकारे करतो त्यामुळे. एक रहस्यमय जागा, चटकन समोर न येणारा खलनायक. भाराभर दुय्यम व्यक्तिरेखा ज्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून न करता पटापट मारत जाण्यासाठी बॉडीकाउंटसारखा केलेला वापर.त्याबरोबरच इथल्या मूळ कल्पनेचा साधेपणा आणि चित्रपटाची मार्शल आर्टलाच व्यक्तिचित्रणापेक्षा अधिक महत्व देण्याची पध्दत पाहाता त्याची पटकथा उत्कंठावर्धक करणं फार सोपं नाही हे स्पष्ट व्हावं.पुरेशी काळजी न घेतल्यास अशा चित्रपटांची नेपथ्यातली  आणि शैलीतली पुनरावृत्ती प्रेक्षकांना कंटाळा आणू शकते. पण हा चित्रपट कथेतल्या मोजक्या ,त्यामानाने परिचित पण उघड नाट्यपूर्ण टप्प्यांना योग्य प्रमाणात महत्व येइलशा पध्दतीने पटकथेत गुंफतो आणि प्रेक्षक त्यात अडकत जातो. चित्रपटात प्रत्यक्ष संवाद असणारे प्रसंग इतके मोजके आहेत ,की त्यामधून, आणि फ्लॅशबॅक पूर्णपणे टाळून पात्रांबद्दल पुरेशी माहिती आपल्याला कशी पुरवली जाते हा एक संशोधनाचा विषय आहे. मात्र चित्रपट हे जमवतो. ही पटकथा फार हुषार प्लॉटिंगचा नमुना नाही हे उघड आहे ,पण तिच्याकडे चित्रकर्त्यांचं दुर्लक्ष झालेलं नाही हे निश्चित.
या चित्रपटाचा फोकस, अँक्शनपटांना असणारी मागणी आणि त्याचं त्यामानाने आळखीच्या वाटेवरून प्रवास करणं पाहिल्यास तो तद्दन व्यावसायिक चित्रपट असल्याचं दिसतं. त्याचा दृष्टिकोन किंचित वेगळा जरुर आहे, प्रायोगिक मात्र नाही.अर्थात ,चांगला व्यावसायिक चित्रपट बनवणं सोपं थोडंच असतं? उलट अनेकदा कलात्मक सिनेमाच्या मुळातच सिम्पथॅटिक आणि मर्यादित प्रेक्षकाला खूष करण्यापेक्षा आपल्या पैशाची किंमत वाजवून घेणारा आम प्रेक्षकच चोखंदळ ठरू शकतो. रेड:रिडेम्प्शन हा अँक्शनपटाच्या आम प्रेक्षकासाठी आहे. त्यांचा पैसा पूर्ण वसूल करून देण्याची तयारी असणारा.
- गणेश मतकरी 

Read more...

टोटल रिकॉल - फिलीप के डिक आणि ख-या खोट्याचा खेळ

>> Monday, August 6, 2012


टोटल रिकॉल (२०१२)च्या उत्तरार्धात एक प्रसंग आहे. या प्रसंगापर्यंत कथेतला प्रोटॅगनिस्ट डग्लस क्वेड ( कॉलिन फारेल) याची खात्री पटलीय ,की तो फॅक्टरी कामगार क्वेड नसून खरोखर हाउजर हा हेर आहे, जो हुकूमशहा सरकारच्या विरोधात बंडखोरांसाठी काम करत असे . अंतर्मनात कृत्रिम आठवणी इम्प्लान्ट करणा-या रिकॉल या संस्थेने केलेल्या गोंधळाने त्याच्या हाउजर असतानाच्या ख-या आठवणी पुन्हा जागृत झाल्या आहेत.
हा विशिष्ट प्रसंग घडतो ,तो युक्तीवादाला महत्व देत ,पण दृश्य पातळीवरही ग्रॅन्ड स्केलवर. इथे क्वेडबरोबर त्याची बंडखोरांबरोबर काम करणारी मैत्रिण मेलिना (जेसिका बेल) आहे. दोघंजण एका ग्लास फ्रन्टेज असणा-या भल्या थोरल्या लॉबीत घेरले गेले आहेत. इमारतीबाहेर पोलिसांचा गराडा पडलाय. अशा स्थितीत, क्वेडसमोर येतो तो त्याचा मित्र हॅरी. हॅरी सांगतो की हे काहीच खरं घडत नाही आहे. हॅरी अजून रिकॉल संस्थेच्या आँफिसात भासमय निद्रावस्थेत आहे आणि हे सारं स्वप्न पाहातोय.त्याला समोर हॅरी दिसत असला तरी तोदेखील प्रत्यक्ष समोर उभा नसून रिकॉ़लच्या आँफिसातच बेशुध्द क्वेडशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय. समोर दिसणारी प्रतिकृती हि केवळ क्वेडच्या मनाने तयार केलेली सोयीस्कर प्रतिमा आहे. एवढंच कशाला, हॅरीबरोबर क्वेडची पत्नी लोरी (केट बेकिन्सेल) देखील रिकॉलमध उपस्थित आहे.जणू या क्यूबरोबर क्वेडला इमारतीबाहेर आपली चिंताग्रस्त पत्नी दिसते. हॅरी सांगतो ,की हा सारा आभास रिकॉलने रचलाय ,तो क्वेडच्या स्वप्नात येणा-या मेलीनाभवती, त्यामुळे पुन्हा माणसात यायचच ,तर त्याने ताबडतोब मेलीनाला गोळी घालणं आवश्यक. आता क्वेड धर्मसंकटात पडतो आणि आपलं पिस्तुल उचलतो.
हा प्रसंग , माझ्या मते टोटल रिकॉल मधला कळीचा प्रसंग आहे. त्यात म्हणण्यासारखी अँक्शन नाही, मात्र चित्रपटाचा मूड त्यात अचूक पकडला जातो. चित्रपटात ,कथानकाच्या संकल्पनेत आणि फिलिप के डिकच्या ’वुई कॅन रिमेम्बर इट फॉर यू होलसेल’या मूळ गोष्टीत सुचवला गेलेला सत्य आणि आभास यांच्या सरमिसळीचा प्रश्न इथे मध्यवर्ती स्थान घेतो आणि या समस्येतून क्वेडने शोधलेला मार्ग,हा चित्रपटाच्या अखेरच्या डावपेचांकडे निर्देष करतो. मूळ टोटल रिकॉल मधेही हा प्रसंग आहे ,मात्र बराच थोडक्यात उतरलेला.इथे त्याची दखल, त्याला साजेशा गांभीर्याने घेतली जाते.नवा टोटल रिकॉल सर्वात पटतो ,पचतो ,तो याच प्रसंगात.
फिलिप के डिक च्या चाहत्याना ठाउक असेल की त्याच्या बहुतेक सर्व कथा, कादंब-यांच्या मध्यवर्ती कल्पना या संकल्पनेत ब्रिलिअन्ट आणि तणावपूर्ण वातावरणनिर्मितीसाठी उत्तम आणि चित्रपटांसाठी सहज वापरता येण्याजोग्या असतात. त्याच्या कथा कादंब-यांवर ब्लेडरनर ,मायनॉरिटी रिपोर्ट, अँड्जस्टमेन्ट ब्युरो , ए स्कॅनर डार्कली आणि इतरही अनेक चित्रपट बनले आहेत.त्या सर्वांनाच भेडसावणारा रुपांतरातला प्रश्न या कथेतही आहेच आणि तो म्हणजे तिस-या अंकाचा अभाव. सुरूवात आणि मध्य पूर्णपणे योग्य असणारी त्याची कथानकं ,एका टप्प्यानंतर पुढे जाण्याचा कंटाळा करतात. साहित्यात हे चालतं, चित्रपटात नाही. मग पटकथाकार स्वतंत्रपणे पुढला भाग रचू पाहातात, जे फारच कठीण काम असतं. जुन्या टोटल रिकॉल मधेही हीच अडचण होती. त्यातला क्वेडचं साहस खरं ,का केवळ रिकॉलने घडवलेला मनाचा खेळ हा प्रमुख मुद्दा अर्धवट राहीला होता. नव्या चित्रपटाच्या टॅगलाईनमधेच ’व्हॉट इज रिअल?’हा प्रश्न असल्याने ,काही ठाम उत्तराची अपेक्षा होती. सामान्यत: रुपांतरं आधीच्या पटकथेला रिइन्टरप्रिट करण्याचा ,किंवा तिच्यातले गोंधळ निस्तरण्याचा प्रयत्न करतात. तसं जर केलं नाही तर हे प्रयत्न अर्थहीन म्हणावे लागतील. त्यामुळे निर्मिती मूल्य आणि अभिनयशैली या दोन्ही बाबतीत अधिक आधुनिक असणारा चित्रपट शेवटच्या भागाला सावरण्याचा प्रयत्न का करत नाही हे अनाकलनीय आहे.करत नाही हे मात्र खरं.
मला जुन्या रिकॉलपेक्षा नवी आवृत्ती ही लेखकाच्या दृष्टिकोनाशी अधिक सुसंगत वाटली. त्या चित्रपटाचा भर हा बराचसा श्वार्त्झनेगरच्या स्टार पॉवरचा वापर करण्यावर होता,ज्यामुळे त्यात नायकाच्या सर्वश्रेष्ठतेला खरं आव्हान नव्हतं आणि विनोद वा नायकाच्या टाळीबाज वाक्यांनी त्याचं गांभीर्य कमी झालं होतं. नवा चित्रपट हा सुटत चाललेला टोन सुधारुन घेतो. फारेलची निवडदेखील या विचारसरणीशी सुसंगत आहे. त्याची प्रेक्षकांच्या डोक्यातली प्रतिमा ही विशिष्ट कक्षेत बसणारी नाही आणि त्याने स्वीकारलेली शैलीही अंडरप्ले करण्याची , त्याचं घडणा-या घटनांवर ,आजूबाजूच्या परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचं दाखवून देणारी आहे. पीकेडी च्या साहित्यात हा हतबल परंतू काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारा नायक अधिक योग्य वाटतो. आता कोणी म्हणेल की चित्रपटाचा विचार स्वतंत्र हवा, कथेचं बोट सोडून केलेला. हा विचार योग्य आहे, पण शंभर टक्के खरा नाही. जेव्हा दिग्दर्शक इतक्या प्रसिध्द लेखकाची तितकीच प्रसिध्द गोष्ट निवडतो तेव्हा मुळातच त्याला लेखकाची दृष्टी हवीशी वाटते. त्यामुळे रुपांतराच्या गणितातून ती काढून टाकणं योग्य होणार नाही.
नव्या रिकॉलमधलं खरं नवं कॉन्ट्रिब्यूशन आहे ,ते भविष्यातली पृथ्वी दाखवणा-या प्रॉडक्शन डिझाईनचं. मूळ चित्रपटात हे साहस बरंचसं मंगळावर घडतं, पण नव्या चित्रपटातून मंगळ हद्दपार झाला आहे.त्याएेवजी आहे ती प्रगतीच्या आफ्टर इफेक्ट्समधून शिल्लक उरलेली पृथ्वी. किरणोत्सर्गातून बचावलेले ,पृथ्वीच्या दोन टोकांना असणारे दोन भूखंड, त्यावरली भिन्न प्रकारची पण सारख्याच प्रमाणात गजबजलेली लोकवस्ती आणि त्याना जोडणारा पृथ्वीगर्भातून जाणारा ’फॉल’ हा प्रवासमार्ग , हे सारं भव्य तर आहेच ,पण खूप तपशिलात डिझाईन केलेलं आहे. दर भूखंडाचं आर्किटेक्चर, वाहतूकव्यवस्था , नागरिक, त्याना मिळणा-या सुविधा ,या सा-याचा बारीकसारीक विचार झालेला जाणवतो. अँक्शन सीक्वेन्सदेखील फार मेहनतीने उभे केले आहेत , पण त्यावर पीकेडी च्याच कथेपासून स्फूर्ती घेणा-या दुस-या चित्रपटाची, स्पीलबर्गच्या मायनॉरीटी रिपोर्टची छाया जाणवते.
सारं पाहून असं वाटतं कि मूळ चित्रपटाच्या चाहत्याना हा कितपत आवडेल याची खात्री नाही, पण टोटल रिकॉल प्रथमच पाहाणा-याना त्याचं रंजक तरीही विचार करायला लावणारं स्वरुप आवडायला काहीच हरकत नाही. एक मात्र आहे ,की मध्यंतरी आलेल्या वाचोव्स्कींच्या मेट्रिक्स किंवा नोलनच्या इन्सेप्शन सारख्या चित्रपटांनी या संकल्पनेचा बार थोडा अधिकच उंचावला आहे. त्यामुळे शेवटाकडे काही नवा विचार न मांडणं ,नव्या प्रेक्षकांना नक्कीच खटकण्याची शक्यता आहे.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP