स्टार ट्रेकची नवी भरारी

>> Friday, June 26, 2009

स्टार ट्रेकच्या आजवरच्या सर्व चित्रपटांना मिशनचं स्वरूप होतं. काही प्रमाणात ते इथंही आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन ही ओरिजिन स्टोरी आहे. स्टार ट्रेक ज्या हेतूनं नव्या भरारीला सिद्ध झालं, ते हेतू यशस्वी झाले आहेत यात शंका नाही. आपल्याकडचा प्रतिसाद गृहीत न धरताही ही निर्मिती यंदाच्या यशस्वी चित्रपटातली एक आहे.

भारतीय रसिक हा बहुतांशी वास्तववादाचा प्रेमी आहे. हा वास्तववाद म्हणजे न्यूजरील फूटेज किंवा इटालियन निओरिऍलिझमशी नातं सांगणारा थेट वास्तववाद नव्हे, तर अधिक लवचिक पद्धतीचा, सोपा करून सांगितलेला वास्तववाद. थोडक्‍यात सांगायचं, तर कोणतीही गोष्ट ऐकता-वाचताना, चित्रपटात पाहताना तिची मूळ चौकट परिचित, रोजच्या आयुष्यातली असणं ही आपली गरज आहे. एकदा ही बाह्य चौकट आखून घेतली की मग त्या चौकटीच्या आत कितीही कल्पनाविलास केलेला आपल्याला चालतो. उदाहरणार्थ, लोकप्रिय हिंदी चित्रपटातल्या व्यक्तिरेखाच घेऊ. त्या ओळखीच्या जगात वावरणाऱ्या, ओळखीचे व्यवसाय करणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्याची, अधिक वरच्या पट्टीतली आवृत्ती असल्या की आपलं भागतं. मग या तथाकथित वास्तवाचा आभास आणत त्यांनी कितीही तार्किक कोलांट्या मारलेल्या आपण चालवून घेऊ शकतो.
याउलट उघड "फॅन्टसी जॉनरं' मात्र आपण थेट नाकारतो तरी किंवा मुलांसाठीचा म्हणून त्याला एका सोयीस्कर लेबलाखाली टाकतो. परभाषीय साहित्य, चित्रपटांनाही आपण एका मर्यादेपलीकडे चालू देत नाही. त्यामुळेच आपल्या पुस्तकाच्या दुकानात वास्तवाचं सोंग आणून कल्पितकथा सांगणाऱ्या जेफ्री आर्चर किंवा जॉन ग्रिशमचा जेवढा खप संभवतो, तेवढा उघड कल्पित साहित्य असणाऱ्या फिलिप के. डिक किंवा स्टीफन किंगचा संभवत नाही. या दृष्टिकोनामुळे आपलं साहित्य, चित्रपट हेदेखील एका विशिष्ट प्रकारे, एका मर्यादित परिघात घडत आलेले आहेत. जी विविधता पाश्‍चात्त्य साहित्यात, चित्रपटांत पाहण्यात येते, ती आपल्याकडे आलेली दिसत नाही.
ही वास्तवापासून दूर जाणाऱ्या कलाकृतीना निकृष्ट ठरवण्याची, आपल्या व्यक्तिगत आवडीच्या तराजूतच त्यांना तोलून काढण्याची वृत्ती जर आपण बाजूला ठेवू शकलो, तर आपल्यासाठी कितीतरी नवी दालनं झटक्‍यात उघडतील.
हे सगळं आताच लिहायचं कारण म्हणजे "स्टार ट्रेक' चित्रपट आणि आपल्या तिकीट खिडकीवर त्याला मिळणारा जगभराच्या तुलनेत अल्प प्रतिसाद. खरं तर "स्टार ट्रेक' आपल्याला परिचित नाही असं मुळीच नाही. ओरिजिनल "स्टार ट्रेक' मालिका वीसेक वर्षांपूर्वी आपल्याकडे टीव्हीवर दाखवण्यात आली होती आणि तिला प्रेक्षक वर्गही चिकार होता. अर्थात तेव्हाही आपल्याकडे आधी सांगितल्यासारखाच दृष्टिकोन असल्यानं हा प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने "बाल' प्रेक्षकवर्ग होता. याउलट इतर जगभरात ही मालिका सर्व वयाच्या प्रेक्षकांनी सारख्याच आपलेपणानी पाहिली. पुढे "द नेक्‍स्ट जनरेशन,' "डिप स्पेस नाईन' आणि "एन्टरप्राईज'मध्ये पिढ्या अन्‌ कलाकार बदलत मालिका वेगवेगळ्या रूपात आली. आपल्याकडेही यातल्या अनेक भागांचं प्रक्षेपण विविध चॅनल्सवर झालं. चित्रपट मात्र आपल्याकडे फारसे आले नाहीत. 1976 पासून "स्टार ट्रेक'चे सुमारे दहा चित्रपट पडद्यावर आलेले आहेत. त्याच्या चाहत्या वर्गानं त्यातल्या सुमारे अर्ध्यांना डोक्‍यावर घेतलं. (कारण विषम क्रमांकाचे मालिकेतले चित्रपट वाईट असल्याचं शपथेवर सांगणारे अनेक चाहते आहेत.) अन्‌ चित्रपटगृहात नव्हे पण व्हिडिओ लायब्रऱ्यांमधून ते उपलब्धही आहेत. त्यामुळे काही प्रमाणात फॅन बेस आपल्याकडेही नक्कीच होता. अर्थात अशी शक्‍यता आहे, की तेव्हाचा बाल प्रेक्षक आता प्रौढ झाल्यानं त्यानं आता आपल्या वयाला शोभून दिसणारे इतर चित्रपट पाहणं पसंत केलं असावं, अन्‌ स्टार ट्रेककडे दुर्लक्ष करणं.
"स्टार ट्रेक' हा सायन्स फिक्‍शन चित्रपट आहे. इथं एक लक्षात घ्यायला हवं, की सायन्स फिक्‍शन या लेबलाखालीही काही उपप्रकार आहेत, अन्‌ त्याखाली फार वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येऊ शकतात. 2001 : ए स्पेस ओडिसी, स्टार वॉर्स मालिका अन्‌ स्टार ट्रेक मालिका ही प्रामुख्याने अवकाशात घडणाऱ्या चित्रपटांची तीन लोकप्रिय नावं पाहिली तरी यातला प्रत्येक उपप्रकार दुसऱ्यापेक्षा खूप वेगळा आहे असं दिसून येईल. "2001' हे अधिक गंभीर उदाहरण आहे. वैज्ञानिक संकल्पनांचा खोलात जाऊन विचार करणारं. त्याच्या लेखनातला आर्थर सी. क्‍लार्क यांचा सहभागच त्याचं स्वरूप स्पष्ट करणारा आहे. "स्टार वॉर्स'चं केवळ रूप विज्ञानकथेचं आहे, पण मुळात ती चांगल्या अन्‌ वाईटामधला सनातन संघर्ष दाखवणारी परीकथा आहे. या उलट स्टार ट्रेक सरळ सरळ अँक्शन अँडव्हेंचर आहे.
"स्टार ट्रेक' चा हा नवा भाग दोन प्रमुख हेतू समोर ठेवून निर्मिलेला आहे. पहिला आहे तो जुन्या, मूळ मालिकेच्या अन्‌ त्यामुळे अजरामर झालेल्या "कॅप्टन क्‍लर्क, मि. स्पॉक, डॉ. मॅककॉय, स्कॉटी या व्यक्तिरेखांच्या चाहत्या वर्गाला मालिककेडे पुन्हा खेचून आणणं, मधल्या काळात फुटलेल्या फाट्यांनी अन्‌ बदलत गेलेल्या स्वरूपानी जे दूर गेले त्यांना परत बोलावण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरा हेतू आहे तो उघडच नवे चाहते तयार करणं. स्टार ट्रेक फ्रॅन्चाइजने आजवर निर्मात्यांना प्रचंड प्रसिद्धी अन्‌ पैसा मिळवून दिलेला आहे. तो तसाच मिळत राहावा असं वाटत असेल तर केवळ जुनी पिढी उपयोगाची नाही, तर नवीन प्रेक्षक तयार होणं आवश्‍यक आहे. स्ट्रार ट्रेक हे दोन्ही करण्यात यशस्वी होतो, ते त्यातल्या मध्यवर्ती कल्पनेमुळे.
स्टार ट्रेकच्या आजवरच्या सर्व चित्रपटांना मिशनचं स्वरूप होतं. काही प्रमाणात ते इथंही आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन ही ओरिजिन स्टोरी आहे. सामान्यतः ओरिजिन स्टोरीज या सुपर हिरोंशी जोडलेल्या असतात. कारण त्यांना त्याच्या विशिष्ट शक्ती कशा मिळाल्या हे त्या कथांमध्ये सांगितलं जातं. इथं स्टार ट्रेकच्या प्रमुख व्यक्तिरेखांची पार्श्‍वभूमी काय, त्या एकमेकांना कशा भेटल्या आणि ही टीम कशी तयार झाली हे इथं दिसतं. मात्र त्यापलीकडे जाऊन काही विशेष गोष्टी हा चित्रपट करतो. आपल्या टाईम ट्रॅव्हलच्या घटकामुळे तो प्रीक्वल आणि सीक्वल यांचं एक वेगळं मिश्रण तयार करतो. वयोवृद्ध स्पॉकच्या भूमिकेत मूळ स्पॉक लिअनर्ड निमॉयला आणून मूळ मालिकेला या नव्या भागाबरोबर सांधतो आणि समांतर कालप्रवाहाच्या कल्पनेनं मूळ मालिका अन्‌ या भागात राहिलेल्या विसंगतीचाही समाचार घेतो. एकदा या कालप्रवाहात खंड पडून तो वेगळ्या रस्त्यानं जायला लागल्याचं मान्य केलं, की नवा स्टार ट्रेक घडवून आणत असलेले सर्व बदल आपोआपच ग्राह्य ठरतात आणि चाहत्यांना जुने संदर्भ उकरून बोटं दाखवायला जागा उरत नाही.
चित्रपट जवळपास सलीम जावेद शैलीत सुरवात करतो. भविष्यात आलेलं रोम्युलन अवकाशयान नाराडा आणि त्याचा बंडखोर कॅप्टन नीरो (एरिक बाना) विरुद्ध यू.एस.एस. केल्विन आणि त्याचा बदली कॅप्टन जॉर्ज कर्क (क्रिस हे हेम्सवर्थ) यांमध्ये अवकाशात चाललेल्या युद्धामध्ये केल्विनचा पाडाव होतो, पण कर्क आपला पराक्रम दाखवत जवळपास आठशे लोकांचे प्राण वाचवतो. यात त्याची गरोदर पत्नीदेखील असते. मरण्यापूर्वी तो आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचं रडणं ऐकतो अन्‌ त्याचं बारसंही करतो.
अनेक वर्षांनी उडाणटप्पू, पण अतिशय हुशार जेम्स टी कर्क (क्रिस पाईन) स्टार फ्लीटमध्ये भरती होतो. मॅककॉय (कार्ल अर्बन) आणि उहूरा (झो सालदाना) त्याच्या बरोबरच शिकत असतात. अखरेच्या परीक्षेत कर्कने लबाडी केल्याचा आरोप ठेवला जातो, तो तरुण व्हल्कन ऍम्बॅसडर स्पॉक (झॅकरी क्विन्टो) कडून. विद्यालयात उपसलेल्या तलवारी पुढे उपसलेल्याच राहतात. आणीबाणीच्या प्रसंगी सर्वांनाच व्हल्कन ग्रहाच्या दिशेनं निघावं लागतं, मात्र भांडण संपत नाही. पुढे यानाचा ताबा स्पॉककडे दिला जातो आणि त्याला विरोध करणाऱ्या कर्कची एका निर्मनुष्य ग्रहावर हकालपट्टी करण्यात येते. कर्क आणि स्पॉक यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित होणं दुरापास्त होऊन बसतं. भविष्यात स्पॉकच्या हातून घडलेल्या चुकीची सर्वांनाच मोठी किंमत द्यायला लागेलशी चिन्हं दिसायला लागतात.
दिग्दर्शक जे जे ऍब्रम्सने आपल्या दृश्‍य संकल्पनांपासून व्यक्तिरेखा रंगवण्यापर्यंत मघा सांगितलेले दोन हेतू डोळ्यांसमोर सतत ठेवलेले आहेत. "रेट्रो फ्युचर' नावाने ओळखली जाणारी एक शैली आहे. ज्यात भविष्यकाळ साकारला जातो, पण भूतकाळात कल्पिल्याप्रमाणे . इथली दृश्‍य योजना त्याच प्रकारची आहे. व्हिज्युअल, मारामाऱ्या, साहसदृश्‍य यात नवी सफाई आणि गुंतागुंत आहे, प्रेक्षकांसाठी ओळखीच्या गोष्टी भरपूर आहेत. मूळ यान, त्यातला कॅप्टन्स ब्रिज फार बदललेला नाही. वेशभूषा किंवा यानाचा अंतर्भाग यामध्येही मुळापासून केलेला बदल नाही.
व्यक्तिरेखांचे स्वभाव त्यांची ओळख करून देतानाच सूचित करण्यात आले आहेत. हे प्रसंग अन्‌ त्यांचे संवाद इतके चपखल आहेत की जुन्या प्रेक्षकांना जुने मित्र भेटल्याचा आनंद व्हावा. अपवाद स्कॉटीच्या भूमिकेतल्या सायमन पेगचा. हे कास्टिंग मध्यंतरी बॉन्ड मालिकेत "क्‍यू'च्या भूमिकेसाठी जॉन क्लेजला घेतलं होतं, त्याची आठवण करून देणारं आहे. हा विनोद काहीसा परका आहे. स्वाभाविक नाही.
हीच योजना कर्क आणि स्पॉक या प्रमुख नायकांनाही लागू पडते. इथे स्पॉक हा परिचित प्रेक्षकांसाठी केलेला आहे. बराचसा मुळाबरहुकूम. त्यात भर म्हणून निमॉयच्या वृद्ध स्पॉकचीही वर्णी आहेच. याउलट पाईनचा कर्क खूपच वेगळा आहे.विल्यम शॅटनर नक्कल करण्याचा इथे प्रयत्न नाही, तर हा कर्क काहीसा अधिक तडफदार, भडक डोक्‍याचा, मात्र विनोदबुद्धी शाबूत असलेला आहे. तरूण (आणि "बाल') प्रेक्षकांना जवळचा वाटणारा.
स्टार ट्रेक ज्या हेतूने नव्या भरारीला सिद्ध झालं, ते हेतू यशस्वी झाले आहेत यात शंका नाही. आपल्याकडचा प्रतिसाद गृहीत न धरताही ही निर्मिती यंदाच्या यशस्वी चित्रपटातली एक आहे. आपल्याकडे फार प्रतिसाद नसल्याचा तोटा अखेर आपल्यालाच होणार आहे. आपल्याकडची वितरण पद्धती ही प्रेक्षक प्रतिसादावर अवलंबून असल्याने आजही अमेरिकेतले मोजके चित्रपटच आपल्याकडे आयात होतात. भविष्यात विज्ञानपटही या आयातीतून वगळले गेलेले मला तरी आवडणार नाहीत. तुम्हाला आवडेल?
- गणेश मतकरी

Read more...

एड वुड - ट्रॅजिकॉमेडी

>> Friday, June 19, 2009


एडवर्ड डी. वुड ज्यु. किंवा एड वुडची किर्ती (किंवा अपकिर्ती) आहे ती जगातला सर्वात वाईट दिग्दर्शक म्हणून. ब्लॅक अँण्ड व्हाईट भयपट आणि विज्ञानपट हे हॉलीवूडचं चलनी नाणं होतं त्या काळातल्या या त-हेवाईक व्यक्तिमत्त्वाच्या प्लान नाईन फ्रॉम आउटर स्पेस चित्रपटाने आजवरचा सर्वाधिक वाईट चित्रपट होण्याचा मान मिळविला असला तरी त्याचे इतर चित्रपटही त्याच जातकुळीतले होते. पैशांची चणचण, अत्यंत कमी दिवसात केलेले चित्रिकरण, स्वतःच्या आणि आपल्या चमूच्या कुवतीवर भलता अविश्वास (यातल्या काही गोष्टी काही मराठी चित्रपटांनाही लागू प़डत असतील का ?) आणि अत्यंत सुमार, दर्जा गाठण्याचा जराही प्रयत्न न करणारे स्पेशल इफेक्ट्स ही एड वुडच्या चित्रपटांची व्यवच्छेदक लक्षणं म्हणावी लागतील. वुडच्या हयातीत त्याचा एकही चित्रपट जराही चालला नाही, मात्र त्याच्या मृत्युपश्चात जगातला सर्वात वाईट दिग्दर्शक म्हणून त्याला घोषित करण्यात आलं आणि वुडचा सिनेमा अजरामर झाला. तो चांगला नाही याबद्दल कोणाचंच दुमत नाही, पण त्याच्या सवंगपणालाच एक कल्ट सिनेमाचा दर्जा मिळाला आणि वुडचं आणि त्याच्या सिनेमाचं नाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचलं, त्याला प्रसिद्धी मिळाली. थोडी उशिरा आणि थोड्या वेगळ्या कारणासाठी, पण एड वुड चित्रपटातल्या बेला लुगोसीच्या तोंडचं वाक्य उचलायचं म्हटलं, तर देअर इज नो सच थिंग अँज बॅड प्रेस. प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धी, मग त्यात चांगलं वाईट काही नाही.
टिम बर्टनने दिग्दर्शित केलेला एड वुड हा चित्रपट नक्की काय आहे, हे कोडंच आहे. वर वर पाहता तो एड वुडच्या आयु्ष्यातल्या महत्त्वाच्या (?) कालावधीवर प्रकाश टाकणारा चरित्रपट आहे. पण तेवढंच नाही. एड वुड एक महत्त्वाची गोष्ट करतो, जी प्रत्येक चरित्रपटाने करणं अपेक्षित आहे. तो घटनांच्या पलीकडे जाऊन एड वुडच्या अंतरंगांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. वुडच्या चुकांना तो सावरून घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण या चुकांसकटही चित्रपट माध्यमावरचं त्याचं निस्सिम प्रेम पकडण्याचा प्रयत्न करतो. एड वुडला रिटेक हा प्रकारच माहिती नाही. चित्रिकरणातल्या कितीही अक्षम्य चुका तो सहजपणे गृहीत धरून पुढे जातो. जणू समोर चित्रित होणारी दृश्य न दिसता त्याला एक काल्पनिक जग दिसतंय जेथे त्याने घेतलेला प्रत्येक शॉट हा उच्च दर्जाचा कलाविष्कार आहे, आणि या जगात एड वुड स्वतः त्याच्या आँर्सन वेल्स या दैवताइतका मोठा दिग्दर्शक आहे.
एड वुड हा स्वतंत्रपणे दोन ट्रॅक्सवरून चालणारा चित्रपट आहे. विनोद आणि शोकांतिका. यातला विनोद हा वरवरचा आहे, आणि तो संवादातून, तसंच बर्टनने आपल्या १९९४ मधल्या चित्रपटाच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट चित्रणातून एड वुडच्या चित्रपटाचा मूड जिवंत करण्यामधून येतो. इथे सुरुवात होते, ती शवपेटीतून बाहेर डोकावणा-या पांढ-या आकृतीने वर्दी देण्यापासून, नामांकनादरम्यान अर्धकच्च्या स्पेशल इफेक्ट्सची खिल्ली उडवली जाते. संवादात विसंगती आणि शाब्दिक कोट्या शोधल्या जातात आणि व्यक्तिरेखांचे सादरीकरणही ( बेला लुगासीच्या भूमिकेत आँस्कर मिळवून जाणा-या मार्टिन लॅन्डेचा अपवाद वगळता.) ख-यापेक्षा अर्कचित्रांसारखे करण्यात येते. मात्र एकदा या विनोदाच्या बाह्य आवरणापलीकडे पाहिलं तर दिसणारं चित्र वेगळं असतं. एड (जॉनी डेप) हा असंख्य अडचणींना तोंड देऊन झगडणारा तरुण दिग्दर्शक आणि बेला लुगासी, हा एकेकाळी ड्रॅक्युलाच्या भूमिकेने स्टार बनलेला. पण आता चित्रपटसृष्टीबाहेर फेकला गेलेला आणि गरीबी अन् अमली पदार्थांनी पोखरलेलं आयुष्य गतकिर्तीची स्वप्न पाहत जगणारा वृद्ध अभिनेता. यांच्या मैत्रीची गोष्ट या आतल्या पातळीवर आपल्याला दिसते, ही गोष्ट गंभीर आहे, पटण्यासारखी आहे आणि खरंतर हीच आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवते. एकदा का विनोदी आवरणाची सवय झाली की, त्यात पुढे फार नाविन्य येऊ शकत नाही, ही गंभीर गोष्ट मात्र अपरिहार्य शेवटापर्यंत आपल्याला बांधून ठेवते.
एड वुडच्या शेवटाकडे येणारा एक प्रसंग आहे. प्रसंग अतिशय विनोदी आणि त्याचवेळी विचार करायला लावणारा आहे. प्लान नाईन फ्रॉम आऊटर स्पेस या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान निर्मात्यांच्या आगाऊपणाला विटल्याने आपला आवडता स्त्रीवेष (!) धारण करून एक जवळचा एक बार गाठतो आणि तेथे त्याची भेट होते थेट आँर्सन वेल्सशी. आता एड वुडमधल्या इतर प्रसंगांप्रमाणेच हा सत्य की बर्टनच्या कल्पनेतून आलेला (बहुदा तेच खरं असावं) हे कळायला मार्ग नाही, मात्र जगातला सर्वात वाईट चित्रपट प्लान नाईन बनवणा-या वाईट दिग्दर्शकाची गाठ सर्वोत्कृष्ठ चित्रपट सिटीझन केन बनवणा-या थोर दिग्दर्शकाशी घालणं आणि त्यानिमित्ताने चित्रपट उद्योगाकडेच तिरकसपणे पाहाणं हे बर्टनसारखा विक्षिप्त माणूसच करू जाणे. इथे दोघांच्या बोलण्यातून दिसून येते की दिग्दर्शक उत्तम असो वा सुमार दोघांपुढल्या अडचणी एकसारख्याच आहेत. (निर्मात्यांची अरेरावी ही प्रमुख अडचण) मग एडला प्रश्न पडतो तो हा की एवढी यातायात करून चित्रपट काढण्यातच काही अर्थ आहे का ? यावर वेल्सचं उत्तर एकूणच कलावंतांच्या दुःखाला आणि त्यांच्या प्रसंगी अपयशालाही तोंड देऊन लढत राहण्याला अर्थ देणारं आहे.
एड वुडची दृष्टी ही चार लोकांपेक्षा वेगळी होती. दिग्दर्शनाचे ठोकताळेही शिष्टसंमत मार्गाशी फटकून राहणारे होते. अधिक जाणवणा-या शून्य बजेटसारख्या संकटांना आणि आगाऊ निर्मात्यांनाही त्याला तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे त्याच्या पडद्यावर आलेल्या चित्रपटांमध्ये त्याच्या स्वतः.च्या मर्यादा किती आणि साधनांच्या किती यावरही विचारता येईल, हे चित्रपट दर्जेदार नव्हेत तर सर्वसामान्यच आहे, पण एखाद्या व्यक्तीवर असा अपमानकारक किताब लादणं हेही योग्य नाही. बर्टनचा चित्रपट हा कदाचित चारित्र्याच्या दृष्टीने शंभर टक्के खरा नसेल, पण तो एका परीने एड वुडला न्याय देतो. त्याचे चित्रपट त्याचं जे संकुचित आणि काहीसं विकृत चित्रं आपल्यापुढे उभं करतात, त्याला इतरही पैलू असल्याचं दाखवून देतो. एड वुडच्या ज्ञात चमत्कृतींवर पांघरुण न घालता हे करून दाखवणं ही मोठीच करामत म्हणावी लागेल.
- गणेश मतकरी

Read more...

एंजल्स अँड डिमन्स- धर्म आणि विज्ञान

>> Saturday, June 13, 2009


"एंजल्स ऍन्ड डिमन्स' ही ब्राऊननं "दा विंची कोड'आधी लिहिलेली; पण दुर्लक्षित कादंबरी. कादंबरीतील गतिमानता, परिणामकता चित्रपटात नक्कीच आहे. ब्राऊनचा आणि लॅन्गडनचा फॅनबेस बळकट करण्याचं काम "एंजल्स ऍन्ड डिमन्स'नी केलं आहे हे नक्की.

बेस्टसेलर नामक लोकप्रिय वर्गवारीत बसणाऱ्या कादंबऱ्यांना साहित्य म्हटलं जावं का, हा वादाचा मुद्दा आहे. अगदी आपल्याकडल्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पाहिलं तरीही फिक्‍शन, बेस्टसेलर आणि लिटरेचर हे विभाग स्वतंत्रपणे केल्याचं दिसतं. तत्कालीन बेस्टसेलर यादीतल्या पुस्तकांना कालांतरानं "फिक्‍शन'मध्ये दाखल केलं जातं; पण अभिजात साहित्यासाठी राखून ठेवलेल्या "लिटरेचर'मध्ये शिरण्याचा मान त्यांना क्वचित मिळतो. याला कारण आहे. ज्याला जेनेरिक किंवा विशिष्ट प्रकारात घुटमळणारं लिखाण म्हटलं जातं, त्याचं प्रमाण इतर देशांत अन अर्थातच इंग्रजी वाङ्‌मयात पुष्कळ आहे. क्राईम, हॉरर, सायन्स फिक्‍शन यांसारख्या लिखाणाचा मराठीत फार वाचकवर्ग नसला तरी इंग्रजीत हे अतिशय वाचकप्रिय उपप्रकार आहेत अन एकदा अशा उपप्रकारात यश मिळालेला लेखक त्या उपप्रकाराच्या आधारेच पुढलं लिखाण करत राहील, अशी शक्‍यता संबंधित अर्थकारण अन प्रचंड प्रसिद्धी यामुळे तयार होते. मग अनेकदा (सन्माननीय अपवाद वगळता) स्वतंत्र सिद्ध कलागुण असूनही हे लेखक पुनरावृत्ती करणंच अधिक पसंत करतात. त्यांचा आधीचा निश्‍चित वाचकवर्ग अधिकाधिक मोठा होत जातो आणि ही मंडळी "बेस्टसेलर' यादीत नाव पटकावतात. अर्थात, या प्रकारची हुकमी पुनरावृत्ती हेदेखील सोपं काम नाही. लेखनाची चौकट ठरून गेली असताना दर वेळी वाचकांना बांधून ठेवणारं नवं प्लॉटिंग करणं हे कठीणच आहे आणि या यशस्वी लेखकांना मिळणारी मान्यता ही त्यांच्या या विशिष्ट कलागुणांना वाचकांकडून मिळालेली पावतीच म्हणता येईल.
या लेखकांना असणारा मोठा वाचकवर्ग हा अनेकदा त्यांच्या कथा-कादंबऱ्यांना पडद्यावर आणण्यासाठी उपयुक्त ठरलेला दिसतो. हॉलिवूडची व्यावसायिक गणितं ही इतक्‍या मोठ्या अपेक्षित प्रेक्षकवर्गाकडे पाठ फिरवणं शक्‍यच नसतं. मग या कादंबऱ्यांची रूपांतरं केली जातात. त्यातली कोणती यशस्वी ठरतात, हे या रूपांतरांना मूळ कलाकृतीचा गाभा गवसलेला आहे की नाही यावर अवलंबून ठरतं.
डॅन ब्राऊनच्या "दा विंची कोड'चं रूपांतर मला खूप आवडलं नव्हतं. एक ऐतिहासिक - सांस्कृतिक रहस्यकथा असं ब्राऊनच्या मूळ पुस्तकाचं स्वरूप होतं. प्रतीकांचा अभ्यास करणारा सिम्बॉलॉजिस्ट रॉबर्ट लॅन्गडन कलाविश्‍वात श्रेष्ठ ठरलेल्या मोनालिसापासून अनेक चित्रशिल्पाकृतींमागच्या इतिहासाचा छडा लावत, आपल्या तर्कशास्त्रानं काळाच्या पडद्याआड लपलेल्या, प्रत्यक्ष चर्चनं दडवून ठेवलेल्या एका रहस्याची उकल करतो, असं या कादंबरीचं स्वरूप होतं. लॅन्गडनचं या कलाकृतीचं त्यामागच्या तर्कशास्त्राचं केलेलं विवेचन हा कादंबरीचा महत्त्वाचा भाग होता. दुसरा होता तो लॅन्गडनचा एका रहस्यापासून दुसऱ्याकडे जाणारा प्रवास, जो काही श्रेष्ठ कलाकृतींची सफर आपल्याला घडवतो. "दा विंची कोड'च्या रूपांतरात दिग्दर्शक रॉन हॉवर्डनं विवेचन आणि प्रवास यातल्या दोघांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. परिणामी यातल्या कोणत्याच गोष्टीला महत्त्व आलं नाही. चित्रपट हा कादंबरीतल्या स्थळांचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारा कम्पॅनिअन पीस असल्यासारखा झाला.
"एंजल्स ऍन्ड डिमन्स' ही ब्राऊननं "दा विंची कोड'आधी लिहिलेली; पण दुर्लक्षित कादंबरी. ज्यांनी ती वाचली असेल त्यांच्या लक्षात आलं असेल, की रचनेच्या दृष्टीनं ती अधिक चांगली आहे. दा विंची कोडमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी तिथे मुळातच आहेत. रहस्याच्या उकलीसाठी कालमर्यादा घालून देणारी डेडलाईन आणि हुशार खलनायक या दोन चित्रपट रूपांतरासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रमुख गोष्टी तिथे आहेत. त्याबरोबरच लॅन्गडनची धावपळही अधिक फोकस्ड आहे. व्हॅटिकन सिटीमध्येच पूर्ण रहस्य उलगडतं, त्याचा निकाल हा पोपच्या निवडणुकीशी समांतर जातो आणि या उलगड्यावर प्रचंड जीवितहानी टळणं अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऍक्‍शन ही केवळ कलाकृती दर्शनापुरती न उरता काही निश्‍चित परिणाम साधणारी ठरते. दा विंची कोडमधल्या रहस्याची सुरवात वर्तमानात असली तरी उलगडा भूतकाळाकडे निर्देश करणारा आहे. इथे भूतकाळाचा वापर स्वतंत्र घटकांप्रमाणे असला तरी लॅन्गडननं केलेली कोड्याची उकल वर्तमानातच आपला प्रभाव दाखवणारी आहे. वाचकांसाठी त्यामुळेच प्रेक्षकांसाठीही अधिक जवळची.
दिग्दर्शक रॉन हॉवर्ड अन पटकथाकार डेव्हिड केप तसंच अकिवा गोल्ड्‌समन यांनी कादंबरीची ही वैशिष्ट्यं लक्षात घेऊन चित्रपटाला गतिमान करण्यासाठी त्यांचा वापर केला आहे. दा विंची प्रमाणेच लॅन्गडनला विवेचनासाठी वेळ न मिळणं आणि त्यामुळे त्याचं चातुर्य विश्‍वसनीय न होणं हा दोष इथंही आहे. मात्र, तो दोष नाहीसा होणं अशक्‍य आहे. कादंबरी ज्या प्रकारे अशा तपशिलांना वेळ देऊ शकते, तसा चित्रपट देऊ शकत नाही. मात्र, तो काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. या मुद्‌द्‌यांपलीकडे पाहिलं तर रहस्य सोपं, थोडक्‍यात केलेलं आपल्याला जाणवतं. मात्र, चित्रपट डेडलाईनलाच अधिक महत्त्व देत असल्यानं ते आक्षेपार्ह वाटत नाही.
मूळ कादंबरी ही दा विंची आधी घडणारी म्हणजे दा विंचीचं प्रीक्वल असली, तरी ती सेल्फ कंटेन्ड असल्यानं आधी किंवा नंतर घडण्याला काही विशिष्ट आधार नाही. हे ओळखून चित्रकर्त्यांनी "एंजल्स ऍन्ड डिमन्स'ला सीक्वल म्हणूनच सादर केलं आहे. दा विंचीमध्ये लॅन्गडन (टॉम हॅंक्‍स) चर्चच्या विरोधात असल्यानं इथे सुरवातीला चर्चचा रोष हा जाणवण्यासारखा आहे. चित्रपट सुरू होतो तो दोन घटनांनी - पोपचा मृत्यू आणि उएठछ या प्रयोगशाळेतून ऍन्टिमॅटरची चोरी. जयंत नारळीकरांची पुस्तकं किंवा इंग्रजी सायन्स फिक्‍शन नियमित वाचणाऱ्यांना माहीत असेल, की आपलं जग हे मॅटरनं बनलेलं आहे. ऍन्टिमॅटर ही मॅटरच्या विरोधी संकल्पना आहे. असं मानलं जातं, की मॅटर अन ऍन्टिमॅटरचा संपर्क आला तर प्रचंड विस्फोट होईल अन मोठा विनाश घडण्याची शक्‍यता. चर्चकडून लॅन्गडनला पाचारण केलं जातं ते एका धमकीमुळे. विज्ञान आणि धर्म या दोघांमधला विरोध तर जाहीरच आहे. एके काळी अस्तित्वात असणाऱ्या "इल्ममिनाती' या वैज्ञानिकांच्या गुप्त संघटनेकरवी पोप बनण्याच्या स्पर्धेतल्या चार धर्मोपदेशकांचं अपहरण केलं जातं. तेही पोप निवडला जाण्याच्या काही तास आधी. धमकीनुसार मध्यरात्रीपूर्वी तासागणिक एका धर्मोपदेशकाला मारण्यात येईल अन मध्यरात्रीच्या ठोक्‍याला ऍन्टिमॅटरकरवी व्हॅटिकनचा अन काही प्रमाणात रोमचाही विनाश ओढवेल. आता हा विनाश केवळ लॅन्गडनच टाळू शकेल.
या चित्रपटाची पात्रयोजना ही एकाच वेळी चांगली; पण अयोग्य म्हणण्याजोगी आहे. चांगली तर ती उघडच आहे, कारण प्रमुख भूमिकेत हॅंक्‍स आणि तीन संशयितांच्या म्हणजे पोपचे रक्षक मानले जाणाऱ्या स्वीस गार्डचा प्रमुख, गत पोपचा विश्‍वासू सहकारी अन निवडणुकीची व्यवस्था पाहणारा कार्डिनल स्टॉस या भूमिकांत अनुक्रमे स्टेलन स्कार्सगार्ड, इवान मॅकग्रेगर आणि आर्मिन म्युलर - स्टाल हेदेखील ताकदीचे नट आहेत. याबरोबरच बऱ्याच लहान भूमिकांमध्येही कसलेले कलावंत पाहायला मिळतात. असं असूनही या योजनेतला धोका म्हणजे चित्रपटाचं स्वरूप अन संशयितांचं कास्टिंग पाहता खरा गुन्हेगार कळायला आपल्याला जराही वेळ लागत नाही. त्यामुळे अभिनयाचा, चित्रपटाचा दर्जा टिकतो; रहस्य मात्र टिकत नाही.
मूळ चित्रपटानं चर्चला नकारात्मक भूमिका दिली आणि चर्चनंही त्याला विरोध केला. इथं मात्र, चित्रपटानं सलोख्याचा हात पुढे केला आहे आणि चर्चनंही तो स्वीकारल्याचं दिसतं. कारण चित्रीकरणादरम्यान विरोध करूनही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र व्हॅटिकनच्या अधिकृत वृत्तपत्रानं त्याला "निरुपद्रवी मनोरंजन' असल्याचा दाखला दिलेला आहे.
"लॅन्गडन' व्यक्तिरेखेच्या यशानं ब्राऊनच्या पुढल्या कादंबरीकडे अनेकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. मात्र, बराच काळ जाऊनही अन त्यावर काम सुरू असल्याच्या खऱ्या- खोट्या बातम्या येऊनही प्रत्यक्ष कादंबरी मात्र बाजारात आलेली दिसत नाही. अर्थात, तिचे अन त्यावर उघडच येऊ पाहणाऱ्या चित्रपटाचे गुणदोष एंजल्सपेक्षा फार वेगळे असण्याची शक्‍यता नाही. तरीही ही आगामी कादंबरी अन्‌ चित्रपट क्रिटीकप्रूफ मानले जायला हरकत नाही. ब्राऊनचा आणि लॅन्गडनचा फॅनबेस बळकट करण्याचं काम "एंजल्स ऍन्ड डिमन्स'नी केलं एवढं नक्की.
-गणेश मतकरी

Read more...

बदलाच्या प्रतीक्षेत मराठी सिनेमा

>> Tuesday, June 9, 2009चित्रपटसृष्टी केव्हा बदलते? जेव्हा सातत्याने काही नवीन देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांकडून होतो तेव्हा, आणि या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो तेव्हा. आता हा प्रयत्न तेव्हाच होईल- जेव्हा दिग्दर्शक केवळ आर्थिक नफा, व्यावसायिक यश यापलीकडे जाऊन चित्रपटांकडे पाहील...


अलीकडे एक गोष्ट नेहमीची झालीय. काही ना काही कारणाने एखादा मराठी चित्रपट चर्चेत येतो आणि उत्साहाचं वातावरण पसरतं. पुन्हा मराठी चित्रपटांनी कमबॅक केल्याची सर्वांची नव्याने खात्री होते, मराठी-इंग्रजी पेपरांमधून कौतुकपर लेख लिहिले जातात, काही नवे (आणि अनेकदा अमराठी) निर्माते या त्यामानाने कमी आर्थिक उलाढाल संभवणाऱ्या उद्योगात शिरू पाहतात. या निमित्ताने "बिग पिक्‍चर'कडे पाहण्याची संधी मात्र कुणी घेताना दिसत नाही. याआधी 2004 पासून कोणकोणते चित्रपट या प्रकारे लक्षवेधी ठरले हे आपण जाणतोच, आणि हेदेखील जाणतो, की या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या चित्रपटांपलीकडे जाऊन मराठी चित्रपटांनी फार गुणवत्तादर्शक कामगिरी केली नाही.
"श्‍वास'च्या काळात नसलेली एक गोष्ट मध्यंतरी सुरू झाली, ती म्हणजे "कार्पोरेट हाउसेस' आणि याच उद्योगात आधीपासून असणाऱ्या "झी/ मुक्ता आर्टस्‌'सारख्या मोठ्या कंपन्यांची मराठी चित्रपटांत वाढत चाललेली गुंतवणूक. याला उघडच जबाबदार आहे ती हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना लागणारी अत्यल्प गुंतवणूक. यातल्या काही संस्थांकडे असलेल्या चित्रपट वितरणाच्या सुविधा आणि अधेमधे पसरणाऱ्या "मराठी' उत्साहाचा फायदा घेण्याची संधी. त्याचबरोबर सरकारी अनुदान, आणि काही काळापूर्वी मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवलेल्या सुविद्य शहरी प्रेक्षकांचं मल्टिप्लेक्‍सच्या निमित्तानं परतणं, हादेखील फायदाच.
मल्टिप्लेक्‍सचा फायदा हा त्यामानाने दुहेरी महत्त्वाचा आहे. मुंबईसारख्या शहरांमधल्या मराठी चित्रपटांच्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची परिस्थिती ही आताआतापर्यंत चिंताजनक होती, त्यामुळे उच्च मध्यमवर्गीय प्रेक्षक हा या चित्रपटगृहांच्या वाटेला जाईनासा झाला होता. या वर्गाने पाठ फिरवल्यामुळे तिथे लागणारे चित्रपटही ग्रामीण किंवा ढोबळ विनोदी प्रकारचे होते- जे त्या वर्गाला मुळातच आकर्षित करत नाहीत. या कारणाने गंभीर विषयावर आधारित चित्रपटाला उपलब्ध प्रेक्षकवर्ग हा एकूणच मर्यादित झाला होता आणि सुमार विनोदी चित्रपटांचं पेव फुटलं होतं. मल्टिप्लेक्‍सनी हा तिढा सोडवला. सर्व वर्गातल्या, सर्व प्रकारचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला जाता येईल अशी चित्रपटगृहं उपलब्ध करून दिली, आणि चित्रपटांच्या विषयाचा आवाका वाढवला. त्याचबरोबर फक्त विशिष्ट वर्गाला चालणारे, मर्यादित वितरण असणारे चित्रपट निघण्याच्या शक्‍यताही तयार केल्या, ज्यातून पुढेमागे खरोखरच मराठी चित्रपटांचं स्वरूप बदलू शकेल. मात्र या बदलाला सुरवात झाली आहे का, या प्रश्‍नाचं समाधानकारक उत्तर मात्र लगेच देता येणार नाही.
सध्या चर्चेत असलेला, कर्मधर्मसंयोगाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला अन्‌ यंदाच्या सर्वभाषिक चित्रपटांमधला सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या चित्रपटांमधला एक मानला जाणारा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा आजचा लक्षवेधी चित्रपट मानला जातोय. त्याच्या गुणदोषांची चर्चा करणं हा आजच्या लेखाचा हेतू नाही, मात्र "श्‍वास' किंवा "डोंबिवली फास्ट'सारखे गाजलेले चित्रपट आणि शिवाजीराजे भोसले यांची तुलना करूनच एक गोष्ट दिसून येईल, की ते चित्रपट- ज्याला बेतीव व्यावसायिक चित्रपट म्हणता येईल, या प्रकारचे नव्हते. "श्‍वास' स्वतंत्र अन्‌ "डोंबिवली फास्ट' आधारित असला तरी एक प्रकारचा प्रामाणिकपणा या दोन्ही चित्रपटांमध्ये होता. हेतुपुरस्सर काढलेल्या, प्रेक्षकांना काय आवडेल याचा अंदाज बांधणाऱ्या यशस्वी चित्रपटात वाईट काहीच नाही, मात्र तो तसा आहे, याची नोंद घेणं जरूर आवश्‍यक आहे. "शिवाजीराजे' चित्रपटाचं व्यावसायिक असणं कुठेच लपत नाही. मराठी समाजाला सरसकट आवडणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाला दिलेलं "सकारात्मक' स्थान, खर्चिक चित्रीकरणासहित काढलेल्या पोवाड्यासारख्या प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी, अनेक दिवस चालणारी आणि मराठी अस्मितेला आवाहन करणारी (अन्‌ मराठी चित्रपटांना क्वचित परवडणारी) जाहिरात आणि हिंदी चित्रपटांच्या पद्धतीचं वितरण, या सर्व गोष्टी त्याची साक्ष आहेत. त्याला न भूतो न भविष्यति असं यश मिळवून द्यायला हिंदी निर्माते अन्‌ मल्टिप्लेक्‍समधला वाद थोडाफार कारणीभूत असला तरी त्याशिवायही "शिवाजीराजे' यशस्वी ठरला असता, हे नक्‍की. या प्रकारच्या व्यावसायिक निर्मिती या लवकरच मराठी चित्रपटांमध्ये नित्याच्या होतील असं दिसतं. "साडेमाडे तीन' किंवा "एक डाव धोबी पछाड' यासारख्या वाहिनी बॅक्‍ड चित्रपटांच्या यशातही या प्रकारच्या व्यावसायिक गणितांचा वास जरूर येतो.
या हुकुमी व्यावसायिक निर्मितीबरोबर आज एक मोठी लाट आलेली दिसते ती ज्याला सहजपणे समांतर चित्रपट म्हणता येईल अशा चित्रपटांची. यातले सगळे अतिवैचारिक किंवा प्रेक्षकांना अगम्य वाटणारे नाहीत, यालट लक्षापासून मकरंद अनासपुरेपर्यंत सर्व मंडळींच्या विनोदाला विटलेल्या आणि अगदी काही वेगळं पाहण्याची इच्छा आणि तयारी असलेल्या प्रेक्षकांना यातले बरेच चित्रपट जवळचे वाटावे. गेल्या वर्षभरात समेला पोचलेल्या या लाटेत अनेक तरुण दिग्दर्शक सहभागी आहेत. त्यांचं तारुण्य केवळ त्यांच्या वयात नाही, तर त्यांच्या चित्रपटात दिसून येतं. उमेश कुलकर्णी (वळू, आगामी चित्रपट - विहीर), सचिन कुंडलकर (रेस्टॉरंट, गंध), सतीश मनवर (गाभ्रीचा पाऊस), मंगेश हाडवळे (टिंग्या), परेश मोकाशी (हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी) या नव्या प्रयत्नांत आघाडीवर आहेत.
चित्रपटसृष्टी केव्हा बदलते? जेव्हा सातत्याने काही नवीन देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांकडून होतो तेव्हा, आणि या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो तेव्हा. आता हा प्रयत्न तेव्हाच होईल- जेव्हा दिग्दर्शक केवळ आर्थिक नफा, व्यावसायिक यश यापलीकडे जाऊन चित्रपटांकडे पाहील.
इतर प्रादेशिक चित्रपट आणि आपले चित्रपट यामध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे आपलं बॉलिवूडच्या खूप जवळ असणं. त्यामुळे आपल्याकडले सर्व प्रेक्षक हे मराठी चित्रपटांची तुलना हिंदी चित्रपटांशी करतात आणि आपले बहुतेक दिग्दर्शक हे पुढेमागे हिंदी चित्रपटांत जाण्याची स्वप्नं पाहतात. बहुतेकदा मराठी चित्रपट करताना दिग्दर्शकांचा हेतू हा आपली कला सिद्ध करण्याचा एक हुकमी आणि कमी खर्चिक टप्पा, एवढाच असतो. इथला नेत्रदीपक प्रयत्न हा हिंदी निर्मात्यांसमोर आपलं काम ठेवण्यापुरता असतो. खरं तर हे योग्य नाही.
जगभरात जेव्हा दिग्दर्शक आपल्या मातृभाषेत चित्रपट बनवतात, तेव्हा त्या भाषेत आपल्यावर सर्वात कमी बंधनं असतील, आपण आपले विचार अधिक योग्य रीतीने मांडू शकू, असा हेतू असतो. बर्गमनसारख्या प्रथितयश दिग्दर्शकाने अमेरिकेत मान्यता मिळूनही स्वीडन सोडण्याचा मोह आयुष्यभर टाळला. गिलेर्मो डेल टोरोसारख्या हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या दिग्दर्शकाने मातृभाषेतल्या आव्हानात्मक निर्मितीसाठी (पॅन्स लॅबिरीन्थ) अधिक पैसे मिळवून देणारी व्यावसायिक निर्मिती (क्रॉनिकल्स ऑफ नार्निया) नाकारल्याची उदाहरणं आहेत. जेव्हा जेव्हा ऑस्करला परभाषिक चित्रपटांची नामांकनं/पारितोषिकं जाहीर होतात, तेव्हा तेव्हा या इतरदेशी भिन्न भाषांमध्ये काम करणाऱ्या दिग्दर्शकांना अमेरिकेतून आमंत्रणं येतात, मात्र बऱ्याचदा ती न स्वीकारता आपापल्या भाषेत/देशातच काम करणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. हे घडू शकतं. कारण हे सर्व जण अधिक वरच्या जागी पोचण्यासाठी लागणारी एक आवश्‍यक शिडी म्हणून आपापल्या भाषेतल्या चित्रपटांकडे पाहत नाहीत, तर आपण आपलं सर्वोत्तम काम हे स्वतःच्या भाषेत करू शकतो, हा विश्‍वास त्यामागे असतो.
मराठी चित्रपट दिग्दर्शकांमध्ये हा अभिमान, ही गरज कमी प्रमाणात दिसून येते. संधी मिळणारे दिग्दर्शक लगेचच हिंदीत जातात (उदा. - निशिकांत कामत), तर इतर जण नाइलाजाने मराठीत राहतात. मग कालांतराने त्यांची स्वतःची गणितं ठरत जातात, आणि त्यांच्या आविष्काराला आपसूक मर्यादा पडत जातात. हिंदीत जाणारेही फार काळ मनाला पटेलसं करू शकत नाहीत. कारण हिंदी चित्रपट हा मुळातच व्यावसायिक धर्तीचा असल्याने तिथे येणाऱ्या मर्यादा अधिक मोठ्या, अधिक जाणवणाऱ्या असतात; आणि कलेपेक्षा धंद्यावर, तडजोडीवर बेतलेल्या.
आज आपला चित्रपट कुठे पोचावा असं वाटत असेल, तर आपल्या दिग्दर्शकांनी (दाक्षिणात्य किंवा बंगाली चित्रपटांमध्ये दिसून येणारा) आपल्या भाषेच्या चित्रपटांचा अभिमान जागता ठेवणं आवश्‍यक आहे. हे व्यावसायिक, बेतीव चित्रपटांकडून अपेक्षित नाही. कारण मुळातच त्यांचा हेतू हा कलेपेक्षा व्यवसायाला अधिक महत्त्व देणारा आहे. मघा मी ज्या दुसऱ्या समांतर फळीचा उल्लेख केला, त्या फळीकडूनच या प्रकारची कामगिरी होऊ शकते.
त्यांचं सुरवातीचं काम (कारण यातल्या बऱ्याच जणांची ही नुकती सुरवातच आहे.) हे त्यांच्या संवदना जाग्या असल्याचं, ते बॉक्‍स ऑफिसपलीकडे जाऊन कलाविष्काराच्या पातळीवर चित्रपटांकडे पाहत असल्याचं दाखवून देणारं आहे. त्यातल्या अनेकांना आपल्या देशात अन्‌ देशाबाहेरही गौरवण्यात आलेलं आहे. जागतिक पातळीवर पाहता सर्वच चित्रपट सबटायटल्ड असल्याने, आपली भाषा ही अधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्यातली अडचण उरत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आहे.
मात्र दुसऱ्या बाजूने हेही लक्षात घ्यायला हवं, की केवळ चित्रपट महोत्सवांवर चित्रपटनिर्मिती चालू शकत नाही. आपल्या भाषेतल्या चित्रपटांना सुधारणारे प्रयत्न तेव्हाच पुढे जातील, जेव्हा त्यांच्या मातीतच त्यांना आवश्‍यक तो प्रतिसाद मिळेल. आपण जर कायम चाकोरीतल्या मनोरंजनाचाच हेतू ठेवला आणि हिंदी किंवा मराठीतही तथाकथित विनोदी वा मराठी अस्मितेच्या आवाहनामागे दडून धंद्याची गणितं मांडणारेच चित्रपट पाहायला लागलो, तर या नवदिग्दर्शकांचा उत्साहदेखील टिकणार नाही. मी मघा म्हणाल्याप्रमाणे केवळ चित्रकर्ते सध्याच्या परिस्थितीवर मार्ग काढायला पुरेसे नाहीत, तर त्यांना आश्रय देणारा एक निश्‍चित प्रेक्षकवर्ग तयार होण्याची आवश्‍यकता आहे. जेव्हा हे दोन्ही एकाच वेळी घडेल, तेव्हा आपल्या चित्रपटांमध्ये बदल घडायला सुरवात झाली, असं ठामपणे म्हणता येईल.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP