टेरिबली हॅपी- भयपट!

>> Sunday, July 25, 2010

भयपट हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्यातले काही सांकेतिक संकल्पनांनाच नव्याने पडद्यावर आणून प्रेक्षकांची `पैसे वसूल` करमणूक करण्याचा प्रयत्न करतात, काही दृश्य चमत्कृती अन् तांत्रिक सफाईवर विसंबून प्रेक्षकांना थक्क करतात, काही पडद्यावरल्या भीतीप्रद दृश्यांना समाजाच्या तात्कालिन परिस्थितीला समांतर जाणारे सांकेतिक अर्थ देण्याचा प्रयत्न करतात, तर काही मनुष्यस्वभावातलेच गडद कोपरे शोधून आपल्यापुढे आरसा धरतात. माझा अनुभव आहे, की या चौथ्या प्रकारच्या चित्रपटांत आपल्याला अस्वस्थ करण्याची सर्वाधिक ताकद असते. मग पडद्यावरल्या घटना कितीही साध्या असल्या तरी फरक पडत नाही. त्या जे दाखवतात त्यापेक्षा त्या जे सुचवतात त्यातच आपण अडकून पडतो.
`टेरिबली हॅपी`(२००९) हा डेनिश चित्रपट या चौथ्या वर्गातला आहे. खरं तर तो तथाकथित भयपट नाही. त्याच्याकडे आपण क्राईम स्टोरी, निओ न्वार किंवा सायकॉलॉजिकल थ्रिलर अशा वेगवेगळ्या नावांखालीही पाहू शकतो. मात्र त्याची आपल्या सभ्यतेवरला पडदा बाजूला ओढून पलीकडला अंधार दाखविण्याची ताकद मला विलक्षण वाटते. त्या अंधाराच्या दर्शनानेच मी `टेरिबली हॅपी`ची रवानगी भयपटामध्ये करेन. एक वेगळ्या प्रकारचा भयपट, जो प्रकार तुम्ही नक्कीच पाहिला नसेल.
ही एका पोलीस अधिका-याची गोष्ट आहे. आणि एका खेडेगावाची. गाव अगदी छोटं. सगळे गावकरी एकमेकांना ओळखणारे (किंवा ओळखून असणारे). गावात नवीन आलेल्या माणसाला सहजी आपला न म्हणणारे. गावाला काय मानवेल अन् काय नाही याबद्दल त्यांच्या निश्चित कल्पना आहेत. त्यांचे स्वतःचे कायदे आहेत. ते मोडणा-यांना अर्थात शिक्षाही आहेत.
पोलीस अधिकारी रॉबर्ट (जेकब केडरग्रेन) गावात येतो तो काहीसा भूतकाळापासून पळत. इथे तो फार काळ राहीलशी अपेक्षा नाही.
रॉबर्टला गावात उघडंच एक उपरा म्हणून पाहिलं जातं. शिवाय होरगेन (किम बोदनिया) या प्रतिष्ठित गुंडांच्या पत्नीबरोबरचे, इन्गेलिस (लेन मारिआ किश्चन्सन) बरोबरचे त्याचे वाढते सलोख्याचे संबंध कोणालाच पाहावत नाहीत. गाव जणू त्याच्यासाठी रचलेला एक सापळा असल्यासारखं रॉबर्टला वाटायला लागतं. वरवरच्या निर्विकार चेह-यांमागे काही गुपितं दडल्यासाऱखी वाटतात, पण कोणती ते कळत नाही. अशातच, एका चमत्कारिक परिस्थितीत इन्गेलिसचा मृत्यू ओढवतो.
`टेरिबली हॅपी`चा विशेष हा की तो वरवर साध्या वाटणा-या प्रत्येक तपशिलाला एक वेगळ्या चष्म्यातून पाहतो. या चष्म्यातून पाहिलेली कोणतीच गोष्ट साधी-सोपी राहत नाही. उदाहरणार्थ एका बाहुल्याला बाबागाडीत घालून फिरवणारी मुलगी. एरवी यात काय विशेष आहे ? पण इथे सुचवलं जातं, की जेव्हा ही मुलगी आपल्या करकऱणा-या बाबागाडीला घेऊन गावात फिरते, तेव्हा तिचा बाप, तिच्या आईला मारहाण करीत असतो. किंवा दुसरं उदाहरण. गावाबाहेर एक दलदलीचा भाग आहे. आता यात तरी खास काय? पण जेव्हा गावातील माणसं अचानक बेपत्ता होत असल्याचं सुचवलं जातं, तेव्हा या गोष्टीलाही भलता अर्थ येतोच.
दिग्दर्शक हेन्रीक रुबेन गेन्झ आपल्या हाताळणीत काहीकाही गोष्टी उघडपणे सांगून टाकतो. या सांगण्यातून त्याला प्रेक्षकांचा एक दृष्टिकोन तयार करायचा आहे, ज्यामुळे शेवटाकडलं स्पष्टीकरण एका तर्काच्या चौकटीत बसू शकेल तो गावातलं वातावरण हे मुळातच चमत्कारिक असल्याचं दाखवून देतो. त्यातल्या माणसांच्या वागण्या बोलण्यात, हावभावात एक प्रकारचा तुटक त्रयस्थपणा आणून ठेवतो. जणू आपल्या नकळत या मंडळींचं काही कारस्थान चाललं असावं असं सुचवितो.
त्याचबरोबर रॉबर्टची घुसमट आपल्यालाही जाणवावी हा विचार त्याच्या कॅमेरा अँगल्सच्या निवडीतून स्पष्ट होतो. इथे काही महत्त्वाच्या, उघड्यावर घडणा-या प्रसंगाला परस्पेक्टीव जवळ जवळ पुसून टाकणारा- सरळ लावलेला कॅमेरा आहे. चार भिंतीतल्या बहुतेक प्रसंगात मात्र जाग डिस्टॉर्ट करणारे लो अँगल वापरले जातात. शॉटमध्ये वरचं छत दिसायला लागलं की दृश्यचौकट नेहमीच गर्दीची वाटायला लागते. अंगावर येते, क्लॉस्ट्रोफोबिक होते. या क्लृप्तीचा इथे चांगला वापर करण्यात आलेला दिसतो.
टाईपकास्टिंग किंवा टायपेज हीदेखील गेन्झने संयतपणे पण उत्तम प्रकारे वापरलेली युक्ती. इथली माणसं काय वागतात बोलतात याआधी ती कशी दिसतात याचा विचार केलेला आहे. त्यांचं दिसणं, त्यांच्या व्यक्तिरेखेला डिफाईन करतं. पुढे ती त्या दिसण्याला सुसंगत वागतात का विसंगत, हा दिग्दर्शकाच्या खेळीचा भाग झाला.
टेरिबली हॅपीमधला गुन्हेगारीचा उघड भाग सोडला तर `डिटीरीओरेशन` किंवा एखाद्या गोष्टीचं खराब होत जाणं, सडत जाणं हे इथलं मुख्य कथासूत्र वाटतं. मग हे सडत जाणं, कसलंही असेल. कदाचित एखाद्या वस्तीचं, एखाद्या नात्याचं, कदाचित आपल्याच डोक्यातल्या काही मूल्यांचं. इथल्या वातावरणातंच हा होऊ घातलेला विनाश पसरलेला आहे. तो आपल्याला जितका प्रकर्षाने जाणवेल, तितकं या चित्रपटाचं भयपट असणं आपल्याला पटत जाईल.
चित्रपटाचा सूर हा सतत काहीसा तिरकस लागलेला आहे. अगदी नावापासूनच म्हणाना. त्याला थेट विनोदी म्हणता येणार नाही, पण ब्लॅक ह्यूमरचा जाणवण्यासारखा वापर खूप ठिकाणी आहे.चित्रपटाचा शेवट ही त्यातली सर्वात स्पष्ट जागा. गंमत म्हणजे त्याला सुखांत किंवा शोकांत असं एखाद्या व्याख्येत बसवणं शक्य नाही. दिग्दर्शकाने रंगवत नेलेल्या खेळाचा, तो तर्कशुद्ध अंत आहे, इतकंच म्हणता येईल. त्याचं तर्कशास्त्र या चित्रपटाने रचत आणलेलं आहे. या कथानकाच्या चौकटीबाहेर त्याला अर्थ राहणार नाही. तरीही हा शेवट मूलभूत पातळीवर आपल्याशी संवाद साधतो. तो न्याय्य आहे की नाही यासंबंधी आपल्याला काय वाटतं हे जाणून घेऊ पाहतो. त्याचं होकारार्थी वा नकारार्थी उत्तर अर्थातच आपल्याला चित्रपटाविषयी काही सांगत नाही, उलट आपल्या स्वतःविषयीच मात्रं खूप काही सांगून जातं.

-गणेश मतकरी.

Read more...

द इन्सेप्शन- आर यू (स्टिल) वॉचिंग क्लोजली?

>> Sunday, July 18, 2010

फेसाळणा-या लाटा. जणू या लाटांनी वाहून आणल्यासारखा कुणीतरी समुद्रकिना-यावर पडलेला. आपला थकलेला चेहरा वर करून तो समोर पाहतो. वाळूत दोन लहान मुलं खेळताहेत. पाठमोरी. त्यांचे चेहरे आपल्याला दिसत नाहीत. याक्षणी आपल्या लक्षात येणार नाही, पण `चेहरे न दिसणं` हा तपशील खूपच महत्त्वाचा.
जवळजवळ लगेचच कोणीतरी बंदुक रोखतं, अन् या थकलेल्या माणसाला ताब्यात घेतलं जातं. एका प्रचंड सजलेल्या डायनिंग रुममध्ये कोणा वृद्ध जपानी गृहस्थासमोर आणून बसवलं जातं. थकलेल्या माणसाकडे सापडलेली गोष्ट म्हणून समोर ठेवली जाते, एक छोटीशी भिंगरी. वृद्ध ही भिंगरी ओळखतो. त्याने ती अनेक वर्षांपूर्वी पाहिलेली. त्याच्या तरुणपणी.
प्रेक्षकांना एव्हाना लक्षात यायला लागतं की आपल्यापुढे एकामागून एक ब-याच गोष्टी मांडल्या जातायत, ज्यांचा अर्थ आपल्याला आता समजला नाही, तरी त्यांची नोंद घेणं बहूदा खूपच आवश्यक आहे. प्रसंगाप्रसंगाबरोबर गुंता वाढत जाताना मग आपण सारं काही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायला लागतो. किना-यावरची पाठमोरी मुलं, वृद्धाचं वक्तव्य, भिंगरी, खोलीची सजावट, सारं सारं. आणि खरोखरंच त्यातल्या प्रत्येक गोष्टीला पुढे पटकथेत स्थान आहे. अगदी महत्त्वाचं. त्यामुळे चित्रपटाला पहिल्या सेकंदापासून आपण जितकं लक्षपूर्वक पाहू तितकी तो आपल्याला समजण्याची अधिक शक्यता आहे. क्रिस्टोफर नोलानच्या `द प्रेस्टीज` चित्रपटाची टॅगलाईन होती `आर यू वॉचिंग क्लोजली?` हा प्रश्न इन्सेप्शनच्या प्रेक्षकांनाही विचारण्यासारखा आहे. ` आर यू (स्टिल) वॉचिंग क्लोजली?`
क्रिस्टोफर नोलानचा `द इन्सेप्शन` हा सायन्स फिक्शनचा अवतार धारण करणा-या, पण प्रत्यक्षात तत्त्वचिंतनात्मक विषय केंद्रस्थानी असणा-या चित्रपटांच्या परंपरेतलाच एक आहे. अनेकदा. या चित्रपटांचं वैज्ञानिक रुप इतकं अस्सल असतं की `सायन्स फिक्शन` हा या चित्रपटाचा मर्यादित अजेंडा असल्याचा भास, ते पाहणा-याला व्हावा. प्रत्यक्षात त्यांची मजल एका विशिष्ट चित्रप्रकारापुरती अन् केवळ रंजनमूल्यांपुरती न राहता अधिक गहन विषयापर्यंत पसरलेली दिसते. क्लार्क/क्युब्रिकचा `२००१ः ए स्पेस ओडिसी`, फिलिप के. डिक/रिडली स्कॉटचा `ब्लेडरनर` वाचोस्की बंधूंचा `द मेट्रिक्स`, डिक/लिन्कलेटरचा `ए स्कॅनर डार्कली` अशी या चित्रपटांची अनेक उत्तम उदाहरणं देता येतील. क्रिस्टोफर नोलानचा नवा चित्रपट ही या यादीतली सन्माननीय भर ठरावा.
प्रसिद्ध गुन्हेगारी कथालेखक रेमन्ड चॅन्डलर यांनी आल्फ्रेड हिचकॉकबद्दल म्हटल्याचं ऐकिवात आहे, की त्याच्या कोणत्याही चित्रपटाचं रुपांतर, हे अखेरीस एका पाठलागात होतं. क्रिस्टोफर नोलानच्या चित्रपटांबद्दल उलट म्हणावं लागेल. त्याचे बहुतेक चित्रपट सुरुवातीपासूनच एका मोठ्या पाठलागासारखे `चेज मुव्हीज` असतात. मात्र त्यांच्या उलगडत जाण्याबरोबरच आपल्या लक्षात येतं, ते हा पाठलाग दुय्यम, केवळ एक रचना म्हणून वापरण्यात आल्याचं. नोलानचा आशय हा या रचनेपल्याड जाणारा, खूप गुंतागुंतीचा, अन् तरीही गुंतवणारा असतो.
`द इन्सेप्शन` मध्ये प्रत्येक गोष्ट नवी आहे अशातला भाग नाही. त्यात बराच कच्चा माल हा `मेट्रिक्स`च्या आधाराने, पण अधिक अद्ययावत कल्पना अन् तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मांडण्यात आला आहे. स्वप्नावस्था अन् वास्तव यांमधलं साम्य अन् विरोधाभास, स्वप्नातल्या मृत्यूचा वास्तवाशी जोडलेला संबंध, स्वप्नांमधून आतबाहेर करणा-यांचं तंत्र आणि तंत्रज्ञान, ट्रेनिंग, स्वप्नाच्या आवकाशात शक्य असलेले बदल, या सर्व संकल्पना मेट्रीक्समधे वापरण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गुरुत्त्वाकर्षणाला धाब्यावर बसवणा-या मारामा-या, स्लोमोशनचा उत्तम वापर, यादेखील गोष्टी मेट्रीक्समधे आहेत. मात्र फरक आहे, तो हे सगळं वापरण्याच्या तर्कशास्त्रात. मुळातंच मेट्रीक्सला पडलेले प्रश्नं आणि इन्सेप्शनला पडलेले प्रश्न हे सारखे नाहीत. मेट्रीक्स हा मानवाच्या मूलभूत पातळीवरल्या अस्तित्त्वाबद्दलच शंका उपस्थित करणा-या तात्त्विक, फिलॉसॉफिकल प्रश्नांना जवळ करणारा होता. इन्सेप्शनमधेही काही प्रमाणात अस्तित्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, पण तो मूलभूत पातळीवर, संपूर्ण मानवजातीला एकत्रितपणे पाहाणारा नसून अधिक व्यक्तिगत पातळीवरचा आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन इन्सेप्शनचा भर राहतो, तो आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो, त्यांच्या योग्यायोग्यतेशी संबंधित नैतिक, एथिकल प्रश्नांवर.
इन्सेप्शन आपल्या आशयाला सुसंगत रीतीने मांडण्यासाठी ब्लू-प्रिन्ट वापरतो. ती `हाइस्ट मुव्हीची`. एक जवळजवळ अशक्य वाटणारा चोरीचा आराखडा, नायकाने ती पार पाडून दाखवण्याचं आव्हान स्वीकारणं, मग आपल्याला हवी ती टीम उभी करणं, योजना आखणं, प्रत्यक्ष चोरी, त्यातून येणा-या अनंत अडचणी, अन् अखेर, असे या फॉर्म्युल्याचे टप्पे आहेत. इन्सेप्शन ते इमाने-इतबारे घेतो.
चित्रपटातला काळ हा नजिकचा भविष्यकाळ आहे. म्हणजे दिसायला, अथवा लोकांच्या वागण्याबोलण्याकडे पाहाता, तो तथाकथित फ्युचरिस्टिक नाही. पण या काळात, किंवा चित्रपटीय `when` मधे, चोरीची एक नवी शाखा अस्तित्वात आली आहे. ती म्हणजे डोक्यातल्या कल्पनांची, विचारांची चोरी. ती करायची, ती ज्याची कल्पना चोरायची त्याच्या थेट स्वप्नात जाऊन. या चोरांना एक्स्ट्रॅक्टर असं नाव आहे. अन् त्याचं स्वतःचं असं शास्त्र डेव्हलप झालेलं आहे. स्वप्नातला अवकाश उभा करणारे `आर्किटेक्ट`, विशिष्ट माणसांचा त्यांच्या सर्व लकबींसह आभास उभा करणारे `फोर्जर` माणसांना ठराविक वेळी/ठराविक वेळाकरता झोपवणारी अन् योग्य वेळी जागी करणारी गुंगीची औषधं पुरवणारे `केमिस्ट` यांची या उद्योगात महत्त्वाची भूमिका आहे.
चित्रपटाचा नायक आहे कॉब (लिओनार्दो डिकाप्रिओ) हा एक्स्ट्रॅक्टर. मात्र त्याच्यावर सायतो (केन वॉटानेब) या जपानी उद्योगपतीने सोपवलेली कामगिरी आहे, ती `एक्स्ट्रॅक्शन`ची नसून `इन्सेप्शन`ची. म्हणजे कल्पना चोरायची नसून, नवीन कल्पना पेरायची. या धंद्यातल्या लोकांच्या मते इन्सेप्शन अशक्य आहे. मात्र कॉबला ते शक्य वाटतं. त्याच्याच म्हणण्यानुसार त्याने यापूर्वी ते जमवलेलं आहे.
ज्याच्या मनात ही कल्पना पेरायची, तो असतो रॉबर्ट फिशर ज्युनिअर (सिलियन मर्फी). आपल्या वडिलांच्या प्रचंड कंपनीला बंद करून रॉबर्टने दुसरं काही करावं, अशी सायतोची इच्छा असते आणि हीच कल्पना रॉबर्टच्या डोक्यात बेमालूम पेरणं ही कॉबची कामगिरी. कॉबचं पूर्वायुष्य एका शोकांत घटनेने झाकोळलेलं असतं. रॉबर्टच्या कामगिरीचा मोबदला म्हणून सायतो आपली पापं धुवून काढण्याची एक संधी कॉबला देऊ करतो. मग वरवर अशक्य वाटणा-या कामगिरीसाठी चांगली टीम तयार कऱण्याचं काम सुरू होतं. मात्र प्रत्यक्ष कामगिरी, ही जीवावरच्या धोक्याची असते. कल्पना पुरेशी खोल रुजण्यासाठी स्वप्नातल्या स्वप्नातल्या स्वप्नात,म्हणजे तीन पातळ्या खाली जाणं आवश्यक असतं. फिशरचा सबकॉन्शस हा कॉबच्या टीमला प्रतिबंध करण्यासाठी स्वप्नातले विरोधक उभे करतो, मात्र त्यांच्यापासून वाचणं खूपच गरजेचं. स्वप्नातल्या इतक्या खोल पातळीवर आलेला मृत्यू, हा नायक मंडळींना कायमचं कोमात ढकलण्याचीही शक्यता असते.
इन्सेप्शनला तीन महत्त्वाच्या पातळ्या आहेत. प्रत्यक्ष अ‍ॅक्शनचा भाग, कामगिरीतलं अन् कॉबच्या भूतकाळातलं रहस्य आणि नैतिक प्रश्नांचा वेध. अर्थात नोलानने हे सगळं इतकं बेमालूमपणे एकमेकात मिसळलंय, की आपण काळजीपूर्वक पाहीपर्यंत या पातळ्यांचा वेगळेपणा आपल्याला चटकन जाणवत नाही. यातला पहिला मोठा नैतिक प्रश्न हा कामगिरीतच आहे. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात, जर हवी ती कल्पना घुसवता आली, तर व्यक्तिस्वातंत्र्याला काय अर्थ उरला? त्या व्यक्तीच्या हातून घडणा-या गोष्टींचा दोष मग कोणाकडे जाईल? या धाग्यावरून सुरुवात करीत इन्सेप्शन विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करतो. स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्या वागण्याचा दुस-यावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो ? प्रत्यक्ष घडणारा गुन्हा अन् आपल्या मनातला त्याविषयीचा विचार यातलं अधिक भयानक काय? अप्रत्यक्षपणे अन् चुकून हातून अपराध घडला, तर त्याला शिक्षा कोणती? असे विविध मुद्दे इथे हजेरी लावतात. ब-याच प्रमाणात रॉबर्टच्या गोष्टीपेक्षा कॉबच्या भूतकाळाचा भाग इथे अधिक प्रभावी ठरतो. त्याचं कारण पटकथा ही जवळजवळ पूर्णपणे कॉबवर केंद्रीत झालेली आहे. त्यामुळे दृष्ट लागण्याजोगा नटसंच असून त्यांच्याकडे पुरेशा तपशिलात पाहीलं जात नाही. खासकरून स्वप्नांचा अवकाश डिझाईन करणारी आरीआडने (हार्ड कॅंडी अन जुनोमधली एलेन पेज) अन कॉबचा सर्वात जवळचा सहकारी आर्थर (ब्रिक अन द लुकआउटमधला जोसेफ गार्डन लेविट) यांच्या भूमिका त्यांना अधिक वाव देणा-या असत्या तर बरं झालं असतं.
इन्सेप्शनचा दृश्य भाग हा वेधक आहे यात शंकाच नाही. मात्र मी या भागाला मेट्रीक्सचीच पुढली पातळी म्हणेन. त्यामुळे केवळ हा दृश्य भाग पाहण्यासाठी जाणा-यांना हे नेत्रसुख जरूर मिळेल, पण चित्रपटाची संकल्पनांच्या पातळीवरली भव्यता चित्रपटाशी पूर्णपणे समरस झाल्याखेरीज त्यांना मिळणार नाही. डोळ्यांपेक्षा डोक्याचा अधिक वापर इथे अपेक्षित आहे. तसं झालं, तरच इन्सेप्शन पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचेल.
अखेर एकच गोष्ट. ती म्हणजे चित्रपटाची अखेर. अनेकांना हा शेवट संभ्रमात टाकण्याची शक्यता जरुर आहे, कारण तो दोन परस्परविरोधी स्पष्टीकरणं एकाच वेळी पुढे करतो. यातला एक शेवट सांकेतिक अर्थाने सुखांत म्हणता येईल, तर दुसरा न्याय्य. जेव्हा अशा प्रकारचे परस्परविरोधी शेवट उभे केले जातात तेव्हा बहुतेक वेळा दिग्दर्शक त्याला स्वतःला कोणता शेवट अधिक पटतो याविषयी प्रेक्षकाला काही क्लूज सोडतो. मात्र त्याच शेवटाला धरून न राहता हवा तो शेवट निवडण्याची मुभादेखील देतो. इन्सेप्शनमध्ये ख्रिस्तोफर नोलान हेच करतो.चित्रपटातला अखेरचा शॉट कोणता आहे, अन् तो कोणत्या क्षणी संपवला जातो याचा विचार केला तर आपल्याला दिग्दर्शकाला काय अभिप्रेत आहे, हे कळू शकेल. मी मात्र तो सांगून टाकण्याचं पाप करू इच्छित नाही.

- गणेश मतकरी.

Read more...

नाईट अ‍ॅण्ड डे` - फॉर्म्युल्याप्रमाणेच

>> Sunday, July 11, 2010

एकाच महिन्यात आपल्याकडे `डे अ‍ॅण्ड नाईट` आणि `नाईट अ‍ॅण्ड डे` अशा दोन फिल्म्स पाहायला मिळाव्यात याची थोडी गंमत वाटते. अर्थातच नावाखेरीज दोघांमध्ये काही साम्य नाही अन् खरं तर नावातही नाही. कारण एकातली नाईट Night तर दुस-यातला नाईट हा Knight. पहिली टॉय स्टोरी भाग ३च्या आधी दाखविण्यात येणारी शॉर्ट फिल्म, तर दुसरा `समर ब्लॉकबस्टर` छापाचा खर्चिक चित्रपट.टॉम क्रूझ अन कॅमरून डियाज सारख्या मातब्बर मंडळींना घेऊन केलेला. शॉर्ट खूपच प्रायोगिक, अन् नव्या पद्धतीने आशय मांडणारी, तर चित्रपट बराच टिपिकल, फॉर्म्युलाला जवळ करणारा. तरीही नावातल्या माफक साम्याची गंमत वाटतेच. असो. आता `नाईट अ‍ॅण्ड डे` कुठल्या प्रकारात मोडतो याचं उत्तर शोधलं, तर `रोमॅन्टिक अ‍ॅक्शन कॉमेडी` असं लांबलचक उत्तर सापडेल. सांगण्यासारखी गोष्ट ही, की या चित्रपटाचे बरेचसे गुणदोष, हे या लांबलचक उत्तराशीच जोडलेले आहेत. रोमॅन्टिक कॉमेडी, अ‍ॅक्शन फिल्म या दोन फॉर्म्युला बेस्ड चित्रप्रकारांचं हे मिश्रण आहे. या दोन्ही प्रकारांची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यांची रचना कशी असावी, त्यात कोणकोणत्या घटकांना महत्त्वाचं स्थान असावं, याचे निश्चित आडाखे आहेत.
उदाहरणार्थ रोमॅण्टिक कॉमेडीमध्ये पात्रांचं प्रथम भेटणं, त्यांच्यातील बेबनाव, त्यांच्या नात्याने घेतलेले टप्पे याला महत्त्व आहे. एखादी रोमॅण्टिक कॉमेडी दुस-याहून वरचढ तेव्हा ठरते, जेव्हा ती या घटकांचा वापर करताना त्यात तोच तोच पणा येऊ देत नाही, व्यक्तिरेखा अधिक विश्वसनीय घडवते. प्रमुख पात्रांमध्ये वाढत जाणारा रोमान्स हा चित्रकर्त्यांच्या मर्जीनुसार चाललेला नसून एका नात्याचा खरोखरचा आलेख असल्याचा आभास तयार करते.
अ‍ॅक्शन फिल्ममध्ये महत्त्व असतं सेट अ‍ॅक्शन प्रसंगांना. ते अमूक इतक्या प्रमाणात असावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. त्यामुळे ब-याच अ‍ॅक्शन चित्रपटांत पात्र पार्श्वभूमीला ढकलली जाण्याचा धोका असतो. तो टाळण्याकरीता मग या अँक्शन प्रसंगाच्या अधला मधला वेळ वापरावा लागतो.
मात्र एकदा का हे दोन फॉर्म्युले एकत्र आले की बिकट प्रसंग येतो. दोन्ही फॉर्म्युलातले आवश्यक घटक घेता घेताच पटकथेचा बराचसा भाग खर्ची पडतो, अन प्रेक्षकांना पात्रांशी समरस होण्यासाठी आवश्यक अशी जी भावनिक गुंतवणूक तयार होण्याची अपेक्षा असते तिला पुरेसा वेळच मिळत नाही. नाईट अ‍ॅण्ड डेचं देखील हेच होतं.
इथला नायक आहे रॉय मिलर (टॉम क्रूझ) तर नायिका जून हेवन्स (कॅमरून डियाज). इथे मला एक प्रश्न पडतो. पटकथेत पुढे उघड होतं, की नायकाचं मूळ आडनाव नाईट (Knight) आहे. मग नायिकेच्या नावात `डे` का नाही? किंवा त्यांना परस्पर विरोधी प्रवृत्ती दाखविण्यासाठी नाईट अन् डे वापरायचे आहेत असं मानलं, तर स्पेलिंग वेगळ्या नाईटचं कशाला?किंवा नाईटचा संबंध `नाईट इन शायनिंग आर्मर` या वाक्र्प्रचाराशी किंवा मिलरच्या हेर असण्याशी संबंधित असला, तर मग त्याचं नाव नाईट दाखविण्याचा अट्टाहास कशाला? जेव्हा आपल्याला असे प्रश्न पडायला लागतात, तेव्हा एकतर चित्रकर्ते स्वतःला फार हुशार समजत असतात, किंवा अनेकांच्या ब्रेनस्टोर्मिंगमधून चित्रपट तयार झाल्याने अनेक कॉन्ट्रॅडिक्टरी कल्पना त्यात घुसलेल्या असतात. या प्रसंगी आपण एकच करू शकतो, ते म्हणजे तपशिलात जाणं टाळणं.
तर जून बॉस्टनला आपल्या बहिणीच्या लग्नाकरीता निघालेली आहे. विमानतळावर तिची अचानक मिलरशी गाठ पडते. आता ही गाठ काही फार अचानक पडत नाही, मिलरचा यामागे काही हेतू असतो. जून आणि मिलर एकाच विमानातून निघतात. विमानात माणसं फारच कमी, अन् असतात ती देखील मिलरला खलास करण्यासाठी नेमलेली. जून वॉशरुममध्ये असताना मिलरवर हल्ला होतो अन् तो पायलटसकट सर्वांना मारून टाकतो. बाहेर आलेल्या जूनला ड्रग करतो अन् विमान एका शेतात उतरवतो.
मिलर, त्याच्याच सांगण्याप्रमाणे एफ.बी.आय.साठी काम करतो. मात्र काही कारणाने त्याच्या सहका-यांचा गैरसमज झालाय, अन् त्याला ताब्यात घेण्याचा हुकूम निघालाय. घरी परतलेल्या जूनच्या मागे लवकरच मिलरचे एफ.बी.आय.मधले सहकारी लागतात अन् तिला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा हस्तक्षेप करणं मिलरला भाग पडतं.
मी मघा तपशिलात न जाण्याचा जो सल्ला दिला, तो इथे फार उपयोगी आहे. फिल्मचा वास्तवाशी काही संबंध नाही असं मानलं तरीही इथे तर्काला धरून गोष्टी होत नसल्याचं आपल्याला सतत जाणवत राहतं. उदाहरणार्थ विमानातले तुरळक लोक एफ.बी.आय.चे मारेकरी असल्याचं मिलरसारख्या सावध हेराला आधी का कळू नये ? एफ.बी.आय.ला मिलरला पकडण्याकरीता याहून सोपा मार्ग मिळाला नसता का? जूनच्या मागे एफ.बी.आय. लागणार हे मिलरला माहीत असताना, अन् ती जीवावरच्या संकटात येऊ नये अशी इच्छा असताना, तो तिला घरी का जाऊ देतो? असे अनेक प्रश्न आपल्याला इथे पदोपदी पडतात. सतत काहीतरी घडवत राहून प्रेक्षकांना त्यात गुंतवणं ही `नाईट अ‍ॅण्ड डे` ची स्ट्रेटेजी आहे, जी चित्रपटाच्या प्रभावाला मारक ठरणारी आहे.
रोमॅन्टिक कॉमेडीचा भर जरी नायक-नायिकेवर असला, तरी अनेकदा त्यात सहायक पात्रं महत्त्वाची भूमिका बजावतात. नायक नायिका एकत्र नसताना खासकरून या पात्रांचा उपयोग होतो. नाईट अ‍ॅण्ड डेमध्ये ती शक्यता असलेली दोन पात्रं आहेत. जूनचा अग्निशमन दलातला मित्र, आणि तिची लग्न ठरलेली बहीण. मात्र या पात्रांच्या वाट्याला जेमतेम एखाददुसरा प्रसंग येतो कारण उरलेली सर्व जागा अ‍ॅक्शन प्रसंगांनी संपवलेली आहे.
मात्र हे सगळे दोष असूनही `नाईट अ‍ॅण्ड डे` बघू नये असं मात्र मी म्हणणार नाही. क्रूझ आणि डिआज यांचं कास्टिंग ही इथली जमलेली गोष्ट आहे. सतत कुठल्या ना कुठल्या अ‍ॅक्शन प्रसंगात सापडण्याच्या आसपास जो मोकळा वेळ मिळतो, त्याचा जमेल तितका वापर करून त्यांनी व्यक्तिरेखांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक जेम्स मॅन्गोल्डनेही संगणकीय अ‍ॅक्शनमधून जागा काढून या दोघांचे प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही जागा मर्यादित असल्याने तो त्याचा सदुपयोग किती प्रमाणात करू शकेल यालाही मर्यादा आहेतच.
अ‍ॅक्शनदेखील ब-यापैकी आहे. संगणकाच्या चतुराईची सवय झाल्याने त्यात कोणतीच गोष्ट थक्क करून सोडत नाही, हे मात्रं खरं.
एकदा का आपण `रोमॅन्टिक अ‍ॅक्शन कॉमेडी` या फॉर्म्युलाला स्वीकारलं, की आपसूकच `नाईट अ‍ॅण्ड डे` ला स्वीकारणं आपल्याला भाग पडतं. कारण फॉर्म्युल्याकडून असणा-या सर्व अपेक्षा तो पु-या करतो. आता मुळात फॉर्म्युल्यालाच स्वीकारावं की नाही, हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

-गणेश मतकरी.

Read more...

द प्रेस्टीज - आर यू वॉचिंग क्‍लोजली?

>> Sunday, July 4, 2010

चित्रपट चांगल्या दिग्दर्शकाने बनवला असला, तर तो अंतिमतः सर्वच बाबतींत यशस्वी झाला नाही, तरी त्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या असतात. त्यातलं दिग्दर्शकाचं कौशल्य हे कौतुक करण्यासारखं असतं. किंबहुना अनेकदा या चित्रपटांचं अपयश हे एखाद्या सामान्य कुवतीच्या दिग्दर्शकाच्या यशापेक्षाही अधिक नेत्रदीपक असतं. क्रिस्ट्रोफर नोलानचा "द प्रेस्टीज' हे अशा भव्य अपयशाचं उदाहरण म्हणावं लागेल.
"द प्रेस्टीज'मध्ये आपलं लक्ष खिळवून ठेवणाऱ्या खूप जागा आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला घडणाऱ्या कथानकात जान आणण्यासाठी बारकाईने उभारलेले कालाचे तपशील आहेत, नोलानच्या गाजलेल्या "मेमेन्टो' प्रमाणे एका रेषेत न उलगडणारी पटकथा आहे, उत्कृष्ट चित्रीकरण आहे, तोडीचा अभिनय आहे, दिग्दर्शकीय दृष्टिकोनही आहे. पण तरीही चित्रपट आपल्या शेवटात कमी पडतो. आणि या कमी पडण्याची मुळं त्यांच्या एकूण आकारातच जागोजाग पसरलेली आहेत.
प्रेस्टीजचं कथानक हे दोन जादूगारांशी संबंधित आहे. रुपर्ट (ह्यू जॅकमन) आणि आल्फ्रेड (क्रिश्‍चन बेल) या दोघांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांवर हा पूर्ण चित्रपट आधारित आहे. मात्र त्याची रचना ही खास आहे. चित्रपटाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही जादूचे तीन भाग असतात. द प्लेज, द टर्न आणि द प्रेस्टीज. प्लेज म्हणजे तयारी, सेट अप, जिथे जादूगार प्रेक्षकांना विश्‍वासात घेऊन आपण काय करणार आहोत हे सांगतो, त्यांच्या मनाची तयारी आणि थोडी वातावरणानिर्मिती करतो. टर्न ही प्रत्यक्ष जादू. म्हणजे एखाद्या वस्तूला अदृश्‍य करायचं, तर ते करण्याची क्रिया म्हणजे टर्न. मात्र ही प्रक्रिया "टर्न'मध्ये पुरी होत नाही. प्रेक्षक जादूगाराला तेव्हाच मानतो, जेव्हा तो ही अदृश्‍य वस्तू पुन्हा दृश्‍य करेल, प्रेक्षकांसमोर सादर करेल. हा तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रेस्टीज, जो जादूगाराची जादू पूर्णत्वाला नेईल.
प्रेस्टीज चित्रपटात दिग्दर्शकाने जादूची ही तीन भागांतली रचनाच आपल्या पटकथेच्या ढाच्यासाठी वापरली आहे. पटकथेच्या पहिल्या भागात रुपर्ट, त्याची बायको आणि आल्फ्रेड हे एका जादूगाराचे मदतनीस म्हणून काम पाहत, आपणही मोठे होण्याची स्वप्नं पाहताहेत. एकदा आल्फ्रेडच्या चुकीमुळे रुपर्टच्या बायकोला आपला प्राण गमवावा लागतो आणि रुपर्ट पिसाळतो. दुसऱ्या भागात रुपर्ट कोलोराडो स्प्रिंग्जमध्ये निकोला टेस्ला या वैज्ञानिकाच्या शोधात येऊन पोचला आहे. टेस्लाने आल्फ्रेडला त्याच्या एका प्रयोगासाठी एक चमत्कारी यंत्र बनवून दिल्याचा रुपर्टला सुगावा लागलेला आहे, आणि रुपर्ट टेस्लाचं मन वळवून त्याहूनही चांगलं यंत्र बनवून घेण्याच्या प्रयत्नांत आहे. आणि तिसऱ्या भागात रुपर्ट आपल्या जादूच्या प्रयोगादरम्यान मरण पावलेला आहे, आणि याचा आळ आल्फ्रेडवर आहे. आल्फ्रेडला यात मृत्युदंड मिळण्याची शक्‍यता फारच मोठी आहे.
आता ही मुळातली तीन भागांतली रचनादेखील दिग्दर्शकाने जशीच्या तशी वापरलेली नाही, तर तिचे अनेक तुकडे करून त्यांना पुढेमागे पसरून विषयाची गुंतागुंत चिकार वाढवली आहे. ही गुंतागुंत वाढवण्याचा उघड हेतू म्हणजे, यातलं रहस्य या गुंत्याआड लपवणं. दुर्दैवानं ते लपत तर नाहीच, वर चित्रपटाच्या "आर यू वॉचिंग क्‍लोजली' या टॅग लाइनला अनुसरून क्‍लोजली पाहणाऱ्यांना ते हळूहळू स्पष्ट दिसायला लागतं. तरीही मी म्हणेन की चित्रपट फसतो तो यामुळे नाही, निदान केवळ यामुळे नाही.
प्रेस्टीजमध्ये दोन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांची स्वतंत्र रहस्य आहेत. आल्फ्रेडचं रहस्य हे त्या मानानं साधं असलं, तरी चित्रपटाच्या तर्कशास्त्रानुसार अतिशय योग्य म्हणता येईलसं आहे. ते ओळखण्यासाठी दिग्दर्शकानं अनेक खुबीच्या जागा शोधल्या आहेत, ज्या एक तर अप्रत्यक्षपणे रहस्याकडे बोट दाखवतात. किंवा त्यांचं तर्कट हे रहस्याच्या उलगड्याशी समांतर जाणारं आहे. पिंजऱ्यासकट पक्षी गायब करण्याची जादू ही यातली अशीच एक जागा, जिचा संदर्भ सरळ पाहता स्पष्ट होत नाही; पण पुढे तिचा अनेक पदरी अर्थ आपल्याला जाणवायला लागतो.
याउलट रुपर्टचं रहस्य हे उगाचंच गोंधळ वाढवत नेणारं, आणि अंतिम क्षणी तकलादू ठरणारं आहे. या रहस्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे, यातल्या जादूचं विज्ञान काल्पनिकतेकडे किंवा सायन्स फिक्‍शनकडे झुकणं. प्रेस्टीजचा इतर सर्व भाग, हा अमुक काळात घडणारी एक थरारक गोष्ट म्हणून योग्य वाटणारा आहे. मात्र रुपर्टचं टेस्ला प्रकरण हे या कथेच्या मूळ प्रवृत्तीलाच अपायकारक ठरतं. शिवाय या प्रकरणाला समाधानकारक तिसरा अंकच नाही. "लक्षपूर्वक पाहणाऱ्याला' टेस्लाचं यंत्र काय करतं, आणि त्याचे परिणाम काय होणार, याचा पत्ता सहजपणे लागतो. खरंतर एका अर्थानं पाहायचं तर हा भाग विचार करायला लावणारा आहे. विज्ञानानं जादूची जागा घेणं, आणि खोट्या जादूची सवय झालेल्या जादूगारांनी आणि प्रेक्षकांनीही खरी जादू समोर येताच हतबल होणं, या दोन्ही कल्पना उत्कंठावर्धक आणि कथा पुढे नेण्याची शक्‍यता असणाऱ्या आहेत. मात्र त्यांचा म्हणावा तितका वापर "प्रेस्टीज' करत नाही.
त्यामुळे अखेर "प्रेस्टीज'चं स्वरूप दोन भिन्न प्रकृतीच्या रहस्यांचं सोयीनुसार केलेलं मिश्रण, असं होतं आणि चित्रपट फसतो.
तरीही "प्रेस्टीज' पाहताना आपण कंटाळत नाही. क्रिस्ट्रोफर नोलान त्याच्या पोतडीतल्या अनेक करामतींनी आपल्याला पाहतं ठेवतो. कथानकाच्या गुंतागुंतीत एक प्रकारचा उथळपणा असला तरी प्रमाणबद्धता आहे. उदाहरणार्थ तीनही भागांना जोडणारं डायरीवाचन. रुपर्टनं टेस्लाकडे जाताना वाचलेली आल्फ्रेडची डायरी, आणि आल्फ्रेडनं तुरुंगात वाचलेली रुपर्टनं टेस्लाबरोबर घालवलेल्या काळाची डायरी, यांचा पटकथेतला वापर वाखाणण्याजोगा आहे. हे वाचन केवळ प्रसंगांना एकमेकांशी जोडत नाही, तर आपल्याला घडलेल्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतं.
त्याचप्रमाणे यातल्या घटनांचा वेग आणि जागोजागी येणारी अनपेक्षित वळणं जरी आपल्याला यातल्या व्यक्तिरेखांच्या भावनिक बाजूशी समरस होऊ देत नसली (ही चित्रपटातली एक मोठी त्रुटी आहे) तरी या पटकथेच्या पसाऱ्याचा प्रेक्षकांना सहज समजलेशा रीतीनं ठेवलेला माग, हीदेखील गोष्ट पाहण्यासारखी आहे.
चित्रपटात आणखी एक लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे, जो नोलान पूर्णतः विचारात घेत नाही, केवळ एका ठिकाणी उल्लेख करून सोडतो, तो म्हणजे यातल्या नायकांच्या झपाटलेपणाचं स्वरूप. यांच्या वैराची सुरवात होते. ती रुपर्टच्या पत्नीच्या मृत्यूमुळे आणि या गोष्टीसाठी आल्फ्रेडचा बदला घेणं, हेच त्याच्या डोक्‍यात असतं. मात्र पुढे हा बदला निमित्तमात्र उरतो आणि दोघे केवळ एकमेकांचे पाय ओढणं, याला जीवनाची इतिकर्तव्यता मानायला लागतात. रुपर्ट जेव्हा आपल्या सहायिकेला (स्कार्लेट जोहान्सन) आल्फ्रेडचं रहस्य शोधण्यासाठी हेर म्हणून पाठवायचं ठरवतो, त्या प्रसंगात हे उघड होतं. रुपर्टचा हेतू आता केवळ बदल्यापुरता उरलेला नाही. हा प्रसंग महत्त्वाचा आहे. तो या कथासूत्राच्या कथेच्या चौकटीबाहेरही खरा असल्याने माणसं चुकीचा रस्ता निवडताना अमुक एक कारण पुढे करतात, ते अनेकदा केवळ त्यांच्या मनाचं समाधान करण्यापुरंत खरं असतं. पुढे कारण विस्मृतीत जातं, पण रस्ता सुटत नाही.
"प्रेस्टीज' हा नोलानचा सर्वोत्तम चित्रपट निश्‍चित नाही, तो मान आज तरी काहीशा प्रायोगिक, पण अतिशय लोकप्रिय ठरलेला मेमेन्टोकडे जातो. किंबहुना गुणवत्तेनुसार याचा नंबर बराच खाली लागेल. तरीही "प्रेस्टीज' पाहण्यासारखा ठरतो. याचं कारणही नोलानच. मी मघा म्हटल्याप्रमाणे या अंतिमतः फसलेल्या चित्रपटातही अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. अर्थात आपण लक्ष देऊन पाहिलं तरंच. "सो, आर यू वॉचिंग क्‍लोजली?'

-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP