चित्रपट कसा पाहावा?

>> Sunday, July 24, 2011

ब्लॉगचे मुख्य लेखक गणेश मतकरी यांच्या `सिनेमॅटिक` या दुस-या लेखसंग्रहाचे प्रकाशन  २२ जुलै २०११ रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पंधराव्या अधिवेशनात शिकागो येथे करण्यात आले. या पुस्तकातील लेखांबाबत गणेश यांचे मनोगत.
- ब्लॉगएडिटर. 


सिनेमा आपल्याला वेढून राहिलेला आहे. आपल्या असण्याचा चटकन जाणवणारा, पण अविभाज्य भाग बनून राहिलेला आहे. एकेकाळी आपल्याला आठवड्यात एकदा  टी.व्ही.वर आणि खास ठरवून केलेल्या चित्रपटगृहाच्या फे-यांमध्ये सिनेमा भेटत असे. आज ती परिस्थिती उरलेली नाही. सिनेमा आपल्याला कुठेही भेटतो. सदा सर्वकाळ चालू असलेल्या केबल चॅनल्सवर, मल्टिप्लेक्समधे, रस्त्यावरच्या डीव्हीडी विक्रेत्यांकडे, इन्टरनेटवरल्या टॉरन्ट साईट्सवर, आयपॅड किंवा मोबाईलच्या छोट्या स्क्रीन्समधून आणि अजून तग धरून असलेल्या फिल्म सोसायट्यांच्या छोट्या-मोठ्या दालनात. त्याचा हा सर्वव्यापी संचार, आपल्याला या माध्यमाची दखल घ्यायला भाग पाडणारा, नुसतंच कुंपणावर न बसता, त्याविषयी ठाम मत बनवण्य़ाची गरज तयार करणारा.
या पार्श्वभूमीवर, चित्रपटाकडे पाहण्याचे दोन प्रमुख दृष्टिकोन आज दिसून येतात.
यातला पहिला आहे, तो मीडिआ विस्फोटाआधीच्या पिढीचा, जी आजही सिनेमाकडे दुरून पाहते. त्याचं आयुष्यातलं स्थान मान्य न करता, केवळ करमणूक हेच सूत्र धरून राहते. बदललेलं चित्रच या पिढीला मान्य नाही. ती रस्त्यावरून डीव्हीडी विकत घेत नाही, इन्टरनेटचा उपयोग फक्त कामापुरता करते, आणि तंत्रज्ञानाच्या सोयी, या आक्रमण असल्याप्रमाणे धुडकावते. याउलट मी़डिआ विस्फोटानंतरची पिढी ही लहानपणापासून चित्रपटांच्या अधिक जवळ आहे. डीजिटल क्रांतीची ती साक्षीदार आहे. जागतिक फिल्ममेकर्स त्यांचे आदर्श आहेत, अन् जगातला कोणताही सिनेमा त्यांच्यापासून दूर नाही. हातातल्या मोबाईल फोन्सने त्यांच्यावर चित्रभाषेचे संस्कार करायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष न भेटताही इन्टरनेटवरल्या गोतावळ्यात पसरलेल्या शेकडो मित्रांबरोबर चर्चा करण्याचा, सिनेमा हा त्यांचा आवडीचा विषय आहे.
आपला समाज हा एकत्रितपणे नांदणा-या या परस्परविरोधी दृष्टिकोनांचा बनलेला आहे. एका परीने `सिनेमॅटिक जनरेशन गॅप` आहे असं देखील म्हणता येईल. मात्र गॅपच्या दोन्ही तीरांवरल्या प्रेक्षकांसाठी चित्रपट माध्यम पुरतं उलगडलंय असं मात्र नाही. सर्व प्रकारचे चित्रपट आज आपल्याकडे असूनही, `चित्रपट कसा पाहावा? ` या मूलभूत प्रश्नाचं निश्चित उत्तर मात्र आजही संदिग्ध आहे.
एक गोष्ट उघड आहे की, चित्रपट हे माध्यम अतिपरिचित आहे. आणि कोणत्याही अतिपरिचित गोष्टीचं खरं मूल्य तपासून न पाहता तिला गृहीत धरणं, ही आपली सवय. त्यामुळेच असेल कदाचित, पण आपण चित्रपटाकडेही वरवरच्या नजरेतून पाहिलं जाणं हे आश्चर्य नसून अपेक्षित आहे.  विरंगुळा, करमणूक ही त्याची ओळख बनण्याचं, हे एक मुख्य कारण आहे.
 विरंगुळा म्हणून पाहणं चूक नाही, पण अपुरं आहे . चूक नाही, कारण ही एक व्यावसायिक कला आहे. प्रेक्षकाचं मन रमवणं हा तिच्याकडून असलेल्या अपेक्षांमधलाच एक भाग आहे. या पातळीवरून पाहिलेला चित्रपट आपल्याला त्याच्या सर्वांगाचं आकलन करून देणार नाही कदाचित , पण एका सर्वसामान्य दृष्टिकोनातून आपल्याला गुंतवणारा जरूर असेल. व्यावसायिक यशाची अपेक्षा असलेला कोणताही चित्रपट, हा या पातळीवरून परिणाम करणारा असतो, असावाच लागतो. मात्र त्यापलीकडे त्याचं आकलन होणं हे चित्रकर्त्यांच्या भूमिकेवर आणि प्रेक्षकांच्या तयारीवर अवलंबून राहतं.
मी चित्रपटाचं पद्धतशीर शिक्षण घेतलेलं नाही, पण चित्रपट जाणून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मी वेगवेगळ्या टप्प्यांवर नियमितपणे करतो. केवळ आवड असताना पाहिलेला सिनेमा, चित्रपटांविषयी लिहायला लागल्यावर नजरेला पडलेला सिनेमा, फिल्म सोसायटीच्या माध्यमांतून दिसलेला जागतिक पातळीवरचा सिनेमा आणि फिल्म सर्कल या छोट्या चित्रपटविषयक स्टडी ग्रुपशी संबंध आल्यावर अभ्यासलेला सिनेमा आठवला की लक्षात येतं, की यातल्या दूर टप्प्यावर तो पाहण्याची पद्धत वेगवेगळी होती. टप्प्यांचं महत्त्व हे, की त्या त्या वेळी माझ्या दृष्टीत बदल होतोय, हे निश्चितपणे जाणवलं.
 चित्रपटाविषयी लिहायला लागल्यावर आवश्यक म्हणून मी जे वाचन केलं, फिल्म सोसायटीने जे जागतिक चित्रपटांचं दालन उघडलं, यामुळे माझ्या लिहिण्यापाहण्यात आपोआप फरक होत गेला. मात्र अधिक उल्लेखनीय फरक झाला तो फिल्म सर्कलमुळे.
फिल्म सर्कल हा सात आठ जणांचा गट होता. त्यात काही दिग्दर्शक होते. काही समीक्षक तर काही फिल्म सोसायटीतली मंडळी. स्वतः दिग्दर्शक अन् अभ्यासक असलेल्या अरूण खोपकरांच्या पुढाकाराने एकत्र आलेला हा गट, त्यांच्याच घरी जमत असे. यावेळी चित्रपट पाहणं आणि त्यावर चर्चा तर होतच असे, पण एकूण माध्यम, त्याचा इतर कलांशी संबंध, त्यातल्या प्रमुख दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धती यांवर बोलणं होई. प्रत्येकाने घेतलेली नवी पुस्तके पाहिली जात, कधी देवाणघेवाण होत असे. लेखांच्या फोटोकॉपी आणि डीव्हीड़ी यांची तर सतत उलाढाल होत असे. प्रत्येकाचं चालू काम, आवडीनिवडी यालाही गप्पात प्रवेश होता. 
या प्रकारे काही एका हेतूने झालेल्या चित्रपट आणि कलाविषयक बोलण्यातून, चर्चेदरम्यान व्यक्त होणा-या मतांनी अन् वयातल्या फरकाने आलेल्या भिन्न अनुभवांनी, गटातल्या सर्वांचाच अमुक एक प्रमाणात फायदा झाला. अर्थात माझाही.
याबद्दल एवढं विस्ताराने लिहायचं कारण म्हणजे आज चित्रपट कसा पाहावा? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अशी स्टडी सर्कल्स ही योग्य जागा ठरेल. आज चित्रपटांच्या उपलब्धतेची कमी नाही, मात्र जितकी उपलब्धता अधिक, तितकाच त्यातलं काय घ्यावं आणि काय़ टाळावं हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा. एकेकाळी फिल्म सोसायट्यांच्या माध्य़मातून प्रेक्षकांच्या निवडीला दिशा देण्याचा प्रयत्न काही प्रमाणात झाला, मात्र आज सोसायट्यांच्या प्रयत्नालाही मर्यादा आहेत. एकतर नियमांच्या चौकटीत राहून त्या कोणते चित्रपट दाखवू शकतील यावर बंधने आहेत, जी स्वतंत्रपणे डीव्हीडी विकत घेणा-याला किंवा इन्टरनेटवरून डाऊनलोड करण्याला नाहीत. त्याशिवाय़ आजच्या धावपळीच्या जीवनपद्धतीत चित्रपटाच्यावेळी पोहोचणं सभासदांना कठीण, ते चर्चेला काय हजेरी लावणार? आज काही जागरुक फिल्म सोसायट्या या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना यश येणं गरजेचं आहे. जोवर ते येत नाही, तोवर चित्रपट रसिकांनी स्वतःच काही उपाय शोधणं शक्य आहे.
 मित्रमंडळी, ऑफिसमधील सहकारी, गृहसंकुलांमधली मंडळं अशा समूहातल्या चित्रप्रेमींनी हा प्रयोग करून पाहणं जमू शकेल. केवळ व्यक्तिगत पातळीवर न राहता किंवा केवळ शेरेबाजी न करता या प्रकाराची छोटी स्टडी सर्कल्स चित्रपटाबद्दलची सतर्कता वाढवताना दिसू शकतील. माध्यमाकडे तेवढ्यापुरता मर्यादित चौकटीतून न पाहता चित्रपट संस्कृतीच्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर पाहण्याची सवय लागेल. या प्रकारच्या गटांमधूनही चित्रपट अभ्यासक-समीक्षक यांना मार्गदर्शनपर भूमिका घेता येईल, पण मला ते फार महत्त्वाचं वाटत नाही. केवळ आपलं मत तयारीनिशी मांडणं, हेच चित्रपट पाहणा-याला त्या मताचा गंभीरपणे विचार करायला लावणारं असतं. संस्काराकडे नेणा-या पहिल्या पायरीइतकं.
चित्रपट ही कला,  आणि तिचं कला असणं निर्विवादपणे सिद्धही झालेलं आहे, साहित्य वा चित्रकलेसारखी एका प्रतिभावंताच्या ताकदीवर अवलंबून असत नाही, तर त्यात अनेकांचा सहभाग असतो.  या चमूचा प्रमुख दिग्दर्शक असला, आणि तोच चित्रपटाचा अंतिम परिणाम ठरवतो हे खरं, पण तरीही यातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा स्वतंत्र विचार आवश्यक आहे. हे चांगला प्रेक्षक जाणतो. तो केवळ  एक एकसंध कलाकृती म्हणून चित्रपटाकडे पाहून तो थांबत नाही. तर दिग्दर्शन, पटकथा, छायाचित्रण, अभिनय अशा तिच्या विविध अंगांकडे तो तपशीलात पाहू शकतो. याचा उघड फायदा म्हणजे  प्रत्येक चित्रपट, अगदी फसलेला असला तरीही, त्याला काहीतरी देऊन जातो. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे घटकांचा स्वतंत्र अभ्यास, त्याला सुट्या कलाकृतीत न अडकवता, एकूण चित्रपट माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी देऊ शकतो.
पाहणारा जर पुरेसा जागरुक असेल, तर ही दृष्टी केवळ माध्यमापुरतीही राहत नाही. एकूण कलाविचार, सामाजिक- राजकीय घटना तसंच समाजशास्त्र, तत्त्वज्ञान यांच्या विस्तृत पार्श्वभूमीवर आणि अनुषंगाने चित्रपटांचा कसा विचार करता येऊ शकतो, हे दाखवून देते.
 `सिनेमॅटीक` या माझ्या दुस-या लेखसंग्रहातलं लिखाण हे या प्रकारचं, एकट्यादुकट्या चित्रपटापलीकडे जाणारे धागेदोरे शोधणारं आहे.
आजचा सिनेमा हा कोलाज असल्यासारखा, वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांनी बनलेला आहे. अर्थगर्भ आणि अर्थहीन, व्यावसायिक आणि कलात्मक, खर्चिक आणि नो बजेट, ३५ मि.मी आणि डीजिटल, पारंपरिक आणि सर्व नियम झुगारणारे, असे सर्व प्रकारचे चित्रपट आज खांद्याला खांदा लावून उभे आहेत. चित्रपटांच्या या भाऊगर्दीत हरवून न जाता पाहिलं, तर काही सूत्रं, काही प्रवाह, काही पॅटर्न्स नजरेला पडतातच.
चित्रपट हे निर्वातात घडत नाहीत. त्याचं प्रत्येकाचं स्थान आणि विचार हे विशिष्ट काळाचे, विशिष्ट प्रदेशाचे आणि विशिष्ट वातावरणाचे असतात. आधी घडून गेलेल्या कामाचा या चित्रपटांना संदर्भ असतो, आणि पुढे होणा-या कामाकडे त्यातून निर्देश केला जातो. हा संदर्भ आणि निर्देश शोधत आजच्या चित्रपटाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न म्हणजेच हा लेखसंग्रह.
मला वाटतं, `चित्रपट कसा पाहावा?`  य़ा प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर म्हणून `सिनेमॅटिक`कडे पाहता येईल.
-गणेश मतकरी

Read more...

कासाब्लान्का - आजही आजचा वाटणारा

>> Sunday, July 17, 2011

असं मानलं जातं की `कासाब्लान्का` चित्रपटाचा शेवट काय व्हावा याच्याबद्दलचा संभ्रम हा चित्रिकरणाच्या अखेरच्या दिवसापर्यंत कायम होता. नायिका इल्साने आपल्या प्रियकर रिकला सोडून क्रांतिकारक नव-याबरोबर अमेरिकेत पलायन करावं, का रिकबरोबर मागे राहून एकट्या नव-यालाच नाझी अधिका-यांपासून दूर, सुरक्षित ठिकाणी जाऊ द्यावं, असा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता. ही गोष्ट ऐकिवात जरूर आहे, पण ती खरी वाटत नाही. कासाब्लान्काचा शेवट इतका सर्व बाजूंनी जमलेला आहे की, त्याहून वेगळ्या शेवटाची कल्पना आज तरी अशक्य वाटते. एका परीने तो सुखांत आहे. सर्व प्रमुख पात्रांना जिवंत ठेवून तो प्रेक्षकांना समाधान तर देतोच, वर रिकच्या पात्राला स्वार्थापलीकडे पाहायला देऊन त्याला एक व्यक्तिरेखा म्हणूनही मोठं करतो. कासाब्लान्का अजरामर होण्यामागे जी अनेक कारणं आहेत, त्यातलं या शेवटाचं अचूक असणं, हे महत्वाचं कारण मानावं लागेल.
दिग्दर्शकीय दृष्टीचा सर्वोत्तम नमुना मानला जाणारा सिटीझन केन (१९४१) आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा कासाब्लान्का (१९४३) हे दोन चित्रपट एकमेकांपासून केवळ दोन वर्षांच्या अंतरावर येणं, हे हॉलीवूडसाठी या काळाची महती सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे.
कासाब्लान्का जेव्हा बनत होता तेव्हा, अन् प्रदर्शित झाला तेव्हाही, ही कलाकृती एवढी गाजेल असं कोणाच्या गावी नव्हतं. सिटीझन केनप्रमाणे तिच्याभोवती आधीपासून वलय नव्हतं,वा ती एखाद्या वादातही सापडलेली नव्हती. दिग्दर्शक मायकेल कर्टीझ हे अनुभवी दिग्दर्शक असूनही त्याच्या कामासाठी हा चित्रपट ना तेव्हा ओळखला गेला, ना आज हे नाव कासाब्लान्काशी जोडलेलं दिसतं.
प्रदर्शनानंतर चित्रपट उत्तम चालला, मात्र त्याची कीर्ती पसरत गेली, ती पुनर्प्रदर्शनातून आणि व्हिडीओ रिलीजमधून. आज कासाब्लान्का म्हणताच आठवतात ते हम्फ्रे बोगार्ट आणि इनग्रीड बर्गमन, मात्र ही दोघं देखील निर्मात्यांची प्रथम पसंती नव्हते. कासाब्लान्का ज्या नाटकावर आधारित होता ते देखील खूप महत्वाचं नाटक नव्हतं.
या सा-याच गोष्टींमध्ये एकप्रकारची अनिश्चितता दिसून येते, मात्र यशाला गणित नव्हतं. थोडा फॉर्म्युला, थोडी स्टार पॉवर, उत्तम पटकथा आणि बरेच योगायोग यांच्या जिवावर कासाब्लान्का गाजत राहिला. आजही त्याचं नाव सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अनेक याद्यांत स्थान मिळवून आहे, आणि आजही तो पाहाताना आपण गुंग होऊन जातो.
चित्रपट घडतो १९४१ मधे, नाझी साम्राज्याच्या वाटचालीदरम्यान, जर्मन फौजांच्या जाचातून सधन अमेरिकेकडे पलायन करण्याची इच्छा असणा-या युरोपीय नागरिकांसाठी `कासाब्लान्का` हे छोटंसं गाव खूप महत्वाचं ठरलेलं. इथूनच त्यांच्या सुटकेचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. मात्र तो खुला कऱण्याचा परवाना मात्र दुर्मिळ आहे. अनेकजण तो मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काहीच न घडता घडण्याचा आभास मिरवणारं, उत्साहाचा खोटा आभास तयार करणारं इथलं वातावरण हे चित्रपटाच्या कथानकासाठी योग्य ती पार्श्वभूमी तयार करणारं आहे.
रिक (बोगार्ट) कासाब्लान्कामधे एक नाईट क्लब चालवतो. रिकचा राजकीय त्रयस्थपणा हा त्याच्या नाईटक्लबच्या अन् स्वतःच्याही शिल्लक राहण्यामागचं प्रमुख कारण आहे. इथल्या पोलीस खात्याचा प्रमुख कॅप्टन रेनो (क्लॉड रेन्स) हा देखील त्याच्या मैत्रीत आहे तो या त्रयस्थपणामुळेच. मात्र नाझींना उघड विरोध करणारा चेक क्रांतिकारक पीटर लाझ्लो (पॉल हेन्रीड) आणि त्याची पत्नी इल्सा (बर्गमन) या गावात येतात आणि रिक धर्मसंकटात पडतो. पॅरिसमधे असतानाचं आपलं इल्साबरोबरचं प्रेमप्रकरण रिक विसरू शकत नाही. अन् तिचं लाझ्लोबरोबरचं अवतरणं त्याला विश्वासघात वाटतो. कर्मधर्मसंयोगाने लाझ्लोला अमेरिकेत पाठविण्यासाठी आवश्यक असलेला परवाना रिककडे असतो, मात्र लाझ्लोच्या कामाचा मोठेपणा लक्षात घेऊनही इस्लाला माफ करणं रिकला जड जाणारं असतं.
मुळात नाटकावर आधारित असलेल्या कासाब्लान्काचा नाटकासारखा आकार हा लपणारा नाही. इथल्या ब-याच घटना या रिकच्या नाईट क्लबमध्ये घडतात आणि पॅरिसमधल्या दिवसांचा छोटेखानी फ्लॅशबॅक अन् अखेरचा एअरपोर्ट वरला प्रसंग, हीच काय ती थोडी वेगळी पण अनावश्यक स्थळं आहेत. मात्र हा आकार असूनही फारसं बिघडत नाही, उलट काही प्रमाणात फायदाच होतो. चित्रपट यामुळे नाटकातल्या प्रवेशांप्रमाणे मोठे प्रसंग अन् अर्थपूर्ण संवाद रचण्यावर आपलं लक्षं केंद्रित करतो. घटना घडण्याच्या वेगापेक्षा त्या ठाशीवपणे सावकाश घडविण्याकडे लक्ष दिल्याने इथलं नाट्य चढत जातं.
चित्रपट आला तेव्हा बोगार्टची प्रतिमा ही साहसपट अन् फिल्म न्वार वर्गातले चित्रपट यामध्ये रुळलेली होती. त्यामुळे इथली रोमॅण्टिक पार्श्वभूमी प्रेक्षक कसे चालवून घेतील हा प्रश्नच होता. मात्र त्याच्या इतर भूमिकांचा ठसा इथे पूर्ण काढण्यात आला नव्हता, आणि हे या व्यक्तिरेखेच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी फायद्याचं ठरलं. बोगार्ट अन् बर्गमन यांची इथली कामं उत्तम आहेत. यात वादच नाही, पण त्यांना तुल्यबळ वाटेल अशी इथली भूमिका आहे, ती पोलीस अधिकारी रेनोची. क्लॉड रेन्सने या भूमिकेला दिलेला मिश्किलपणा या पूर्णपणे भ्रष्ट अन् भल्याबु-याची चाड नसलेल्या पात्राला सहानुभूती मिळवून देतो.
ही पात्रं लक्षात राहायला कारण, त्यांची अभिनेता म्हणून असणारी ताकद तर आहेच, मात्र त्याबरोबर त्यांच्यासाठी लिहिले गेलेले संवादही. या चित्रपटातील अनेक वाक्य अजरामर झालेली आहेत. आणि त्यांचं कुठेही वापरलं जाणं हे ताबडतोब कासाब्लान्काची आठवण जागवणारं आहे. `हिअर इज लुकिंग अ‍ॅट यू किड` , `वुई`ल  ऑलवेज हॅव पॅरिस` किंवा   `लुईस, आय थिंक धिस इज द बिगिनिंग ऑफर ब्युटीफुल फ्रेण्डशीप `  अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. पुढल्या काळात कासाब्लान्काचा प्रभाव हा अनेक चित्रपटांवर पडलेला दिसतो. बोगार्टने पुढे केलेल्या  `टू हॅव अ‍ॅण्ड हॅव नॉट` आणि `सिरॉको`वर कासाब्लान्काचा प्रभाव होता, तर  `ए नाईट इन कासाब्लान्का` किंवा वुडी अ‍ॅलनची प्रमुख भूमिका असणारा  `प्ले इट अगेन सॅम` यामधे त्याचा विनोदी पद्धतीने वापर करण्यात आला होता. सिडनी पोलाकच्या `हवाना`सारखी काही आधुनिक रूपांतरही पुढल्या काळात केली गेली. मात्र या आधुनिक रुपांतराची फार गरज वाटत नाही वा प्रभाव पडत नाही, कारण मूळ चित्रपटच पुरेसा आधुनिक आहे. एखादी गोष्ट मोडलेली नसेल, तर ती दुरूस्त करण्याच्या फंदात पडू नये, असं म्हणतात. हॉलीवूडच्या बाबतीत, एखादा चित्रपट कालबाह्य झाला नसेल तर त्याची आधुनिक आवृत्ती काढायला जाऊ नये, असा अलिखित नियम काढायला हरकत नाही. चित्रकर्त्यांची अनेक आर्थिक संकटं टळायला त्याची नक्कीच मदत होईल.
- गणेश मतकरी

Read more...

सिटीझन केन - केन, वेल्स आणि हर्स्ट

>> Sunday, July 10, 2011

बहुतेक चित्रपट हे `अमुक` एका चित्रपटाच्या व्याख्येत बसणारे आणि पर्यायाने त्या चित्रप्रकाराचे अलिखित नियम पाळणारे असतात. विशिष्ट नियमांच्या चाकोरीत फिरत असल्यानेच हे प्रकार सहसा एकमेकांमध्ये मिसळताना दिसत नाहीत. मात्र याला अपवाद आहेत. अनेकदा हे अपवाद त्यांच्या आशयाच्या विविधतेने अन् विक्षिप्त रचनाकौशल्याने अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. १९४१मध्ये पंचविशीतल्या ऑर्सन वेल्सने केलेला `सिटीझन केन` हे अशा अपवादात्मक चित्रपटांमधलं एक महत्त्वाचं उदाहरण. रहस्यपट, चरित्रं, मेलोड्रामा, माहितीपट अशा अनेक चित्रप्रकारांमधला त्याचा वावर सहज आणि पुन्हा पुन्हा अभ्यासण्यासारखा आहे. सिटीझन केन आणि ऑर्सन वेल्स यांच्याविषयी बोलताना दोन प्रश्नं साहजिकच उपस्थित होतात. हा खरोखरंच जगातला सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे का, हा पहिला, आणि पर्यायाने वेल्स हा जगातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे का ? हा दुसरा.
यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यामानानं सोपं आहे. चित्रपटाच्या निर्मितीआधी आर.के.ओ.ही चित्रसंस्था फारच डबघाईला आली होती. आधी रंगभूमी आणि रेडिओवर नाव केलेल्या वेल्सला नवशीक्या कलावंतांसह हा चित्रपट उभा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देणं, हा त्यांचा परिस्थिती बदलण्याचा अखेरचा प्रयत्न होता. हे स्वातंत्र्य वेल्सने कारणी लावलं आणि ही उत्कृष्ट निर्मिती केली. मी `सिटीझन केन`ला अगदी पहिल्या क्रमांकाचा एकमेव मानकरी ठरवणार नाही, पण सर्वोत्कृष्ट पाच चित्रपटांची निवड करायची झाली, तर त्यात हे नाव नक्की असेल.
कथानकाची मांडणी, चित्रिकरण, आशयाची खोली आणि अभिनयाचा दर्जा, यात `केन`  काळाच्या इतका पुढे होता, की आज सत्तर वर्षानंतरही तो आपली पकड ढिली करायला तयार नाही.
अनेक अभिजात म्हणवणा-या कलाकृती काळाबरोबर आपला प्रभाव घालवून बसतात, अन् तात्कालिन संदर्भाशिवाय त्यांची ओळख पुरी होऊ शकत नाही. `सिटीझन केन` मात्र गुणवत्तेत कोणत्याही चित्रपटापुढे कमी पडणार नाही. आजदेखील.
दुस-या म्हणजे वेल्स सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे का, या प्रश्नाचं उत्तर मात्र थोडं गोंधळात टाकणारं आहे. केवळ केनच्या बाबतीत म्हणावं, तर वेल्सने आपली कर्तबगारी सिद्ध केलेलीच आहे. पण दिग्दर्शकाचं मूल्यमापन हे एका निर्मितीवर न करता एकूण कारकिर्दीकडे पाहून करावं लागतं. आणि या दिग्दर्शकाच्याबाबत ते होणं शक्य नाही. सिटीझन केनने तोंड फोडलेल्या वादाचा ऑर्सन वेल्स बळी ठरला, तो कायमचाच. त्याने नंतर केलेल्या कामातले अनेक चित्रपट हे या वादाचे अप्रत्यक्ष बळी ठरले, अनेकांवर निर्मात्या संस्थांनी ताबा घेऊन अक्षम्य काटछाट केली, काही बंद पडले. या दुर्दैवी वागणुकीमुळे आज असलेल्या त्याच्या चित्रपटांचा आढावाही अपुरा, अन्यायकारक ठरतो. हा अन्याय अधिक जाणवतो तो `सिटीझन केन` च्या परिपूर्ण रूपाकडे पाहून.
 ऑर्सन वेल्स आणि प्रसिद्ध पटकाथाकार हर्मन मॅन्कीविज यांनी केलेल्या संहितेतच चित्रपटाच्या वादाची सुरुवात आहे, आणि तिला जबाबदार आहे, तो चित्रपटातल्या चार्ल्स फॉस्टर केन या नायकावर असणारा एक्झामिनर वृत्तसमूहाचा मालक `विलिअम रॅन्डॉल्फ हर्स्ट` याचा प्रभाव. केनची व्यक्तिरेखा हर्स्टवर आधारलेली होती वा नव्हती यावर मतभेद आहेत, मात्र ती आजिबात आधारली नव्हती असं म्हणणंही योग्य नाही. व्यक्तिरेखा ही नेहमी दोन पातळ्यांवर दिसते. तिच्या सामाजिक आयुष्याचे तपशील, तिची जनमानसातील प्रतिमा ही पहिली पातळी, तर तिचा व्यक्तिगत अवकाश ही दुसरी. केन हा पहिल्या पातळीसाठी हर्स्टवर अवलंबून आहे. दुस-या पातळीवरले तपशील मात्र खरंतर स्वतः  ऑर्सन वेल्सच्या स्वभावाशीच अधिक मिळते जुळते आहेत.
हर्स्टच्या सामाजिक प्रतिमेवर आधारित असणं सहज पडताळून पाहण्याजोगं. एक्झामिनरशी समांतर असं एन्क्वायर वृत्तपत्र, स्पॅनिश अमेरिकन युद्धाबद्दल केनच्या तोंडी असणारं हर्स्टचं वाक्य (यू प्रोव्हाईड द पिक्चर्स, आय विल प्रोव्हाईड द वॉर), हर्स्टच्या `रान्च` या महालासारख्या घराला समांतर असं केनचं `झनाडू`, आपल्या प्रेयसीच्या करिअरसाठी हर्स्टने केलेल्या प्रयत्नाचा संदर्भ अशी अनेक साम्यस्थळं चरित्र आणि चित्रपटात आहेत. केनमधल्या रहस्याच्या केंद्रस्थानी असणारा शब्द `रोजबड़` हा देखील हर्स्ट आणि त्याची प्रेयसी मॅरीअन डेव्हिस यांच्याशी जवळून जोडलेला आहे. चित्रपटात मात्र या रहस्याचं उत्तर प्रत्यक्ष आय़ुष्यापेक्षा वेगळं आहे. 
मात्र हे वरवरचे तपशील सोडले, तर केन हा हर्स्ट नव्हे. त्याच्या केंद्रस्थानी असणारा मुद्दा देखील या तपशीलापलीकडला आहे, मानवतेशी जोडलेला आहे.
चित्रपट सुरू होतो, तोच मृत्यूशय्येवरल्या केनपासून. एकटा पडलेला केन आपल्या वस्तूसंग्रहालयासारख्या घरात प्राण सोडतो. तेव्हा त्याच्या तोंडावर `रोजबड़` हाच शब्द असतो. या संदर्भहीन शब्दाने गोंधळलेला एक वार्ताहर या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न, शोध म्हणजे हा चित्रपट.
चित्रपटाची निवेदनशैली ही केवळ त्याकाळातच नव्हे, तर आजही नवी वाटणारी आहे. लिनीअर पद्धतीने किंवा एकामागून एक घटना घडवत हा चित्रपट आकाराला येत नाही. इथे सुरुवातीलाच आपल्याला केनला आदरांजली वाहाणारा, त्याच्या आय़ुष्यातल्या घटना दाखवून देणारा एक मोठासा माहितीपट दाखविला जातो. मात्र इथली माहिती ही जुजबी, त्रोटक. वार्ताहराचा तपास सुरू झाला, की त्याने मिळविलेली माहिती, त्याने घेतलेल्या मुलाखती, या आपण माहितीपटात पाहिलेल्या गोष्टींना अधिक खोलवर जाणारा अर्थ देऊ करते. वेळप्रसंगी एकच गोष्ट अनेकांच्या दृष्टिकोनातून घडवली जाते, आणि ख-याचा निवाडा प्रेक्षकांवर सोडला जातो. केन कुठेही फसवत नाही. इथल्या प्रत्येक कोड्याला तंत्रशुद्ध उत्तर आहे, अगदी `रोजबड़`ला देखील.
निवेदन शैलीबरोबरच ग्रेग टोलँडचं छायाचित्रणदेखील केनला ब-याच उंचीवर नेऊन ठेवतं. इथलं कृ्ष्णधवल छायाचित्रण, हे आजही कोणत्याही रंगीत चित्रपटाला मान खाली घालायला लावेल. ऑर्सन वेल्सने इथे कॅमेरापुढल्या घटनांबरोबरच पार्श्वभूमीदेखील स्पष्ट दाखवून देणा-या `डीप फोकस` तंत्राचा प्रयोग केलेला आहे. रेन्वारच्या `रुल्स ऑफ द गेम` चित्रपटाचा अभ्यास इथे उपयोगी पडला असला, तरी संकल्पनेपासून, ते छायाचित्रणापर्यंत आणि अभिनयापासून संकलनापर्यंत ऑर्सन वेल्सची स्वतंत्र दृष्टी ही सतत जाणवण्यासाऱखी.
हर्स्ट केनचं प्रदर्शन रोखू शकला नाही. मात्र त्याने चित्रपटाच्या विरोधात उघडलेली मोहीम वेल्सला चांगलीच भोवली. एकूणएका समीक्षकाने कौतुक करूनही केनला तिकीट खिडकीवर यश मिळालं नाही. आर.के.ओ.ने हात राखून केलेलं मर्यादित प्रदर्शन आणि हर्स्टने चालवलेली बदनामी याचा हा एकत्रित परिणाम होता.
मात्र चित्रपटाबरोबर सिटीझन केनची गोष्ट संपली नाही. वेल्सने चित्रित केलेला केन हा तरुणपणी यशाच्या शिखरावर असतो. पुढे काळंच त्याला नमवतो आणि मरतेवेळी तर तो अगदीच एकटा पडलेला असतो. ऑर्सन वेल्सची पटकथा पुढे त्याच्याच आयुष्याचं प्रतिबिंब ठरली. तरुणपणी नाटक, रेडिओ अन् चित्रपटात प्रतिभासंपन्न ठरलेला हा सर्जनशील कलावंत नियतीच्या धक्क्यांनी नामशेष होत गेला.
या काळात `सिटीझन केन` चित्रपटाची किर्ती मात्रं वाढत गेली. लवकरच त्याच्या भोवती हर्स्टने निर्माण केलेलं जाळंही विस्तारत गेलं. आश्चर्य म्हणजे पुढल्या काळात हर्स्टच्या प्रतिमेभोवतालचं वलय या चित्रपटाने वाढत गेलं. गंमतीची गोष्ट म्हणजे जो चित्रपट नाहीसा करण्यासाठी हर्स्ट झटला, त्याचंच नाव हर्स्टला चिकटलं. स्वॅनबर्गने लिहिलेल्या हर्स्टच्या चरित्राचं नाव `सिटीझन हर्स्ट` असणं, हा त्याचाच पुरावा नाही का ?.
कला ही वास्तवाचं प्रतिबिंब असते, का वास्तव कलेचं? असा एक वाद अनेक  वर्षांपासून सुरू आहे. सिटीझन केनने मात्र हा प्रवास दुहेरीदेखील असू  शकतो, हे पुराव्याने सिद्ध केलं.
-गणेश मतकरी.

Read more...

डेली बेली- माफक नवी वाट

>> Sunday, July 3, 2011

जेव्हा एखादा वेगळ्या प्रकारचा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा तो पाहिला जाण्यासाठी प्रेक्षकांची मनःस्थिती तयार असणं आवश्यक असतं. आजकाल चित्रपटांचा प्रमुख व्यवसाय हा पहिल्या चार दिवसात होणारा असल्याने, अन् पूर्वीसारख्या ज्युबिल्या करणं शक्य नसल्याने प्रेक्षकांना मत तयार करण्यासाठी, माऊथ पब्लिसिटीसाठी वेळ देऊ करणं हे नव्या चित्रपटांना शक्यच नसतं. त्यामुळे `मार्केटिंग` या संस्थेला चित्रपट क्षेत्रात फार महत्त्व आलेलं आहे. आमिर खान प्रॉडक्शनने आपल्या सर्व चित्रपटांच्या बाबतीत वेगळेपणा आणणं आणि तो प्रेक्षकांना पचण्यासाठी आवश्यक ते मार्केटिंग जमवणं या दोन्ही गोष्टी करून दाखविलेल्या दिसतात. `लगान`पासून `धोबीघाट`पर्यंत आमिर खानची प्रत्येक निर्मिती ही या निकषांवर उतरणारी असल्याचं आपल्या लक्षात येईल. `डेली बेली` हा त्याचा नवा चित्रपटही त्याला अपवाद नाही.
 `डेली बेली` बद्दल बारीक सारीक बातम्या तर अनेक दिवस कानावर पडताहेत. तिचं अ‍ॅडल्ट कॉमेडी असणं, त्यातल्या भाषेचा धीटपणा, अभिनय देव या जाहिरात क्षेत्रात पारंगत दिग्दर्शकाची निवड. प्रमूख भूमिकेसाठी आधी रणबीर कपूर अन् पुढे इम्रान खान येणं या सर्व गोष्टी आपण ऐकत होतोच, पण ख-या अर्थाने वातावरण निर्मितीला सुरुवात झाली, ती  `बोस डी.के` गाण्याच्या रिलीजपासून, अन् त्यानंतर संस्कृतीरक्षकांपासून ते इतर चित्रकर्त्यांपर्यंत अनेकांनी व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनाच्या आधारे.
डी.के.बोसची तथाकथित वादग्रस्तता का आहे, हे आपण जाणतोच, आणि ती निरर्थक कशामुळे आहे, हे देखील थोडा अधिक विचार करताच आपल्या लक्षात येईल. या प्रकारची भाषा आज आपण सर्वत्र ऐकतो, त्यात धक्कादायक काही उरलेलं नाही. चित्रपट प्रौढांसाठीच असल्याने तिथे मूळातच आक्षेप असण्याचं कारण नाही. पण टी.व्ही/रेडिओवर ही गाणी ऐकून मुलांवर वाईट संस्कार होतील असं म्हणणं, हे आपण भवतालच्या वास्तवाबद्दल अनभिज्ञ आहोत असंच सिद्ध करणारं आहे. रस्त्यावरून जाताना बस-ट्रेनमध्ये, कॉलेजमधे या प्रकारची भाषा सर्रास वापरली जाते. त्यातही, या प्रकारच्या शिव्या कोणी त्यांच्या अर्थासाठी देत नाही, तर ती एक बोलण्याची पद्धत बनून गेली आहे. ती तशी बनणं आणि ती आपल्या अंगवळणी पडणं, हे काही फार कौतुकास्पद नाही, हे मान्य, पण तिचं अस्तित्त्व अमान्य करून केवळ चित्रपटातल्या गाण्यांना विरोध करणं हे मूर्खपणाचं, त्याखेरीज इन्टरनेटमधून खरोखरंच वाईट संस्कारांची शक्यता असलेल्या अनेक गोष्टी घराघरात थेट पोहोचत असताना, `बोस डी.के` कडे पाहून भुवया उंचावणं, तर अगदीच निरर्थक. असो. तरीही बोस.डी.केच्या वादाचं महत्व हे की,  `डेली बेली` या चित्रपटात असं काही आक्षेपार्ह, आपल्या अभिरूचीच्या सांकेतिक चौकटीत न बसणारं आहे, हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं, आणि त्यांच्या मनाची तयारी व्हायला लागली. हा वेगळेपणा पुढे `नग्गदवाले डिस्को` या स्पूफने किंवा `सैगल ब्लूज`ने चालू ठेवला, आणि  `डेली बेली` कसलीच `सँक्टीटी` ठेवणार नाही असं प्रेक्षकांना जाणवायला लागलं. काहीतरी `इन्टरेस्टिन्ग`, पण आपल्या  नेहमीच्या चौकटीत न बसणारं पाहायला मिळणार अशी खात्री प्रेक्षकांना वाटायला लागली.
 `डेली बेली` च्या वातावरणनिर्मितीने जे सुचवलं, ते त्यांनी करून दाखवलं, हे उघड आहे. अतिशय अर्वाच्य भाषा वापरणारा आणि भारतीय प्रेक्षकाच्या अभिरुचीला न सवयीच्या विषयांना बगल देणारा हा चित्रपट आहे. अर्थात खान/देव/वर्मा (पटकथाकार) ही मंडळी काही एखादा नवाच चित्रप्रकार सुरू करतायत असं वाटू नये, कारण इथे दिसणारा फॉर्म्युलाही जागतिक चित्रपटांमधला जुना आणि जाणता आहे. गाय रिचीच्या  `लॉक स्टॉक अँन्ड टू स्मोकिंग बॅरल्स` आणि  `स्नॅच` ची आठवण करून देणारी ही सिच्युएशनल कॉमेडी आहे. कथेबाबत पाहिलं, तर ही सहीसही नक्कल नव्हे, पण पैशाच्या चणचणीतले मित्र, ब्लॅकमेलिंगचे सबप्लॉट्स, बदलणा-या पॅकेजेसचे घोटाळे, अण्डरवर्ल्डमधली चमत्कृतीपूर्ण अन् विनोदी मंडळी हे सारे घटक खूपच परिचयाचे आहेत. केवळ हिंदी चित्रपट पाहणा-यांना नसतील कदाचित, पण डेली बेली पाहणारा प्रामुख्याने शहरी वळणाचा मल्टीप्लेक्स प्रेक्षकवर्ग हा थोडाफार इतर देशांचे चित्रपटही पाहत असेल, अशी अपेक्षा.
ताशी (इम्रान खान), नितीन (कुणाल रॉय कपूर) आणि अरूण (वीर दास) हे एका अत्यंत बेकार घरात एकत्र राहतात. खरं तर घर इतकं बेकार असण्याची गरज नाही. कारण निदान ताशी घरचा बरा असावा, अन् नितीन फोटोग्राफीबरोबरच ब्लॅकमेलिंगचा जोडधंदा करीत असल्याचं मधेच एका प्रसंगात सांगितलं जातं. पटकथा ते सोडून देऊन कथानकात न वापरण्याचा अक्षम्य गुन्हा करते, पण ते सध्या बाजूला ठेवू. अरूण मात्र पैशाची चणचण असणारा गरीब कार्टूनिस्ट आहे. ताशीची मैत्रीण त्याला एक पॅकेज अमुक अमुक पत्त्यावर पोहोचवायला सांगते. पण आपल्याच कामात अडकलेला ताशी ते पोहोचवू शकत नाही. नको त्या ठिकाणी खादाडी करून जबदस्त पोटदुखीने पिडलेला नितीन डॉक्टरी तपासणीसाठी एका वेगळ्याच गोष्टीचं पॅकेज करून ठेवतो अन् अपेक्षेप्रमाणे पॅकेजेसची अदलाबदल होते. मूळ पॅकेजमधल्या हि-यांऐवजी भलतीच गोष्ट हातात पडल्याने पिसाळलेला माफिआ डॉन (विजयराज) प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवतो. अन् पळापळीला सुरुवात होते.
 `डेली बेली` ची सर्वात मोठी हुशारी म्हणजे मध्यंतर टाळणं. यामुळे एकदा कथेत गुरफटल्यानंतर तो प्रेक्षकांना त्याबाहेर येऊन विचार करायला उसंत देत नाही. विचार केला तर प्रेक्षकांना लक्षात येईल, की मुळात या प्रकारच्या चित्रपटांमधे जितकी गुंतागुत हवी, तितकी या पटकथेत नाही.  `फार्स`च्या फॉरमॅटमधे आशयाला महत्व नाही, हे खरं, पण या आशयाच्या जागा सतत होणा-या गोंधळाने भरून काढली पाहिजे.
प्रमुख पात्रांवरची संकटाची मालिका ही चढत्या क्रमाने परिणाम वाढवणारी हवी. इथे मात्र तसं होत नाही. इथली गुंतागुंत दोन-तीन टप्प्यांपलीकडे जात नाही, अन् उरलेला वेळ हा विनोद करण्यात काढण्याची गरज चित्रकर्त्यांना वाटते. ही गरज हेच कारण मुळात  `डेली बेली` च्या धक्कादायक भाषेच्या मुळाशी आहे. काही प्रमाणात धक्का देणं, एरवी वापरात असलेल्या मात्र चित्रपटात अपेक्षित नसणा-या भाषेला वापरणं, काही बरे अश्लील विनोद करणं, यात ती प्रेक्षकाला रमवते आणि पटकथेची सिम्प्लीसिटी लपवते.
गंमत म्हणजे मला स्वतःला हा चित्रपट प्रौढांसाठी असण्याचं कारण कळत नाही. धावपळ, मारामा-या आणि डेली बेलीची बरीच जागा अडवणारा  `पॉटी ह्यूमर`  या तीनही गोष्टी बालप्रेक्षकांना अत्यंत प्रिय आहेत. भाषेच्या संस्काराचा मुद्दा असला तरी प्रौढ प्रेक्षकाइतका मुलं त्याचा बाऊ करणार नाहीत, हे उघड आहे. त्यामुळे इम्रान खान, पूर्णा जगन्नाथन असणा-या हॉटेल रूममधील प्रसंगासारख्या मोजक्या जागा सोडल्या, तर हा सहजच बालप्रेक्षकांना आवडेलसा चित्रपट आहे. ही फार्सिकल कॉमेडी आहे, पण सेक्सकॉमेडी नाही याची जिज्ञासूंनी नोंद घ्यावी.
 `डेली बेली`  हा त्या जातीच्या जागतिक चित्रपटांइतका परिणामकारक नसला तरी त्याची जातकुळी त्याच प्रकारची आहे. मध्यंतर टाळणं अन् गाणी प्रामुख्याने पार्श्वभूमीला अन् श्रेयनामावली दरम्यान, हे त्यामुळेच होतं. गाण्याचं असं होणं, हे दुर्दैवी, कारण इथला साउंडट्रॅक हा खरोखर उत्तम आहे.  `भाग डी.के. बोस`,`नग्गदवाले`  तुकड्यातुकड्यात वाजणं,  `जा चुडैल` अर्धवट येणं आणि `सैगल ब्लूज` केवळ खोलीदर्शनात घडवणं हे विनोदाची मोठी संधी घालवणारं आहे. हा गाण्यांवरचा अन्याय काही प्रमाणात का होईना पण भरून निघतो, तो अखेरच्या  `आय हेट यू` (लाईक आय लव्ह यू) या एल्व्हिसपासून मिथून चक्रवर्तीपर्यंत अनेकांची आठवण जागी करणा-या, आमिर खान स्टारिंग आयटेम साँगमुळे. या गाण्याकडे चित्रपटातही वेगवेगळ्या जागी निर्देश केला जातो, हे विशेष. ताशीने घेतलेली गायिकेची मुलाखत, अरूणचं थिएटरबाहेर मैत्रिणीची वाट पाहत थांबणं, त्याच्यावरचा अशा चित्रपटांचा  `जा चुडैल` दरम्यान दिसणारा प्रभाव, या सगळ्याचं हे कन्क्लूजन आहे. ते संपताना होणारी डिस्को फायटर या आगामी चित्रपटाची अनाऊन्समेन्ट देखील तितकीच गंमतीदार. हा चित्रपट खराखुरा येण्याची शक्यता नसल्याबद्दल हळहळ वाटायला लावणारी.
 `डेली बेली`  पाहावा का, याचं सोपं उत्तर उघडंच पाहावा असं आहे. आपल्या साचेबद्ध चित्रपटांनी निवडलेली कोणतीही नवी वाट निश्चितच प्रोत्साहन देण्यासारखीच. मात्र तो पाहाताना अखेर ही बॉलीवूड  निर्मिती असल्याचं, आणि  आपल्या अपेक्षा एका मर्यादेतच पु-या होतील याची जाणीव असणं आवश्यक .
- गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP