सेन्साॅरशिप आणि दृष्टीकोन
>> Sunday, February 21, 2016
डेडपूल पाहून मी थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती, ती हा सिनेमा माझ्या मुलीला भयंकर आवडला असता, ही. अर्थात, सेन्साॅर बोर्डाच्या कृपेने हा न्यू एज सुपरहिरोपट मुलांना पहायला मिळणार तर नव्हताच, मलाही तो जेमतेमच पाहता आला होता. सर्वत्र काटछाट, संवादातली हवा जमेल तेव्हा काढून घेणारे आॅडिओ कट्स, हाणामारीला सभ्य करण्याचा प्रयत्न, नग्नतेचे शाॅट्स कमी करणं, वगैरे सगळंच.
बाॅन्डच्या स्पेक्टरमधे चुंबनदृश्य पन्नास टक्के कमी करण्याचा थोर बावळटपणा तर याआधी आपल्या सेन्साॅरबोर्डाने केला होताच, पण बाॅन्ड हा एरवी फारच जन्टलमन असल्याने, आणि त्यातली अॅक्शन श्वास रोधायला लावतानाही त्याच सभ्यपणाने डिझाईन केली असल्याने त्यात इतर ठिकाणी कात्री लागण्याचा तसा धोका नव्हता. डेडपूल मुळातच पूर्ण वाया गेलेला ( त्याच्याच शब्दात सांगायचं तर ' आय मे बी सुपर, बट आय अॅम नो हिरो.') तेव्हा त्याच्या दर गोष्टीतच अतिसंस्कारी लोकांना काही ना काही आक्षेप घेण्यासारखं दिसणार हे उघड होतं. गंमत म्हणजे इतकं छळूनही काही उघड दिसणाऱ्या कापणेबल जागा यात ( बहुदा स्लॅन्ग लक्षात नं आल्याने) सुटून गेल्या आहेत. तेही कापलं गेलं असतं तर इथेही त्याची अवस्था 'एक्स मेन ओरिजिन्स- वुल्वरिन' मधल्या याच व्यक्तिरेखेच्या तोंड शिवलेल्या अवतारासारखी झाली असती.
हे का होतं, हे मला अजूनही लक्षात आलेलं नाही. सिनेमाला ज्या त्या गोष्टीसाठी जबाबदार धरायची आपल्याकडे पध्दत आहे हे मला माहीत आहे, आणि दर अपराध हा हिंदी, इंग्रजी सिनेमातले धडे घोकूनच होतो, हा ही आपला पारंपरिक विश्वास आहे. आर्ट इमिटेट्स लाईफ आपण मानत नाही , तर वास्तवच कलेवरुन नियमितपणे प्रेरणा घेत असल्याचं आपण गृहीत धरुन आहोत. ( सत्य बहुदा याच्या मधे कुठेतरी असावं. आर्ट इमिटेट्स लाईफ इमिटेट्स आर्ट .......असं वाटोळं फिरणारं हे चक्र असावं आणि त्यात कधी एक दुसऱ्याची नक्कल करत असेल, तर कधी दुसरा एकाची असा माझा तरी समज आहे) तरीही मला एक वाटतं, की गुन्हेगारी वर्गात मोडले जाणारे गुन्हे प्रेरीत करण्यासाठी चित्रपटांना एक वास्तववादाची पुसट का होइना, पण चौकट आवश्यक आहे, आणि ती चौकट नसेल, म्हणजेच चित्रपट फार उघडपणे फॅन्टसी वळणाने जात असेल, तर त्यापासून थेट गल्लोगल्ली प्रेरणा मिळणं अशक्य आहे. नाही म्हणायला सुपरहिरो अवतारात खांद्यावर टाॅवेल लटकवून शाळकरी मुलांनी उंचावरुन उडी मारणं, यासारख्या गोष्टी तर घडतच असतात, पण त्याला एक प्रकारचा अपघात म्हणता येईल. तोही शंभरातल्या नव्वद केसेसमधे टाळता येण्याजोगा. या प्रकारच्या प्राथमिक स्वरुपाच्या प्रभावाचा आक्षेप घ्यायचा तर आपल्याला डेडपूलसारखा गावगुंडच का, धुतल्या तांदळासारखा सुपरमॅनही चालणार नाही. त्यामुळे सध्या ते बाजूला ठेवू.
चुकीचा प्रभाव पडण्यासाठी वास्तववादाची चौकट आवश्यक आहे हे मी म्हणतो, ती कुठली, तर सांगतो. हा वास्तववाद म्हणजे सत्यजित राय किंवा मृणाल सेन यांच्या चित्रपटासारखा शंभर टक्के वास्तववाद नाही, जिथे प्रत्यक्ष शक्यतांपलीकडे आयुष्य जाऊच शकणार नाही. हा वास्तववाद भारतीय व्यावसायिक चित्रपटांच्या पलायनवादी दृष्टीकोनाशी जोडलेला आहे. यात वास्तवाचा एक वरवरचा आभास तर आहे, पण या आभासापलीकडे गेलेल्या अनेक शक्यता या चित्रपटात सूचित होतात. सुखांत शेवट असो, वा काळजाला हात घालणारा शोकांत, सामान्य मध्यमवर्गीय आयुष्यापलीकडे पोचणारा या सिनेमांचा रोख असतो. नायक हा तर बोलूनचालून प्रेक्षकाचा प्रतिनिधी, त्यामुळे प्रेक्षकाचं आयुष्य अधिक ग्लॅमरस कसं करता येईल याबद्दलच्या काही शक्य वाटणाऱ्या कल्पनाही त्यात असतात, आणि प्रेक्षकाला प्रेरणा मिळू शकते , ती अशा शक्य कोटीच्या आसपास फिरणाऱ्या अतिरंजीत कल्पनांमधूनच. एकदा का अशा हायब्रीड वास्तववादाची आपल्याला सवय झाली, की आपण त्यात गुंततो, त्यातल्या गोष्टी आपल्याला सरावाच्या होऊन जातात. मग तिथल्या नायकासारखं संमतीशिवाय नायिकेच्या मागे फिरणं वास्तवातही चालून जाईल असं वाटायला लागतं, किंवा भरधाव नियमांची पर्वा न करता मनमानी गाड्या चालवणं, वा कोणी आपलं एेकत नसल्यास त्याविरोधात कायदा हातात घेणं हेदेखील. सुपरहिरोपटांसारख्या फॅन्टसी चित्रपटांमधेही नायकाची अमुक तमुक शक्ती आपल्याला मिळावी असं पाहणाऱ्याला वाटू जरुर शकतं, पण ते वास्तव नाही, हेदेखील त्याच्या मनात पक्क बसलेलं असतं. त्यामुळे अशा सरळसरळ कळण्याजोग्या कल्पनारम्य चित्रपटांना कात्री लावणे अनावश्यक वाटतं.
असं वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे या काटछाटीने काय साध्य होतं , तर काहीच नाही. जर भावी पिढीवर या चित्रपटांमधून वाईट संस्कार होतील अशी भीती वाटत असेल तर संपूर्ण पिढीलाच नजरकैदेत ठेवायला हवं. याला कारण म्हणजे संस्कार करण्याची क्षमता असणाऱ्या सिनेमाहून अधिक प्रभावी, अशा इतर अनेक गोष्टी त्यांच्याजवळ आज आहेत. त्यातल्या दोन चटकन सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे इंटरनेट आणि गेमिंग. या दोघांचा प्रभाव वेगळ्या पध्दतीचा आहे, पण भीती वाटून घ्यायची म्हंटलं, तर तितकाच धोकादायक.
खरं म्हणजे यातला इंटरनेट हा एक मुद्दाच सेन्साॅर बोर्डाचं अस्तित्व अनावश्यक ठरवण्यासाठी पुरेसा आहे. सेन्साॅर बोर्ड हल्ली जरा अधिकच मन लावून काम करतय, हे अगदी साधेसाधे मराठी चित्रपटही युए ( किंवा क्वचित ए देखील) रेटिंग घेऊन अवतरतायत यावरुन लक्षात येईल. मग हाॅलिवुड वगैरेची तर बातच नको. गंमत म्हणजे ज्या मुलांपासून हे चित्रपट दूर ठेवण्यासाठी हे सेन्साॅर बोर्ड झटतय, त्या मुलांना काही महिन्यातच या सर्व आणि इतर शेकडो चित्रपटांच्या न काटछाट केलेल्या आवृत्त्या इन्टरनेटवर उपलब्ध होतायतच. आयट्यून्स वरुन खरेदी करणं, नेटफ्लिक्स सारखे अॉनलाइन चॅनल्स यांमुळे हे आता राजमार्ग झालेले आहेत. आणि आडमार्गाला जायचं तर विचारुच नका. तिथे जे उपलब्ध आहे त्याला तोडच नाही. मग या परिस्थितीत, घराघरात सर्व वयाच्या प्रेक्षकाला जे उपलब्ध आहे, ते १८ वर्ष वयावरच्या लोकांपर्यंत आणताना सेन्साॅरने का लाजावं हा प्रश्न उरतोच.
व्हिडिओ गेम्सचं आजचं स्वरुप हे आशय नियंत्रित करु पहाणाऱ्या मंडळींच्या लक्षात आलंय का, हा दुसरा तितकाच महत्वाचा प्रश्न. फोन्स, आयपॅड, यासारख्या छोट्या आणि त्यामानाने सिम्प्लीफाईड आवृत्त्यांबरोबरच कन्सोल गेमिंग हा एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. एक्स बाॅक्स , प्ले स्टेशन यासारखे कन्सोल्स आणि कम्प्यूटर्स यांवरचे खेळ या लोकांनी पाहिले आहेत का? चित्रपटात ज्या गोष्टी पाहायला सेन्साॅर बोर्ड आक्षेप घेतं, त्यातल्या बऱ्याच गोष्टी खेळणारी व्यक्ती नायकाच्या भूमिकेतून करु शकते. माणसं मारणं, गाड्या उडवणं, गुन्ह्यांच्या लुटुपुटीच्या योजना आखणं, खेळातल्या व्यक्तिरेखांना धमकावणं, असं सर्व काही इथे शक्य आहे. याचा परिणाम काय आणि किती खोलात जाऊ शकतो , याची चित्रपटांबरोबर तुलनाही होणारं नाही.
या दोन्ही माध्यमांना मी स्वत: आक्षेप घेत नाही, कारण पलायनवाद आणि करमणूक या दोन गोष्टी त्यांच्या मुळाशी आहेत. गेम्समधे व्हायलन्स असतो हे खरं, पण रिफ्लेक्सेस सुधारणं, स्ट्रॅटेजीचा विचार किंवा कथनशैलीचे धडे, आणि इतरही अनेक गोष्टी यातून शिकण्यासारख्या आहेत. त्याशिवाय चित्रपटांमधेही काय, कशासाठी कापावं हे ठरवणं बोर्डाला वाटतं तितकं सोपे नाही. डेडपूलसारख्या ( किंवा मागे आलेल्या किक-अॅस सारख्या चित्रपटातही) भाषा, किंवा हिंसा, हा एक प्रकारच्या दृक्श्राव्य शैलीचा भाग आहेत. कुब्रिकच्या क्लाॅकवर्क आॅरेन्जमधे सेक्स आणि व्हायलन्स मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्या मुळाशी प्रश्न आहेत ते सामाजिक नीतीमत्तेशी जोडलेले. विल ग्लकच्या इझी ए मधल्या शाळकरी नायिकेचं, स्वत:च्या खोट्या प्रेमप्रकरणाची जाहिरात करणं बेजबाबदारपणाचं वाटलं , तरी ते समजून घ्यायला हाॅथाॅर्नच्या द स्कार्लेट लेटर चा संदर्भ आवश्यक आहे. जेसन रिटमनच्या जुनो मधे पंधरा वर्षांची नायिका गरोदर असणं, याकडे आपल्याला धोक्याच्या घंटेपलीकडे जाऊन एका मनस्वी मुलीची प्रेमकथा म्हणून पाहता आलं पाहीजे.
या वरवर धोकादायक वाटणाऱ्या चित्रपटांमधलं काही कापणं, वा त्यांना वयोमर्यादांच्या तिढ्यात अडकवणं हे नुसतं या चित्रपटांचा परिणाम कमी करत नाही, तर चुकीच्या गोष्टींकडे प्रेक्षकाचं लक्ष वेधतं. या आधी जो प्रेक्षक एक गोष्ट म्हणून या चित्रपटाकडे बघत होता, तो आता काही दडवलेली गोष्ट म्हणून नव्याने त्याकडे पाहायला लागतो. मग ही गोष्ट कोणती हे तो इंटरनेटवर शोधतो आणि पाहून टाकतो. म्हणजे मूळ हेतू साध्य तर होत नाहीच वर उलटच काहीतरी होतं.
मला विचाराल तर आज गरज लोकांपासून काही लावण्याची नाही, तर जे त्यांच्यासमोर आहे, ते काय दृष्टिकोनातून पहाणं योग्य ठरेल, याविषयी बोलण्याची आहे. आपण जे बघतोय, त्याला काॅन्टेक्स्ट आणण्याची आहे. लपवाछपवीचे दिवस आता गेले हे जितक्या लवकर आपण मान्य करु , तितक्या लवकर या पुढच्या पायरीकडे वळणं आपल्याला शक्य होईल.
- गणेश मतकरी Read more...