1917 - महायुद्धाचा साक्षीदार

>> Friday, January 24, 2020




जो साको या ग्राफिक नाॅव्हेलिस्टचं ‘द ग्रेट वाॅर’ नावाचं एक प्रसिद्ध नाॅव्हेल आहे, जे पहिल्या महायुद्धातल्या एका महत्वाच्या दिवसाचं चित्रण करतं. १ जुलै १९१६ हा तो दिवस, ज्या दिवशी फ्रान्समधे फ्रेंच आणि ब्रिटीश विरुद्ध जर्मन सैन्य यांच्यात साॅमच्या लढाईला सुरुवात झाली . खरंतर याला पारंपरिक अर्थाने ग्राफिक नाॅव्हेलही म्हणता येणार नाही कारण याला रुढार्थाने कथा नाही. ब्रिटीश सैन्याच्या बाजूने मांडलेलं हे युद्धाचं सलग चित्र आहे, जे सैनिकांच्या छावण्यांपासून सुरु होत पुढे सरकत युद्धभूमीपर्यंत जातं, बरोबर काळातला प्रवासही दाखवतं, वाचणाऱ्यालाही या रणधुमाळीत सामील करुन घेतं आणि युद्धात कामी आलेल्यांच्या शवांच्या दफनविधीशी येऊन थांबतं. या चित्रात खंड नाही, एकमेकांना जोडलेली ही एक फुटाची चोवीस पॅनल आहेत, जी आपण सलग उलगडून हे थरारक दृश्य पाहू शकतो. हे कथेबिगर पण प्रचंड तपशिलातलं पुढे सरकणारं लांबलचक चित्र आपल्याला युद्धाच्या कल्लोळात खेचून घेतं. सॅम मेन्डीसचा ‘1917’ पाहून मला पहिली आठवण या पुस्तकाची झाली.

हा सिनेमा आणि हे पुस्तक यांचा थेट संबंध नाही, पण कन्वेन्शनल कथेच्या आधाराशिवाय पहिल्या महायुद्धाचं अतिशय तपशिलात केलेलं चित्रण, आपण घटनेचे साक्षीदार असल्याचा प्रेक्षकावाचकाला अनुभव देणं, ही यांमधली जाणवण्यासारखी साम्यस्थळं आहेत.

चित्रपटातल्या घटना घडतात  त्या ६ एप्रिल १९१७ या दिवशी, फ्रान्समधे . ब्रिटीश बटालिअनमधल्या  ब्लेक ( डीन चार्ल्स चॅपमन ) आणि शोफील्ड ( जाॅर्ज मॅके ) या दोन सैनिकांवर एक कामगिरी सोपवली जाते. त्यांच्या छावणीपासून काही मैलांवर असलेल्या दोन ब्रिटीश तुकड्यांवर संकट आलय. १६०० सैनिकांसह या तुकड्यांनी ज्या जागेवर हल्ला करण्याची योजना आखलीय तो त्यांच्यासाठी रचलेला सापळा आहे, पण त्यांना याची कल्पना नाही. ब्लेक आणि शोफील्डनी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे अंतर पायी पार करुन तिथल्या सेनाप्रमुखाला चढाई रद्द करण्याची सूचना असलेलं पत्र पोचतं करायचं आहे. जर हल्ला झाला, तर मोठ्या संख्येने ब्रिटीश सैन्य कामी येईल हे निश्चित. ब्लेकचा भाऊ त्या तुकड्यांमधे आहे, आणि बातमी पोचली नाही, तर त्याचं  भवितव्य अनिश्चित आहे. ब्लेक कामगिरी स्वीकारतो, आणि दोघांचा प्रवास सुरु होतो.

चित्रपट म्हंटलं तर सत्य घटनेवर आधारीत आहे, म्हंटलं तर नाही. कारण तुकड्यातुकड्यांमधे घडलेल्या अनेक घटना एकत्र सांधून चित्रपटाचं जुजबी कथानक तयार केलय. ट्रेन्च वाॅरफेअर, किंवा जमिनीत खोदलेल्या चरांमधे सैन्याने दडून युद्ध करणं हे फार प्रभावीपणे चित्रपटात दिसलेलं नाही. पण इथे ते दिसतं. इथल्या सैन्याची अवस्था, वातावरण 1917 च्या सुरुवातीच्या भागात येतं. आपण ब्लेक आणि शोफील्डबरोबर पुढे जात रहातो आणि रिकाम्या छावण्यांपासून प्रत्यक्ष युद्धभूमीपर्यंत अनेक जागांचे, घटनांचे साक्षीदार होतो. प्रत्यक्ष युद्धाचा भाग यात कमी आहे, पण केवळ युद्ध दाखवणं हा चित्रपटाचा मुद्दाच नाही. चित्रपटाला समोर ठेवायचाय तो एक जिवंत अनुभव. शंभर वर्षांपूर्वी घडून गेलेल्या एका युद्धात सहभागी होण्याचा.


‘1917’ पहाताना शाॅटमधे, प्रसंगात खंड नाही. संपूर्ण कथानक एकच सलग प्रसंग असल्याचा आभास इथे तयार करण्यात आला आहे.  अमेरिकन ब्युटी (१९९९) पासून स्कायफाॅल (२०१२)  पर्यंत अनेक नावाजलेले चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सॅम मेन्डीसने वापरलेल्या या क्लुप्तीबद्दल प्रेक्षकांमधे मतभिन्नता आहे. कोणी म्हणतं ती अनावश्यक आहे, चित्रपटाच्या कथनाला त्यामुळे मर्यादा पडते, तर कोणी तिचं वारेमाप कौतुक करतं. व्यक्तीश: मला ही योजना अतिशय चपखल वाटते. ही मांडणी तरुण पिढीला आपली वाटेलशी आहे, कारण तिचं स्वरुप गेमिंगच्या खूप जवळ जाणारं आहे. फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन शूटर्समधे या प्रकारची कथनशैली सरसकट वापरली जाते. तिथे तुम्हीच कथेतलं एक पात्र बनता आणि खेळात मांडलेल्या अनुभवविश्वाला सामोरे जाता. तिथेही कॅमेरा तुमच्याबरोबर असतो. दृश्य खंडीत होत नाहीत, तर तुमचा प्रवास सलग चालू रहातो. ‘ काॅल ऑफ ड्यूटी’ सारख्या युद्धावर आधारीत खेळांमधेही ती वापरली गेली आहे. अर्थात , केवळ तरुणांना परिचित असणं, एवढाच या शैलीचा फायदा नाही. या प्रकारच्या कथनात एक अर्जन्सीदेखील आहे. सोपवलेलं काम पुरं होईपर्यंत वाढत जाणारा ताण आहे. हा ताण चित्रपट तुमच्यापर्यंत पोचवतो. तुम्ही त्या प्रवासाचा एक भाग बनता.


या दिग्दर्शकीय क्लुप्तीत तांत्रिक सफाई असली , तरी तंत्र नवीन म्हणता येणार नाही. मेन्डीसने अधिक लांबी असलेले वेगवेगळे शाॅट्स घेतले आहेत, आणि ते चटकन लक्षात येणार नाहीत अशा जागा पाहून एकमेकांना जोडून हा सलग कथनाचा परिणाम साधला आहे. आपण लक्ष देऊन पाहिलं तर या जोडकाम असलेल्या जागा लपणार नाहीत ( उदाहरणार्थ जाॅर्जची नदीत उडी ) पण त्या जागा लपवणं गरजेचं नाही. केवळ घटनेत एकसंधता आणणं हाच या युक्तीमागचा हेतू आहे, जो साध्य होतो. २०१४ च्या ‘बर्डमॅन’ चित्रपटासाठी अलेहान्द्रो इन्यारितूनेही सीन्स स्वतंत्र चित्रीत करुन जोडले होते आणि एका शाॅटमधेच चित्रपट उलगडल्याचा आभास आणला होता, पण तिथलं जोडकाम अदृश्य रहाणारं नाही. ते लक्षात आणून देणं हाच त्या चित्रपटाच्या गंमतीचा भाग आहे. मेन्डीसची योजना ही इन्यारितूच्या चित्रपटापेक्षा वेगळी आहे. आल्फ्रेड हिचकाॅकने १९४८ मधे जेव्हा ‘रोप’ हा आपला पहिला रंगीत चित्रपट केला त्याची आठवण करुन देणारी आहे. एका घरात घडणाऱ्या रहस्यनाट्याला चित्रीत करताना त्याला हा सलग चित्रणाचा परिणाम साधायचा होता. तेव्हा तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे त्याने दहा मिनिटांच्या लाॅंग टेक्समधे चित्रण करुन ते लक्षात येणार नाहीसं जोडलं. आज प्रत्यक्ष लांब टेक्स शक्य असले, तरीही ‘1917’ मधे हिचकाॅक स्ट्रॅटेजीचीच आवृत्ती वापरली आहे. यातल्या प्रवासात येणाऱ्या काळ आणि अंतर यातल्या उड्यांसाठी हे चित्रण प्रत्यक्षात सुटं असण्याची गरज आहे. हे सारं एकत्र सांधताना आणि युद्धचित्रणातही व्हिजुअल इफेक्ट्सचा मोठा वापर असणं साहजिक आहे. पण हा वापर अदृश्य आहे. पहाताना कुठेही काय चित्रीत केलय आणि काय डिजीटली उभं केलय हे लक्षात येत नाही, यातच या तंत्रज्ञानाचं यश आहे.


मी काही रिव्ह्यूजमधे असं वाचलं की चित्रपटाचं तांत्रिक अंग उत्तम आहे, पण चित्रपटातून फार काही हाती लागत नाही. काय हाती लागावं अशी आपली अपेक्षा आहे ? चित्रपट तुम्हाला देऊ करतोय तो एक अस्सल अनुभव आहे . तो तुम्हाला तुमच्या बसल्या जागेवरुन उचलून शंभर वर्षापूर्वी झालेल्या एका युद्धाच्या मध्यभागी नेऊन ठेवतो आहे, तिथल्या सैनिकांची मनस्थिती, त्यांचं जगणं दाखवतोय. हा अनुभव हे चित्रपटाचं उद्दीष्ट असू शकत नाही का ? त्याने दर खेपेला गोष्ट सांगायला हवी का ? संदेश द्यायला हवा का?

वाॅशिंग्टन डिसीला असलेल्या हाॅलोकाॅस्ट म्युझिअम मधे आपण गेलो, तर एका ठिकाणी बुटांचा खच पडलेला आपल्याला दिसतो.हे बूट छळछावण्यांमधे मारल्या गेलेल्यांच्या पायातले. दुसरीकडे एका पुलावरुन जाताना वरपासून खालपर्यंत लावलेले असंख्य फोटो आपल्यापुढे येतात. हेदेखील अन्यायाने मारल्या गेलेल्या ज्यूंचे. हे पाहून आपण म्हंटलं की बूट आणि फोटो कशाला दाखवले, त्यापेक्षा आम्हाला काय घडलं ही गोष्ट सांगितली तर पुरे आहे, तर ते योग्य ठरेल का ?  ऐकीव माहितीपेक्षा अधिक परिणाम करण्याची ताकद त्या फोटोंमधे आणि त्या बुटांच्या ढिगाऱ्यातच आहे, कारण ते तुम्हाला साक्षीदार बनवतात. कधीकाळी अमुक अमुक  घडलं, इतकं सांगून न थांबता जे घडलं त्याला तुमच्या अनुभवविश्वाचा थेट भाग बनवतात. 1917  आपल्याला एक शतक मागे  टेलिपोर्ट करतो. ते सैनिक ज्या प्रसंगाला सामोरे गेले, तेच तुमच्यापुढे ठेवतो. तुम्हाला विश्वासात घेतो.  तिथल्या चिखलाचा सडा, रिकामे ट्रेन्चेस, कुजणारी माणसांची, प्राण्यांची प्रेतं, गावांचे उध्वस्त अवशेष, यांमधूनच हा चित्रपट बोलतो. ते आपण ऐकू शकतो का , हा खरा प्रश्न आहे !
--  गणेश मतकरी

Read more...

तानाजी - इतिहासाचा रंजक अर्थ

>> Friday, January 10, 2020



इतिहासकार इ एच. कार म्हणतात, की ऐतिहासिक सत्य, ही काही कोळणीने आपल्या पाटीवर नीट मांडून ठेवलेल्या माशांसारखी नसतात, त्याऊलट ती एका कदाचित आपण पोचूही शकणार नाही अशा एका महासागरात सुळकन पोहणाऱ्या जिवंत माशांसारखी असतात. इतिहासकार कोणत्या सत्यापर्यंत पोचतो यात काही वेळा अपघाताचा भाग असू शकतो, पण बहुधा ते अवलंबून असतं, ते तो या महासागराच्या कोणत्या भागात गळ टाकायचं  ठरवतो, आणि त्यासाठी कोणती साधनं वापरतो यावर. या दोन्ही गोष्टी ठरतात, ते अर्थातच त्याला कशाचा शोध आहे यावरच. इतिहासकाराला जे हवं आहे, ते बहुधा त्याला मिळू शकतं, कारण शेवटी इतिहास म्हणजे काय, तर अन्वयार्थ.

तानाजी- द अनसंग वाॅरीअर चित्रपटाचं थोडंसं असच आहे.

दिग्दर्शक ओम राऊत आणि पटकथाकार प्रकाश कापडिया ( ओम राऊत सह ) , यांनी तानाजीची कथा, ही इन्टरप्रिट केलेली आहे. त्याचा अर्थ, त्यांना उमजेल अशा, आणि प्रेक्षकांच्याही पचनी पडेल अशा पद्धतीने लावलेला आहे. ती प्रत्येक वेळी आपण ऐकलेल्या तानाजीच्या प्रसिद्ध कथेशी जुळते का, तर अर्थातच नाही. पण त्यातला बराच भाग ; म्हणजे प्रामुख्याने तानाजीचं व्यक्तीमत्व आणि ती ऐतिहासिक चढाई याबद्दलचा भाग, हा इतिहास आणि चित्रपटीय तर्कशास्त्र या दोन्हीच्या सामायिक चौकटीत पटण्याजोगा झालेला आहे. आणि मी म्हणेन की हेच चित्रपटाचं यश आहे.

मागे मी हिरकणी चित्रपटाबद्दल लिहिताना असं म्हणालो होतो, की मूळची आख्यायिका, ही चित्रपटाची पूर्ण लांबी भरण्यासाठी पुरेशी नाही, त्यामुळे तिला केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती एक पटेलशी कथा रचणं आवश्यक होतं, किंवा त्या घटनेलाच तपशीलात रंगवून चित्रपट भरायला हवा होता. तानाजी काही प्रमाणात या दोन्ही गोष्टी करतो. आपण लहानपणी ऐकलेली कथा , ही प्रामुख्याने कोंढाणा परत मिळवण्याची निकड आणि चढाई, या दोन घटनांशी जोडलेली आहे, आणि या केवळ दोन घटना, चित्रपटाची लांबी भरण्यासाठी पुरेशा नाहीत. मग तानाजीच्या लहानपणचा थोडा ( पुढल्या महत्वाच्या भागाला फोरशॅडो करणारा ) प्रस्तावनापर भूतकाळ, किल्ल्याचं स्वराज्याच्या दृष्टीने असलेलं महत्व मांडणारा भाग, आणि मोठा, प्रत्यक्ष चढाईआधीचा भाग, असे भाग चित्रपटात तपशीलवार मांडण्यात आलेले आहेत. त्याशिवाय प्रत्यक्ष चढाईच्या प्रसंगावरही आवश्यक तो वेळ घालवून तो चांगला रंगवला आहे.  या मांडणीमुळे चित्रपट अजिबात रेंगाळत नाही. पटापट पुढे सरकतो.  या सगळ्या भागात स्वत: तानाजी ( देवगण ) आणि किल्लेदार उदयभान ( सैफ ) यांच्या व्यक्तीरेखा तपशीलात रंगवलेल्या आहेत. हे करताना शेलारमामाच्या मूळ कथेत महत्वाच्या असलेल्या शेलारमामा या व्यक्तीरेखेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालय. विशेषत: ती शशांक शेंडेसारखा ताकदीचा मराठी अभिनेता करत असल्याने ते फार जाणवतं, पण आधी म्हणाल्याप्रमाणे दिग्दर्शकाने टाकलेला गळ हा त्याला इतिहासाच्या समुद्रातून काय शोधायचय, यावर अवलंबून आहे. शरद केळकरचा शिवाजी, काजोलची सावित्री, या तशा पुरक भूमिका आहेत. त्यांची लांबी अनावश्यक वाढवलेली नाही, ही चांगलीच गोष्ट आहे.

तानाजी आणि उदयभान या  दोन व्यक्तीरेखांचा एक प्राॅब्लेम असा, की त्या वास्तववादी पद्धतीने रंगवलेल्या नाहीत, तर प्रामुख्याने पारंपरीक मसाला हिंदी चित्रपटातल्या नायक आणि खलनायकांच्या माॅडेलवर त्या  खूपच आधारलेल्या आहेत. तानाजीचा मूळ कथेतला भागही त्यात उतरल्याने, त्या व्यक्तीरेखेच्या बाबतीत हा बाॅलिवुड हिरोईझम थोडा लपतो. खलनायकासमोर नाच, टाॅर्चर सीक्वेन्स, अशा तो ढळढळीतपणे पुढे आणणाऱ्या जागा आहेत, पण त्याकडे आपण इतर भागामुळे दुर्लक्ष करु शकतो. उदयभान म्हणून सैफ मात्र सगळा वेळ ‘सायको खलनायक’ मोडमधेच आहे. हा एक बरा दिसणारा गब्बर सिंग वाटावा अशी ही व्यक्तीरेखा रचली आणि सादरही केलेली आहे. या दोन्ही भूमिका चांगल्या अभिनेत्यांनी साकारल्याने आणि कथेत तुल्यबल मांडणी असल्याने, तसच, तानाजीची वीरश्री या सर्वतून उत्तमरित्या अधोरेखित होत असल्याने याबद्दल आपल्या प्रेक्षकाला तक्रार असण्याचं कारण नाही. परंतु या भागात आपण इतिहासापेक्षा बाॅलिवुड लाॅजिकमधेच जातो हे नाकारण्यात काहीच मुद्दा नाही.

तानाजीवर केलेलं vfx चं काम, हा चित्रपटसंबंधातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि गेल्या काही वर्षांमधे, खासकरुन बाहुबलीपासून, आपली या क्षेत्रात कथित प्रगती सुरु असल्याने, त्याविषयी बोलणं आवश्यक आहे.व्हिजुअल इफेक्ट्सचं काम हे दोन प्रकारचं असतं, व्हिजुअलायजेशन आणि एक्झिक्यूशन. व्हिजुअलायजेशनच जर चांगलं नसेल, तर तांत्रिक काम कितीही चांगलं असेल तरी उपयोग नसतो, आणि तांत्रिक काम फसलं, तर व्हिजुअलायजेशनचा परिणाम कमी होतो. तरीही आपल्याकडे व्हिजुअलायजेशन अधिक सुधारणं, हे या घडीला आवश्यक आहे. तंत्रज्ञ आपल्याकडे आहेत, आणि वाटल्यास बाहेरुनही आणता येतात. हे काम कमी पडतं, ते मुख्यत: बजेट आणि आवश्यक त्या वेळाची कमतरता यामुळे. जे काही वर्षात आपोआप सुधारेल अशी शक्यता आहे. पण व्हिजुअलायजेशनचं  काय, जे संपूर्णपणे दिग्दर्शकाच्या कुवतीवर अवलंबून आहे, आणि त्यासाठी वेगळे पैसे पडत नाहीत ! तानाजीबद्दल एक समाधानकारक गोष्ट अशी म्हणावी लागेल, की त्यातला व्हिजुअलायजेशनचा भाग व्यवस्थित आहे. इफेक्ट्स साठी प्रसंगांची निवड ( बुद्धीबळ, तानाजीचा इन्ट्रो ) इथपासून त्यांचं स्टन्टबरोबरचं इन्टीग्रेशन , हे सगळं इथे  विचारपूर्वक आणलेलं आहे. तांत्रिक बाजूत मात्र ते अजूनही कमीच पडतात.

आता आपल्याकडे ‘भारतासाठी खूपच चांगलंय’ असं मानण्याची एक पद्धत आहे. शिवाय काही लोकांना अदृश्य vfx हा प्रकारच कळत नाही. त्यांना ते कळावेच लागतात. ते लक्षात आले, की मगच ‘ वा, काय काम केलय’ असं त्यांना वाटतं. या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. ज्याप्रमाणे चांगलं दिग्दर्शन हे दिग्दर्शक अदृश्य असण्यात आहे, तसेच चांगले vfx ते आहेत हेच ओळखू न येण्यात आहे. जे दिसतय ते आपल्याला खरच वाटायला हवं. ते तसं नसणार, हे मागाहून वाटायला हवं.

तानाजीचे पहिल्या भागातले इफेक्ट खूपच कळण्यासारखे आहेत. इतके, की ही काही परफाॅर्मन्सेस असलेली चांगली, पण ॲनिमेटेड फिल्म वाटावी. साध्या घोडदौडीसारख्या प्रसंगांपासून, स्थळं उभी करण्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांचा कधी आवश्यक, तर कधी उगाचच वापर आहे, आणि तुम्ही तरबेज प्रेक्षक असाल, तर प्रत्येक वेळी या जागा तुमच्या लक्षात येतील. एक चांगली गोष्ट म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या भागात इफेक्ट्सचा वापर वेगवेगळ्या प्रकारचा आहे. पहिला भाग अनेक गोष्टी एस्टॅब्लिश करत असल्याने, त्याला वाईड ॲंगल्स, लाॅंगशाॅट्स, स्थलदर्शन करणारी दृश्य, यांची अधिक गरज आहे. आपण जसे उत्तरार्धाकडे येतो, तसे आपण मानवी स्केलकडे येत जातो. चित्रपट अधिक इन्टीमेट होतो. स्टंट्सना, जे छान जमलेले आहेत ,  इफेक्ट्सहून अधिक महत्व येतं. लांबून पहाण्यापेक्षा, व्यक्तीरेखांचा आमनेसामने संघर्ष, अधिक दिसायला लागतो. आणि या जागी vfx जमून जातात. ते पहिल्या भागासारखे खटकत नाहीत. एकूण, हा चित्रपट या तंत्रज्ञानाकडे आशेने पहायला लावतो. पुढल्या काळात तंत्र आणि ते चांगल्या प्रकारे वापरणारे दिग्दर्शक, या दोन्हीकडून अपेक्षा ठेवावी असं वातावरण तयार करतो.

चित्रपटाने तुमच्यावर परिणाम केला का, हे ओळखण्याची साधी परीक्षा म्हणजे चित्रपट संपतेवेळी तुम्ही यातल्या प्रमुख व्यक्तीरेखेबरोबर कितपत आयडेन्टीफाय करु शकता, ही आहे. तुम्हाला होणारा आनंद, दु:ख, किंवा काहीच न वाटणं, यावरुन ते लक्षात येतं. तानाजी माझ्या मते त्या दृष्टीने यशस्वी आहे. ओम राऊतचा हा दिग्दर्शक म्हणून दुसराच सिनेमा आहे. लोकमान्य नंतरचा. आणि दोन चित्रपटांमधून दिसलेलं काम पाहिलं तर त्याला खूपच प्राॅमिसिंग दिग्दर्शक म्हणायला हरकत नाही. निव्वळ काम म्हणूनही, आणि पहिलं आणि दुसरं या दोन पावलात दिसलेल्या प्रगतीसाठीही. आता तिसरं पाऊल अधिक अवघड होणार हे झालच, पण त्याची प्रतिक्षा करायला हरकत नाही.

-  गणेश मतकरी

Read more...

संमिश्र परिणामांचा धुरळा

>> Monday, January 6, 2020



सिनेमा वेळेवर पहाण्याचे काही फायदे असतात आणि काही तोटे. पहिला फायदा हा, की फिल्म तुमच्यापुढे मिस्ट्रीसारखी उलगडते. अगदी सोशल फिल्मसुद्धा. तुम्ही त्याबद्दल काही मत बनवलेलं नसतं. जे पहायला मिळतं ते सरप्राईज असतं. अशा वेळी इम्पॅक्ट हा एनहान्स्ड असू शकतो. फिल्म खूप आवडू शकते, किंवा उलट. फिल्म थोडी नंतर पाहिली की तुमच्या कानावरुन मतं गेलेली असतात, रिव्ह्यू ऐकलेले असतात, काही अपेक्षा तयार झालेल्या असतात. ज्यांचा उलटा परिणामही होऊ शकतो. मला स्वत:ला फिल्म पहाण्याआधी तिच्याबद्दल माहिती असणं अधिक आवडतं. कारण त्यामुळे तुम्ही फिल्म जागरुकपणे पहाता. शक्य तितकं निरपेक्ष रहाण्याचा प्रयत्न मात्र अशा वेळी करावा लागतो.

धुरळाबद्दल मी अगदीच निरपेक्ष होतो असं म्हणता येणार नाही. समीर विद्वांस आणि क्षितीज पटवर्धन हे दिग्दर्शक - लेखक मला आवडणाऱ्या चित्रकर्मींपैकी आहेत, आणि त्यांच्याकडून तशीही अमुक एक अपेक्षा असतेच. जोडीला महत्वाकांक्षी विषय, स्टार वर्गात मोडणारा चांगला नटसंच आणि खूपच चांगले रिव्ह्यूज यावरुन अपेक्षा तयार होणारच. या सगळ्या अपेक्षा फिल्मने पुऱ्या केल्या का ? त्याकडे आपण येऊच.

अनेक रिव्ह्यूज आल्याने , मी कथानक सांगत बसत नाही. एवढच सांगतो, की गावच्या लोकप्रिय सरपंचांच्या मृत्यूनंतर कुटुंबातल्या इतरांनी त्यांची जागा घेण्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून कुटुंबात पडत गेलेली फूट याबद्दलचा हा चित्रपट आहे. त्याला कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन बाजू आहेत, ज्यांच्या मिश्रणातूनच त्यातलं नाट्य तयार होतं.

पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला हवी की फिल्म सरळच पहाण्यासारखी आहे.कारण ती काहीतरी महत्वाकांक्षी अटेम्प्ट करते. सिंहासनशी तुलना व्यर्थ आहे, पण पुरेशा गंभीरपणे राजकारणावर नजर टाकणारे चित्रपट आपल्याकडे होतच नाहीत. धुरळा ग्रामीण राजकारणातल्या अनेक बाजू पुरेशा गंभीरपणे मांडायचा प्रयत्न करतो. आणि ते करताना तो आपला मानवी चेहरा घालवत नाही. अल्टीमेटली तो एका कुटुंबाचा चित्रपट रहातो. हे करताना तो आपला सेन्स ऑफ ह्यूमर शाबूत ठेवतो, नाट्यपूर्ण जागा शोधतो, अनेक चांगल्या कलावंतांसाठी प्रसंग तयार करतो, हे सगळं तो पहाण्यासाठी पुरेसं आहे. पण हे करताना, त्याच्या काही मर्यादाही आहेत.

सर्वात पहिली मर्यादा म्हणजे त्यात खूप अधिक व्यक्तीरेखा आहेत आणि त्याची लांबी ( जवळपास तीन तास) अनावश्यक  वाटेलशी मोठी आहे. आता ही लांबी नुसतीच , घटनांशिवाय आहे, असं नाही. चित्रपट घटनाप्रधान आहे, शह काटशह, चाली प्रतिचाली, याचा खेळ यात सतत आहे. पण त्याला इनेविटेबिलिटी नाही. कथेची गरज आणि त्या प्रमाणात वेळ, हे गणित इथे गोंधळलय असं मला वाटतं. अशाच प्रकारे चित्रपट आणखी तासभरही चालू शकतो, किंवा तो अर्धा तास कमीही होऊ शकला असता. मग इथेच का संपला, याला काही कारण नाही. सरपंचपदासाठी होणाऱ्या निवडणूकांना चित्रपटात फार महत्व आहे. पण त्यासाठी निश्चित टाईमलाईन, आणि त्या जवळ येण्यानुसार बदलता वेग, हे स्पष्ट असण्याची गरज होती. ते इथे पुरेशा ठळकपणे दिसत नाही. त्याऐवजी नुसताच प्रचार बरीच जागा खातो.

दुसरी गोष्ट म्हणजे एका कुटुंबातले सगळे ‘उभे’ असणं ही चमत्कृती आहे, पण त्यातच चित्रपटाचा पॅराडाॅक्स आहे. तो कोणता , हे सोनाली कुलकर्णीच्या व्यक्तीरेखेच्या तोंडून एकदा बाहेर येतं, पण चित्रपट ते पुरेशा गांभीर्याने घेत नाही. स्पाॅयलर नको , म्हणून मी तो उल्लेख इथे करत नाही, पण लक्ष दिलत तर तुम्हालाच समजेल. चित्रपटातल्या अनेक घटना, या सोयीस्करपणे होतात. ( उदा हणमंतच्या पार्टीतलं विघ्नं ) त्या होतात कारण चित्रपटाला अमुक मुद्दा गाठायचाय , असं वाटतं, बरेचदा ते स्वाभाविक वाटत नाही. चित्रपटाचा शेवट याचं खूपच ठळक उदाहरण आहे. तो प्रिची होतो, ढोबळ होतो. एकाच वेळी तो गडद आहे असं भासवतो, पण प्रत्यक्षात तो कथानकाचा गडदपणा कमी करतो, व्यक्तीरेखांना रंगसफेदी करतो.

चित्रपटाचा पहिला भाग हा बराच लांबल्यासारखा वाटतो. त्यात बहुतेक व्यक्तिरेखांचे तपशील येतात. काही घटनांचेही. बॅक स्टोरी येते. हे सारं कदाचित कादंबरीत अधिक छान वाटलं असतं,( ती अजूनही लिहिण्यासारखी आहेच. बालगंधर्व चित्रपटात सारे तपशील नीट न वापरता आल्यावर अभिराम भडकमकरने ते कादंबरीत वापरले तसं. ) पण चित्रपट त्याला गरजेएवढा वेळ देऊ शकत नाही, आणि परिणामी हे वरवरचं वाटतं. दुसरा भाग अधिक आटोपशीर आहे. या भागात चित्रपट बराच सावरतो. मला असंही वाटलं की चित्रपटातला विनोदी भाग गाळून तो गंभीर केला असता, तर अधिक प्रभावी वाटला असता. स्वतंत्रपणे पाहिलं तर तो गंभीरच आहे. महत्वाकांक्षेतून ओढवणारा नाश असा खास शेक्सपिअरन अंडरकरन्ट त्यात आहे, वर दोन व्यक्तीरेखांचे ट्रॅक्स तर खासच शोकांताकडे झुकताना दिसतात. संवादातून विनोदाचं टेक्श्चर टिकवण्याचा आग्रह, कोणतीच गोष्ट गडद होऊ देत नाही. त्यामुळे खूप हसवणाऱ्या काही जागा असूनही ते अनावश्यक वाटतं.

कामांबद्दल बोलायचं, तर सई ताम्हनकर आणि तिच्या खालोखाल अलका कुबल, यांची कामं मला खासच आवडली. दोघींनिही आपलं बरचसं करीअर पोटेन्शिअलपेक्षा उथळ भूमिकांमधे घालवलं आहे, त्यामुळे चांगल्या भूमिकांमधे त्या दिसणं विशेष वाटतं.अंकुश चौधरीचा स्क्रीन प्रेझेन्स आहेच, भूमिकेला लांबीही आहे, पण भूमिका त्यामानाने सपाट आहे. इतर लोक छोट्या प्रसंगातही छाप पाडून जातात, ( विशेषत: अमेय वाघ )तसं त्याच्या भूमिकेत होत नाही. प्रसाद ओकच्या भूमिकेचं टोक पुढे संहिताच बोथट करुन ठेवते. बाकी सर्वच कलाकारांची कामं चांगली आहेत, पण ती त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांनुसारच.

एकूणात सांगायचं, तर धुरळा , हा एक फर्मली चांगला प्रयत्न म्हणण्याजोगा, पण पोटेन्शीअल पूर्णपणे वापरता न आलेला सिनेमा आहे. त्यात प्रेक्षकांचा विचार आहे. ढोबळ नाट्यमय जागा, विनोद, टाईपकास्टींग, स्टार्सचा वापर यात तो दिसतो. असा प्रेक्षकांचा विचार करण्यात फार गैर काही नाही. अखेर हा व्यावसायिक सिनेमा आहे. महोत्सवांना डोळ्यापुढे ठेवून बनवलेला नाही. पण त्यामुळे जर परिणामाशी तडजोड होत असेल तर ते टाळायला हवं. कारण विनोद वगैरे आणूनही प्रत्यक्षात तो सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोचतोय असं चित्र मात्र पहायला मिळत नाही. याला आपल्या प्रेक्षकांच्या मर्यादा हे एक कारण आहे. पण तेवढच कारण नाही.

समीर विद्वांसच्या चांगल्या चित्रपटांपैकी धुरळा म्हणता येईल, पण डबल सीट आणि आनंदी गोपाळ हे परिणामात उजवे असणारे त्याचे चित्रपट आताही धुरळाच्या वरचीच जागा राखून आहेत. धुरळा हा बनवण्यासाठी या दोघांहून कठीण नक्कीच आहे. पण परिणामात तो या दोघांपेक्षा कमी पडणारा आहे.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP