नोप - अनपेक्षित भयाचं आगमन

>> Friday, August 19, 2022


.

जॅार्डन पीलचं नाव हे सामाजिक संदेश असणाऱ्या भयपटांसाठी प्रसिद्ध आहे. गेट आउट(२०१७) आणि अस(२०१९) या त्याच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांमधे कृष्णवर्णीय समाजावरल्या अत्याचाराबद्दलचं भाष्य हे केंद्रस्थानी होतं. ‘असमधे समाजविचाराचा थोडा ओव्हरडोस होता, पणनोपमधे पुन्हा हे प्रमाण जमून आलेलं आहे. एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जरी कृष्णवर्णीयांबद्दलचं भाष्य इथे मर्यादीत प्रमाणात असलं आणि चित्रपटातली ओजे आणि एम, ही भावाबहिणीची जोडीही कृष्णवर्णीय आहेच, तरीही कथानकाचं सबटेक्स्ट हे केवळ कृष्णवर्णीयांशी संबंधित नाही. त्याचा विस्तार अधिक मोठा आहे


चित्रपटाचं कथानक म्हटलं तर ट्रेलरमधून कळतं, म्हटलं तर नाही. ट्रेलर मधे दिसणाऱ्या गोष्टी कथानकाचा महत्वाचा भाग आहेतपण तरीही काय दाखवावं आणि काय लपवावं हे योजताना अत्यंत चतुर असं मिसडिरेक्शन दिग्दर्शकाने साधलं आहे. सायन्स फिक्शन चित्रपटाशी सुसंगत वाटणारी इथली दृश्य तो पहाणाऱ्याला एका विशिष्ट दिशेला घेऊन जातात, आणि तिथेच खरी गंमत आहे. चित्रपटात येणारा ट्विस्ट खरं तर खूप अनपेक्षित नाही, पण तरीही आपण जो विचारातच घेतलेला नाही असा आहे


खरं तर ट्रेलर वगळता कथानकाबद्दलचं फारसं काहीच उलगडून सांगण्यासारखं नाही.हॅालिवुडसाठी अश्वप्रशिक्षणाचं काम करणाऱ्या ओजे ( डॅनिएल कलूया) आणि एम (कीकी पामर ) च्या प्रचंड रान्चवर आणि जवळच्याच एका छोट्याशा थीम पार्कमधे कथानकाचा बराचसा भाग घडतो. वडीलांच्या चमत्कारीक मृत्यूनंतर ( ज्याचं स्पष्टीकरणही आपल्याला पुढे मिळतं ) पुन्हा व्यवसायात जम बसवण्यासाठी धडपडणाऱ्या ओजेला रान्चवर एक तबकडी दिसते, आणि ती पाहून तो हादरुन जातो. प्रत्येक गोष्टीचा व्यावसायिक अंगाने विचार करणारी त्याजी बहीण एम ठरवते, की आजवर कधीच असं काही विश्वसनीय पद्धतीने चित्रीत झालेलं नाही. ते जर आपण करु शकलो तर पैशाला कमी नाही. आणि मग त्या दृष्टीने दोघांची हालचाल सुरु होते


या चित्रपटात एक गोष्ट स्पष्ट होते की जॅार्डन पीलचं काम हे एम नाईट श्यामलनच्या कामाशी फार जवळचं नातं सांगणारं आहे. भयाची आवडवैचित्र्यपूर्ण मांडणीचा परिणामकारक वापर, ट्विस्ट्स, कमीत कमी घटकांच्या वापरातून काही विशेष दाखवण्याच्या शक्यता आजमावणं, हे सारच आपण श्यामलनच्या चित्रपटांमधे पाहिलेलं आहे. ‘नोपच्या ट्रेलर वरुन कळतं, की चित्रपटात युएफओ ( अनआयडेन्टीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स, ज्याला आपल्याकडे उडत्या तबकड्या असं आणि एवढच छोटंसं आणि अपुरं नाव आहे) किंवा युएपी (अनआयडेन्टिफाईड एरीअल फिनोमिना) पहायला मिळणार. स्वत: श्यामलननेहीसाईन्सहा परग्रहवासियांना स्थान असलेला चित्रपट बनवलेला आहे आणि दोन्हीच्या कथानकात काही साम्य नसलं तरी ते ज्या पद्धतीने साध्या गोष्टींमधून भीती तयार करतात, त्यात विलक्षण साधर्म्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. श्यामलनची तुलना ( निदान त्याच्या पहिल्या काही चित्रपटांसाठी ) इतर दोन मास्टर दिग्दर्शकांशी करण्यात आली आहे. ते म्हणजे हिचकॅाक आणि स्पीलबर्ग. जॅार्डन पीलचीही त्यांच्याशी तुलना सहज शक्य आहे, आणि या चित्रपटातही त्या दोघांचा प्रभाव दिसून येतो. तुम्ही गुगल केलत तर ज्या चित्रपटातले संदर्भ इथे दिग्दर्शकाने वापरले आहेत त्याची यादी तुम्हाला सहज मिळू शकेल, पण त्यापलीकडे जाऊन माझं मत असं आहे, की हा पूर्ण चित्रपटच स्पीलबर्गला ओमाज असल्यासारखा आहे. खासकरुन त्याचे पहिल्या दोन फेजमधले चित्रपट, म्हणजेड्यूअल’, ‘जॅाज’, यासारखे रॅा थ्रिलर्स आणि पुढेक्लोज एन्काउंटर्स ऑफ थर्ड काइन्ड’, ‘इटी’, यासारखे फॅन्टसीकडे झुकणारे चित्रपट. मुळातनोपमधल्या तबकडीचं वागणंहीड्यूअलमधला ट्रक, ‘जॅाजमधला शार्क यांच्याशी जोडता येऊ शकतच. पण विशिष्ट चित्रपट निवडायचे, तरक्लोज एन्काउन्टर्स….’ आणिजॅाज’, हे या चित्रपटासाठी खास महत्वाचे ठरतील. मी तर असंही म्हणेन, की चित्रपटाचा पूर्वार्ध हाक्लोज एन्काउन्टर्स…’ ची आठवण करुन देणारा आहे, तर उत्तरार्धजॅाजची. तेही केवळ थीमॅटीक दृष्टीकोनातूनच नाही. पण कथानकाची रचना, पात्रांनी परिस्थितीशी लढताना वापरलेल्या क्लुप्त्या, काही विशिष्ट शॅाट्स, हे सारं या दोन चित्रपटांकडे निर्देश करतं. तबकडीचं काहीसं रहस्यमय वागणं, ट्रकमधून जाणाऱ्या ओजेला होणारं दर्शन हा भाग ठळकपणेक्लोज एन्काउंटर्स…’ ची आठवण करुन देतो. तर पताकांचा वापर हाजॅाजमधे पाण्याखाली दडलेल्या शार्कला शोधण्यासाठी वापरलेल्या कल्पनेची. शेवटाचा भाग तर पूर्णपणेजॅाजच्या रचनेशी सुसंगत आहे. अगदी एमने घेतलेला शेवटचा निर्णयही आपण त्या दृष्टीकोनातून पाहू शकतो.


स्पीलबर्ग, हिचकॅाक आणि श्यामलन या तिघांच्या चित्रपटात वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी या काही अनपेक्षित स्वरुपात आपल्यासमोर उद्भवतात. ‘ड्यूअलमधला हायवे, ‘नॅार्थ बाय नॅार्थवेस्टमधलं पिकांवर फवारणी करणारं विमान, ‘सायकोमधलं मोटेल, ‘साईन्समधलं शेत, ‘ओल्डमधला समुद्रकिनारा, श्यामलनने लिहिलेल्याडेव्हिलमधली लिफ्ट, या साऱ्या तशा परिचित गोष्टी, पण संदर्भ बदलताच त्या धोकादायक बनतात. ‘नोपमधला टेलिव्हीजन स्टुडीओ, थीमपार्क, रान्च ही देखील साधीशी ठिकाणं, पण अनपेक्षितपणे या जागा भीतीदायक ठरतात. चित्रपटाचा स्टुडीओमधला ओपनिंग शॅाट हाच याचं उदाहरण मानता येईल. श्रेयनामावलीदरम्यान सिटकॅाममधले संवाद, प्रेक्षकांचा हशा, असं सारं ओळखीचं ऐकू आल्यावर दृश्य उघडतं, तेच एका निर्मनुष्य स्टुडीओत. समोर पडलेल्या एका व्यक्तीचे पाय आपल्याला दिसतात, आणि छान कपडे घातलेलं पण रक्ताने माखलेलं एक माकडही समोर येतं. इथे काहीतरी भयंकर झालय असं आपल्या लक्षात येतं, पण नक्की काय हे कळत नाही. हा शॅाट अस्वस्थ करतो तो एकतर जे समोर दिसतं त्यामुळे, आणि त्याबद्दल चित्रपट काहीच माहीती देत नाही त्यामुळेही. ही माहीती आपल्याला पुढे तुकड्यातुकड्यात दिली जाते. हा प्रसंग एका तुलनेने दुय्यम पात्राच्या पूर्वायुष्यातला आहे, आणि कथानकाशी थेट जोडलेला नाही, पण संकल्पनेच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी तो मांडतो. ज्याच्या ताकदीची आपण कल्पना करु शकत नाही त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं हे धोकादायक आहे, असं या प्रसंगात सुचवल्याचं आपल्या पुढे लक्षात येतं, जे ब्लॅक हिस्ट्रीपासून अनेक ठिकाणी जोडून पहाता येईल. चित्रपटातल्या मुख्य खलनायकाबद्दलही आपण ते म्हणू शकतोच


चित्रपटाची दुसरी मोठी थीम प्रदर्शनाची, स्पेक्टेकलची हौस असल्याचं पीलने एकीकडे म्हटलं आहे. प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन मांडण्याचं मानवी संस्कृतीला असणारं वेड त्यांना भलत्या मार्गाला नेत असल्याचं इथे सुचवलं जातं. गोर्डी या पहिल्या दृश्यातल्या माकडापासून तबकडीला चित्रीत करुन नफा मिळवण्याच्या एमच्या इच्छेपर्यंत चित्रपटात याची वेगवेगळी उदाहरणं येतात. ही इच्छा या पात्रांना सतत अधिक मोठ्या संकटात टाकते, आणि धोक्याच्या दिशेने आकर्षित करत रहाते


मग नोप हा चित्रपट काय वर्गात टाकायचा? तो विज्ञानपट आहे, भयपट, का आणखी काहीएक गोष्ट ठळकपणे सांगण्यासारखी आहे की चित्रपट भयपटच आहे, मात्र यातलं बरच भय हे इम्प्लाईड स्वरुपाचं आहे. म्हणजे तुमच्या समोर भूतं नाचवून तुम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न केले जात नाहीत, तर सूचक रीतीने हे भय अवतरतं. हा सूचक वापरही योग्य त्या जागी अंगावर काटा आणतो, आणि तोच चित्रपटाचा विशेष आहे. एकदा का ट्रेलरमधे दिसणारी माहीती, आणि तुम्हाला जे माहीत असल्याचं तुम्हाला वाटतय ते मागे सोडलत, की चित्रपट अतिशय अनपेक्षित मार्गाने जातो. तो मार्ग फसवा नाही, विचार करायला लावणारा आहे आणि पुरेशी भयनिर्मितीही साधणारा आहे. ‘नोपशक्य तर थिएटरमधेच पहाण्याचा सिनेमा आहे. पडद्याचा मोठा आकार, शांतता, लक्ष केंद्रीत होईलशी परिस्थिती आणि अंधार या त्याच्या मॅक्झिमम इफेक्टसाठी आवश्यक गोष्टी आहेत. त्या साधल्यात तर स्वस्त धक्के देणाऱ्या भयपटांच्या काळात काहीतरी वेगळं  पाहिल्याचं समाधान तो नक्की देईल. सामान्यत: जे भयपट टाळतात, त्यांच्यासाठी मी हा खास रेकमेन्ड करेन.

- गणेश मतकरी 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP