१२ अँग्री मेन (१९५७)- दीड तासांचा युक्तीवाद
>> Monday, April 23, 2012
रहस्याशी थेट संबंध नसला ,तरी बंदिस्त अवकाशाशी जोडलेलं असणं अन अनेकांनी हाताळण्याचा केलेला प्रयत्न ,या दोन गोष्टिंशी साम्य असणारा एक प्रकार चित्रपटांतही आहे. नाटकांच्या बरोबर विरुध्द प्रकृतीचा असणारा सिनेमा , हा सामान्यत: अनेक जागी विखुरलेल्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून आपलं कथानक पुढे नेताना दिसतो. तरीही गेली अनेक वर्षं अनेक मोठे दिग्दर्शक हे मर्यादित स्थळकाळाशी बांधलेले आणि एकाच प्रमुख प्रसंगाला खुलवणारे चित्रपट सातत्याने करुन पाहात असल्याचं आपल्याला दिसतं. यातले सारेच अगदी एका खोलीत किंवा एका घरात घडतात असं नाही, कधी त्याला एखादं उपकथानक असण्याची आणि त्या उपकथानकाने अधिक सांकेतिक मार्ग निवडण्याची शक्यताही असतेच, पण तरीही त्यांचा भर हा मर्यादित अवकाशाचा अधिकाधिक उपयोग अधिकाधिक सर्जनशील पध्दतीने करुन पाहाण्यावर असतो ,हे खरं. हिचकॉकचे लाईफबोट आणि रोप ,पोलान्स्कीचा डेथ अँड द मेडन, लिन्कलेटरचा टेप ही या प्रकारातली अधिक नावाजलेली उदाहरणं, पण त्याशिवायदेखील सॉ,फरमॅट्स रुम,फोनबूथ, डेव्हिल, एक्झॅम, सायलेन्ट हाऊस असे कमी अधिक प्रमाणात एका स्थळाशी बांधलेले मुबलक चित्रपट सापडतील. या सा-यांचा मूळपुरुष शोधायचा तर सिडनी लूमेट च्या प्रथम चित्रपटाचं , १२ अँग्री मेनचं नाव घ्यावं लागेल.
१२ अँग्री मेन चं रुप वरवर पाहाता नाटकासारखं वाटतं , आणि त्याला नाट्यरूप देण्यातही आलं होतं, परंतु नाटक हा त्याचा मूळ फॉर्म नव्हे. रेजिनाल्ड रोजने तो प्रथम लिहिला , तो टेलिप्ले म्हणून, टि व्ही साठी, स्वत: घेतलेल्या ज्युरीवरल्या अनुभवावर आधारुन.ते नाटक म्हणून नं सुचण्याचं एक कारण हे जसं रोजला आधीच असणारी टेलिव्हिजन या माध्यमाची जाण हे होतं,तसं कथानकात हालचालीला असणारी मर्यादा हेदेखील असू शकतं.नाटकाची अवकाशाची मर्यादा गृहीत धरुनही त्यात रंगमंचाचा वापर हवा तसा करायला पात्र मोकळी असतात. या कथेतली पात्र मात्र खटल्याचा निकाल लावू पाहाणारे ज्युरी मेम्बर असल्याने एका टेबलाभोवती बसून वाद घालण्यापलीकडे ती फार काही करतील हे अपेक्षित नाही. अर्थात ,हा विषय रंगमंचावर स्टॅटीक वाटण्याची शक्यता अधिक.पात्रं हालचाल करु शकत नसल्याने वा एका मर्यादेत करु शकत असल्याने वाटू शकणारा अभाव हा कॅमेरा आपल्या हालचालीने ,गतीने, दृश्य मांडणी बदलती ठेवण्याच्या शक्यतेने भरुन काढू शकतो. त्यामुळे हा विषय टिव्ही आणि त्याचं लॉजिकल एक्स्टेन्शन मानता येईल असा चित्रपट ,यासाठी अधिक योग्य.
वर मी कथानक असा उल्लेख केला आहे, पण तो खरं तर साेयीसाठी, कारण लौकिकार्थाने १२ अँग्री मेनला कथानक नाही .सांकेतिक रचना, परिचयाच्या नायक नायिकांच्या व्यक्तिरेखा नाहीत.तो सुमारे दीड तास चालणारा युक्तीवाद आहे.तो सुरु होतो तो एक खटला संपता संपता. बापाच्या खूनाच्या आरोपावरुन मुलावर चालवल्या जाणा-या या खटल्याचं कामकाज पूर्णपणे संपुष्टात आलंय आणि आरोपी गुन्हेगार आहे अथवा नाही हे ठरवण्याची जबाबदारी ज्युरीवर सोपवण्यात आली आहे.आपसातले मतभेद आवरून, आपला व्यक्तिगत भूत वा वर्तमान या जबाबदारीच्या मधे येऊ न देता, एका त्रयस्थ अपक्षपाती दृष्टिकोनापर्यंत पोचण्याचा ज्युरीतल्या बारा सामान्य माणसांचा प्रयत्न म्हणजेच हा चित्रपट.
ज्युरी रुम मधल्या चर्चेला सुरुवात होताच लक्षात येतं ,की इथल्या बहुतेकांची मुलगा गुन्हेगार असल्याची खात्री आहे. केवळ ज्युरी नंबर आठ ( बारा उत्तम अभिनेत्यांच्या चमूतला एकमेव स्टार आणि चित्रपटाचा सहनिर्माता हेन्री फोन्डा) थोडा साशंक आहे. म्हणजे मुलगा निर्दोष आहे अशी त्याची खात्री नाही ,पण कोणत्याही चर्चेशिवाय देहान्त शासन सुनावण्याची त्याची तयारी नाही. चर्चेला सुरुवात होते आणि एकेका ज्युरी मेम्बरचा मुखवटा उतरायला लागतो.त्यांची खरी प्रवृत्ती ,व्यक्तिमत्वाचे छुपे पैलू उलगडायला लागतात.
१२ अँग्री मेन पाहाताना एक गैरसमज होण्याची शक्यता आहे कि हा रहस्यपट असावा. आरोपी मुलाच्या दोषी असण्यावर सुरुवातीला असणारा भर आणि अखेर ज्युरीने दिलेला उलटा कौल यामुळेही हा काही रहस्यभेदाचा प्रकार असावा असं वाटण्याची शक्यता अधिक , मात्र ते योग्य नाही. कुरोसावाच्या राशोमॉनमधे जसा गुन्हेगाराचा शोध हा आपल्याला घटनांच्या अंतिम उलगड्यापर्यंत नेत नाही तसाच इथला आरोपीच्या दोषी असण्याबद्दल शंका उत्पन्न करणारा शेवटदेखील प्रत्यक्ष काय घडलं याविषयी खात्रीलायक माहिती पुरवत नाही. त्याचा रोख आहे तो समाजाच्या दुटप्पीपणावर. एका बाजूने तो अमेरिकन कायद्याच्या तथाकथित अंमलबजावणीवर टिका करतो आणि दुस-या बाजूने तो प्रतिष्ठित वर्गाच्या गडद बाजूला आपलं लक्ष्य बनवतो. त्या दृष्टिने पाहाता या चित्रपटातलं व्यक्तिचित्रण खास पाहाण्यासारखं आहे. पूर्णपणे नि:पक्षपाती , न्याय्य नजरेने पाहाणा-या आठव्या ज्युरर पासुन ते आरोपीत आपल्या कृतघ्न मुलाचं प्रतिबिंब पाहून त्याला दोषी ठरवणार््या तिसर््या ज्युरर (ली जे कॉब) पर्यंत अनेक व्यक्तिरेखा इथे तपशीलात आल्या आहेत. त्याचबरोबर केवळ शब्दात रंगवलेल्या आरोपी मुलगा आणि दोन साक्षीदारांच्या व्यक्तिरेखादेखील समाजाच्या एका वेगळ्या स्तराचं प्रातिनिधित्व करतात. समाजाच्या या दोन स्तरांमधली अढी दिग्दर्शक लूमेटने भडक न होता पण थेटपणे उभी केली आहे.
अमेरिकन दिग्दर्शकांमधलं मोठं नाव मानल्या जाणा-या आणि हॉलिवूडच्या चकचकाटापेक्षा न्यू यॉर्क स्कूलच्या रोखठोख परंपरेकडे झुकणा-या सिडनी लूमेटचा ,हा पहिला चित्रपट.१२ अँग्री मेन बरोबरच डॉग डे आफ्टरनून, द व्हर्डिक्ट,नेटवर्क सारखे अनेक अर्थपूर्ण चित्रपट देणारया लूमेटनी स्टुडिओ यर्सच्या अखेरीपासून ते थेट गेल्या दशकापर्यंत , बदलत्या चित्रविषयक जाणीवांत राहूनही सातत्याने कला आणि सामाजिक भान या दोन्ही कसोट्यांवर उतरणारं काम दिलं. त्यांचा अखेरचा चित्रपट ’बीफोर द डेव्हिल नोज यू आर डेड' (२००७) हा त्यांचा दृष्टिकोन तेव्हाही तितकाच वास्तव आणि बोचरा असल्याची जाणीव देणारा होता.
एका खोलीत घडणा-या १२ अँग्री मेनला अवकाशाची मर्यादा जाणवत नाही ,ती त्याच्या दिग्दर्शकाच्या तरबेज हाताळणीमुळे. रंगभूमीप्रमाणे एका अवकाशात घडत असूनही चित्रपटमाध्यमाला असणारा , कॅमेरामार्फत प्रेक्षकांच्या नजरेवर नियंत्रण ठेवण्याचा फायदा दिग्दर्शकाने घेतला आहे.इथला कॅमेरा हा केवळ आपल्याला त्या खोलीत नेउन थांबत नाही , तर आपण काय पाहावं आणि काय पध्दतीने पाहावं याची एक निश्चित मांडणी करतो. दिग्दर्शक शक्य तेव्हा पात्रांना प्रत्यक्ष हलवून दृश्य संकल्पना बदलत नेतोच, उदाहरणार्थ ज्युरी नंबर ३ च्या विरोधात त्यंाचा एकत्र गट तयार होणं, किंवा वर्णद्वेशी ज्युरी नंबर १० ची बडबड सहन न होउन एकेकाने टेबल सोडून दूर जाणं, वगैरे. पण जेव्हा हे होउ शकत नाही , तेव्हा कॅमेरा आपलं तर्कशास्त्र वापरतो. सामान्यत: वापरलेले मिडशॉट्स आणि वाद टिपेला जाताच क्लोज अप्स वर येणं, पात्रांच्या भावनांना अधोरेखित करण्यासाठी कॅमेराला विशिष्ट हालचाल देणं, मतदानाच्या वेळी चिठ्ठ्या आणि हात किंवा आठवा एका साक्षीचा शहानिशा करुन पाहात असताना त्याची चाल , असं थेट अँक्शनला महत्व देणं ,अशा रीतीने इथे आपण काय पाहावं याची सतत निवड केली जाते. त्याशिवाय वातावरणातला तणाव दाखवण्यासाठी इथे दोन पटकन लक्षात न येणा-या ,पण परिणाम जाणवणार््या क्लुप्त्या वापरल्या जातात.
पहिल्या भागात कॅमेरा टॉप अँगल वापरतो ज्यामुळे जागा मोठी असल्याचा भास होईल. मधल्या भागात तो नजरेच्या पातळीवर येतो आणि पात्र आणि भिंती सोडता इतर अवकाश जाणवेनासा होतो, जागा अधिक बंदिस्त वाटते. आणि तिस-या भागात तर कॅमेरा लो अँगलला जातो ज्यामुळे या भिंतीही किंचित आत झुकतात आणि वातावरण अधिक कोंदट वाटायला लागतं. दुसरी क्लुप्ती आहे ती सातत्याने लेन्सची फोकल लेन्ग्थ वाढवत नेण्याची. यामुळे भिंती पात्रांच्या जवळजवळ येतात आणि दिग्दर्शकाला जी घुसमट तयार होणं अपेक्षित आहे ,ती होते.
१२ अँग्री मेनचं तत्कालिन समीक्षकांनी खूप कौतुक केलं पण अधिक सोपी, संकेत पाळणारी करमणूक अपेक्षित असणार््या प्रेक्षकांनी तो नाकारला. आज मात्र हा चित्रपट ( या रुपात, आणि मूळ टेलिप्लेच्या नाट्यरुपातही) महत्वाच्या कलाकृतीत गणला जातो. आपल्याकडेही तो ’ एक रुका हुआ फैसला ’या आज कल्ट स्टेटस मिळालेल्या टेलिफिल्मच्या रूपात, आणि ’निखारे’ या नाट्यरुपात परिचित आहे . मात्र परिचय असो वा नसो , लूमेटची आवृत्ती पहाणं हे चित्रपट रसिक आणि अभ्यासक या दोघांसाठीही नक्कीच महत्वाचं राहील.
- गणेश मतकरी
Read more...