डीकोडींग ‘संजू’

>> Saturday, June 30, 2018
एका वाक्यात सांगायचं, तर राजकुमार हिरानीचा, संजय दत्तच्या आयुष्यावर आधारलेला चित्रपट ‘संजू’ हा एकाच वेळी इन्जिनीअस आणि सामान्य चित्रपट आहे, आणि तो आवडूनदेखील मी असं म्हणेन, की राजकुमार हिरानीने तो करण्याचा मोह टाळायला हवा होता.


चित्रपट इन्जिनीअस का, तर तो त्यातला युक्तीवाद हा फार ब्रिलीअन्ट पद्धतीने मांडतो आणि प्रेक्षकाला तो जे सांगतोय ते एकच सत्य आहे, याबद्दल बराचसा कन्व्हिन्स करतो. आणि सामान्य का, तर या युक्तिवादापलीकडे तो फारसा जातच नाही म्हणून. त्यातले सुटे घटक म्हणून आपण पितृप्रेम, मैत्री, यासारख्या घटकांकडे पाहू शकतो, पण हे सर्व घटक शेवटी एकाच गोष्टीला सर्व्ह करतात, आणि ती म्हणजे यातला युक्तीवाद.

हिरानीने चित्रपट करायला नको होता असं वाटण्यामागे, दोन साधीशी कारणं आहेत. एक म्हणजे ही अजेन्डा फिल्म आहे, त्यामुळे दिग्दर्शकाला घटनांकडे न्यूट्रली न पहाता एका निश्चित दृष्टीकोनाला बांधून घ्यावं लागलय. एका तरबेज वकीलासारखी त्याची परिस्थिती झालीय. हा वकील हुशार आहे आणि आपल्या अशीलाला सोडवणारच हे त्याच्या कामातून सिद्धच आहे, पण त्याबरोबरच तो ज्या बाजूने लढतोय ती पूर्ण निर्दोष नसावी अशी समोरच्या प्रत्येकाचीच खात्री आहे. दुसरं कारण हे की हिरानीच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’सारख्या सिनेमांमधे जे पटकथेचं/ दिग्दर्शनाचं मॅजिक होतं, ते इथे उत्तम कारागिरी या स्वरुपात उरलेलं आहे. ते हुशारीने तर केलय, पण तो काय करतोय, आणि काय पद्धतीने करतोय, हे इथे पूर्णपणे एक्सपोज झालेलं आहे. असं असतानाही हिरानी आजचा महत्वाचा दिग्दर्शक राहील, संजू चित्रपट खोऱ्याने पैसे कमवेल, आणि संजय दत्तच्या बऱ्याच चाहत्यांना क्लोजर देऊन गिल्ट फ्रीही करेल, पण तरीही त्यासाठी हिरानीने ही केस पब्लिक मधे लढवायला घेणं आवश्यक होतं का , हा प्रश्न उरतोच. केवळ मुन्नाभाई म्हणून कास्ट झाल्यावर संजय दत्तच्या ओळखीला पुरेशी रंगसफेदी मिळाली होतीच, आता ही केस चालवायला घेतल्याने, उलट लोकांचं लक्ष गुन्ह्याकडे वेधलं गेलं. असो.

संजय दत्तचं आयुष्य अतिशय गुंतागुंतीचं आहे. त्याचं स्टारपुत्र असणं, स्टार म्हणून जवळपास पहिल्या सिनेमातच एस्टॅब्लिश होता होता त्याचा ड्रगयुज सर्वांसमोर येणं, त्याची अनेक लफडी, लग्न आणि वैयक्तिक आयुष्यातले गोंधळ, बहीणी आणि वडील यांच्याबरोबरचं त्याचं नातं, सिनेमाने जोडलेली नवी नाती, करीअरमधे मिळालेलं स्टारडम आणि त्याला बाॅम्बस्फोटात गुंतल्यामुळे वेळोवेळी लागत गेलेले ब्रेक्स, तुरुंगवास होऊनही वास्तवपासून सुरु झालेली त्याची नवी इनिंग आणि पुढे मुन्नाभाईच्या भूमिकेने त्याला मिळालेली सर्वमान्यता, अशी त्याच्या आयुष्यातली प्रमुख प्रकरणं मानता येतील. या सगळ्याला घेऊनही बायोपिक करता आली असती आणि ती खरोखरच एक गंभीर, आणि काॅम्प्लेक्स बायोपिक झाली असती, पण संजू तशी बायोपिक नाही. त्याबद्दल बोलताना काही प्रेक्षकांनी ‘याला बायोपिक म्हणायचं का ?’ आणि ‘तो तुटक तुटक वाटतो’ असे आक्षेप घेतले आहेत त्याला कारणीभूत हीच गोष्ट आहे की हिरानीने त्याच्या आयुष्यातला मोठा स्पॅन घेऊनही त्याला सिम्प्लीफाईड रितीने आणि सोयीस्कर पद्धतीने आपल्यापुढे मांडलय. तो हे करु शकतो का, तर का नाही ? आणि हे करुनही ती बायोपिक आहे का, तर निश्चितच, पण या मांडणीत तो व्यक्तीरेखांचा, खासकरुन विनी ( अनुष्का )आणि कमलेश ( विकी कौशल ) यांचा जो सोयीस्कर उपयोग करतो, त्यामुळे त्याचं अजेंडानिष्ठ असणं उघड होतं.

आपल्या रंगभूमीवर मध्यंतरी ‘समाजस्वास्थ्य’ हे अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित नाटक आलं होतं, त्याचा उल्लेख इथे करावासा वाटतो. र धों कर्व्यांच्या आयुष्यावर आधारीत असलेलं हे नाटक त्यांच्या चरीत्राशी प्रामाणिक होतं आणि नाटक म्हणून उत्तम होतं, पण त्यावरही बोलताना काहीजण त्याला चरीत्रनाट्य म्हणावं का हा मुद्दा काढत. चरीत्रनाट्यात किंवा चित्रपटातही चरीत्र नायकाचं ( किंवा नायिकेचं ) पूर्ण चरीत्र येणं आवश्यक नाही. कितिही छोटा आणि कितिही मोठा अवाका असला तरी चरीत्रातल्या घटनांवर आधारीत असणं, त्याला चरीत्रनाट्य/चित्रपट ठरवू शकतात. समाजस्वास्थ्यमधे रधोंच्या आयुष्यातले तीन खटले दाखवण्यात आले होते, जे ते चालवत असलेल्या समाजस्वास्थ्य या मासिकासंबंधातले होते. त्या खटल्यांच्या अनुषंगाने रधोंचं जेवढं आयुष्य प्रकाशात येईल, तेवढच इथे दाखवलं होतं. संजू साधारण हाच प्रकार करतो. मात्र समाजस्वास्थ्य मधले खटले खरे होते, इथे तसं नाही. चित्रपटाने चालवलेली संजूची केस तीन प्रश्नांची बनवली जाते , ज्यांची खरी/खोटी उत्तरं आपल्याला दिली जातात. पहिला प्रश्न म्हणजे ॲडीक्शनचा दोष संजय दत्तवर जावा का ?दुसरा, संजय दत्तने घरी एके ५६ का ठेवली ? आणि तिसरा, म्हणजे मिडीआने रिपोर्ट केल्याप्रमाणे त्याच्या घराच्या आवारात RDX चा ट्रक खरच पार्क केलेला होता का ? समाजस्वास्थ्य मधल्या केसेस कोर्टात चालवल्या जातात, तर संजू या प्रश्नांचा डिफेन्स दोन पात्रांसमोर देतो. त्याचं आत्मचरीत्र लिहू पहाणारी विनी, आणि त्याचा एकेकाळचा, पण बाॅम्बस्फोटातल्या आरोपांनंतर बिछडलेला दोस्त कमलेश. विनी हे पात्र उघडच काल्पनिक आहे. संजूच्या ॲडीक्शनला जबाबदार असलेला गाॅड, आणि त्याचा सद्वर्तनी मित्र कमलेश ही दोन्ही पात्र त्याच्या दोन्ही प्रकारच्या मित्रांचं प्रातिनिधीक रुप मानता येतील, पण कमलेशची योजना, ही प्रामुख्याने संजूला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देण्यासाठी आहे.

‘ट्रान्स्फर आॅफ गिल्ट’ नावाचं एक महत्वाचं डिव्हाईस प्रसिद्ध दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकाॅक त्याच्या सिनेमात वापरत असे . ज्यात प्रत्यक्षात अपराधी व्यक्तीला सहानुभूती मिळावी म्हणून गुन्ह्याची जबाबदारी दुसऱ्या एखाद्या पात्रावर ढकलली जात असे. संजू काहीसं तेच करतो. ॲडीक्शनबाबत ही जबाबदारी ढकलली जाते ती गाॅड या व्यक्तिरेखेवर. आणि नंतरच्या केसमधे क्लीअर गुन्हेगार समोर नसल्याने, मिडीआलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. याचा निकाल देण्यासाठी समोर येतात ते विनी आणि कमलेश , जे खरं तर प्रेक्षकांचेच प्रतिनिधी आहेत. ड्रग ॲडीक्ट संजय दत्त हा भला माणूस कसा? त्याच्या वर पोलिसांनी केलेले आरोप खोटे कसे असतील ? असे प्रेक्षकांना पडलेलेच प्रश्न ही पात्र विचारतात, आणि चित्रपटाने दिलेली उत्तरं खरी मानून ते संजय दत्तला निर्दोष ठरवतात. त्यांना संजय दत्तची बाजू पटणं, हेच प्रेक्षकाला त्याची बाजू पटण्यासारखं आहे.

चित्रपटात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, जो बहुधा राजकुमार हिरानीने चित्रपट निवडण्यामागचा महत्वाचा भाग असावा. आणि ते म्हणजे मिडीआचा आज होणारा वापर. हिरानीच्या फिल्म्सकडे आपण पाहिलं, तर प्रत्येक वेळी एक टारगेट ठरवताना दिसतो, आणि त्या टारगेटचं नकारात्मक चित्र रंगवण्यात बराच वेळ घालवतो. कधी हे टारगेट मेडीकल प्रोफेशन असतं, कधी बिल्डर लाॅबी, कधी शिक्षणसंस्था. संजूमधे मिडीआ हे ते टारगेट आहे. मिडीआवर संजूने केलेली आगपाखड, हेडलाईन्सचा वापर, क्वेश्चनमार्कबद्दलचा युक्तीवाद, संपादकाची छोटी भूमिका आणि या सर्वांवर कडी म्हणजे शेवटी श्रेयनामावलीच्या दरम्यान येणारं गाणं. या सगळ्यातून हिरानी फाॅर्म्युला एक्स्पोज व्हायला लागतो. मिडीआ या प्रकरणात दोषी आहे का? काही प्रमाणात त्यांना दोष जरुर जाईल, खासकरुन जर त्यांनी माध्यमाचा गैरवापर केला असेल तर. पण चित्रपटात मिडीआला बाजू मांडायला मिळत नाही, त्यामुळे संजू प्रेक्षकांसाठी निर्दोष ठरतो, आणि गुन्हेगार ठरते ती मिडीआ.

पटकथेचा हा असा काहीसा कॅलक्युलेटेड फाॅरमॅट असल्याने चित्रपटाला अनेक महत्वाचे मुद्दे हाताळायला वेळ मिळत नाही. संजय दत्तची लग्न हा त्यातला एक मुद्दा. यात मान्यता दिसते ती नाममात्र, पण ती कशी भेटली वगैरे तपशील येत नाहीत. तिच्याआधीच्या लग्नांचा तर उल्लेखही येत नाही. वडिलांबरोबरच्या नात्याचा आलेख तपशीलात येतो, पण बाकी वैयक्तिक आयुष्य दाखवलच जात नाही. पटकथेची निवड ही सिलेक्टीव असल्याने एकूण करीअरचा उल्लेख टाळायला हरकत नाही, पण संजय दत्तच्या करीअरला पुनरुज्जीवन देणाऱ्या वास्तवचा उल्लेख नसणं खटकतं, पण तो उल्लेखाशिवायही थोडासा रिप्रेझेन्ट व्हावा म्हणून महेश मांजरेकरांचा कॅमिओ टाकला असावा, असं वाटतं. त्यामानाने मुन्नाभाई एमबीबीएस ला खूपच जास्त फुटेज मिळतं, पण त्यात बापलेकाच्या भूमिका असल्याने ते जस्टीफाईड आहे. मला आणखी एक गोष्ट खटकली ती म्हणजे गंभीर गोष्टी मांडतानाही चित्रपटाने सतत विनोदांचा आधार घेणं. प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यासाठी चित्रपटात जागा असणं आवश्यक होतं, पण दिग्दर्शकाचा कम्फर्ट झोन काॅमेडी असल्याने, चित्रपट हसण्यासाठी गरजेपेक्षा थोड्या जास्तच जागा शोधतो.

हे सारं लक्षात घेउनही चित्रपटात करमणूक होते हे खरं आहे. अवघड विषय प्रेक्षकाच्या पचनी पडेल अशी मांडणी करणंही सोपं अजिबातच नाही. त्यामुळे बेतीव वाटली तरीही राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांच्या पटकथेला श्रेय द्यायलाच हवं. मसान , लव्ह पर स्क्वेअर फुट , राझी यासारख्या चित्रपटांमधून आजचा खास लक्षवेधी अभिनेता ठरलेल्या विकी कौशलला इथे कमलेशची महत्वाची भूमिका मिळाली आहे. परेश रावल सुनील दत्तसारखा दिसत नसला, तरी त्याने काम आपल्या नेहमीच्याच सफाईने केलय. उत्तरार्धात तो अधिक पटतो. रणबीर कपूरचा परफाॅर्मन्स फ्लाॅलेस आणि त्याचा करीअर बेस्ट म्हणण्यासारखाच आहे. ट्रेलरमधे त्याचं बोलणं कॅरीकेचरीश वाटलं होतं, तसं इथे फारसं वाटत नाही. त्यामुळे चित्रपटाला फार गंभीरपणे घेतलं नाही तर तो सहज आवडण्यासारखा आहे. तरीही एकदा विषय पडद्यावर आणायचा, असं ठरवल्यावर राजकुमार हिरानीला  काही वेगळं करुन पहाण्याची संधी होती, जी त्याने घेतली असती तर... असं मात्र वाटत रहातं.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP