झीरो डार्क थर्टी- आजचा इतिहास

>> Sunday, January 27, 2013


यंदाच्या आँस्कर स्पर्धेत आपल्याला दोन चित्रपट असे पाहायला मिळतात ,जे अमेरिकन हेरगिरीच्या इतिहासातल्या दोन  घटनांवर आधारलेले आहेत. या दोन्ही सत्य घटना मुस्लीम राष्ट्रांमधे घडलेल्या  असल्या तरी त्यांच्या वजनात मात्र बराच फरक आहे. १९८० च्या सुमारास इराणच्या कनेडीअन अँम्बेसेडरच्या घरात लपलेल्या सहा अमेरीकन नागरिकांना वाचवण्याची बेन अँफ्लेकच्या 'आर्गो' मधली घटना ही महत्वाची असली तरी छोटेखानी आहे. या तुलनेत कॅथरीन बिगेलोच्या 'झिरो डार्क थर्टी' मधली घटना फारच मोठी, ओसामा बिन लादेनचा अंत घडवत दहशतवादविरोधी लढ्यातला एक मोठा अध्याय संपवणारी आहे. दोन्ही चित्रपटांचे शेवट हे ऐतिहासिक नोंदीचाच भाग असल्याने अमेरिकन हेरांच्या योजनेचं यशापयश हे या चित्रपटांमधलं रहस्य नाही, तर योजनेचे तपशील, ती पार पाडताना आलेल्या अडचणी आणि त्यावर काढण्यात आलेले मार्ग हा खरा उत्कंठावर्धक भाग आहे. विशेष गोष्ट म्हणजे दोन्ही चित्रपट उत्तम असूनही दोन्ही दिग्दर्शकांनी चित्रपटाला आकार देताना संकल्पनेच्या पातळीवर घेतलेले निर्णय हे परस्परविरुध्द आहेत. आर्गोने महत्व दिलंय ते प्रत्यक्ष योजनेला, घटनांना . त्यामुळे त्यातली कोणतीही व्यक्तिरेखा  ( अगदी अँफ्लेकची स्वतःची, सुटकेची जबाबदारी घेणा-या हेराची सुध्दा)   केंद्रस्थान घेऊन स्वतःकडे अधिक लक्ष वेधून घेत नाही. याउलट झीरो डार्क थर्टी मधल्या घटना या व्यक्तीपुढे दुय्यम आहेत. प्रामुख्याने हे व्यक्तिचित्र आहे ते माया (जेसिका चेस्टेन) या नावाने चित्रपटात दिसणार््या सीआयए आँपरेटीवचं.  चित्रपट घटना मांडतो त्या तिच्या दृष्टीकोनातून. याचा अर्थ असा नाही ,की तिच्या अपरोक्ष घडणा-या घटना आपल्याला दाखवल्या जात नाहीत. त्या जातातच, मात्र तिच्या लेखी त्या घटनांना, त्यांच्या परिणामांना असणारं महत्व जोखून. शेवटचा, लादेनच्या हत्येच्या मिशनचा प्रसंग हा पूर्णपणे तिच्या गैरहजेरीत घडतो कारण ती इन्टेलिजन्स आँपरेटीव असल्याने या प्रकारच्या कामगिरीवर जाणं शक्य नाही. हा भाग प्रेक्षकांच्या खास इन्टरेस्टचा असल्याने ,आणि घटनाक्रमातही फार महत्वाचा असल्याने चित्रपटातून गाळणंही शक्य नाही. इथे तिचं या संदर्भातलं महत्व अधोरेखित केलं जातंच. प्रत्यक्ष कामगिरी चालू असताना तर आपण पुन्हा पुन्हा तिच्याकडे जातोच , वर हा भाग संपल्यावरही चित्रपट तिच्याबरोबरच राहातो.
 घटना या प्रकारे मांडण्याचे दोन फायदे आहेत. एक तर हा इतिहास खूपच नजिकचा  आणि त्यामानाने वादग्रस्त आहे. तोही केवळ एका विशिष्ट बाजूने, जेत्याच्या बाजूने मांडण्याचा. त्यामुळे केवळ अमेरिकन विजय मांडला तर तो एकतर्फी होण्याची वा त्यावर इतर देशांकडून टिका होण्याची शक्यता अधिक. या मार्गाने आपल्याला आॅब्सेशन दिसतं ते देशाचं नाही, तर व्यक्तिचं. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या लढ्याला मानवी चेहरा मिळतो. अरेरावीने जग काबीज करायला निघालेल्या महासत्तेने एका छोट्या देशातल्या व्यक्तीला कायदे न जुमानता पकडणं हे एरवी अमेरिकेच्या प्रतिमेला फारसं शोभून दिसलं नसतं. इथे आपल्यावर ठसतो तो अमेरिका विरुध्द लादेन हा नाही तर माया विरुध्द लादेन हा संघर्ष. जागतिक राजकारणाची वादग्रस्तता बाजूला ठेवून हे पचवून घेणं प्रेक्षकाला अधिक पटण्यासारखं आहे.

दुसरा फायदा आहे तो एक चांगली व्यक्तिरेखा घडवत नेण्याची संधी चित्रकर्त्यांना आणि पाहाण्याची संधी आपल्याला मिळण्याचा. माया खरी कोण किंवा कशी आहे हे आपल्याला कळायला मार्ग नाही. कारण चित्रपटाची पटकथा जरी आधारासाठी घटनेचा सरकारी वृत्तांत वापरत असली आणि त्यात चित्रकर्त्यांच्या स्वतःच्या सोर्सेसकडून कळलेला, जनतेपर्यंत न पोचलेला तपशील भरत असली,तरी मायाची आेळख ही गोष्ट अशी आहे की तिच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ती लपवण्यावाचून पर्याय नाही. आपण फक्त हे जाणतो, की अशी अशी  एक स्त्री या विजयाला जबाबदार होती. तिला चेहरा देण्याचं श्रेय मात्र चेस्टेन या अचानक स्टार झालेल्या अभिनेत्रीचं. तिला गोल्डन ग्लोब तर मिळालेलंच आहे. आॅस्कर मिळण्याची शक्यताही खूपच.
दिग्दर्शक कॅथरीन बीगेलो आणि लेखक मार्क बोल ही 'द हर्ट लॉकर' मागची टीम या चित्रपटामागे आहे हे चित्रपटाच्या टेक्श्चरमधे जागोजागी जाणवतं. युध्दग्रस्त परिस्थितीला एकेकाळी चित्रपटात मिळणारं ग्लॅमर 'सेव्हींग प्रायवेहट रायन'ने काढून टाकलं त्याला आता खूपच वर्ष झाली पण त्या एका मोठ्या पावलावर खूश होऊन चित्रकर्ते थांबले नसल्याची लक्षणं अलीकडच्या युध्दपटांमधे दिसतात. बिगेलो/ बोलचे हे दोन्ही चित्रपट त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांची निवेदनशैली देखील आता अधिकाधिक साधी , कथनापेक्षा नोंदी घेणारी ,निरीक्षणं मांडणारी झाली आहे. हॉलीवूडला करमणुकप्रधान या लेबलाखाली टाकून दुर्लक्ष करणा-या आणि कोणत्याही अभ्यासाशिवाय आपल्या चित्रपटांशी तुलना करणा-यांनी असे चित्रपट पाहाण्याची गरज आहे. या चित्रपटातला वास्तववाद  कोणत्याही प्रकारे पाणचट करण्याचा प्रयत्न इथे झालेला नाही. किंबहुना त्याचं असं रॉ असणं , अस्सल वाटणं यातच त्याचं खरं नाट्य लपलेलं आहे.
झीरो डार्क थर्टीचा काळ मोठा आहे. ११ सप्टेम्बर २००१ च्या हल्ल्याचं ध्वनिमुद्रण तो सुरुवातीलाच ऐकवतो आणि त्यानंतर दोनेक वर्षांनी मुख्य कथानक सुरू करतो, ते मायाच्या पाकिस्तानमधल्या अमेरीकन छावणीत दाखल होण्यापासून. ही तरुण माया या पोस्टींगमुळे फार खूश नाही. टॉर्चरच्या सरसकट वापराने ती बिचकते ,मात्र हे करणं आवश्यक आहे याबद्दल तिच्या मनात तिळमात्र शंका नाही. छोट्या छोट्या प्रकरणांमधे विभागलेला आणि आेसामा बिन लादेनच्या पाठपुराव्यातले महत्वाचे टप्पे अधोरेखित करणारा पुढल्या दहा एक वर्षांचा काळ हा मायाच्या व्यक्तिमत्वातले बदलही अधोरेखित करणारा आहे. तिचं अधिक कठोर होणं, निर्ढावत जाणं, सहकार््यांपासून या ना त्या मार्गाने येत गेलेला दुरावा़, लादेनच्या मागाने झपाटून जाणं, वरिष्ठांनाही धाक वाटेल इतकी व्यक्तिमत्वाला धार येणं, आणि अखेर या कामात इतकं गुरफटणं की ते काम संपल्यावर तिला दुसरं आयुष्यच उरु नये , असा हा सारा प्रवास आहे. त्यामुळेच चित्रपटाचा विचार केवळ एका मिशनमधलं यश, वा अमेरिकेची विजयगाथा अशा उघड आणि सरधोपट पातळीवर करणं शक्य नाही. यातला विजय हा महत्वाचा आहे, पण त्यानंतर मायाला जाणवणारी पोकळी या विजयाला जवळजवळ दुय्यम महत्व आणून देते. या लढ्यात व्यक्तिगत आयुष्य हरवून बसलेल्या अनेकांच्या आयुष्याचं प्रातिनिधीक चित्र उभी करते.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं आँस्कर मिळेल का नाही हा प्रश्न तसा दुय्यम आहे. तो ते मिळण्यासाठी लायक आहे यात शंकाच नाही. पण त्याचं वादग्रस्त असणं त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला असलेला सरकारी पाठिंबा आणि त्यातून काढले जाणारे राजकीय अर्थ ,त्याचबरोबर काही प्रसंगात दिसणारा युध्दकैद्यांचा छळ यामुळे अँकेडमी जरा बिचकून राहाण्याची शक्यताच अधिक आहे. मात्र प्रेक्षकांनी त्याकडे पाहाताना अधिक मोकळी नजर ठेवण्याची गरज आहे. इतक्या महत्वाच्या घटनेनंतर इतक्या नजिकच्या काळात इतक्या प्रभावी पध्दतीने केलेला चित्रपट येणं ही घटना तशी दुर्मिळ आहे. त्याचा राजकीय मुद्दा करण्यापेक्षा त्यातल्या मानवी दृष्टीकोनाचं कौतुक करणं हीच अधिक प्रामाणिक प्रतिक्रीया ठरावी.
- गणेश मतकरी 

Read more...

मटरु की बिजली का मन्डोला - भारद्वाजी विनोद

>> Monday, January 21, 2013एक गाव . त्यात खूप सारी माणसं. बरीच नुसत्या विनोदी वळणाची. पण काही विनोदी असूनही  दुष्प्रवृत्त. मग त्यात नेहमीचे टाईप्स. भोळी जनता, नेते, उमराव, राजकारणी, झालंच तर आपल्या ओळखीच्या नरेटीव साच्यात बसणारे नायक, नायिका, खलनायक, एखाद्या अवघड प्रश्नाकडून सोप्या सुखान्ताकडे सुखेनैव प्रवास करणारी संहिता, हे सारं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत असेल तर त्यात आश्चर्य नाही. गेली अनेक वर्ष प्रियदर्शन हा लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक आपल्याकडे या फॉर्म्युलात बसणारे चित्रपट देतो आहे. मोजके प्रमुख नट आणि लहान भूमिकांमधेही उत्तम चरित्र अभिनेते घेण्याचा सपाटा लावून त्याने हा चित्रप्रकार पेटन्ट केला आहे असं म्हणणंही अतिशयोक्ती होउ नये.
मात्र त्याच्या चित्रपटांमधे ( ब-याच प्रमाणात) करमणूक असूनही त्यांचा असा  एक प्रॉब्लेम आहेच जो आपल्याकडल्या बहुतांशी हिंदी चित्रपटामधे पाहायला मिळतो. तो म्हणजे कथा निर्वातात घडणं.  एकदा सेट अप ठरला की पात्रांचं काम हे केवळ आपापसात विविध प्रकारचे गोंधळ निर्माण करणं इतकंच उरतं. त्यांच्या वागण्याबोलण्याला कसलेच संदर्भ उरत नाहीत. ते कोणत्या प्रदेशात राहातात, त्यांची विचारसरणी कोणत्या प्रकारची आहे, त्यांच्या भूमिकेमागे काही जागतिक संदर्भ आहे का? असा कसलाच विचार या व्यक्तिरेखांच्या म्हणजे खरंतर या चित्रकर्त्यांच्या मनाला शिवलेला दिसत नाही. तो या चित्रपटात शिवतो ,हा विशाल भारद्वाजच्या 'मटरु की बिजली का मन्डोला' चा विशेष.
मटरू मधे नावापासून असलेला वेगळेपणा , त्याचा तरुणांना आवडण्याजोगा नटसंच ,स्वतः विशाल भारद्वाजचं तारांकित नाव आणि भाराभर प्रमोशन पाहाता, लोकांच्या चित्रपटाकडून फार प्रचंड अपेक्षा होत्या आणि जेव्हा अशा अपेक्षा असतात ,तेव्हा बहुतेक वेळा चित्रपट निराशा करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. त्या नियमाला अनुसरुन बहुतेक प्रेक्षकांनी तो कसा सुमार चित्रपट आहे आणि कसा भारद्वाजच्या किर्तीला शोभणारा नाही याविषयी ताशेरे ओढले. वर्तमानपत्रांमधेही उलटसुलट परीक्षणं आली. काहींना हे भारद्वाजने डाव्या अंगाने केलेलं हे अत्युच्च स्टेटमेन्ट वाटलं तर काहींना ही एक मोठीच बनवाबनवी वाटली. मी स्वतः जेव्हा तो बघायला गेलो ,तेव्हा हे सारं मला माहीत होतं.
गुलजारचा शिष्य असणारा विशाल भारद्वाज हा आपल्या कामात गुलजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो असं दिसतं. साहित्यावर आधारित वा तसे नसतानाही साहित्यिक वळणाचे विषय, आपल्या चित्रपटांमधे फारसं न पाहायला मिळणारे विक्षिप्त दृष्टीकोन आणि स्वतंत्र तर्कशास्त्र, लोकप्रिय व्यावसायिक कलावंतांचा वेगळ्या व्यक्तिरेखांमधे वापर , उत्तम लिहिलेली ( बहुधा गुलजारनेच) गाणी ,हे आणि यासारखे अनेक घटक आपण भारद्वाज आणि गुलजार या दोघांच्याही चित्रपटात असतात. मात्र भारद्वाजचे चित्रपट हे अधिक श्रीमंती  निर्मितीमूल्य घेऊन येतात. गुलजारला साधेपणा चालतो,हे त्याच्या कथानकांच्या छोट्याशा जीवापासून छायाचित्रण शैलीपर्यंत अनेक गोष्टीत जाणवतं.भारद्वाजला छानछोकी लागते. व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाईफ असाव्या लागतात, पटकथा काही प्रमाणात प्रयोग करणारी असावी लागते, दृश्यशैली ठाशीव असावी लागते आणि स्टार्सही अधिक ग्लॅमरस. त्यात भर म्हणून गेल्या काही दिवसात तो चित्रप्रकारांमधेही वैविध्य आणण्याचा प्रयत्न करतोय. कमीने मधल्या निओ न्वार नंतर आता त्याचा हेतू सरळ विनोदी चित्रपट करण्याचा आहे . मात्र भारद्वाजने करायला घेतल्यावर तो फार सरळ राहाणार नाही हेदेखील उघड आहे.

मटरु मधे कथानक महत्वाचं नाही ,किंबहुना ते बरचसं आँटो पायलटवर आहे. त्यात कोण अडचणीत आहे, कोणाचं प्रेम कोणावर आहे, कोणाचं ह्रदयपरीवर्तन होणार , कोणाचा जय होणार हे सगळं ठरल्यात जमा आहे. मग महत्व आहे कशाला ,तर ते मूळ सेटअप ला आणि व्यक्तिरेखा रंगवण्याला. मूळ सेटअपला अशासाठी की तो या पुढल्या फार्ससाठी एक ब-यापैकी बैठक तयार करतो. ही बैठक वास्तववादी नाही, पण ती वास्तव जाणते. तिला वैचारीक आधार आहे. आणि व्यक्तिरेखांना महत्व अशासाठी की त्या तद्दन खोट्या असल्या तरी विशिष्ट प्रवृत्तींचं दर्शन योग्य प्रकारे करतात.

हरयाणामधल्या मन्डोला नामक कल्पित गावी हे कथानक घडतं. गावचा जमीनदारदेखील( पंकज कपूर) मन्डोला हेच नाव लावतो. मन्डोलाची योजना ही गावातल्या कर्जबाजारी शेतक-यांच्या जमिनीवर कब्जा करुन तिथे स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या कलमानुसार औद्योगिक शहर उभारणी करण्याची आहे. या योजनेत मदत व्हावी म्हणून तो राजकारण्यांना ( शबाना आझमी आणि आर्यन बब्बरने उभा केलेला तिचा रणजित, शक्ती कपूर परंपरेतला इरिटेटिंग मुलगा ) हाताशी धरुन आहे. मोबदल्यात आपली मुलगी बिजली ( अनुष्का शर्मा) त्यांच्या घरी सून म्हणून पाठवण्याची  त्याची तयारी आहे. यात अडचणी दोन आहेत. पहिली म्हणजे मन्डोलाची सदसदविवेकबुध्दी जी त्याने दारुला स्पर्श करताच उफाळून येउन  मन्डोलाला  सद्वर्तनी समाजवादी होऊन शेतक-यांची बाजू लढवायला लावते ( ही व्यक्तिरेखा चॅप्लिनच्या  सिटी लाईट्समधल्या दारू पिताच आमूलाग्र बदल घडून येणा-या श्रीमंतासारखी असणं हा योगायोग नसावा) .आणि दुसरी अडचण म्हणजे वकील असून कर्जफेडीसाठी मन्डोलाकडे ड्रायवर आणि हरकाम्याची नोकरी करणारा मटरु ( इम्रान खान ), ज्याचा गावात राहाण्यामागचा हेतू काहीतरी वेगळाच असावा.

'मटरू'चा जीनीअस हा त्याच्या मूळ कल्पनेत आहे जी वरवर गावाकडल्या काॅमेडीचा आव आणत आपल्या ग्रामीण राजकारणी धोरणावर ताशेरे आेढते, मात्र हाच जीनीअस संहितेच्या मांडणीत टिकत नाही. चित्रपट सुरु होताच आपल्याला भास व्हायला लागतो तो संहितेवरचं काम कमी पडल्याचा. अनावश्यक पात्रांचा भरणा, नीट न बांधलेले सैल प्रसंग, विशाल भारद्वाजपेक्षा डेव्हिड धवनच्या चित्रपटात शोभण्याजोगे विनोद, पात्रांमधे न दिसणारं सातत्य ( उदाहरणार्थ सुरुवातीला ड्रायवर असलेला मटरु पुढल्या भागात ते काम सोडून सर्व काही करताना दिसतो) या गोष्टी पाहून वाटतं की बहुधा पुनर्लेखनाचा कंटाळा करुन दिग्दर्शकाने संहितेच्या पहिल्या ढाच्यावरच काम केलेलं दिसतंय. चित्रपट पुढे सरकतो तेव्हा हे अधिक स्पष्ट होत जातं.

मात्र वेळोवेळी असेही प्रसंग येत राहातात जे आपल्याला दिग्दर्शकाच्या शैलीची आेळख देतात, त्यातल्या विनोदामागे दडलेलं वास्तव समोर आणतात , व्यावसायिक दृष्टीकोनाला बाजूला सारत मनाला येईल ते करत टिकून राहण्यामागची हिंमत दाखवतात. मन्डोलाच्या स्वप्नात असणारं शेतांना हटवून होणा-या प्रगतीचं चित्रण आणि त्यावर येणारं मन्डोलाचं स्वगत ,हा एकच प्रसंग माझा मुद्दा स्पष्ट करायला पुरेसा व्हावा. दुर्दैवाने अशा जागा जितक्या प्रमाणात हव्या तितक्या प्रमाणात येत नाहीत आणि चित्रपट ज्या पातळीवर पोचू शकला असता त्या पातळीवर पोचू शकत नाही.

चित्रपट आशयाबरोबर विनोदातही वेळोवेळी रेंगाळण्यामागचं एक कारण म्हणजे सारा डोलारा पेलण्याचं एकट्या पंकज कपूरवर पडलेलं काम. तो ते उत्तमरीत्या करतो मात्र तो नसणारे प्रसंगही अनेक आहेत ,जे ना इम्रान खान सावरु शकत ना अनुष्का शर्मा. कदाचित अजय देवगण असता तर परिस्थिती थोडीफार सुधारली असती , मात्र थोडीफारच. कारण मुळात या भूमिका लिहितानाही डाव्या हाताने लिहिलेल्या आहेत. किंबहुना त्या तशा असणं हेही देवगण जाण्यामागचं कारण असू शकेल.

मात्र हे सारं असूनही मटरु की बिजली का मन्डोलाने मला पुरतं निराश मात्र केलं नाही. भारद्वाज काय करु पाहातोय हे मी समजू शकत होतो. त्यातल्या चांगल्या विनोदाला हसू शकत होतो. त्यामागचा विचार आेळखू शकत होतो. भारद्वाजच्या इतर चित्रपटांबरोबर तुलना करता हा चित्रपट त्यामानाने कमी पडतो यात वादच नाही, पण तशी तुलना करणं मला आवश्यक वाटली नाही. अनेक विनोदी चित्रपट केवळ त्यातला बाश्कळपणा प्रेक्षकापुढे ठेवून हिट होत असताना , काही अजेन्डा असलेला चित्रपट  कधीही अधिक परवडेल असं मी समजतो.
- गणेश मतकरी 

Read more...

आवर्जून पाहावीशी बीपी

>> Sunday, January 6, 2013


मराठी चित्रपटांमधे जी तथाकथित नवचित्रपटांची लाट आली आहे , ती टिकेल अथवा नाही हे बहुतांशी एका विशिष्ट घटकावर अवलंबून राहील आणि ते म्हणजे चांगली निर्मितीमूल्य आणि विषय असणारे आशयघन चित्रपट देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दिग्दर्शकांच्या कामातलं सातत्य . पोस्ट - श्वास म्हणजे गेल्या नऊ दहा वर्षांच्या कालावधीतलं काम पाहता लक्षात येईल की एखाद दुसरा उत्तम चित्रपट करणारी मंडळी बऱ्यापैकी आहेत , पण नेमाने मराठी चित्रपटात टिकून राहून स्वतःचा प्रेक्षक तयार करणारे फार जण नाहीत . अपेक्षा असणाऱ्या दिग्दर्शकांपैकीही निशिकांत कामत , मंगेश हाडवळे आणि गेल्या काही दिवसात सचिन कुंडलकर यांनी हिंदी चित्रपटांत पदार्पण केल्याने ही यादी अधिकच छोटी व्हायला लागली आहे . या परिस्थितीत रवी जाधवने ' नटरंग ' आणि ' बालगंधर्व ' नंतर तिसरा मराठी चित्रपट करणं , हे त्याला मराठी चित्रपटांत नियमितपणे आणि अमुक एक दर्जा संभाळून काम करणारा दिग्दर्शक ठरवायला पुरेसं आहे .
खरं सांगायचं तर नटरंग किंवा बालगंधर्व हे दोन्ही आपल्या परीने महत्वाकांक्षी आणि अवघड वळणाचे चित्रपट असले , तरी मला वैयक्तिकदृष्ट्या फार आवडलेले चित्रपट नव्हेत . त्यांच्या विषयांचा अवाका , गांभीर्य आणि तपशील पाहता त्यांना वेळाच्या , प्रेक्षक पसंतीच्या आणि न्याय्य पटकथेच्या गणितात बसवताना थोडी अधिक कसरत झाल्याचं जाणवतं , ज्यामुळे ते थोडे अवजड झालेले आहेत . तरीही त्यांनी या दिग्दर्शकाचं एका विशिष्ट प्रकारचे ( गंभीर , भव्य , चरित्रात्मक , स्टार पॉवर्ड ... इत्यादी ) चित्रपट बनवणारा दिग्दर्शक म्हणून केलं आणि प्रेक्षक त्याच्याकडून काही विशिष्ट अपेक्षा ठेवायला लागला , हे खरंच . सामान्यतः साहित्यिक वा कलावंतांचा , मग ते चित्रकारापासून अभिनेत्यांपर्यंत आणि लेखकांपासून चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत कोणीही असोत , असा कल दिसून येतो की एका प्रांतात यश मिळालं की ते तो सोडायचं नाव घेत नाहीत आणि ते पुढलं सारं काम , त्या एके काळी मिळालेल्या यशाच्या पुनरावृत्तीत घालवतात . रवी जाधवच्या नव्या प्रयत्नाचं मला कौतुक यासाठीच वाटतं की , तो आधीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांमधे तयार केलेल्या संभाव्य अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेत नाही आणि अगदीच वेगळ्या पध्दतीच्या चित्रपटाला हात घालतो . हा प्रयत्न म्हणजे अर्थात ' बी पी ', ऊर्फ ' बालक - पालक '.
बी पी , हा या दिग्दर्शकाच्या आधीच्या चित्रपटांहून संपूर्णपणे वेगळा आहे . त्यामागची मूळ कल्पना , ही काहीशी गंभीर असली , तरीही तो जवळजवळ पूर्णपणे विनोदी आहे . त्याचा भार कोणा एका नामांकित कलावंतावर नसून ( जरी त्यात छोट्या भूमिकांमधे असे कलावंत जरूर पाहायला मिळतात ) पाच शाळकरी ( वा निदान शाळकरी दिसणाऱ्या ) मुलांवर आहे . प्रबोधन हा जरी चित्रपटाच्या हेतूंमधला एक भाग असला , तरी अगदी शेवटच्या पाचदहा मिनिटांखेरीज तो कुठेही स्वतःकडे अनावश्यक मोठेपणा घेण्याचा प्रयत्न करत नाही , वातावरण सतत खेळकर ठेवतो .
' बीपी ' हा अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या आणि महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधे गाजलेल्या एका याच नावाच्या एकांकिकेवर सैलसा बेतला असल्याचं मी ऐकून आहे . ही एकांकिका मी पाहिलेली नाही . त्यामुळे ती आणि चित्रपट यांमधे नक्की काय बदल आहेत , हे मी छातीठोकपणे सांगू शकणार नाही . मात्र एकांकिका त्या मानाने हल्लीची असल्याने एक बदल त्यात नक्की असावा , असं मला वाटतं आणि तो म्हणजे काळाचा बदल . बीपी जरी हल्लीच्या काळातली मुलं आणि त्याच्या पालकांमधे आवश्यक असणाऱ्या सुसंवादाविषयी बोलत असला , तरी त्यातलं कथानक हे गेल्या पिढीत १९८० च्या दशकाच्या आसपास घडणारं , पालकांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवायला लावणारं आहे . अशी पिढी , जी आज बालकांच्या नसून पालकांच्या स्थानी आहे , ज्यांच्या अनेक कडूगोड आठवणी या संवेदनशील विषयाशी जोडलेल्या आहेत , आणि अर्थातच , ज्यांना ' बीपी ' या शब्दप्रयोगाचा खरा अपेक्षित अर्थ माहीत आहे .
ब्लू फिल्म्स ना ' बीपी ' का म्हंटलं जात असे , हे मला अजिबात सांगता येणार नाही . पण मी स्वतः आठवी - नववीत असताना हा एक फार जिव्हाळ्याचा (!) विषय होता हे खरं . या लपून पाहाण्याच्या चित्रपटांमधे कोणी दर्जा शोधत नाही हे खरं असलं तरी , नवे रंगीत टिव्ही आणि नव्याने घरात दिसू लागलेले व्हिसीआर यांच्या काळात त्यातल्या त्यात बऱ्या फिल्म्स मिळवणे आणि पालकांच्या नकळत पाहणे , हा त्याकाळी एक धाडसाचा विषय होता . आज इन्टरनेटने जे - ते उपलब्ध करून देऊन ज्या अनेक गोष्टींमधला चार्म घालवलाय , त्यातलीच ही देखील एक म्हणता येईल . बीपी मधल्या कालबदलामागे हे हरवलेलं धाडस पालकवर्गाच्या मनात पुन्हा जागृत करणं , हा एक हेतू असू शकतो . मात्र असं असतानाही चित्रपटाला आजच्या काळाविषयी जे सत्य मांडायचय त्याची अपरिहार्यता कमी होत नाही . मी तर म्हणेन की केवळ सेक्सच का , घाऊक उपलब्धतेमुळे आजच्या पिढीत जो संवेदनशीलतेचा ऱ्हास होताना दिसतोय , त्याची एक नोंद घेण्याचं काम बी पी ने केलेलं आहे .
बीपी मधलं प्रमुख टोळकं आहे , ते चौघांचं . अव्या ( रोहीत फाळके ), चिऊ ( भाग्यश्री सकपाळ ), भाग्या ( मदन देवधर ) आणि डॉली ( शाश्वती पिंपळीकर ). एका चाळीत राहाणाऱ्या या चौघांना आपल्या परिचित विश्वापलीकडलं काहीतरी पालकांनी आपल्यापासून दडवून ठेवल्याचा सुगावा लागतो आणि हे नक्की काय ते जाणून घेण्याचा ते सपाटा लावतात . या कामात त्यांच्या मदतीला धावून येतो , तो या विषयाचा विश्वकोश असणारा विशू ( प्रथमेश परब ). उरलेला चित्रपट हा प्रामुख्याने दोन भागात विभागला जातो . या चौकडीच्या जिज्ञासेची पूर्तता करणारा पूर्वार्ध , तर त्या पूर्ततेमुळे त्यांच्या मानसिकतेत होणारे बदल दाखवणारा उत्तरार्ध . चित्रपटाचा पूर्वार्ध हा अधिक एकजिनसी आहे , कारण त्यात या मुलांचा एका विशिष्ट दिशेने होणारा प्रवास हा चढत्या आलेखाप्रमाणे येतो . याउलट उत्तरार्ध हा व्यक्तिरेखांच्या स्वतंत्र वाढीला वाव देणारा आणि अधिक आशयपूर्ण असूनही किंवा त्यामुळेच काहीसा एपिसोडिक आहे . हे टोळकं टोळकं न राहता इथे त्यांच्या तीन सुट्या गोष्टी होतात आणि विशू हा बराचसा बाजूला पडतो . मात्र तरीही एकूण परिणामात चित्रपट कच्चा वाटत नाही हे विशेष !
या दिग्दर्शकाची शैली ही कदाचित त्याच्या अॅडव्हर्टायजिंग पार्श्वभूमीमुळे असेल , पण छोट्या छोट्या जागा भरत नेण्याची , प्रसंग खुलवत नेण्याची आहे . त्यामुळे तो प्रत्येक प्रसंग शक्य तितका पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो . त्यामुळे कथाकल्पनेचा जीव छोटा असला तरी काहीतरी थातूर मातूर पाहिल्यासारखं वाटत नाही . चित्रपट भरगच्च वाटतो . फॅशन , दबंग , बालगंधर्व यांसारख्या विविध प्रकारच्या चित्रपटातून त्याच तोलाचं काम करणारा महेश लिमये , हा सध्याच्या महत्वाच्या छायाचित्रकारांतला एक मानला जातो . अशा छोटेखानी पण महत्वाच्या चित्रपटाला आलेल्या वजनात त्याचाही हात असणं साहजिक आहे . मात्र सर्वाधिक श्रेय जायला हवं , ते यातल्या मुलांकडे . मदन देवधर एक गुणी अभिनेता म्हणून परिचित आहेच . पण इतर , आजवर पडद्यावर न चमकलेली ही सारीच मुलं या गंभीर आणि गंमतीदार भूमिकांमधे आपला तोल सावरत कमालीच्या सफाईने वावरली आहेत . त्यांच्यासाठी आणि या आज प्रत्येकच घरात पालकांना संभ्रमित करून सोडणाऱ्या विषयासाठी ' बीपी ' पाहणं आवश्यक ठरावं !

- गणेश मतकरी (महाराष्ट्र टाइम्समधून) 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP