`हाय नून` - वेस्टर्न नसणारा `वेस्टर्न`

>> Sunday, December 25, 2011

अमेरिकन चित्रपटांत आढळणा-या चित्रप्रकारात अतिशय लोकप्रिय असलेला, जगभर पाहिला जाणारा अन् अनेक देशांच्या चित्रपटांवर प्रभाव टाकणारा चित्रप्रकार म्हणून  `वेस्टर्न`चं नाव घेता येईल. शहरीकरणाच्या आधी अस्तित्त्वात असणारी जुन्या अमेरिकन वेस्टमधली खेडी, त्यांच्या दुतर्फा पसरलेला वाळवंटी प्रदेश याच्या पार्श्वभूमीवर घडणा-या, भल्याबु-यामधल्या अत्यंतू मूलभूत संघर्षाभोवती आकाराला येणा-या, साध्या पण नाट्यपूर्ण साहसकथा वेस्टर्न चित्रपटांमध्ये पाहायला मिळत. रचनेच्या दृष्टीने केलेले प्रयोग हे सहसा वेस्टर्नमधे दिसत नाहीत. प्रवृत्ती सहजपणे उठून दिसणा-या काळ्या पांढ-या व्यक्तिरेखा, पटकन कळण्यासारख्या नायक अन् खलनायक अशा दोनच बाजू, सज्जन नायकाचा विनाशर्त विजय अशी काही नियमितपणे दिसणारी लक्षण असणारे वेस्टर्नस् हे सरळ रेषेत चढत जाणारी पटकथा नित्य मांडताना दिसत. अगदी सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून आकाराला आलेला हा चित्रप्रकार, गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत चांगलाच लोकप्रिय अन् हमखास प्रेक्षकवर्ग असणारा ठरला होता. १९५२च्या `हाय नून`ने मात्र त्याचा वापर एक वेगळ्याच प्रकारची गोष्ट सांगण्यासाठी केला. नेहमीच्या वेस्टर्नची अपेक्षा कऱणारे, गॅरी कूपरसारख्या सांकेतिक वेस्टर्नमधे शोभणा-या स्टारच्या भरवशावर आलेले प्रेक्षक गडबडले. त्यांना जो चित्रपट पाहायचा होता, तो हा नव्हता.
वरवर पाहता `हाय नून`चा वेस्टर्नपणा, हा वादातीत आहे, कारण या चित्रप्रकाराशी जोडलेले अनेक संकेत त्यात पाहायला मिळतात. प्रगतीच्या प्रतीक्षेत असणारं छोटेखानी गाव, तिथल्या जनतेचं चोर लुटारूंपासून रक्षण करणारा, कायद्याने चालणारा, आदर्शवादी नायक, नायकाचा बदला घेण्यासाठी येणारा क्रूरकर्मा खलनायक, नायक अन् खलनायकाच्या आमनेसामने होणा-या संघर्षावर येणारा शेवट, पोलीस चौकी, मद्यालय यासारखी परिचित स्थलयोजना अशा अनेक ओळखीच्या जागा घेत हा चित्रपट पुढे जातो. मात्र त्याचा प्रमुख उद्देश हा लोकांना आवडेलसं वेस्टर्न पडद्यावर आणण्याचा नाही, तर ओळखीच्या संकेतामधून प्रेक्षकाला गाफील ठेवण्याचा आहे.
त्या काळासाठी अन् वेस्टर्नसारख्या अभिजात, भव्य चित्रप्रकारासाठी यापूर्वी वापरली न गेलेली पहिली अन् उघडच लक्षात येणारी गोष्टं म्हणजे चित्रपटाचं `रिअल टाइम` असणं. चित्रपटाचा पंचाऐंशी मिनिटांचा कालावधी कथेतही तितकाच काळ व्यापतो. एका नाट्यपूर्ण संघर्षाशी जोडलेल्या प्रसंगाला तास- सव्वातास उरलेला असताना चित्रपट सुरू होतो, अन् प्रसंगाबरोबरच संपतो.
वेस्टर्नमधे नित्य हजेरी लावणा-या अ‍ॅक्शन प्रसंगांना, साहसदृश्यांना देखील शेवटच्या दहा पंधरा मिनीटातच जागा मिळते, कारण उरलेला पूर्ण चित्रपट हा त्या संघर्षाकडे नेणा-या, प्रामुख्याने संवादी, परंतु निश्चित युक्तीवाद मांडणा-या घटनांनी व्यापला जातो.
प्रत्यक्ष पाहता, इथला लढा आहे, तो गावचा शूर, सुस्वभावी मार्शल विल केन (गॅरी कूपर) आणि जेलमधून सुटून गावात परतणारा माथेफिरू गुन्हेगार फ्रॅन्क मिलर (इआन मॅकडोनल्ड) यांच्या मधला, परंतु चित्रपटाचा दृष्टिकोन संघर्षाचं स्वरूप बदलून टाकतो, आणि लढ्याला नैतिक स्वरूप आणून देतो.
चित्रपटाची सुरुवात होते, ती अशा चित्रपटांमधे नित्य आढळणा-या अन् प्रेक्षकाला चटकन आपली ओळख पटवून देणा-या तीन संशयास्पद व्यक्तिरेखांपासून. ज्या एका निर्जन ठिकाणी भेटतात अन् पुढे गावक-यांना आपला दरारा दाखवत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचतात. हे तिघं वाट पाहात असतात बारा वाजता स्टेशनवर अपेक्षित असलेल्या ट्रेनची, ज्यातून त्यांचा जुना सहकारी फ्रॅन्क मिलर परतेल.
मिलरच्या अनपेक्षित आगमनाची खबर नुकत्याच लग्न झालेल्या केनपर्यंत पोहोचते, अन् आपल्या नववधूच्या, एमिच्या (ग्रेस केली) मताची पर्वा न करता, तो मिलरशी सामना देण्याचं ठरवतो. खरं तर लग्नाबरोबरच निवृत्ती स्वीकारलेल्या, मार्शलला पुन्हा ही जबाबदारी स्वीकारण्याची सक्ती नसते, मात्र तो ही आपली जबाबदारी मानतो. गावक-यांनी मदत केली, तर मिलरचा बंदोबस्त करणं काही कठीण नसतं, पण आत्तापर्यंत केनला मित्र म्हणवणारे अन् त्याच्या कारकीर्दीचं कौतुक करणारे गावकरी केनच्या (खरं तर केन हा गावाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्या स्वतःच्याच) मदतीला येणं नाकारतात, आणि केन एकटा पडतो. प्रत्यक्ष मिलरची गाडी स्टेशनात येईपर्यंत उलगडत जाणारा चित्रपट हा केनची द्विधा मनःस्थिती अन् आपल्या माणसांकडून होणारा विश्वासघात यावर बेतलेला आहे. यात केनची बाजू, त्याच्या विरोधात अन् क्वचित बाजूने मांडले जाणारे युक्तीवाद याला सर्वाधिक महत्व आहे. शेवटी मिलरशी होणारी मारामारी ही नाममात्र आहे. चित्रपटाचा शेवटदेखील नायकाचा विजय अशा अपेक्षित सुखांत शेवटावर संपत नाही, तर मार्शलने आपल्या बिल्ल्याला धुळीत फेकण्यावर होतो. केनचा इथे व्यक्त होणारा उद्वेग हा चित्रपटाच्या आशयाला टोकदारपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो.
`हाय नून` प्रदर्शित होईपर्यंत काळ्या-पांढ-याची सवय असलेल्या प्रेक्षकांना इथल्या ग्रे-शेड्स खटकल्या यात आश्चर्य नाही. ओळखीच्या फॉर्मचं वेगळंच काही सांगण्यासाठी वापरलं जाणं अनेकांना मंजूर झालं नाही. प्रेक्षकांना, तसंच चित्रपटसृष्टीतल्या अनेकांना देखील.
उत्तम वेस्टर्नपटांसाठी ओळखली जाणारी दोन नावं या टीकेत पुढे होती. पहिला होता अभिनेता जॉन वेन, ज्याने प्लेबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत हाय नूनला `अन अमेरिकन` असं संबोधलं, तर दुसरा होता दिग्दर्शक हॉवर्ड हॉक्स, ज्याने `हाय नून`ला उत्तर म्हणून १९५९ मधे `रिओ ब्राव्हो` बनविला. ब्राव्होमधल्या स्टॅन्ड ऑफचा प्रकार हाय नूनच्याच पद्धतीचा, मात्र त्यात नायकाला एकटं पाडलं जात नाही.
एका दृष्टीने पाहायला गेलं, तर हाय नून हा मुळात वेस्टर्न चित्रपटच नाही. तो विशिष्ट पार्श्वभूमी वापरत असला, तरी त्याचा आशय अधिक गुंतागुंतीचा आहे, त्याची शैली संवादाना अँक्शनहून अधिक प्राधान्य देणारी आहे. आपला आशय पोहोचविण्याची त्यांची पद्धत स्पष्ट, अन् खरोखरीच एखाद्या युक्तीवादासारखी आहे. उदाहरणार्थ केन जेव्हा गाव सोडून जायचं नाकारतो, तेव्हा तो आपल्या अशा वागण्याचं मुद्देसूद उत्तर एमीला देतो. पुढे जेव्हा गावकरी त्याला मदत नाकारतात, तेव्हाही ते आपली बाजू विविध प्रकारे सिद्ध करतात.
केनची बाजू वरवर बरोबर असली, तरी अंतिमतः त्याचं वागणं गावाच्या अन् गावक-यांच्या हीताचं नाही, असं गावक-यांचं म्हणणं. ते एखाद्या प्रसंगात ढोबळ कारणं मांडून आपटता येणं शक्य होतं, पण इथे या प्रश्नाचा तपशीलात विचार होतो. व्यापार, कायदा, धर्म आणि समाज या सा-यांची साक्ष विविध प्रसंगात काढली जाते, अन् केनला दर प्रसंगी निरुत्तर केलं जातं. चित्रपटाच्या दृष्टीने केनचं वागणं योग्य आहे, कारण तो आपलं वागणं नैतिक बाजूने पाहून आपल्या मनाला पटेल तो निर्णय घेतो. इतर लोक केवळ आपला स्वार्थ, तोही तत्कालिन स्वरूपाचा स्वार्थ पाहातात. आपल्या वागण्याचे पुढे होणारे दुष्परिणाम त्यांना दिसत नाहीत. त्यांची हीच चूक चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न करतो.
दिग्दर्शक फ्रेड झिनमन आणि `हाय नून`चा अजेंडा हा काहीसा राजकीय असल्याचं मानलं जातं, अन् ते काही खोटं नाही. सिनेटर जो मॅकार्थींच्या काळात योग्य त्या पुराव्याशिवाय अनेक अमेरिकन नागरिकांवर कम्युनिस्ट असल्याचा आळ आणला गेला, अन् त्यांना एकटं पाडून चौकशी केली गेली. मित्रांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडण्यात आलं. हॉलीवूडमधेही अनेकांना अन अमेरिकन गोष्टीत गुंतल्याच्या सबबीवरून ब्लॅकलिस्ट केलं गेलं. हाय नून चा रोख हा स्वार्थाच्या राजकारणावर आहे, जे माणसाची किंमत, मूल्य,नीतीमत्ता न जाणता केवळ वैयक्तिक फायद्यासाठी दुस-याला अडचणीत आणायला कमी करीत नाही.
हाय नूनला गॅरी कूपरसह चार ऑस्कर पारितोषिकं मिळाली आणि कालांतराने प्रेक्षकांनाही त्याची खरी किंमत कळायला लागली. राजकीय प्रतिष्ठाही त्याने मिळविली, कारण अनेक राष्ट्राध्यक्षांचा आवडता, अन् व्हाईट हाऊसमध्ये सर्वाधिक वेळा दाखविण्यात आलेला चित्रपट ही आज त्याची दुसरी ओळख आहे. माझ्या दृष्टीने मात्र त्याला सर्वाधिक श्रेय द्यायला हवं, ते त्याच्या संकेताच्या चौकटीत न अडकणा-या विचारासाठी. त्याचं फॉर्मची लवचिकता ओळखणं, हे पुढे येणा-या दिग्दर्शकांना प्रेरणादायी ठरलं असेल यात शंका नाही.
- गणेश मतकरी 

Read more...

'मिशन :इम्पॉसिबल - घोस्ट प्रोटोकॉल’ - ए क्लोज सेकन्ड

>> Sunday, December 18, 2011

माझ्या आठवणीप्रमाणे , जेव्हा 'मिशन :इम्पॉसिबल' ने मोठ्या पडद्यावर प्रथमावतार घेतला , तेव्हा त्याच्या गुणवत्तेबद्दल एकमत नव्हतं. ब्रायन डि पामाने दिग्दर्शित केलेल्या या भागाची गुंतागुत अनेकांना संभ्रमात पाडून गेली आणि मुळात अ‍ॅक्शन-थ्रिलर असून प्रेक्षकाला सतत विचार करता ठेवणारा हा चित्रपट कारण नसताना अनाकलनीय ठरवला गेला. अर्थातच समाधानकारक कमाई करुन आणि मध्यंतरी चित्रपटाला कल्ट स्टेटस मिळूनही, चार पाच वर्षांनंतर जेव्हा सीक्वलचा विचार झाला , तेव्हा वेगळ्या दिग्दर्शकाचं नाव पुढे आलं.हा नवा चित्रपट चालूनही पुढे इतर काही मुद्दे निघाले, अन पुढल्या भागासाठी पुन्हा दिग्दर्शक बदलण्यात आला. चार वेगवेगळ्या पण चांगल्या दिग्दर्शकांनी आपापल्या शैलीचे विशेष जपत केलेलं दर्जेदार काम म्हणून ’एलिअन’ मालिकेखालोखाल (रिडली स्कॉट, जेम्स कॅमेरॉन, फिंचर आणि जोने) ’मिशन :इम्पॉसिबल’चच नाव घेता येइल. इथे पामानंतर आलेले दिग्दर्शक होते जपानी अ‍ॅक्शनपटांच्या यशानंतर हॉलीवूडमधे आपलं स्थान बनवणारा जॉन वू, न्यू एज थ्रिलर्सवर आपला ठसा उमटवणारा जे जे एब्रॅम्स आणि आता ,पिक्सारच्या ’ दि इन्क्रीडिबल्स’ , रॅटॅटूइ’ सारख्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटांसाठी वाखाणला गेलेला ब्रॅड बर्ड.
पहिल्या तीन्ही भागात मला वैयक्तिकदृष्ट्या सर्वात आवडला होता तो पहिलाच भाग, आणि तोदेखील केवळ पटकथेसाठी नाही. सुरुवातीच्या फसलेल्या मिशनपासून अखेरच्या ट्रेन सीक्वेन्सपर्यंत अनेक संस्मरणीय प्रसंगमालिका या भागात होत्या ज्यानी चित्रपटाचा परिणाम सतत चढता ठेवला होता.मूळ टि.व्ही. मालिकेला अनेक वर्ष उलटूनही नव्या प्रेक्षकासाठी या संकल्पनेचं पुनरुज्जीवन करण्याचं काम यात सफाइने करण्यात आलं होतं.
बर्डच्या चित्रपटाच्या घोषणेनंतर आणि त्याच्या दृश्यफिती पाहायला मिळाल्यानंतर मात्र हा चौथा भाग अधिक वरचढ ठरण्याची उघड दिसायला लागली.दृश्य परिमाण हा अ‍ॅ   अ‍ॅनिमेशन चित्रपटांचा स्ट्राँग पॉईंट असतो, आणि बर्डने आपली या विषयातली तयारी आधीच सिध्द केलेली आहे. त्या तयारीकडे पाहूनही MI-4 या मालिकेतलं महत्वाचं नाव ठरणार अशीच लक्षणं दिसत होती. हा अंदाज पूर्ण खरा ठरला असं मात्रं नाही.
मिशन इम्पॉसिबल मालिका ब-याच प्रमाणात बॉन्ड चित्रपटांच्या जातकुळीची आहे.  इथन हन्ट अन जेम्स बॉन्ड या व्यक्तिरेखा सारख्या वजनाच्या तर आहेतच वर त्यांचे गुणावगुणही बॉन्डचं वुमना़यजिंग सोडता बरेच एकसारखे आहेत. (क्रेग असणा-या बॉन्डपटात हा गुणधर्मही कमी झाल्याने साम्यदेखील वाढलेलं .) त्याखेरीज हेरगिरी संबंधातलं कथानक, देशोदेशी घडणारं, त्या ,त्या देशांच्या विशेषांना एकत्र आणणारे अ‍ॅक्शन सीक्वेन्स, मारामा-यांमधे नायकाला तुल्यबळ असणा-या नायिका, जगावर ताबा मिळवू पाहाणारे चक्रम खलनायक हे सारं दोन्हीकडे आढळतं. तरीही ,कथासूत्राच्या दृष्टीने दिसणारा एक मुख्य फरक म्हणजे हन्टवर येणारं संकट हे अधिक व्यक्तिगत स्वरुपाचं , त्याला वा त्याच्या जवळच्याना जीवावरच्या संकटात लोटणारं असतं. मिशन्स या बहुधा पार्श्वभूमीसारख्या वापरल्या जातात. बॉन्डचं साहस मात्र ब-याच प्रमाणात कामगिरीच्या स्वरुपातच राहातं. या भागात, घोस्ट प्रोटोकॉलमधेही हन्टवर मिशन सोपवली जाते खरी, पण लवकरच तो आणि त्याचे सहकारी आपला जीव आणि आपलं नाव , या दोन गोष्टींसाठीच झगडताना दिसतात.
रशियन जेलमधे अडकलेल्या हन्टला (अर्थात टॉम क्रूज), जेन (पॉला पॅटन) आणि हन्टचा जुना सहकारी बेन्जी (सायमन पेग) सोडवतात . त्यांच्यासह थेट क्रेमलिनमधे पोचल्यावर या त्रिकूटाला अडचणीत आणलं जातं, आणि तिथे  झालेल्या स्फोटासाठी अपराधी ठरवलं जातं. काहीशा विचित्र परिस्थितीतच त्याना आणखी एक एजन्ट येउन मिळतो,  तो म्हणजे ब्रॅन्ट (हर्ट लॉकरसाठी ऑस्करप्राप्त ठरलेला जेरेमी रेनर), आणि सारेजण अणुयुध्दाच्या पुरस्कर्त्या हेन्ड्रीक्सच्या ( सध्या डेव्हीड फिंचर रिमेक करत असलेल्या ’गर्ल विथ ए ड्रॅगन टॅटू’ च्या मूळ स्वीडीश चित्रपटाचा नायक मायकेल निक्वीस्ट. गंमत म्हणजे त्याच चित्रपटाची नायिका नूमी रापेस देखील नुकत्या प्रदर्शित झालेल्या अशाच दुस-या मोठ्या फ्रँचाइजमधे , शेरलॉक होम्समधे हजेरी लावून आहे. फिंचरने मात्र या दोन्ही भूमिकांमधे वेगळ्या कलावंताना घेतलंय) मागे लागतात.
जवळपास दोन तृतियांश चित्रपट, म्हणजे रशिया आणि दुबई मधे घडणारा भाग , हा फ्रँचाइजला केवळ शोभणाराच नाही ,तर एका वेगळ्या उंचीवर नेणारा आहे. खासकरुन जगातल्या सर्वात उंच इमारतीबाहेर, दुबईच्या बुर्ज कलीफाबाहेर लटकण्याचा पैसे वसूल सीक्वेन्स, त्यानंतरचा MI स्टाईल शोडाउन आणि वादळ हा भाग तर मालिकेतल्या सर्वोत्कृष्ट प्रसंगातला एक म्हणावा लागेल,मात्र तिथून मंडळी मुंबईचं विमान पकडतात आणि चित्रपट घसरायला लागतो.
थ्रिलर चित्रपटाचा परिणाम टिकवायचा तर त्याचा आलेख चढता असावा लागतो. आणि त्याची अखेर ही त्या चित्रपटाच्या उत्कर्षबिंदूवर व्हावी लागते. या महत्वाच्या अलिखीत नियमाचा MI4 भंग करतो जेव्हा तो तथाकथित मुंबईतल्या स्त्रीलंपट उमरावाच्या (अनिल कपूर) नादी लागतो. आपल्या मिडीआने कपूरची यथेच्छ आणि रास्त टिंगल केली यात आश्चर्य नाही. स्लमडॉग आणि 24 मालिकेतल्या महत्वाच्या भूमिकांनंतर ही क्षुल्लक आणि कन्वेन्शनल भूमिका कशीतरीच वाटते. अर्थात ती स्वीकारण्यामागचं कारण पब्लिक रिलेशन हेच असणार यात शंका नाही. अशा चित्रपटात स्टिरीओटाईप्स असणार हे आपण गृहीत धरतो, त्यामुळे अभिनेत्याचा वापर न  होणं हा दोष फार मोठा नाही. मोठा दोष आहे तो या भागातली अ‍ॅक्शन देखील प्रभावी नाही ,हा.त्यातल्या त्यात ’मॉन्स्टर्स इन्क’ चित्रपटाच्या शेवटाची आठवण करुन देणारा पार्किंग लॉट प्रसंग गोष्टी किंचित मार्गी लावतो.
MI4 चा एक उल्लेखनीय भाग म्हणजे त्यांचा मालिकेच्या स्वरुपात बदल घडवण्याचा प्रयत्न. तंत्रज्ञानाची किमया, मिसडिरेक्शन (अनेकदा मुखवट्याच्या मदतीने केलेलं) हे इथे नित्य पाहायला मिळत असे. इथे ते कमी करण्यात किंवा गाळण्यात आलंय. किंबहूना, तंत्रज्ञान फसणं ही इथली महत्वाची थीम मानता येईल. सुरुवातीला फोनमधला मेसेज सेल्फ डिस्ट्रक्ट नं होण्यापासून अशा प्रसंगांची मालिका सुरु होते ,ती अखेरपर्यंत. ट्रेनमधे चढतानाचा रेटीना स्कॅनचा गोंधळ, दुबई सीक्वेन्स मधे काचेवर चढण्यासाठी वापरलेल्या हातमोज्याचं बंद पडणं, मुंबईत ब्रॅन्टला उडवणा-या चुंबकाची वाताहात ,हे सारं त्याकडे निर्दश करतं. त्याचाच एक भाग म्हणून मुखवटेही बनू शकत नाहीत अन MI चित्रपट प्रथमच मुखवटाविरहीत होतो. क्रूजला तुल्यबल असा दुसरा नायक प्रथमच उभा राहातो तो रेनरच्या रुपात, ज्यामुळे पन्नाशी गाठलेल्या क्रूजचा नजिकच्या भविष्यात अ‍ॅक्शन भूमिकांतून निवृत्तीचा विचार असावा की काय , असा एक नवाच प्रश्न तयार होतो.
हे सारं लक्षवेधी असूनही, अन दिग्दर्शक बर्डचं लाइव्ह अ‍ॅक्शन करिअर निश्चित होउनही , शेवटच्या भागाचा दुबळेपणा चित्रपटाला खाली खेचतो अन आधी वाटल्याप्रमाणे तो मालिकेतला सर्वोत्कृष्ट काही ठरू शकत नाही. तो किताब अजूनही ब्रायन डी पामाकडेच राहातो, पहिल्या MI साठी.
- गणेश मतकरी 

Read more...

द वेजेस ऑफ फिअर - अनपेक्षित थ्रिलर

>> Sunday, December 11, 2011

अ‍ॅक्शन थ्रिलर्सनी गरजेपुरती प्रस्तावना मांडून लगेचच मुख्य कथानकाला हात घालावा, असा संकेत आहे. थ्रिलर्समधे गाड्या वापरल्या तर त्या गतीमान असाव्यात अन् अनेक नेत्रसुखद दृश्यांची सोय त्यांनी करावी असा संकेत आहे. या प्रकारच्या चित्रपटांचा मुख्य हेतू हा करमणूक असल्याने वास्तववादी मांडणी किंवा विश्वसनीय व्यक्तिरेखा त्यात असण्याची गरज नाही, असाही एक संकेत आहे. मात्र उत्तम चित्रपट हे नेहमीच संकेत पाळतात असं कुठे आहे ? किंबहूना ब-याचदा या चित्रपटांची अनपेक्षितता, हाच त्यांचा विशेष ठरताना आपल्याला दिसून येते.
काही अभ्यासकांच्या मते नववास्तववादाची सुरुवात मानला गेलेल्या लुचिनो विस्कोन्तीच्या `ओसेसिओने`चा अपवाद वगळता वास्तव पार्श्वभूमी असणारे थ्रिलर्स क्वचितच पाहायला मिळतात. मुळात ओसेसिओनेदेखील जेम्स एम केनच्या `पोस्टमन ऑलवेज रिंग्ज ट्वाईस`वर आधारित होता, जी मुळात वास्तववादी नव्हती, पण त्या विशिष्ट काळातल्या तरुण इटालियन दिग्दर्शकांमध्ये जी आपल्या भोवतालच्या परिस्थितीला चित्रपटांत प्रतिबिंबित करण्याची निकड तयार झाली होती, त्यातून चित्रपटापुरती ती पार्श्वभूमी तयार झाली. हेन्री-जॉर्ज क्लूजोच्या `द वेजेस ऑफ फिअर`मधे मात्र ती कृत्रिमरीत्या आणली गेलेली नाही. साऊथ अमेरिकेत काही काळ वास्तव्य केलेल्या अन् तिथल्या परिस्थितीशी परिचीत असणा-या जॉर्ज अरनॉ यांच्या कादंबरीचा त्याला आधार आहे. कादंबरीचं मुख्य कथानक कल्पित असलं, तरी त्या काळाचं, त्या समाजाचं आपल्यापुढे येणारं चित्र खोटं नाही. अन् त्यापलीकडे जाऊन पाहायचं, तर अमेरिकन भांडवलशाहीबद्दलची त्यातली टीका तर आजदेखील पटेलशीच म्हणावी लागेल.
क्लूजोची कीर्ती ही फ्रान्सचा `हिचकॉक` अशी आहे. अन् या विधानाचा खरेपणा पटवून देणा-या दोन चित्रपटांमधला एक म्हणून  `द वेजेस ऑफ फिअर`चं नाव घेता येईल, दुसरा अर्थातच १९५५चा  `डिआबोलिक`. डिआबोलिकचं कथानक हे साधारण हिचकॉकिअन प्रकारचं आहे. (किंबहूना क्लूजोने या पटकथेचे हक्क हिचकॉकशी स्पर्धा करून मिळविले असं म्हणतात.) पण रहस्य, ताण, पुढे काय घडणार याची उत्कंठा हे सारं असूनही  `द वेजेस ऑफ फिअर` मात्र थोडा वेगळ्या प्रकारचा आहे.
दोन तास चाळीस मिनिटं चालणा-या या चित्रपटाचा जवळजवळ पहिला एक तास हा सेटअपसाठी ठेवलेला आहे. म्हणजे मुख्य कथानक इथे सुरू होत नाही, पण ते परिणामकारक ठरण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी इथे तयार केली जाते. व्यक्तिरेखांची ओळख करून दिली जाते. त्यांच्या अडचणी सांगितल्या जातात. त्यांचे एकमेकांबरोबरचे संबंध दाखवून दिले जातात. पुढल्या भागात त्या जी जोखीम स्वीकारणार आहेत, ती स्वीकारण्यामागची कारणं आपल्याला पटतीलशा पद्धतीने मांडली जातात. एका परीने हा भाग जवळजवळ पुढल्या भागाइतकाच महत्त्वाचा आहे, कारण परिस्थितीचं गांभीर्य तर इथे आपल्याला दाखवलं जातंच, वर त्यातल्या आशयाला एक सामाजिक, राजकीय चौकट मिळते. गोष्टीला एक कॉन्टेक्स्ट मिळतो. ज्यामुळे पुढला प्रत्यक्ष अ‍ॅक्शनचा भागदेखील एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाणं शक्य होतं.
वेजेस ऑफ फिअर घडतो, तो साऊथ अमेरिकेतल्या एका छोट्या गावात, जिथे एका मोठ्या तेल कंपनीखेरीज इतर कोणताच उद्योग नाही. तेल कंपनी अमेरिकन, स्टॅन्डर्ड ऑईल या कंपनीची आठवण करून देणारी. काही ना काही कारणाने गावात आलेले अनेक परदेशी नागरिक इथे अडकून पडलेले आहेत. गावात एअरपोर्ट आहे, पण विमानाचं तिकीट कोणाला परवडत नाही. गावात कामधंदाच नसल्याने पैसा मिळविण्याची देखील शक्यता नाही. ही सारी मंडळी गावातल्याच एका हॉटेलच्या आसपास राहतात, अन् मिळेल ती कामं करतात, मारिओ (इव्ज मोन्तान) आणि जो (चार्ल्स वॅनेल) देखील यातलेच. काही अंतरावरल्या तेल कंपनीच्या विहिरीत एकाएकी प्रचंड आग लागते आणि आणिबाणीची परिस्थिती तयार होते. ही आग विझवायला अत्यंत विस्फोटक असणारं नायट्रोग्लिसरीन उपयोगी पडणार असतं. पै पैचा हिशेब करणारे अमेरिक हे रसायन वाहून नेण्याच्या कामासाठी आपले ड्रायव्हर्स वापरणं शक्य नसतं, कारण खराब रस्ते अन् कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसणारे ट्रक्स, यामुळे अपघात हा निश्चित असतो.
मग एका मोठ्या रकमेचं आमिश दाखवून विदेशी नागरिकांना पाचारण केलं जातं, भीती वाटत असूनही अनेक जण तयार होतात, कारण हाच एक सुटकेचा मार्ग असतो. जिवंत राहिल्यास विमानाने, अन्यथा मृत्यू हीच सुटका. अखेर निवड होते, ती मारिओ, जो, मारिओचा आनंदी, पण सिमेंटच्या कारखान्यात काम करून आजाराने त्रासलेला रुममेट लुइगी आणि शांत स्वभावाचा पण अस्वस्थ बिम्बा या चौघांची. दोन ट्रक्समधे बसून दोन जोड्या या अतिशय बिकट प्रवासाला निघतात. असा प्रवास जो निदान यातल्या एका जो़डीसाठी तरी नक्कीच प्राणघातक ठरेल.
अ‍ॅक्शन सीक्वेन्स म्हणजे भरधाव गाड्या या समीकरणावर पोसलेल्या प्रेक्षकासाठी हा एक वेगळा अनुभव ठरावा, कारण यात अखेरच्या प्रवासावर निघालेले हे दोन ट्रक मुळातच भऱधाव जाऊ शकत नाहीत. एखादा खाचखळगा, जोरात दाबलेला ब्रेक, थोडीशी घाई यातली कोणतीही गोष्ट नायट्रोग्लिसरीनचा स्फोट होण्यासाठी पुरेशी असल्याचं भान या प्रवाशांना ठेवणं भागच आहे. त्यामुळे बराचसा प्रवास हा डोक्यावरला ताण संभाषणाच्या आड लपवत, क्षणाक्षणाला अधिकच गंभीर होत केला गेलेला आहे. दिग्दर्शक देखील आपल्याला पात्रांच्या बरोबरीने त्यांच्या बंदिस्त बसायच्या जागेत नेऊन पोहोचवतो अन् नाट्य रंगायला लागतं.मात्र केवळ संवादच हे नाट्य रंगवतात असं नाही, तर या ड्रायव्हर्सपुढे प्रत्यक्ष येऊन ठाकणा-या अडचणी देखील पुरेशा श्वास रोखायला लावणा-या आहेत. खासकरून एका खोल दरीवर उभारलेल्या तकलादू जुन्या लाकडी प्लॅटफॉर्मवरून होणारा दोन्ही ट्रक्सचा प्रवास अन् मारिओ/जोच्या ट्रकला एका तेलानं भरलेल्या उथळ डबक्यात करावं लागणारं दिव्य, हे प्रसंग खास उल्लेख करण्यासाऱखे.
अ‍ॅक्शन थ्रिलर्सनी आपल्याला आणखी एक वाईट सवय लावलेली आहे, आणि ती म्हणजे सोप्या मांडणीची, अन् चटकन पटणा-या, शक्यतर सुखांत शेवटाची अपेक्षा कऱण्याची. अर्थात मुळातंच या चित्रप्रकारात अविश्वसनीय गोष्टी मुबलक प्रमाणात असल्याने, अन् त्यातल्या बहुतेक गोष्टींशी नायक सहजी लढत असल्याने शेवटालाही त्याने विजयी होणं, एका परीने तर्कशुद्धच म्हणावं लागेल. वेजेस ऑफ फिअरमधे मुळात नायक कोण, इथपासून सुरुवात करावी लागेल. भूमिकेची लांबी पाहता, मारिओ हा नायक, किंवा प्रोटॅगनिस्ट म्हणून अधिक पटण्याजोगा. त्यात त्याला एक किंचित नायिकादेखील (व्हेरा, क्लूजोची पत्नी) दिलेली. मात्र वरवर पाहाता या चारही प्रमुख पात्रांत भेदभाव कऱणं कठीण आहे. प्रत्येकाला आपल्या अडचणी आहेत, आपला दृष्टिकोन आहे, कोणीही भाबडा नाही. उलट प्रत्येकजण निर्ढावलेला आहे. त्यामुळे गोष्ट आहे ती चौघांची, एकट्या दुकट्याची नव्हे. पण हे लक्षात घेऊन अन् चौघातला एकच जण प्रवासाच्या अंतापर्यंत पोहोचेल, असं पाहून देखील दिग्दर्शकांचं समाधान होत नाही. या अखेरचाच्या विजयाचा आंनंददेखील फार काळ टिकू द्यावा असं त्याला वाटत नाही.
द वेजेस ऑफ फिअरमधे `मृत्यू` या संकल्पनेला फार महत्व आहे, आणि सुरुवातीपासून अखेरपर्यंत या मृत्यूची छाया चित्रपटावर पसरलेली आहे. माणसाच्या आयुष्यात तेवढ्यापुरते चढउतार असले, तरी शेवटी मृत्यू हा सर्वांना समान दर्जावर आणतो, असा यामागचा दृष्टिकोन आहे. त्यासाठी चित्रपट इतर दुय्यम पात्रांचीही मदत घेतो. आगीमुळे अपघातात झालेले मृत्यू, मृत्यूची जवळजवळ खात्री असणारं ड्रायव्हरचं काम हातचं गेल्याने एका पात्राने केलेली आत्महत्या, लुइगीचं एका प्रकारच्या मरणाऐवजी दुसरं पत्करणं अशा विविध पातळ्यांवर अशा विविध पातळ्यांवर चित्रपट मृत्यूचं सार्वभौत्व मांडत राहतो. शेवटाने त्यावर शिक्कामोर्तब होतं इतकंच.
जवळजवळ याच प्रकारचा युक्तीवाद आपल्याला मृत्यूऐवजी `दैव` या संकल्पनेसाठी देखील करता येईल. `फ्रेन्च कनेक्शन`, `द एक्झॉर्सिस्ट`सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक विलिअम फ्रिडकीन याने द वेजेस ऑफ फिअरचं दुसरं इंग्रजी रुपांतर `सॉर्सरर` (१९७७) करतेवेळी तो केला देखील. त्याच्या चित्रपटातल्या एका ट्रकचं नाव `सॉर्सरर` आहे, मात्र सॉर्सररची/जादुगाराची प्रतिमा त्याने  `दैव` अशा अर्थी वापरली आहे. असं दैव, की ज्यापासून कोणीही सुरक्षित नाही. आपण सारीच त्याच्या हातची बाहुली आहोत. वेजेससारख्या लॅन्डमार्क चित्रपटावर आधारित असून अन् स्वतंत्रपणेही एक चांगला चित्रपट असूनही,  `सॉर्सरर` बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. का? तर त्याच्या प्रदर्शनाच्या काही काळ आधी झळकलेल्या स्टार वॉर्सने चित्रपटाची सारी गणितच बदलून टाकली होती. हादेखील दैवाचाच खेळ, दुसरं काय?
- गणेश मतकरी 

Read more...

'द डर्टी पिक्चर'- विद्या बालन आणि करमणूकीचा अट्टाहास

>> Sunday, December 4, 2011

सामान्यत: मी अभिनयाविषयी लिहीण्याचं टाळतो. एकतर ब-याच अंशी अभिनय हा 'what you see is what you get 'या प्रकारचा असतो आणि त्यावर खूप लिहीलं जातं. सर्वसाधारण प्रेक्षक चित्रपटाला गेल्यावर फार विचार न करताही ज्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकतो त्यातलीच ही एक गोष्टं असते. चांगल्या भूमिकेत अभिनयाचा कस लागतो, हे तर खरच. पण काही अनपेक्षित गेम चेन्जिंग परफॉरमन्स सोडले तर त्यावर फार काही लिहिण्याची मला गरज वाटत नाही. विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर'मधला अभिनय तिचं आजवरचं काम आणि क्षमता पाहाता अनपेक्षित नक्कीच नाही, मात्र गेम चेंजिंग जरुर आहे.
'परिणीता' या पहील्याच, अन इतर दोन मोठे स्टार्स असूनही हिरॉइनसेन्ट्रीक असलेल्या चित्रपटापासूनच बालनचं नाव झालं हे खरं पण २०१० च्या 'इश्कीया' पासून तिने आपल्या कामाच्या पध्दतीत अन चित्रपटांच्या निवडीत महत्वाचा बदल केल्याचं दिसून येतं.प्रतिमेच्या मर्यादेत राहून हातचा प्रेक्षक टिकवण्याच्या धडपडीत असणा-या ( आमिर खान इन्क्लूडेड) स्टार्सच्या जगात तिने केवळ आपल्याला आव्हानात्मक वाटतील अशाच भूमिका निवडायला सुरुवात केली आहे, मग प्रतिमा टिकली नाही तरी चालेल. स्टार होण्यापेक्षा चांगली अभिनेत्री होणं हे तिला महत्वाचं वाटतं आहे. इश्कीया नंतर तिने ' नो वन किल्ड जेसिका' मधली अनग्लॅमरस आणि राणी मुखर्जी बरोबर विभागली जाणारी भूमिका निवडणं, अन आता डर्टी पिक्चर पाहून हे स्पष्ट होतं. तिचा आगामी चित्रपट 'कहानी' टेरेन्टीनोच्या ' किल-बिल' वर आहे असं म्हणतात. असल्यास ही निवडदेखील त्याच सूत्रात बसवता येईल.
'द डर्टी पिक्चर'मधली भूमिका ही नायिकेचीच असली आणि दुस-या एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यावर ब-याच प्रमाणात आधारलेली असली तरी ती स्वीकारणं हे धाडसाचंच काम म्हणावं लागेल. माफक प्रमाणात अंगप्रदर्शन (तेही ग्लॅमरस, सौंदर्याला उठाव देईल अशा प्रकारचं नव्हे) , वजन वाढवून १९८० च्या सुमारास दाक्षिणात्यं चित्रपटात लोकप्रिय असणारे भडक (पण तथाकथित सेक्सी) कपडे घालणं, द्व्यर्थी संवाद हे केवळ तिच्या प्रतिमेशी सुसंगत नाहीत, एवढच नाही ,तर ते तिची दुसरी , चुकीची प्रतिमा तयार करण्याची शक्यता असणारे. त्यात मुळात आयकॉनिक असणा-या सिल्क स्मिथाला ह्यूमनाइज करणंदेखील सोपं नाही.विद्या बालन हे करुन दाखवते. त्यातले धोके पत्करुन, आपल्या आजवरच्या कामातलं सर्वात मोठं आव्हान पेलून दाखवते. केवळ तिच्या कामासाठी 'द डर्टी पिक्चर'पाहाणं हे भाग ठरतं. कारण शेवटी या चित्रपटाची गुणवत्ता ही त्यातल्या प्रमुख अभिनेत्रीच्या तोडीची ठरत नाही.
मला वाटतं चित्रपटाचा प्रमुख दोष हा त्यातच मांडल्या गेलेल्या एका युक्तीवादात दडलेला आहे . चित्रपटातली सिल्क (बालन) , एब्राहम (इम्रान हाश्मी) या आर्टी दिग्दर्शकाला सांगते ,की प्रेक्षक चित्रपटाकडून तीन गोष्टींची अपेक्षा करतात ,' एन्टरटेनमेन्ट,एन्टरटेनमेन्ट आणि एन्टरटेनमेन्ट', अन पुढे एब्राहमदेखील हाच मंत्र इतर कोणाला तरी सांगतो.या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा , मिलन लुथरीयाचा, यावर खूप विश्वास असावा. त्यामुळे चित्रपट उद्योगाची काळी बाजू ,आणि एका अभिनेत्रीचा उदयास्त अशा गंभीर आणि अस्वस्थ करणा-या विषयावरचा हा चित्रपटदेखील सर्व वेळ आपल्या प्रेक्षकाला 'एन्टरटेन' करण्याचा प्रयत्न करतच राहातो.
रुप किंवा अभिनय यातली कुठलीच बाजू हा सिल्क स्मिथाचा स्ट्राँग पॉइंट नव्हता.तिची खासियत होती तिचा निर्भीडपणा आणि यशासाठी काहीही करण्याची तयारी. बिनधास्तपणा आणि अंगप्रदर्शनाची तयारी हा तिने आपला USP बनवला. याने तिला चित्रपट जरुर मिळाले पण फिल्म इंडस्ट्रीने तिचा गैरफायदा घेतला. पडत्या काळात तिने निर्माती होण्याचाही प्रयत्न केला ,जो यशस्वी झाला नाही. नैराश्य, पैशांची चणचण ,व्यसनाचा अतिरेक या सगळ्याच्या अतिरेकातून तिने वयाच्या पस्तिसाव्या वर्षी आत्महत्या केली.हा विषय आणि हे ढोबळ कथासूत्र प्रामाणिकपणे दाखवल्यास पारंपारिक अर्थाने एन्टरटेन करेल हे शक्य नाही आणि त्याची गरजदेखील नाही. प्रेक्षक काही केवळ अंगप्रदर्शन ,विनोद आणि गाणी याकडे आकर्षित होत नाहीत, चांगलं कथानक कितीही गंभीर असलं तरी त्याला बांधून ठेवतच. डर्टी पिक्चर्स मात्र हे मान्य करत नाही. किंबहूना या गोष्टींवर त्याचा इतका भर आहे की त्याला सुजाण ,दर्जा ओळखणारा प्रेक्षक अपेक्षित नसून मूळ सिल्क स्मिथाच्या चित्रपटांचा- गुणवत्तेपेक्षा नेत्रसुखाला प्राधान्य देणारा प्रेक्षकच अपेक्षित आहे की काय अशी शंका यावी.
चित्रपट बायोपिक स्वरुपाचा असला तरी ही चरित्राशी प्रामाणिक , आँथेन्टिक बायॉग्रफी नव्हे. वादांपासून दूर राहाणं, वास्तवापेक्षा सिल्कच्या प्रतिमेला चिकटून राहाणं, अन चित्रपटाला आपल्या वैयक्तिक 'एन्टरटेनमेन्ट'च्या कल्पनांप्रमाणे वळवणं ,या गोष्टी शक्य व्हाव्यात म्हणून चित्रपट स्वत:ला फिक्शनचं लेबल लावून घेतो आणि तपशिलात फेरफार करण्यासाठी मोकळा होतो . चित्रपट , आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावर आधारुन दोन किंवा तीन भागात विभागलेला आहे. उत्कर्ष आणि अधोगती असं पाहील्यास दोन किंवा प्रेमप्रकरणांच्या हिशेबाने तीन. मात्रं या तीनही प्रकरणांना ,का कोण जाणे ,पण एकाच माणसाचं निवेदन आहे. सिल्कशी लव्ह-हेट रिलेशनशिप असणा-या एब्राहमचं. का ,ते माहित नाही.चित्रपटाचा पाउण भाग एब्राहम तिचा दुस्वास करतो आणि तिच्या पडत्या काळात एकदम तिच्या प्रेमात पडतो. म्हणजे हा माणूस तिच्या जवळचा नाही. तिच्या व्यक्तिगत आयुष्याचे सारे तपशील त्याला माहीत असण्याचं कारण नाही. शेवटाकडे एका प्रसंगात त्यांच्या गप्पा होतात, पण त्या इतक्या तपशिलात जातीलसं वाटत नाही. शिवाय निवेदनातल्या नकारात्मक छटा प्रसंगात दिसत नाहीत.संहीता एका माणसाचा दृष्टीकोन न मांडता ,गोष्टं त्रयस्थपणेच मा़डते.  गावाकडून पळून आलेली सिल्क एका बोल्ड नृत्याचा आधार घेउन फिल्म इंडस्ट्रीमधे शिरकाव करते आणि लवकरच सूर्यकांत (नासीर) या वाढत्या वयाला  जुमानता तरुणांच्या भूमिका करणा-या नायकाच्या प्रेमात पडते. सूर्यकांत तिला इतर कामं मिळवून देतो, पण मोबदल्यात स्वत:चा खूप फायदा करुन घेतो.त्याच्याशी असणा-या संबंधातून भ्रमनिरास झाल्यावर सिल्क त्याच्या भावाच्या , रमाकांतच्या( तुषार) प्रेमात पडते, पण तिथेही तिच्या पदरी निराशाच येणार असते.
चित्रपटाचा बराच भाग चित्रपटसृष्टीची उणीदुणी काढण्यात जाताे मात्र ही उणीदुणी वरवरची , रोजचा पेपर वाचणा-या कोणालाही माहीत असतील अशा प्रकारची आहेत. कास्टींग काउच, भानगडी, लॉबीइंग यात नवीन काय आहे? झोया अख्तरने आपल्या 'लक बाय चान्स' मधली भ्रष्ट चित्रसृष्टी मांडताना दाखवलेली इनसाइट इथे पाहायला मिळत नाही. नाही म्हणायला एक निरीक्षण मात्र इन्टरेस्टींग आहे. डान्सर सिल्कची कामं जावीत म्हणून सूर्यकांत एका नव्या ट्रेन्डची कल्पना मांडतो, ज्यानुसार डान्सरकडून अपेक्षित सा-या गोष्टी नायिकेनेच कराव्यात , म्हणजे डान्सरची गरजच उरणार नाही.हा ट्रेन्ड चित्रपटात आला, हे तर खरच. किंबहुना डर्टी पिक्चर देखिल या ट्रेन्डचाच एक भाग म्हणावा लागेल.
काही अतिशय परिणामकारक प्रसंग असूनही , चित्रपटाचा उत्तरार्ध विस्कळीत होतो , तो सिल्कच्या अस्ताचा आलेख नीट नं मांडल्याने. करमणुक प्राधान्यामुळे हा भाग लांबणीवर टाकला जातो. परिणामी तो अचानक सुरु होतो, आणि त्रोटक होतो. तरीही यातल्या काही प्रसंगात बालन या शापित नायिकेचा आत्मा इतका अचूक पकडते , की आपण चित्रपटाचा करमणुकीचा अट्टाहास विसरतो.सिल्कच्या दु:खाशी समरस होतो. अखेर चित्रपटाला सावरतात ते हेच प्रसंग. त्यातलं दाक्षिणात्य चित्रपटांचं विडम्बन नाही, अश्लील वेषभूषा नाही किंवा गाणी नाहीत. या गोष्टी प्रेक्षकाला चित्रपटगृहापर्यंत खेचू शकतात . तिथून आपण काय परत न्यायचं ,हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.
- गणेश मतकरी 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP