एलिअन : कोवेनन्ट - अपेक्षा उंचावणारा

>> Sunday, May 14, 2017
नोट- स्पाॅयलर्स आहेत. खूप नाहीत, पण आपल्या जबाबदारीवर वाचावं

रिडली स्काॅटने १९७९ मधे प्रदर्शित झालेला एलिअन बनवला, तेव्हा त्याचा एकच चित्रपट आलेला होता, ड्युएलिस्ट (१९७७) . ड्युएलिस्टला कॅन महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता आणि या पार्श्वभूमीवर स्काॅट जर  जाॅर्ज ल्यूकसच्या  स्टार वाॅर्सने इतका प्रभावित झाला नसता, तर कदाचित त्याचं चित्रपटातलं करिअर वेगळ्याच दिशेला गेलं असतं असं म्हणायला जागा आहे. पण तसं झालं नाही. स्काॅटला नवं तंत्रज्ञान आणि विज्ञानपट याला भविष्यात महत्व येइलसं दिसलं आणि त्याचा मार्गच बदलला. एलिअन आणि फिलिप के डिकच्या 'डू अॅन्ड्राॅइड्स ड्रीम आॅफ इलेक्ट्रीक शीप?' या कादंबरीवर आधारीत ब्लेडरनर ( १९८२ ) या दोन महत्वाच्या कल्ट स्टेटस मिळालेल्या  सायन्स फिक्शन चित्रपटांचं श्रेय स्काॅटकडे जातं.ब्लेडरनरला तेव्हा फार व्यावसायिक यश मिळालं नाही पण पुढल्या व्हिडीओ कसेट इरामधे त्याची किर्ती पसरायला लागली आणि आज मास्टरपीस मानल्या जाणाऱ्या चित्रपटांमधे त्याची गणना होते. लवकरच 'ब्लेडरनर २०४९' हे डेनिल विलेनेव दिग्दर्शित सीक्वलही येऊ घातलय

एलिअन बाॅक्स आॅफिसवर खूपच यशस्वी ठरला. त्याने सायन्स फिक्शन हाॅररचं एक नवं पर्व सुरु केलं, नायिकाही अॅक्शन हिरो म्हणून कास्ट होऊ शकतात हे सिगर्नी वीव्हरच्या रिपली या व्यक्तीरेखेने सिद्ध केलं आणि या चित्रपटामुळे स्काॅट स्वत:देखील एक महत्वाचा व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय ठरला. एलिअन हे एकच फ्रॅन्चाईज असं असेल की ज्याचे सारे भाग तितकेच यशस्वी ठरले नसले, तरी ते सारेच अतिशय महत्वाच्या दिग्दर्शकांकडून बनवले गेले. पैकी दुसरा भाग एलिअन्स (१९८६) जेम्स कॅमेरोन ने बनवला, तिसरा एलिअन ( १९९२) डेव्हिड फिंचरने, तर चौथा एलिअन रेजरेक्शन (१९९७), ज्याॅं-पिएर जोने ( एमिली, व्हेरी लाॅंग एन्गेजमेन्ट ) या फ्रेंच दिग्दर्शकाने

स्काॅट पुन्हा मालिकेकडे वळला तो २०१२ च्या प्रोमिथिअस पासून, तेही प्रीक्वल्समधून मूळ चित्रपटाआधी तीस वर्ष घडणाऱ्या काळातलं कथानक मांडत. प्रोमिथिअस जरी एलिअन मालिकेच्या विश्वात घडत असली, तरी ती नेहमीची एलिअन फिल्म नाही. तिच्या नावातही एलिअन नसणं आणि चित्रपटातही मूळ एलिअन (अर्थात झेनोमाॅर्फ) फार काळ नसणं यावरुनही ते स्पष्ट आहे. प्रोमिथिअसमागचा हेतू एलिअन प्रीक्वल्सची पार्श्वभूमी तयार करणं हा आहे, आणि खऱ्या अर्थाने एलिअन: कोवेनन्टलाच प्रीक्वल त्रयीचा पहिला भाग मानायला हवं. यात दाखवलेल्या घटना एलिअन चित्रपटातल्या घटनांआधी वीस वर्ष घडतात, त्यामुळे उरलेल्या काळातल्या घटनांमधून आपण एलिअनपर्यंत पोचण्यासाठी आणखी दोन भाग येणं अपेक्षित आहे

मी एलिअन: कोवेनन्टबद्दलच्या काही प्रतिक्रियांमधे एकलं, की तो ' मोर आॅफ सेम' आहे. इतरांसारखाच आहे, खूप वेगळा नाही. असं मत असलेल्यांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक तर प्रोमिथिअस धरुन हा एलिअन मालिकेतला सहावा भाग आहे. इतक्या उशीरा मालिकेतला एक चित्रपट संपूर्ण वेगळ्याच प्रकारचा असावा ही आपली अपेक्षा का आहे? मला विचाराल तर नव्या भागांमधे मूळ सूत्र बदलताही, त्याचा अवाका वाढत जायला हवा. ते इथे उघडच झालेलं आहेएकूण मालिकेबद्दलच बोलायचं, तर कथेतला  विचार हा पुढे पुढे ( आधीही पण खास करुन गेल्या आणि या भागातअधिकाधिक विस्तृत परीघात केला गेला, आणि त्याला दोन विचारधारांमधे पुढे नेण्यात आलय, येतय. त्यातली पहिली आहे आर्टिफिशीअल इन्टेलिजन्स आणि मानव यांच्यातलं नातं, आणि दुसरी धर्म आणि नव्याची (!) निर्मिती अर्थात क्रिएशन. अन्ड्राॅइड व्यक्तिरेखा पहिल्या भागातही होती आणि स्काॅटने प्रोमिथिअसपासून A I हा विषय अधोरेखित केलाय. डेव्हिड ही व्यक्तिरेखाच या कथानकाची प्रमूख सूत्रधार म्हणा , नायक म्हणा, ( इतरही काही म्हणता येईल ) आहे. तसच देव, नवनिर्मिती, स्वर्गाबद्दलच्या कल्पना यादेखील प्रोमिथिअसमधून पुढे आलेल्या आहेत. प्रोमिथिअस हे यातल्या यानाचं नावही देवांकडून आग चोरून माणसाला देणाऱ्या दैवताचं असल्याने 'माणसानं तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन देवांचा रोष ओढवून घेणं', हा प्रतिकात्मक आशय तिथेही आहे. इंजिनीअर्सनी ( इंजिनीअर म्हणजे मानवनिर्मितीमागे असल्याचं सूचित केलेल्या आणि मानवाला नष्ट करण्याची इच्छाही असणाऱ्या परग्रहवासियांना इथे दिलेलं नाव ) मानवजात नष्ट करण्याची इच्छा ठेवण्यामागे येशूख्रिस्ताचा संदर्भ आहे. नव्या भागाच्या नावातला कोवेनन्ट ( यानाचच नाव) हादेखील बायबलशी संबंधित शब्द. त्याला करार असं म्हणता येईल. मग तो दोन व्यक्तींमधला असेल, दोन प्रजातींमधला , किंवा मानव आणि देव यांच्यामधे असलेला

 असं असतानाही एक गोष्ट विसरुन चालणार नाही. एलिअन मालिका हे मुळात भयपट आहेत. अवकाशातलं झपाटलेलं घर, हाॅन्टेड हाऊस हा त्याचा उपचित्रप्रकार. एका गटाला काही अतिमानवी गोष्टीला सामोरं जावं लागणं आणि त्यातल्या एकेकाचा बळी जाणं ही मूळ कथा. ' इन स्पेस, नो वन कॅन हिअर यू स्क्रीम ', ही त्याची प्रसिद्ध टॅगलाईनही त्यातलं भयच अधोरेखित करते. चित्रपटातला विचार अघिक महत्वाकांक्षी झाला, बजेट वाढलं, तंत्रज्ञान अधिक अद्ययावत झालं म्हणून त्याचा चित्रप्रकार बदलायचा नाही. ते झालं तर तो या मालिकेचा भागच उरणार नाही. तरीही नीट पाहिल्यावर हे लक्षात येईल, की इथली पुनरावृत्ती ही टेक्श्चर टिकवण्याचं काम करते, आणि ते करताना आशयाच्या मोठ्या उड्या घेण्याचं स्वातंत्र्य दिग्दर्शकाला बहाल करते

एलिअनचे मूळचे चार भाग आणि नवे दोन, यांच्यात एक मोठा फरक आहे, तो योजनाबद्धतेचा. पहिल्या चार चित्रपटांचं कथानक हे पूर्ण विचारांती आधी ठरवण्यात आलेलं नव्हतं, तर आधीचा चित्रपट चालणं हे पुढल्या भागाच्या निर्मितीसाठी कारण होतं. याउलट योजनाबद्धता हा नव्या चित्रपटांचा विशेष आहे. प्रोमिथीअसचं वेगळं असणं हा अपघात नाही, तर सेट अप म्हणून त्याची योजना असल्याने ते अपरिहार्य आहे. त्यातल्या पहिल्या, इंजिनीअरच्या  रहस्यमय अंताचं चित्रण असणाऱ्या प्रसंगापासूनच हे लक्षात येतं, की चित्रपटाचा पल्ला मोठा आहे, आणि केवळ घाबरवण्यावर स्काॅट आता समाधान मानणार नाही. एलिअन, या मूळ चित्रपटात नाॅस्ट्रोमो या यानाच्या चमूला एका अनोळखी ग्रहावर एक प्रचंड यान पडलेलं मिळतं, आणि तिथे एका परग्रहवासियाचे अवशेष सापडतात. ही जागा, हे यान, त्या परग्रहवासियाचा वंश, आणि परफेक्ट किलिंग मशीन असलेल्या प्राण्याची जन्मकथा ही मनात धरुन प्रीक्वल्स पद्धतशीरपणे रचलेली आहेत. मालिकेची किर्ती आणि रिडली स्काॅटचं नाव यांमुळे हे भाग बनणार हे निश्चित असल्याने त्यांचा एकत्रित विचार करणं शक्य झालं असावं

प्रत्येक चित्रपटात एक असा प्रसंग असतो, जो त्या चित्रपटाचं मूळ, त्यातली कल्पना आपल्यापुढे काही एका निश्चित स्वरुपात मांडेल. कोवेनन्टमधला पहिला, उद्योगपती पीटर वेलन्ड ( गाय पिअर्स ) आणि प्रोमिथीअस मोहिमेवर गेलेला यंत्रमानव डेविड ( मायकेल फासबेंडर ) यांच्यातल्या संभाषणाचा प्रसंग याच प्रकारचा आहे. कालानुक्रमात हा प्रसंग प्रोमिथीअस मोहिमेच्याही काही वर्ष मागचा आहेयात या दोघांमधे निर्मिती आणि निर्माता यावर चर्चा होते. बुद्धीमान असलेल्या डेव्हिडच्या हे लक्षात येतं की तो मानवाची निर्मिती असला तरी मानवाहून श्रेष्ठ आहे. तरीही केवळ एक यंत्रमानव असल्याने तो गुलाम बनून राहिला आहे. प्रसंग संपताना डेव्हिड पीटरला तू माझा निर्माता तर तुझा निर्माता कोण, असं विचारतो, त्यावर मानवाचा निर्माता कोण हे शोधण्याचा मनसूबा असल्याचं पीटरकडून स्पष्ट होतं

डेव्हिडची आपल्यावर अन्याय झाल्याची खंत, स्वत: नवनिर्मिती करण्याची महत्वाकांक्षा, आणि आपल्या निर्मात्याहून वरचढ ठरण्याची हिकमत हा कोवेनन्टचा कणा आहे, त्याच्या रचनेतला महत्वाचा भाग. कथानकाचा फार तपशील इथे देण्याची गरज नाही. थोडक्यात सांगतो, की कथाभाग घडतो, तो प्रोमिथीअस मोहिमेच्या शेवटानंतर दहा वर्षांनी. कोवेनन्ट या दूरच्या एका पृथ्वीसदृश ग्रहावर वसाहत बनवायला निघालेल्या यानाला एक अपघात होतो आणि त्यात जेकब ब्रॅन्सन या त्यांच्या कॅप्टनचा अंत होतो. आता यानाचा ताबा धार्मिक प्रवृत्तीच्या क्रिस्टोफर ओरॅम (बिली क्रुडूप ) कडे जातो. ओरॅम कोणालाच फारसा आवडत नाही. एका जवळपासच्या ग्रहावरून अनपेक्षितपणे आलेला डिस्ट्रेस सिग्नल हा दैवी खूण मानून ओरॅम यान त्या दिशेला वळवतो. ब्रॅन्सनची पत्नी डॅनीअल्स ( कॅथरीन वाॅटरसन ) या गोष्टीला विरोध करते पण तो एेकत नाही. डॅनीअल्स, ओरॅम , वाॅल्टर ( फासबेंडर ) हा डेव्हीडसारखाच पण अधिक अद्ययावत यंत्रमानव इतरांसह या ग्रहावर पोचतात , पण तिथे पोचताच लक्षात येतं की परिस्थिती वाटली त्याहून फार वेगळी आहे. ग्रहावर असलेला डेव्हिडच आता यातून मार्ग काढेलशी शक्यता तयार होते

झेनोमाॅर्फ या राक्षसी प्राण्याच्या निर्मितीचा मोठा भाग कोवेनन्ट मधे दिसतो. त्यामुळे यातल्या घटना, भीतीची स्थानं ही मूळ चित्रपटासारखी वाटली, तरी प्रत्यक्षात ती दाखवण्याच्या कारणांमधे फरक आहे. काहीवेळा ते झेनोमाॅर्फच्या उत्पत्तीशी संबंधित आहे, तर कधी पुढल्या भागांमधे होणाऱ्या घटनांची ही पूर्वसूचना आहे. पहिल्या आणि नंतरच्याही बऱ्याच भागांचं मूळ 'हाॅन्टेड हाउस इन स्पेस' हा फाॅर्म्युला हे होतं. झपाटलेल्या घराच्या या क्लासिक फाॅर्म्युलाला कोवेनन्टमधे भयपटांमधलाच आणखी एक क्लासिक फाॅर्म्युला जोडला आहे, तो म्हणजे 'मॅड सायन्टीस्ट' फाॅर्म्युला. शास्त्रज्ञांच्या नैसर्गिक उत्क्रांतीवर मात करण्याच्या हौसेला फ्रॅन्केन्स्टाईन पासून कितीक विज्ञान-भय कृतींनी वापरलेलं आहे. कोवेनन्टचा रोख साक्षात ' क्रिएशन', वरच असल्याने ही संकल्पना या कथानकात फार स्वाभाविकपणे येते. तिची काही प्रमाणात सूचना आधीच्या भागांमधेही आहे. पण इथे ती अधिक स्पष्ट होते

प्रोमिथीअस हा भयपटापेक्षा विज्ञानपट म्हणून अधिक प्रभावी होता तर एलिअन हा विज्ञानपटापेक्षा भयपट म्हणून प्रभावी होता. कोवेनन्टबाबत हा प्रश्न महत्वाचा की तो नक्की काय म्हणून प्रभावी आहे आणि नव्याने एलिअन पहाणाऱ्याला तो कळेल का

माझ्या मते विचार आणि भीती यांचं मिश्रण एलिअनमधे जमलेलं आहे. जवळपास सारख्याच प्रमाणात ते प्रभावी आहेत. यातल्या वैज्ञानिक ( अन धर्मसंबंधित ) सूत्रांबद्दल तर मी वर लिहीलच आहे, पण त्याबरोबर क्रीचर डिझाईनचा इल्लेखही आवश्यक आहे. एच आर गीगरचं झेनोमाॅर्फचं डिझाईन हे मुळातच खूप भीती उत्पन्न करणारं, आणि त्यातल्या सेक्शुअल इमेजरी मुळे द्व्यर्थी वापर शक्य असलेलं आहे. त्यात एलिअन जन्मण्याची पद्धतही या प्रतिकात्मकतेच्या अधिक शक्यता तयार करणारी आहे. अशा चित्रपटांमधे सेन्साॅर बोर्ड मठ्ठ असल्याचा खरा फायदा असतो, कारण त्यांना कापण्याच्या शक्यता पूर्णपणे लक्षात येत नाहीत आणि गोष्टी सुटून जातात. रिडली स्काॅटची दृश्यात्मकतेवर पकड पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे प्रतीकात्मक दृश्ययोजना तसच प्रत्यक्ष भीती या दोन्हीचा पूर्ण वापर तो करुन घेतो. यात झेनोमाॅर्फच्या आधीची आवृत्ती निओमाॅर्फ पहाताना एका विशेष महत्वाच्या प्रसंगात गिआर्मो डेल टोरोच्या 'पॅन्स लॅबिरीन्थ' मधल्या भीतीदायक पेल मॅनची आठवण झाल्यावाचून रहाणार नाही. चित्रपटाच्या शेवटाकडचा एक ट्विस्ट मात्र फारच प्रेडीक्टेबल आहे. तो लपवणं सहज शक्य होतं पण तसं केलेलं नाही. ही एक गोष्ट सोडता स्काॅटचं काम चोख आहे

एलिअन मालिकेतलं काही जर याआधी तुम्ही पाहिलं नसेल, तर यातला सगळा तपशील कळणं कठीण आहे. प्रोमिथिअसचा खूप संदर्भ या चित्रपटात आहे, आणि एकूणातच झेनोमाॅर्फ काय आहे आणि काय करु शकतो हे लक्षात येणंही आवश्यक आहे. या सगळ्याची काहीच कल्पना नसेल तरीही भयपटाच्या पातळीवर चित्रपट पहाणं शक्य आहे, पण कथानकाच्या इतर पातळ्या या बाकी माहितीशिवाय पोचतीलच असं निश्चित म्हणता येणार नाही. जे मालिकेला अपरिचित असतील त्यांनी निदान रिडली स्काॅट दिग्दर्शित इतर दोन भाग, एलिअन आणि प्रोमिथिअस हे तरी पहावेत असं मी म्हणेन. आणि ते पहाणं काही आज अवघड नाही

प्रोमिथीअस, अाणि एलिअन कोवेनन्ट या दोन भागात रिडली स्काॅटने जे केलय, त्याने माझ्या तरी पुढल्या भागांबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यात नवा विचारांचा भाग तर येईलच, पण भयनिर्मितीबाबत ते  ' मोर आॅफ सेम ' प्रकारचे असणं अत्यावश्यक आहे. ती मालिकेची ओळख आहे, आणि ती तशी रहायलाच हवी.


- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP