अशक्य कल्पनांचा आविष्कार

>> Monday, February 25, 2008


खऱया-खोट्याचं,वास्तव-कल्पिताचं,विनोद आणि वैचारिकतेच्या काठाकाठावरून चालणारं बेमालूम मिश्रण पाहायचं असेल तर चार्ली कॉफमन या पटकथाकाराचे चित्रपट जरूर पाहावेत. अत्यंत विक्षिप्त आणि चमत्कृतीपूर्ण कल्पनांना लीलया हाताळण्याची ताकद या विलक्षण हुशार माणसात आहे. `इटर्नल स‌नशाईन आँफ द स्पॉटलेस‌ माईन्ड`,अँडेप्शन, आणि कॉफमनला पहिल्याप्रथम लोक ओळखायला लागले तो `बीइंग जॉन मालकोविच` हे त्याने लिहिलेले चित्रपट म्हणजे अनपेक्षित घटना आणि चमत्कारिक व्यक्तिरेखा यांचे मोठे भांडारच आहेत.
जॉन मालकोविच` हा हॉलीवूडमधला एक दर्जेदार आणि तऱहेवाईक नट आहे. डेन्जरस लिएजांस, कॉन एअर, आँफ माईन्स अँड मेन`सारख्या चित्रपटातून त्याला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. `बीइंग जॉन मालकोविच` या नावावरून वाटतं की हा चित्रपट या नटाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित, काहीसा चरित्रात्मक वैगैरे असावा. तर त्याचं उत्तर म्हटलं तर होकारार्थी आहे, म्हटलं तर नकारार्थी. म्हणजे यात मालकोविच आहे, त्याचं आयुष्यही आहे. पण बाकी स‌गळं कॉफमनच्या डोक्यातून आलेलं अफलातून रसायन आहे.
इथला नायक क्रेग (जॉन कुझँक ) आहे एक कठपुतळ्यांचा खेळ करणारा. पण त्याच्या कार्यक्रमांच्या वादग्रस्त विषयांमुळे त्याला कुणीच उभं करीत नाही. त्याची बायको लाटी (कँमरून डीयाझ) एक पेट शॉप चालवते आणि घरीही असंख्य प्राण्यांबरोबर राहते. क्रेग शेवटी नोकरी शोधायचं ठरवतो आणि एका इमारतीच्या साडेसातव्या मजल्यावरच्या आँफिसात नोकरी मिळवतो.
हे साडेसातव्या मजल्याचं आँफिस हा स्वतंत्रपणे एक खूपच विनोदी प्रकार आहे. या मजल्यावर उतरायला सातव्या आणि आठव्या मजल्याच्या मध्ये लिफ्ट बंद करायला लागते आणि लोखंडी पाईप दारातून घुसवून ते उघडायला लागतं. याची उंचीही अर्ध्या मजल्याची आहे आणि स‌र्वांना वाकून चालायला लागतं. `ओव्हरहेड्स लो` असण्याबद्दलचा विनोदही स‌र्वांकडून ऎकून घ्यावा लागतो.
तर क्रेग या आँफिसमध्ये मँक्सिन (कँथरिन किनर) या मुलीच्या प्रेमात पडतो, पण ती या बावळट कठपुतळीवाल्याच्या नादाला लागणार नसते. या आँफिसातच एका कपाटामागे त्याला माणूस जेमतेम शिरेल एवढ्या आकाराचं एक बीळ मिळतं. यातनं आत शिरलेला क्रेग पोचतो थेट नट जॉन मालकोविचच्या डोक्यात. म्हणजे आता क्रेग हा मालकोविचच्या डोळ्यातनं जग पाहायला लागतो. पण हे टिकतं केवळ पंधरा मिनिटं. त्यानंतर क्रेग फेकला जातो तो हमरस्त्याजवळच्या एका टेकाडावर.
आता या अविश्वसनिय घटनेचा क्रेग आणि मँक्सिन फायदा घ्यायचं ठरवतात.स्वतःच्या आयुष्याला विटलेल्या लोकांसाठी पंधरा मिनिटं जॉन मालकोविच बनण्याची तिकीटविक्रीच चालू करतात. अशातच मँक्सिन मालकोविचच्या संपर्कात येते आणि लाटी मालकोविचच्या डोक्यात असताना तिच्या प्रेमातही पडते. लवकरच क्रेग, लाटी, मँक्सिन, मालकोविच असा प्रेमाचा अशक्य स्क्वेअर तयार होतो.
`बीइंग जॉन मालकोविच` चा विशेष असा की तो यातल्या कल्पनांच्या स‌ततच्या कोलांटउड्यांनी बिथरत नाही आणि या उड्या शक्य तितक्या साधेपणाने दाखवतो. म्हणजे माणूस मालकोविचच्या डोक्यात शिरला, तर फार काही स्पेशल इफेक्टस वैगैरे दिसत नाहीत. कँमेरा केवळ एका एका चाैकटीतून मालकोवचला जे दिस‌तं. ते दाखवतो. वेळ संपल्यावर माणसं डोक्यातून हायवेवर फेकली जातात. तिथेही फडद्यावरचा चकचकाट नाही. केवळ हायवेचं दृश्य आणि माणसं आकाशातून पडल्यासारखी पडतात.
चित्रपट अनेक कळीच्या मुद्यांना स्पर्श करतो. माणसाचं स्वत्व म्हणजे काय? माणूस स्वतःला कितपत ओळखतो? प्रेम नक्की शारीरिक अस‌तं की मानसिक? आपल्या हालचालींवर आपला ताबा असतो का? अशा अनेक प्रश्नांची स‌रळ आणि तिरकस उत्तर तो शोधतो. यात एकमेकांत मिस‌ऴणाऱया विविध विचारांची स‌रमिसळ आहे. मात्र चित्रपट आपल्या रचनेत कुठेही गोंधळून जात नाही. कमालीच्या चिकाटीने तो यातल्या वळणांचा भाग ठेवतो अन् पाहणाऱयाला संभ्रमात पाडत नाही. हसवतो मात्र भरपूर.
आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे यात जॉन मालकोविचने साकारलेली जॉन मालकोविचची भूमिका. स्वतःचंच विडंबन करण्याचा हा उत्कृष्ट प्रयत्न आहे. पडद्यावरचा मालकोविच हा अर्थात खरा मालकोविच नाही. पण त्याची लोकांमधली जी प्रतिमा आहे, त्याचीच ही टिंगल आहे. शांत, गूढ, स्वतःला हुशार स‌मजणारा, लोक आपल्याला विक्षिप्त स‌मजतात, हे माहीत असलेला मालकोविच उभा करणारा हा असामान्य नट, एवढं एक कारणदेखील हा चित्रपट पाहायला पुरेसं आहे.
-गणेश मतकरी ( महानगरमधून)

Read more...

दुःखाची लाखबंद मोहर...

>> Saturday, February 23, 2008


अपंग व्यक्तीला सर्वसामान्य आयुष्य जगणं हेही एक आव्हानच असतं. अशा वेळी त्या अपंग माणसापाशी कलावंतांचं स्पंदणारं मन असेल तर? तर हा संघर्ष अधिकाधिक तीव्र, उत्कट आणि जिवंत होत जातो. दुःखाची धार जितकी अधिक, तितका त्यातून उमटणारा सूर उत्फुल्ल-रसरशीत-दाणेदार. रे चार्ल्सनं आपल्या वादळी आयुष्यातून हे सिद्ध केलं. ऍफ्रो-अमेरिकन कुटुंबातला त्याचा जन्म. त्यामुळे वंशभेद करणाऱ्या अमेरिकन समाजाची हेटाळणीची नजर. वडील नाहीत, त्यात घरची गरिबी. हे सगळं न समजण्याच्या वयातच धाकट्या भावाशी खेळत असताना, एका दुर्दैवी अपघातात त्याचा धाकटा भाऊ पाण्यात बुडून गेला. ही नियतीनं रेच्या कोवळ्या मनावर उमटवलेली पहिली लाखबंद मोहर. त्यातून आलेलं अनामिक दुःख आणि स्वतःच्याही नकळत मनात वस्तीला आलेला अपराधीपणाचा डंख. हे पुरेसं नाही म्हणूनच की काय, वयाच्या सातव्या वर्षीच डोळ्यांना कसलासा आजार होऊन रेची दृष्टी गेली. आता त्याच्या विश्‍वात होती फक्त निश्‍चयी-खंबीर आई आणि संगीताबद्दल वाटणारी ओढ. आईही पावला-पावलाला आधार देऊ करणारी नव्हे, तर रेला आपल्या स्वतःच्या पायांवर आत्मविश्‍वासानं उभं करू पाहणारी. काहीशी डॉमिनेटिंग. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आंधळा रे न्यूयॉर्कमध्ये आला तेव्हा त्याच्या गाठीशी फक्त त्याचं संगीत होतं. सुरवातीच्या संघर्षानंतर जाणकारांनी त्याच्या संगीतामधली जान ओळखलीही. "बी'सारख्या समंजस सहचारिणीचं प्रेम, यश, प्रसिद्धी, समृद्धी हे सगळं त्याच्याकडे चालून आलं. पण रेला सुखाचा घास इतक्‍या सहजासहजी मिळायचा नव्हता. त्याच्या भावाच्या मरणातून आलेल्या गंडानं त्याच्या मनात आपली पाळंमुळं रोवली होती. त्याच्या मनावर कायमचा उमटलेला त्याच्या आईचा ठसाही त्याच्या नकळत त्याला गुदमरून सोडणारा. त्यातूनच मग बीखेरीज इतर स्त्रियांशी संबंध ठेवणं आणि हेरॉईनसारख्या ड्रग्समध्ये अडकणं सुरू झालं. रेचं बंडखोर-जिवंत संगीत जितकं खरं होतं, तितकीच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही अंधारी बाजूही खरी होती. किंबहुना दोन्हीही एकमेकांना पूरकच होत्या. तुरुंग, मानसोपचारतज्ज्ञ, पुनर्वसन केंद्र अशा भयानक वर्तुळातून रेला जावं लागलं. पण त्यातून तो बाहेर आला तो मात्र लखलखीत शुद्ध सोन्यासारखा. त्यानंतरही तो संगीत देत राहिला. अमेरिकाभर पसरलेल्या आपल्या चाहत्यांना तृप्त करीत राहिला. पण ड्रग्जला मात्र तो शिवलाही नाही. त्याचं संगीत अमेरिकेत आजही मानानं विराजमान आहे. जॉर्जियात वंशभेदाला त्याने केलेला विरोध, त्यामुळे तिथल्या प्रेक्षकांनी त्याच्यावर घातलेला बहिष्कार आणि नंतर जाहीर माफी मागून केलेला त्याचा सन्मान हा त्याच्या आयुष्यातला अभिमानास्पद घटनाक्रम. अशा वादळी आयुष्याला चित्रबद्ध करणं हे खायचं काम नाही. रे ला कुरतडत असणारा अपराधीपणा आणि त्याच्या आईची त्याच्या मनावरची गडद सावली हे दोन तपशील दिग्दर्शकानं त्याच्या अंधाऱ्या बाजूसाठी निवडले आहेत. रे ला होणारे विचित्र गूढ भास आणि बालपणाबद्दलच्या त्याच्या रंगीत-उजळ आठवणी यांच्या मदतीनं त्यांनी रे चं व्यक्तिमत्त्व साकारलं आहे. काळ्याशार ओल्या अंधारात अवचित कशावर तरी पाय पडावा आणि मनातल्या भयानं फणा काढावा, असे रे चे हे भास आहेत. त्यांनी व्यापलेला रे च्या मनाचा कोपरा प्रेक्षकांना त्याच्या भीषण गंडाची पुरती चुणूक दाखवतो. तशाच त्याच्या आठवणी. त्या आठवणींमधलं त्याचं घर कायम झळझळत्या उन्हात न्हाणारं. रंगीत रसरशीत आहे. रंगीबेरंगी बाटल्या टांगलेलं तिथलं झाड म्हणजे रे च्या नादप्रेमाचं आणि रंगांना मुकलेल्या त्याच्या दृष्टीचं प्रतीकच. दुःख आणि आनंद अशा परस्परविरोधी प्रवाहात सापडलेला हा कलावंत. आपल्यामधल्या उसळणाऱ्या स्त्रोताला त्याने संगीतातून जोरकसपणे वाट करून दिली. पण त्याचं भरकटणंही त्याच्या ऊर्जेला अपरिहार्यच होतं. असं परस्परविरोधी आव्हानात्मक व्यक्तिमत्त्व जेमी फॉक्‍सनं रेखाटलं आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याच्या या व्यक्तिरेखेला नामांकन मिळालंय, ही त्याच्या कामाला पावतीच आहे. बालपणी निरोगी-उत्साही असणाऱ्या रे च्या देहबोलीत हळूहळू बदल होत जातो. अंधत्वानं येणारी असहायता आणि कलावंताची ऊर्जा यांच्यातला अंतर्विरोध जेमीनं जिवंत केला आहे. स्त्रियांबद्दल त्याला वाटणारं आकर्षण, अत्यानंदाच्या वेळी कलाविष्काराच्या वेळी त्याच्या शरीराची होणारी अस्वस्थ हालचाल, ड्रग्जनी त्याच्या शरीरावर केलेला परिणाम हे सगळं जेमीनं कसलाही नाट्यपूर्णतेचा आव न आणता साकारलंय. एरवी काहीसा चाचरणारा रे, गाताना मात्र मुक्तपणे बोलत असतो. हा बारीकसा तपशीलही जेमीनं अचूक पकडलाय. अडखळत, चाचरत होणारं त्याचं बोलणं त्याची अस्वस्थता व्यक्त करतं. रे च्या आईची व्यक्तिरेखाही ठसा उमटवून जाणारी आहे. तिच्या शिडशिडीत-लहानखुऱ्या चणीमधूनही तिच्यातला सळसळता जीवनोल्हास जाणवल्याशिवाय राहत नाही. तिच्या चेहऱ्याची करारी ठेवण आणि चमकणारे डोळे लक्षात राहून जातात. रे च्या आयुष्यामधले काही अनावश्‍यक तपशील टाळले असते तर त्याच्या गोष्टीला अधिक वेग आला असता हे खरंच. पण हा दोष वगळताही, रे चं भावविश्‍व साकारण्याची दिग्दर्शकाची संयत शैली आणि त्याला पुरेपूर साथ देणारा जेमीचा बंद्या रुपयासारखा खणखणीत अभिनय ही "रे' बघण्यासाठी पुरेशी सबळ कारणं आहेत.

- मेघना भुस्कुटे (सकाळमधून)

Read more...

फ्रेंच एंगेजमेंट

>> Thursday, February 21, 2008


जॉन-पीटर जुनेट आणि मार्क कारो या दोन फ्रेंच दिग्दर्शकांनी एकत्रितपणे चित्रपट बनवायला सुरवात केली ती 1992 मध्ये. पहिल्या चित्रपटापासूनच ही नावं लोकांच्या चांगली लक्षात राहिली. कारण त्यांनी बनवलेले दोन चित्रपट सर्वांच्या पसंतीला उतरण्यातले नसले, तरी विक्षिप्त ब्लॅक कॉमेडी म्हणून नाव मिळवून गेले. या दोन्ही चित्रपटांचे विषय चमत्कारिक होते. पहिला होता डेलिकसी (1992)- ज्यात अन्नटंचाई असलेल्या भविष्यातल्या जगाचं चित्रण होतं. जिथे खाटकाचा सहायक म्हणून राहिलेल्या नायकाला नोकरीवर ठेवण्यात मालकाचा इरादा असतो तो त्याला प्रत्यक्ष खाद्य म्हणून वापरण्याचा. दुसऱ्या "सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रन'मध्ये एक वेडा शास्त्रज्ञ लहान मुलांचं अपहरण करतो ते त्यांची स्वप्नं पळवण्यासाठी. कारण त्याचं स्वतःचं वय हे स्वप्नांच्या अभावे झपाट्याने वाढायला लागलेलं असतं. या दोन्ही चित्रपटांचे नाव आहे ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृश्‍य शैलीसाठी, आणि विषयातला भयानकपणा सांभाळूनही दिग्दर्शकांनी कथेत आणलेल्या विनोदासाठी. अर्थात हे दोन चित्रपट पाहिल्यावर या जोडीविषयी प्रेक्षक आणि समीक्षकांनी काही विशिष्ट मतं बनवली, आणि सर्जनशील परंतु आम प्रेक्षकांसाठी नसणाऱ्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणना करून टाकली. कारोने पुढे दिग्दर्शन केलं नाही. जुनेटने हॉलिवूडची "एलिअन ः रेझरेक्‍शन' हा एलिअन चित्रपट मालिकेचा चौथा भाग बनवण्याची ऑफर स्वीकारली, आणि मग फ्रान्सला परत गेला. आता मात्र जुनेटने आपल्याबद्दल असणाऱ्या सर्व समजांना खोटं पाडलं, आणि केवळ फ्रान्समधल्याच नाही, तर जगभराच्या सर्व प्रेक्षकांना आपला वाटेल असा चित्रपट पडद्यावर आणला. 2001 चा "एमिली' जो "लगान' आणि "नो मॅन्स लॅंड'बरोबर ऑस्कर स्पर्धेत होता, आणि त्यालाच बक्षीस मिळेल, अशी अनेकांची समजूतही होती. एमिली हा जुनेटच्या आधीच्या चित्रपटांहून संपूर्णपणे वेगळा होता. त्यात गडद छटा नावालाही नव्हत्या. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद लोकांपर्यंत पोचवून जगाचं भल करण्याची इच्छा असणाऱ्या एका प्रसन्न मुलीची ही गोष्ट होती. एमिलीच्या यशाने आडाखेबाज समीक्षक संभ्रमात पडले, आणि आता हा दिग्दर्शक कोणता नवा रस्ता निवडतो, हे पाहण्याच्या तयारीला लागले.
विरुद्ध दृश्‍य भाषांचं एकत्रीकरण
एमिलीनंतरचा जुनेटचा चित्रपट "ए व्हेरी लॉंग एंगेजमेंट' नुकताच पाहण्यात आला. गडद आणि प्रसन्न, नकारात्मक आणि सकारात्मक, गंभीर आणि विनोदी, अशा सर्वच छटांना एकत्र करणारा हा चित्रपट सादरीकरणातही पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन विरुद्ध दृश्‍य भाषांना एकत्र करताना दिसतो, तेही अत्यंत सफाईने; दिग्दर्शकीय हुशारीचं प्रदर्शन न करता. या चित्रपटाचा विषय पाहायचा तर सरळ गंभीर या सदरात मोडणारा आहे. ही प्रेमकथा, शोधकथा आणि युद्धकथा या तीनही परस्परभिन्न प्रकारांना चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जोडतो. कथा घडते ती प्रामुख्याने 1920 मध्ये. मात्र अनेक वेळा भूतकाळात उड्या घेऊन ती 1917 मधला कथाभागही सांगते. पहिलं महायुद्ध हे त्यावर गेलेल्या सैनिकांसाठी अतिशय त्रासदायक युद्ध होतं. मानसिकदृष्ट्यादेखील. विरुद्ध देशांचं सैन्य समोरासमोरच्या छावण्यांमध्ये महिनो न्‌ महिने तळ ठोकून बसलेलं असे. या काळातलं वाट पाहणं, अधेमधे युद्ध पुकारणं, पण बहुतेक वेळा थंडी-वाऱ्या-चिखलाला तोंड देत बसणं अनेक सैनिकांना सहन होत नसे. मग यावर अखेरचा आत्महत्येचा तोडगा अनेक जण स्वीकारीत. याहून अधिक आशावादी, घरची ओढ असणारे सैनिक स्वतःलाच जखमी करून घेत आणि सैन्यातून सुटायचा प्रयत्न करीत. मात्र यात एक गोम होती. जर का वरिष्ठांच्या लक्षात आलं, की ही सैन्यातून बाहेर पडण्याची युक्ती आहे, तर स्वतःलाच जखमी केल्याच्या आरोपाखाली त्यांना मृत्युदंड मिळे. मथिल्डा (ऑड्रे टॉटो, एमिलीचीच नायिका) हिच्या मानेक (गास्पार युलिटेल) या प्रियकरालाही अशीच शिक्षा झालेली आहे. मात्र ही शिक्षा अमलात आणली गेल्याचा पुरावा मात्र मथिल्डाकडे नाही. आता सुमारे तीन वर्षांनंतरही मथिल्डा आपल्या प्रियकराच्या मृत्यूबद्दलचं सत्य मान्य करायला तयार नाही. तिला आतून वाटतंय, की तो अजूनही जिवंत आहे. त्याला शोधून काढण्यासाठी ही पायाने किंचित अधू मुलगी जिवाचं रान करते. सैन्याची कागदपत्रं शोधून पाहते, प्रायव्हेट डिटेक्‍टिव्हला कामाला लावते, पेपरात जाहिराती देते, प्रत्यक्ष मृत्युस्थळीही जाऊन येते. मानेकला प्रत्यक्ष मरताना पाहणारा कोणी नसला, तरी युद्धानंतर त्याचं काय झालं, हे जाणणाराही कोणी माणूस नसतो. मानेकप्रमाणेच शिक्षा झालेल्या पाच जणांना प्रत्यक्ष गोळ्या न घालता, जर्मन आणि फ्रेंच छावण्यांमधल्या नो मॅन्सलॅंडवर सोडण्यात आलं, अन्‌ त्यातले बहुतेक जण दगावले हे मॅथिल्डाला माहीत असतं, पण पुढची बातमी मिळणं मुश्‍कील होत जातं. तपशील युद्धाचा
"ए व्हेरी लॉंग एंगेजमेंट'चा प्राण जर प्रेमकथेचा असला, तर तपशील युद्धकथेचा आहे, अन्‌ सादरीकरण रहस्यपटाप्रमाणे आहे. पटकथा एमिलीच्या शोधप्रयत्नांबरोबर पुढे सरकते, आणि समोरचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागतं. मात्र मिळालेली माहिती नेहमीच योग्य दिशेला नेते असंही नाही. कधी कधी ती या तपासाला भरकटतदेखील नेते. उदाहरणार्थ- पाचांतल्या एकाचा मृत्यू मथिल्डा ग्राह्य धरते तो या फ्रेंच सैनिकाने घातलेल्या जर्मन बुटांमुळे. कारण मृत्युमुखी पडलेल्या एका सैनिकाच्या पायांत हे बूट असल्याचं तिला कळलेलं असतं. पुढे लवकरच माहिती मिळते, की छावणीबाहेर पाठवताना त्याने एका मित्राबरोबर बूट बदलले होते. याचा अर्थ मेलेला माणूस हा पाच जणांपैकी नसून, वेगळाच कोणी असतो. युद्धचित्रणाच्या बाबतीतही एंगेजमेंट हा संपूर्णपणे काळाबरोबर आहे. युद्धावर गरजेहून अधिक वेळ तो रेंगाळत नाही, पण प्रेक्षकांची भिडभाड न ठेवता तो स्पीलबर्ग स्कूलप्रमाणे युद्ध आहे तसं रोमॅंटिक न करता पाठवतो. असं असूनही यातला सर्वांत छान भाग आहे तो या अतिशय गंभीर विषयाच्या कथेत ठेवलेला प्रसन्नपणा आणि विनोदाचा शिडकाव्याचा. नायिकेचा आशावाद हा या चित्रपटात पूर्ण पसरलेला आहे- जो चित्रपटाला निराशेकडे झुकू देत नाही. एका परीने पाहायचं तर हा चित्रपट जुनेटच्या पहिल्या दोन चित्रपटांना नंतरच्या एमिलीच्या सुराबरोबर सांधतो. आता हा दिग्दर्शक आपल्या मूळच्या विचित्र विषयांकडे न वळता, याच प्रकारचे, सर्वांपर्यंत पोचणारे चित्रपट करत राहिला तर उत्तम होईल. कारण त्याच्या कलेचा आस्वाद जितका अधिक लोकांना घेता येईल तितकं चांगलं. केवळ थोडक्‍या प्रेक्षक वर्गावर ती दवडणं हा तिचा अपव्यय ठरेल.
-गणेश मतकरी ( साप्ताहिक स‌काळ)

Read more...

हाऊ टू मॅडमॅन मेक अ फिल्म

>> Saturday, February 16, 2008सिनेमातला नायक बनण्याची सुप्त इच्छा प्रत्येक तरुणाच्या मनात असते. आदर्श नायकही कसा? तर एखाद्या संकटग्रस्त मुलीची मदत करणारा. तिच्या जीवनात सुखाची पखरण करणारा व चित्रपटाअखेर तिचे चुंबन घेणारा!
ह्यूजो आणि तिनचेक हेदेखील असे स्वप्नाळू तरुण. रुग्णालयात मानसोपचार घेणारे. काहीसे मतिमंद. चित्रपट बनविण्याच्या वेडापायी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वापरात अस‌लेला कँमेरा घेऊन ते पळ काढतात व सुरू होते आगळ्या-वेगळ्या चित्रपटाचे शुटिंग.
व्हायको अँन्जेलिक .या स्लोव्हेनियाच्या तरुण दिग्दर्शकाने आपल्या हाऊ टू मॅडमॅन मेक अ फिल्म (लास्ट स‌पर) या पहिल्याच चित्रपटात ह्युजो आणि तिनचेक या दोन मतिमंद तरुणांची कथा अनोख्या पध्दतीने सादर केली आहे. ह्युजो आणि तिनचेक रुग्णालयातून पळ काढतात आणि त्यानंतर आपण पाहतो ते ह्युजोच्या हातातला कँमेऱयाने चित्रबध्द केलेला चित्रपट.
या चित्रपटाचा नायक आहे तिनचेक. तिनचेक आणि ह्यूजो यांना पलायन प्रवासात भेटलेली स‌र्व माणसे त्यांच्या चित्रपटाच्या व्यक्तिरेखा बनून जातात. वास्तव जीवनातल्या अस्सल, खऱय़ाखुऱया माणसांना ह्युजो कँमेरात कैद करतो. तिनचेक नायक बनण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करू लागतो. सिनेमातल्या नायकाला स‌हजपणे शक्य होणारी गोष्ट खऱया जीवनात प्राप्त होणे किती कठीण अस‌ते याचा प्रत्ययही त्याला येऊ लागतो. काही सुंदर स्रियांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही तो करतो. पण व्यर्थ!
अखेरीस एका देखण्या तरुणाचा माग काढत ते तिच्या घरापर्यंत पोहोचतात. तिच्या घरातील पलंगाखाली लपून ह्यूजो चित्रिकरण करत राहतो. ही तरुणी असते मॅग्डोलेना. मँग्डानेलाच्या प्रियकराने तिला वेश्याव्यवसायात ढकललेलं असतं. या व्यवसायाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ह्युजो आणि तिनचेक मॅग्डानेलाला आत्महत्या करण्यासाठी मदत करायचे ठरवतात. अट फक्त एकच. मॅग्डानेला आत्महत्येपासून वाचविण्याचे,म्हणजेच तिनचेकला नायक म्हणून सिध्द करणारे दृश्य चित्रित करण्याची परवानगी ते मँग्डालेनाकडून घेतात. मँग्डानेलाच्या आत्महत्येपूर्वी `अखेरचे जेवण` घेण्यासाठी ह्युजो तिला आपल्या आजीच्या घरी नेतो. आतापर्यंत निर्दयी जगात वावरलेली मॅग्डालेना, ह्युजो,तिनचेक व आजी यांच्या अकृत्रिम प्रेमाने हरखून जाते. तिनचेक नायक होण्यासाठी उत्सुक असतो. तो व ह्युजो मॅग्डालेनाच्या आत्महत्येची तयारी पूर्ण करतात. या पळून गेलेल्या रुग्णांच्या मागावर असलेले रुग्णालयातील कर्मचारी व मँग्डानेलाचा प्रियकर त्याचवेळी तेथे येऊन पोहोचतात.
हाऊ टू मॅडमॅन मेक अ फिल्म किंवा लास्ट स‌पर अनेकार्थाने वैशिष्टयपूर्ण आहे. नायक मतिमंद, तर नायिका वेश्या. स‌माजाने नाकारलेल्या या घटकांमधील निरागस‌ ‌ नाते टिपता टिपता दिग्दर्शक स‌माजातल्या व्यंगावर नेमकेपणाने बोट ठेवतो व रुढार्थाने मतिमंद तरुणांना वास्तव जीवनातील नायकपण बहाल करतो.
-संतोष पाठारे

Read more...

एक फोटोग्राफर आणि मुलं

>> Friday, February 15, 2008


शिकागोच्या नॅशनल पब्लिक रेडिओने 1993 मध्ये एक योजना राबविली होती. आयदा बी वेल्स पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्‍ट या गरीब वस्तीत राहणाऱ्या लिलन जोन्स आणि लॉईड न्यूमन या दोन मुलांना त्यांनी एका कामासाठी टेपरेकॉर्डर पुरवले. काम होतं ते या वस्तीतल्या लोकांच्या जीवनावर, जिथं काही दिवसांपूर्वीच खाऊवरून झालेल्या भांडणातून एका मुलाला उंचावरल्या खिडकीतून खाली फेकण्यात आलं होतं, एक ऑडिओ डॉक्‍युमेन्टरी करण्याचं. त्यांनी हे आजूबाजूचं जग इतक्‍या प्रभावीपणे ध्वनिमुद्रित केलं, की या कामासाठी त्यांना पीबॉडी ऍवॉर्ड देण्यात आलं.

हे आठवलं ते दुसरा एक माहितीपट पाहिल्यावर. ऑस्कर मिळविलेल्या, कलकत्त्याच्या वेश्‍यावस्तीत वाढणाऱ्या मुलांवर आधारित माहितीपटात याच प्रकारचा एक प्रयोग आपल्याला दिसतो. अमेरिकन फोटोग्राफर झाना ब्रिस्की आणि तिचा सहकारी रॉस कॉफमन यांनी बनविलेल्या या माहितीपटातल्या मुलांना दिले जातात, ते स्टील फोटोग्राफीचे कॅमेरे. त्यांच्या भोवतालच्या जगाला चौकटीत बांधण्यासाठी, त्यांचा दृष्टिकोन कागदावर उमटवण्यासाठी. या फिल्ममध्ये आपल्याला दिसणारी वेश्‍यावस्ती ही बकाल आहे. इथल्या मुलांची परिस्थिती, समाजात या मंडळींना मिळणारी वागणूक, त्यांचं या पिढीजात वेश्‍या व्यवसायाच्या चक्रात अडकून राहणं, हे आपल्याला अस्वस्थ करणारं निश्‍चित आहे; पण परदेशी प्रेक्षकांना बसेल तेवढा धक्का देणारं नाही. कारण हे वास्तव आपल्याला तितंक उपरं नाही. आपल्या समाज व्यवस्थेचा हा एक कीड लागलेला भाग आहे आणि आपण आपल्या सुरक्षित जीवनाच्या चौकटीत सांभाळून राहत असलो तरी त्यांच्या अडचणी आपण जाणून आहोत, निदान काही प्रमाणांत. असं असूनही आपण कधीही या सामाजिक प्रश्‍नाचा विचार करत नाही. आपण स्वतः सोशल वर्कर नाही, त्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात या भानगडीत पडण्याचं काही कारणच नाही, अशी एक सोपी सबब पुढे करून आपण आपली या प्रकरणातून सुटका करून घेतो. "बॉर्न इनटू ब्रॉथेल्स'चा विशेष हाच, की झाना ब्रिन्स्कीदेखील कोणी सोशल वर्कर नाही. ती आहे फोटोग्राफर, त्यामुळे प्रत्यक्षात इथल्या प्रश्‍नांच्या मुळाशी जाण्याची तिला गरज नाही. ती त्रयस्थपणे आपलं काम करून बाहेर पडू शकते; पण ती तसं करत नाही. ती हे जाणून आहे, की आपण सामाजिक बदल घडवून आणू शकत नाही. आपली मदतही फार तर मूठभर मुलांना होईल, हेही तिला माहीत आहे. तरीही आपल्या हातून होईल ते करण्याची तिची इच्छा या माहितीपटात दिसून येते.

फोटोग्राफी क्‍लास

मुलांसाठी झानाने केलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने मुलांसाठी काढलेला फोटोग्राफीचा क्‍लास.दुभाष्याच्या मदतीने तिने या मुलांना आपल्या आजूबाजूला अधिक जाणीवपूर्वक बघायला शिकवलं. तिचा हा प्रयत्न या माहितीपटातून आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने पोचतो. आपल्याला प्रत्यक्ष मुलं फोटो काढताना दिसतात. आत्मविश्‍वासाने सर्वत्र फिरण्याचीही त्यांना सवय होताना दिसते. रस्त्यावर, बसमध्ये, प्राणिसंग्रहालयात, कोणत्याही प्रहरी ही मुलं कॅमेरा डोळ्याला लावून असतात. कोणाला प्रत्यक्ष फोटो काढणं आवडतं, तर कोणाला त्यांची हा चांगला, हा वाईट, अशी निवड करणं आवडतं. अनेक जण आपल्या छायाचित्रांविषयी बोलतात. दुसऱ्या कोणाची चित्रं आवडली, का आवडली, हेदेखील बोलतात. गौरला आपल्या वस्तीचा बकालपणा, अस्वच्छता खटकते. आपल्या राहण्याच्या पद्धतीतला गलिच्छपणा तो चौकटीत पकडण्याचा प्रयत्न करतो. या मुलांमध्ये सर्वांत हुशार असणाऱ्या अविजितच्या छायाचित्रात तपशील भरलेले दिसतात. मूळ विषयाबरोबरच आजूबाजूच्या अनेक वस्तू, माणसं, यातून अविजित अधिक व्यक्त होतो. अविजित, कोची, सुचित्रा आणि इतरही मुलांची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात आणि ती थक्क करणारी असतात. या मुलांची वयं आणि पार्श्‍वभूमी पाहता त्यांनी दाखविलेली समज, ही कौतुकास्पद असते. बहुधा झानालाही या मुलांच्या नजरेचं कौतुक वाटलं असावं. शिवाय इतके दिवस त्यांच्याबरोबर घालवल्याने वाटणारी आपुलकी होतीच. तिने ठरवलं, की यातल्या शक्‍य त्या मुलांना या वस्तीतून बाहेर काढायचं. त्यासाठी करण्यात आलेली गोष्ट दुपदरी होती. एक म्हणजे तिने या मुलांसाठी बोर्डिंग स्कूल्स शोधायला सुरवात केली जेणेकरून या मुलांना आपल्या वस्तीत राहावं लागणार नाही आणि सुधारणेला वाव मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे या कामाला लागणारी आर्थिक मदत मिळविताना तिने या मुलांच्या कलेचाच आधार घेण्याचा ठरवलं. हा निर्णय योग्य आणि हुशारीचा होता. कारण मुलांच्या आत्मविश्‍वासात त्याने वाढ झाली असती. त्यांचं नाव आणि कौतुकही काही प्रमाणांत झालं असतं आणि प्रत्यक्ष अर्थसाह्य उभं राहण्याची आशाही होतीच. झानाने ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या मदतीने ठिकठिकाणी या मुलांच्या छायाचित्रांची प्रदर्शनं घडवली. "सोदबीज'सारख्या मातब्बर संस्थेमार्फत या छायाचित्रांचा लिलाव करवला. यादरम्यान अविजितकडे इतक्‍या मंडळींचं लक्ष वेधलं गेलं, की त्याला एका जागतिक छायाचित्र प्रदर्शनासाठी ऍमस्टरडॅमला जाण्याची संधी चालून आली. अर्थात खऱ्या आयुष्यातले प्रश्‍न चित्रपटासारखे पटकन सुटत नाहीत. त्याप्रमाणे इथेही ते पटकन सुटले नाहीत. बोर्डिंग स्कूल प्रवेशात अनंत अडचणी आल्या. वेश्‍यावस्तीत राहतो म्हणून अविजितला पासपोर्ट मिळेना. त्यातून त्याच्या घरी काही कौटुंबिक प्रश्‍न तयार झाले आणि त्याची फोटोग्राफी मागे पडलेशी लक्षणं दिसायला लागली. "बॉर्न इनटू ब्रॉथेल्स' आपल्या मनाला भिडतो तो वेगवेगळ्या कारणांसाठी. तो आपल्यासमोर जी सत्यकथा उलगडतो, ती माहितीपटाच्या रूक्षपणाने, केवळ माहितीचे तुकडे आणि आकडेवारी देऊन नाही, तर प्रेक्षकाला बरोबर घेऊन, त्यात गुंतवून. या व्यक्तिरेखांचा प्रवास जितका त्यांना स्वतःला अनपेक्षित आहे, तितकाच आपल्यालाही. त्यामुळे आपणही या प्रवासात कधी सामील होतो, ते आपल्याला कळत नाही. त्याच्या या प्रकृतीमुळे तो सांकेतिक माहितीपटाहून अधिक पाहण्यासारखा होतो. त्याच्यातली प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूकही वाढते अन्‌ त्यातला संदेश एरवीच्या माहितीपटापेक्षा अधिक लोकांपर्यंत पोचण्याची शक्‍यता तयार होते. त्याचबरोबर यातल्या मुलांच्या प्रश्‍नावर झानाने काढलेला तोडगा इतका वेगळ्या प्रकारचा आहे, की तोही आपल्याला विचार करायला लावतो. समाजाच्या दुर्दैवी घटकांना मदत करण्यासाठी अमुक एकच मार्ग आहे, असं नाही, हे यातून दिसतं. आपल्या अडचणी सोडवताना, असं काही वेगळ्या प्रकारचं उत्तर काढणं शक्‍य आहे का, हे पडताळून पाहायला आपण प्रेरित होतो. पण "बॉर्न इनटू ब्रॉथेल्स'चा सर्वांत मोठा गुण हा, की तो आपल्या सर्वांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो. समाज बदलण्यासाठी आपण स्वतः समाजसेवक असण्याची गरज नाही. संपूर्ण समाजही आपल्या मर्जीप्रमाणे बदलेल, असं नाही. तरीही प्रत्येकाने आपल्याकडून जेवढं होईल ते करण्याची गरज आहे. त्यातून पडलेला फरक हा कितीही सूक्ष्म असला तरी अखेरीस तो सर्वांच्या फायद्याचाच असेल. झाना ब्रिस्कीकडून निदान एवढा धडा तरी आपण घ्यायलाच हवा.


-गणेश मतकरी ( साप्ताहिक स‌काळ)

Read more...

तैवानी प्रतिबिंब

>> Monday, February 11, 2008


एका तैवानी कुटुंबातला लग्नसमारंभ. ग्रुप फोटोची तयारी चाललेली. गर्दीत पुढं यांग-यांग हा छोटा- सहा-सात वर्षांचा मुलगा उभा. त्याच्या मागे तीन-चार मुली. यांग-यांग (जोनाथन चांग) पुढे पाहत असताना हळूच एक मुलगी मागून टपली मारते. तो वळून पाहतो, पण एव्हाना मुली साळसूदपणे उभ्या. काही वेळानं दुसरी मुलगी तेच करते. यांग-यांग वळेपर्यंत जैसे थे. हा प्रसंग तसा साधा, अगदी कोणत्याही लग्नसमारंभात पाहायला मिळण्यासारखा; पण दिग्दर्शक एडवर्ड यांगच्या "यीयी' (yiyi) या तीन तास चालणाऱ्या प्रदीर्घ आणि अर्थपूर्ण चित्रपटात तो एक महत्त्वाचं कथासूत्र मांडण्यासाठी वापरला जातो. हे सूत्र अर्थातच या प्रसंगात स्पष्ट होत नाही. त्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागते. पुढं एका प्रसंगात यांग-यांग आपल्या वडिलांना म्हणजे चित्रपटाचा नायक एन.जे. (निन-जेन वु) याला विचारतो, की आपण फक्त समोरचंच पाहू शकतो; मग आपल्याला संपूर्ण सत्य कसं कळू शकेल? या आपल्या नजरेच्या किंवा दृष्टिकोनाच्या मर्यादेनं यांग-यांग एका परीनं झपाटून जातो. वडिलांनी दिलेल्या कॅमेराचा उपयोगही तो पाठमोऱ्या माणसांचे फोटो काढण्यासाठी करतो. त्या त्या माणसाला त्याच्या नजरेला कधीच पडू न शकणारा भाग दाखवण्यासाठी. यांग-यांगला पडलेला प्रश्‍न बालसुलभ असला आणि तो मांडताना दिग्दर्शकानं मांडलेली उदाहरणं, म्हणजे यांग-यांगला टपली कोण मारतंय हे न कळणं किंवा पाठमोरे फोटो काढणं, ही गमतीदार आणि मुलांच्या विश्‍वाबरोबर सहजपणे मिसळणारी असली, तरी दिग्दर्शकाला अभिप्रेत अर्थ हा अधिक खोलवर जाणारा आहे. जगातला प्रत्येक माणूस हा त्याच्या दृष्टिकोनानं बांधलेला असतो आणि त्याच्यापुरते अर्थ त्यानं काढले तरी कोणत्याही गोष्टीचा त्रयस्थपणे आणि सर्व पैलूंनी विचार करणं त्याला अशक्‍य असतं, असं हा चित्रपट मांडतो. अतिशय सोप्या शब्दांत, सहजपणे आणि आपण काही वैश्‍विक सत्य सांगत असल्याचा आव न आणता. 2000 च्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिक पटकावणारा हा चित्रपट अमुक एका चित्रप्रकाराच्या लेबलाखाली बसण्यासारखा नाही. एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनात काही महिन्यांच्या कालावधीत घडणाऱ्या घडामोडी इथं पाहायला मिळतात. एका लग्नापासून सुरू होणारा हा चित्रपट त्याच कुटुंबात घडणाऱ्या एका व्यक्तीच्या मृत्यूनं संपतो. मध्यंतरीच्या कालावधीत एका मुलाचा जन्म, एक आत्महत्येचा प्रयत्न आणि एक खून अशा ठळक आणि मेलोड्रामाच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी चालतीलशा जागा पटकथेत येतात; पण चित्रपट कुठंही अतिनाट्याच्या वाटेला जात नाही.

अस्सल चित्रण

एन.जे., त्याची पत्नी मिन-मिन (एलेन जिन), मुलगी टिंग-टिंग (केली ली) आणि मुलगा यांग-यांग हे इथलं प्रमुख कुटुंब. एन.जे. त्याच्या व्यवसायात काही अडचणींना तोंड देतोय. अशातच त्याची भेट शेरीशी (सु-युन को) होते. शेरी ही त्याची महाविद्यालयीन काळातली प्रेयसी. पण हा संबंध एन.जे.नं काही वैयक्तिक कारणासाठी संपवलेला. आता शेरी ही तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखात आहे. मिन-मिनच्या आईला याच सुमारास काही अपघात होतो आणि पुढं आलेल्या प्रदीर्घ आजारपणात निराश झालेली मिन-मिन अध्यात्माचा आधार घेते. शेजारच्या घरातल्या लिलीचा मित्र फॅटी (पॅन्ग चांग यु) हा टिंग-टिंगकडे आकर्षित होतो आणि तिचं विश्‍व थोडं बदलायला लागतं. इकडं यांग-यांगच्या शालेय जीवनातही काहीशा याच प्रकारच्या घडामोडी व्हायला लागतात. एन.जे. शेरीशी संपर्क वाढवायचं ठरवतो आणि कुटुंबाच्या समस्या वाढण्याची चिन्हं दिसायला लागतात. बहुधा चित्रपटांमध्ये असं दिसतं, की कथा या घडवल्या जातात. पात्रं घेत असलेले निर्णय हे प्रत्यक्ष व्यक्तीपेक्षा व्यक्तिरेखा घेईल, असे घेतले जातात आणि गोष्ट पुढं जाण्यासाठी अनेक तडजोडी केल्या जातात. पडद्यावरची पात्रं फारसा विचार करताना दिसत नाहीत आणि रचना ही बहुधा शेवटावर नजर ठेवून आकाराला आलेली दिसते. "यीयी'चा विशेष म्हणजे हे चित्रकर्त्यांचे आडाखे आणि चित्रपट बांधण्याचे प्रयत्न इथं जाणवत नाहीत. कितीही लहान-मोठं पात्र असो, त्याला कथेला पुढं नेण्याची घाई झाल्याचं दिसत नाही. ती आपल्या गतीनं काम करतात, आपल्या गतीनं आणि कुवतीनं विचार करतात आणि अत्यंत नैसर्गिकपणे वागतात. त्यांचं कुठंही नकली न होणं, या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेतं. मनुष्यस्वभावाचं बारकाईनं केलेलं निरीक्षण, ही या चित्रपटातली महत्त्वाची बाजू. चित्रपटातल्या सर्व वयाच्या पात्रांच्या चित्रणात हे दिसून येतं; मग ते व्यावसायिक यशासाठी तडजोडी करायचं नाकारून घरी बसणारं एन.जे.सारखं प्रमुख पात्र असो किंवा एन.जे. आणि त्याच्या मित्राला हॉटेलमध्ये "तुम्ही जुगार तर खेळत नाही,' असा प्रश्‍न विचारून दुसऱ्या क्षणी "कोण जिंकलं?' असं विचारणारं, केवळ काही सेकंद पडद्यावर येणारं वेटरचं पात्र असो. चित्रपटाची लांबी आपल्याला न जाणवण्याचं कारण काही प्रमाणात हे अस्सल चित्रण आहे, जे आपल्याला अनेकदा आपण चित्रपट पाहतोय हे विसरायला लावतं आणि या कुटुंबाच्या सुख-दुःखात आपल्याला एखाद्या हितचिंतकाप्रमाणे सहभागी करून घेतं. यातल्या आजीच्या पात्राचा, पटकथेच्या दृष्टिकोनातून खास उल्लेख करण्याची आवश्‍यकता वाटते. हे पात्र चित्रपटाच्या बहुतेक काळ कोमामध्ये आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष घटनांमध्ये सहभागी होत नाही; पण दिग्दर्शकानं अनेक पात्रांना या आजीच्या संपर्कात आणलं आहे. ती एकप्रकारे या व्यक्तिरेखांचा साऊंडबोर्ड आहे. डॉक्‍टरांनी ती बरी होण्यासाठी सल्ला दिलेला आहे, की बेशुद्धावस्थेत असूनही तिच्याशी बोलत राहण्याची आवश्‍यकता आहे आणि प्रत्येक जण वैयक्तिकपणे या पात्राशी जो संवाद साधतो, तो चित्रपटाच्या आणि व्यक्तिरेखांच्या जडणघडणीत महत्त्वाचा ठरणारा आहे. त्या-त्या पात्राच्या स्वभावाचं प्रतिबिंबही या एकतर्फी संभाषणांवर पडलेलं दिसतं. उदाहरणार्थ टिंग-टिंगच्या मनात अपराधाची भावना आहे, की आजीच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत. या संवादातून ती माफीची अपेक्षा करते आणि मनाच्या चलबिचलीला वाट करून देते. तिचे प्रसंग हे चित्रपटाच्या अखेरीला खास महत्त्वाचे ठरतात. एका प्रसंगी एन.जे. या संवादालाच शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो, "हे थोडं प्रार्थना करण्यासारखं आहे. आपलं म्हणणं पलीकडच्या व्यक्तीला ऐकू येतंय की नाही, हे कळायला मार्ग नाही आणि आपलं बोलणं कितपत प्रामाणिक आहे याचीही शाश्‍वती नाही.'

आपल्या समाजाचं प्रतिबिंब

चित्रपट प्रेक्षकाला सतत गुंतवून ठेवत असला, तरी त्यातलं रचनेचं सौंदर्य अचानक समोर आणून देणारा भाग आहे तो जवळजवळ दोन-तृतीयांश चित्रपट झाल्यानंतरचा. हा भाग एन.जे.च्या टोकिओ प्रवासाशी संबंधित आहे. मिंग-मिंग या वेळपर्यंत पुरती निराश झाली आहे आणि एका आश्रमात वस्तीला जाऊन राहिली आहे. एन.जे. कामानिमित्तानं टोकिओला जातो आणि आपल्या जुन्या दिवसांना स्मरत शेरीलाही तिथं बोलवून घेतो. हा भाग या दोन व्यक्तिरेखांना आपल्या जुन्या आठवणी जागवताना दाखवतो आणि त्याला समांतर म्हणून एन.जे.च्या दोन मुलांच्या आयुष्यात येणारी प्रेमाची पहिली चाहूलही चित्रित करतो. जवळजवळ एक स्वतंत्र चित्रपट होण्याची क्षमता असणाऱ्या या भागातून "यीयी'मधलं आणखी एक कथासूत्र समोर येतं- ते म्हणजे गतकाळात हातून निसटलेल्या संधींचा पाठपुरावा आणि आपण घेतलेले निर्णय चुकले का किंवा वेगळे निर्णय आपल्याला कोणत्या नव्या दिशेला घेऊन गेले असते, याचा विचार करणारा आपला स्वभाव. चित्रपट हा भूतकाळ एन.जे.समोर उभा करतो आणि आपल्या सर्वांच्याच मनातल्या काही सुप्त जखमांना वाचा फोडतो. असं असूनही अखेरीस चित्रपटाचा विश्‍वास आहे तो मात्र प्राक्तनावर. प्रत्येकाचं आयुष्य दुसरी संधीही बदलू शकणार नाही, या मतावर तो ठाम आहे. मात्र, हा विचार तो आपल्यावर लादत नाही. आपल्याला याच निर्णयापर्यंत पोचण्याची दिशा मात्र दाखवतो. वरकरणी साधा सोपा वाटला तरीही "यीयी' हा तैवानी चित्रपट अत्यंत कौशल्यानं सादर करण्यात आला आहे. यांतली एकही व्यक्तिरेखा आपल्या वंशाची नसली तरी हा समाज जणू आपल्या समाजाचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे कोणीही परकं वाटत नाही. इथं लग्नाचं जेवण सोडून मॅक्‍डोनल्डमध्ये जाणारा आणि टेबलवर बॅटमॅन रॉबिनची चित्रं लावणारा मुलगा आपला जसा पाहण्यातला आहे, तसाच तत्कालीन स्वार्थासाठी हलक्‍या प्रतीच्या कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्‍ट करणारा एन.जे.चा बिझनेस पार्टनरही. मैत्रिणीची पत्रं पोचवताना स्वतःच तिच्या मित्राकडे आकर्षित होणारी मुलगी जशी पाहण्यातली आहे, तशीच जबाबदाऱ्यांनी थकून गेलेली, सुटकेचा मार्ग शोधणारी तिची आईही. हे सगळे जण आपल्याला जो अनुभव देतात, तो केवळ चित्रपटाच्या सांकेतिक व्याख्येमधून व्यक्त होण्याजोगा नाही. त्यापलीकडे जाऊन तो आपल्या मनाशी थेट संवाद साधणारा आहे. आपल्या माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादांचा आणि परिपूर्णतेचा साक्षात्कार घडवणारा आहे.
-गणेश मतकरी ( साप्ताहिक स‌काळमधून)

Read more...

तरल कविता

>> Thursday, February 7, 2008


सिनेमाच्या सुरुवातीलाच दृष्ट लागण्यासारख्या देखण्या फ्रेम्स दिसल्या, की नजर सुखावते; पण जीव धसकतो. सिनेमा "सुंदर' करण्याच्या हव्यासापोटी आशयाची गळचेपी तर होणार नाही ना, अशी पूर्वानुभवावर आधारित भीती वाटते. "ब्रोकबॅक माऊंटन'च्या सुरुवातीला तसंच होतं. निळसर डोंगररांगा, हिरवीगार कुरणं, त्यात वाहणारे नितळ ओढे, मेंढ्यांचे दुडदुडणारे कळप आणि या सगळ्या हळुवार निसर्गाशी नातं सांगणारा एखादाच काऊबॉय... पार्श्वभूमीला तितकंच हळुवार तरल संगीत; पण गोष्ट उलगडत जाते आणि दिग्दर्शक अँग ली आपली भीती निराधार ठरवत जातो. आपल्यासमोर असते ती एक तरल कविता; तिला साजेशा, पूरक दृश्यभाषेतून मांडलेली. जॅक ट् विस्ट (जॅक गेलेनहॉल) व एनिस डेल मार (हीथ लीजर) हे दोघे काऊबॉईज. आयुष्याच्या सुरुवातीला अस्थिर काळात योगायोगानं एकत्र आलेले. ब्रोकबॅक माऊंटनवर एकत्र धनगरकी करीत असताना त्यांची मैत्री होते. मैत्रीच्याही पुढे जाणारं शरीर नातं त्यांच्यात नकळत जडून जातं. सुरुवातीला त्याची त्यांना लाजही वाटते; पण त्यातली सहज नैसर्गिकता ते स्वीकारतात. पुढे दोघांचेही रस्ते बदलतात. मैत्रिणी भेटतात. लग्नंही होतात. जॅकला एक गोड छोकरा; तर एनिसला दोन मुली होतात. पण, त्यांना एकमेकांची ओढ स्वस्थ बसू देत नाही. चार वर्षांच्या दीर्घ काळानंतर ते एकमेकांना भेटतात आणि मग भेटतच राहतात, आपल्या अपरिहार्य नात्याची खात्री पटून, ब्रोकबॅक माऊंटनच्या साक्षीनं. जॅक आणि एनिसचं नातं दिग्दर्शकानं फारच लोभस रंगवलं आहे. ते फक्त मित्र नाहीत; ते परस्परांचे जोडीदार आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष नात्यात येणारे सारेच ताणतणाव त्यांना चुकले नाहीत. तशीच त्यासोबत येणारं परस्परांचं मधुर आकर्षणही. त्यांच्या भांडणातून, एकत्र येण्यातून, एकमेकांबद्दलच्या काळजीतून, मारामारीतून आणि शारीर भाषेतून हा नात्याचा गोफ अलगद विणत जातो; शिवाय जगाच्या नजरेतून हे नातं नॉर्मल नसल्याचाही ताण त्यांना आहेच. कायमचं एकत्र येण्याच्या त्यांच्या गरजेवर ती समाजाची भीती कायम छाया धरून असते. ते सिनेमाभर जाणवत राहतं. जॅक आणि त्याच्या बायकोचं नातं, एनिस आणि त्याच्या बायकोचं नातं, एनिसचे त्याच्या दोन पोरींवर असलेलं जीवापाड प्रेम, हे सारं त्या दोघांच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीला असतं. त्यामुळेच त्यांचं माणूसपण गहिरं होत जातं. अखेरीस जॅक मरतो आणि एनिस खऱ्या अर्थानं एकाकी होतो. बायकोशी घटस्फोट झाल्यानंतरही प्रयत्नानं सावरलेला एनिस या धक्क्यानं मात्र खरा खचतो. वाकलेले खांदे - रोडावत गेलेली अंगलट आणि उतरलेला चेहरा अशा देहबोलीतून हीथ लीजरनं ते नेमकं पोचवलं आहे. तो जॅकच्या मरणानंतर जॅकच्या आई-वडिलांना भेटायला जातो, तो प्रसंग या उत्कट प्रेमकथेला उंची देणारा. फारसं न बोलताच त्याचे आई-वडील जॅकच्या आयुष्यातलं एनिसचं स्थान समजून घेतात. एनिस जॅकची खोली पाहायला जातो. तिथे त्याला जॅकचा जुना शर्ट मिळतो. रक्ताचा लहानसा डाग असलेला. त्यांच्यातल्याच एका मारामारीची आणि नंतरच्या मिलनाची आठवण सांगणारा. न राहवून तो शर्ट घेऊन एनिस खाली येतो. जॅकच्या आईची नजर चुकवतच तो शर्ट दाखवतो आणि ती काहीच न बोलता, समजून त्याला तो शर्ट पिशवीत भरून देते... आयुष्यभर बायका-मुलांचा रोष पत्करून, जगाच्या तुच्छतापूर्ण नजरा झेलत जॅक आणि एनिसनं जपलेलं त्यांचं नातं, जॅकच्या आईनं स्वीकारल्याचा हा क्षण. हलवून जाणारा. दोन पुरुषांची असली तरी ती जगावेगळ्या नात्याची गोष्ट नाही; ती एक प्रेमकथा आहे. एकमेकांसाठी झुरणाऱ्या प्रेमिकांची, जगाचा विरोध झुगारून एकमेकांसाठी असणाऱ्या प्रेमिकांची. या नात्यात शरीर तर असतं; पण त्याचा वाटा फक्त एका पायरीपुरता हे दाखवून देणारी ही प्रेमकथा. ई. प्रॉलक्सच्या लघुकथेवर आधारित असलेल्या या तरल गोष्टीला तशीच शैली आवश्žयक होती. कुठेच भडक न होणारी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक लय देत जाणारी. "ब्रोकबॅक माऊंटन' ती लय सांभाळतो आणि म्हणूनच त्यांच्या छायांकनाला "ऑस्कर' पुरस्कार मिळतो. कारण- त्यातल्या फ्रेम्स कथेचा वा आशयाचा संदर्भ सोडून देत नाहीत; तर जॅक-एनिसच्या उत्कट प्रेमकथेला अधिकच गहिरं करतात आणि खऱ्या अर्थानं "देखण्या' ठरतात.
- मेघना भुस्कुटे (सकाळमधून)

Read more...

शब्दांच्या पलीकडले....

जगातल्या एकूण संवादांपैकी फक्त सात टक्के संवाद हा शब्दांच्या माध्यमातून होतो. उरलेला सारा संवाद होण्याची माध्यमं- स्पर्श, सूर, नजरा... अशी अबोल असतात. मग भाषा या घटकाला तसा अर्थ काय उरला? बॉब हॅरिस हा जगप्रसिद्ध मॉडेल एका जाहिरातीच्या निमित्तानं जपानमध्ये येऊन पडलाय. पत्नीशी तुटलेला संवाद आणि सभोवताली पसरलेलं परक्या-अपरिचित भाषेचं जग. आजूबाजूला दिसणारे लोकही त्याच्यामधल्या माणसाला ओळखणारे नव्हेतच. ते ओळखतात मॉडेल असणाऱ्या बॉब हॅरिसच्या प्रतिमेला. त्यांच्या आश्चर्य-आनंदाच्या, आदराच्या प्रतिक्रिया बॉबला अधिकच एकटं करून टाकणाऱ्या. त्याचं वयही असं सीमारेषेवरचं. तारुण्य उलटलंय आणि संध्याकाळच्या सावल्याही तशा लांबच. अशाच एका उदास-कंटाळवाण्या संध्याकाळी बारमधल्या गायिकेचं एकसुरी गाणं ऐकत असताना त्याची नजरानजर शार्लेटशी होते. गंमत म्हणजे शार्लेट त्याची दखल "मॉडेल बॉब हॅरिस' म्हणून घेत नाही. नवरा आणि त्याची मित्रमंडळी अशा गराड्यात असूनही तिला जाणवणारं कंटाळवाणं एकटेपण तिला बॉबच्याही नजरेत भेटतं आणि मग एकमेकांच्या कंटाळ्याची अचूक नोंद घेत एक मित्रत्वाचं हसू दोघेही जण हसतात. इथून एका वेगळ्याच नात्याची सुरुवात होते. नुकतीच ग्रॅज्युएट झालेली आणि लग्नाच्या नव्हाळीतून बाहेर पडणारी शार्लेट आणि परिपक्व बॉब यांच्यातली मैत्री फुलत जाते. कसलेच शरीर संदर्भ आणि कसल्याही अपेक्षा नसलेलं हे निरपेक्ष नातं. काही दिवसांपुरतं. तरीही अतिशय जवळीकीचं. खरंखुरं. बॉबचं काम संपून त्याची घरी परतायची वेळ होते, तेव्हाही ते दोघे जण अगदी सहजपणे एकमेकांचा निरोप घेतात; पण परतताना बॉबला रस्त्यावरून एकटीच फिरणारी शार्लेट दिसते आणि त्याला राहवत नाही. निरोपाची एक घट्ट मिठी मारताना तो तिच्या कानात आपल्याला न कळेलसं काहीतरी कुजबुजतो आणि तिच्या उदास चेहऱ्यावर गोड हसू उमटतं. तो हुरहुरता क्षण पार करून दोघं हसऱ्या चेहऱ्यानं एकमेकांचा निरोप घेतात. आपापलं आयुष्य जगायला... आगळ्यावेगळ्या तरल शैलीत "लॉस्ट इन ट्रान्सलेशन'ची गोष्ट आपल्यापुढे उलगडत जाते. तेव्हा आपणही शब्दांच्या पलीकडल्या प्रदेशात सफर करून येतो. जपानमध्ये येतानाही बॉब आपल्या गाडीच्या खिडकीतून मोठमोठ्या इमारती आणि अनोळखी चित्रलिपीमधल्या निऑन साइन्स न्याहाळतो आहे. पण तेव्हा रस्त्यावर रात्र उतरलेली आणि शार्लेटचा निरोप घेऊन परततानाही तो त्याच परक्žया वाटणाऱ्या इमारती बघतो आहे; पण आता आभाळात उजेड फुटलाय. एका सुरेख नात्यामुळे सुखद आणि सुसह्य झालेला त्याचा हा परतीचा प्रवास! चित्रपटाच्या सुरुवातीचं आणि शेवटचं अशा या दोन विरोधाभासी दृश्यांतून दिग्दर्शिका खूप काही सांगून जाते. काहीशा रोमॅंटिक अशा या गोष्टीला नर्मविनोदाची झालर आहे. जपानी दिग्दर्शकांच्या भारंभार बोलण्यातलं अवाक्षरही न कळल्यामुळे हैराण झालेला बॉब, आपल्या चाहत्यांच्या आक्रमक प्रेमापासून हलकेच पळू बघणारा बॉब, त्याच्या पुरुषी प्रतिमेच्या प्रेमात पडून त्याच्या गळ्यात पडणारी तिथली जपानी स्त्री, तिच्यापासून पळता भुई थोडी झालेला बॉब... अशी बॉबची रूपं आपल्याला हसवून जातात. बॉबची मैत्रीण झालेली शार्लेट लेखिका आहे, हाही एक नजाकतदार तपशील. तिच्या हळवेपणाला, संवादासाठी तडफडणाऱ्या तिच्या मनाला, तिच्या संवेदनशीलतेला त्यामुळे एक वेगळीच किनार मिळते. बॉबला एका परक्žया स्त्रीबरोबर हॉटेलच्या खोलीत बघितल्यावर तिला तिच्या इच्छेविरुद्ध आलेला फणकारा आणि खिन्नपणाही लाजवाब. त्यामुळे तिच्या कोवळ्या वयाला साजेसे रंग तिच्या व्यक्तिरेखेला मिळतात. आपलं हे अनवधानानं घडलेलं प्रकरण तिच्यापासून होता होईतो लपवणारा बॉबही सुरेखच. आपल्या नात्याचा नितळपणा जपण्याची त्याची धडपड त्यातून जाणवते. आणि त्या गोष्टीचा निरर्थकपणाही... या सुंदर प्रवासाचा कळस होतो तो शार्लेटच्या कानातली बॉबची कुजबुज आपल्याला कळत नाही तेव्हा. कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करूनही आपल्याला बॉबचे शब्द अजिबात कळत नाहीत. लक्षात येतो तो फक्त तिचा उजळत जाणारा चेहरा. इतक्या अस्फुट गोष्टीवर निरोपाचा प्रसंग बेतणाऱ्या सोफिया कपोलाला सलाम, असं म्हटल्याखेरीज राहवतच नाही.
-मेघना भुस्कुटे (सकाळमधून)

Read more...

अभिजात कुरोसावा

>> Monday, February 4, 2008


कुरोसावा हा त्याच्या स‌मकालीन जपानी समीक्षकांना अन स‌मव्यावसायिकांनाही काही प्रमाणात उपरा वाटत असे. कारण त्याने आपल्या कामाला केवळ आपल्या प्रांताशी निगडीत ठेवलं नाही. पश्चिमेचा धार्जिणा असल्याची टीका त्याच्यावर होत गेली. त्याचे जगभरात पोहोचणे हे कदाचित त्याच्यावरल्या भिन्न सांस्कृतिक प्रभावांशी निगडीत असेल. कारण त्यामुळे त्याचा सिनेमा हा दृश्यात्मकता आणि आशय, या दोन्ही बाजूंमधून केवळ प्रादेशिक राहिला नाही.
त्याने आपल्यावरले प्रभाव हे दडवून ठेवले नाहीत. तर त्यांचा आपल्या चित्रपटांमधून मोकळेपणाने वापर केला. राशोमान आणि सेव्हन सामुराई यांचे नाव आपण कुरोसावाचे स‌र्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घेतो, ते उगाच नाही. एकाच घटनेला चार दृष्टिकोनातून मांडणारा राशोमान हा स‌त्य या संकल्पनेचा विचार नव्याने करायला लावतो आणि अखेर माणुसकीलाच स‌त्यापेक्षा किंवा प्रामाणिकपणापेक्षा वरचे स्थान बहाल करतो. त्याचा आशय हा कधीच जुना न होणारा जरुर आहे. मात्र इथे तो सांगण्यासाठी केलेला निवेदनात्मक प्रयोग हा इतका महत्त्वपूर्ण ठरला की पुढे हा प्रयोग थोडाफार बदलून अनेक वार वापरला गेला. वापरला जातो आहे. किस्लोवस्कीपासून टेरेन्टीनोपर्यंत अनेकांच्या कामावर राशोमानची छाया पसरलेली दिस‌ते आणि कोणताही दिग्दर्शक ती अमान्य करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत नाही.
राशोमान जसा त्यातल्या रचनेचा प्रभाव जागतिक चित्रपटसृष्टीवर टाकून आहे, तसाच सेव्हन सामुराई हा त्याच्या कथानकाचा आणि मांडणीचा.सामुराई इतकी थेट रुपांतरे इतर कोणत्याच चित्रपटांची झालेली असणे संभवत नाही. कुरोसावावर असलेला जॉन फोर्डसारख्या उत्तम वेस्टर्न चित्रपट बनविणाऱया दिग्दर्शकाचा प्रभाव हा सामुराईच्या मुळाशी जरूर आहे. किंबहूना त्यामुळेच त्याचा मँग्नेफिशन्ट सेव्हन नावाने स‌हज वेस्टर्न पट होऊ शकला. मात्र अमुक एका चित्रपटाची कुरोसावाने येथे नक्कल केली नाही. त्याच्यावरचा प्रभाव वेस्टर्नवरच्या प्रेमातून,या चित्रप्रकाराला आत्मसात करण्यामधून आलेला आहे. चिकटवलेला नाही.
सामुराई ज्याप्रकारे कुरोसावावरला एक पाश्चिमात्य प्रभाव दाखवतो. तसाच दुसरा प्रभाव आहे नाटककारांचा. मँक्झिम गाँर्कीच्या नाटकावर आधारित लोअर डेप्थ आणि शेक्सपिअरच्या मँकबेथचे सामुराई रूप थ्रोन आँफ ब्लड या चित्रपटांवर जाणवतो. कुरोसावा परकीय कल्पनांचा स‌ढळ हस्ते वापर करीत असलेला दिस‌ला तरी त्याने आपल्या संस्कृतीशी नाळ तोडलेली नाही. हे या चित्रपटांवरून स्पष्ट होते. काबुकी आणि नोह हे पारंपारिक जपानी नाट्यप्रकार किंवा जिवाई गेकी या सामुराईंच्या काळातल्या गोष्टी सांगणाऱया चित्रपट प्रकाराशी अस‌लेल्या नात्याबरोबरच जपानी स‌माजमनाचा, त्यांच्या मूल्यांचा आणि वर्तणुकीचा ताळमेळही येथे पाहायला मिळेल.
इकिरू (1952), रेड बियर्ड (1965) हे चित्रपट ताकाशी शिमोरा आणि तोशिरो मिफूने या कुरोसावाच्या चित्रपटांतून नित्य दिसणाऱया अभिनेत्यांची उत्तम कामगिरी असलेले चित्रपट आहेत. रेड बियर्ड हा कुरोसावा आणि मिफुने यांनी एकत्रितपणे केलेला अखेरचा चित्रपट असल्याने तो कुरोसावाच्या कारकिर्दीचा एक महत्वाचा टप्पाही अधोरेखित करतो. या चित्रपटानंतर कुरोसावाचा पुढला चित्रपट आला तो तब्बल पाच वर्षांनी दोदेस्कादेन. हा 1970चा चित्रपट व्यावसायिक दृष्टीने यशस्वी ठरला नाही. मात्र हा कुरोसावाचा पहिला रंगीत चित्रपट. दोदेस्कादेन कुरोसावाच्या इतर चित्रपटांप्रमाणेच पश्चिमेत डोक्यावर घेतला गेला. आणि अँकँडमी अँवार्ड नामांकनात स्थानही मिळवता झाला. मात्र जपानमधले. त्याचे अपयश कुरोसावाच्या जिव्हारी लागले. पुढच्याच वर्षी त्याने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नालाही हे अपयशच जबाबदार मानले जाते.
कुरोसावा हा खऱया अर्थाने एक उत्तम दिग्दर्शक होता. कलात्मकतेच्या प्रेमातून त्याने आपले चित्रपट कधीही दुर्बोध होऊ दिले नाहीत. ना प्रेक्षक मिऴविण्याच्या इच्छेतून नको त्या तडजोडी केल्या. आपला प्रांत गृहीत धरून जागतिक कलाविश्वाकडे इतक्या मोकळेपणाने पाहणारा आणि भाषा-संस्कृती- काळ यांच्यापलीकडे जाऊन प्रेक्षकांशी थेट संवाद साधू शकणारा दुसरा दिग्दर्शक क्वचित असेल.
-गणेश मतकरी ( वास्तव रूपवाणीमधील भाग)

Read more...

आगळं धर्मयुद्ध

>> Saturday, February 2, 2008


एक धर्मस्थळ. अतिशय महत्त्वाचं, पण दोन भिन्न धर्मीयांसाठी.या धर्मस्थळावर ताबा कुणाचा असेल यासाठी खेळलं जाणारं राजकारण, आणि त्यातून होणारी प्रत्यक्ष आणि संभाव्य अपरिमित मनुष्यहानी. रिडली स्कॉट या दिग्दर्शकाच्या `किंगडम ऑफ हेवन` चा विषय प्रत्यक्ष धर्मस्थळाचं, किंवा संबंधित धर्माचं नाव न घेता सांगितला तर मला वाटतं कोणालाही अयोध्येत घडलेल्या, घडवलेल्या दंगलींची आणि देशभर पेटलेल्या आगडोंबाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. यात आश्चर्य नाही, कारण शेवटी धर्माचं राजकारण हे त्यातला तपशिलाचा भाग सोडला तर सारखंच असतं. मग ते आज घडणारं असो, वा हजार वर्षांपूर्वी, आणि रामाच्या जन्मभूमीत असो वा ख्रिस्ताच्या वधभूमीत. `किंगडम ऑफ हेवन` घडतो 1184 च्या सुमारास जेरुसलेमच्या पार्श्वभूमीवर. जेरुसलेम या मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांना सारख्याच महत्त्वाच्या असलेल्या धर्मस्थळी शंभर वर्षांपासून ताबा आहे तो ख्रिश्चनांचा. मुस्लिम सत्ताधाऱ्यांना ते परत मिळवायचं आहे आणि त्यासाठी त्यांची जमवाजमव सुरू आहे.फ्रान्समधल्या एका गावातला लोहार बेलिअन (ऑर्लांडो ब्लूम) हा त्याच्या मुलाच्या मृत्यूने आणि पत्नीच्या आत्महत्येने शोकमग्न आहे. त्याच वेळी इबेलिनचा बॅरन गॉडफ्रे (लिआम नीसन) त्याच्या दारात येतो, आणि बेलिअन हा त्याचाच अनौरस मुलगा असल्याचं सांगून त्याला आपल्याबरोबर जेरुसलेमला चलण्याची विनंती करतो. आधी नकार देऊनही नंतर बेलिअन गॉडफ्रेला सामील होतो. जेरुसलेमच्या रस्त्यावर झालेल्या एका चकमकीत गॉडफ्रे जखमी होतो आणि त्यातच पुढे त्याचा मृत्यू ओढवतो. मरणापूर्वी तो आपली सरदारकी बेलिअनला बहाल करायला मात्र विसरत नाही. नवा बॅरन ऑफ इबेलिन बेलिअन, मजल दरमजल करत येऊन पोचतो तो जेरुसलेममध्ये आणि लवकरच तिथल्या कुष्ठरोगी राजाच्या (एडवर्ड नॉर्टन) आणि मार्शल टायबेरिअसचया (जेरेमी आयर्नस) मर्जीतला होऊन जातो. सिबिला (इव्हा ग्रीन) या राजाच्या बहिणीच्या प्रेमातही तो पडतो. मात्र तिच्या नवऱ्याचा शत्रू होऊन बसतो.युद्ध व राजाचा मृत्यूजेरुसलेमवर चढाई करण्यासाठी सलाउदीन (घासन मसूद) हा अरब नेता, आपल्या फौजेनिशी येऊन पोचतो आणि युद्धाला तोंड फुटतं. राजाचा मृत्यू ओढवतो, आणि जेरुसलेमच्या रक्षणाची जबाबदारी बेलिअनवर येऊन पडते.रिडली स्कॉटचा हा चित्रपट बहुतांशी ऐतिहासिक घटनांवर आधारित असला तरी वर्तमानातल्या ख्रिश्चन / मुस्लीम झगड्याची त्याला अजिबात आठवण नसणं संभवत नाही. चित्रपटाची जुळवाजुळव ही बुशच्या कथित `वॉर ऑन टेरर` च्या आधी झालेली असली, तरी वर्ल्ड ट्रेड सेंटरफचा आघात त्यापूर्वीच होऊन गेलेला होता. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी येणारा मानवतेचा संदेश हा केवळ ऐतिहासिक संदर्भाशी संबंधित आहे, असं म्हणणं योग्य होणार नाही.स्कॉट आणि पटकथाकार विलिअम मोनाहान यांनी रचलेली किंगडम ऑफ हेवनची पटकथा, ही या प्रकारच्या पटकथा कशा रचाव्यात याचा उत्तम वस्तुपाठ आहे. ती शंभर टक्के इतिहासाशी प्रामाणिक नाही, पण त्यात बदलण्यात आलेले तपशील हे कथेचा आशय अधिक टोकदार करतात. उदाहरणार्थ बेलिअन आणि राजकन्या सिबीला यांच्या प्रेमसंबंधाविषयी इतिहास काहीच म्हणत नाही. प्रत्यक्षात ती आपल्या संसारात सुखी होती आणि बेलिअनचाही संसार शाबूत होता. मात्र चित्रपटात हे प्रेम दाखवण्यात दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे अशा भव्य पटामध्ये आवश्žयक समजल्या जाणाऱ्या रोमान्सची जागा भरून काढली जाते. आणि दुसरं म्हणजे बेलिअनची एक सद् सद्विवेकबुद्धी शाबूत असणारा माणूस अशी प्रतिमा तयार होते. राजाला आपला मृत्यू दिसायला लागल्यावर तो आणि टायबेरीअस एक योजना आखतात. बेलिअनचं सिबिलाबरोबर लग्न लावून द्यायचं आणि तिच्या नवऱ्याला मारून टाकायचं. मात्र बेलिअन या योजनेलातयार होत नाही. त्याची तत्त्वनिष्ठा अधिक अधोरेखित होते, ती प्रेक्षकांना त्याचं सिबिलावर प्रेम असल्याचं माहीत असल्यामुळेच.पटकथेत असलेली आणखी एक ऐतिहासिक चूक म्हणजे बॅल्डविनकडून सिबिलाकडे होणारं सत्तेचं हस्तांतर. हे ताबडतोब झालं नाही. कारण मध्ये काही काळ सत्ता गेली ती सिबिलाच्या मुलाकडे, जो लवकरच मरण पावला. पण हा तपशील घालून पटकथा रेंगाळवण्यापेक्षा चित्रकर्ते हा भाग वगळणं योग्य समजतात. आणि पटकथेला बंदिस्तपणा येण्याच्या दृष्टीनं ते योग्यदेखील आहे.स्कॉटचा ग्ल्रॅडिएटर मला फारसा आवडला नव्हता. त्यातली संगणकीय रोममधली दृश्यं, रसेल क्रोची कामगिरी वगैरे उत्तम होतं. पण या चित्रपटाचा मुद्दा काय, हे कळत नव्हतं. एक साहसकथा किवा सूडकथा यापलीकडे त्याला अस्तित्व नव्हतं. किंगडममध्येही ग्लॅडीएटरची आठवण करून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. इथलं जेरुसलेम पूर्णतः संगणकनिर्मित नाही. शहराच्या मोठ्या सेटवर चित्रीकरण करून इथे संगणकीय दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. पण परिणाम हा तितकाच भव्य आहे. युद्धाची काही दृश्य फारच जमलेली आहेत. खास करून शेवटच्या मोठ्या लढाईत थोडक्या सैन्याचा बेलिअन करत असलेला प्रभावी वापर पाहण्यासारखा. मात्र ग्लॅडीएटर आणि किंगडममध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. आणि तो म्हणजे किंगडमकडे सांगण्यासारखं काही आहे. इथला संदेश आहे तो विवेक शिकवणारा, धर्मांधतेला विरोध करणारा. बेलिअन जेरुसलेमसाठी लढायला तयार होतो, तेव्हा एक गोष्ट त्याच्यासमोर स्पष्ट आहे. तो इथल्या धार्मिक अवशेषांसाठी लढणार आहे. ही जनता कोणत्या धर्माची आहे हे, तो पाहत नाही. केवळ प्राण वाचवणंच त्याला मंजूर आहे. त्यामुळेच जेरुसलेम पडणार असं लक्षण दिसताच, तो सलाउदीनला सामोरा जातो आणि लोकांच्या सुरक्षिततेच्या हमीवर शहर त्यांच्या हवाली करतो. या चित्रपटातल्या बेलिअननं उचललेलं पाऊल हे सामान्यतः असले लार्जर दॅन लाईफ नायक उचलताना दिसत नाहीत. त्यामुळेच मारू किंवा मरू हे वचन असणाऱ्या बुद्धिहीन नायकापेक्षा बेलिअन अधिक प्रभावी वाटतो.श्रद्धेचा सखोल आविष्कार किंगडम कोणाचा कैवार घेत नाही. साहजिकच दोन्ही समाजांतल्या कट्टर मंडळींना तो दुखावतो. अशाही परिस्थितीत त्याची बाजू घेणारे काही खंदे शिलेदार मात्र दिसतात. हमीद दबाशी या मुस्लिम विचारवंताने साईट अँड साऊंडच्या अंकात म्हटलंय, की तसंच पाहिलं, तर हा चित्रपट इस्लामच्या बाजूचा किंवा विरोधातला नाही. ख्रिश्चॅनिटीच्याही बाजूचा- विरोधातला नाही. खरं तर तो धर्मयुद्धाविषयीही नाही. आणि तरीदेखील तो श्रद्धेचाच सखोल आविष्कार आहे.या चित्रपटाची श्रद्धा आहे मानवतेवर. बेलिअनचा विश्वास देवाधर्मावर नाही, पण माणसाचा जीव वाचवण्यावर आहे. माणूस कोणत्या धर्माचा आहे याच्याशी त्याला कर्तव्य नाही. त्याचं माणूस असणंच त्याला पुरे आहे. यातल्या धर्माच्या रखवाल्यांचाही विश्वास हा स्वतःची सत्ता वाढवण्यावरच अधिक आहे, हे तो जाणतो. त्याची जिंकण्याची व्याख्या केवळ अमुक लढाई जिंकण्याइतकी मर्यादित नाही. आपल्या मनाला पटणारा विजय हा लौकिकदृष्ट्या हार समजला गेला तरी त्याला मंजूर आहे. किंगडमचं वैशिष्ट्य हेच, की तो या नायकाचा दृष्टिकोन समजून घेतो आणि एक पराभूत सरदार न समजता त्याच्या निर्णयाचा मोठेपणा सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. किंगडम ऑफ हेवनला मी भव्यपटामध्ये येऊ पाहणाऱ्या नव्या विचाराची सुरवात समजेन. आजवर केवळ दिखाऊपणासाठी गाजल्या जाणाऱ्या या चित्रप्रकारालाही काळाचं, समाजाचं आणि परिस्थितीचं भान आल्याचं हे लक्षण आहे. त्या दृष्टीनं पडलेलं हे पहिलं पाऊल आहे म्हणा ना!
-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP