प्यार वाली लव्ह स्टोरी- रोमिओ, जुलिएट आणि दुनियादारी

>> Saturday, October 25, 2014( स्पॉयलर वॉर्निंग- खासच अनइमॅजिनेटीव्ह वाचका प्रेक्षकासाठी या लेखात कदाचित काही स्पॉयलर असू शकतील. पण फार ढोबळ स्वरुपाचे. )

मी पुणे मिरर साठी मराठी चित्रपटांचं परीक्षण करत नसतो, तर ' प्यार वाली लव्ह स्टोरी' नामक सिनेमा पाहिला असता की नाही, मला माहीत नाही. बहुधा नसताच पाहिला. रिव्ह्यू लिहायचे नसले की आपल्याला हवं ते पाहाण्याचं, खरं तर नको ते नं पाहाण्याचं स्वातंत्र्य असतं, जे फारच आकर्षक आहे. मात्र त्यात एक तोटा असतो. केवळ हवं ते पाहिल्यामुळे आपलं बिग पिक्चरकडे दुर्लक्ष होतं. आपण आपल्या आवडत्या चित्रपटांमंधे रमून एकूण चित्रपटसृष्टीचं काय चाललय हे विसरुन जाण्याची शक्यता तयार होते. मी मुळात मिररची असाईनमेन्ट स्वीकारली त्यामागच्या कारणांत बिग पिक्चरकडे लक्ष ठेवता यावं, आपण नक्की कुठे आहोत नी कुठे जातोय हे स्पष्ट दिसावं,  हे एक प्रमुख कारण होतं.

स्पष्ट बोलायचं तर मराठी चित्रपटाकडे पाहाता, एका चांगल्या चित्रपटाला दोन बरे आणि सात वाईट हे प्रमाण सध्या तरी दिसतय, जे तसं माझ्या अपेक्षेप्रमाणेच आहे. प्यार वाली लव्ह स्टोरी यातल्या कोणत्या वर्गात बसतो हे मला अतिशय निपक्षपातीपणे विचारलं तर मी त्याला तिसऱ्या गटांत टाकणं टाळेन आणि दुसऱ्या गटात घेईन. थोडक्यात , तो बरा चित्रपट मानेन.

चित्रपटांचं परीक्षण करताना मी अनेकदा चित्रकर्त्याला अपेक्षित प्रेक्षक कोण आहे याला महत्व देतो, जे अनेकांना पटत नाही, पण ते योग्य आहे. परीक्षण हे सर्वसामान्य प्रेक्षकाला चित्रपट काय प्रकारचा आहे हे कळावं आणि तो पहावा किंवा नाही, हे ठरवण्याची सोय व्हावी यासाठी असतं. त्यावर जर मी वैयक्तिक आवडीनिवडी लादल्या, तर ते योग्य होणार नाही. मागे एका मोठ्या वर्तमानपत्रात लिहीणाऱ्या विदुषी केवळ आपली आवड ( म्हणजे नातेसंबंधावर आधारीत आणि कलात्मक चित्रपट) सोडून सर्वाना झोडायच्या . त्यांचा स्टार वॉर्सच्या तिसऱया भागाचा रिव्ह्यू हा परीक्षण कसं करु नये याचा सर्वोत्तम नमुना म्हणून माझ्या मनावर कोरलं गेलाय. केवळ त्यांना नातेसंबंधावरला चित्रपट आवडतो म्हणून स्टार वॉर्स मालिका वाईट ठरत नाही. तिचा स्वतंत्र प्रेक्षक आहेच. तो कोण आहे या नजरेतून ते परीक्षण आवश्यक नाही का? त्या चित्रप्रकाराच्या ,शैलीच्या जवळ जाऊन चित्रपट पहाणं हे योग्य. असो. 'प्यार वाली लव्ह स्टोरी'ला कोणता प्रेक्षक अपेक्षित आहे असा विचार केला तर उत्तर मिळेल,  दुनियादारीचा. आणि हा फारच प्रचंड प्रेक्षकवर्ग आहे यात शंका नाही.

आपल्या यशस्वी दिग्दर्शकांचं समीक्षकांना मूर्ख ठरवणारं एक आर्ग्युमेन्ट नेहमी असतं, ते म्हणजे आम्ही एन्टरटेनर्स आहोत आणि आम्ही अभ्यासकांसाठी नाही तर सामान्य माणसांसाठी चित्रपट बनवतो. यात  मोठा गोंधळ आहे, तो म्हणजे समीक्षकांना ( आणि परीक्षकांनीही) करमणूकप्रधान चित्रपट आवडत नाहीत हा समज. फक्त त्यांची एक माफक अपेक्षा असते की चित्रपटांनी करमणूक करतानाही लोकांना मूर्ख समजू नये. या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय जाधवदेखील चित्रपटातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करताना सामान्य माणसाचा कौल घेणार हे उघड आहे. मात्र या चित्रपटात ते एकवेळ चालून जाऊ शकेल कारण यात पूर्ण चित्रपटाला बांधणारी एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे त्यात घेतलेला  रोमिओ अॅन्ड जुलिएट या अजरामर नाट्यकृतीचा आधार. हा आधार चित्रपटाचा एकूण प्रभाव टिकवतो, वाढवतो, आणि चित्रपटाला सुसह्य करतो.


दुनियादारी प्रमाणेच प्यार वाली देखील पिरीअड फिल्म आहे मात्र पिरीअड तितका जुना नाही, नव्वदच्या दशकातला आहे. मुंबईतल्या एका छोटेखानी वस्तीत चित्रपट घडतो. इथे हिंदू मुसलमान गुण्यागोविंदाने पण स्वतंत्र चाळीत रहातात. मुसलमानांमधला दादा आहे कादर ( उपेन्द्र लिमये) तर हिंदूंमधे पश्या ( समीर धर्माधिकारी) . पश्याचं नंदिनीशी ( उर्मिला कानिटकर कोठारे) लग्न ठरतं आणि पश्याचा भाऊ अमर ( स्वप्नील जोशी) त्यात सामील व्हायला येतो. अमर येताक्षणीच कादरच्या बहिणीच्या , आलियाच्या ( सई ताम्हनकर) प्रेमात पडतो. तीही यथावकाश त्याच्या प्रेमात पडते. पण पुढे काही हालचाल होईपर्यंत आलियाच्या वडीलांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवलेलं असतं. लग्नाच्या धामधुमीतच मुंबईतल्या दंगलींना तोंड फुटतं आणि परिस्थिती अधिकच बिघडते.

मरणानंतर अनेक शतकं उलटल्यावरही शेक्सपिअरचा जागतिक चित्रपटांवरचा, त्याच्यावेळी अस्तित्वातही नसलेल्या या माध्यमावरचा प्रभाव पाहिला की चक्रावायला होतं. नुकत्याच आपल्याकडे येऊन गेलेल्या राम लीला आणि हैदर नंतरच हे माहितीतलं तिसरं शेक्सपिअर रुपांतर, तेही फक्त यावर्षातलं. शेक्सपिअरला आहे तसा घ्या वा त्यातल्या प्रमुख संकल्पना वापरा, तपशील / संवाद मुळासारखे ठेवा वा बदलून टाका, त्याचा परिणाम हा रहातोच. इथेही तो आहेच. जाणवण्यासारखा.

'प्यार वाली लव्ह स्टोरी' चा प्रेक्षक, हा करमणूकप्रधान चित्रपटाचा प्रेक्षक आहे हे तर झालंच, पण तो चित्रपटाकडून अतिशय किमान अपेक्षा ठेवणारा प्रेक्षकही आहे. त्याला चित्रपटात नेहमीचा मसाला , म्हणजे कॉमेडी, हाणामाऱ्या, प्रेम, गाणीबजावणी वगैरे लागतं पण ते ढोबळ स्वरुपाचं. संहितेत काही विचार, कलामूल्य असण्याची त्याला गरज भासत नाही. चटका लावणाऱ्या शोकांतिकेचं 'प्यार वाली लव्ह स्टोरी' असं गुलछबू नाव असण्यात काही गैर वाटत नाही कारण मुळात ते नाव त्यांनाच आकर्षित करण्यासाठी दिलेलं आहे हे तो जाणून आहे. त्याला चित्रपटाकडून ना कलात्मक दृष्टी अपेक्षित आहे, ना सोफेस्टिकेशन. उलट टाळीबाज संवाद, व्यक्तिरेखेबरोबर नं जाणारे विनोद, प्रत्येक दृष्यातली रंगाची आतषबाजी , क्षणभर उसंत नं देणारं ढणाढणा संगीत, हे सारच त्यांना चालणार आहे. त्याबद्दल त्यांची तक्रार नाही.

आता मुळात चित्रपटात हे सारं इतक्या ढोबळ पध्दतीने का मांडलं , यावर 'प्यार वाली' चा एक्स्क्यूज काय असावा?  तर हे सारं असं मांडलय, कारण या मांडणीला तयार प्रेक्षक उपलब्ध आहे. समजा सिनेमा अधिक संयत असता , व्यक्तिरेखा अधिक खोल असत्या, संवाद वरवरचे नसून अर्थपूर्ण असते, तर तो चालला असता याची काय गॅरेन्टी? त्यापेक्षा जे गेल्या चित्रपटात यशस्वी ठरलं आहे ते चालू दे. फॉर्म्युला तसाच राहू दे. इफ इट अेन्ट ब्रोक, डोन्ट फिक्स इट.

'प्यार वाली' बरा आहे की नाही, तो चालणार का नाही, यापेक्षा मला वाटतं ही जुन्याला धरुन रहाण्याची वृत्ती हा इथला खरा कळीचा प्रश्न आहे ज्यावर आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा. हा केवळ आपल्याकडेच आहे असं नाही. हिंदी व्यावसायिक चित्रपटांमधे तर तो आपल्याहूनही अधिक बिकट स्वरुपात आहे. प्रेक्षक अमुक प्रकारचा आहे या निरीक्षणावरुन त्याच त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत राहायची असेल, तर चित्रकर्त्यांच्या सर्जनशीलतेचा उपयोग काय? आणि प्रेक्षक सुधारत नाही ही जबाबदारीदेखील अखेर  चित्रकर्त्यांचीच नाही का? प्रेक्षकांना जर ठराविक वळणाच्याच गोष्टी पहायला मिळाल्या तर तो सुधारणार तरी कसा?

असं असूनही, मी 'प्यार वाली लव्ह स्टोरी'ला अगदी बाजूला टाकणार नाही. त्याच्या मूळ कथासूत्रामुळे वा आणखी कशाने, पण आजकाल चित्रपटीय रोमान्सच्या नावाखाली आपल्याला ज्या  फुटकळ चित्रपटांना पहावं लागतं त्यापेक्षा या चित्रपटाची प्रवृत्ती ही मूळातच अधिक जोरकस आहे. कथानकाची वीण फार पक्की नसली तरी वीण आहे. कलाकार चांगले आहेत, त्यातल्या बहुतेकाना करायला काही आहे. मला सर्वात अधिक आवडलं ते उर्मिला कानिटकर कोठारेचं छोटेखानी काम. या व्यक्तिरेखेत सातत्य नाही, आणि तिची चित्रपटाच्या सुरुवातीची प्रतिमा पुढे ढेपाळत जाते, पण तो दोष संहितेचा आहे, अभिनेत्रीचा नाही. इतर नटसंचही चांगलाच आहे. पटकथा, दिग्दर्शनाने जर निश्चित मागणी केली असती , तर ती पूर्ण करण्याची ताकद असणारा .

'प्यार वाली' याच नट आणि तांत्रिक संचात अधिक उंची गाठू शकला असता का? निर्विवादपणे. पण ती गाठायची तर परिचीत प्रेक्षकांच्या सेफ्टी नेटचा आधार सोडण्याची तयारी हवी. चित्रपट आशयघन नसेल तर हरकत नाही पण करमणुकीतही काय दर्जात्मक सुधारणा होऊ शकते हे पडताळून पहाता आलं पाहीजे. निदान ते होऊ शकतं असा विश्वास पाहिजे. आज तो फार कमी मराठी चित्रपटांमधे दिसतो. तो अधिक दिसायला लागेल तेव्हा चित्रपटांचं प्रमाणही बदलायला लागेल. पण या झाल्या जरतरच्या गोष्टी. आजचं काय, हा प्रश्न उरतोच !

- ganesh matkari

Read more...

कुंपणावरुन

>> Monday, October 6, 2014

ललित ' अॉक्टोबर २०१४ मधल्या स्वागत स्तंभासाठी लिहीलेला लेख-

आठवतं तेव्हापासून मला मतकरींचा मुलगा म्हणून आेळखतात. मतकरी म्हणजे अर्थातच रत्नाकर मतकरी. हा आडनाव पुरेसं अनयुजवल असल्याचा अॅडव्हान्टेज ( आणि क्वचित डिसअडव्हान्टेज), कारण पूर्ण नाव सांगताच मतकरी कनेक्शन समोर यायचंच. शाळा काॅलेजमधे असताना याचा खूपच फायदा. थोडा कमी अभ्यास चालून जाणं, थोडा बेशिस्तपणा खपून जाणं वगैरे. पुढे पुढे ,' तू नाही का लिहीत, बाबांसारखं?' वगैरे अनावश्यक प्रश्न. ज्याची उत्तरं अर्थातच नम्रपणे नकारार्थी, कारण लिहिणं हा माझ्या महत्वाकांक्षेचा भाग कधीच नव्हता. वाचन मात्र खूप. आमच्याकडली चिकार पुस्तकं, त्यात भर म्हणून पपांकडली पुस्तकं. पपा म्हणजे ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव मनोहर. माझ्या आईचे वडील. वाचनाबरोबर नाटकं, सिनेमे पाहाण्याची आवड. अनेक घरात मुलांनी वरचा नंबर काढावा या अपेक्षेने क्लासेस वगैरे सुरु होतात आणि  बिचारी मुलं सिनेमे पाहाण्यात मागे पडतात. तसं काही माझं झालं नाही.

आमच्याकडे बालनाट्य आणि सूत्रधार या संस्थांमुळे सतत नाटकांचं वातावरण असल्याने नाटकात काम वगैरे, बाय डिफाॅल्ट. करायचं आहे का वगैरे प्रश्न नाही. गरज असली ,भूमिका असली, की उभं राहायचं. पण माझ्या मते मला हा इन्टरेस्टही फार तयार झाला नसावा. कधीतरी माझ्या डोक्यात ( तेही कुठून कोणाला माहीत) आर्किटेक्ट व्हायचं आलं आणि मग त्या शिक्षणादरम्यान मी ती कामंही बंद केली. पुढे चित्रमालिकांदरम्यान बाबांना मदत करायला लागलो, पण तो पडद्यामागे, समोर नाही.

या सगळ्या काळात बाबा आणि पपा यांनी कोणत्याही दिशेला जाणूनबुजून ढकललं नाही. दोघांचाही तसा व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास, त्यामुळे ज्याला जे वाटेल ते करु द्यावं असा कल. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या लेखनक्षेत्रात , म्हणजे क्रिएटीव रायटिंग आणि क्रिटिसिजम मधे नावाजलेल्या या माणसांनी, मला कधीही 'अमुक कर' असं सुचवलं नाही. मात्र त्यांच्याबरोबर फिजिकली असल्याचा फायदा हा झालाच. त्यांच्या ( आणि त्यांच्याबरोबरच्या ) गप्पा, चर्चा, पपांची पुस्तकांबद्दलची रेकमेन्डेशन्स, बाबांची नाट्यवाचनं या सगळ्यामधून काहीतरी आपोआप डोक्यात शिरलं असणारंच, कारण पुढे वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी जेव्हा चित्रपटसमीक्षा लिहायला लागलो, तेव्हा मी ती खूपच सहजपणे लिहीली.

या सुमारास, म्हणजे १९९७ मधे, मी आर्किटेक्ट होऊन नोकरीला लागलो होतो. माझ्याच आर्किटेक्चर स्कूलला जुनिअर असलेल्या पल्लवी देवधरशी लग्नं झालं होतं. तीन वर्ष एका कामानिमित्ताने गोव्यात काढून नुकताच मुंबईत आलो होतो. आपलं महानगरचे तत्कालिन संपादक निखिल वागळे माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. एकदा आमच्याकडे आले असताना असंच काही बोलणं निघालं आणि त्यांनी मला ,'तू आमच्याकडे इंग्रजी चित्रपटांची परीक्षणं का करत नाहीस?' असं सुचवलं. पुढल्या आठवड्यापासनं मी ' अॅक्सिडेन्टल समीक्षक' झालो तो झालोच. पुढे वागळे संपादन करीत असलेला दिवाळी अंक अक्षर आणि मीना कर्णिक संपादन करत असलेला चंदेरी यातही मी नियमितपणे चित्रपटविषयक लेख लिहायला लागलो. ललित लेखनाची शक्यताही पडताळून न पाहाता.

समीक्षेला लेखन म्हणायचं की नाही, हे मला माहीत नाही किंवा दुसर््या शब्दात सांगायचं तर समीक्षक हा लेखक असतो का ? किंवा मानला जातो का? जावा का? हे मला माहीत नाही. पण या प्रकारचं लेखन मी बर््यापैकी केलं. वृत्तपत्रीय समीक्षा, सदरलेखन आणि मोठे लेखही. दरम्यान पाहाण्याचा ,चित्रपटांविषयी वाचनाचा अवाका वाढवत नेला. प्रभात चित्रमंडळ चा सभासद होऊन जागतिक चित्रपटांकडे अधिक डोळसपणे पाहायला लागलो. माझं वाचन लेखन वाढण्यात अरुण खोपकरांसारख्या ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक/ दिग्दर्शकांची खूप मदत झाली.

वृत्तपत्रीय किंवा साप्ताहिकातल्या चित्रपटसमीक्षेला मर्यादा असते हे मान्य पण मला स्वतःला हा प्रकार खूप इन्टरेस्टिंग वाटतो. पारंपारिक फाॅरमॅट ला चिकटलं नाही, तर थोडक्या जागेतही बरंच काही सांगण्यासारखं असतं.  मुळात तुम्हाला स्वतःला जी गोष्ट इन्टरेस्टिंग वाटेल त्यावर तुम्ही फोकस ठेवला, तर जागा हा फार मोठा मुद्दा उरत नाही. माझं महानगर आणि साप्ताहिक सकाळ मधलं लेखन मला या दृष्टीने मोठ्या लेखांपेक्षाही अधिक आवडायचं. अशा या समीक्षेची माझी तीन पुस्तकं प्रकाशित झाली. 'फिल्ममेकर्स' आणि 'सिनेमॅटीक'मधे मोठे लेख, तर महानगरमधे येणार््या एका स्तंभाचं पुस्तकरुप असणारं 'चौकटीबाहेरचा सिनेमा'. तरीही, पुस्तकरुपात प्रकाशित नसलेलं बरच आहे.

माझ्या या लिखाणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मॅजेस्टीक आणि अक्षर सारख्या चांगल्या प्रकाशनांनी जिव्हाळ्याने काढल्याचा फायदाही झाला. वृत्तसमीक्षा आणि सदरलेखन  विशेषतः तरुण वर्गाला खूप आवडलं. ते माझ्यापर्यंत पोचलं, ते मात्र नंतर लिखाण ब्लाॅगवर यायला लागलं त्या सुमारास. ब्लाॅग, फेसबुक, याला बरेच जण रिकामपणचा उद्योग समजले, तरी मला तसं वाटत नाही. लिहीणारा आणि वाचणारे, यांच्यात संवाद घडायचा, तर ही माध्यमं फार उत्तम आहेत. अर्थात, त्या वापरावरही नियंत्रण हवं.

मी आमच्या घरच्या प्रोजेक्ट्समुळे , मग ती नाटकं ,चित्रमालिका असोत, किंवा गेल्या वर्षी नॅशनल अवाॅर्ड मिळालेला इन्वेस्टमेन्ट चित्रपट असो, समीक्षेकडे केवळ प्रेक्षकांच्या खुर्चीतून पाहू शकत नाही. तसा मी कुंपणावर बसलेला समीक्षक आहे असं म्हणता येईल. चित्रपटांकडे दोन्ही बाजूने पाहाणारा, पण तरीही प्रॅक्टिकल प्राॅब्लेम्स हा दर्जा घसरण्याचा एक्स्क्यूज न मानू शकणारा. पपा असते, तर त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या लिहीण्याच्या प्रकारात काही फरक पडला असता का? तसं नाही वाटत.
आपल्याकडे गंभीरपणे लिहिण्यात, मग ते कोणत्याही प्रकारचं असो, एक मोठी अडचण असते, ती म्हणजे अर्थकारण. त्यामुळे पूर्णवेळ लिहीणं हे अनेक लेखकांना शक्य होत नाही. माझ्या स्वतःच्या वडीलांनी त्यांच्या विपुल लिखाणातून अन खासकरुन नाट्यलेखनातून हे करुन दाखवलं. मला त्या प्रमाणात न लिहीताही हवा तेव्हा, हवा तितका वेळ उपलब्ध करुन देता येतो तो मात्र पल्लवीमुळे. घराची थेट जबाबदारी तिने उचलल्याने, माझ्या वेळाचा मुक्त वापर करणं मला शक्य तरी होतं. तिने स्वतःहून हे ठरवलं नसतं, तर मी सध्या करतो त्याच्या अर्ध्या प्रमाणातही काम करु शकलो असतो का, ही शंकाच आहे. आणि ही महत्वाची गोष्ट करुनही ती घरच्या प्रोजेक्ट्समधेही गुंतलेली असतेच. अगदी लिहीलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यापासून ते निर्मितीत सक्रीय सहभाग घेण्यापर्यंत अनेक बाबतीत.
मला माझ्या लिहिण्यात, किंवा एकूणच, एक गोष्ट नेहमी जाणवते, की काम डोक्यावर दिलं, आणि डेडलाईन दिली, तर ते होतं, अन्यथा होण्याची गॅरेन्टी नाही. बहुधा त्यामुळेच, अनेक वर्ष डोक्यात असूनही , कोणी डेडलाईन न दिल्याने मी क्रिएटीव रायटींगचं मनावर घेतलं नाही. बाबांप्रमाणेच माझी बहीण सुप्रिया लिहीत होतीच. आता कोणी लिहीण्याबद्दल विचारलं, तर सुप्रियाने आणि मी , ललित आणि समीक्षा अशी डिपार्टमेन्ट वाटून घेतल्याचं मी सांगायला लागलो होतो. पण ते सांगण्यापुरतं. आपणही लिहून पाहावं असा विचार डोक्यात यायला लागला होता. त्याला मुहूर्त मिळाला, तो इन्वेस्टमेन्ट नंतरच्या काळात मोकळा वेळ असताना.
या वेळी मी दोनतीन दिवस बसून एक कथा लिहून काढली. काहीशी सेमी आॅटोबायग्राफिकल पण तपशील हा मुद्दा नव्हता. मुद्दा होता, तो मला माझ्या आजूबाजूचा आजचा  बदलता मध्यमवर्ग जसा दिसतोय तसा मांडायचा होता, हा. मी इंग्रजीच्या तुलनेत मराठी कमी वाचत असल्याने, मला आजच्या साहित्यात या वर्गाबद्दल कसं, काय लिखाण झालय याची कल्पना नव्हती. त्यामुळे आपल्याला जे दिसतय ते मांडून पाहू अशी कल्पना होती. एक कथा पूर्ण होताच तिला जोडणार््या इतर कथाही दिसायला लागल्या आणि कथा-कादंबरीच्या मधल्या फाॅर्ममधलं काही डोळ्यासमोर आलं. हे लिखाण 'अनुभव' मासिकाने कथामालिकेच्या स्वरुपात प्रकाशित केलं आणि  समकालीन प्रकाशनाने ते नुकतंच  ' खिडक्या अर्ध्या उघड्या', नावाने पुस्तकरुपात प्रसिध्द केलंय.
सध्या मिळणारा प्रतिसाद ललित लेखन पुढे चालू ठेवावं असं वाटायला लावणारा आहे. साहित्यिक आणि समीक्षकाकडून ते चांगलं रिसीव्ह होतय, पण त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे साधा वाचकही त्यातल्या प्रयोगाबियोगाचा विचार न करताही ते आहे तसं वाचून पाहातोय आणि त्याला ते आहे तसं आवडतंय. त्या आनंदात मी नवीन काही लिहायला घेतलंही आहे.
पुढे काय करावं हे निश्चित नाही, पण निश्चित कशाला असायला हवं. या दोन्ही प्रकारातलं लेखन सुरु ठेवून पाहू पुढे आणखी काय नवीन करता येतं ते !


- गणेश मतकरी

Read more...

हैदर- अस्वस्थ व्हा !

>> Saturday, October 4, 2014दर्जातलं सातत्य, या एका पातळीवर पाहायचं, तरी विशाल भारद्वाजची शेक्सपिअर चित्रत्रयी थक्क करुन सोडणारी आहे. शेक्सपिअरमधे मुळात व्यावसायिक वळणाचं नाट्य पुरेपूर असलं, तरी तो रुपांतरीत करायला सोपा अजिबातच नाही. त्याच्या नाटकांमधले तपशील, रचनेचे बारकावे, व्यक्तित्रणावरची हुकूमत आणि त्याच्या शोकांतिकांमधे अधिक जाणवणारी, पण सर्वच नाटकात असणारी गुंतवून ठेवणारी कथनशैली या सगळ्याला न्याय देणं सोपं नाही. आॅर्सन वेल्स पासून राल्फ फाईन्स पर्यंत आणि सर लाॅरेन्स आॅलिविएपासून इथन हाॅकपर्यंत  जगभरातल्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी आणि नटांनी आजवर नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमधे शेक्सपिअर समर्थपणे उभा केला आहे. विशाल भारद्वाजचे मकबूल, ओंकारा आणि आता हैदर हे मॅकबेथ, आॅथेल्लो आणि हॅम्लेट या तीन सुप्रसिध्द शोकांतिकांची रुपांतरं मांडणारे चित्रपट, या चांगल्या रुपांतरांत सहजच घेता येतील.
सध्याच्या नव्या हिंदी सिनेमातलं भारद्वाज हे अपवादात्मक नाव आहे.या मंडळींमधल्या बहुतेकांचा हेतू हा काहीशा व्यक्तीगत, गंभीर पण मिनिमल स्वरुपाच्या गोष्टी सांगण्याचा आहे. याऊलट भारद्वाजचे चित्रपट भव्य आणि अभिजात वळणाचे असून प्रयाेगशीलदेखील आहेत. मोठे स्टार्स, नाट्यपूर्ण कथानकं, वादग्रस्त विषय असं सारं असूनही ते कधीही व्यावसायिकतेला वाहिलेले दिसत नाहीत. कलाकृतीचा विचार प्रथम आणि आस्वादकाचा दुय्यम असा या खऱ्या कलावंताचा दृष्टीकोन आहे.
जर भारद्वाजच्या चित्रत्रयीत दर्जात्मक क्रम लावायचा तर मी हैदरला इतर दोन चित्रपटांच्या मधे ठेवेन. ओंकाराचा नंबर सर्वात वर लावीन. याला उघड कारण रसास्वादाची क्षमता हे आहे. ओंकारा ही आॅथेल्लोचं यथार्थ रुपांतर तर होताच वर तो सर्वांना सरसकट आवडेलसा व्यावसायिक चित्रपट होता. गाणी म्हणा, परिचित रुपातले आवडणारे परफाॅर्मन्स, सैफची ( त्याला भलता आत्मविश्वास देऊन गेलेली ) नकारात्मक भूमिका असे सर्वसामान्य प्रेक्षकाला आवडतीलसे घटक असूनही ते उत्तम रुपांतर होतं. इतर दोघांचं वळण हे तितकं व्यावसायिक नाही. हैदर बाबत बोलायचं तर त्याचं काहीसं अव्यावसायिक असणं हे हॅम्लेटशीच जोडलेलं आहे. हॅम्लेट करायला तितका सोपा नाही कारण मुळात ही तशी पॅसिव्ह व्यक्तिरेखा आहे. तो नायक आहे, भला माणूस आहे, पण स्वत:हून तो काही करु पहात नाही. कोणीतरी सांगणं, परिस्थितीने नाईलाज करणं या गोष्टी त्याला काही करायला भाग पाडतात. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष घटनांपेक्षा मानसिक द्वंद्व हा इथला महत्वाचा भाग आहे. आपल्याकडल्या नायकांना सामान्यत: प्रोअॅक्टीव गोष्टी जमतात आणि प्रेक्षकांनाही तीच अपेक्षा असते. नायकाने चार लोकाना बडवून काढलं की आपण खूष होतो. तो आपल्या कृतीच्या योग्यायोग्यतेचा विचार करायला लागणं आपल्याला झेपत नाही. त्यामुळे हैदरचं खरं आव्हान आहे ते हा असा ( टोकाचा) विचारी नायक आपल्यापुढे शक्य तितक्या प्रामाणिकपणे आणणं हे.

दुसरं, आणि तितकच मोठं आव्हान आहे ते विशाल भारद्वाजने निवडलेली गडद पार्श्वभूमी. नव्वदच्या दशकातलं काश्मीर आणि त्याची दुभंगलेली अवस्था ही शक्य तितकी खरी उतरवण्यासाठी भारद्वाजने पत्रकार पीर यांची मदत घेऊन शक्य तितकं अस्सल चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीचा विशेष हा, की ती हैदरच्या मनातल्या गोंधळाला एक वेगळा पैलू देते. काश्मीरच्या जनतेचं कोण आपला नं कोण परका या गोंधळात अडकणं, हे हैदरच्या आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघाताचं आणखी एक रुप ठरतं आणि चित्रपटाचा आशय विस्तारतो.
हैदरची गोष्ट बहुतेकाना परिचित असावी, अर्थात हॅम्लेट माहीत असल्यास. इथला हैदर ( शाहीद कपूर) आपल्या दहशतीच्या छायेतल्या गावी परततो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या डाॅक्टर वडिलांना दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन भारतीय सेनेने पकडून नेलय. अशातच तो आपल्या आईला ( तबू ) काकाबरोबर ( के के ) नको इतक्या जवळकीने वागताना पाहातो आणि विश्वासघाताच्या जाणीवेने त्रस्त होतो. वेडापिसा होऊन आपल्या वडिलांचा शोध घेणाऱ्या हैदरला  आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या ( श्रध्दा कपूर , त्यातल्यात्यात बेताचा अभिनय) मार्फत एक निरोप मिळतो आणि पित्याच्या मृत्यूला काका कारणीभूत असल्याचं लक्षात येतं. सूडाच्या भावनेने पेटलेला हैदर बदला तर घ्यायचं ठरवतो, पण त्याची मनोवस्थाच त्याला दगा देणार अशी चिन्ह दिसायला लागतात.
हॅम्लेटचं नाव जगातल्या अशा मोजक्या क्लासिक्समधे घेता येईल ज्यांचे अनेक तपशील, ती न वाचणाऱ्या पहाणाऱ्यांनाही माहीत आहेत. रुपांतरांमधून, वेळोवेळी इतरांनी वापरलेल्या संदर्भांमधून आणि एकूण लोकप्रियतेमधून ती सर्वांपर्यंत पोचलेली आहे. ' टु बी आॅर नाॅट टु बी' हे स्वगत आणि हॅम्लेटची हातात कवटी धरलेली मूर्ती तर प्रसिध्द आहेच, वर त्यातला नाटकाचा प्रसंग, हॅम्लेटच्या बापाचं भूत अशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत. यातल्या बहुतेक गोष्टी, चित्रपटाचा वास्तव पार्श्वभूमीचा धागा शाबूत ठेवत आणण्याचा यशस्वी प्रयत्न लेखन/ दिग्दर्शनात दिसतो. बापाच्या भूतासाठी काढलेली पळवाट तर फारच जमलेली आहे आणि प्रथमदर्शनी तिने दचकवलं तरी पुढे ती अधिकाधिक योग्य वाटत जाते. नाटकाची जागा घेणारं 'बिस्मिल' हे गाणं बाॅलिवुड परंपरेत चपखल बसतं हा त्याचा विशेष आहे तसंच मर्यादाही. विशेष अशासाठी , की गाणं आणि सादरीकरण दोन्हीतही ते उत्तम आहे आणि मूळ प्रसंगाचा परिणाम ते साधू शकतं. मर्यादा अशासाठी की एरवीच्या वास्तव प्रकृतीबरोबर हे ( किंवा टु बी आॅर नाॅट टु बी ची रस्त्यातली आवृत्ती देखील) तितकं जात नाही. आणि ज्यांनी कर्ज किंवा ओम शांती ओम पाहिलेत त्याना हे गाणं सहजच त्या दोन चित्रपटांतल्या अशाच प्रसंगांची आठवण करुन देतं.
प्रसंगांप्रमाणेच व्यक्तिरेखांचही इथलं रुपांतर चोख आहे. गर्टरुड ( आई ) आणि क्लाॅडीअस ( काका) पासून रोझान्क्रान्झ आणि गिल्डनस्टर्न ( दोन सलमान ) पर्यंत सर्व महत्वाच्या व्यक्तिरेखाना इथे समांतर पात्रयोजना आहे. बदललेल्या आशयस्वरुपामुळे घटनांच्या कालावधीत थोडं पुढेमागे करण्यात आलय, पण शब्दश: रुपांतर हे इथे अभिप्रेत नाही. या तिन्ही चित्रपटांत मूळ कलाकृतीला नव्या संदर्भांमधे बसवण्यात आलय आणि ते करायचं तर तर असे काही बदल आवश्यक आहेत.
काही जणांना चित्रपटाचा पूर्वार्ध हा संथ वाटतो आणि तो तसा आहे देखील. बरेच बाॅलिवुड चित्रपट कथेत शिरताच घटना घडवायला सुरुवात करुन वेगाचा आभास आणतात कारण सामान्य व्यावसायिक प्रवृत्तीच्या हिंदी चित्रपटांना काॅन्टेक्स्ट आवश्यक नसतो. त्या कथा कुठेही कशाही घडू शकतात. शिवाय घटना घडवणं ,एका पाॅइन्टपासून दुसऱ्यापर्यंत प्रवास करणं , हे प्रमुख सूत्र असतं. तसं इथे करणं शक्य नाही  कारण हैदरने तसं करणं हे त्याच्या मूळ प्रकृतीलाच इजा पोचवणारं ठरलं असतं. इथला पहिला भाग हा पार्श्वभूमी उलगडणं आणि त्या पार्श्वभूमीचं हैदरच्या मनोव्यापारांशी समांतर असणं स्पष्ट करतो. हे पटेलसं करायचं तर वेळ हा लागणार. ज्यांना तो घालवण्याची इच्छा नसेल त्यांनी आपण कोणते चित्रपट काय हेतूने पाहातो यावर पुनर्विचार करणं आवश्यक आहे.
शाहीद कपूर आणि तबू, या दोघांचा हा चित्रपट आहे. लांबी पाहिली तर शाहीदचा, पण तबूशिवाय त्याचा तोल राहाणार नाही. श्रध्दा कपूर वगळता, बाकी सहाय्यक नटसंचही चांगला आहे, पण तो कायम दुय्यमच राहातो. शाहीद चांगला अभिनेता असून त्याला रोमान्स आणि विनोदावर फुकट घालवलं जातं हे आपण जाणतोच.भारद्वाजच्या कमीने मधे शाहीद होता पण ती भूमिका इतकी लक्षवेधी नव्हती. हैदरमधली आहे. लंगडा त्यागीने जशी सैफच्या कारकिर्दीला वेगळी दिशा दिली तशी हैदर शाहीद कपूरच्या कारकिर्दीला देण्याची शक्यता दिसते.
हैदरचा शेवट हा भारतीय प्रेक्षकाची परीक्षा घेणारा आहे. तो सुखांत तर नाहीच , वर वैयक्तिक विध्वंसाची नवी गणितं मांडणारा आहे. बाॅलिवुड वळणाचे शेवट आपण बाजूलाच ठेवू, पण नव्या वळणाच्या गँग्ज ऑफ वसेपूर सारख्या चित्रपटाच्या शोकांतातही एक प्रकारचा विजय गृहीत धरलेला आहे. हैदरमधे या प्रकारचं समाधान नाही. प्रेक्षकाचं अस्वस्थ होणं ,ही यावर संभवणारी त्यातल्यात्यात संयत प्रतिक्रिया. ही कितीही टोकाला जाऊ शकते. पण चित्रपटाने अस्वस्थ करणं, विचार करायला लावणं यात वाईट काय आहे ? वेगळा अनुभव देण्याची खरोखर क्षमता असणारे चित्रपट क्वचित मिळतात. मग जेव्हा ते येतात, तेव्हा त्या अनुभवाला नाकं नं मुरडता सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहीजे. तेव्हा पहा आणि अस्वस्थ व्हा. सततच्या कृत्रिम आनंदावर हादेखील उतारा ठरु शकेल.

- -ganesh matkari

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP