फँड्री कसा पहावा?

>> Sunday, February 23, 2014



राष्ट्रीय पातळीवरल्या फिल्ममेकर्सशी , इतर भाषिक समीक्षकांशी बोलताना आपल्याला नेहमी जाणवतं, की त्यांच्या दृष्टीने मराठी चित्रपट एका महत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यात काहीतरी वेगळं, एक्सायटींग घडतय. प्रत्यक्षात मात्र मधला चारपाच वर्षांचा काळ हा वेगळ्यापेक्षा व्यावसायिकतेलाच अधिक महत्व देणारा आहे, असं दिसून येतं. त्यात आश्चर्यकारक काही नाही, कारण वेगळा सिनेमा हा व्यवसायीकतेएेवजी नाही तर तिला पर्याय म्हणून अस्तित्वात येतो. असं असूनही परीचित आणि वेगळं याचा तोल सांभाळणं, ही कोणत्याही चांगल्या चित्रपटसृष्टीची गरज असते. गेला काही काळ हा तोल ढळतोय की काय असं वाटायला लावणारा होता. मात्र नुकताच प्रदर्शित झालेला नागराज मंजुळेचा फँड्री आणि एरवी व्यावसायिक गणिताने बांधलेल्या झी सारख्या संस्थेने सारी गणितं बाजूला सारून त्यांना दिलेला आधार, हे चित्र आशादायक आहे.

यात एका गोष्टीवर काही प्रमाणात प्रेक्षकांकडून थोडी टिका झालेली दिसते, ती म्हणजे त्यांच्या जाहिरात तंत्रातून करण्यात आलेली दिशाभूल. पोस्टर्स, ट्रेलर्स मधून त्यातल्या रोमँटीक अँगलवर देण्यात आलेला भर, जे पाहाताना 'शाळा'पासून 'टिपी' पर्यंत चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभे राहातील, किंवा पब्लिसिटी साठी वापरलेलं आणि चित्रपटात नसलेलं अजय/अतुल या गाजलेल्या संगीतकारांनी संगीतबध्द केलेलं गाणं. या सगळ्यातून हा चित्रपट जसा असेल अशी आपली कल्पना होते, तसा तो नाही.मला वैयक्तिकदृष्ट्याही या प्रकारची दिशाभूल आवडत नाही, पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वाॅर आणि फिल्म पब्लिसिटी. चांगला चित्रपट लोकांपर्यंत पोचायला क्वचित गनिमी कावा वापरायला हरकत नाही, अशा मताचा मी आहे. एकदा का प्रेक्षक चित्रपटगृहात पोचला की तो चित्रपटात गुंततो का? हा खरा प्रश्न, आणि मला वाटतं फँड्री बाबत ,बहुसंख्य प्रेक्षकांसाठी तरी या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे.

फँड्री हा विशिष्ट चित्रप्रकारात बसणारा चित्रपट नाही. तो फाॅर्म्युला ठरवून काम करत नाही. पण त्याच्या विषयाबद्दल एका वाक्यात सांगायचं तर एका विशिष्ट , काहीशा स्थित्यंतराच्या काळात अस्तित्वात अालेलं  जांबुवंत कचरु माने उर्फ जब्या (सोमनाथ अवघडे) या आडगावात राहाणार््या कैकाडी समाजातल्या शाळकरी मुलाचं अनुभवविश्व तो आपल्यासमोर उभं करतो. हे विश्व अनेक पैलूंचं बनलेलं आहे. त्यात त्याला आपण अमुक जातीचा असल्याचा आणि त्यातून पडणार््या मर्यादांशी जोडलेला न्यूनगंड आहे. पडेल ते काम करुन कसंबसं कुटुंब पोसणार््या आपल्या वडिलांमधे ( किशोर कदम) जब्याला आपलंच भविष्य दिसत असल्याने कदाचित, त्यांच्याबद्दल राग आणि कीव याचं मिश्रण त्याच्या मनात आहे. नाही म्हणायला थोडा आशावादही आहे, प्रामुख्याने शालीवरल्या एकतर्फी प्रेमातून आणि  गावाने ओवाळून टाकलेल्या चन्क्याशी झालेल्या  (नागराज मंजुळे)मैत्रीमधून पुढे येणारा. आपल्याहून बर््या परीस्थितीतल्या मुलांचा थोडा हेवा आहे, पण परिस्थितीवर मात करण्याची, या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची जिद्द आहे. फँड्रीची पटकथा ही या सर्व बाजूंचाविचार करत जब्या हा नक्की कसा आहे याचं चित्र उभं करत नेते. महत्वाचं आहे ते हे चित्र. त्यापुढे जब्याचा एखादा छोटा विजय वा पराजय  दुय्यम मानावा लागेल. फँंड्रीची पटकथा सरधोपट पध्दतीने प्रेमकथा, वा अन्यायाविरुध्दच्या लढ्याची गोष्ट वा आणखी काही बनत नाही ती त्यामुळेच. त्याउलट ती अधिक गुंतागुंतीचा आशय मांडते. आपल्या जिवंत नायकाच्या सुखदु:खाच्या प्रातिनिधिक चढउतारांमधून एका समाजाच्या जगण्याचा आढावा घेते.

फँड्री आणखी एक इन्टरेस्टींग गोष्ट करतो ती म्हणजे अतिशय वास्तववादी पध्दतीने जीवनदर्शन घडवतानाही तो काव्यात्म, प्रतीकात्मक शैली जागृत ठेवतो. श्रेयनामावलीपासून सुरु असणारा जब्याचा काळ्या चिमणीचा शोध हा चित्रपटाला एक वेगळी धार आणतो, आणि या शोधातले टप्पे चित्रपटातला आशय अधिकाधिक गहीरा करत नेतात. जसा यातला पक्ष्याचा वापर , तसाच यात महत्वपूर्ण जागा असणार््या डुकरांचाही. आजच्या काळातही गावांमधे दिसणारी शिवाशीव, श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेदभाव, त्यांमधून निर्माण होणारे सामाजिक-नैतिक तणाव, हे या दुसर््या प्रतिकाच्या योजनेत सामोरे येतात. आपल्याला समोर दिसतय त्यापलीकडे पाहाण्याला प्रवृत्त करतात.

फँड्रीमधला सर्वात इन्टरेस्टींग भाग आहे तो त्याचं सतत जब्याच्या दृष्टीकोनाशी प्रामाणिक राहाणं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रसंग त्याच्या उपस्थितीत घडतो, किंबहुना यातला कचरूचा वावर हा बराचसा स्वतंत्र आहे, मात्र फोकस ठरवते ती जब्याचीच व्यक्तिरेखा. हे सर्वात स्पष्टपणे लक्षात येतं ते प्रेमप्रकरणाच्या संदर्भात. सामान्य चित्रपटीय प्रेमप्रकरणासारखा इथे दोन्ही बाजूंवर भर येत नाही.  चित्रपटात शालूचं असणं हे केवळ जब्याच्या नजरेतून येतं. तिचे प्रसंग येतात ते केवळ जब्याच्या आकर्षणाचं दृश्यरुप म्हणून. बाकी ना तिला धड संवाद आहेत, ना व्यक्तिरेखेला खोली. हा अपघात नसून योजना आहे, आणि दिग्दर्शकीय निर्णय म्हणून अतिशय योग्य. चित्रपटाकडे प्रेमकथा म्हणून पाहाणं योग्य नाही, हे आपण केवळ या योजनेवरुनही सांगू शकतो.

या चित्रपटातला वास्तववाद केवळ दृश्यापुरता नाही, आशयातही तो जाणवतो. वास्तववादी कलाकृती बंदीस्त अवकाशात , जेवढ्यास तेवढी गोष्ट सांगण्यावर भर देत नाहीत. त्यांचं जग हे मूळ कथानकाच्या चहूबाजूना पसरलेलं असतं . खर््या आयुष्यात  गोष्टी पाॅईन्ट ए ते पाॅईन्ट बी अशा ठराविक मार्गावर न चालता एकमेकाशी अशा जोडल्या जातात की त्यांचा संपूर्ण अवाका सहजपणे दृष्टीपथात येऊ नये. वास्तववादी कलाकृतीही आपल्या शैलीत हा अवाका आणण्याचा प्रयत्न करतात. आपण या घटनाक्रमाचा काही भाग पाहातोय, वाचतोय , पण या पात्रांचं , त्यांच्या समस्यांचं आयुष्य त्यापलीकडेही आहे असं जणू त्यांना सुचवायचं असतं. फँड्रीमधेही आपण पाहातो तो अशा एका वास्तवाचा तुकडा. त्यातल्या सर्व तपशीलांचं समाधानकारक सुटसुटीत उत्तर आपल्याला मिळणार नाही आणि ते मिळावं अशी अपेक्षा करणंही योग्य होणार नाही. चन्क्याची अशी अवस्था नक्की का झाली, शालूचं जब्याविषयी खरं मत काय, जब्याच्या अखेरच्या लढ्याचा परिणाम काय होईल, असे प्रश्न आपल्या विचारांना खाद्य पुरवतात, मात्र उत्तरं नं सांगता. या प्रश्नांचं असं कथेपलीकडल्या अवकाशाचा  भाग असणं,  आपल्याला एक सामाजिक वास्तव पाहात असल्याचा अनुभव देतं. असं वास्तव जे सहजी आपल्या कवेत येणार नाही, पण आपल्याला त्याविषयी विचार करतं ठेवेल.

नागराज मंजुळे ची राष्ट्रीय पारितोषिक विजेती शाॅर्ट फिल्म ' पिस्तुल्या ' मी पाहिली होती. त्याचा चित्रपटीय प्रयत्न हा सामाजिक बांधिलकीच्या पातळीवर त्याच जातीचा ( नो पन इन्टेन्डेड)  असला, तरी प्रत्यक्ष दर्जाच्या दृष्टीने 'फँड्री ' कितीतरी उजवा आहे. त्याच्या तांत्रिक बाजू, अभिनय, वगैरे सारं उत्तम आहेच, परंतु माझ्या मते सर्वात कौतुक व्हायला हवं, ते प्रथम प्रयत्न करणार््या या दिग्दर्शकाच्या नजरचं. शेवटी सार््यावर त्याचं नियंत्रण अपेक्षित आहे, आणि ते आपण ठेवू शकतो, हे त्याने इथे सिध्दही केलं आहे.

आता प्रश्न उरतो, तो प्रेक्षकांचा. त्यांनी फँड्रीकडे कोणत्या दृष्टीने पाहावं, हा. हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही. मी स्वत: हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तो मामी महोत्सवात, जेव्हा त्याची हवा तयार झाली नव्हती. त्यामुळे चित्रपट पाहाताना अपेक्षांचं ओझं नव्हतं. आज एक बाजू आहे जी चित्रपटाच्या आजवर झालेल्या कौतुकाचा , पारितोषिकांचा दाखला देऊन तो आॅस्कर वर्दी आहे असं मानते, तर दुसरी, जी त्याच्या फसव्या जाहिरात तंत्राकडे बोट दाखवून नाराजी व्यक्त करते. माझ्या मते, या दोन्ही बाजूंनी फँड्री पाहाणं हे त्याच्यावर अन्यायच करणारं आहे. हे उघड आहे, की इतका चर्चेत असणारा चित्रपट, या ना त्या अपेक्षांच्या प्रभावाखाली पाहिला जाईल आणि त्या अपेक्षा अंतिमत: तुमच्या दृष्टीवर परिणाम करतील. मात्र मी म्हणेन की अवघड असलं तरी आजवर एेकलेलं सारं हा चित्रपट पाहाण्याआधी विसरायचा प्रयत्न करा. जितक्या मोकळ्या मनाने तो पाहाल, तितका तो तुमच्यापर्य्ंत पोचण्याची शक्यता अधिक. आणि जर तो तसा पोचू शकला तर मराठी चित्रपटांमधला आशादायक बदलाचा काळ अजून सरलेला नाही असंच म्हणावं लागेल.
-गणेश मतकरी

Read more...

पुरस्कारांचे दिवस आणि सेन्साॅरशिप

>> Sunday, February 16, 2014




जानेवारी ते एप्रिल, हा काळ आपल्याकडल्या इंग्रजी चित्रपटरसिकांसाठी चांगला असतो. सामान्यत: केवळ दिखाऊ चित्रपट आणणारे चित्रपट वितरक थोडा काळ आपली गणितं बाजूला ठेवतात आणि समृध्द आशयाला प्राधान्य असलेले चित्रपट आपल्या चित्रपटगृहांमधे पाहायला मिळण्याची शक्यता वाढते. कधीकधी तर आपल्या चित्रपटप्रदर्शकांनी 'जागतिक चित्रपट म्हणजे केवळ हाॅलिवुड' हा बाणा बाजूला ठेवत चक्क इतर देशांच्या चित्रपटांची आयात केल्याचंही दिसून येतं. यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही, कारण याचा वितरकांच्या सद्सदविवेकबुध्दीशी काहीच संबंध नाही. उलट यात त्यांची व्यावसायिक मानसिकताच जागृत असल्याचं दिसून येतं.

हा काळ अवाॅर्ड सीझनचा आहे. गेल्या वर्षीच्या कामगिरीची दखल या काळात घेतली जाते.सर्वात प्रथम देण्यात येणारी आणि आॅस्करचा प्रीव्ह्यू मानली जाणारी गोल्डन ग्लोब अवाॅर्ड्स, सर्वात लोकप्रिय मानली जाणारी आॅस्कर्स अर्थात अकॅडमी अवाॅर्ड्स, नंतर ब्रिटीश अकॅडमीची बाफ्टा आणि अमेरिकन इन्डीपेन्डन्ट सिनेमाला दिली जाणारी इन्डीपेन्डन्ट स्पिरीट अवाॅर्ड्स या सार््या मोठ्या पुरस्कारांचा हा काळ. साहजिकच, या काळात या स्पर्धेत असणार््या चित्रपटांची ( मग ते गंभीर असोत वा रंजक) चांगलीच हवा असते. हे पुरस्कार समारंभ टिव्हीवर दाखवणारे चॅनल्स सतत या समारंभांची  हाईप वाढवत नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातूनया चित्रपटांची चांगली जाहिरातदेखील होते. साहजिकच, या काळापुरता एक प्रेक्षकवर्ग तयार होत जातो, जो सामान्यत: उपलब्ध प्रेक्षकवर्गाहून मोठा आहे, ज्याला या चित्रपटांची , त्यांच्या विषयांची, त्यांच्याबद्दल तयार झालेल्या मतप्रवाहांची चांगली माहिती आहे, आणि संधी मिळाल्यास तो हे ( आणि यात पारितोषिक नामांकनात असलेले परभाषिक चित्रपटही आले) तिकीट काढून नक्कीच पाहिल. मग अशा परिस्थितीत वितरकांनी गप्प बसून राहाणं, अगदीच मूर्खपणाचं.

परिणामी, या काळात हे सारे नव्याने प्रदर्शित होणारे चित्रपट आपल्याला हक्काने, मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतात. यंदाचच घ्या. गोल्डन ग्लोबची पारितोषिकं याआधीच देण्यात आली आहेत आणि तिथे पारितोषिकप्राप्त ठरलेली स्टीव मॅक्वीनचा '१२ इअर्स अ स्लेव्ह' आणि  डेव्हिड ओ रसेल चा 'अमेरिकन हसल' ही घोडी आॅस्कर स्पर्धेत पुढे असणार याबाबत कोणाच्याच मनात शंका नाही. त्याबरोबरच स्कोर्सेसीचा ' द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट', वुडी अॅलनचा 'ब्लू जॅस्मीन', स्पाइक जोन्जचा 'हर' या आणि अशा अनेक चित्रपटांबद्दलही कुतुहल वाढत चाललय. यातले वुल्फ  तर आपल्याकडे आॅलरेडी प्रदर्शित झालाय , हसल आणि यादीतले इतरही अनेक चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत कोणीही खरा चित्रपटप्रेमी या चित्रपटांना मोठ्या पडद्यावर पाहायची संधी सोडणार नाही. बरोबर?

चूक !

हे उत्तर कोणाला खोटं वाटेल, अतिशयोक्त वाटेल. आतापर्यंतच्या युक्तीवादाला निरर्थक ठरवणारं वाटेल. पण प्रत्यक्ष पाहिलं तर ते अगदी प्रॅक्टीकल म्हणण्यासारखं आहे. कसं ते सांगतो.

हाॅलिवुडचं स्वरुप हे ढोबळमानाने पाहिलं तर आपल्या चित्रपटउद्योगासारखंच आहे. म्हणजे प्रेक्षकांची करमणूक करणं हा आपल्यासारखाच त्यांच्या व्यावसायिक चित्रपटांमागचा अगदी मूलभूत हेतू आहे, आणि त्यातून पैसा मिळवणं हादेखील. आपल्याकडे ज्याप्रमाणे एकेकाळी समांतर चित्रपट होता आणि आजही वेगळा चित्रपट करणार््यांचा एक गट कार्यरत आहे, तसाच त्यांच्याकडे 'इन्डीपेन्डन्ट' या लेबलाखाली हाॅलिवुडबाह्य अस्तित्व टिकवणारा गट आहे. असं जरी असलं, तरीही आशयाच्या शक्यता, प्रेक्षकांची तयारी आणि विषयाचं वैविध्य, या सार््याच बाबतीत, आपण आणि ते यांच्यात खूप फरक आहे. त्यांची संस्कृती, सामाजिक वातावरण, जीवनमान, हेदेखील आपल्याहून वेगळं आहे. काही कमाल मर्यादेत, आविष्कारस्वातंत्र्यावर त्यांचा विश्वास आहे. साहजिकच, ते आशयापासून दृश्ययोजनांपर्यंत जो मोकळेपणा ठेवतात, तो आपल्याकडे चालणं कठीण होऊन बसतं.

आपल्याकडे अनावश्यक टॅबू फार गोष्टींवर आहेत. तुम्ही अमूक विचार मांडू शकत नाही, अमूक राजकीय पक्षाविरोधात बोलू शकत नाही, अमूक धर्माला ( अमूक कशाला, कोणत्याही म्हणू) प्रचलित पारंपारिक दृष्टीकोनापलीकडे जाऊन पाहू शकत नाही, सभ्यतेच्या पारंपारीक भारतीय कल्पनांपलीकडे जाऊन दृश्य दाखवू शकत नाही वगैरे. पारितोषिकप्राप्त चित्रपट हे नियमितपणे यातल्या कोणत्या ना कोणत्या लिखित वा अलिखित नियमाच्या विरोधात जाणारे असतात कारण त्यांची आपल्याला काय पडद्यावर आणायचंय याबद्दल काही एक भूमिका असते, जी सारंच गुळमुळीतपणे मांडत, वय वर्षं आठ ते एेशी, अशा सार्वत्रिक प्रेक्षकवर्गाला कवेत घेणारी नसते. अशा परिस्थितीत  आपल्याला चित्रपटगृहात काय पाहायला मिळेल, अथवा मिळेल का, याची जराही शाश्वती उरत नाही.

या आॅस्करचंच उदाहरण घ्यायचं, तर ' द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट' आणि  ' अमेरिकन हसल हे दोन्ही चित्रपट त्यांच्या दृश्य संवेदनांतआपल्या सभ्यतेच्या पारंपारिक कल्पनांना आव्हान देणारे आहेत. वुल्फ हा जाॅर्डन बेलफर्ट या भ्रष्ट स्टाॅकब्रोकरची सुरस आणि चमत्कारिक गोष्ट सांगतो, तर हसल १९७०/८० च्या दशकात भ्रष्ट राजकारण्यांना पकडण्यासाठी एफबीआयने दोन चोरांना हाताशी धरल्याची थरारक कथा सांगतो. गंमतीची गोष्ट अशी, की दोन्ही कथा, काही एक प्रमाणात सत्य घटनांवर आधारीत आहेत. वुल्फ बेलफर्ट च्या आत्मचरित्रावरच आधारलाय, तर हसल संपूर्ण अहवाल खरा असल्याचं कबूल करत नसला, तरी याला सत्याचा आधार असल्याचं श्रेयनामावलीतच मांडतो. दोन्ही चित्रपट आपल्याकडे येताना सेन्साॅर बोर्डाच्या तावडीत अडकणार हे या चित्रपटांच्या कथानकाचा गोषवारा वाचताच लक्षात येत होतं, प्रामुख्याने त्यातल्या काही धीट दृश्यांसाठी. वुल्फची काटछाट मी प्रत्यक्षात बघितलेलीच आहे, हसलचं त्या प्रमाणात बिघडणार नाही, पण काहीतरी कापलं जाईल निश्चित. हा अंक प्रसिध्द होईपर्यंत त्याचंही काय बरं वाईट केलं जातंय हेही दिसेलच.

सेन्साॅर बोर्ड हे आपल्या भल्यासाठी आहे, असं आपण गृहीत धरु ( गृहीत धरणंच बरं, सिध्द करणं कठीण) , पण जेव्हा त्यांच्यासमोर या चित्रपटांसारख्या कलाकृती येतात, तेव्हा ते काय दृष्टीकोनातून त्यांचा विचार करतात हे मला पडलेलं मोठच कोडं आहे. हे दोन्ही चित्रपट काही एक गंभीर वळणाचा आशय हसत खेळत मांडणारे आहेत. दोन्ही मोठ्या , गाजलेल्या , आॅस्करविनींग दिग्दर्शकांनी साकारले आहेत, त्यात पहिल्या दर्जाचा, स्वत:च्या भूमिकांकडे अतिशय गंभीरपणे पाहाणारा नटसंच आहे. जेव्हा प्रयत्न या प्रकारचा असतो, तेव्हा आपल्याला चित्रपटातच्या कलात्मक बाजूची जाण असली नसली, तरी त्याकडे थोडं सावधपणे पाहाणं गरजेचं असतं. ही सारी इतकी प्रतिष्ठीत , नावाजलेली , वैचारीक पार्श्वभूमी असणारी मंडळी, जर काही आपल्या चटकन पचनी न पडणारं दाखवत असतील, तर सरळसरळ त्यावर कात्री चालवण्यापेक्षा , त्याकडे पुन्हा एकदा पाहून आपल्या समजण्यात काही घोटाळा तर नाही, हे पाहाणं आवश्यक ठरतं.

बर््याचदा , चित्रपट हे संवाद वा दृश्यशैली विशिष्ट प्रकारची ठेवतात. कधीकधी तर मुद्दाम ती एका टोकाला नेणारी, बिचकवणारी ठेवावी लागते. त्याचा परीणाम हा चित्रपटांना एक टेक्श्चर देण्यासाठी केला जातो, आणि तो डिझाईन करताना दिग्दर्शकाचा काही एक विचार असतो. स्टॅनली कुब्रिकच्या ' द क्लाॅकवर्क आॅरेंज ' मधली प्रक्षोभक दृश्य, किंवा माईक निकोल्सच्या ' क्लोजर'मधली धक्कादायक भाषा अशी कितीतरी उदाहरणं आपण देऊ शकतो  जी प्रत्येक वेळी काही ना काही हेतू मनात धरुन वापरल्याचं आपल्या लक्षात येतं. ही काढण्याची, बदलण्याची, चित्रपटाच्या मूळ परिणामाला धोका पोचेलसं काही करण्याची सेन्साॅर बोर्ड  सदस्यांना गरज का वाटावी?

हे सरळ आहे, की सार््या गोष्टी सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी नसतात. पण त्यासाठी तो प्रौढांसाठी मर्यादीत ठेवणं, हे त्यांच्या हातात आहेच. पण एकदा ही वयोमर्यादा निश्चित केली, की पुढे प्रत्येक दृश्य कापत राहाण्यात काय मुद्दा आहे? एकाच वेळी प्रेक्षक समजत्या वयाचा परंतु असमंजस मानण्याची ही कोणती योजना? तसं केल्याने उलटच परिणाम होतो. कापलेल्या जागा काही सहजासहजी लपत नाहीत आणि तयार होणार््या दृश्य खाचखळग्यांनी प्रेक्षक कथेबरोबर समरस होऊ शकत नाही.

त्याखेरीज आणखी एक गोष्ट महत्वाची. ती म्हणजे विशिष्ट दृष्य कापण्यामागचं कारण. चित्रपट हे अनेकदा जे प्रत्यक्ष दाखवतात, त्याहूनही अधिक धक्कादायक गोष्ट सूचित करतात. वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट नग्नता दाखवत असला, तरी प्रत्यक्षात ती नग्नता भयंकर नाही, तर त्यातून दिसणारा समाजाच्या एका स्तराचा अॅटीट्यूड भयंकर आहे. ही दृष्य वापरली जातात ती केवळ आशयाला पूरक म्हणून. त्यांना काढणं हे दिग्दर्शकाच्या हातातलं एक अस्त्र काढून घेण्यासारखं असल्याने योग्य नाही. आणि जर ते ती दृश्य पूरक नसतील, आणि आशयाचा जहालपणा तसाही प्रेक्षकापर्यंत पोचत असेल तर मुळातच ती काढण्यात मुद्दा नाही, कारण अधिक भयंकर आहे तो आशय ,दृष्य नाही . चित्रपटात, चांगल्या दर्जेदार चित्रपटात जे काही दिसेल त्याहून कितीतरी धक्कादायक गोष्टी आज शाळकरी मुलांना इन्टरनेटवर घरबसल्या पाहाता येतात. यावर सेन्साॅर बोर्डाचं काहीही नियंत्रण नाही. मग कलाकृतीचं अवमूल्यन करणारा , आणि स्वत:कडे मोठेपणाची भूमिका घेऊन भल्याभल्यांच्या हेतूविषयी शंका घेणारा हा सेन्साॅरचा फार्स कशासाठी?

याचा परिणाम होतो तो हाच, की या प्री आॅस्कर काळात नवे चित्रपट प्रदर्शित होउनही, अनेक खरे चित्रपटरसिक ते चित्रपटगृहात जाऊन पाहावे का नाही, या संभ्रमात पडतात. खासकरुन संवेदनशील विषयांवरले वा वादग्रस्त चित्रपट. त्यापेक्षा इन्टरनेटवरुन डाऊनलोड करण्याचा मार्ग अवैध असला, तरी कलाकृती मूळच्या रुपात पाहायला मिळण्याचा मोह हा कितीतरी अधिक प्रमाणात असतो. या मंडळींना दोषी ठरवणं हे नक्कीच सोपं आहे, पण मला तरी त्यांच्या तर्कशास्त्रात काही चूक दिसत नाही. निदान या चित्रपटांकडे पाहाण्याच्या आपल्या सरकारी, कायदेशीर धोरणात , कलाप्रांताचा निश्चित विचार करून काही बदल घडवल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही.
-गणेश मतकरी
 (Grihaswaminimadhun)

Read more...

हाॅफमन

>> Sunday, February 9, 2014


"द जाॅब इजन्ट डिफिकल्ट. डूइंग इट वेल इज डिफिकल्ट."

फिलिप सिमोर हाॅफमन, अभिनयाविषयी बोलताना.
(जुलै २३, १९६७-फेब्रुवारी ४, २०१४)

अभिनेते दोन प्रकारचे असतात. पहिले मोठ्या थोरल्या भूमिकांमधे वाजागाजा करत येतात. तुमचं लक्ष हे त्यांच्याकडे जाण्याआधी त्यांच्या भोवतीच्या वलयाकडे जातं आणि त्यांच्या भूमिकांमधेही त्या त्या व्यक्तिरेखांपेक्षा त्यांच्या स्वत:ची ठाशीव प्रतिमाच जाणवत राहाते. किंबहुना अनेकदा ही प्रतिमा हवीशी वाटल्यानेच आपण या अभिनेत्यांना स्वीकारतो.

 याउलट दुसर््या प्रकारचे अभिनेते कधी तुमच्या भावविश्वाचा भाग होऊन जातात अनेकदा तुम्हाला कळतही नाही. त्यांच्या येण्यात आव नसतो, 'माझ्याकडे पहा' असं ते आपल्या भूमिकांमधून सुचवत नाहीत, अनेकदा ते छोट्या भूमिकांमधेही नजरेला पडतात आणि त्यांच्यातला नट आपल्याला दिसतच नाही. आपल्यापुरते ते ती व्यक्तिरेखाच असतात. हळूहळू या मंडळींना पडद्यावर पहात राहायची आपल्याला सवय होऊन जाते. मग कधीतरी आपण लक्षात ठेवून त्यांचं नाव जाणून घेतो आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवायला लागतो. कधीमधी जुने चित्रपट पाहातानाही यांची गाठ पडते आणि आपल्याला तेव्हा आवडलेली ती अमुक तमुक भूमिका यांनीच केली होती बरं का, असा सुखद धक्का आपल्याला अनुभवता येतो. ही मंडळी बहुधा अपेक्षाभंग करत नाहीत. तुमच्या संपादन केलेल्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत. म्हणजे निदान आपल्या कामात तरी . कधीकधी मात्र त्यांचं व्यक्तिगत आयुष्यच त्यांना असा पेच घालतं, की गोष्टी कधी हाताबाहेर गेल्या कोणालाच कळत नाही. वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी  फिलीप सिमोर हाॅफमनचा ड्रग ओव्हरडोसने झालेला अंत अशाच एका दुर्दैवी पेचाशी जोडण्यापलीकडे आपण काही करु शकत नाही.

आपल्याकडे इंग्रजी चित्रपट पहायला मिळण्याचं प्रमाण गेल्या वीसेक वर्षात, म्हणजे हाॅफमनच्या कारकिर्दीदरम्यान सुधारत गेलं असलं, तरी ते फार भरवशाचं नाही. त्यामुळे लोकप्रिय चित्रपट हमखास येत असले, तरी अधिक आशयगर्भ चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसण्याची खात्री नाही. अर्थात आपण ते या ना त्या मार्गाने पाहू शकतो पण अशा रँडम बघण्यात दिग्दर्शका, लेखका , अभिनेत्यांच्या कामाचा आलेख विस्कळीत होऊन जातो. त्याचा वेगळा अभ्यास केल्याशिवाय या कलावंतांची वाढ कधीपासून कशी होत गेली हे आपल्याला कळायला मार्ग उरत नाही. माझ्या लक्षात हा अभिनेता आला तो पाॅल थाॅमस अँडरसन दिग्दर्शीत आँसाब्ल चित्रपटात, मॅग्नोलिआ मधे  . चित्रपट जरी १९९९चा असला तरी मी पाहीपर्यंत आणखी दोनतीन वर्ष उलटली होती. या चित्रपटात नटसंच प्रचंड होता. अगदी टाॅम क्रूजपासून वय आणि प्रसिध्दीच्या सर्व पायर््यांवरले लाेक होते. तरीही त्यातलं हाॅफमनने उभं केलेलं, सद्वर्तनी मेल नर्सचं पात्र लक्षात राहीलं. नंतर मी लगेचच  दोन वर्ष आधी म्हणजे १९९७ ला आलेला, अँडरसनचाच बूगी नाईट्स पाहिला आणि हा अभिनेता जे करतोय ते पाहिलं पाहिजे असं निश्चित ठरलं.

पाॅर्न इन्डस्ट्रीचं थबकवणारं  चित्रण करणार््या 'बूगी नाईट्स'ला हाॅफमनची ब्रेकिंग आऊट फिल्म मानलं जातं. म्हणजे या चित्रपटातल्या गे बूम आॅपरेटरच्या भूमिकेपासून तो लोकांच्या नजरेत आला. याआधीही त्याने लोकप्रिय आणि समीक्षकप्रिय चित्रपटांमधून छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या पण हाॅफमनची ताकद इथे लक्षात यायला लागली. आणि एकदा ती आली म्हणताच त्याच्यापुढे अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या.

हाॅफमनचं रुप सांकेतिक प्रमुख भूमिकांना चालणारं नव्हतं. मोठं डोकं, जाडगेली शरीरयष्टी यांमुळे त्याला परिचित वळणाच्या भूमिका मिळणार नाहीत हे उघड होतं, पण त्या तशा मिळण्याची गरजही नव्हती. कारण नायक म्हणून त्याने स्वत:ला पाहिलंच नाही. त्याने स्वत:साठी जागा शोधली ती खलनायकी नव्हे, पण नकारात्मक, थोड्या आडवळणाच्या व्यक्तिरेखांत. 'पॅच अॅडम्स' (१९९८) मधला , नायकाच्या आपल्या डाॅक्टरी पेशाकडे गांभीर्याने न पाहाण्याचा राग असणारा रुममेट ( हा चित्रपट मुन्नाभाई एम बी बी एस मागची प्रेरणा आहे आणि त्यातली डाॅ अस्थानाची भूमिका साकारताना, बोमन इरानीने या व्यक्तीरेखेपासून स्फूर्ती घेतल्याचं जाणवतं), 'द टॅलेन्टेड मिस्टर रिपली' (१९९९) मधला रिपलीचा डाव ओळखणारा पण तरीही त्याला तुच्छ लेखत राहाणारा फ्रेडी,  'आॅल्मोस्ट फेमस' (२०००) मधला आपल्या 'अनकूल' असण्याबद्दल अभिमान बाळगणारा संगीत क्षेत्रातला पत्रकार लेस्टर बँग्ज, अशा अनेक लक्षात राहाण्यासारख्या भूमिका त्याने केल्या. त्याचा विशेष हा होता की तो या काहीशा बेतीव भूमिकांनाही चटकन खर््या करुन सोडत असे. या काहीशा स्वार्थी, आक्रस्ताळ्या, विक्षिप्त पात्रांनाही सहानुभूती मिळवून देत असे.

या सार््या भूमिकांची लांबीही खूप मोठी होती अशातला भाग नाही. पण हाॅफमनचा वावर, वाक्यांची फेक, समोरच्या नायकांची पत्रास न ठेवता भूमिकेत शिरण्याची तयारी, यामुळे तो एखाद दुसर््या प्रसंगातही लक्षात राहायचा. त्याच्या पात्रांच्या वृत्तीत जरी साम्य असलं तरी प्रत्यक्षात यातली प्रत्येक पडद््यावर साकारताना त्याने स्वत:मधे आमूलाग्र बदल घडवला. त्याने स्वत:ची शैली किंवा प्रतिमा होऊ दिली नाही.

हाॅफमनचं रुप आणि त्याच्या सुरुवातीच्या काळातल्या छोटेखानी भूमिका यांनी तो मध्यवर्ती भूमिकांपर्यंत कसा जाईल , हा प्रश्न होताच, जो सुटला बेनेट मिलर दिग्दर्शित कापोटी (२००५) चित्रपटाने. हाॅफमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं आॅस्कर मिळवून देणार््या या चित्रपटात त्याने कॅन्ससमधल्या एका कुप्रसिध्द हत्याकांडावर आधारीत  'इन कोल्ड ब्लड'  हे प्रचंड गाजलेलं पुस्तक लिहिणार््या ट्रुमन कापोटींची भूमिका साकारली होती. आपल्या एरवीच्या व्यक्तिमत्वाशी पूर्ण फारकत घेणार््या या भूमिकेने हाॅफमन स्टार झाला.तोही 'स्टार'  या पदाच्या पारंपारिक गुणवैशिष्ट्यांशी अर्थाअर्थी संबंध नसताना. सिडनी लूमेट दिग्दर्शित  'बीफोर द डेव्हिल नोज यू आर डेड' (२००७)  मधला सारी गणितं चुकत जाणारा भ्रष्ट फिनान्स एक्झिक्युटीव, चार्ली काॅफमनच्या 'सिनेकडकी, न्यू याॅर्क'(२००८) मधला वास्तव आणि कल्पिताच्या सीमेवर भरकटणारा नाट्यदिग्दर्शक, जाॅन पॅट्रिक शॅनलीच्या 'डाउट' (२००८) मधला संशयाच्या छायेतला धर्मोपदेशक अशा अनेक प्रमुख भूमिका त्याने पुढल्या काळात केल्या. अनेक पुरस्कार आणि नामाकनं मिळवली .  'जॅक गोज बोटींग' (२०१०) या चित्रपटातून दिग्दर्शनातही पदार्पण केलं.

अनेक वर्षांपासून तो ब्राॅडवेवरही दिग्दर्शन आणि अभिनय करतच होता. आर्थर मिलरच्या 'डेथ आॅफ ए सेल्समन' या सुप्रसिध्द नाटकाच्या २०१२ मधल्या पुनरुज्जीवनात त्याने केलेली विली लोमॅन ही मध्यवर्ती भूमिका त्याच्या रंगभूमीवरल्या करीअरचा हायलाईट मानली जाते. त्याच्या मृत्यूनंतर श्रध्दांजली म्हणून पाच फेब्रुवारीला पावणेआठवाजता ब्राॅडवे नाट्यगृहांचे दिवे एका मिनिटाकरता मंद करण्यात आले, यावरुनही हाॅफमनचा या क्षेत्रातला दबदबा दिसून येतो.

कोणताही कलावंत गेल्याचं दु:ख हे असतंच पण या प्रकारचा अष्टपैलू कलावंत जेव्हा आपल्या कारकिर्दीच्या मध्यावर निघून जातो तेव्हाची भावना ही थोडी हताश करणारी असते. फिलीप सिमोर हाॅफमनचा व्यसनापायी ओढवलेला मृत्यू ही घटना त्यातलीच एक. वीस बावीस वर्षांपूर्वी त्याने या व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि पुढली अनेक वर्षं तो यशस्वीही ठरला.पण शेवटी त्याच्या व्यक्तीगत आयुष्याने त्याला दगा दिलाच.  हाॅलिवुडमधल्या सर्वात जिव्हारी लागणार््या शोकांतिकांमधे एकीची भर पडली असं म्हणणं नक्कीच चुकीचं ठरणार नाही.

आज हाॅफमनची जागा रिकामी आहे. ती कोणी इतक्यात भरून काढेल असं वाटत नाही.

- ganesh matkari

Read more...

हर- निराळी प्रेमकथा

>> Sunday, February 2, 2014


'पास्ट इज ए स्टोरी वुई टेल अवरसेल्व्ज'
समॅन्था, हर

'हर' या स्पाइक जोन्ज दिग्दर्शित चित्रपटाला नायिकाविरहीत रोमँटिक काॅमेडी म्हणणं टेम्प्टिंग असलं तरी योग्य नाही, कारण चित्रपटात (अगदी योग्य कारणासाठी) प्रत्यक्षात न दिसणार््या नायिकेचं अस्तित्व आपल्याला  पदोपदी जाणवत राहातं. स्कार्लेट जोहॅन्सनने दिलेला , तिला व्यक्तिमत्व देणारा समॅन्थाचा आवाज हे यातलं प्रमुख कारण असलं, तरी तेवढंच कारण नाही. गोल्डन ग्लोब जिंकून आॅस्कर स्पर्धेत असणारी जोन्जचीच उत्तम पटकथा, दिग्दर्शनात नायकाचा प्रत्यक्षातला एकटेपणा न जाणवू देणं, आणि वाकीन फिनिक्सचा प्रेक्षकाला पहिल्या दोन मिनीटातच गुंतवणारा अभिनय अशा बर््याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. मात्र मी त्यापलीकडे जाऊन म्हणेन, की राॅम काॅम्सचा एक सुखान्त आणि ' बाॅय मीट्स गर्ल, बाॅय लूजेस गर्ल, बाॅय गेट्स गर्ल' या परिचित रचनेतून मिळणारा, आणि मनोरंजन हा हेतू ठामपणे डोक्यात ठेवणारा फाॅर्म असतो. 'हर' या परिचित संकेतांमधे राहाण्याचा प्रयत्न करत नाही. तो त्यापलीकडे जाउन प्रेम, अस्तित्व, जाणीवा, जगणं याबद्दल फिलाॅसाॅफीकल प्रश्न उपस्थित करतो. मेट्रिक्स सारख्या चित्रपटांनी सत्य म्हणजे काय हे शोधणारे देकार्तचे विचार, ब्रेन इन ए वॅट सारख्या संकल्पना पुढे आणत माणसाला मिळणारी जाणीव हेच सत्य, मग ती कृत्रिम पध्दतीने अस्तित्वात आलेली का असेना, असा विचार मांडला होता. हर त्याही पुढे जात ही जाणीव जिवंत व्यक्तीला असण्याची गरज क्वेश्चन करतो. काॅन्शसनेस, मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना, हा त्याच्या लेखी जिवंतच आहे, मग तो ए आय, अर्थात आर्टीफिशअल इंटेलिजन्स का असेना!
चित्रपट थोडासा भविष्यात, म्हणजे अनेक विज्ञानपटात वापरल्या जाणार््या ' नजिकचा भविष्यकाळ' या सोयीस्कर काळात घडतो. हा काळ आजच्यापेक्षा फार वेगळा नाही, मात्र यंत्रविश्व खूपच अद्ययावत आणि सोफिस्टीकेटेड झालय, पर्यायाने, त्यावर विसंबणारा माणूस, जनसंपर्कापासून दूर, अधिकच एकटा पडला आहे. हे आजच्या जगाचं लाॅजिकल एक्स्टेन्शन असणारं आयसोलेशन हर मधे फार प्रभावीपणे येतं. नात्यांमधे वाढत चाललेली क्षणभंगूरता, स्वातंत्र्याच्या कल्पनांमधून तुटत चाललेले संबंध, प्रत्येक व्यक्तिचं आपल्यापुरतं विश्व, हे या जगाचं वैशिष्ट्य आहे. या जगाच्या रहिवाश्यांनाही सोबतीची गरज आहे, पण हा शोध त्यांना या व्यक्तिगत विश्वाबाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करण्यापेक्षा त्या विश्वातच अधिक खोलवर नेताना दिसतो.
'हर' मधला प्रोटॅगनिस्ट आहे थिओडोर (फिनिक्स). थिओडोर पत्रलेखक आहे. पत्रलेखनाची कला संगणकाच्या प्रभावाखाली नामशेष होत चालली आहे, मात्र काही खास पत्रव्यवहार हाताने लिहील्यासारखे फाॅन्ट वापरुन लिहीणं ,हा व्यवसाय बनला आहे. थिओडोर या कामात खूपच हुशार आहे. स्वत: बिकट घटस्फोटातून अन एक प्रकारच्या डिप्रेशनमधून जात असतानाही इतरांना प्रेमादराची पत्र लिहून देण्याचं काम तो सफाईने करतोच आहे. अशातच तो आपला संगणक अपडेट करतो आणि आपल्या नव्या ओ एस (आॅपरेटींग सिस्टीम) बरोबर त्याचा संवाद सुरू होतो. आजवरच्या ओ एस च्या तुलनेत अधिक अद्ययावत असणारी ही सिस्टीम जणू स्वत:चं व्यक्तिमत्व घेऊन येते. स्वत:ला समॅन्था ( जोहॅन्सन) असं नावही ठेवते. तिचा संचार थिआेडोरच्या  संगणकांपासून त्याच्या फोन्सपर्यंत असल्याने,  संपर्कातून जवळीक वाढते आणि शरीरविरहीत मैत्री सुरू होते, लवकरच प्रेमापर्यंत पोचते. आपल्याला शरीर नसल्याची अडचण भरुन काढण्यासाठी  समॅन्था सुरूवातीला काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करते पण त्यात यश न मिळताही प्रेम तसंच राहातं.दिवस जातात तशी समॅन्था स्वत: अधिकाधिक मानवसदृश बनण्याचा प्रयत्न करायला लागते. प्रत्यक्ष नाही पण वैचारीक पातळीवर. पण मानव बनण्यातही धोका हा असतोच. शेवटी मानव म्हंटला की स्वातंत्र्य आलं, आणि हे स्वातंत्र्य मिळताच समॅन्था थिओडोरशी स्वत:ला बांघून राहीलच याची काय खात्री?
माणूस असणं, स्वत:चं व्यक्तिमत्व असणं म्हणजे काय, हा प्रश्न 'हर' मधे खूप महत्वाचा ठरतो, आणि त्यावर सोपं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. केवळ त्याचे विविध पैलू आपल्यापुढे मांडले जातात. समॅन्थाचं व्यक्ती नसूनही स्वतंत्र व्यक्तिमत्व असणं आणि त्याला विरोधाभास असणारं थिओडोरचं प्रत्यक्ष माणूस असून सतत कोणानाकोणात गुंतून , कोणानाकोणावर अवलंबून राहाणं हे नात्यांबद्दल, त्यांच्या बनण्या टिकण्याबद्दल, त्यांच्या खोली अन सच्चेपणाबद्दल आपल्याला विचार करायला भाग पाडतं. इतकं, की त्याबद्दल खूप विचारही कदाचित त्रासदायक ( चांगल्या अर्थाने) ठरावा.
स्पाईक जोन्जची वेगळ्या आणि हाय कन्सेप्ट फिल्म्स करण्याबद्दल ख्याती आहे. खासकरुन चार्ली काॅफमनच्या पटकथा असणारे बीईंग जाॅन मालकोविच (१९९९) आणि अॅडॅप्टेशन ( २००२) यांची खास नावं घ्यावी लागतील. मात्र महत्वाचं हे, की तो संकल्पनेला दृश्य रुप आणण्याच्या भानगडीत स्पेशल इफेक्ट्सच्या नादी लागून वाहावत जात नाही. त्याची मांडणी गरजेपुरती, मिनिमलीस्ट असते. हर हा कदाचित त्याचा सर्वात पाॅलिश्ड वाटणारा चित्रपट असावा, मात्र याचा अर्थ तो दृश्य चमत्कारांना स्थान देतो असं नाही. इथेही, तो भविष्य दाखवण्यापुरते काही आधुनिक घटक अधोरेखित करतो, म्हणजे मल्टीमिडिआचं बदलतं रुप, यंत्रांचा साध्या आयुष्यात वाढत जाणारा शिरकाव, आर्किटेक्चर, इन्टीिरअर डिझाईनमधे दिसणारा देखणा परकेपणा अशा जागा इथे आहेत मात्र त्या आशयाला पूरक राहातात, त्यावर कुरघोडी करु पाहात नाहीत. समॅन्थाला दृश्यरुप देण्याचा नादही चित्रपट सोडतो आणि आवाजानेच तिला खरी करत आणतो.
फ्रेन्च समीक्षक मिशेल शिआें  यांच्या लिखाणात 'अकुजमेत्र' नावाची एक संकल्पना दिसून येते. ती आवाजाच्या अशा वापराला उद्देशून आहे ज्यात हा आवाज व्यक्तिची जागा घेताे. प्रत्यक्षात चित्रपटात व्यक्ति दिसली नाही तरी प्रेक्षकाच्या मनात तिचं अस्तित्व तयार होण्याचं काम हा आवाज करतो. अनेक परिचित चित्रपटांमधे आपण ही क्लुप्ती पाहिलेली आहे.सायकोमधली नाॅर्मन बेट्सच्या आईची व्यक्तिरेखा, २००१-ए स्पेस ओडिसीमधला हॅल, मून चित्रपटात केविन स्पेसीचा आवाज असणारा गर्टी, थोड्या माफक प्रमाणात आपल्या लन्चबाॅक्समधे इलाच्या अदृश्य शेजारीणबाईंच्या व्यक्तिरेखेबद्दलही हे म्हणता येईल. 'हर' मधली समॅन्था, हे या डिव्हाइसचं चांगलं आणि गिमिकपलीकडे जाणारं उदाहरण मानता येईल. कारण या भूमिकेला केवळ आवाज असणं ही चमत्कृती नाही, हे वास्तवच आहे. किंबहुना याप्रकारच्या नात्यांपासून आपण फार दूर आहोत असंही म्हणता येणार नाही.  अॅपलने वापरात आणलेल्या 'सिरी' ची समॅन्था वंशज आहे हे उघड आहे. आपला आजही या यंत्राबरोबर असणारा वाढता संबंध पाहाता हा नजिकचा भविष्यकाळ खरच नजिक आहे, हे नक्की.
जोहान्सनने आजवर खूप इन्टरेस्टिंग भूमिका केल्या आहेत. गेल्या वर्षी तिने केलेल्या 'डाॅन जाॅन' आणि 'हर' या दोन्ही चित्रपटात तिने परस्परविरोधी प्रवृत्तींना फार चांगल्या पध्दतीने मांडलं आहे. तरुण, सुंदर असून आयुष्याकडे अत्यंत सुपरफिशिअली पाहाणारी डाॅन जाॅनमधली बार्बरा शुगरमन ही एक प्रकारे प्रत्यक्ष अस्तित्व नसतानाही जगणं म्हणजे काय हे समजलेल्या समॅन्थाच्या अगदी उलट म्हणता येईल. या दोन्ही ठिकाणी ती आपल्यापर्यंत पोचते, हे अभिनेत्री म्हणून तिचं कौशल्य.
'हर' ची कल्पना कोणी एेकली, तर एकतर ती खूप बाळबोध तरी वाटेल, किंवा गिमिकी तरी.  मात्र हर या दोन्ही वर्णनात बसत नाही. गेल्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट प्रेमकथांमधे गणला जाऊ शकणारा पण प्रगल्भ असा हा चित्रपट हा बदलत्या काळाबरोबर बदलत जाणार््या जगण्याचा वेध घेतानाच आपल्या मूलभूत प्रेरणांचाही सहज विचार करतो. त्याचा मूळचा विक्षिप्तपणा त्याला नामांकन मिळवून देऊनही आॅस्करच्या सर्वोच्च पुरस्कारापर्यंत नेणार नाही हे नक्की, पण त्याने काहीच फरक पडत नाही. मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधे त्याचं स्थान मात्र निश्चित आहे.
- ganesh matkari

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP