एक्झाम- एक खोली आणि आठ पात्रं

>> Monday, August 30, 2010


एक खोली. मध्यम आकाराची. फार मोठी नाही, पण आठ टेबलं, अन् अर्थातच आठ खुर्च्या ठीकठाक राहतील अशी. इन्टीरिअर कॉर्पोरेट सेट अप मधे शोभण्याजोगं. अंतराअंतरावर पुढे आलेले खांब, त्यावर लॅम्प शेड्स. भिंतीवर आडव्या पट्ट्या. पूर्ण खोलीचा रंग करडा. छतावर स्प्रिन्कलर्स, खोलीच्या मध्यभागी जमिनीवरून जाणारा एक ड्रेन. खोलीतल्या आठ टेबलांवर कॅन्डीडेट १ ते ८ यांच्यासाठी प्रश्नपत्रिका ठेवलेल्या. या प्रश्नपत्रिकांवर थेट प्रकाशझोत टाकणारे स्पॉटलाईट्स. टेबलांसमोरच्या भिंतीवर एक मोठा स्क्रीन किंवा काच. त्याखाली एक डिजीटल टायमर. आणि हो, खोलीतली प्रत्येक हालचाल मुद्रीत करता येणारा कॅमेरा.
खोलीचं एवढं तपशीलवार वर्णन करण्याचं कारण म्हणजे ही खोली `एक्झाम` (२००९) या चित्रपटातल्या एखाद्या व्यक्तिरेखेसारखी. पहिला पात्रपरिचय सोडता संपूर्ण चित्रपट या खोलीत घडतो. खोलीचा जवळपास प्रत्येक तपशील हा चित्रपटात वापरला जातो. इथली पात्रं आणि ही खोली यांमध्ये एक संवाद घडतो, एक नाट्य उलगडतं.

सुरुवातीलाच आठ जणांना या खोलीत आणलं जातं. या सा-यांनी एका मोठ्या कंपनीतल्या प्रतिष्ठित नोकरीसाठी अर्ज केलेला. अनेक परीक्षा-मुलाखतींना सामोरं गेल्यावर ही परीक्षा म्हणजे निवडप्रक्रियेचा अखेरचा टप्पा. आठ जणांमध्ये चार पुरूष, चार स्त्रिया. सर्वांची पार्श्वभूमी, वर्ण,शैक्षणिक पात्रता इत्यादी परस्परांपेक्षा पूर्णपणे वेगळी. सारे आपापल्या जागी येताच दरवाजात एक पिस्तुलधारी गार्ड येऊन उभा राहतो, अन् एक काळा सूट येऊन परीक्षेचे नियम पुरेशा गंभीरपणाने सांगतो. त्या सर्वांपुढे एक प्रश्न मांडण्यात येईल. त्याला एकच बिनचूक उत्तर असणं अपेक्षित आहे. परीक्षेदरम्यान त्याच्याशी वा गार्डशी बोलणारा परीक्षेतून बाद होईल आणि प्रश्नपत्रिकेचा कागद खराब करणाराही परीक्षेतून बाद होईल. टायमरवर ऐंशी मिनीटांचा वेळ सेट केला जातो आणि परीक्षा सुरू होते. पहिला धक्का लगेचंच बसतो. कॅन्डीडेट्स ज्याला प्रश्नपत्रिका समजत असतात तो कागद कोरा असतो. मुळात प्रश्न कोणता याचीच आठातल्या एकालाही कल्पना नसते.

ज्याप्रमाणे लॉक्ड रूम मिस्ट्रिज या कायम रहस्यकथाकारांना खुणावत आल्या आहेत, त्याचप्रमाणे एका बंदिस्त जागेत घडणारी कथानंक चित्रकर्त्यांना अनेक वर्षे खुणावत आली आहेत. १९४४मध्ये हिचकॉकने एका छोट्याशा बोटीवर घडणारा `लाईफबोट` केला होता. तर १९५७ मध्ये लुमेटने ज्युरी रूममध्ये `१२ अँग्री मेन` घडविला होता. टेरेन्टीनोचा `रिझरव्हॉयर डॉग्ज` हा पहिला चित्रपटही एका वेअरहाऊसमध्ये घडणारा होता. तर लिन्कलेटरचा `टेप` एका मोटेल मधल्या खोलीत.
हल्ली ब-याच प्रमाणात भय-रहस्याच्या मिश्रणासाठी या फॉर्म्युल्याचा वापर होताना दिसतो. क्युब (कॅनडा) मालेफिक (फ्रान्स), फरमॅट्स रुम (स्पेन), सॉ (अमेरिका) अशी जगभरातून या फॉर्म्युल्याला मागणी आलेली दिसते. (लवकरच येणारा एम.नाईट श्यामलनची निर्मिती असणारा `डेव्हिल` देखील याच प्रकारातला असावा, असं त्याच्या ट्रेलर्स पाहून वाटतं.) `एक्झाम` ही या फॉर्म्युल्याची ब्रिटिश आवृत्ती आहे.

एक्झामचा सर्वात चांगला भाग म्हणजे तो कायम प्रेक्षकांच्या एक पाऊल पुढे असतो, अन सतत काहीतरी अनपेक्षित घडविण्याचा प्रयत्न करीत असतो. खरं तर एकच जागा अन् त्याच व्यक्तिरेखा ठेवून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं, हे जोखमीचं काम आहे, पण इथली पटकथा ते करून दाखविते. सामान्यतः अशा चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखांची ओळख ही नेहमी एकमेकांपासून अन् प्रेक्षकांपासून लपवलेली असते. इथेही ती तशीच आहे. त्यामुळे व्यक्तिरेखांना डोकं लढविण्यासाठी इथे मुळात तीन गोष्टी तयार होतात. पहिली म्हणजे उत्तराचा- किंवा पर्यायाने प्रश्नाचा शोध, इतर स्पर्धकांच्या खरे-खोटेपणाचा तपास आणि आपण जिंकण्यासाठी इतरांना हरवायचा किंवा स्पर्धेतून बाद करण्याचा सततचा प्रयत्न. मुळात हा नोकरीसाठी होणा-या सिलेक्शन प्रोसेसचा भाग असल्याकारणाने इतर चित्रपटांप्रमाणे मृत्यूची भीती तयार करता येत नाही, वा सध्या भयपटात कायम हजेरी लावणारे किळसवाणे तपशीलही इथे वापरता येत नाहीत, वापरणं अपेक्षित नाही. त्याऐवजी कोणत्या वेगळ्या मार्गाने ही स्पर्धा शब्दशः जीवघेणी ठरेल हे लेखक- दिग्दर्शक स्टुअर्ट हेजलडीन उत्तम रीतीने पाहातो. टेरेन्टीनोप्रमाणेच आपल्या पहिल्या प्रयत्नांतच त्याने हे मोठं आव्हान यशस्वीपणे स्वीकारलं आहे. अशा चित्रपटांमध्ये अवकाशावर असलेली मर्यादा पाहाता छायाचित्रणाला खूप महत्त्व येतं. दिग्दर्शकाचं त्यावर असलेलं नियंत्रण अगदी सुरूवातीलाच दिसून येतं. पात्रपरिचयात दर व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य अधोरेखित करणं, अन् लगेचच त्याच संकल्पनेनुसार त्या खोलीची वैशिष्ट्यही दाखवत जाणं, पात्रांच्या प्रेमिंगमधला फोअरग्राउंड-बॅकग्राउंडचा वापर, निवेदनाच्या गतीबरोबर संतुलित होणारी कॅमेराची गती, वेगळेपणा आणण्यासाठी केलेला बदलत्या प्रकाशयोजनांचा उपयोग, या सर्वातून दिसून येतं की आपण काय करतोय याची दिग्दर्शकाला पूर्ण जाण आहे.

एक्झामचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. अन कारण आहे त्यातल्या कोड्याची उकल. यात महत्त्व आहे, ते उमेदवारांनी आपल्याला कोणता प्रश्न विचारण्यात येतोय हे ओळखण्याला. तो काय असेल याबद्दल बरीच चर्चा होते, मुळातच पुरेशा गांभीर्याने सुरू होणारा चित्रपट अधिकाधिक गंभीर होत जातो. हे असूनही, जेव्हा प्रश्नाविषयी अन् उत्तराविषयी जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, तेव्हा आपला विरस होतो. तपशिलाकडे पाहिलं तर चित्रपट फसवत नाही. ही उकल म्हटली तर रास्त आहे, पण आत्तापर्यंत चित्रपटाने स्वतःकडून ज्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत, त्याबरोबर जाणारी नाही. लहान मुलांच्या कोड्यात जसा दिशाभूल करणारा ट्रिक क्वेश्चन असतो, तसा हा आहे. या विशिष्ट कंपनीबद्दल आपल्याला जी माहिती आहे, ती पाहाता, हा प्रश्न तिच्याकडून विचारला जाणार नाही, त्यामुळेच तो आपलं समाधान करू शकत नाही.

अशा परिस्थितीतही, शेवटाकडे दुर्लक्ष करूनही `एक्झाम` पाहण्यासारखा आहे. त्यातली निवेदनाची पद्धत, वरवर साध्या वाटणा-या प्रसंगातून रहस्य उभं करणं, प्रेक्षकाला सतत विचार करत ठेवणं, केवळ धक्क्यांच्या गरजेसाठी बॉडी काउंट वाढवत न नेणं, व्यक्तिरेखांचा चांगला उपयोग करून घेणं, अशा अनेक बाबतीत तो अव्वल कामगिरी बजावतो. `एक्झाम`कडे जर या नव्या लेखक-दिग्दर्शकाची परीक्षा म्हणून पाहिलं तर त्याला फर्स्ट क्लास विथ डिस्टीन्क्शन मिळाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. कोड्याची याहून बरी उकल कदाचित त्याला गुणवत्ता यादीपर्यंतही घेऊन गेली असती.

-गणेश मतकरी.

Read more...

द एक्स्पेन्डेबल्स - अनावश्यक निर्मिती

>> Sunday, August 22, 2010

कुरोसावाने जेव्हा सेव्हन सामुराई केला, तेव्हा आपण किती अजरामर फॉर्म्युला तयार करतोय हे त्याच्या लक्षात आलं नसेल. मात्र सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी असणारे अन् दर्जामधेही पाराकोटीचा चढउतार असणारे अनेक चित्रपट या एका चित्रपटाने जन्माला घातले. द एक्स्पेन्डेबल्स हा या फॉर्म्युलाचाच एक मध्यम दर्जाचा अवतार. एक्स्पेन्डेबल्सकडे सर्वाधिक लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे त्याचा स्टार लाईनअप. विन डिझेलचा अपवाद वगळता अ‍ॅक्शनपटांमधले यच्चयावत स्टार्स इथे हजेरी लावतात. मात्र एका परीने ही दिशाभूल आहे. कारण ब्रूस विलीस, मिकी रोर्कसारखी नावं असूनही इथे प्रत्यक्ष काम फक्त तिघांना आहे. लेखक, दिग्दर्शक, आणि स्टार या तीनही भूमिकांतला सिल्व्हेस्टर स्टलोन, जेसन स्टॅथम आणि जेट ली. उरलेल्यांचं स्थान एकतर पाहुण्या कलाकारांसारखं आहे, किंवा पडद्यावर दिसत राहूनही त्यांच्या भूमिकेत फारसा दम नाही.
वरवर पाहता `एक्स्पेन्डेबल्स` हे नावही, खूपंच चांगलं. हे नाव स्वतःकडे कमीपणा घेणारं, नकारात्मक आहे. नायकांना सामान्य पातळीवर आणणारं, जे या प्रकारच्या अ‍ॅक्शनपटाला उपयुक्त ठरू शकतं. मात्र प्रत्यक्षात या नावाच्यआ साधेपणाचा इथे कोणताच उपयोग करण्यात आलेला दिसत नाही. इथे सर्व नायक मंडळी आपण नायक आहोत, हे ठाऊक असल्याप्रमाणे गुर्मीत असलेली दिसतात. एकदा का त्यांचं हे नायकपण गृहीत धरलं गेलं,की पुढे काय होणार याला अर्थ उरत नाही. फॉर्म्युलाप्रमाणे टप्पे घेणं एवढंच चित्रपट करू शकतो.
एखादी छोटी वस्ती. तिथल्या लोकांवर अन्याय अन्याय करणारे कर्दनकाळ. मदतीला पाचारण करण्यात आलेले नायक. शक्य तर परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांचे पण कामगिरीसाठी एकत्र येणारे. नायकांचं कर्दनकाळांच्या पुढ्यात उभं ठाकणं, आणि शत्रूचा नायनाट . हा फॉर्म्युला आपण सिप्पींच्या शोलेपासून, डिस्नेच्या बग्ज लाईफपर्यंत सतत पाहिलेला. यात रचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे नसले, तरी प्रेक्षकांनी समरस होण्याच्या दृष्टीने महत्वाचे टप्पे म्हणजे नायकांची ओळख आणि त्यांचं वस्तीतल्या लोकांशी होणारं बॉन्डींग. सेव्हन सामुराईपासून स्फूर्ती घेणा-या बहुतेक चित्रपटांचे नायक हे सर्वगुणसंपन्न नाहीत. किंबहुना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले दोष अन् नायकांनी त्यावर केलेली मात, हा चित्रपटातल्या नाट्याचा एक महत्त्वाचा पैलू. त्याचप्रमाणे ते ज्या लोकांसाठी लढताहेत त्यांना समजून घेणं, त्यांनी या नायकांच्या बाजूने वा विरोधात उभं राहणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं. एक्स्पेन्डेबल्सला मात्र तसं वाटत नाही. कारण तो या दोन्ही गोष्टी जवळजवळ काढून टाकतो.
या प्रकारच्या बहुतेक चित्रपटात व्यक्तिरेखांचं मुळात एकत्र येणं, हे एखादी `ओरीजिन फिल्म` असल्याप्रमाणे दाखवलं जातं. शोलेसारख्या चित्रपटात ही क्लृप्ती न वापरताही विविध प्रसंग अन् संवादांच्या मदतीने ही मंडळी कोण आहेत याची आपल्याला ओळख करून दिली जाते. एक्स्पेण्डेबल्सच्या कर्त्यांना बहुदा हा भाग एक्स्पेण्डेबल वाटला असावा. इथले प्रसंग आणि संकट हे यातल्या कोणाहीबद्दल काहीही सांगत नाहीत. ख्रिसमस (स्टेथम)ची मैत्रिण आणि यिन यान्ग (जेट ली)चं पगारवाढ मागणं यापलीकडे इतरांच्या व्यक्तिरेखांच्या व्यक्तिगत गरजा , व्यक्तिमत्त्वाचे पैलू, भूत/वर्तमानकाळ यांकडे कामगिरीच्या चौकटीपलीकडे जाऊन पाहीलं जात नाही.हा स्वतंत्रपणे दोष नसला, तरी ज्या चित्रपटातल्या इतरही कुठल्या बाबतीत नावीन्य नसेल, तिथे तो खचितच जाणवतो. चित्रपटातले संवाद थोडेसे विनोदी, चटपटीत लिहिण्याचा क्षीण प्रयत्न दिसतो. मात्र तो इतका क्षीण आहे की तो धड ना विनोदनिर्मिती करत, ना तो या व्यक्तिरेखांविषयी काही माहिती देत.
एक्स्पेन्डेबल्सला वर सांगितलेल्या फॉर्म्युलापलीकडे जाऊन, किंवा खरं तर तितकीही कथा नाही. बार्नी (सिल्व्हेस्टर स्टलोन) हा इथला गटप्रमुख. खलनायकांपुरते दोघे बाकी ठेऊन उरलेले सगळे त्याच्या `एक्स्पेन्डेबल्स`नावाने ओळखल्या जाणा-या गटात सामील. ब्रूस विलीस आणि अरनॉल्ड श्वारत्झनेगर असलेल्या एकुलत्या एका प्रसंगात गटावर कामगिरी सोपविली जाते, ती एका बेटावरला हुकूमशहा अन् त्याच्या मदतीने अमली पदार्थाचा धंदा करणारा अमेरिकन यांचा नायनाट करण्याची. यासाठी बार्नी एक मोठी रक्कम मागतो. मात्र तो हुकूमशहाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर, एक्स्पेन्डेबल्स ही कामगिरी धर्मादाय असल्यासारखी फुकटात पार पाडतात.
इथली पटकथा इतकी सरधोपट पद्धतीने, ओळखीच्या रस्त्य़ाने पुढे सरकते, की चित्रपटाला `प्रेडिक्टेबल्स` असं नाव देखील चाललं असतं. प्रेमासाठी धोका पत्करणारे नायक. जनतेच्या भल्यासाठी बापाच्या विरोधात जाणारी नायिका, दुष्ट खलनायकाचं मुलीवरच्या प्रेमाने होणारं ह्दयपरिवर्तन, मदतीला धाऊन जाणारी मित्रमंडळी, एकही प्रसंग वा व्यक्ती इथे अनपेक्षित काही साधून आपल्याला चकित करू पाहत नाही.
आता इथे एक उघड प्रश्न असा संभवतो, की जर चित्रपट अ‍ॅक्शनपटाच्या वर्गात बसणारा असेल, तर निदान त्याबाबतीत तरी , तो त्याच्या चाहत्यांना खूष करेल का? याला माझं व्यक्तिगत उत्तर हे नकारार्थीच आहे. काही स्टंट्स अन् अ‍ॅक्शन प्रसंग इथे लक्षात राहण्याजोगे आहेत, नाही असं नाही. खासकरून त्यांचा वेग, वेळोवेळी दिसणारं क्रौर्य, पूर्वी टाळण्यात येणारं पण हल्ली चालणारं रक्त अशा घटकांचा वापरही त्यात्या वेळेपुरता प्रभावित करणारा आहे. पण हा परिणाम टिकून राहणारा नाही. अ‍ॅक्शन ही अनेकदा लक्षात राहते, ती प्रसंग ज्या प्रकारे तिला कथानकात गुंफतात, तिच्या आधारे. इथे आपली इतक्या प्रमाणात अ‍ॅक्शन हवी ना, मग घालू कशी तरी, अशी वृत्ती दिसते. त्यामुळे ज्या प्रकारचा सेट-अप आवश्यक आहे, तोच तयार होऊ शकत नाही. साहजिकच चित्रपटाच्या संदर्भापलीकडे ती परिणाम करणार नाही, हे आलंच.
एक्स्पेन्डेबल्स प्रभावी न ठरल्याचं वाईट वाटतं, ते या प्रकारची उत्तम पात्रयोजना वाया जाते म्हणून, अर्थातच यातले बरेच जण दिग्दर्शक स्टॅलनच्या पुण्याईने उभे आहेत हे उघड आहे. मात्र या प्रकारच्या फसलेल्या प्रयत्नानंतर, ते एकत्र येणं कठीण. पुन्हा एकदा `डर्टी डझन` सारखा यशस्वी प्रयत्न करण्यात आला असता (जे ओशन्स मालिकेने काही प्रमाणात केलं, पण अ‍ॅक्शन चित्रप्रकारासाठी नाही.) तर मुळातच मर्यादित आवाका असणा-या या चित्रप्रकाराचा त्यातून फायदाच झाला असता. सध्या तरी तसं होणं संभवत नाही.


-गणेश मतकरी.

Read more...

डीस्पिकेबल मी- लक्षात राहण्याजोगा

>> Sunday, August 8, 2010

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट कुठला, असं विचारलं, तर अजून तरी `टॉय स्टोरी - 3 `चंच नाव घ्यावं लागेल. काही बाबतीत आधीच्या दोन भागांहून वरचढ असणा-या भागात मुलं अन् त्यांचे पालक या दोघांनाही आवडण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. प्रत्येकाच्या वयानुसार अन् अनुभवानुसार ज्याला जे पटेल ते, अन् पचेल ते घेण्याची त्यात सोय होती. यंदाच्या इतर अ‍ॅनिमेशनपटांनी (श्रेक 4, हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन इ.) फार वाईट कामगिरी केली नसली, तरी टॉय स्टोरीच्या दर्जाला कुणी येऊ शकलेलं नाही. काहीशी हीच गोष्ट `डीस्पिकेबल मी`च्या बाबतीतही म्हणता येईल. सर्वोत्तम नसला तरी हा चित्रपट पाहायला मात्र काहीच हरकत नसावी, असं माझं मत आहे. `ऑस्टीन पॉवर्स ` मालिकेत मायकल मायर्सने जे जेम्स बॉण्डमधल्या खलनायकांचं विडंबन करायला सुरुवात केली, त्यानंतर या प्रकारच्या व्यक्तिरेखा पडद्यावर आणि इतरत्र यायला सुरुवात झाली. इतरत्र म्हणजे कॉमिक्स, कम्प्यूटर गेम्स वैगैरे. मुलांच्या चित्रपटात, अन् तेही प्रमुख भूमिकेत, अशा मेगॅलोमॅनिअ‍ॅक खलनायकाची व्यक्तिरेखा आल्याचं आठवत नाही. (लवकरच येणारा मेगामाइन्ड देखील अशाच व्यक्तिरेखेविषयी आहे, मात्र त्याचा फॉरमॅट सुपरहीरोपटाचा आहे.) इथल्या खलनायकाची उघड स्पर्धा, कोणत्याही नायकाशी नाही. तर एका नव्या, उभरत्या खलनायकाशीच आहे.
इथला नायक (किंवा खलनायक म्हणूया हवं तर) आहे ग्रू (स्टीव कारेलचा आवाज). ग्रूचं खलनायकी विश्वात ब-यापैकी नाव आहे, अन् त्याची महत्त्वाकांक्षा देखील जबरदस्त आहे. त्याच्या नावावरच्या चो-या मात्र फार गाजलेल्या नाहीत. आणि आता त्याचं वयही व्हायला लागलंय. अशातच एकदा इजिप्तमधला पिरॅमिड कोणीतरी चोरल्याचं लक्षात येतं, आणि ग्रूची महत्त्वाकांक्षा पुन्हा उभारून येते. आपला वृद्ध सहकारी डॉ निफॅरिओ आणि टॉय फ्रँचाईज करणा-यांसाठी खूषखबर असलेली छोट्या, पिवळ्या हस्तकांची फौज, यांच्या मदतीने ग्रू प्रत्यक्ष चंद्र चोरायचं ठरवतो. खलनायकांना आर्थिक मदत करणारी `बँक ऑफ इव्हिल` मात्र व्हेक्टर या नव्या खलनायकाच्या (अर्थातच बँकेच्या चेअरमनच्या मुलाच्या) पाठीशी उभं राहायचं ठरवते. ग्रू स्वतंत्रपणे पाऊल उचलतो, आणि चंद्राचा आकार छोटा करण्यासाठी लागणारी गन पळवतो. त्याच्या मागावर असलेला व्हेक्टर, ती लगेचच हस्तगत करतो. आता पुढचं पाऊल उचलायचं तर ती गन परत मिळवायला हवी. व्हेक्टरच्या अभेद्य घरात जाण्यासाठी ग्रू योजना आखतो, ती तीन अनाथ मुलींना व्हेक्टरच्या घरी असणारा मुक्त प्रवेश गृहीत धरूनच. त्यासाठी तो या मुलींना दत्तकही घेतो. पण लवकरच या मुलींचं निरागस प्रेम त्याच्यातल्या खलनायकावर मात करेलसं दिसायला लागतं.
`डीस्पिकेबल मी`ची पटकथा स्मार्ट, चटपटीत आहे. मात्र ती कथेने उपलब्ध केलेल्या शक्यतांचा पुरेपूर वापर करताना दिसत नाही. पेचप्रसंग किंवा भावनाविवष करणारे प्रसंग, या दोघांनाही टोकाला न्यायला ती बिचकते. परिणामी प्रसंग उत्कर्षबिंदूपर्यंत जाण्याआधीच संपतात. त्यामुळे प्रेक्षकांचा जीव टांगणीला लागणा-या जागा त्यात घेतल्या जात नाहीत. व्हेक्टरच्या घरात ग्रू अडकणं, मुलींची पुन्हा अनाथाश्रमात होणारी पाठवणी, चंद्र पळवण्यातले धोके, हे सगळं आपण पाहातो, पण त्यातून व्यक्तिरेखा मार्ग काढू शकणार नाहीत, असा ताण आपल्या अनुभवात कधीही येत नाही. भावनेच्या पातळीवरही पुस्तक वाचतानाच्या दोन प्रसंगांच्या दर्जाला कोणताही प्रसंग जाऊ शकत नाही. तरीही प्रसंगाला वळण देण्याच्या शक्यता, आणि व्यक्तिरेखांचे तपशील याबाबतीत पटकथा बाजी मारते. परिणामी ती प्रसंग पूर्ण डेव्हलप न करताही आपण गुंतून राहू इतकं कौशल्य जरूर दाखविते.
चित्रपटाची रचना पाहता, ग्रू तिच्या केंद्रस्थानी असणार हे उघड आहे. (ग्रू हे नाव कुठून आलं असावं? मॅड मॅगझिनसाठी अनेक वर्ष काम करणा-या सर्जिओ अ‍ॅरेगॉन्सच्या `ग्रू द वॉन्डरर`वरून ते सुचलं असेल का? अर्थात त्या ग्रूचं स्पेलींग थो़डं वेगळं , Groo असं आहे.) त्यामुळे यातल्या सर्व, म्हणजे ज्युली अँड्रूजने आवाज दिलेल्या ग्रूच्या आईपासून मार्गो एडिथ आणि अ‍ॅग्नेस या अनाथ मुलींच्या त्रिकुटापर्यंत सर्व व्यक्तिरेखा या ग्रूच्या भोवती फिरतात. त्यांना दुय्यम महत्त्व आहे. दिग्दर्शक पिएर कॉफिन आणि क्रिस रेनॉड या दुकलीने ग्रूचं महत्त्वं थोडं कमी करून इतरांचं थोडं अधिक वाढवलं असतं, तर चित्रपट अधिक रंगला असता, कदाचित.
`डीस्पिकेबल मी`ची चित्रशैली थोडी पिक्सारच्या इन्क्रीडीबल्सच्या जवळ जाणारी आहे. दृश्यमांडणी अधिक मोकळी, ठळक ठेवून पसारा टाळणारी आहे. मात्र दिसणा-या दरेक गोष्टींचा इथे खूप विचार झाल्याचं दिसतं. ग्रू आणि व्हेक्टरच्या घरांचे अंतर्भाग, ग्रूने प्रयोगशाळेत जाण्यासाठी तयार केलेली अदभूत लिफ्ट, व्हेक्टरच्या घरातल्या बैठकीखालचं अ‍ॅक्वेरीअम किंवा त्याच्या समुद्री जीव फेकणा-या बंदुका, ग्रूच्या मिनीयन्स नामक हस्तकांच्या पेहरावातलं साम्य आणि वैविध्य, या सगळ्याचा चित्रपटाच्या व्हिज्युअल डिझाइनमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
चित्रपटाच्या स्वतंत्र घटकांचा, त्यातल्या स्वतंत्र प्रसंगांचा परिणाम कितीही कमी वा अधिक असला, तरी कलाकृतीचा एकूण परिणाम ही काहीतरी वेगळीच गोष्ट असते. जिचा आपण हिशेब मांडू शकत नाही, पण ती आपल्याला निश्चितपणे जाणवते. `डीस्पिकेबल मी`मधल्या त्रुटी प्रसंगी लपत नसूनही चित्रपटाचा एकूण परिणाम हा या त्रुटींवर मात करणारा असल्याचं आपल्याला तो संपताना लक्षात येतं. अन् या गोष्टींमुळेच तो अ‍ॅनिमेशनपटांच्या गर्दीतही उठून दिसतो. आपलं स्थान निर्माण करतो.

-गणेश मतकरी.

Read more...

रेक- रिअ‍ॅलिटी हॉरर

>> Sunday, August 1, 2010

एका इमारतीच्या तळमजल्यावर काही रहिवासी जमलेले. काहीसे गोंधळलेले. तळमजल्याचा भाग लांबट अन् काहीसा अरुंद. एका बाजूने वर गेलेला जिना. जिन्यावर इमारतीत आधीच येऊन पोहोचलेले पोलीस. याच गर्दीत दोन अग्निशमन दलाचे जवान, एक टीव्ही अ‍ॅन्कर आणि एक कॅमेरामन. या कॅमेरामनचा आपण केवळ आवाजच ऐकू शकतो; तो दिसत कधीच नाही. तरीही स्पॅनिश चित्रपट `रेक`मधलं हे सर्वात महत्त्वाचं पात्र आहे. कारण सोपं आहे. इथला कॅमेरामन हा प्रेक्षकांचा डोळा आहे. आपल्यापुढे उलगडणारी कथा, ही या कॅमेरामनच्या हातातल्या कॅमेरावर रेकॉर्ड झालेली आहे. या गोंधळाला कारण आहे ती तिस-या मजल्यावर राहणारी एक म्हातारी. ती बहुदा घरात पडली असावी. कारण तिच्या ओरडण्याचा आवाज अनेकांनी ऐकलेला. मात्र दरवाजा बंद असल्याने शेजारी तिला मदत करायला असमर्थ आहेत. अशातच कोणीतरी इमर्जन्सी नंबर्सना फोन केल्याने इथे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या लोकांनी हजेरी लावलेली. टीव्ही क्रू हा तसा अपघात आहे. फायर स्टेशनवर एक रिअ‍ॅलिटी शो शूट करणा-या अ‍ॅन्जेला विदाल (मॅन्यूएला वालेस्को)चा हा तिथल्या जवानांचं धावपळीचं आयुष्य चित्रित करण्याचा प्रयत्न आहे.
यथावकाश कॅमेरा क्रू, पोलीस अन् जवान म्हातारीच्या घराबाहेर पोहोचतात. घर फोडलं जातं. काहीशा बिचकत आत आलेल्या मंडळींना म्हातारी दूरवर उभी दिसते. अंधूक प्रकाशात. कॅमेरामनच्या अचानक लाईट लावण्याला ती बुजते. अन् कॅमेरामनला शूटिंग थांबविण्याची ताकीद मिळते. मात्र ते थांबवल्याचा आव आणून, अन कॅमेरा खाली घेऊनही तो रेकॉर्डिंग बंद करीत नाही. अन् एका अर्थी तेही बरंच होतं. त्यामुळे म्हातारीने झडप घालून पोलिसाच्या गळ्याचा लचका तोडल्याचं दृश्य तो सहजपणे चित्रित करू शकतो.
रिअ‍ॅलिटी टीव्हीचा वापर `हॉरर` चित्रप्रकारातल्या सर्व उपप्रकारात केला जाईल असं वाटतं. याआधी काळी जादू (ब्लेअर विच प्रोजेक्ट), मॉन्स्टर मुव्ही (क्लोवरफिल्ड). भूतकथा (पॅरानॉर्मल अ‍ॅक्टीव्हिटी) हे प्रकार येऊन गेलेत.
`रेक` ही उघडच `झॉम्बी फिल्म` आहे. तिचं नाव मराठीत चमत्कारिक वाटलं, तरी अगदी योग्य आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग चालू असताना कॅमेराच्या डिस्प्लेवर उमटलेली तीन अक्षरं, म्हणजेच `REC`.
रेकमधला सर्वात चांगला जमलेला भाग म्हणजे त्यातला कॅमेराचा वापर, जो खूपच विचारपूर्वक केला गेल्याचं जाणवतं. पॅरानॉर्मल अ‍ॅक्टीव्हिटीमध्ये जसं पडद्यावर काहीच न दाखवता साऊंड डिझाईनमधून भीती निर्माण करण्यात आली होती तसं इथे केलंलं नाही. इथले भीतीचे प्रसंग, हे झॉम्बीपटांच्या परंपरेप्रमाणेच प्रत्यक्ष घडविण्यात आले आहेत, मात्र कॅमेरा हे या प्रसंगात सहभागी असलेलं पात्रच असल्याने त्याच्या चित्रणपद्धतीत अधिक नाट्यपूर्णता झाली आहे. टीव्हीसाठी नित्य बातम्या चित्रित कऱणा-या कॅमेरामनचा सराईतपणा इथे दिसून येतो. त्याने अडचणीत फ्रेमिंग करून अँकरच्या निवेदनासाठी शोधलेल्या जागा, बाजूला राहूनही प्रत्यक्ष अ‍ॅक्शनचा भाग न चुकता टिपणं, वेगवेगळ्या स्थळाबरहुकूम बदलत गेलेली चित्रणाची स्ट्रॅटेजी, नाईट व्हिजनसारख्या क्लृप्त्यांचा गरजेपुरता पण अर्थपूर्ण वापर इथे सतत आहे. त्यामुळे वरवर दिसणा-या सराईतपणापलीकडे जाऊन दर प्रसंगात उपलब्ध होणा-या दृश्यशक्यता इथे प्रद्धतशीरपणे वापरण्यात आल्या आहेत, हे स्पष्ट होतं.
याप्रकारच्या चित्रपटांच्या संहिता या बहुदा एखाद्या `हॅपनिंग`प्रमाणे असाव्या लागतात. त्यांचा एक धागा वास्तवाशी निगडीत असतो, अन् कथेतली चमत्कृती शाबूत ठेवूनही त्यांचा स्थलकालाच्या एका विशिष्ट चौकटीतच विचार करावा लागतो. `रेक`ची चौकट आहे, ती या इमारतीची. म्हातारीची केस फार साधी नसल्याचं ज्याक्षणी इमारतीतल्या लोकांच्या लक्षात येतं, साधारण तेव्हाच ते इमारतीबाहेरच्या मंडळींनाही उमजतं. ताबडतोब इमारतीला बाहेरून टाळं लागतं, आणि आतल्या लोकांवरचा प्रसंग थोडा अधिकच बिकट होतो.
एका दृष्टीने पाहता, ही रचना अ‍ॅगाथा ख्रिस्ती किंवा तत्सम लेखकांच्या रहस्य कादंब-यांची आठवण करून देणारी आहे. फॉर्म्युलाप्रमाणे इथेही एका स्थळी एकमेकांची नीटशी ओळख नसलेल्या अनेक व्यक्तिरेखा जमल्या आहेत. इथे बाहेरून कोणी येऊ शकत नाही, वा इमारतीबाहेरही कोणी पडू शकत नाही.
खुन्याऐवजी इथे आहे, तो माणसातलं माणूसपण संपवणारा एक भयंकर आजार, जो मुळात या इमारतीत कसा आला हेच एक कोडं आहे. वरवर साधे वाटणारे, पण प्रत्यक्षात अपराधी असणारे काही जण इथे आहेत, रहस्याच्या मुळाशी जाऊ पाहणारे काही चलाख उपद्वयापी आहेत, गुपचूप मृत्यूला सामोरे जाणारे काही आहेत, तर शेवटपर्यंत लढणारे काही. अन् अखेरचा धक्का तर आहेच, जो चित्रपटाच्या पुढल्या भागाची सोय करून ठेवतो.
`रेक`मधे पूर्णपणे नवीन म्हणण्यासारखं काहीही नाही. हे तर खरंच आहे. मात्र प्रत्येकवेळी नवी साधनं शोधणं आवश्यक नसतं. अनेकदा आलेल्या साधनांचा केलेला योग्य आणि अर्थपूर्ण उपयोग हा चित्रपटाला आपला कार्यभाग साधण्यासाठी पुरेसा ठरतो.
`रिअ‍ॅलिटी हॉरर` हे भयपटांचं नवीन रुप बहुधा पुढली काही वर्ष तरी चित्रपटांत ठाण मांडून बसण्याची चिन्हे आहेत. या आपल्या रोजच्या आयुष्यातल्या घटनांमध्येच दडलेली भीती शोधणा-या चित्रपटांपुढे, नेटक्या काल्पनिक भूतकथा मांडणारे चित्रपट दिवसेंदिवस फिके वाटायला लागले आहेत.`रेक`चा अंगावर येणारा थेटपणा ही भयपटाच्या नव्या युगाची सुरुवात मानायला हरकत नाही.

-गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP