पुन्हा एकदा क्रांती!

>> Monday, January 28, 2008"व्ही फॉर व्हेन्डेटा' हा चित्रपट आपल्या डोंबिवली फास्ट आणि रंग दे बसंती या दोन्ही क्रांतिवादी चित्रपटांपेक्षा काही बाबतींत खूपच वेगळा आहे. एक तर तो त्यांच्यासारखा वास्तववादी नाही, तर फॅन्टसीच्या अधिक जवळ जाणारा आहे. ते साहजिकही आहे. कारण तो ऍलन मूरच्या ज्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे, ते घडतं एका काल्पनिक इंग्लंडमध्ये 1997-98 च्या सुमारास.काही वेळा हिंसा हेच एकमेव उत्तर असतं, असं सांगणारे चित्रपट एकाएकी अवतरायला लागले आहेत. अचानक समाजाच्या सर्व थरांतूनच नव्हे; पण विभिन्न प्रांतांतूनही हा आवाज उमटायला लागला आहे. एका मराठी आणि एका हिंदी चित्रपटानंतर आता हा संदेश देणारा चित्रपट आहे इंग्रजी, तोही हॉलिवूडचा. व्ही फॉर व्हेन्डेटाफ चित्रपटाच्या पोस्टरवरली टॅगलाईनच त्यांना काय म्हणायचंय ते स्पष्ट करते. पीपल शुड नॉट बी अफ्रेड ऑफ इट्‌स गव्हर्न्मेंट, गव्हर्न्मेंट शुड बी अफ्रेड ऑफ इट्‌स पीपलफ असं सांगणारा हा चित्रपट. (खरं पाहता हे वाक्‍य थोडं टोकाचं आहे, कारण खऱ्या सुराज्यात सरकार किंवा जनता कोणीच कोणाला घाबरायची गरज नाही. मात्र, हेच वाक्‍य आपण अफ्रेडऐवजी अकाउंटेबल हा शब्द घालून वाचलं तर अधिक पटण्यासारखं आहे.)मात्र, व्ही फॉर व्हेन्डेटाफ हा चित्रपट आपल्या दोन्ही क्रांतिवादी चित्रपटांपेक्षा काही बाबतींत खूपच वेगळा आहे. एक तर तो त्यांच्यासारखा वास्तववादी नाही, तर फॅन्टसीच्या अधिक जवळ जाणारा आहे. ते साहजिकही आहे. कारण तो ऍलन मूरच्या ज्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे, ते घडतं एका काल्पनिक इंग्लंडमध्ये 1997-98 च्या सुमारास. या जगातल्या इतर महासत्तांनी स्वतःचा नायनाट करून घेतला आहे आणि इंग्लंड हेच एकमेव मोठं राष्ट्र उरलेलं आहे. त्यांचा राष्ट्रप्रमुख त्यांना इतर जगापासून सुरक्षित ठेवण्याचं वचन देतो; पण लोकांच्या स्वातंत्र्यावर पूर्ण आळा घालून, हुकूमशाही पद्धतीनं, हिटलरी मार्गानं चालून.वाचॉस्की बंधूंनी रूपांतर करताना यातली आपल्या आसपासच्या काळातल्या वेगळ्या; पण समांतर काल्पनिक विश्‍वाची कल्पना बदलली आहे. (बहुधा ती त्यांच्या आधीच्या चित्रपटातल्या मेट्रिक्‍समधल्या समांतर संगणकीय विश्‍वाशी खूप जवळ जाणारी वाटेलशी त्यांना भीती वाटली असावी.) आणि हे इंग्लंड भविष्यकाळातलं असल्याचं सुचवलं आहे. अर्थात, हा भविष्यकाळ विज्ञानपटांमधल्या नेहमी पाहायला मिळणाऱ्या भविष्यकाळासारखा उडत्या गाड्या वगैरे असणारा नाही, तर जवळजवळ आजच्या जगासारखाच आहे. प्रमुख बदल आहेत जे राजकीय, इतर फार नाहीत. वातावरण मात्र गढूळ, काळवंडलेलं आहे. सगळ्याच बाबतीत.व्हेन्डेटाफचं ग्राफिक नॉव्हेल पाहिलं तर आपल्याला हा पुस्तकांचा प्रकार किती प्रगल्भ होत चालला आहे याची कल्पना येईल. समाजबदलाच्या शक्‍यता, राजकारण, स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दलचं चिंतन, प्रतीकात्मकता, रहस्य आणि नाट्यमयता यांनी व्ही फॉर व्हेन्डेटाफची चित्रकादंबरी खच्चून भरली आहे. ऍलन मूरच्या बहुतेक ग्राफिक नॉव्हेल्समध्ये या प्रकारच्या विचारांना चालना देणारा आशय पाहायला मिळतो. वॉचमेन, फ्रॉल हेल, लीग ऑफ एक्‍स्ट्रॉऑर्डिनरी जन्टलमेन अशा त्याच्या विविध पुस्तकांना अमाप प्रसिद्धी मिळालेली आहे. मात्र, त्याचं त्यावरून केलेल्या चित्रपटांबरोबर मात्र फारसं जमत नसावं. इथंही मूरनं चित्रपटापासून दूर राहणंच पसंत केलं आहे. इतकं, की श्रेयनामावलीतही त्याचं नाव आलेलं नाही. मात्र, व्हेन्डेटाचं श्रेय प्रथम द्यायला हवं ते मूरलाच.व्हेन्डेटाचे नायक आहेत व्ही (ह्यूगो विहींग) आणि इव्ही (नॅटली पोर्टमन). व्ही आहे एक बंडखोर जो हुकूमशहा सटलर आणि त्याच्या माणसांशी जवळजवळ एकटा टक्कर देतोय. व्हीने गाय फॉक्‍स या 1605 मध्ये पार्लमेंट उडवून देण्याचा कट रचणाऱ्या क्रांतिकारकापासूनच या लढ्याची स्फूर्ती घेतली आहे. (रंग दे बसंती आठवतोय?) त्यामुळे तो सर्व वेळ गाय फॉक्‍सच्या सस्मित चेहऱ्याचा मुखवटा लावूनच वावरतोय. चित्रपटाच्या सुरवातीला व्ही काही सरकारी गुंडांपासून इव्हीला वाचवतो आणि तिला बरोबर घेऊनच एक सरकारी इमारत उद्‌ध्वस्त करण्याची योजना पार पाडतो. तारीख असते पाच नोव्हेंबर (पाच नोव्हेंबर या तारखेला विशेष अर्थ आहे, कारण गाय फॉक्‍सनं आखलेल्या योजनेचीही हीच तारीख होती. अजूनही त्या तारखेला इंग्लंडमध्ये फॉक्‍सची आठवण घेतली जाते. त्या घटनेवर एक चार ओळींची लोकप्रिय कविताही म्हटली जाते जिचा वापर चित्रपटातही आहे. ती अशी...रिमेम्बर, रिमेम्बर द फिफ्थ ऑफ नव्हेम्बर,द गनपाउडर ट्रिझन ऍन्ड प्लॉट,आय सी ऑफ नो रिझन, व्हाय गनपाउडर ट्रिझन,शुड एव्हर बी फरगॉट.या घटनेनंतर व्ही आणि इव्ही दोघांचाही शोध सुरू होतो. व्ही ची योजना असते ती पुढल्या पाच नोव्हेंबरपर्यंत लोकांना सरकारी जाचातून सोडवण्याची, ज्या कामात तो इव्हीची मदत मागतो; पण इव्हीची हिंमत होत नाही. ती पळ काढते. व्ही आपल्या योजनेवर ठाम असतो.इफेक्‍ट्‌सची रेलचेलवाचोस्की बंधूंची मेट्रिक्‍स चित्रत्रयी सर्वांत परिणामकारक होती ती त्यातल्या पहिल्या चित्रपटात, ज्याला विज्ञानपटाचं रूप तर होतं; पण अनेक तत्त्वशास्त्रीय आणि सामाजिक प्रश्‍नांची चर्चाही होती. पुढल्या दोन चित्रपटांत खास करून रेव्होल्यूशन्समध्ये यातला वैचारिक भाग संपून गेला आणि केवळ इफेक्‍ट्‌सची रेलचेल उरली. मेट्रिक्‍स आणि व्हेन्डेटामध्ये रचना आणि विचारांच्या दृष्टीनं बराच सारखेपणा आहे. सर्वांत महत्त्वाचं साम्य आहे ते हे, की दोन्हींच्या केंद्रस्थानी असणारा प्रश्‍न एकच आहे. सुरक्षित आयुष्याच्या कल्पनेसाठी आपण आपल्या स्वातंत्र्याची किंमत देणं योग्य आहे का? असं मेट्रिक्‍स आणि व्ही फॉर व्हेन्डेटा हे दोघंही विचारतात. त्याखेरीज इथं अनेक चमकदार कल्पनांची रेलचेलही आहे. एका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या इमारतीचा नाश करण्यासंबंधातला युक्तिवाद हा इमारतीची तुलना ही प्रतीकाशी करतो. जणू तिला नष्ट करणं हे सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाचा प्रतीकात्मक विनाश करण्यासारखं आहे. हे किती खरं आहे, हे आपल्याला 2001 च्या 11 सप्टेंबरला दिसलंच, जिथं एका दहशतवाद्यानं (की क्रांतिकारकानं?) एका मोठ्या राष्ट्राच्या दोन इमारतींचा नाश करून ज्यांना हतबल करून सोडलं. त्या प्रसंगात मनुष्यहानीचा भागही होता; पण वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखं जागतिक वर्चस्वाचं प्रतीक गेल्यानं अमेरिकेत मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना पसरली हेदेखील होतंच.याचा अर्थ व्हेन्डेटा हा एकाच वेळी दोन पातळ्यांवर पाहता येतो. पहिल्या पातळीवर तो केवळ एक चित्तथरारक गोष्ट सांगतो, ज्यात एकटा माणूस व्हिलन कंपनीला पुरून उरतो, तर दुसऱ्या पातळीवर तो आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी संबंधित अनेक प्रश्‍नांची चर्चा करतो. या दोन्ही पातळ्या चित्रपटात सर्वत्र कार्यरत नाहीत किंवा कधी त्यातली एक पातळी दुसरीहून वरचढ ठरते; पण चित्रपटात त्या दोघांचंही अस्तित्व जाणवत राहतं.मेट्रिक्‍स बदनाम झाला तो इफेक्‍ट्‌सच्या अतिरेकानं आणि संगणकीय परिभाषेचा त्यातला सततचा वापर हा संगणक येण्यापूर्वीच्या पिढीला जाचक वाटला म्हणून. या दोनही अडचणी इथं नाहीत. इथं इफेक्‍ट्‌स आहेत; पण ते अदृश्‍य स्वरूपाचे. म्हणजे त्यांना अधोरेखित न करता केवळ प्रसंगाच्या परिणामात भर टाकण्यासाठी वापरलेले. मेट्रिक्‍स छापाची मारामारी फक्त शेवटाजवळ एकदा येते; पण ती फार वेळ चालत नाही आणि त्यातला बंदुकांऐवजी असणारा चाकूंचा वापर त्याचं दृश्‍य परिणाम रेखीव करतो.या चित्रपटाचं दिग्दर्शन वाचोस्कींनी केलेलं नाही. जेम्स मॅकटीग या त्यांच्या पूर्वीच्या सहायकानं ती जबाबदारी चांगल्या रीतीनं पार पाडली आहे. वाचोस्कींनी निर्मिती आणि संहितेची जबाबदारी घेतलेली आहे. व्हेन्डेटाला पटकन समजण्याजोग्या पटकथेत बसवणं हे काम कठीण होतं, कारण मूळ कादंबरीचा पसारा फार मोठा आहे. चालू काळात वर्षभर घडणाऱ्या गोष्टी, दोन्ही प्रमुख पात्रांचे भूतकाळ आणि राजकीय परिस्थितीमागचा इतिहास या सर्व गोष्टी कादंबरीत सांगितल्या जातात. त्याशिवाय व्हॅलरी या लेस्बियन अभिनेत्रीच्या ट्रॅकसारख्या छोट्या-मोठ्या अनेक गोष्टी इथं आहेत. त्याचबरोबर मुखवटाधारी व्ही कोण आहे, हे शोधण्यासाठी चाललेला तपास हे रहस्यप्रधान उपकथानकही इथं सुरू आहे.व्हीफचा मुखवटावाचोस्कींनी यातल्या बहुतेक महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्या आहेत, काही बदलून वापरल्या आहेत, काहींना अधिक भव्यता आणली आहे, काहींना चित्रपटीय फॉर्म्युलांमध्ये खेचून बसवलं आहे. कादंबरीतल्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सरकारी भित्तिपत्रकांवर लाल स्प्रे कॅन्सनं व्ही रंगवणारी चष्मिस मुलगी, इव्हीच्या कोठडीतला उंदीर, व्ही च्या राहत्या जागेतला जुकबॉक्‍स अशा लक्षात राहणाऱ्या प्रतिमाही चित्रकर्त्यांनी संहितेत पेरल्या आहेत, ज्या पुस्तक वाचलेल्यांना ताबडतोब लक्षात येतील.मला या रूपांतरात एकच गोष्ट खटकली ती म्हणजे व्ही चा मुखवटा. तो असणं आवश्‍यक होतं; पण त्यामुळे या अभिनेत्याची भूमिका ही डबिंगपुरती उरली आहे. स्पायडरमॅनसारख्या चित्रपटातही ओठ न दिसणाऱ्या मुखवट्याचा वापर स्पायडरमॅन किंवा ग्रीन गॉलिनस?ठी केलेला आहे. मात्र, तिथं त्यांना आपली दुसरी ओळख अभिनयासाठी वापरता आली आहे. इथं व्हीचा मास्क कायम राहतो, हे बराच काळ चुकल्याचुकल्यासारखं वाटतं.तसंच काही वेळा यातल्या घटनांची, विचारांची, व्यक्तिरेखांची गर्दी थकवते. थ्रिलर, रहस्य, प्रेम आणि राजकारण एकत्र पाहताना दमायला होतं. मात्र, पूर्ण चित्रपट पाहिल्यावर वाटतं, की हे सारं आवश्‍यक होतं.व्ही फॉर व्हेन्डेटामध्ये हे सिद्ध होतं, की मेट्रिक्‍सनं वाचोस्कींना संपवलेलं नाही. ऍक्‍शन आणि विचार यांना एकत्र आणणारा खास ब्रॅन्ड त्यांनी रसिकांसाठी उपलब्ध केला आहे. त्यांचे यापुढले चित्रपटही बहुधा याच मार्गावर चालणारे असतील.

-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

Read more...

चांगली सुरवात

>> Friday, January 25, 2008
"वेल बिगन इज हाफ डन' म्हणतात ते काही खोटं नाही. चित्रपटांच्या बाबतीत तर `सुरवात` या गोष्टीला फारच महत्त्व आहे. बहुतेकदा या सुरवातीवरून आपल्याला पूर्ण चित्रपटाचा अंदाज तर येऊ शकतोच, तसंच त्यातला दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, कथनाची शैली, दृश्य योजनेमागची कारागिरी असा तपशीलही स्पष्ट होतो. बहुतेक चित्रपट आपल्याला आवडणार का नाही, हे या पहिल्या दहाएक मिनिटांतच कळतं, आणि जर आवडणार असेल, तर त्यांची आपल्यावरली पकडही याच वेळात बसते.परभाषक चित्रपटांत अशा पकडून ठेवणाऱ्या चित्रपटांची मुबलक उदाहरणं सापडतील. उदाहरणार्थ ः रॉबर्ट वाईजच्या रोमिओ ज्युलिएटवर आधारित वेस्ट साईड स्टोरीची सुरवात पाहा.मूळ कथेतल्या राजघराण्यांची वेस्ट साईड स्टोरीमध्ये रूपांतरं झाली आहेत, ती दोन शहरी गुंडांच्या टोळ्यांमध्ये. या टोळ्यांमध्ये वितुष्ट कसं आलं आणि पुढे त्यांची दुश्मनी कशी विकोपाला गेली, हा सर्व भाग इथे पहिल्या मॉन्टाजमध्ये येतो. त्यातून हे म्युझिकल असल्याने या मारामाऱ्याही नृत्यासारख्या बसवलेल्या. हा भाग संपून मूळ कथानक सुरू होण्याआधीच आपल्याला वेस्ट साईड स्टोरीचा पोत पूर्णपणे कळलेला असतो.अर्थात चित्रपपटाची सुरवात ही केवळ कथेबद्दल माहिती याचसाठी वापरली जात नाही, तर हुशार दिग्दर्शक तिचा वेगवेगळा वापरही करू शकतो. हिचकॉकच्या प्रसिद्ध सायकोची सुरवात ही तर प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठीच रचली गेली आहे. बेट् स मोटेल आणि त्याचा विक्षिप्त मालक नॉर्मन बेट् स हे सायकोच्या केंद्रस्थानी आहेत. पण हिचकॉक त्याची सुरवात करतो ती जेनेट लीफच्या व्यक्तिरेखेपासून. तिचं प्रेमप्रकरण, तिनं केलेली चोरी, मग तिला हायवेवर ट्रॅफिक पोलिसांनी अडवणं आणि बेट् स मोटेलवर आसरा घेणं, या घडामोडींमुळे प्रेक्षकाचा समज असा करून दिला जातो, की जेनेट ली ही चित्रपटाची नायिका आहे. मग अचानक तिचा खून होतो, चोरीचे पैसे गाडीबरोबर दलदलीत पोचतात आणि प्रेक्षक संभ्रमात पडतो. हा संभ्रम तयार करणं, हेच या सुरवातीनं केलेलं चोख काम.सलग मांडणीची पद्धतआपल्याकडे या प्रकारच्या विशिष्ट हेतूनं केलेल्या किंवा प्रेक्षकांना बांधून ठेवणारी सुरवात पाहायला मिळत नाही. युवासारख्या काही चित्रपटांचा अपवाद वगळता, याला एक कारण असं, की आपल्याकडे कथाभाग हा सलग एका क्रमानं मांडण्याची पद्धत अधिक प्रचलित आहे. त्यामुळे चित्रपटाची सुरवात ही बहुधा कथेचीच सुरवात असते. आणि अगदी सुरवातीला फार काही घडत नाही. जागतिक चित्रपटांमध्ये नॉन लिनिअर मांडणी ही खूप लोकप्रिय असल्यानं, त्यांना आपल्या चित्रपटाची सुरवात वेगवेगळ्या पद्धतीनं करून पाहण्याची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.नुकतीच एक फार छान सुरवात पाहण्यात आली. हा चित्रपटही फार उत्तम होता आणि त्याच्या पहिल्या काही मिनिटांतच त्याचं टेक्स्चर, प्रमुख पात्रं, विषय आणि शैली याबद्दल अनेक गोष्टी झटक्यात स्पष्ट झाल्या. ब्राझीलचा सिटी ऑफ गॉड हा 2002 मधील चित्रपट. दिग्दर्शक फर्नांडो मायरेलेस.सिटी ऑफ गॉड हे नाव दोन कारणांसाठी विचित्रं आहे. पहिलं कदाचित अनपेक्षित; पण दुसरं चित्रकर्त्यांना नक्कीच अपेक्षित. सिटी ऑफ गॉड हे थोडं काही वर्षांपूर्वीच्या साहसप्रधान चित्रपटांच्या लाटेतलं वाटतं. म्हणजे किंग सोलोमन्स माईन्स किंवा रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क वगैरे सारखं. एखाद्या खजिन्याच्या जागेचा संदर्भ सांगणारं. खरं तर हा चित्रपट या प्रकारचा नाही, आणि हे खरोखरच एका वस्तीचं नाव आहे.चित्रकर्त्यांना अपेक्षित असणारं, नाव विचित्र ठरवणारं दुसरं कारण असं, की या सिटी ऑफ गॉडचा संबंध देवापेक्षा सैतानाशी अधिक आहे. जी वस्ती या छानशा नावानं ओळखली जाते, ती रिओ डी जानेरोमधील गरीब वस्ती आहे. इथं गुंडगिरी, मारामाऱ्या भरपूर. सामान्य नागरिकांपासून पोलिसांपर्यंत सगळे भ्रष्ट. लहान लहान मुलंदेखील कुणाला गोळ्या घालायला कमी न करणारी. अक्षरओळख नसली तर चालेल; पण इथं राहायचं तर पिस्तूल चालवता यायलाच हवं.गुंडाच्या उदयास्ताची गोष्ट सिटी ऑफ गॉड एका लिटल `झी` नावाच्या कुप्रसिद्ध ड्रगडीलर आणि गुंडाच्या उदयास्ताची गोष्ट सांगतो. पण ती प्रत्यक्ष झीच्या दृष्टिकोनातून नाही, तर रॉकेट (अलेक्झांडर रॉड्रिग्ज) या एका होतकरू फोटोग्राफरच्या नजरेतून. हा रॉकेट जी गोष्ट सांगतो, ती जितकी झीची आहे, तितकीच ती या वस्तीची आहे. त्यासाठी रॉकेट मूळ कथानक सांधणाऱ्या अनेक छोट्यामोठ्या गोष्टी एकत्र करतो. कधी त्या विशिष्ट पात्राच्या असतात वा एखाद्या जागेच्या किंवा स्वतःच घेतलेल्या काही अनुभवांच्या. या गोष्टी एकत्र येऊन चित्रपटाचा आराखडा तयार होतो. चित्रपटाची सुरवात ही कथाप्रधान प्रवृत्ती दाखवते. रॉकेट आणि झीला आपल्यापुढे आणते आणि वस्तीचं एकूण स्वरूपदेखील अधोरेखित करते.या सगळ्याला सुरवात होते, ती एका कोंबड्यापासून. या कोंबड्याला कापण्यासाठी बांधून लिटल झी एका पार्टीची तयारी करत असतो. आपल्यासमोर इतर कोंबड्यांची होणारी परिस्थिती पाहून हा कोंबडा बिथरतो आणि संधी मिळताच पळ काढतो. झी त्याला बघतो आणि पकडण्याचा हुकूम सोडतो. लगोलग सगळे कोंबड्यामागे पळतात. ही पळापळ गल्लीबोळातून सुसाट सुरू होते. आधी नुसत्याच धावणाऱ्यांच्या हातात पिस्तुलं, बंदुका यायला लागतात, शिविगाळ सुरू होते. लवकरच हा ताफा रस्त्यावर एका फोटोविषयी बोलत चाललेल्या रॉकेटपर्यंत येतो. बंदुका रोखलेली ही टोळी ही रॉकेटसमोर उभी ठाकते. इतक्यात मागच्या बाजूला पोलिसच्या गाड्या येतात आणि रॉकेट अक्षरशः या कायद्याच्या दोन बाजूंच्या मध्ये सापडतो. आता आपल्याला रॉकेटच्याच शब्दांत कळतं, की अशी धोबी का कुत्ता बनण्याची परिस्थिती केवळ आत्ताची नाही.तो लहान असल्यापासून हे असंच चाललेलं आहे. आता कॅमेरा पोलिस आणि गुंडाना दाखवत झोकात एक वर्तुळ पूर्ण करतो आणि रॉकेटच्या बालपणी पोचतो. आता वस्ती बैठ्या घरांची. इथल्या मैदानावर रॉकेट उभा आहे. पुन्हा गुंड मुलांच्या शिव्या खात, निरुत्तर.हा सुरवातीचा एपिसोड हा जवळपास एक छोटी गोष्ट वाटण्याइतका सेल्फ कन्टेन्ड तर आहेच, वर यात दिग्दर्शकाचं माध्यमावरलं प्रभुत्व, त्याची तुकड्या तुकड्यात अनेक शॉट्स घेऊन संकलनात गती आणण्याची पद्धत, याही गोष्टी दिसतात. वर्तमानकाळातल्या दृश्यांची किंचित निळसर झाक आणि एकाच हालचालीने कॅमेरा भूतकाळात गेल्यावरचा सेपिया रंग, भर वस्तीतले गल्लीबोळ जाऊन येणारं मैदान यांनी एका क्षणात काळ बदलल्याची जाणीव होते आणि चित्रपटाच्या दृश्य भागाकडून अपेक्षा तयार होतात. पुढल्या भागाबद्दल तयार होणाऱ्या सर्व अपेक्षा सिटी ऑफ गॉड पूर्ण करतो.हिंसाचारया चित्रपटाचा विषय हिंसाचाराचं भरपूर दर्शन घडवणारा आहे. परंतु, हे दर्शन हिंसेला प्रोत्साहन देणारं नाही. प्रेक्षकाला जे धक्कादायक ठरतं ते त्याच्या रक्तरंजित असण्यानं नाही. कारण अनेक खून, मारामाऱ्या असल्या तरी प्रत्यक्ष रक्त दाखवणं दिग्दर्शकानं टाळलं आहे, तर त्यातल्या बंदूकधारी व्यक्तीच्या वयामुळे. यातली अनेक मुलं चौथी-पाचवीत जाण्याच्या वयाची आहेत. एका प्रसंगात झी या मुलांच्या टोळीला धडा शिकवण्यासाठी त्यातल्या दोघांना पकडतो. या सात-आठ वर्षांच्या मुलांच्या पायात गोळ्या घालतो आणि आपल्या बरोबरच्या दहाएक वर्षांच्या मुलाकडे पिस्तूल देऊन सांगतो, की तू मनानं ठरवून या दोघांतल्या कोणाही एकाला मार. या प्रसंगातला मृत्यू थेट दाखवला जात नाही. पायातल्या गोळ्याही बुटांमध्ये मारल्यानं नीट दिसत नाहीत, पण प्रसंगाचा आशय अस्वस्थ करतो.असे अस्वस्थ करणारे प्रसंग सिटी ऑफ गॉडफमध्ये जागोजागी आहेत. या प्रसंगाचा कल्चर शॉक तर पाहणाऱ्याला बसतोच, वर हा चित्रपट सत्य घटनांच्या मालिकेवर (आणि त्यावर लिहिलेल्या पावलो लिन यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर) आधारित असल्यानं, हे सगळं अधिक अंगावर येतं.चित्रपटाची सुरवात ही महत्त्वाची ठरते, जर पुढे येणारा चित्रपट या भागानं करून दिलेल्या प्रस्तावनेला जागला. `सिटी ऑफ गॉड` याचं उत्तम उदाहरण आहे, यात वादच नाही.
-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

Read more...

युद्ध विक्रेत्याची गोष्ट

>> Wednesday, January 23, 2008


जगभर दिवसागणिक फोफावणारा दहशतवाद आपण पाहतोच आहोत. गल्लीतल्या दादांपासून ते जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी धडपडणाऱ्या अतिप्रगत देशांपर्यंत सत्तेची तहान आणि शक्तिप्रदर्शनासाठी वापरले जाणारे विभिन्न मार्गही आता आपल्या परिचयाचे झाले आहेत. हे मार्ग आणि त्यांच्यामागची मानसिकता उलगडून दाखवण्यात केवळ वृत्तपत्रांसारखी वर्तमानात पाय रोवून उभी राहणारी माध्यमंच पुढे नाहीत, तर एरवी करमणूकप्रधान समजल्या जाणाऱ्या चित्रपटांनीही यात महत्त्वाची कामगिरी केली आहे. युद्ध, दहशतवाद आणि गुन्हेगारी यांचा केवळ वरवरचा विचार न करता, त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे अनेक चित्रपट आहेत, जे अंतिमतः याच विषयांना रंजनात्मक करू पाहणाऱ्या चित्रपटांचा तोल राखण्यासाठी उपयोगी पडतात. वेलकम टु साराजावो, बिफोर द रेन किंवा "सेव्हिंग प्रायव्हेट रायन'सारख्या गंभीरपणे सत्तासंघर्षाच्या दारुण वास्तवाकडे पाहणाऱ्या प्रयत्नांबरोबरच काही चित्रपट असेही असतात, जे थोड्या मिस्कीलपणे आपल्या आशयाकडे पाहत असूनही अखेर आपल्या भूमिकेत तितकेच शांतिप्रिय आणि युद्धविरोधी असतील. त्यांचा तिरकस दृष्टिकोन आशयाला बोथट न करता अधिकच भेदक करतो आणि हे सगळं कुठेही विषयाचं अवडंबर न माजवता "द ट्रुमन शो' आणि "गटाका'सारखे दोन विचारप्रवर्तक चित्रपट देणाऱ्या ऍन्ड्रू निकोलचा "लॉर्ड ऑफ वॉर' हा असाच एक चित्रपट.सामान्यतः युद्धविषयक चित्रपट हे ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखांचा आधार घेताना दिसतात. ते मांडत असलेला संघर्षही विशिष्ट चौकटीमधला असतो. लॉर्ड ऑफ वॉरमधली व्यक्तिरेखा आणि तिचा संघर्ष या दोन्ही गोष्टी तुलनेने खूपच वेगळ्या आहेत. इथली प्रमुख व्यक्तिरेखा आहे युरी ऑरलॉव्ह (निकोलस केज). युक्रेनमधल्या निर्वासितांमधून आलेला हा सामान्य नागरिक शस्त्रास्त्रांचा (फिरता) विक्रेता म्हणून कसं नाव मिळवतो आणि आपला धंदा कसा वाढवत नेतो, याची ही गोष्ट. इथला नायक युरी आणि एका परीने खलनायकही तोच.चित्रपटाच्या सुरवातीलाच युरी आपल्याला सांगतो, की जगात साधारण पाचशे पन्नास दशलक्ष शस्त्रास्त्रं आहेत. यावर युरीला पडलेली विवंचना शस्त्रांच्या वाढत्या संख्येविषयी नसून, ती बारामधल्या उरलेल्या अकरा जणांपर्यंत कशी पोचवावीत, ही आहे.वेगळी कथाचित्रपटाला कथा आहे, पण ती ठराविक पठडीतली नाही. म्हणजे ती एका घटनेला केंद्रस्थानी ठेवत नाही किंवा युद्धविषयक चित्रपटांतला साहसाचा फॉर्म्युलाही ती वापरत नाही. युरीची गोष्ट ती एखादं चरित्र मांडल्याप्रमाणे मांडते. त्याला या धंद्यात पडण्याची प्रेरणा मिळाल्यापासून पुढे या कालावधीत अनेक चढउतार होतात. प्रथम युरी आपल्या भावाला मदतीला घेतो; पण त्याचं मन युरीसारखं निर्ढावलेलं नसल्यानं तो लवकरच अमली पदार्थांचा आसरा घेतो आणि युरी एकटा पडतो. सुरवातीला सिमीओन (इआन होम) या शस्त्र खरेदी-विक्रीत वाकबगार माणसाबरोबर काम करण्याची त्याची इच्छा असते; पण सिमीओन त्याला झटकून टाकतो. हे झटकणं सिमोओनला पुढे चांगलंच महागात पडतं.छोट्यामोठ्या नफ्यासाठी धडपडत असताना युरी आवा फोन्टेन (ब्रिजेट मोनाहन) या प्रसिद्ध मॉडेलला पटवतो आणि तिला आपल्या व्यवसायाविषयी अंधारात ठेवून तिच्याशी लग्न करतो. चैनीत राहण्याची सवय असणाऱ्या भावाला आनंदात ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या युरीला मोठा फायदा होतो, तो सोव्हिएत रशिया कोलमडल्याचा. त्यांच्या सैन्यात उच्चपदस्थ असणाऱ्या आपल्या काकाच्या मदतीनं तो पुष्कळ साठा स्वस्तात पदरात पाडून घेतो आणि सिमीओनला मागे टाकतो. आता त्याला दिवस बरे येतात. बोस्निया, लायबेरिया आणि अशा छोट्या-मोठ्या देशांच्या हुकूमशहांकडून त्याच्या मालाची मागणी वाढते.मात्र आवापासून हे सतत लपवून ठेवणं युरीला जमत नाही. जॅक व्हॅलेन्टाईन (इथन हॉक) हा हुशार अधिकारी बराच काळ युरीच्या मागावर असतो. इतर कशाला युरी बधत नाहीसं पाहून तो आवाला सत्य सांगून टाकतो. हे प्रकरण मात्र युरीला जड जाईलसं दिसायला लागतं."लॉर्ड ऑफ वॉर' एकाच वेळी आपल्याला हसवतो आणि सुन्न करतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याची मांडणी आणि युरीची या भयंकर उद्योगाकडे एका साध्या व्यापाऱ्याप्रमाणे पाहायची दृष्टी असणारी व्यक्तिरेखा. दिग्दर्शक ऍन्ड्रू निकोलने घटनांचं प्रत्यक्ष दृश्‍यरूप, त्यातून अभिप्रेत असणारा अर्थ आणि त्यावरील युरीची टिप्पणी यांमधला तोल फार उत्तम राखला आहे. त्यामुळे दिसणाऱ्या घटनांमागची भयानकता आपल्याला जाणवते. युरीच्या दृष्टिकोनाची गंमत वाटते; पण प्रत्यक्षात त्याच्या युक्तिवादाचा फोलपणाही आपल्याला जाणवतो. उदाहरणार्थ चित्रपटाच्या सुरवातीच्या भागात एका युद्धग्रस्त गरीब देशातून बऱ्याचशा बंदूका किलोवर विकून युरी आणि त्याचा भाऊ विटली परत येत असताना एका पडझड झालेल्या जागी त्यांना बंदुकांचे बार ऐकू येतात. दोघे डोकावतात, तर काही बारा-तेरा वर्षांच्या मुलांना भिंतीसमोर उभं करून गोळ्या घालण्याचं काम करणारे त्या देशाचे सैनिक त्यांच्या नजरेला पडतात. विटली मुलांना वाचवायला पुढे सरसावतो; पण युरी त्याला काही करू देत नाही. "ही आपली लढाई नाही' असं सांगून विटलीला तो मागे खेचतो. गोळ्या सुटतात.पुढे एकदा सैन्यानं एका गावाला वेढा घातलेला असताना विटली युरीला सांगून पाहतो, की आपण हत्यारं विकली तर त्याच हत्यारांनी या निरपराध गावकऱ्यांचे बळी घेतले जातील. पुढे तसंच होतं. पण युरीचं म्हणणं, की त्यासाठी केवळ त्याचीच हत्यारं जबाबदार नाहीत, इतरही काही गावांत त्या वेळी हेच घडलं. वर दाखला म्हणून तो हेदेखील सांगतो, "लोक म्हणतात, भल्या माणसांनी निष्क्रियता दाखवली, तर दुष्प्रवृत्ती माजते. खरं तर त्यांनी एवढंच म्हणायला हवं, की दुष्प्रवृत्ती माजते.असमर्थनीय नाहीयुरी आपल्या धंद्यात कमालीचा यशस्वी होतो, कारण त्याच्या वागण्यात दिसणारा सदसद्विवेकबुद्धीचा पूर्ण अभाव. एकदा एक देश शांतिपूर्ण वाटाघाटींवर उतरल्याचं कळताच त्याला भलतंच दुःख होतं. या देशाला निंदनीय ठरवत तो बोस्नियाचं कौतुक करतो. म्हणतो,"व्हेन दे से, दे आर हॅव्हिंग ए वॉर, दे कीप देअर वर्ड.' (आम्ही युद्ध करणार, असं ते म्हणतात, तेव्हा आपला शब्द पाळतात.) कोणतीच गोष्ट भयंकर वाटत नाही, असमर्थनीय वाटत नाही. निकोलस केजने केलेल्या काही भूमिका या केवळ त्याच्या असतात. इतर कुणाचीही या भूमिकेमध्ये आपण कल्पनाही करू शकत नाही. युरीची भूमिका अशा भूमिकांमध्ये गणली जावी.दिग्दर्शकाने दृश्‍य भागही कायम चटपटीत आणि मुद्द्याला धरून ठेवला आहे. सुरवातीच्या श्रेयनामावलीत एक दृश्‍यमालिका आहे, जी बंदुकीच्या गोळीचा प्रवास तिच्याच नजरेतून दाखवते. कारखान्यात तयार होऊन पॅक होण्यापासून ते थेट बंदूकीत बसून कोणत्याशा आफ्रिकन देशातल्या कृष्णवर्णीय लहान मुलाचा कपाळमोक्ष करेपर्यंतचा या दृश्‍यमालिकेचा स्मार्टनेस आणि परिणामकारकता लॉर्ड ऑफ वॉरमध्ये जागोजाग आढळते.या चित्रपटाचा बिनधास्तपणा सर्वच समीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही मानवायचा नाही. काहींनी याचं प्रचंड कौतुक केलं, तर काहींनी त्याच्या असंवेदनशील (काही जण यालाच संवेदनशीलही म्हणतील) प्रतिमांबद्दल आणि सकारात्मक असल्याचा आभास आणणाऱ्या खलप्रवृत्तीच्या नायकाबद्दल त्याची निंदा केली. त्यात अमेरिकेच्या सरकारी धोरणाबद्दल असणाऱ्या टीकेने त्याला पारितोषिकप्राप्त ठरवला जाणार नाही, हेही उघड होतं. पण ऍन्ड्रू निकोल आणि निकोलस केज यांच्या या प्रयत्नाला आपण दुर्लक्षित करणं बरोबर होणार नाही. तसं केलं तर आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वास्तवाच्या एका तुकड्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल.शस्त्रांची उपलब्धता आणि मुबलकता आज किती वाढते आहे, याचं या चित्रपटासंबंधातलंच एक उदाहरण बोलकं आहे. या चित्रपटात दाखवण्यासाठी चित्रकर्त्यांना मोठ्या प्रमाणात बंदुकांची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी नकली बंदुका मिळवण्याचे खूप प्रयत्न केले; शेवटी त्यातल्या त्यात फायद्याचं ठरलं ते खऱ्याखुऱ्या बंदुका प्रचंड संख्येनं विकत घेण. त्या सहजपणे मिळण्यासारख्या आणि स्वस्त होत्या! हे उदाहरणही आजच्या परिस्थितीवर एक प्रकारे भाष्य करणारंच आहे. या चित्रपटासारखंच टोकदार.


-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

Read more...

न दिसणारा दिग्दर्शक

>> Tuesday, January 22, 2008क्‍लिन्ट इस्टवूडचं नाव घेतलं की आपल्यासमोर दोन प्रतिमा उभ्या राहतात. पहिली असते त्याच्या तरुणपणच्या रांगड्या वेस्टर्न नायकाची. सर्जिओ लिऑनच्या फिस्ट फुल ऑफ डॉलर्सफ (कुरोसावाच्या मोजिम्बोचा अमेरिकन अवतार), फॉर ए फ्यू डॉलर्स मोर आणि द गुड, द बॅड अँड द अग्लीफ चित्रपटांनी ईस्टवूडला ॅन विथ नो नेमम नावानेही ओळखल्या जाणाऱ्या ऍग्री यंग प्रतिमेत अजरामर केलं. पैसे सोडून कसलीच वा कुणाचीच पर्वा न करणारा, पण स्वभावाने वाईट नसणारा हा नायक त्याच्या चाहत्यांच्या दीर्घ काळ स्मरणात राहिला. दुसरी प्रतिमा होती डर्टी हॅरी मालिकेतल्या हॅरी कॅलाहान या सर्व नियम धाब्यावर बसविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची. गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याच्याच पातळीवर जायला कमी न करणारा हॅरी अनेक गुन्हेगारीपटावर आपली छाप पाडून राहिला, त्यांच्या आणि आपल्या.गंमत म्हणजे या दोनही अतिशय यशस्वी प्रतिमा हातात असूनही, हा अतिशय बुद्धिमान आणि सर्जनशील कलावंत त्या प्रतिमांच्या साच्यात अडकून तेच ते चित्रपट देत राहिला नाही. एवढंच नाही, तर त्यानं पुढल्या काळात उमेद हरवून बसलेल्या अवस्थेतल्या या प्रतिमाही पडद्यावर साकारल्या. स्वतःच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या अनफरगिव्हनफ मध्ये त्यानं पुढल्या वयातला, नाइलाजानं शस्त्र उचलणारा वेस्टर्न नायक रंगवला, तर इन द लाईन ऑफ फायरफ मध्ये दिग्दर्शक वुल्फगॅंग पीटरसनसाठी थकलेला राष्ट्राध्यक्षांचा शरीररक्षक, ज्याच्या उपस्थितीत एक राष्ट्राध्यक्ष प्राणाला मुकले होते. या नायकांची नावं वेगळी असली तरी त्यांचा प्राण तोच होता आणि हे जाणूनच इस्टवूडने या भूमिकांचा आलेख रचला.यशस्वी नायकयशस्वी नायक म्हणून क्‍लिन्ट इस्टवूड कितीही प्रेक्षकप्रिय असला तरी एक लक्षात घ्यायला हवं, की हा त्याच्या कारकिर्दीचा केवळ एक भाग आहे. तिचा दुसरा भाग म्हणजे आपल्या विसाहून अधिक चित्रपटांसाठी त्यानं केलेलं दिग्दर्शन. तेही केवळ कामापुरतं. केवळ आपल्या भूमिकेला न्याय देण्यापुरतं नव्हे, तर चित्रपटांना एक दर्जा देणारं, प्रेक्षकांना पसंत पडणारं, समीक्षकांनी गौरवलेलं आणि ऑस्करसह अनेक पारितोषिकेप्राप्त ठरलेलं.त्याचं नाव घेताच त्याची ही बाजू आपल्याला चटकन आठवत नसली, तरी ती महत्त्वाची आहे. आज सत्तरीच्या पुढे असणाऱ्या या दिग्दर्शकाला गेल्या अन्‌ या अशा दोन वर्षी सलगपणे उत्कृष्ट चित्रपटासाठी अन्‌ दिग्दर्शनासाठी असलेला ऑस्कर नामांकन आणि या वर्षीच्या मिलिअन डॉलर बेबीफने सर्वत्र मारलेली बाजी (खरं तर गेल्या वर्षी लॉर्ड ऑफ द रिंग्जफ चा तिसरा भाग आल्यानं, एकूण मालिकेच्या सन्मानासाठी सर्व महत्त्वाची पारितोषिक जॅक्‍सन कंपनीकडे गेली; अन्यथा मिस्टीक रिव्हरफसाठी क्‍लिन्ट इस्टवूड नक्कीच पुरस्कारप्राप्त ठरला असता) पाहता, हा दिग्दर्शक अजूनही किती कार्यमग्न आणि दर्जाबाबत जागरूक आहे, हे लक्षात येईल.ईस्टवूडने दिग्दर्शनाला सुरवात तशी लवकर केली. म्हणजे अभिनयासाठी त्याचं सर्वत्र कौतुक होत असतानाच त्यानं हे पाऊल उचललं. 1971 मध्ये डर्टी हॅरीफ प्रदर्शित झाला. त्याच वर्षी त्याचा पहिला दिग्दर्शित चित्रपट प्ले मिस्टी फॉर मीफ पडद्यावर आला. मिस्टी पाहूनच हे स्पष्ट होतं, की ईस्टवूडच्या पडद्यावरच्या सांकेतिक प्रतिमांचा वेगळा वापर कसा करावा, याची जाणीव होती. त्या प्रतिमांना जसंच्या तसं न वापरता काही विरोधाभास अथवा चमकृतीची योजना करणं तो अधिक योग्य समजे. प्ले मिस्टीचा जीव हा स्लॅशरचा होता. सामान्यतः अशा चित्रपटात खलपुरुष सुंदर तरुणींच्या जिवावर उठलेले दिसत. इथे दिग्दर्शकाची चाल बरोबर उलट होती. स्वतःची रांगडी प्रतिमा आणि जॉनरमधली बायकांची नाजूक परिस्थिती उलटवून इथे क्‍लिन्ट इस्टवूडने नकारात्मक भूमिकेत जेसिका वॉल्टरला टाकलं आणि तिचा नियोजित बळी असलेल्या लोकप्रिय डी जे च्या भूमिकेत स्वतः शिरला. चित्रपट यशस्वी ठरला आणि ईस्टवूडची पुढली वाटचाल सुरू झाली.स्वतंत्र शैलीदिग्दर्शक म्हटला की शैली ही आलीच. अनेकदा लोकप्रिय दिग्दर्शक स्वतःची अशी शैली प्रस्थापित करताना दिसतात आणि मग त्या शैलीच्या आहारी जायला त्यांना वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत शैली आशयावर मात करते, दिग्दर्शक चित्रपटाहून मोठा होऊन बसतो. अमुक अमुक जागी दिग्दर्शक दिसतोफ म्हणायची आपल्याला सवय असते, पण ते चांगल्या दिग्दर्शकाचं लक्षण नव्हे. दिग्दर्शकाचं खरं यश आहे ते न दिसण्यात. प्रत्येक चित्रपटाच्या विषयाप्रमाणे दिग्दर्शकीय शैली बदलली गेली पाहिजे अन्‌ चित्रपटातही महत्त्व यायला हवं ते व्यक्तिरेखांना, त्यांच्या प्रश्‍नांना, त्यांच्या प्रवासाला. त्या व्यक्तींना मागे टाकून आपलं कौशल्य दाखवणं, ही आजकालची रीत असली तरी हा चुकीचा पायंडा आहे. शैलीदार चित्रपट टेरेन्टीनोसारख्या काहींना जमत आणि शोभत असले तरी त्यांचं अंधानुकरण चित्रपटसृष्टीला भलत्या वाटेला नेईल. मग ते हॉलिवूड असो की बॉलीवूड.प्लेमिस्टी फॉर मीफ लागला तेव्हा समीक्षकांना वाटलं की दिग्दर्शक म्हणून क्‍लिन्ट इस्टवूडनेही आपली शैली ठरवून टाकलेली दिसते. हॅंड हेल्ड कॅमेराचा वापर, ट्रॅकिंग शॉट्‌स, विमानातून घेतलेले शॉट्‌स अशा छायाचित्रणाच्या युक्‍त्या, निसर्गाचा शक्‍य तितका वापर, हे पाहून ते समजले की ही इस्टवूड शैली. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं, की हे प्रकरण वेगळं आहे. हा माणूस शैलीच ठरवत नाही. लवकरच आलेल्या हाय प्लेन्स ड्रीफ्टरफमधलं निसर्गाचं चित्रण आणि मिस्टीमधलं चित्रण यांमध्ये जर साम्य शोधलं, तर सापडणार नाही. ड्रीफ्टरमधला छायाप्रकाशाचा वापर हा अधिक ठळक आणि कथेला, व्यक्तिचित्रणाला अनुकूल आहे. मिस्टीच्या प्रकाशयोजनेहून कळण्यासारखा वेगळा.लवकरच इस्टवूडचे चित्रपट येत गेले आणि आणि स्पष्ट झालं, की याची दिग्दर्शनशैली ही अगदी लवचिक आहे. हा दिग्दर्शक आपली छाप पडावी म्हणून चित्रपट करत नाही, तर आपल्याला अमुक गोष्ट शक्‍य तितक्‍या परिणामकारक पद्धतीनं मांडायची आहे हे लक्षात घेऊन करतो. अशी शक्‍यता आहे की इस्टवूडच्या अदृश्‍य असण्यामुळेच त्याचा गाजावाजा लायकीपेक्षा कमी प्रमाणात झाला असावा.व्यक्तिप्रधान चित्रपटदिग्दर्शक म्हणून इस्टवूड जसा मोठा होत गेला, तशी त्याची इतर दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची तयारी मात्र कमी होत गेली. त्याच्या सूचनांना मान देणारे, त्याच्या मताबद्दल आदर असणारे दिग्दर्शकच तो जवळ करायला लागला. काही वर्षांनी तर त्याने इतरांबरोबर काम करणंही सोडून दिलं. स्वतःच्या अनेक चित्रपटांतून तो भूमिका करत असे, मात्र सगळ्याच नव्हे.क्‍लिन्ट इस्टवूडच्या चित्रपटांकडे पाहिलं तर लक्षात येईल, की ते सगळे व्यक्तिप्रधान आहेत. वेस्टनर्स किंवा शहरी गुन्हेगारीपट तर त्याच्या हातखंडा विषयातलेच आहेत. (प्रामुख्याने ते त्याच्या स्वतःच्या प्रतिमेला सरळ किंवा उपहासात्मक नजरेतून पाहत असल्याने ते त्याचा जवळचेही आहेत) पण जॅझ संगीतकार चार्ली बर्डफ पार्करवर बेतलेला बर्डफ किंवा दिग्दर्शक जॉन ह्यूस्टनच्या आयुष्यातल्या एका घटनेवर सैलसर आधारलेला व्हाईट हन्टर, ब्लॅक हार्टफ यासारखे चित्रपट पाहूनही तेच लक्षात येतं. इस्टवूडचा चित्रपट हा भव्य ऐतिहासिक विषयावर किंवा स्पेशल इफेक्‍ट्‌सवर मारून नेलेला असणं संभवत नाही.तीन मित्रांची शोकांत गोष्ट सांगणारा गेल्या वर्षीचा मिस्टिक रिव्हर किंवा गुरू-शिष्येच्या जवळजवळ पिता-पुत्रीप्रमाणे बनलेल्या नात्याची कसोटी पाहणारा मिलिअन डॉलर बेबीफ हे दोन चित्रपटही त्याच्या आजवरच्या कारकिर्दीला अपवाद नाहीत. या गोष्टी आहेत माणसांच्या. त्यांच्या व्यक्तिगत विजयाच्या, व्यक्तिगत पराभवाच्या. त्यांना झपाटणारा भूतकाळ, त्यांचा अस्वस्थ वर्तमानकाळ, हीच त्यांची पार्श्‍वभूमी आहे. त्यांच्या वाटेवर त्यांना विरोध करणारी, आधार देणारी किंवा उपयोगी पडणारीही कोणा काल्पनिक परिकथांमधली पात्रं नाहीत, तर त्यांच्यासारखीच दुसरी माणसं आहेत. त्यांच्या या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला येऊन भिडतात ते त्या सांगणाऱ्या दिग्दर्शकाच्या साधेपणानं आणि प्रामाणिकपणानं. हा साधेपणा अनेक शैलीदार दिग्दर्शकांच्या युक्‍त्या प्रयुक्‍त्यांहून अधिक प्रभावी आहे, हे मान्य करावंच लागेल.
-गणेश मतकरी
(साप्ताहिक स‌काळमधून)

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP