पॅरासाईट - भेदक वास्तवाचं प्रत्ययकारी चित्रण

>> Sunday, February 2, 2020
सूचना- लेखात भरपूर स्पाॅयलर्स आहेत. चित्रपट पहाण्याआधी अजिबात वाचू नये

बाॅन्ग जून-हो चा पॅरासाईट हा विषयाकडे पाहून एका विशिष्ट वर्गात बसवणं फार कठीण आहे. पहिला अर्धा भाग पाहिला, तर ती काॅमेडी आहे असं वाटतं. पुढे त्यात भय आणि रहस्याचा भाग शिरतो, आणि शेवटाकडे लक्षात येतं की आपण एक प्रगल्भ आणि भेदक सामाजिक आशय मांडणारा चित्रपट पहातो आहोत. हा जो आशय आहे, त्याची मूळं चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच आपल्यासमोर आहेत, पण ती इतक्या सफाईने लपवलेली आहेत, की आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवलेलच नाही. शेवटाच्या भागाकडे पाहून जर आपण मागे नजर फिरवली, तर ही सारी आशयसूत्र आपल्यापुढे उभी रहातात आणि आपल्या हे आधी कसं लक्षात आलं नाही, असं होऊन जातं. यातली सर्वात उघड गोष्ट आहे ती म्हणजे चित्रपटाचं शीर्षक, ‘पॅरासाईट’. सुरुवातीच्या काही भागातच याचा एक सरळ अर्थ आपल्याला लागतो. पण चित्रपट जसजसा शेवटाकडे येतो तसा आपल्याला लागलेला अर्थ बरोबर होता, का चित्रपट त्याच्या पूर्णपणे उलट विधान करतोय या संभ्रमात आपण पडतो

मॅक्झिम गाॅर्कीच्या लोअर डेप्थ्सनाटकात तळघरात रहाणारी पात्र आहेत, आणि त्यांच्या रहाण्याच्या जागेतून त्यांचं सामाजिक उतरंडीत तळाला असणं, हे प्रतीकात्मक रितीने दाखवलेलं आहे. मूळ रशिअन नावाचं भाषांतर होतं, तेॲट बाॅटमअसं. आपल्याकडेही चेतन आनंदचानीचा नगर’ ( १९४६) हे त्या अर्थाने गरीबांचं समाजातलं स्थान, वस्तीच्या नावातूनच उभं करतो. त्यामुळे पॅरासाईटमधल्या मुख्य पात्रांचं तळघरात असणं, हे लगेच समजण्यासारखं आहे. हे आहे किम कुटुंब. चुंग-सूक (चान्ग हे-जिन) आणि की-टेक( साॅंग कांग-हो) हे आई वडील , की-वू ( चोय वू-शिकहा मुलगा आणि की-जोन्ग (पाक सो-डाम) ही मुलगी. पात्रांची आणि त्यांच्या परिस्थितीचीही आपली पहिल्या पाच मिनिटात ओळख होते. आई वडील बेकार आहेत, मुलांनी शिक्षणं सोडलेली. फोनची बिलं भरायलाही पैसे नाहीत. शेजाऱ्यांचा वाय फाय सिग्नल चोरुन कसंतरी इंटरनेट मिळतय. की-वूचा एक मित्र त्याला  -हाय( जाॅन्ग जी-सो) या श्रीमंत घरच्या मुलीला इंग्रजी शिकवण्याची संधी देऊ करतो आणि चित्रपटातल्या नाट्याला सुरुवात होते. -हाय चा बाप, पाक डाॅन्ग-इक (ली सुन-क्यून) हा व्हिडिओ गेम्स डेव्हलपर असतो, आणि कुटुंब एका प्रसिद्ध आर्किटेक्टने डिझाईन केलेल्या आधुनिक महालात रहात असतं. किम कुटुंबाचं तळघर हे या चित्रपटात जितकी महत्वाची भूमिका बजावतं, तितकाच हा पाक कुटुंबाचा महालही. ते घर जसं प्रतिकात्मक, तसच हेदेखील. खाली मोठा चौथरा देऊन उंचीवर बांधलेलं , आणि अंतर्भागात आपली रहस्य लपवणारं. या कुटुंबातला छोटा मुलगा -साॅन्ग ( जुंग ह्योन-जुन ) ला कलेची प्रचंड जाण आहे, असं त्याच्या आईचं , योन-ग्योचं ( चो येओ जाॅन्ग ) मत आहे. आणि त्याला चित्रकला शिकवण्यासाठी ती शिक्षक शोधतेय. -हाय ला शिकवण्यासाठी आलेला की-वू, आपल्या बहिणीला प्रसिद्ध कला प्रशिक्षक म्हणून चिकटवतो आणि एकेक करुन किम कुटुंबाचे सारेच सदस्य वेगवेगळ्या रुपात पाक कुटुंबात घुसतात. बाप ड्रायव्हर म्हणून लागतो, तर आई हाऊसकीपरची जागा घेते. त्यासाठी पाक कुटुंब या घरात रहायला येण्याआधीपासून कामाला असलेल्या हाऊसकीपरला ( ली जुंग-युन) योजनाबद्ध रीतीने काढावं लागतं, जी पुढे होणाऱ्या गोंधळाची नांदी ठरते

पॅरासाईटची रचना तीन अंक आणि एपिलाॅग अशी आहे. पहाताना, ती अगदी स्पष्ट कळणारी आहे. पहिला जो सेट अपचा भाग आहे, तो प्रामुख्याने किम कुटुंबाने पाक कुटुंबाच्या आयुष्यात ( आणि घरातही ) केलेल्या प्रवेशाबद्दल आहे, जो काही दिवसांच्या काळात घडतो. दुसरा आणि तिसरा अंक प्रमुख्याने दोन दिवसात जवळजवळ सलग घडतात. पाक कुटुंब कॅंपिंग ट्रिपसाठी गेलं असताना पावसाळी रात्री चाललेली किम कुटुंबाची पार्टी, आणि हाऊसकीपरचा प्रवेश इथे दुसरा अंक सुरु होतो, जो रात्रीच्या साऱ्या घडामोडीनंतर किम कुटुंबातल्या तिघांच्या घराबाहेर पलायन करण्याने संपतो. तिसरा अंक हा दुसऱ्या दिवशी पूरसदृश परिस्थिती ओसरत असताना पाक कुटुंबातल्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी, आणि सेलिब्रेशन या दरम्यान घडतो. हे अंक संपल्यावरची दोन पत्र हा एपिलाॅग आहे. किम कुटुंबातल्या बापाने मुलाला लिहिलेलं एक, तर मुलाने बापाला लिहिलेलं दुसरं. या पत्रांकडे वास्तववादी पद्धतीने पहाणं योग्य नाही. ती चित्रपटाच्या आशयाला टोक आणून देण्याचं काम करतात. मुलाने बापाला लिहिलेल्या पत्राचा शेवट विशेष आहे, आणि ते ज्या वाक्यावर आणि चित्रचौकटीवर संपतं, ती देखील. ती काय, हे मात्र मी इथे सांगणार नाही

पॅरासाईट चित्रपट हा अनेक आशयघटकांनी गच्च भरलेला आहे. त्यातले सगळेच आपल्याला प्रथमदर्शनी समजतील असं नाही, पण तो कथेपलीकडे साधारण तरी कळायचा, तर दोनदा तरी पहायला हवा. हे आशयघटक पटकन दिसण्याचं एक कारण म्हणजे त्याला एक व्यवस्थित, गुंतवणारं कथानक आहे, त्यामुळे आपण त्या कथेतच अडकून मेटॅफोरिकल गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता तयार होते. तरी बरं, त्यातलं एक पात्र वरवर साध्या गोष्टीमेटॅफोरिकलआहेत अशी आठवण आपल्याला पहिल्याच प्रसंगापासून सतत करुन देतंयात पहिल्यांदा ज्या गोष्टीला मेटॅफोरिकल म्हंटलं जातं, ती म्हणजे की-वू च्या मित्राने किम कुटुंबाला भेट दिलेला सुबत्ता आणणारा दगड. हा खरोखरच प्रतीकात्मक अर्थासह येतो आणि चित्रपटात अनेक प्रकारे वापरला जातो. ते प्रतीक तर आहेच, वरबी केअरफुल व्हाॅट यू विश फाॅरयासारखी धोक्याची सुचनाही त्यातून ध्वनित होते. मेटॅफोरिकल शब्दाचा वापर हा सुरुवातीला थोडी विनोदनिर्मिती जरुर करतो, पण जे दिसतय त्यापलीकडचे अर्थ पहाण्याबद्दलची ती छुपी सूचनादेखील आहे

वर्गभेद, खालचे आणि वरचे, सहन करणारे आणि अन्याय करणारे, यांमधली वाढती दरी हा चित्रपटाचा विषय आहे. पण तो मांडताना चित्रपट सोपी समीकरणं शोधत नाही. उदाहरणार्थ, पाक कुटुंब हे यात सधन , वर्चस्व गाजवणारं असलं, तरी चित्रपट त्यांना खलनायक म्हणून रंगवत नाही. त्यांच्या जगात ते योग्यच आहेत. त्यांचा दोष असलाच, तर त्यांना आपल्या जगापलीकडचं काही दिसत नाही, हाच असू शकेल. त्यांचा पैसा हीच त्यांची शक्ती आहे, आणि त्यांच्यासाठी सारे दरवाजे इतक्या सहज उघडतात, की रोजच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक त्यांना दिसूही शकत नाहीत.भयंकर पावसाने लोकांची घरंदारं बुडतात तेव्हा पाक कुटुंबातल्या आईला या पावसाचं अचानक येणं हे वरदान वाटतं. आकाश निरभ्र झालं आणि प्रदूषण गायब झालं, आता बागेत छान पार्टी होऊ शकेल , हे कारण तेवढ्यासाठी पुरे असतं. ती तिच्या नजरेआडच्या आपत्तीग्रस्त लोकांचं वाईट चिंतत नाही. पण ते तिला दिसतच नसल्याने, ती वाईट चिंतेल तरी कशीकिम कुटुंबातली दोन्ही मुलं अत्यंत हुशार आहेत. पण त्याला काॅलेज परवडत नाही, आणि तिला कलेची जाण, फोटोशाॅप सारख्या माध्यमांत हुशारी असूनही ती बेकार आहे. वर ही दोघं पाक कुटुंबातल्या सामान्य वकुबाच्या मुलांना शिकवण्यासाठी राबतात. किम कुटुंबाच्या पोरांना भविष्य नाही, आणि पाक कुटुंबातल्या मुलांच्या यशाच्या आड त्यांचा वकुब येणार नाही

कलेचा आस्वाद घेणं हे श्रीमंतांचं काम. जगण्याचाच प्रश्न असलेले कसला आस्वाद घेणार आणि काय. एका महत्वाच्या प्रसंगात जुनी हाउसकीपर किम कुटुंबावर डाफरते. या सुंदर घराचं कलामूल्य त्यांना समजूच शकणार नाही म्हणते. तेव्हा तिचा नवरा तिला थांबवतो, आणित्यांना कसं कळेल?’ असं विचारतो. पाक कुटुंब येण्याआधीच्या काळातल्या फुरसतीच्या क्षणांबद्दल बोलतो, आणि तेव्हाच आपल्यालाही या कलेचं सौंदर्य जाणवलं, अशी आठवण काढतो. कष्टकरी समाजाचं धावपळीचं आयुष्य, आणि कलेला असलेला श्रीमंतांचा आश्रय, यावर ही टीका आहे. पॅरासाईट अशा विसंगतींवर भाष्य करतो, आणि  भयंकर संघर्षावाचून याला दुसरं उत्तर  नाही असा निष्कर्ष मांडतो

फोरशॅडोईंग, किंवा पूर्वसूचना देणं, यात सतत वापरलेलं दिसतं. पुढे महत्वाचे ठरणारे घटक चित्रपट सहज रितीने आधी समोर ठेवतो. त्यातले काही थेट उपयोगाचे, तर काही प्रतीकात्मक. वाॅकी टाॅकी घरी आणणं, किंवा पावसाची सुरुवात, या दोन्ही गोष्टींची सुरुवात साधी आहे, पण कथेत त्यांना पुढे खूप महत्व येतं. प्रतिकात्मक गोष्टींमधे साधेपणाने वापरलेल्या दोन गोष्टी म्हणजे नेटिवांना संपवून त्यांच्यावर राज्य करणाऱ्या गोऱ्यांचं कथानकात डोकवत रहाणं, आणि दुसरी गोष्ट आहे, तो वास. या दोन्हीविषयी थोडं अधिक सांगता येईल. रेड इंडिअन पहिल्यांदा डोकावतात ते की-वू पहिल्यांदा पाक कुटुंबाच्या घरी जातो तेव्हा. मुलाचे खेळातले बाण इथे आधी दर्शन देतात, मग त्याची आई त्यामागचं स्पष्टीकरणही देते. पुढेही मुलाचा खेळण्यातला रेड इंडिअन बनावटीचा तंबू येतो. असं करत करत शेवटी पार्टीदरम्यान होणाऱ्या नाटकापर्यंत आपण पोचतो ज्यासाठी दोन्ही कुटुंबांमधले वडील रेड इंडिअन वेष धारण करतात. हा संपूर्ण धागा आपल्याला अत्याचारी आणि अत्याचाराचे बळी यांमधल्या नात्याची आणि या संघर्षात स्वाभाविकपणेच येणाऱ्या हिंसेची आठवण करुन देतो. याला सोपा शेवट नाही, तडजोड नाही. अत्याचारमुक्त व्हायचं, तर अत्याचाऱ्यांच्या बाजूला जाणं हाच पर्याय असल्याचंही चित्रपटाचा शेवट सुचवतो

वास हा घटकही असाच सहज कथेत सामील होतो. छोट्या -साॅन्गच्या लक्षात येतं की त्याची चित्रकला शिक्षीका, ड्रायव्हर आणि हाऊसकीपर यांना एकसारखा वास येतो. तेव्हा वाटतं, की हे प्रकरण फक्त कथेतल्या रहस्याशी जोडलेलं आहे. पण ते तेवढं सोपं नाही. विचारांती समजतं की हा ते रहातात त्या ओलसर तळघराचा वास आहे. या तळघरासारखाच वास पाक कुटुंबाच्या तळघरालाही असणारच. त्यामुळे तिथे वस्तीला असलेल्यालाही तो असणार हे ओघानेच आलं. क्षणात हा वास त्या वर्गाचं प्रतीक बनतो. चित्रपट पुढे सरकतो, तेव्हा या वासावर इतर चर्चा होत रहातात. वाढदिवसाची तयारी करताना साॅन्गची आई ड्रायव्हर बनलेल्या की-टेक ला घेऊन बाहेर जाते तेव्हा तिचं खिडकीची काच खाली करणं, हे त्याचं टोक असतं. इतकं, की पुढल्या वेळी गार्डन पार्टीमधे जेव्हा -साॅन्गचा बाप जेव्हा वास सहन होऊन नाक धरतो, तेव्हा याचा कडेलोट होतो, आणि संघर्षाची ठिणगी पेटते

पॅरासाईटमधली घरं हा एक स्वतंत्र विषय आहे. किम कुटुंबाचं छोटंसं घर त्यातल्या छोट्या , कोंदट जागांमुळे लक्षात रहातं, त्याचबरोबर त्याच्या थेट तळागाळात, अर्धवट जमिनीखाली असण्यानेही. पाक कुटुंबाच्या घरात दोन्ही प्रकारचे अवकाश आहेत. मोकळं, आधुनिक, सुसज्ज घर, जे खालच्या दुर्लक्षित, कोणालाही दिसणाऱ्या तळघराच्या डोक्यावर बांधलेलं आहे. पाक कुटुंबाला तर त्या तळघराचा पत्ताच नाही, जसा त्यांना समाजातल्या खालच्या स्तराचाही पत्ता नाही. एका परीने हे घर, या अख्ख्या चित्रपटाचं सूत्र वास्तूकलेच्या भाषेत मांडतं. दोन्हीकडल्या तळघरातल्या रहिवाशांना  मात्र मदतीची सारखीच गरज आहे. हे रहिवासी आपल्या सुखवस्तू बांधवांना मदतीचाएसओएसपाठवतात, पण तो त्यांना समजतच नसल्याने, ती भाषाच त्यांना कळत नसल्याने तिथून मदत येण्याची शक्यताच शून्य. पावसाळी पुरात प्रेक्षकाच्या नजरेत या दोन्ही जागा एकत्र होतात त्या संकलनाच्या मदतीने, आणि एसओएस च्या मोटीफमधूनही. बंगल्यात दिव्याच्या उघडझापेमधून हा मोर्स कोडमधला संदेश प्रक्षेपित होतो, तर किम कुटुंबाच्या तळघरात असा प्रत्यक्ष संदेश कोणी देत नाही, पण तिथे फडफडणारी ट्यूबलाईट, ही त्याच परिस्थितीचं प्रतिबिंब दाखवते

चित्रपटातल्या अभिनयाबद्दल मी बहुधा कमीच बोलतो, कारण बहुतेक वेळा ही प्रेक्षकांना सहजच लक्षात येणारी गोष्ट आहे. इथेही ती येईल. यातले बहुतेक जण आपण कोरिअन चित्रपटांमधे पाहिलेले आहेत. इथली सर्वात अवघड भूमिका आहे, ती किम कुटुंबातल्या वडिलांची, कारण आपली परिस्थिती आहे तशी मान्य करुन आनंदात रहाणाऱ्या माणसापासून ते बंडासाठी शस्त्र उचलण्यापर्यंतचा प्रवास या व्यक्तीरेखेला दाखवायचा आहे. त्या भूमिकेला साॅंग कांग-हो ने फार वर नेऊन ठेवलय. जाॅइन्ट सिक्युरिटी एरीआ, सिम्पथी फाॅर मि. व्हेन्जन्स, मेमरीज ऑफ मर्डर, स्नो पिअर्सर, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून लक्षात राहिलेला हा अभिनेता आहे. नटसंचातल्या प्रत्येकाचं मी नाव घेत नाही, पण तो सगळाच चित्रपटाच्या परिणामात भर टाकणाराच आहे

पॅरासाईट हे एका भेदक वास्तवाचं प्रत्ययकारी चित्रण आहे. म्हंटलं तर हा कोरीअन चित्रपट आहे, पण कोणत्याही समाजात या प्रकारची अदृश्य तळघरं असतातच. आपल्याकडेही आहेत. जागतिक सिनेमाचं हे प्रमुख सूत्रच आहे, की चित्रपट हा प्रादेशिक तथ्याशी, वातावरणाशी प्रामाणिक हवा, पण तरीही त्यातला आशय हा जगभर समजणारा हवा. त्या दृष्टीने बाॅन्ग जून-हो चा हा चित्रपट अस्सल जागतिक चित्रपट आहे. अनेकदा या प्रकारचे चित्रपट नुसतेच गंभीर असतात, किंवा मानवी नितीमूल्यांची चर्चा करणारे असतात. पॅरासाईट करमणूक करतो. आपल्या विचारांना चालना देतो, या व्यक्तीरेखांमधे आपल्याला अडकवतो, आपल्याला बाजू घ्यायला लावतो आणि तरीही कोणती बाजू योग्य आहे याकडे निर्देशही करतो. कदाचित गेल्या वर्षातला हा सर्वात महत्वाचा चित्रपट असेल.


गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP