खरीखुरी संगीतिका

>> Friday, May 29, 2009

इतर देशांमध्ये संगीताला महत्त्व असणारे चित्रपट हे सामान्यतः दोन प्रकारांत मोडणारे असतात. पहिला असतो म्युझिकल्स किंवा सांगीतिकांच्या जिथे गाणी ही संवादांची जागा घेतात आणि चित्रपटालाच एक लय आणून देतात. माय फेअर लेडी किंवा साऊंड आँफ म्युझिक ही या प्रकारातल्या चित्रपटांची लोकप्रिय उदाहरणं म्हणता येतील. दुस-या प्रकारात गाण्यांचा/नावाचा वापर हा कोणत्यातरी निमित्ताने केलेला आढळतो. उदाहरणार्थ सॅटर्डेनाईट फीवर मधला नायक हा आपल्या चाकोरीतल्या आयुष्याबाहेर पडण्याची संधी म्हणून आपल्या क्लबमधल्या संध्याकाळी नृत्यसंगीताबरोबर मोकळा होत घालवायला लागतो, मात्र इथले नृत्याचे प्रसंग, हे नृत्याचेच प्रसंग असतात. साध्या प्रसंगांचे ते नृत्यमय सादरीकरण नसतं. फास्ट फॉरवर्ड, डर्टी डान्सिंग असे कितीतरी चित्रपट या प्रकारात मोडताना दिसतील.
या चित्रप्रकारात अनेक लोकप्रिय चित्रपटांची नावे घेता येतील, पण सध्या या प्रकाराला फार मागणी राहिलेली नाही. मूला रूज किंवा शिकागोसारख्या चित्रपटांनी मध्यंतरी म्यूझिकल्सला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हे चित्रपट यशस्वीही झाले. परंतु प्रत्यक्ष चित्रप्रकाला नवजीवन मिळालं नाही. कदाचित या प्रकारचं या ना त्या मार्गाने फॉर्म्यूलात अडकून राहणंच हल्ली प्रेक्षकांना कंटाळवाणं वाटायला लागलं असेल.
सामान्यतः या प्रकारचे चित्रपट हे भव्य स्वरूप धारण करणारे असतात. कलावंतांची लांबलचक यादी, कौशल्याने बसवलेली नृत्यं, रंगतदार छायाचित्रण आणि पॉलिशड वातावऱण या ठिकाणी पाहायला मिळतं. या लुकची इतकी सवय होते की, एखादा चित्रपट या सर्व छानछोकीला वगळताना दिसला तर क्षणमात्र दचकायला होतं. जॉन कार्नी यांचं दिग्दर्शन आणि पटकथा असलेला वन्स पाहून काहीसं असंच होतं.
गाणी सोडता वन्स सारं काही खालच्या पटीत करतो. किंबहूना त्याचा जीवही फार छोटा आहे. रस्त्यावर गिटार वाजवून आणि गाऊन आपल्या कलेचं प्रदर्शन करणारा एक तरुण (ग्लेन हान्सार्ड) आणि त्याच्याशी मैत्री करणारी एक तरुणी (मार्केटा इरग्लोवा) यांची ही गोष्ट बंदीस्त कथानकाचा आणि रचना कौशल्यांचाही आग्रह न धरता एखाद्या नवकथेसारखी अचानक सुरू होते. आणि एका अनपेक्षित वळणावर संपते. सांकेतिक गोड शेवटाचं प्रेक्षकाला समाधान न देता.
तरुण- तरुणींची (इथे दोघांची नावंही दिली जात नाहीत.) भेट होते तो प्रसंगच आपल्याला या विक्षिप्त चित्रपटाची झलक दाखवून देतो. तरुण रात्रीच्यावेळी निर्मनुष्य रस्त्यावर स्वतःची एक रचना गात असताना तरुणी येते, अन समोर ठेवलेल्या गिटार केसमध्ये उदारपणे दहा सेण्ट्स टाकते, वर कौतुक करताना म्हणते छान गाणं आहे, तू लिहीलस का ? हे सकाळी का गात
नाहीस ?
सकाळी मी लोकप्रिय गाणीच गातो, म्हणजे अधिक लोक ऐकतात, स्वतंत्र गाण्यात फार जणांना रस नसतो. ती म्हणते का, मी ऐकते ना सकाळीसुद्धा. त्यावर तो म्हणतो, पण तू दहाच सेन्ट्स टाकतेस. बोलताना तिच्या लक्षात येतं की गाणं ही याची हौस आहे. एरवी हा व्हॅक्यूम क्लीनर रिपेअर करतो. मग ती विचारते की, माझाकडे एक मोडका व्हॅक्यूम क्लीनर आहे, रिपेअर करशील का ? तो म्हणतो, उद्या घेऊन ये.
या प्रसंगातच लक्षात येतं की,पटकथेचा सूर, नायक, नायीका असलेल्या संवादाचा बाज यातलं काहीच बेतीव नाही. व्यक्तिरेखांच्या बाबतीतही हेच. दोघंही तसे एकमेकांच्या प्रेमात पडायला मोकळे नाही. त्याची मैत्रिण त्याला सोडून लंडनला गेलीय, अन् कधीकाळी तिथे जाण्याची त्याचीही इच्छा आहे. तिचं लग्न झालंय, मुलगी आहे. नवरा बरोबर नाही, पण परत येण्याची शक्यता आहे.
वन्समधलं हे प्रेम हे जवळजवळ पूर्णपणे मानसिक पातळीवरचं आहे. ते व्यक्त होतं तरुणाने लिहिलेल्या गाण्यांमधून, ही गाणी त्याने आपल्या प्रेयसीविषयी लिहिलेली. ती येतात गाणी म्हणूनच मात्र त्यांच्या सतत वापराने आणि व्यक्तिरेखेच्या भावना त्यांमधून व्यक्त होण्याने चित्रपट म्युझिकल्सचा आभास निर्माण करतो. या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे यातली संगीताची पूर्ण जबाबदारी म्हणजे गाणी लिहिणं, चाली देणं आणि प्रत्यक्ष गाणं ही यातल्या दोन प्रमुख कलाकारांनी पूर्णपणे पार पाडली आहे. त्यातल्या गाण्याला गेल्यावर्षी मिळालेल्या आँस्करमुळे ती किती यशस्वी आहेत हे देखील स्पष्ट होतं.
वन्सचा दृश्य भागदेखील बेतीवपणा पूर्ण टाळतो. जवळपास एखाद्या डॉक्यूमेन्टरीचं चित्रण असावं, तसं हा चित्रपट पाहताना वाटतं. ब-याच प्रमाणात हातात धरलेला कॅमेरा, अतिशय मर्यादित प्रकाशयोजना, असेल त्या उजेडातलं चित्रण अशा गोष्टींमध्ये हे लक्षात येतं. मात्र त्यामुळे वास्तवाचा आभास अधिकच पुरा होत जातो.
रिचर्ड लिंकलेटरच्या बीफोर सनराइज आणि बिफोर सनसेट चित्रपटात जेसी आणि सीलीन ही दोन पात्रं मागे भेटून माझ्या आठवणींचा कायमचा भाग बनून गेली आहेत. वरवर पाहता ती दोघं आणि ही दोघं यात उघड साम्य नाही. मात्र या दोघांचा अभिनय हा सहजच त्या दोघांची दाद देणारा आहे. चित्रपटांच्या रेखीव जगात क्वचितच भेटणारा. अतिशय दुर्मीळ म्हणून हवासा वाटणारा.
-गणेश मतकरी.

Read more...

टाइमक्राईम्स : परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स

>> Wednesday, May 27, 2009

सुखान्त शेवट म्हणजे काय ? नायक (आणि असल्यास नायिका) हॅपीली एव्हर आफ्टर रहाण्याची सोय झाली की चित्रपट सुखान्त झाला असं आपण म्हणतो. आणि एका परीने ते बरोबर देखील आहे. कारण शेवटी प्रत्येक चित्रपट हा एका विशिष्ट दृष्टिकोनातून सांगितलेला असतो. हा दृष्टिकोन त्या व्यक्तिला केंद्रस्थानी ठेवून रचला जातो. तो नायक आणि त्याला पडलेल्या अडचणींचं निवारण हा कथानकाचा आवाका. हाच तर्क पुढे नेला तर फायदा नायकाचा हेच सुखान्त शेवटाचं प्रमुख लक्षण असणार हे उघड आहे.
मग उपप्रश्न असा, की नायक जेव्हा सांकेतिक प्रतिमेप्रमाणे सदगुणांचा पुतळा नसतो तेव्हाचं काय ? जेव्हा तो केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करून, वेळ प्रसंगी एखादा गुन्हा करूनही आपला स्वार्थ पाहतो, तेव्हाही आपण त्याला माफ करणं अपेक्षित आहे का? आणि ही माफी किती गंभीर गुन्ह्याबद्दल करायची ? चोरी ? मारामारी? की खून? गोड शेवटाचा पाठपुरावा करणा-या नायकाला कोणत्या थराला जाण्याची मुभा प्रेक्षकाने द्यावी ? नाचो विगालोन्दोच्या टाइमक्राईम्सच्या प्रेक्षकाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच शोधावं लागेल.
प्रायमर नावाच्या लो- लो बजेट विज्ञानपटाविषयी नुकतीच पोस्ट टाकण्यात आली आहे. तो प्रायमर तांत्रिकदृष्ट्या विज्ञानपट होता. मात्र विज्ञानपटाकडून अपेक्षित असणारी दृश्य चमत्कृती त्यात नव्हती. दोन मित्रांनी अचानक लावलेला टाइम मशीनचा शोध आणि त्यांचा श्रीमंत होण्याचा बेत असं याच्या कथानकाचं स्वरूप असलं, तरी चित्रपटाचा जीव होता तो चर्चांमध्ये. कालप्रवास आणि त्यातून तयार होणा-या विसंगती याविषयी भरपूर बोलणं आणि प्रेक्षकांना चांगलंच गोंधळात पाडणं हा प्रायमरचा प्रमुख अजेंडा होता.
लो बजेट असणं, विज्ञानपट असणं आणि कालप्रवासातील विसंगतीसंबंधित कथानक असणं या तीनही गोष्टी टाइमक्राईम्समध्येदेखील आहेत, मात्र इथे त्यावर चर्चा करण्यात कोणाला रस नाही. इथला ढाचा आहे तो गुन्हेगारी चित्रपटाचा. एका सामान्य माणसाचं गुन्हेगारी वळणाच्या अनपेक्षित घटनांमध्ये गुरफटत जाणं इथे येतं. पटकथाकार अन् दिग्दर्शकाचा भर आहे, तो प्रेक्षकाला जराही विचार करायला उसंत न देता, एकावर एक धक्के देत राहणं, नवी वळणे घेत गोष्ट पुढे नेत राहणं यावर. प्लॉटिंग हे इथे सर्वात महत्त्वाचं आहे. व्यक्तिरेखांच्या अस्सलपणापेक्षा लेखक दिग्दर्शकाच्या डोक्यातून येणा-या चाली प्रतिचालींना खेळण्याकरीता प्यादी उपलब्ध असण्याची इथे गरज आहे.
चित्रपटाचा नायक आहे हेक्टर (कारा एलेहाल्डे) आता याला नायक म्हणावा का हा प्रश्न चित्रपट संपल्यावर ज्याचा त्याने सोडवावा, पण हेक्टर ही प्रमुख व्यक्तिरेखा आहे ( का हेक्टर या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत, असं म्हणूया ?) हे तर खरंच. तर हेक्टर आपल्या क्लारा (कॅन्डेला फर्नांडेझ) या मैत्रिणीसह गावाबाहेरच्या एका छोट्या घरात उतरलाय. परिसर त्याला परिचित नसावा. दुर्बिण घेऊन आजूबाजूचं निरीक्षण करताना त्याला जंगलात एक मुलगी दिसते. ही मुलगी आपले कपडे उतरवत असते. आता हेक्टरचं कुतूहल (!) जागं होतं आणि तो त्या मुलीच्या शोधात निघतो.
हेक्टरला मुलगी दिसते खरी. मात्र तिच्याजवळ पोहोचण्याआधीच एक मुखवटाधारी माणूस त्याच्या हातात कात्री खुपसतो. जिवाच्या आकांताने पळत अन् मागावरल्या मुखवटाधा-याला चुकवत हेक्टर टेकडीवरच्या एका घरात पोचतो जिथे त्याची एका शास्त्रज्ञाशी (दिग्दर्शक विगालान्दो) गाठ पडते. हा शास्त्रज्ञ त्याला लपवण्याच्या मिशाने एका कालयंत्रात बसवतो.
यंत्रातून बाहेर आलेला हेक्टर हा काळाच्या प्रवाहात थोडासाच, म्हणजे तासभर मागे गेलेला असतो. अर्थात बंगल्यावर ताबडतोब परत जाणं आता शक्य नसतं, कारण जंगलातल्या मुलीचा सुगावा लागायला अजून थोडा वेळ बाकी असणारा हेक्टर अजून बंगल्यातच असतो.
टाइमक्राईम्सला विशिष्ट परिस्थितीत उदभवणा-या शक्यतांची परम्युटेशन्स पाहण्याचा एक प्रयोग म्हणता येईल. दोन घरं, सहा व्यक्तिरेखा (त्यातल्या तीन म्हणजे स्वतः हेक्टर) अंदाजे दीड-दोन तासांचा कालावधी आणि कालप्रवाहात मागे-पुढे जाण्याची सोय या गोष्टी गृहीत धरून काय काय घडू शकेल (पण मन्कीज पॉच्या नियमानुसार केवळ वाईट घडवण्याच्या शक्यताच लक्षात घेऊन) याचा चित्रपट तपास करतो. मला हा पाहताना थोडी ग्राऊंडहॉग डे चित्रपटाची आठवण झाली. त्यातला नायक जसा एकच दिवस पुन्हा-पुन्हा जगत परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, तसाच काहीसा करुण प्रयत्न हेक्टरदेखील करताना दिसला. मात्र बिल मरीने उभा केलेला ग्राऊंडहॉग डेचाचा नायक आणि हेक्टर यांच्या परिस्थितीत एक मोठा फरक आहे. बिल मरीने कितीही चुका केल्या, तरी रोज दिवस नव्याने सुरू होत असल्याने, तो नवा प्रयत्न करायला नेहमीच मोकळा राहू शकतो. हेक्टरची गोष्ट तशी नाही. त्याच्या हातून घडलेल्या गोष्टी प्रत्यक्ष काळात नोंदल्या जातात, त्यामुळे त्याचा मार्ग अनेकदा कितीतरी पटीने बिकट होऊ शकतो.
आधी मी शेवटाबद्दल एक प्रश्न उपस्थित केला असला, तरी इथला शेवट मला आवडला. तो काही प्रमाणात विकृत निश्चित आहे, पण त्याला स्वतःचं तर्कशास्त्र आहे. चित्रपटाने घालून दिलेल्या नियमांचे तो पालन करतो. हेक्टरच्या वागण्यालाही तो सुसंगत आहे. त्यातून हेक्टर आपल्या हातून घडलेली कृत्यं मोठ्या आनंदातून करतो अशातला भाग नाही. ब-याचदा त्याचा नाईलाज झालेलाही दिसून येतो. आपल्या वैज्ञानिक गुन्हेगारीपट या स्वतःच आखून घेतलेल्या मर्यादेपलीकडे मात्र टाइमक्राईम्स जाऊ इच्छित नाही. काहीवेळा मुळात गिमिकवर आधारलेले चित्रपटही (उदा ग्राऊंडहॉग डे, मेमेन्टो) शेवटच्या काही प्रसंगांमधून असं काही भाष्य करतात ज्यांनी त्यांच्या गिमिक्सचा विसर पडावा. इथे मात्र तसं होत नाही. याला दोष म्हणता येणार नाही. त्याचं यश मर्यादित आहे. एवढं म्हटलं, तरी पुरे.
- गणेश मतकरी

Read more...

फिल्ममेकर्सबद्दल....

>> Monday, May 25, 2009


चित्रपट हे आजच्या युगाचे माध्यम आहे असे वारंवार म्हटले गेले आहे. त्यामुळे मराठीत वा इतर प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट-चित्रपटव्यवहार याविषयी सातत्याने लिहिले जाते. परंतु या लेखनाच्या पसाऱ्यात ज्यास चित्रपटसमीक्षा म्हणता येईल असे लेखन फार कमी आहे. या झगमगत्या जगाविषयीचे आकर्षण असणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा विचार करून चित्रपटाच्या अवतीभवतीच्या कथा, वर्णनपर लेखन वा चित्रपटतारका-तारे यांच्याविषयीच्या गप्पा अधिक लिहिल्या जातात. चित्रपटमाध्यमाचा इतिहास आणि विविध चित्रकर्त्यांच्या शैलीचं विश्लेषण यावरचे लेखन दुर्मिळ आहे. एका चित्रपटाच्या घडणीचे विश्लेषण हेही दुर्मिळ आहे. गणेश मतकरी यांचे फिल्ममेकर्स,हे पुस्तक ही उणीव भरुन काढते.
गेल्या काही वर्षांत फिल्म सोसायटी चळवळ आणि इंटरनेटवर उपलब्ध होणारी माहिती, सुलभपणे उपलब्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ‘डीव्हीडी’ यामुळे चित्रपटविश्लेषणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. सुविधा निर्माण झाल्या आहेत याचा अर्थ चित्रपटसमीक्षेच्या लेखनातील अंगभूत मर्यादा नाहीशा झाल्या आहेत असे नाही. चित्रपटासारख्या दृश्य, तंत्राधारी माध्यमाविषयी शब्दाच्या माध्यमातून लेखन करणे ही अवघड प्रक्रिया आहे. सांस्कृतिक वातावरणातील शब्दाच्या धाकामुळे संगीत वा चित्रपटासारख्या इतर माध्यमाविषयी लिहिताना शब्दांच्या जगातील तर्कच मोजला जातो वा एका प्रेक्षकाला आलेल्या अनुभवाचे वर्णन केले जाते. अशा लेखनाला-ज्याला आस्वादात्मक समीक्षा म्हटले जाते, नेहमीच चित्रपटमाध्यमाचा गाभा गवसतो असे नाही. बऱ्याचवेळा समीक्षकाच्या शब्दसौष्ठवावर असे लेखन रेलून राहते. त्याहूनही चित्रपटाच्या संदर्भातील मूलभूत मुद्दा असा की या माध्यमाचा स्वभाव काव्यात्म आहे, सादरीकरण तंत्राधारित आहे आणि पृष्ठभाग कथात्म आहे. हे सुलभीकरण आहे याची जाणीव ठेवूनही त्यामुळे त्या त्या चित्रपटाचे समीक्षण करताना या तिन्ही स्तरांमधील अन्वय लक्षात घ्यावा लागतो. चित्रपट हे माध्यम दिग्दर्शकाचे आहे असे आपण म्हणतो. पण दिग्दर्शक ही संकल्पना चित्रपटाच्या संदर्भात अपुरी वाटते म्हणून मतकरींनी ‘फिल्ममेकर्स’ ही इंग्रजी संकल्पना योजली आहे. ते म्हणतात- ‘दिग्दर्शक या शब्दाला काही मर्यादा आहेत. तो चित्रपट दिग्दर्शकाच्या कर्तृत्वाची पूर्ण कल्पना एका झटक्यात आणून देऊ शकत नाही. ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणून त्याला जी चौफेर कामगिरी करावी लागते आणि संहितेपासून ते संकलनापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे लक्ष घालावं लागतं, ते त्याला खऱ्या अर्थाने चित्रपटाचा जनक ठरवतं. ‘फिल्ममेकर’ हा शब्द दिग्दर्शकाचीही जबाबदारी सोप्या शब्दांत पण थेटपणे मांडतो. या पुस्तकाच्या नावासाठी तो शब्द वापरण्याचंही हेच कारण आहे.’
या पुस्तकात गणेश मतकरींनी १९९८ ते २००७ या काळात लिहिलेल्या अकरा लेखांचा समावेश केलेला आहे. या विश्वविख्यात चित्रपटकर्त्यांची निवड करताना एका विशिष्ट विचारधारेतील वा पठडीतील दिग्दर्शकांची निवड त्यांनी केलेली नाही आणि त्यांनी ‘थोडं पुस्तकाविषयी’मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे लेख पुस्तकात संग्रहित करताना बदल केलेले नाहीत. जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे, कारण ऐतिहासिकदृष्टय़ा सर्व संदर्भ पक्के करण्याचा त्यांचा इरादा नाही. या सर्व लेखांकडे पाहताना एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की काही लेख एखाद्या चित्रपटकर्त्यांच्या पूर्ण कारकीर्दीविषयी आहेत तर काही त्या चित्रपटकर्त्यांच्या विशिष्ट टप्प्याविषयी आहेत. चित्रपटकर्त्यांची निवड करताना केवळ चित्रपटमहोत्सवातून जगापुढे आलेले चित्रपटकर्ते न निवडता समकलीन यशस्वी दिग्दर्शकही निवडलेले आहेत.
गणेश मतकरींच्या चित्रपटविषयक लेखनाविषयी लिहिताना माझ्या डोळ्यासमोर केवळ ‘फिल्ममेकर्स’ हे पुस्तक नाही. तर १९९७-९८ मध्ये चित्रपटाविषयी लिहायला प्रारंभ केल्यापासून मतकरींनी छोटय़ा लेखात वर्तमानकालीन देशीविदेशी चित्रपटाविषयी आणि मोठय़ा लेखात (प्राधान्याने दिवाळी अंकात) चित्रपटकर्त्यांच्या कर्तृत्वाविषयी लिहिले. आजही ‘साप्ताहिक सकाळ’मधील ‘हॉलिवूड बॉलिवूड’ या सदरातून प्रेक्षक जे चित्रपट आज पाहात आहेत त्याविषयी त्यांनी नि:संदिग्ध विधाने केली आहेत. त्यांचे लेख वाचीत असताना लेखकांचा, चित्रपटांचा, चित्रपट इतिहासाचा व्यासंग जाणवतो पण त्याचबरोबर चित्रपट आणि चित्रपटकर्त्यांला जाणून घेण्याची वृत्ती दिसते. चित्रपटाविषयी त्यांना स्वत:ची मते आहेत, ती व्यक्त करण्याची एक थेट पद्धती आहे. ‘फिल्ममेकर्स’ या संग्रहातील लेखाविषयी विचार करताना आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ जाणवते. कोणत्याही समीक्षेने त्या त्या कलाकृतीच्या मागणीचा विचार करून समीक्षामार्ग शोधायचा असतो. आपल्या मूल्यव्यवस्थेशी तडजोड न करता कलावंताच्या मानसिक घडणीशी अन्वय साधायचा असतो हे मतकरींना उमजलेले आहे. त्यामुळे स्फुट लेखनात ज्याप्रमाणे तो तो चित्रपट काय आणि कसे ‘दाखविण्या’चा प्रयत्न करतो आहे हे लक्षात घेऊन ते परीक्षण लिहितात. त्यामागे अभ्यासकाची नम्र वृत्ती आहे तितकाच आपल्या व्यासंगाविषयी विश्वास आहे.
‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकातील अकरा लेख हे विश्वविख्यात अशा चित्रपटकर्त्यांविषयी आहेत. पण या चित्रपटकर्त्यांची निवड खास मतकरींची आहे आणि त्या त्या लेखात आपण कोणत्या दृष्टिकोनातून त्या कलावंताच्या निर्मितीकडे पाहतो आहे हे त्यांना लख्खपणे ठाऊक आहे. त्यामुळे हे अकरा लेख एकत्र वाचतानाही रचनेचा तोचतोपणा जाणवत नाही. लेखक आणि चित्रपटनिर्माता यांच्यातला एक चेतनायुक्त संवाद आपण वाचतो आहोत असे जाणवते. चित्रपटासारखे माध्यम अनेकविध दृक्श्राव्य कलांशी जोडलेले आहे तसेच समाजाच्या सतत बदलत्या प्रश्नांशीही जोडलेले आहे याचे भान या समीक्षकाला आहे. पण यातील कोणतेच संदर्भ वा विवेचन लेखात तुकडय़ातुकडय़ांनी येत नाही. संदर्भ येतात ते त्या त्या लेखातील विचारप्रवाहाच्या सहज ओघात. कलासमीक्षक म्हणून मतकरींना कोटींचे (कॅटेगरी) भान आहे. संमिश्र कोटीतील चित्रपटाविषयीही हे भान समतोलपणे व्यक्त होते.
‘ल्युकसची पहिली चित्रत्रयी’ या लेखात ‘स्टार वॉर्स’ विषयी लिहिताना मतकरी चित्रपटाच्या वेगवेगळ्या कोटींचा विचार असा व्यक्त करतात- ‘मात्र याचा अर्थ ‘स्टार वॉर्स’ केवळ परीकथा, पुराणकथा, विज्ञानपट आणि कॉमिक्स बुक्स यांनाच एकत्र करतो असं नाही. इथे आढळणारे काही संदर्भ आणखी वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांशी नातं सांगतात. म्हणजे वेस्टर्न, समुद्री चाच्यांचे चित्रपट, युद्धपट, सामुराई योद्धय़ांचे चित्रपट इत्यादी. विज्ञानपटांशी असलेलं साम्य आपण गृहित धरून चालतो, पण या इतर शैली अनपेक्षित आहेत आणि त्यामुळे विशेष.. ल्युकसचं कौशल्य आहे, ते या विविध प्रकारांना एकत्र साधण्याचं (फिल्म. पृ. ३१)
वरील विवेचनात ‘कोटी’ हा शब्द मी योजला असला तरी गणेश मतकरींचे दर्शन तारतम्य लक्षात घेता इंग्रजीतील ‘जानर’ ही संकल्पना अधिक प्रस्तुत ठरते. एखादा चित्रपट, त्याची विशिष्ट काळातील निर्मिती, त्यातील निवडी या साऱ्यामागे त्या त्या प्रांतातील कला इतिहासाचा पट जसा असतो तसे राजकीय, सामाजिक अन्वयही असतात. त्या चित्रपटाच्या यशाची कारणमीमांसा म्हणूनच अनेक तऱ्हांनी समजून घ्यावी लागते याची समज मतकरींना आहे.
आपण चित्रपटाविषयी लिहीत आहोत, म्हणून ‘तंत्रज्ञाना’चा वा ‘चित्रपटभाषे’चा जाणीवपूर्वक वेगळा विचार मांडावा असे मतकरींच्या मनात नाही. त्यांना चित्रपट भाषेची सहज जाणीव आहे, त्यांच्या चित्रपट अवलोकनातून ती प्रगल्भ झालेली आहे. पण रसिक म्हणून त्यांची नजर त्याहीपलीकडे आहे. एखाद्या साहित्यरसिकाने कादंबरी वाचताना गोष्टीच्या पलीकडे आशय सूत्र शोधावे तसे मतकरी एखाद्या चित्रपटकर्त्यांने विशिष्ट तंत्र योजले त्यामागचा आधार शोधतात, उदाहरणार्थ हिचकॉक असे म्हटले की, प्रेक्षकांच्या मनात रहस्यपट ही कल्पना येते. पण आपल्या हिचकॉकवरील लेखात मतकरी भयपट आणि रहस्यपट यातील भेद विशद तर करतातच. पण हिचकॉकच्या चित्रपटामागील सूत्र शोधण्याचा यत्न करतात. ही सूत्रे दोन प्रकारची आहेत. हिचकॉकच्या चित्रपटातील तंत्रयोजनेविषयी खूप बोलले गेले असले तरी पटकथेवर त्यातील छोटय़ा छोटय़ा वळणावर ते काम कसे करतात याविषयीचे आणि साऱ्या रहस्याच्या वा पाठलागाच्या मागे असणाऱ्या मनुष्यस्वभावाविषयीचे. मतकरी सांगतात- ‘मानवी मनाची अपरिपक्वता आणि दुर्बलता हे त्यातलं महत्त्वाचं सूत्र. माणसं मूलत: सज्जन असतात, पण कसोटीची वेळ आली तर हा सज्जनपणा टिकत नाही हे हिचकॉकच्या अनेक चित्रपटांतून सांगितलेलं दिसतं.’ (फिल्म मे. पृ. ४०) हिचकॉक कौशल्याने अपराधभावनेचा वापर कसा करतात हेही ते स्पष्ट करतात. तर स्पीलबर्गविषयी लिहिताना अपरिचिताशी गाठ पडल्यावर माणसाचं गोंधळणं आणि सुटण्याच्या आशेनं बहुधा चुकीचे निर्णय घेत जाणं हे त्यांच्या अनेक चित्रपटांच्या मागचे सूत्र ते विशद करतात.
केवळ दिसणाऱ्या दृश्यामागचे सूत्र सांगून ते थांबत नाहीत. मजिदीसारख्या इराणमधील दिग्दर्शकाच्या ‘बरान’चा वेगळेपणा सांगताना मतकरी लिहितात- ‘बरान’चा वेगळेपणा हा की त्याचा पसारा हा केवळ आपल्या नजरेसमोर उलगडतो तेवढाच नसून इतरही पातळ्यांवर पसरलेला आहे.
यातील पहिली पातळी ती त्यातल्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची. अफगाणिस्थानातून इराणमध्ये अनधिकृतपणे येऊन स्थायिक झालेले नागरिक, त्यांचं राहणीमान ते ज्या परिस्थितीत काम करतात ती, याचं स्पष्ट चित्रण इथे दिसून येतं. थेटपणे त्याचबरोबर प्रतीकात्मक रीतीनेही. याची अफगाणी नायिका बोलत नाही. तिचा हा मुकेपणा, हा आपल्या समस्या मांडू न शकणाऱ्या अफगाणिस्थानचंच प्रतीक आहे.’ (फिल्म मे. पृ. ६३)
‘स्पीलबर्गचा सिनेमा’ या लेखात गणेश मतकरींनी अतिशय सुजाणपणे स्पीलबर्ग यांच्या चित्रपटातील विविधता हाताळली आहे. स्पीलबर्ग पटकथाकार, संकलक, कार्यकारी निर्माता असला तरी या लेखात त्यांच्याकडे आपण दिग्दर्शक म्हणून पाहणार आहोत असे सांगून त्याच्या चित्रपटाच्या विषयसूत्राचे वैविध्य, त्या सूत्रानुसार शोधलेल्या शैलीचे आणि तंत्राचे वैविध्य मतकरी मांडतात. यानिमित्ताने मतकरींच्या दृष्टिकोनाचे एक वैशिष्टय़ अधोरेखित करणे आवश्यक आहे. चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीने श्रेयस्कर असू शकतो. एकाच पद्धतीचा वा शैलीतला चित्रपट म्हणजे श्रेष्ठ असे त्यांना वाटत नाही. त्यामुळेच त्यांनी केलेली ‘फिल्ममेकर्स’ ची निवड आहे अशी झाली आहे. स्पीलबर्गविषयी लिहिताना या सुजाणपणाची विशेष गरज होती कारण त्याची निर्मिती वेगवेगळ्या कोटीतली आहे. तंत्रप्रधान निर्मिती असे स्पीलबर्गचे वैशिष्टय़ सांगावे तर ‘अतिस्ताद’ वा ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’सारखे चित्रपट तो करतो. त्याच्या हाताळणीमुळे पारंपरिक युद्धपटाला तो वेगळे आयाम देतो. मतकरींनी वारंवार उल्लेखिलेली एक गोष्ट म्हणजे मुलांसाठीचा चित्रपट आणि प्रौढांसाठीचा हा भेदच स्पीलबर्गने अप्रस्तुत ठरवला. स्पीलबर्गवरच्या लेखात त्यांच्या ‘ह्य़ूएल’चे रसग्रहण करताना मतकरी दिग्दर्शकाच्या काही गोष्टी न दाखविण्याचे निर्णय परिणामाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे असतात ते सांगतात. या तत्त्वाची उदाहरणे हिचकॉकवरच्या लेखातही येतात. प्रेक्षकांना कथेबरोबर नेण्याच्या कौशल्याचे वेगवेगळे अवतार आपल्याला स्पीलबर्गमध्ये पाहायला मिळतात. तो करीत असलेला तंत्रज्ञानाचा वापर कथेला पूरक असतो असे सांगून मतकरी म्हणतात की, तसे पाहिले तर हिचकॉक किंवा स्टॅनली क्युब्रिक यासारख्या दिग्गजांनी स्पीलबर्गहून काकणभर सरसच कामगिरी बजावली आहे. अशी एक इतिहासाची जाणीव मतकरींकडे आहे. ती ‘कलर पर्पल’विषयीचा वाद मांडतानाही दिसते. स्पीलबर्गच्या ‘जुरासिक पार्क’विषयी लिहिताना कादंबरीचं रूपांतर करताना त्यातील डी.एन.ए. क्लोनिंग, केऑस थिएरी विज्ञान भाषेसकट चित्रपटाच्या पूर्वार्धात वापरणाऱ्या स्पीलबर्गचे धाडस नोंदून मगच मतकरी ‘स्पेशल इफेक्ट’ची चर्चा करतात.
‘वाचोस्की बंधू : विज्ञान आणि तत्त्वज्ञान हा या संग्रहातला महत्त्वाचा लेख. याचे कारण वर्तमानकालीन चित्रपट समजून घेताना विज्ञान आणि तंत्रज्ञान यात अनेकदा गोंधळ केला जातो अथवा त्या योजलेल्या वैज्ञानिक टप्प्याची जाणच समीक्षकाला, प्रेक्षकाला नसते. मग आपण ‘सायन्स फिक्शन’ नावाची अपारदर्शी चिठ्ठी लावतो. पण या लेखात ‘मेट्रिक्स’ या चित्रपटाचे विश्लेषण करताना मतकरींनी आजच्या पिढीचे संगणकीय ज्ञान, त्याचा दृश्य प्रतिमांशी असणारा अन्वय आणि त्याही पलीकडे जाऊन प्राचीन तत्त्वज्ञांनी पकडलेल्या प्रश्नांचा चित्रपटाशी असलेला अन्वय विशद केला आहे. चित्रपट मालिकांविषयी फार महत्त्वाचे प्रश्न मतकरींनी याच लेखात नाही तर इतर लेखातही उपस्थित केले आहेत.
चित्रपट हे स्वायत्त माध्यम आहे आणि त्याचे स्वत:चे सौंदर्यशास्त्र आहे. याची जाणीव मतकरींना लख्खपणे आहे. पण चित्रपटकर्ता एका काळात- एका समाजात प्रगत असतो. अपरिहार्यपणे त्याच्या जगातील व्यूह चित्रपटात येतात. गणेश मतकरींनी इराणी चित्रपटाविषयी लिहिताना अथवा ‘भारताबाहेरचा भारतीय शामलन’ या लेखात चित्रपटाच्या सामाजिक- सांस्कृतिक मातीविषयी सखोल जाण व्यक्त केली आहे. आणि ती करताना त्यांच्या मनातील भारतीय चित्रपटांविषयीची सलही व्यक्त झाली आहे. ते लिहितात- ‘मजिदींकडून आज आपल्याला घेण्यासारखं आहे, ते केवळ पडद्यावरल्या चौकटीमधून आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यापेक्षा निश्चित अधिक आहे. ते आहे त्यांच्या विचारांच्या मोकळेपणात, मर्यादांचा सकारात्मक वापर करण्याच्या हिमतीत आणि कोणतीही उधारी- उसनवारी न करता घडवत आणलेल्या स्वत:च्या शैलीच्या सामर्थ्यांत.
मतकरींची लेखनशैली सहज आहे, पण सुलभीकरणाकडे वा सजावटीकडे त्यांचा कल नाही. अभ्यासकाच्या संयत वृत्तीने ते या विषयाकडे पाहतात, पण त्यांच्या मूल्यभानाला न पटणारी गोष्ट नि:संदिग्धपणे मांडतात. या पुस्तकाच्या रचनेत वर्तमानकालीन चित्रपटकर्ते घेऊन शेवटचा लेख बर्गमनवरचा देणे यात एक दृष्टिकोन आहे. मतकरी स्वत: एखाद्या दिग्दर्शकाविषयी विधान करायला दचकत नाहीत. पण एकदा चित्रपट हे आपले क्षेत्र मानल्यानंतर सतत शोधून प्रस्तुत चित्रपट पाहणे, इंटरनेटवरील माहिती, परीक्षणे यांच्याशी संपर्क ठेवणे, चित्रपटाविषयी ग्रंथवाचन करणे हे त्यांनी व्रत मानलेले दिसते. पण लेखनात या व्रतस्थपणाचे ओझे ते वाचकांवर टाकीत नाहीत. किंबहुना चांगल्या अर्थाने निरोगी मोकळी अशी दृष्टी त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या पुस्तकातील लेख वाचल्यावर आपल्याला कधी चित्रपट परत पाहावेसे वाटतील, कधी त्याविषयी अधिक वाचावेसे वाटेल. समीक्षेच्या पुस्तकाने आणखी काय करावे? हे लेख वाचीत असताना मात्र चित्रपट अभिनयाची चिकित्सा पुरेशी झाली नाही असे वाटले. याचा अर्थ मतकरी त्याविषयी लिहीत नाही असे नाही. काही प्रकारच्या चित्रपटात ताकदीचे अभिनेते असूनही दिग्दर्शकाला अभिनयाचा विनियोग करता येत नाही याविषयी ते लिहितात. पण पडद्यावरचा अभिनय या विषयावर मतकरी अधिक काही लिहितील अशी अपेक्षा होती.
गणेश मतकरी हा आजच्या युगातील मोकळ्या स्वतंत्र विचाराचा समीक्षक आहे. त्याच्याकडून यानंतरच्या काळात विशेष अपेक्षा आहेत.
पुस्तकाच्या अखेरीस काही महत्त्वाच्या चित्रपटांची आणि ग्रंथांची संदर्भसूची वाचकांना उपयुक्त ठरेल.
पुष्पा भावे
फिल्ममेकर्स: गणेश मतकरी,
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.
पृष्ठ १८६ (मूल्य २५० रु.)
(लोकसत्तामधून)

Read more...

वैचारिक सत्याचा पाठपुरावा

>> Wednesday, May 20, 2009



पंधरा वर्षांपूर्वी आलेला "क्वीझ शो' हा चित्रपट पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणावर आधारित आहे. ताजेपणा टिकवून ठेवल्यामुळे इतक्‍या वर्षांनंतरही "क्वीझ शो' विचार करायला लावतो.


आयुष्याने शिकवलेले धडे, व्यक्तीच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वापेक्षा तिच्या प्रतिभेने तयार होणारा आभास, व्यक्तीच्या ज्ञानापेक्षा तिने मिळविलेल्या पैशांचा देखावा मांडणारा क्वीझ शो, या शोदरम्यान झालेल्या फसवणुकीचा संशय आणि तपास लावण्याचा प्रयत्न, हे सर्व मुद्दे आपण हल्लीच "स्लमडॉग मिलेनिअर'मध्ये पाहिले आणि त्याच्या गुणदोषांची चर्चा केली. गंमत म्हणजे, स्लमडॉगपेक्षा संपूर्णपणे वेगळा आणि तरीही वर उल्लेखलेल्या मुद्‌द्‌यांनाच अचूक स्पर्श करणारा 1994 चा "क्वीझ शो' मात्र कसा कोण जाणे, सर्वांच्याच विस्मरणात गेला. मला याची अचानक आठवण झाली ती परवा रात्री एक वाजता तो टीव्हीवर दिसला तेव्हा. मात्र एकदा पाहिला असूनही मी तो पुन्हा एकदा संपूर्णपणे पाहिला. आज पंधरा वर्षांनंतरही तो आपला ताजेपणा तसाच टिकवून आहे.
क्वीझ शो आणि स्लमडॉग यात एक महत्त्वाचा फरक आहे. स्लमडॉग हा बॉलिवूड घटकांना अंगीकारत असणारा "मसाला' थ्रिलर आहे. क्वीझ शोमध्ये थ्रिलरचे काही घटक जरूर आहेत, मात्र तो केवळ करमणूक या एकमेव हेतूने बनवलेला नाही. 1950 च्या दशकात अमेरिकेत घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणावर तो आधारित आहे आणि स्वतःचे सत्य घटनेवर आधारित असणे तो अत्यंत गांभीर्याने घेतो. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकन समाजात एक प्रकारचा भाबडेपणा होता. पुढे समाजाच्या अनेक प्रतिष्ठित चेहऱ्यांनी, स्वच्छ प्रतिमा बाणवणाऱ्या अनेकांनी जनतेची दिशाभूल सातत्याने केली. यात चित्रपट तारे- तारका होत्या, खेळाडू होते, कायदेपंडित होते. या अनेकांनी जनतेला दिलेल्या धक्‍क्‍यांनी समाज इतका बदलत गेला, की आज कशावरही चटकन विश्‍वास ठेवणं त्याला अवघड जावं. एका बाजूने याला शहाणपण म्हटलं, तरी सत्यावर, पवित्रतेवर, चांगुलपणावर विश्‍वास ठेवण्याची क्षमता हरवत जाणं, ही काही चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. समाजाच्या या बदलाची सुरवात प्रथम झाली ती क्वीझ शोमध्ये येणाऱ्या प्रकरणापासून, असं मानणारा एक वर्ग आहे. मी म्हणेन, की सुरवात असो वा नसो, चार्ल्स व्हॅन डोरेन आणि ट्‌वेंटीवन नामक क्वीझ शो यांचा समाजाच्या निबर होण्यात निदान हातभार लागला असेल हे निश्‍चित.
"ट्‌वेंटीवन'ची लबाडी बाहेर आल्यानंतर आपल्या वागण्याचं समर्थन करणारं एक पात्र इथे म्हणतं की, "इट इजन्ट लाईक वुई आर हार्डन्ड क्रिमिनल्स हिअर- वुई आर इन शो बिझनेस'. आपलं टीव्ही उद्योगाचा भाग असणंच आपल्याला जणू नैतिक मूल्यांच्या चौकटीतून बाहेर काढत असल्याचं मानणारी इथली पात्रंच विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या अनेक घटनांमागच्या कारणांची सूचक आहेत.
चित्रपटाचा काळ आहे 1958 चा. गेमशोंचं नाव तर मी सांगितलं आहेच- "ट्‌वेन्टीवन'. एन. बी.सी. या प्रथितयश चॅनेलवरच्या या शोमध्ये दोन प्रतिस्पर्धी साउंडप्रूफ बूथ्समध्ये बसून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देतात. प्रश्‍न तसे कठीण; सहजासहजी उत्तर माहीत नसलेले. चित्रपट सुरू होताना या प्रश्‍नांची अचूक उत्तरं देत, प्रत्येक भागात बाजी मारणारा अन्‌ पुनरागमन करणारा तरबेज खेळाडू आहे हर्बी स्टेम्पल (जॉन टर्टुरो). जॉन हा स्पर्धेत टिकून आहे. संचालकांना आणि कार्यक्रमांच्या प्रायोजकांना (छोट्या भूमिकेत, दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी) हवा आहे. कारण तो दिसायला मध्यम, काहीसा आगाऊ असला तरी सामान्य प्रेक्षकाला आपला वाटणारा आहे. मात्र अखेर आजच्याप्रमाणेच तेव्हाही महत्त्व असणार ते शोच्या रेटिंगला किंवा अधिक ओळखीचा शब्द वापरायचा तर टी.आर.पी.ला. ते फार वर जात नसल्याचं लक्षात येताच निर्माता डॅन एनराईट (डेव्हिड पेमर) हर्बला सांगतो, की स्पर्धेतून बाहेर पड. डॅनची इच्छा असते की चार्ल्स व्हॅन डोरेन (राल्फ फाइन्स) या प्रत्येकाला आवडेलशा, देखण्या, विद्वान घराण्याचा वारसा सांगणाऱ्या तरुणाला शोचा नवा नायक करण्याची. हर्ब नाखुषीनेच हरायला तयार होतो, पण एकदा बाहेर पडल्यावर त्याला आपल्या चुकीचा पश्‍चात्ताप व्हायला लागतो. चार्ल्सच्या वाढत्या लोकप्रियतेचा मत्सरही वाटायला लागतो आणि तो डिस्ट्रिक्‍ट ऍटर्नीकडे धाव घेतो. कोर्टात केस दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असताना डिक गुडविन (रॉब मॉरो) या कॉंग्रेशनल कमिटी इन्वेस्टिगेटरची नजर या प्रकरणावर पडते आणि तो त्याच्या मुळाशी जायचं ठरवतो.
"क्वीझ शो' हा तीन बाजूंनी कथानकाकडे पाहतो. हर्ब, चार्ल्स आणि गुडविन ही तीन पात्रं. या तिघांचे दृष्टिकोन कथानकाच्या प्रत्येक पातळीवर महत्त्वाचे ठरतात. ते उघडच परस्परविरोधी आहेत. हर्बला स्वतःवर होणारा अन्याय दिसतो आहे. मात्र, क्वीझ शोने मिळवून दिलेले पैसे उडवून टाकणं, ही त्याचीच चूक आहे. त्याचा राग हा तो या घडीला कफल्लक असण्यातून आला आहे. हर्ब नेहमी स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करतो. आपण लबाडी करून, संयोजकांच्या संगनमताने जिंकत होतो. याचाच अर्थ चार्ल्सही तेच करतो, अशी त्याची खात्री आहे. चार्ल्सचे पुलित्झर पारितोषिक मिळवणारे वडील आणि काका, लोकप्रिय कादंबरीकार आई, त्याचं उच्च शिक्षण हे हर्बच्या खिजगणतीत नाही. त्याचं चार्ल्स भ्रष्ट आहे असं मानणं खरं आहे. मात्र पुराव्याशिवाय तसा आरोप करणं योग्य नाही.
दुसऱ्या बाजूला आहे चार्ल्स. चार्ल्सला सारा मोह पैशांचा नाही, मात्र लोकप्रियतेचा आहे. आपल्या घराण्यातल्या प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांपुढे आपलं कोणीच नसणं त्याला खाणारं आहे. त्याचं भ्रष्ट होणं हे आपली समाजापुढली प्रतिमा उच्च करण्याच्या इच्छेमधून आलं आहे. आपला खोटेपणा त्याला डाचत राहतो. मात्र स्वतःच तयार केलेल्या सापळ्यातून बाहेर पडणं त्याला कठीण जातं.
तिसरा दृष्टिकोन आहे तो गुडविनचा. गुडविन या प्रकरणाच्या मागे आहे. कारण टेलिव्हिजनचा वाढता वरचष्मा त्याच्या कल्पनेपलीकडचा आहे. गुडविन सत्यापर्यंत तर पोचतो, पण चार्ल्सशी झालेल्या मैत्रीमुळे तो त्यात गोवला जावा, हे गुडविनला पटत नाही. मात्र त्याला वाचवणार तरी कसा? कारण चार्ल्स हा ट्‌वेंटीवनचा सर्वांत यशस्वी स्पर्धक आणि त्याला वाचवून केस डळमळीत करणं हेदेखील आता गुडविनच्या शक्तीपलीकडे गेलेलं असतं.
क्वीझ शोचे हे तीन दृष्टिकोन पाहिले तर लक्षात येईल, की इथे काळा-पांढरा असा प्रकार नाही. गुडविन त्यातल्या त्यात सद्‌वर्तनी आहे, पण तो त्रयस्थ आहे. प्रकरणाशी त्याचा संबंध केवळ तपासापुरताच आहे. हर्ब आणि चार्ल्स हे वेगवेगळी पार्श्‍वभूमी असणारे असले तरी, त्यांच्या वागण्यामागची कारणं वेगवेगळी असली तरी अखेर दोघेही भ्रष्ट आहेत. चार्ल्सचं खाणारं मन हे त्याला प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून नायक किंवा प्रोटॅगॉनिस्ट बनवतं. पण हर्बप्रमाणे त्याचं चित्रणही ग्रे शेड्‌समधूनच तयार होणारं आहे.
दिग्दर्शक रॉबर्ट रेडफर्ड आणि पटकथाकार पॉल अटान्सिओ हे वेळोवेळी या दृष्टिकोनांमधला अन्‌ व्यक्तिरेखांमधला संघर्ष हा समाजाच्या नैतिक अधोगतीचा दिशादर्शक म्हणून वापरतात. मुळात टीव्ही उद्योगाला कायद्याचा बडगा दाखवायला निघालेल्या गुडविनचा अखेर भ्रमनिरास होणं आणि ट्‌वेंटीवन शो बंद पडूनही या कारवाईचे बळी हे कमी-अधिक प्रमाणात हर्ब किंवा चार्ल्स ठरणं, हे याचंच एक उदाहरण. क्वीझ शोची शैली ही प्रत्येक प्रमुख घटनेला, व्यक्तिरेखेच्या वागण्याला, युक्तिवादाला काउंटरपॉइंट उभा करणारी आहे. हर्बच्या दृष्टीने चार्ल्स खलनायक आहे, परंतु प्रत्यक्ष चार्ल्सचं घटनांवर नियंत्रण आहे का? गुडविनला चार्ल्सच्या भ्रष्ट असण्याचा सुगावा आहे. मात्र चार्ल्सच्या विद्वान घराणेशाहीचा त्याला मोहही पडतो आहे. मग चार्ल्सच्या वागण्याचं कारण तो या परिस्थितीत समजू शकेल का? चित्रपटातल्या व्यक्तिरेखा एकमेकांना समजून घेतील किंवा नाही? मात्र चित्रपट प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची संधी देतो ती व्यक्तिरेखांवरचा फोकस बदलता ठेवून, एकाच दिशेने संघर्ष घडवत न नेता, त्यातल्या प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी देत, संघर्षामध्ये बदलाच्या शक्‍यता जाग्या ठेवत.
क्वीझ शोवर काही प्रमाणात टीका झाली होती ती पटकथाकार आणि दिग्दर्शकाने घटना मांडतेवेळी घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे. नावं आणि प्रत्यक्ष संदर्भ न बदलता काळात आणि इतर तपशिलात केलेल्या बदलांमुळे. माझ्या दृष्टीने हे क्षम्य आहे. अखेर सत्यदेखील दोन प्रकारचे असते. प्रत्यक्ष घटनात्मक पातळीवरचं सत्य आणि त्या घटनांमधून जे सिद्ध होत जातं त्याचा पाठपुरावा करणारं वैचारिक सत्य. या वैचारिक सत्याला तपशिलातला बदल इजा पोचवू शकत नाही. चित्रकर्त्यांचा या बदलामागचा दृष्टिकोन हा या दुसऱ्या पातळीला अधोरेखित करण्याच्या हेतूने आला आहे, म्हणूनच चालण्यासारखा. मूळ घटनांना पन्नास अन्‌ चित्रपटाला पंधरा वर्षं होऊनही "क्वीझ शो' आजही विचार करायला लावतो, त्याचे कारणदेखील या वैचारिक सत्याच्या पाठपुराव्यात शोधता येईल.
- गणेश मतकरी

Read more...

ग्राउंडहॉग डे- हाच खेळ उद्या पुन्हा

>> Monday, May 18, 2009

दिग्दर्शक हेरॉल्ड रामीसच्या ग्राउंडहॉग डेला कथानक आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, कारण एका बाजूला पाहिलं तर हा एका आत्मकेंद्री माणसाचा सज्जन, मोठ्या मनाचा माणूस होण्याकडे झालेला प्रवास आहे. पण दुस-या बाजूने घटना आणि इतर पात्रांच्या कथेतला सहभाग पाहिला तर ती एका घटनाक्रमाची अनेकवार होणारी पुनरावृत्ती आहे. कारण संपूर्ण चित्रपट हा एका विशिष्ट दिवसाभोवती फिरतो, जो कथानायक सोडता इतरांसाठी बदलत नाही किंवा कथानायकाच्या उचापतीमुळे जितका बदलू शकेल तितकाच बदलतो. दिवस आहे अर्थातच ग्राउंडहॉग डे.
पन्कासाटोनी गावात प्रथा आहे, ज्यानुसार पन्कासाटोनी फिल नावाने ओळखला जाणारा ग्राउंडहॅम, म्हणजे सशासारखा छोटा प्राणी, एका ठराविक दिवशी हिवाळा किती टिकेल याविषयीचं भाकीत वर्तवतो. आडगाव असलेल्या पन्कासाटोनीसाठी हा एक मोठा सणच आहे. यावर्षी हा सण टीव्ही वृत्तांतात पकडण्यासाठी, हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं काम करणारा, स्वार्थी,स्वतःच्या कोषात राहणारा, आगाऊ आणि भांडखोर फिल (बिल मरी) या गावात येऊन पोहोचला आहे. बरोबर आहे त्याचा कॅमेरामन आणि दिग्दर्शिका रिटा (अँन्डी मॅकडोविच). आधीच या कामगिरीवर नाखूष असणा-या फिलचा दिवस काही बरा जात नाही. काम चांगलं होत नाही, भांडणं होतात, त्याचा जुना कंटाळवाणा वर्गमित्र भेटतो आणि अखेर हायवेवर झालेल्या हिमवर्षावाने ही मंडळी गावातच अडकून पडतात.
दुसरा दिवस उजाडतो तो पहिल्या दिवसासारखाच. रेडियोवर तेच संगीत, तेच निवेदन. लवकच फिलच्या लक्षात येतं की हा दिवस पहिल्या दिवसासारखा नसून पहिला दिवसच आहे, म्हणजे ग्राउंडहॉग डेच आहे. हा दिवस जसा उलगडत गेला तसाच तो पुन्हा उलगडणार आहे आणि फिलला त्याला पुन्हा एकदा तोंड द्यावं लागणार आहे.
हा दिवस पुन्हा पुन्हा घडत राहणं आणि फिलचं त्यावर रिअँक्ट होणं एवढीच चित्रपटाची कल्पना आहे. चित्रपट सायन्स फिक्शन वैगैरे नाही, त्यामुळे नायकापुरता हा कालप्रवाह अडकून राहण्याला चित्रपट कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, आणि चित्रकर्त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य आहे. हे का होतं याला अंतिमरीत्या महत्त्व नाही. आपलं आयुष्य हे अखेर आपण स्वतःच घडवतो. ते चांगलं की वाईट हे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आहे, असं चित्रपट सांगतो. मात्र हे सांगण्यासाठी तो कधीही शब्दांच्या आहारी जात नाही.
एका घटनाक्रमाच्या असंख्य शक्यता प्रेक्षकांसमोर उलगडताना तोचतोचपणा येऊ न देणं सोपं नाही. कारण फिलमुळे दिवस बदलत असला तरी इतरांचं आयुष्य याने बदलेपर्यंत ठराविक रितीनेच घडणार आहे. फिलचं वागणं कसं बदलत जातं आणि फिल विविध प्रकारे या दिवसाचा उपयोग कसा करतो, ते पाहणं रंजक आहे, तसंच आपल्याला अंतर्मुख करणारंही आहे. स्वतःच्या वागण्याचा अन् त्याच्या दुस-यांवर होणा-या परिणामांचा विचार करायला लावणारं आहे. इथे फिल आधी चिडतो, भांडण करतो, मग आपल्याला माहीत असणा-या घटनांचा फायदा करून घेण्याचं ठरवतो. म्हणजे त्याला एखादी मुलगी आवडली तर एखाद्या दिवशी तिची माहिती काढून घेऊ शकतो आणि दुस-या दिवशी त्या मुलीच्या कल्पनेतला पुरुषोत्तम असल्याचं नाटक करून तिला पटवू शकतो.
रिटाला पटविण्यासाठी तो यथाशक्ती प्रयत्न करतो. पोलिसांना चिथावण्यापासून आत्महत्या करेपर्यंत कोणतीच गोष्ट त्याला या दिवसापासून मुक्ती देत नाही, हे लक्षात आल्यावर तो हळूहळू मिळालेल्या क्षणाचा वावर चांगल्या रितीने करायला शिकतो. गावच्या लोकांना (त्यांना फिल माहित नसला तरी इतक्या दिवसांनी फिल मात्र सगळ्यांना ओळखायला लागलेला) मदत करतो, पिआनो, आईस स्कल्पटींग शिकतो. स्वतःचं आयुष्य एकापरीने सुधारायचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न अखेर त्याच्या आयुष्यात दुसरा दिवस उजाडायला कारणीभूत ठरतात.
ग्राउंडहॉग डे म्हटलं तर कॉमेडी आहे. त्यात अनेक विनोदी प्रसंग आहेत आणि मरीसारखा प्रसिद्ध कॉमेडीयन नायकही. त्यातल्या फिल आणि रिटाच्या बदलत्या नात्याच्या सुंदर चित्रणामुळे त्याला रोमँटिक कॉमेडीही म्हणता येईल. पण खऱं तर त्याला अशा विशिष्ट विभागात न बसवणं हेच न्याय्य राहील. कारण अंतिमतः त्याला स्वतःला एक माणूस म्हणून सुधारण्याचा संदेश, हा संदेश म्हणून येत नसला तरी तो स्पष्ट आहे, तो एरवीच्या कॉमेडी (किंवा रोमँटिक कॉमेडी) वर्गाकडून अपेक्षित नाही. किंवा त्याची एकाच वेळी गुंतागुंतीची आणि सोपी रचनाही.त्या दृष्टीने ग्राउंडहॉग डेचा स्वतंत्र चित्रप्रकार आहे. जो त्याच्यापुरता मर्यादित आहे. एकट्या चित्रपटासाठीही राखून ठेवलेला.
-गणेश मतकरी.

Read more...

निवडणुकीचा खेळ आणि रिकाउंट

>> Wednesday, May 6, 2009



"रिकाउंट' चित्रपटात बुश-गोर यांच्यातील निवडणुकीदरम्यानच्या तात्कालिक घडामोडी असल्या तरी आजचं राजकारण आणि त्यातल्या प्रवृत्ती यांचा संपूर्ण आढावा हा चित्रपट घेतो.

""सो डिड द बेस्ट मॅन विन देन?''
""अ‍ॅब्सलुट्ली''
""आर यू शुअर अबाऊट दॅट?''
""ऍज शुअर ऍज यू आर अबाऊट युअर मॅन.''
""आय होप यू आर राईट, मि. सेक्रेटरी. आय डू होप यू आर राईट.''

हा संवाद घडतो "रिकाउंट' चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगात. ऍल गोर कॅम्पचा प्रमुख रॉन क्‍लेन (केविन स्पेसी) आणि बुश कॅम्पचा प्रमुख निवृत्त सेक्रेटरी ऑफ स्टेट, जेम्स बेकर द थर्ड (टॉम वेल्किनसन) यांच्यामध्ये. 2000 च्या निवडणुकीत झालेल्या ऍल गोरच्या पराभवानंतर लगेच झालेल्या भेटीत. तेव्हा बुशच्या योग्यतेबद्दल खात्री देणाऱ्या बेकरना जर बुशच्या कारकिर्दीची कल्पना तेव्हाच झाली असती, तर ते आपल्या उत्तरात कचरले असते का? मला तसं वाटत नाही. किंबहुना त्यांच्याच उत्तराप्रमाणे त्यांना स्वतःला आणि क्‍लेनलाही आपापल्या उमेदवाराबद्दल खात्री असणं भाग होतं, नव्हे, त्यांच्या कामाची ती गरज होती. आता प्रश्‍न असा पडतो, की जेते आणि जित हे दोघे आणि त्यांचे आपापले पक्ष हे जर "ग्रेटर कॉमन गुड' हा प्रश्‍नच निकालात काढून निवडणुकांकडे एखाद्या खेळाप्रमाणे, ज्यात कोणत्याही पद्धतीने जिंकणं भाग आहे अशा खेळाप्रमाणे पाहत असतील, तर मुळात या निवडणुकीच्या प्रक्रियेलाच काही अर्थ आहे का?
"रिकाउंट'च्या पार्श्‍वभूमीला राहूनही सतत जाणवणारा हा प्रश्‍न आहे. 2000 चा अमेरिकन निवडणुकांचा निकाल आणि त्यामधून झालेली राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची निवड, ही नक्कीच अमेरिकन राजकारणाच्या सर्वात संदिग्ध निकालांपैकी एक मानली गेली पाहिजे. फ्लॉरिडामध्ये घोषित होणाऱ्या निकालाच्या अखेरच्या टप्प्यावर झालेले अनेक गोंधळ, बुशला असणारी अतिशय थोड्या मतांची आघाडी, मूळ मतदान प्रक्रियेत राहिलेल्या अन्‌ घडवलेल्या अनेक त्रुटी, मग त्यातून घडलेलं फेरमतमोजणीचं नाट्य हा "रिकाउंट'चा विषय. जरी यातल्या घटना एका विशिष्ट निवडणुकीदरम्यान घडलेल्या असल्या, तरी हा चित्रपट केवळ तत्कालीन घडामोडी सांगणारा आहे, असं म्हणणं योग्य नाही. आजचं राजकारण अन्‌ त्यातल्या प्रवृत्ती यांचा संपूर्ण आढावा हा चित्रपट घेतो. त्याचा रोख एका विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने आहे का? असेल कदाचित; पण त्यामुळे त्याच्या आशयाची तीव्रता कमी होत नाही.
रिकाउंटची कल्पना ही थोडी टॉम स्टॉपार्डच्या "रोझेन्क्रान्झ अँड गिल्डर्नस्टर्न आर डेड' या नाटकाची आठवण करून देणारी आहे. शेक्‍सपिअरच्या हॅम्लेटकडे दोन दुय्यम पात्रांच्या दृष्टिकोनातून, त्यांना नायक करून पाहणारं हे नाटक. (याच कल्पनेची खूपच विनोदी आवृत्ती म्हणजे "लायन किंग' चित्रपटाचा तिसरा भाग म्हणून ओळखला जाणारा "हकुना मटाटा'- ज्यात लायन किंगच्याच कथानकाला टिमॉन आणि पुम्बा या दुय्यम पात्राच्या, नायक सिम्बाच्या कॉमिक रिलीफ देणाऱ्या साइडकिक्‍सच्या दृष्टिकोनातून पाहण्यात येतं.) आता "रिकाउंट' काही कोणत्या आधी येऊन गेलेल्या नाटका/ चित्रपटाची आवृत्ती नाही, पण जेव्हा आपण बुश, ऍल गोर यांच्यामधल्या निवडणुकीची अन्‌ त्यातून उद्‌भवलेल्या वादाची ही गोष्ट आहे असं म्हणतो, तेव्हा साहजिकच त्या दोघांना महत्त्वपूर्ण भूमिका असण्याची शक्‍यता तयार होते. प्रत्यक्षात इथे मात्र ती दोघं जवळजवळ अदृश्‍य आहेत. काही मोजक्‍या दृश्‍यांत त्यांचं ओझरतं दर्शन आहे आणि प्रत्यक्ष घटनांदरम्यानचं जे न्यूज फुटेज इथे वापरण्यात आलं आहे, त्यातही ही दोघं दर्शन देतात. मात्र लढा जरी त्यांच्या नावानं दिला गेला तरी त्यांचे सेनापती हेच इथले नायक आहेत. मघा उल्लेखलेला क्‍लेन ही चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे, तर बेकरची भूमिका थोडी लांबीने लहान पण तेवढीच महत्त्वपूर्ण आहे.
तिसरी महत्त्वाची, मात्र खूपच छोटी भूमिका आहे फ्लॉरिडाची तेव्हाची सेक्रेटरी ऑफ स्टेट कॅथरिन हॅरिस (लॉरा डर्न) हिची. छोटी असूनही ही सर्वाधिक स्मरणात राहणारी भूमिका आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक तर मूळच्या कॅथरिन हॅरिसचं या फेरमतमोजणी प्रकरणातलं स्थान महत्त्वाचं आहे. घडणाऱ्या घटनांवर ताबा नसणं, स्वतःवर पडलेल्या जबाबदारीचं भान नसणं, आपण प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहोत हा गैरसमज, या तीन गोष्टी या व्यक्तिरेखेच्या विशेष आहेत. तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची हिंमत दाखवली असती, तर कदाचित या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. मात्र ते झालं नाही. भूमिका लक्षवेधी ठरण्याचं दुसरं कारण आहे ते लॉरा डर्नची उत्तम कामगिरी. तिच्या प्रत्येक वाक्‍यातून, मुद्राभिनयातून, संवाद बोलण्याच्या शैलीतून हॅरीसबाई प्रत्यक्ष जिवंत होतात. याचा पुरावा हा अखेरच्या श्रेयनामावलीत पाहावा. यात या निवडणुकांदरम्यान अस्सल फुटेज पाहायला मिळतं. डर्नची भूमिका पाहिल्यावर आपण या फुटेजमधल्या हॅरीसबाई अचूक ओळखू शकतो.
रिकाउंटचे पटकथाकार अन्‌ दिग्दर्शक हे एक सरप्राइज पॅकेज आहे. कारण या प्रकारच्या गंभीर नाट्यपूर्ण प्रयत्नासांठी नाव झालेली ही मंडळी नाहीत. इथली पटकथा आहे डॅनी स्ट्रॉंग यांची. जे अभिनेता (बफी द व्हॅम्पायर स्लेअर मालिकेसाठी) म्हणून परिचित आहेत. जे रोश यांनी दिग्दर्शनाचे यशस्वी प्रयत्न केले आहेत, पण तो मुख्यतः विनोदी (ऑस्टिन पॉवर्स मालिका) चित्रपटांमधून. या प्रकारचा प्रयत्न या दोघांकडून अनपेक्षित आहे म्हणून अधिकच उल्लेखनीय.
खरं तर जेव्हा रिकाउंट पाहायला बसलो, तेव्हा मला तो आवडेल, किंवा बांधून ठेवेल याची खात्री नव्हती. कारण राजकारणात मला फारसा रस नाही. आपल्याही नाही, मग बाहेरच्या तर सोडाच. त्यामुळे अमेरिकन इलेक्‍शन, सत्य घटनांवर आधारित असणं आणि उघड नाट्यपूर्ण घटनांपेक्षा तात्त्विक वाद केंद्रस्थानी असणं, या तिन्ही गोष्टी मला कथेत गुंतवतील अशी शक्‍यता दिसत नव्हती. मग चित्रपटाला हे जमलं कसं, तर त्याचं कारण आहे ते व्यक्तिरेखा/ दृष्टिकोन/ तपशील/ संदर्भ यांच्या चित्रपट घडवलेल्या मोन्ताजमध्ये. रिकाउंटमध्ये पटकथा लेखक/ दिग्दर्शकाने काही प्रमाणात स्वातंत्र्य जरूर घेतलं असेल, पण त्यांनी त्यासाठी जो अभ्यास केला आहे, तो जाणवणारा आहे. चित्रपट कुठेही कोणाही व्यक्तिरेखेच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरत नाही, प्रेक्षकांना भावनिक कल्लोळात गुंतवायचा प्रयत्न करत नाही. क्‍लेनला ऍल गोरने चीफ ऑफ स्टाफ पदावरून काढल्याचा एक संदर्भ, एवढंच त्याचं व्यक्तिरेखांच्या भूतकाळाशी नातं आहे. मग तो करतो काय, तर अनेक व्यक्तिरेखा, त्यांचं या निवडणुकांसंदर्भात असणारं स्थान, त्यांनी निवडलेली बाजू आणि त्यांचा त्याबाबतचा दृष्टिकोन या सगळ्यांना एकत्र जोडून एक संपूर्ण चित्र उभं करतो. हे पूर्ण चित्र हे मधल्या फळीचं आहे. त्यात ज्याप्रमाणे उमेदवारांना महत्त्वाचं स्थान नाही, तसंच जनतेलाही नाही. मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या या मंडळीचं चित्र खूप अस्सल आहे. आर्थर हेलीच्या एखाद्या उद्योगाचा पूर्ण अभ्यास करून लिहिलेल्या कादंबऱ्या ज्या प्रकारे आपल्याला गुंतवतात, तसाच हा चित्रपट गुंतवतो. त्यासाठी तुमचा गृहपाठ चोख असण्याची गरज नाही.
एक गोष्ट मात्र आहे, हे चित्र जसं अस्सल आहे, तसंच विदारक आहे. राजकारणी जनतेवर अवलंबून असले, तरी त्याचं अस्तित्व प्रत्यक्ष जनतेपासून किती डिस्कनेक्‍टेड आहे, हेदेखील इथे जाणवतं. जनतेच्या मतांचा इथला उल्लेख हा जनतेला काय वाटतेय, या विषयीचा नसून, त्याला केवळ संख्याशास्त्रीय महत्त्व आहे. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद, त्यांच्या क्‍लृप्त्या यादेखील अखेर नंबरशीच जोडलेल्या आहेत. कोणते पान या खेळाचे नियम पाळते आणि कोणते ते वाकवते यावर एकमत नसेल, मात्र शेवटी हा खेळ आहे यावर कोणाचंच दुमत नाही. नेत्यांच्या वचनांमधला जनतेचा कळवळाही विजयाचा आनंद किंवा पराजयाची निराशा लपवण्याचाच एक मार्ग आहे.
अर्थात अमेरिकेसारख्या देशात- जिथे भाषणस्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य अशा गोष्टी खरोखरच मानल्या जातात, तिथे निदान यावर चित्रपट येऊ शकतात. आपल्याकडे जर असा खरोखर गंभीर स्वरूपाचा प्रयत्न झाला तर त्याचं भवितव्य काय असेल, हे वेगळं सांगायला नको.
- गणेश मतकरी

Read more...

वर्मावर बोट ठेवणारा इलेक्‍शन

>> Friday, May 1, 2009

निवडणुकांच्या निमित्तानं बाहेर येणाऱ्या प्रवृत्तींकडे त्यामागच्या स्वार्थाकडे, भ्रष्टाचाराकडे आणि निकालानं जैसे थे राहणाऱ्या व्यवस्थेकडे आपली तिरकस नजर लावणारा चित्रपट म्हणजे अलेक्‍झांडर पेनचा "इलेक्‍शन'. "इलेक्‍शन'मधली निवडणूक ही खरं तर शाळेतली - मायक्रो पातळीवरची; पण तरीही या संपूर्ण प्रक्रियेवर नेमकं बोट ठेवणारी. राजकारणावर आधारित आणि प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारा; विनोदी पण तरीही विचारी, असा दुर्मिळ, निवडणुकीशी संबंधित वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेतील दुसरा चित्रपट.

निवडणुकीला उभे राहतात ते उमेदवार सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी असतात अशी एक अफवा आहे. काहींचा त्या अफवेवर दृढ विश्‍वास आहे; इतरांचा तितका नाही. मात्र त्यासंबंधात प्रत्यक्ष काही करणं हे कल्पनेपलीकडलं असल्यानं, ते सत्य असल्याचं स्वतःच्या मनाला पटवणं, हे त्यांना सोपं वाटतं. शिवाय सध्या मतदान करणं म्हणजेच समाजसुधारणेच्या दिशेनं काही पावलं उचलणं, असाही एक समज दृढ होताना दिसतो. पण याचा अर्थ असा म्हणावा का, की केवळ निवडणुकीची यशस्वी प्रक्रियाच आपल्याला कधी ना कधी स्वच्छ समाज आणि प्रामाणिक राज्य व्यवस्था देईल? त्यात प्रत्यक्ष उमेदवारांच्या चारित्र्याचा काहीच हात नसेल? या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्यांचा वा विरोध दर्शवणाऱ्यांचा त्यांच्या भूमिकेमागे काहीच स्वार्थ नसेल? प्रत्यक्ष उमेदवारांचा हेतू चुकून जनतेचं कल्याण हाच असला, तरी त्यासाठी त्यांच्या डोळ्यांसमोर असणारा मार्ग हाच योग्य मार्ग असेल? केवळ एक "इलेक्‍शन' आपल्या शंभर व्याधींवरचा एकच रामबाण उपाय असेल?
अलेक्‍झांडर पेन नावाचा दिग्दर्शक पटकथाकार आहे, जो समाजातल्या विसंगतींवर नेमकं बोट ठेवणारे चित्रपट नियमितपणे काढत असतो. त्याचा एक सिनेमा आहे "इलेक्‍शन (1999). इलेक्‍शन'मधली निवडणूक ही खरं तर जिल्हा, राज्य, देश पातळीवरची नाही, तर ती आहे साधी हायस्कूलमधली. स्टुडंट कौन्सिलचं अध्यक्ष कोणी व्हावं यासाठी लढली जाणारी. मात्र पेनचं टार्गेट हे केवळ हायस्कूलपुरतं मर्यादित नाही. निवडणुकीची प्रक्रिया हेच त्याचं लक्ष्य आहे. मात्र तो या प्रक्रियेला एका मायक्रो पातळीवर आणू पाहतो. या इलेक्‍शनच्या निमित्तानं बाहेर येणाऱ्या प्रवृत्तींकडे त्यामागच्या स्वार्थाकडे, भ्रष्टाचाराकडे आणि निकालानं "जैसे थे' राहणाऱ्या व्यवस्थेकडे आपली तिरकस नजर लावतो.
इलेक्‍शनमध्ये प्रमुख पात्रं चार. तीन उमेदवार आणि एक शिक्षक, ज्याचा या निवडणुकीमागच्या राजकारणात मोठा हात आहे. जिम मॅक्‍झॅलिस्टर (मॅथ्यू ब्रॉडेरिक) या अमेरिकन इतिहास आणि नागरिकशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाचा ट्रेसी फ्लिकवर (रिज विदरस्पून) पहिल्यापासूनच राग आहे. त्याला कारण आहे ते काही दिवसांपूर्वी शाळेने यशस्वीपणे दाबून टाकलेली एक भानगड. या भानगडीत निष्पाप बळी ठरली होती ती "बिचारी' ट्रेसी. आणि जिमच्या एका मित्राला मात्र आपल्या नोकरीसह बायको-मुलांनाही गमवावं लागलं होतं. जिमचा मित्र काही फार शुद्ध चारित्र्याचा होता असं नाही; मात्र जिमच्या मते, चूक त्याची एकट्याची नव्हती. ट्रेसी जेव्हा स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी उभं राहायचं ठरवते, तेव्हा जिमच्या मनात हा राग ताजा असतो आणि ट्रेसीला बिनविरोध निवडून येऊ द्यायचं नाही असं तो ठरवतो. यासाठी तो चिथावतो, तो श्रीमंत आणि सरळमार्गी पॉल मेझल्शला (क्रिस क्‍लाईन). पॉल एक लोकप्रिय फुटबॉलपटू असतो; मात्र नेतेगिरी त्याच्या रक्तातच नसते. पॉलला जिमनं उभं केल्याचं ट्रेसीला लक्षात येतं आणि ती पिसाळते. एवढ्यात आणखी एक अनपेक्षित उमेदवार उभा राहतो, पॉलची बहीण टॅमी (जेसिका कॅम्पबेल). टॅमीची जवळची मैत्रीण अचानक यू टर्न मारून पॉलच्या प्रेमात पडते, आणि निवडणूक हाच एक बदला घेण्याचा मार्ग असल्याचं टॅमी ठरवते. जिम या अचानक तयार झालेल्या स्पर्धेमुळे खूष होतो. मात्र त्याचं कौटुंबिक आयुष्य याच क्षणी एका नव्या पेचप्रसंगाला सामोरं जाणार असतं. कुटुंब आणि पेशा या दोन्ही आघाड्यांवर जोमानं लढत राहणं जिमला शक्‍य होईलसं दिसत नाही.
इलेक्‍शनमध्ये सतत जाणवणारी आणि चित्रपट व्यापून टाकणारी गोष्ट म्हणजे बोचरा उपहास. चित्रपट म्हटलं तर विनोदी आहे; मात्र विनोद कुठेही चिकटलेला वाटणारा नाही. तो व्यक्तिरेखा अन्‌ एक प्रकारे त्यांनीच निर्माण केलेल्या परिस्थितीतून तयार होणारा आहे. जिम आणि ट्रेसी या इथल्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. त्यामुळे अधिक तपशिलात रंगवलेल्या, तर पॉल आणि टॅमी या दुय्यम महत्त्वाच्या, त्यामुळे किंचित कमी तपशिलात. मात्र त्यामुळे त्यांच्या खरेपणावर कुठंही परिणाम झालेला दिसत नाही. किंबहुना त्या खऱ्या असणं, हेच इलेक्‍शनच्या यशाचं मुख्य कारण आहे.
चित्रपट या व्यक्तिरेखांकडे दोन प्रकारे बघताना दिसतो. एक म्हणजे निःपक्षपातीपणे तो जे जसं घडतंय तसं दाखवतो, अन्‌ प्रेक्षकांवर निष्कर्ष काढण्याचं काम सोपवतो. दुसऱ्या प्रकारात तो पात्रांना त्यांची मतं घटनांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याच आवाजात मांडायला देतो. ही त्यांची स्वतःविषयी काय कल्पना आहे ती मांडतात. (बऱ्याचदा ती त्यांच्या एकंदर वागणुकीला छेद देणारी, आणि भव्य असतात) वागणं आणि विचार यांमधली फारकतच बहुतेक वेळा इलेक्‍शनचा टोन निश्‍चित करते.
सामाजिक रूढी आणि नीतिमत्ता यांचं राजकारणातलं स्थान, हे इथं असणारं एक महत्त्वाचं सूत्र. संहितेत जर अशी सूत्रं पात्रांच्या तोंडून वदवली गेली, तर अनेकदा ती प्रेक्षकांच्या नजरेत स्पष्ट व्हायला मदत होते. मात्र हे वदवणं जितकं स्वभाविकपणे होईल तितकं उपयुक्त असतं. जर पात्रं उपदेशाचे डोस पाजायला लागली, तर प्रेक्षक त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला मागेपुढे पाहत नाही. इलेक्‍शनमध्ये हा विषय पात्रांसंदर्भात उल्लेखला जाण्याआधी जिमनं वर्गात विचारलेल्या एका प्रश्‍नातून उच्चारला जातो. जिमचं प्रश्‍न विचारणं आणि ट्रेसीनं उत्तरादाखल उचललेल्या हाताकडे दुर्लक्ष करत राहणं, हा प्रसंग प्रेक्षकांच्या स्मरणात राहील अशा रीतीनं मांडला जातो. जवळजवळ लागून येणाऱ्या फ्लॅशबॅकमध्ये हाच प्रश्‍न ट्रेसीच्या भानगडीसंदर्भात विचारला जातो आणि त्याचं "चर्चेत असणारा प्रश्‍न'म्हणून स्थान निश्‍चित होतं. यानंतर जर कोणी हा महत्त्वाचा मुद्दा विसरलं, तर त्याला आठवण करून दिली जाते चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगात- ज्यात प्रश्‍न बदलतो, पण त्याची वाक्‍यरचना, अन्‌ जिमची वागणूक यातून सुरवातीचा प्रसंग सुचवला जातो, अन्‌ प्रेक्षकांना या मुद्‌द्‌याची आठवणदेखील करून दिली जाते.
इलेक्‍शनचं वरवरचं रूप हे "टीनेज कॉमेडी' या नावाखाली पाहायला लागणाऱ्या तरुण मुला- मुलींच्या वायफळ बाळबोध विनोदिकेचं आहे. मात्र प्रत्यक्षात त्यात मांडलेले विषय ना वायफळ आहेत ना बाळबोध. खरं तर त्यातला संघर्ष आणि शेवट हेदेखील एरवी या प्रकारच्या चित्रपटांमध्ये न आढळणारी उंची दाखवणारे आहेत. नेहमी अशा चित्रपटांतल्या व्यक्तिरेखा टू डिमेन्शनल असतात, अन्‌ त्यांची मांडणीही काळी-पांढरी असं स्पष्ट विभाजन असणारी असते. इथे सगळाच ग्रे शेड्‌सचा मामला आहे. हेतू आणि कृती यांमध्ये एकवाक्‍यता नसणं, हा जिम आणि ट्रेसीचा विशेष इथलं बहुतेक नाट्य घडवतो. त्यांचा हेतू बऱ्याच प्रसंगी स्तुत्य असतो; मात्र प्रत्यक्षात तो कृतीमध्ये उतरलेला दिसत नाही. पॉल आणि टॅमी त्यामानानं "बोले तैसा चाले' प्रकारचे असतात. मात्र त्यांचं पारदर्शक असणं, हेच वेळोवेळी त्यांच्या विरोधात जातं. जणू चित्रपट सुचवतो, की राजकारणात "अमुक एका प्रमाणात भ्रष्ट असणं, स्वार्थी असणं हा गुणच आहे. त्याहून भाबडं असणं व प्रामाणिक असणं राजकारण्यांना परवडणार नाही.'
विचार करायला लावणारे विनोदी चित्रपट मुळातच एक दुर्मिळ वर्ग आहे. राजकारणावर आधारित असणारे आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे चित्रपट हा दुसरा एक दुर्मिळ वर्ग. आता या दोन्ही वर्गांना एकत्र करणारा चित्रपट म्हणजे किती दुर्मिळ, याची कल्पनाच केलेली बरी. "इलेक्‍शन' हा एक असा अतिदुर्मिळ चित्रपट आहे. राजकारण्यांच्या वर्मावर हलकेच बोट ठेवणारा अन्‌ अप्रत्यक्षपणे पाहायचं, तर मतदान करणाऱ्यांच्यादेखील.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP