बदलत्या वर्तमानाचं भान असलेला दिग्दर्शक - गिरीश कासरवल्ली

>> Thursday, January 25, 2018पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडल्यावर केलेल्या , ‘घटश्राद्ध’ या आपल्या पहिल्याचित्रपटापासूनच, दिग्दर्शक गिरीश कासरवल्ली हे नाव भारतीय चित्रपटांसाठी लक्षवेधी ठरलेलं आहे. तेव्हापासून, ते त्यांनी २०१२ साली केलेल्या कूर्मावतार या चित्रपटापर्यंत त्यांचा प्रत्यकेच चित्रपट हाकाही नवं करु, बोलू पहाणारा आणि दर्जात्मक पातळीवर गौरवला गेलेला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमधेमराठी  चित्रपटांना आजवर पाच सुवर्ण कमळं मिळाली आहेत याचं आपल्याला कौतुक वाटतं, पणएकट्या कासरवल्लींच्याच घटश्राद्ध (१९७७) , तबरन कथे (१९८७) , ताई साहेबा ( १९९७)  आणि द्वीप(२००२) , या चार चित्रपटांना सुवर्ण कमळं आहेत. बाकी सन्मान, पुरस्कार तर विचारुच नका !

कासरवल्लींच्या एकूण कामाकडे पाहिलं, तर काही गोष्टी सहज लक्षात येतात. त्यातली पहिली, आणिकदाचित सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ प्रेक्षकांचा विचार करुन या दिग्दर्शकाने कधीही काहीहीकेलं नाही. सिनेमा चालावा आणि आपल्याला त्यातून काही आर्थिक लाभ व्हावा , असा विचार त्यांच्याकामात कुठेही दिसत नाही. आशयाच्या, अर्थाच्या पातळीवर आपल्याला नवी काय मांडणी करतायेईल, आजवर चित्रपटात सांगता न आलेलं काही आपण सांगू शकतो का, आणि ते सांगण्याचा सर्वातयोग्य मार्ग कोणता, याला कासरवल्ली प्राधान्य देतात. पण याचा अर्थ असा नाही, की नवं काहीसांगताना, या दिग्दर्शकाचा सिनेमा कठीण होतो, दुर्बोध होतो. उलट मी तर म्हणेन की कोणत्याहीसर्वसाधारण प्रेक्षकाला या चित्रपटांशी समरस होणं अगदी सोपं आहे.

बरेच दिग्दर्शक स्वतःची एक शैली ठरवतात, टाईप ठरवतात, चित्रप्रकार ठरवतात, आणि पुढे त्याचप्रकारचं काम करत रहातात. त्यामुळे त्यांची एक ओळख ठरुन जाते, आणि त्या त्या प्रकारच्यासिनेमाशी त्यांचं नाव जोडलं जातं. कासरवल्लींनी असा एका विशिष्ट प्रकाराला बांधून घेण्याचा प्रयत्नकेला नाही. ढोबळमानाने पाहिलं तर व्यक्ती आणि समूह, समाज यांच्यामधलं नातं आणि त्या नात्यातहोणारे संभाव्य बदल असा एक व्यापक विषय त्यांच्या संपूर्ण कामातून पुढे येतो, पण वरवर पहाता याचित्रपटांमधे सरसकट साम्य दिसून येत नाही.  कथेची जातकुळी, त्यातून व्यक्त होणाऱ्या कल्पना/आशयसूत्र, निवेदनशैली किंवा चित्रप्रकार, तसच आशयानुरुप बदलणारी पार्श्वभूमी पहाता त्यांचा  प्रत्येक चित्रपट हा दुसऱ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचं जाणवतं.

एखाददुसरा अपवाद वगळता कासरवल्लींचं संपूर्ण काम, हे साहित्यकृतींच्या आधाराने केलेलं, रुपांतरीत आहे, मात्र हे रुपांतर जसच्या तसं अजिबातच नाही. मूळ कृतीतले काही घटक, मांडणी, काही कल्पना यांचा वापर ते करतात, पण या घटकांपलीकडे जात नव्या दृष्टीने त्या गोष्टीकडे पहाणंही त्यांच्या चित्रपटांची गरज आहे. कासरवल्ली एखाद्या संकल्पनेचा विचार करत असतील, आणिएखाद्या साहित्यकृतीत या विचाराशी सुसंगत असे घटक सापडले, ती कृती आपल्या डोक्यातल्याविचारांना पडद्यावर आणतानाचं एक साधन म्हणून आपण वापरु शकू असं वाटलं, तरच त्या कथा/कादंबरीचा विचार  रुपांतरासाठी केला जातो. नाही म्हणायला घटश्राद्धसारखं उदाहरण घेता येईल, जेबरचसं जसंच्या तसं यु आर अनंतमूर्तींच्या कथेवर आधारीत आहे, पण राम शा यांच्या कादंबरीवरआधारलेला ताई साहेबा, वैदेहीच्या लघुकथेवर आधारलेला गुलाबी टाॅकीज यासारखी, कथेत आणिमांडणीत अगदी मुलभूत बदल घडवणारी रुपांतरच त्यांच्या कामात अधिक प्रमाणात दिसतात. हादृष्टीतला बदल अतिशय आवश्यक आहे आणि तो मनासारखा झाला नाही, तर चित्रपट हवा तसा बनूचशकणार नाही. या एका कारणामुळेही कासरवल्लींना दुसऱ्या पटकथाकारावर अवलंबून रहाणं अवघडजातं, आणि ते आपल्या पटकथा स्वत:च लिहीतात.

कासरवल्लींच्या कारकिर्दीत, त्यांच्या स्त्रीकेंद्री चित्रपटांचं स्थान महत्वाचं आहे. मुळात घटश्राद्ध हादेखील एका परीने स्त्री केंद्रीच चित्रपट आहे, पण १९९६च्या क्रौर्यपासून ते २००८ च्या गुलाबी टाॅकीजपर्यंत आलेल्या सहा चित्रपटांमधूनही फार वैशिष्टपूर्ण स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला पहायला मिळतात. स्त्री विरुद्ध व्यवस्था हे यातल्या अनेक चित्रपटांचं सूत्र आहे. कधी ही रुढींनी बांधलेली धर्मव्यवस्थाआहे, कधी समाजाच्या अलिखित नियमांनी ती तयार झाली आहे, तर कधी तिला सरकारी आशिर्वादआहे. प्रत्येक वेळी यातल्या व्यक्तिरेखा व्यवस्थेला यशस्वीपणे तोंड देतातच असं नाही, पण त्यांचासंघर्ष प्रेक्षकाला बरच काही सांगून जातो.

राजकीय भाष्य हा गिरीश कासरवल्लींच्या चित्रपटांचा महत्वाचा भाग. आता राजकीय भाष्य म्हणजेनुसती चित्रपटात राजकारणातल्या व्यक्तीरेखा घुसवणं, किंवा राजकीय सबप्लाॅट आणणं वगैरे नाही. इथला राजकीय विचार हा अधिक मुलभूत स्वरुपाचा , देशाच्या राजकीय धोरणाचा विचार करणाराआहे. विकासाची धोरणं, समाजरचना, जातीयवाद, सरकारी यंत्रणांच्या नावाखाली अस्तित्वात येणारीदुष्टचक्र याबद्दलचा असतो. स्वातंत्र्य म्हणजे काय, सत्ताधाऱ्यांची यात काय भूमिका आहे, यावरकासरवल्लींचा सिनेमा बोलू पहातो. सुखांत चित्रपटांमधून सोपी उत्तरं शोधत प्रश्न सोडवण्याचा आवआणण्यात त्यांना रस नाही, तर प्रश्न उपस्थित करणं हीच या चित्रपटांची गरज आहे. तबरन कथे, द्वीप, कूर्मावतार, अशा अनेक चित्रपटांकडे आपण या दृष्टीने पाहू शकतो.


गिरीश कासरवल्लींच्या चित्रपटावर बऱ्याच अंशी वास्तववादाचा पगडा आहे. पण हा वास्तववादपाश्चात्य चित्रपटांच्या वळणाचा नसून सत्यजित राय किंवा ऋत्विक घटक यांनी भारतात वास्तववादाचंजे रुप रुजवलं, त्याच्याशी सुसंगत आहे. त्यांच्या फिल्म्सची पार्श्वभूमी खरी असते. ती केवळ एककल्पित कथा नसून तिला विशिष्ट काळ आणि तत्कालिन समाज याची पक्की बैठक असते. चित्रपटांची रचना तर्काला धरुन असते, वर त्यात केवळ रंजनाचा हेतू नसून काही एक सामाजिक, राजकीय अंगाचा विचार त्याच्या केंद्रस्थानी असतो. अर्थात, मी सपुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे केवळएका साच्याला धरुन रहायचं नाही, अशी दिग्दर्शकाची पद्धतच,आहे. त्यामुळे सिम्बाॅलिझमचा भरपूरवापर असलेला मने ( हिंदीत ‘एक घर’) , किंवा नाॅनलिनीअर कथनपद्धती वापरत प्रेक्षकाला कोड्यातपाडणारा ‘ रायडिंग द स्टॅलिअन ऑफ ड्रीम्स ‘, असे काही पूर्ण वेगळे प्रयत्नही त्यांच्या कामात वेळोवेळीयेऊन गेलेले आहेत.

वर्तमानाचं भान सतत आपल्या कामामधून जाणवून देणाऱ्या आणि आशय तसच तंत्र यावर घट्ट पकडअसलेल्या या सर्जनशील दिग्दर्शकाने भारतीय चित्रपटावर आपला ठसा उमटवलेला आहे. दुर्दैवाने, त्याचं काम जरी  सातत्याने गौरवलं गेलं असलं, तरी सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत त्याचा चित्रपट म्हणावातितका पोचलेला नाही. जगभरातल्या सर्वाधिक चित्रपटनिर्मिती होणाऱ्या देशांमधे आपला क्रमांक वरचाअसला, तरी आपला प्रेक्षक, मग तो मराठी असो, हिंदी वा कन्नड , आजही केवळ रंजनवादीचित्रपटांनाच प्राधान्य देतो. त्यामुळे प्रेक्षकांपुरतं हिंदीत बाॅलिवुड आणि इतर भाषांमधे जे बाॅलिवुसदृशकाम केलं जातं, तोच सिनेमा अधिक प्रमाणात पाहिला जातो. केवळ गिरीश कासरवल्लींचाच नाही, तरआपल्या प्रादेशिक चित्रपटांमधला काही अर्थपूर्ण कामगिरी करु पहाणारा समांतर वळणाचा एकूणसिनेमाच, या मनोरंजनाच्या लाटेपुढे आज हतबल झालेला आहे. असं असतानाही, ज्यांचं काम याक्षणिक मनोरंजन देणाऱ्या फिल्मच्या माऱ्यासमोर काळाच्या ओघात टिकून राहील अशातला एकदिग्दर्शक म्हणून आपण कासरवल्लींकडे निश्चित पाहू शकतो.

पुण्यात होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवाचा ‘झेनिथ एशिआ’ हा पुरस्कार संपूर्ण आशियातआपल्या कर्तुत्वाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय चित्रकर्त्याला दिला जातो. यंदा हा मान गिरीशकासरवल्लींना मिळाला आहे. त्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतानाच, मी भारतीय प्रेक्षक लवकरचथोडा सुजाण होईल, आणि त्यांच्या सारख्यांचं दर्जेदार काम अधिक प्रमाणात आपल्यापर्यंत पोचेल,  अशीही आशा व्यक्त करतो.

गणेश मतकरी


Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP