बर्डमॅन (ऑर द अनएक्पेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नरन्स)

>> Sunday, July 21, 2024


ॲन्ड डिड यू गेट व्हॉट यू वॉन्टेड फ्रॉम धिस लाईफ

इव्हन सोआय डिडॲन्ड व्हॉट डिड यू वॉन्ट?

टु कॉल मायसेल्फ बिलव्हेड, टू फील मायसेल्फ बिलव्हेड ऑन द अर्थ.

(रेमन्ड कार्व्हर, लेट फ्रॅगमेन्ट)



 

अमेरिकन आणि जागतिक साहित्यात लघुकथेसाठी मानाचं स्थान पटकवलेल्या रेमन्ड कार्व्हरने लिहिलेल्या आणि त्याच्याच थडग्यावर कोरलेल्या या ओळींपासून मेक्सिकन दिग्दर्शक अलेहान्द्रो इन्यारितूच्याबर्डमॅन (ऑर द अनएक्पेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नरन्स)’ या चित्रपटाची सुरुवात होते. इथे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली, या उताऱ्यातला आशय आणि दुसरी, म्हणजे तो रेमन्ड कार्व्हरने लिहिलेला असणं.


 बर्डमॅनचित्रपटात कार्व्हरला विशेष स्थान आहे. कारण चित्रपटातलं मुख्य पात्र रिगन थॉमस कार्व्हरच्याव्हॉट वुई टॉक अबाउट, व्हेन वुई टॉक अबाऊट लव्हया प्रसिद्ध कथेचं त्याने स्वत:च केलेलं नाट्यरुपांतर ब्रॉडवेसाठी बसवतय, आणि त्यात कामंही करतय. रिगन (मायकल कीटन) हा मूळचा हॉलिवुडचा लोकप्रिय स्टार. एकेकाळी त्याचीबर्डमॅनही सुपरहिरो व्यक्तीरेखा चांगलीच गाजलेली. मात्र अशा व्यावसायिक सिनेमात राम नाही असं समजून त्याने दोन चित्रपट करुन व्यक्तीरेखा सोडली. तेव्हापासून त्याच्या नावावर एकही चाललेला चित्रपट नाही. या नाटकाचं दिग्दर्शन हा करीअर सावरायचा त्याचा अखेरचा प्रयत्न असावा. चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा उतारा, हा रिगनच्या वागणुकीशी सुसंगत म्हणून वाचता येतो. उतरत्या काळात आणि वयात, त्याला आपण घालवलेलं आयुष्य व्यर्थ असल्याची चिंता वाटतेय. ते तसं नसल्याची, आपण काहीतरी महत्वाचं करुन दाखवल्याची पावती, त्याला त्याच्या चाहत्यांकडून हवीय. त्यांच्या आणि त्याच्या स्वत:च्या नजरेतही त्याला मान हवा आहे.


 दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ती रिगनची मानसिकता. ‘बर्डमॅनला त्याने सोडलय पणबर्डमॅनने त्याला सोडलेलं नाही. त्याच्या डोक्यात या व्यक्तीरेखेचा काहीसा चिडकट आवाज ठाण मांडून बसलेला आहे. सुपरहिरो रुपात सहज यश मिळणं शक्य असताना रिगनने चालवलेली ही कलात्मक धडपड या आतल्या आवाजाला अजिबात मान्य नाही. हा रिगनच्या व्यक्तीमत्वात दडलेला बर्डमॅन रिगनभोवतालचं वास्तवही मॅनिप्युलेट करु शकतो. त्याला अधांतरी तरंगता येतं, नुसत्या नजरेने वस्तू हलवता येतात, आणि जेव्हा नाटकात वाईट काम करत असलेल्या एका कलाकाराला अपघात होतो, तेव्हा तोही आपल्यातल्या बर्डमॅनने घडवला अशी रिगनची खात्रीच असते.


 जेव्हा या कलाकाराला आयत्या वेळी बदलण्याची पाळी येते, तेव्हा सहकलाकार लेज्ली (नेओमी वॉट्स) माईक शायनरचं ( एड नॉर्टन ) नाव सुचवते. माईक अतिशय टॅलेन्टेड पण पूर्णत: बेभरवशाचा नट आहे. तो येतो आणि परिस्थिती अधिकच विस्कटते. चार दिवसांनी असलेल्या अधिकृत पहिल्या प्रयोगाआधीच्या, प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या रंगीत तालमीवजा प्रिव्ह्यूत गोंधळ होत रहातात. रिगनची ॲडीक्ट मुलगी सॅम (एमा स्टोन) हिचं माईकच्या जवळ येणं, माईकने रंगमंचावर केलेला तमाशा, रिगनचं एन्ट्रीआधी नाट्यगृहाच्या बाहेरच्या बाजूला अडकणं, असं बरच काही होतं, आणि हे नाटक रंगमंचावर येणार का नाही, याबद्दल प्रत्येकालाच शंका वाटायला लागते.


 जेव्हा एखादा चित्रपट आपल्याला कथास्वरुपात चटकन कळू शकतो, तेव्हा त्यातल्या अर्थाची खोली आपल्या चटकन लक्षात न येण्याची शक्यता खूप असते. ‘बर्डमॅनया प्रकारातलं उत्तम उदाहरण आहे. त्यात कास्टिंग चॉईस, तंत्राची योजना, अर्थाच्या विविध शक्यता, याची रेलचेल आहे, पण परफॉर्मन्स, चित्रपटाचं करमणूक मूल्य, कथानकातला ताणतणाव, या गोष्टीच तो पहाताना इतक्या प्रभावी ठरु शकतात, की त्यापुढे इतर गोष्टींकडे आपलं लक्षच जाऊ नये. उदाहरणार्थ कार्व्हरच्या कथेचा वापर. बर्डमॅन हे कार्व्हरच्या कथेचं रुपांतर नाही, आणि जरी मूळ कथेतल्या महत्वाच्या घटना आपल्याला पडद्यावरल्या नाट्यरुपात दिसल्या, तरीही ती कथा वाचलेली असणं चित्रपट समजण्यासाठी आवश्यक नाही. संवाद आणि संदर्भातून कथेतला आवश्यक तो भाग, मुख्य कथासूत्र आपल्यापर्यंत पोचवली जातात जी चित्रपटासाठी महत्वाची आहेत. प्रेम म्हणजे नक्की काय, आणि आयुष्यात त्याचं काय स्थान असू शकतं, त्याची विविध रुपं, याबद्दलची चर्चा कथेत आहे. इथे रिगनचं व्यक्तीगत आयुष्य, लेज्ली आणि माईक यांचे संबंध, अशा अनेक जागी कार्व्हरच्या कथेतली सूत्र आपण जोडून पाहू शकतो.


 चित्रपट, दिग्दर्शन, पटकथा आणि छायालेखन या सर्व विभागात ऑस्कर मिळवणाऱ्या बर्डमॅनचं इमॅन्यूएल लूबेझ्कीने केलेलं छायालेखन हे स्वतंत्रपणे अभ्यासण्यासारखं आहे. डिजीटल चित्रीकरण आल्यापासून सिंगल टेकमधे मोठ्या लांबीचे प्रसंग घेणं शक्य झालंय, आणि एकाच टेकमधे पूर्ण सिनेमा चित्रीत केल्याचीही उदाहरणं आहेत. ‘बर्डमॅनप्रत्यक्षात सिंगल टेक फिल्म नाही कारण ती चारपाच दिवसांच्या काळात घडते, आणि प्रहर, दिवस, यांमधे स्पष्ट बदल आहेत. पण दहा मिनिटांच्या लांबीचे प्रसंग संकलनात जोडून जे घडतंय ते एका न तुटणाऱ्या शॉटमधे चालल्याचा परिणाम चित्रपट साधतो. अनेकदा प्रसंगबदल हे एक व्यक्ती चालत एका ठिकाणून दुसरीकडे गेल्याने होतो, आणि ही ट्रान्झिशन्स लक्षपूर्वक पहावीत. पार्श्वभूमीला असणारं म्युझिक पात्रानुसार कसं बदलतं, हे देखील विशेष आहे. या सलग चालणाऱ्या कॅमेराच्या प्रवासाने एक ताण, एक अर्जन्सी तयार होते, जी चित्रपटाच्या फायद्याची आहे.


 एड नॉर्टन (प्रायमल फीअर, फाइट क्लब), एमा स्टोन (इझी ए, ला ला लॅन्ड, पुअर थिंग्ज ) झॅक गॅलिफिनॅकिस (द हॅन्गोवर मालिका), नेओमी वॉट्स (द रिंग, २१ ग्रॅम्स, किंग कॉंग) अशा एकाहून एक उत्तम अभिनेत्यांची रांग या चित्रपटांत आहे, पण त्यातही, मायकल कीटनची रिगनच्या भूमिकेसाठी केलेली निवड, हा इन्यारितूचा मास्टरस्ट्रोक आहे, कारण कीटनच्या पार्श्वभूमीने ही व्यक्तीरेखा अस्सल होते. दिग्दर्शक टिम बर्टननेबॅटमॅनमोठ्या पडद्यावर आणला तेव्हा तरुण मायकल कीटन या सुपरहिरो भूमिकेत होता. ‘बॅटमॅन’(१९८९) आणिबॅटमॅन रिटर्न्स’(१९९२) या दोन चित्रपटांनी तो मोठा स्टार बनला. पण त्यानंतर त्याने ही भूमिका सोडली. पुढली अनेक वर्ष तो लहान मोठ्या भूमिका करत राहिला, पण त्याला पुन्हा ते स्थान कधी मिळालं नाही. सर्वसाधारण प्रेक्षकाला त्याला पाहिल्यावर एखादी क्रिटिकली अक्लेम्ड भूमिका आठवत नसे, तर एकेकाळचा बॅटमॅन हीच त्याची ओळख बनली. त्यामुळे कीटन हा जवळपास खऱ्या आयुष्यातला रिगनच होता, आणि प्रेक्षकांना ही व्यक्तीरेखा समजवून सांगावी न लागता, केवळ कीटनचं त्या जागी असणं हे त्यासाठी पुरेसं होतं. ‘बर्डमॅनहा कीटनसाठी कमबॅक ठरला, आणि यानंतर तो पुन्हा एकदा स्टार म्हणून गणला जाऊ लागला. चित्रपटांत रिगनच्या आतला बर्डमॅन त्याला सुचवतो, की हे सारं सोडून पुन्हा व्यावसायिक सुपरहिरो फिल्म्सकडे वळणं शक्य आहे. ते जरी कीटन ने केलं नाही, तरी पुन्हा एकदा बॅटमॅन साकारण्याची संधीही त्याला २०२३ च्याद फ्लॅशमधे मिळाली.


 कला महत्वाची की व्यवसाय’, ‘रंगभूमी खरी की चित्रपटहे दोन परस्परात गुंतणारे वाद या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत, आणि प्रेक्षक म्हणून आपलं मतही त्यात महत्वाचं आहे. कल्पनेतला बर्डमॅन आणि रिगन यांच्यातला एक, आणि रंगभूमी समीक्षक डिकिन्सन आणि रिगन यांच्यातला एक असे दोन प्रसंग संबंधित बरेच मुद्दे मांडतात.


 बर्डमॅन आणि रिगन यांच्यात घडणारा संवाद जरी बराचसा रिगनच्या डोक्यात चालत असला, तरी चित्रपटांत अनेकदा आपल्याला रिगनच्या सुपरपॉवर्स दिसतात. पण या पॉवर्स फसव्या आहेत, कारण चित्रपट हा रिगनच्या मनात काय आहे, आणि वास्तवात काय घडतंय याची सरमिसळ आपल्यासमोर ठेवतो. प्रत्यक्षात काय झालं असेल याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलं जातं. हे चित्रपट कसं करतो हे मी इथे सांगत नाही कारण ते पहाण्यातच गंमत आहे. याला अपवाद ठरतो तो चित्रपटाचा शेवटचा प्रसंग, जो अनेकांना संभ्रमात पाडून गेला. या प्रसंगाला दोन परस्परविरोधी वाटणारी स्पष्टीकरणं आहेत, आणि तुम्हाला त्यातलं कोणतं स्पष्टीकरण पटतं, वा दिसतय त्याचा तुम्ही काय अर्थ लावता, हे तुम्ही चित्रपट किती लक्षपूर्वक पहाताय यावर अवलंबून आहे.

 - गणेश मतकरी

 

Read more...

स्वातंत्र्यवीर सावरकर - भावनिक सत्याचे प्रयोग

>> Monday, March 25, 2024


 Swatantrya Veer Savarkar Review: Randeep Hooda puts up an award-winning act  in his ode to polarising figure | PINKVILLA


‘Those who seek the truth about a man from the film of his life might as well seek it from his loving grandmother. Most biopics, like most grandmothers, see the good in a man and demonize his enemies. They pass silently over his imprudent romances. In dramatizing his victories, they simplify them. And they provide the best roles to the most interesting characters. If they didn't, we wouldn't pay to see them.

 Roger Ebert, Review of Hurricane.

 

 

 

प्रख्यात चित्रपट समीक्षक रॉजर इबर्ट यांनी हरीकेन चित्रपटाच्या समीक्षेत बायोपिक मधल्या सत्यांशाची तुलना चरीत्रनायकाच्या प्रेमळ आजीकडून ऐकलेल्या त्याच्याबद्दलच्या गोष्टींशी केली आहे. ही आजी त्याला वाईट म्हणत नाही, त्याच्या चुकांवर पांघरुण घालते, त्याच्या विजयाचे क्षण अधिकच गौरवाने पण काहीसे वरवरचे मांडते. तिच्या कथा असत्य असतात असं नाही, पण ते तिच्या दृष्टीने सांगितलेलं सत्य असतं.

 चित्रपट हा चित्रपट आहे. ती रेकॉर्डेड हिस्ट्री नाही, ते चरित्र नाही, तो माहितीपट नाही. हे खरंतर सांगायला लागू नये, पण  लागतं अशी परिस्थिती आहे. आपल्याकडेच नाही, इतर देशातही. दिग्दर्शक चरित्रपटात जे मांडतो ते भावनिक सत्य असतं, इमोशनल ट्रूथ, जे त्याच्या दृष्टीकोनाशी प्रामाणिक असेल, पण घडलेल्या दर गोष्टीशी असेलच असं नाही. एका परीने ते स्वाभाविकही आहे. अडीच तीन तासात जर माणसाचं आयुष्य; सावरकरांच्या केसमधे तर जवळपास पूर्ण आयुष्य, मांडायचं असेल तर सर्व घटनांची जंत्री येऊ शकणार नाही, किंवा ती देण्याचा तोटाच अधिक. जेव्हा सारं दाखवता येत नसेल, तेव्हा मुख्य मुद्दे पोचण्यासाठी कथनाशी शक्य तितकं प्रामाणिक रहात काही तडजोडी करणं, घटना पुढेमागे करणं, व्यक्तीरेखा प्रातिनिधिक स्वरुपात आणणं, क्वचित घडलेल्या पण घडू शकल्या असत्या अशा गोष्टी दाखवणं, हा अपराध मानला जात नाही, जाऊ नये. अशी निवड करावीच लागते, ते स्वाभाविक आहे. अर्थात, इथे तुम्ही जे स्वातंत्र्य घेताय, ते किती घेता, यावरही तुमच्या चित्रपटाची ऑथेन्टिसिटी ठरते. हे सारं आपण प्रत्येक बायोपिक पहातानाच लक्षात ठेवायला हवं. त्यालास्वातंत्र्यवीर सावरकरहा अपवाद नाही.

 हा चित्रपट रणदीप हूडाचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न आहे, आणि त्यासाठी त्याने निवडलेला विषय हा फारच महत्वाकांक्षी आहे. त्याला पडद्यावर आणण्यात तो यशस्वी झालाय का, तर मी म्हणेन काही बाबतीत झालाय, इतर बाबतीत नाही, पण प्रयत्न म्हणून तो पुरेशा गंभीरपणे केलेला दिसतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या परस्परविरोधी मतप्रवाह असलेल्या व्यक्तीरेखेवरल्या चित्रपटाला दोन प्रकारचा प्रेक्षक येऊ शकतो. पहिला, ज्याला सावरकरांचे विचार ( पूर्णपणे वा ऐकीव माहीतीवरुन ) आणि काम माहीत आहेत आणि त्याला ते अमुक एका प्रमाणात पटलेले आहेत. याच्यासाठी चित्रपट हाकन्विन्सींग कन्विन्स्डआहे. तो त्यापासून तपशील वगळता वैचारीक स्वरुपाचं नवं काही घेऊ शकणार नाही, पण त्याला आपल्या मनातले सावरकर, त्यांच्या आयुष्यातल्या घटना, पडद्यावर पहाण्याचा आनंद त्याला मिळू शकेल. दुसऱ्या प्रकारचा प्रेक्षक आहे, ज्याला सावरकर परिचित आहेत, पण ते कार्यापेक्षा नावाने. त्यांच्या चरीत्रातल्या काही मुख्य घटना, लंडनमधली अटक, समुद्रात उडी, तुरुंगवास वगैरे माहीत आहेत, पण खूप काही माहीत नाही. त्यांचं कार्य जाणून घेण्याची त्याची इच्छा आहे. या प्रेक्षकावर चित्रपटाचा अधिक परिणाम होऊ शकतो. सावरकरांची सशस्त्र क्रांतीची हाक, त्यांचे इंडीआ हाऊसमधले प्रयत्न, त्यांची हिंदुत्वाची सर्वसमावेशक व्याख्या, या गोष्टी त्याला नव्याने कळू शकतात आणि त्यांची वेगळी ओळख होऊ शकते. यातल्या पहिल्या प्रकारच्या प्रेक्षकाला हा सिनेमा अधिक नीट कळू शकेल, पण त्याचा मोठा प्रभाव पडायचा, तर सिनेमाने दुसऱ्या प्रकारच्या प्रेक्षकापर्यंत पोचण्याची गरज आहे. या प्रेक्षकाला सावरकरांची महती पटवणं हा चित्रपटाचा एक हेतू असू शकतो

 ‘स्वातंत्र्यवीर सावरकरमधे हूडाने अभिनय, दिग्दर्शन आणि सहलेखन अशा तीन जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ज्यांनी त्याची कारकीर्द पाहिली असेल, त्यांना त्याच्या अभिनयातल्या ताकदीचं आश्चर्य वाटू नये. इथे त्याला अनेक गोष्टी करण्याची संधी मिळाली आहे. एक लोकप्रिय ऐतिहासिक व्यक्तीरेखा उभी करणं हा भाग आहेच, पण त्याबरोबर विविध काळात, वयात, परिस्थितीनुसार त्यांच्यात होत गेलेलं स्थित्यंतर उभं करणं हे अतिशय कौशल्याचं काम त्याने करुन दाखवलंय. त्याबरोबरच दिग्दर्शनाच्या तांत्रिक बाजूंमधेही मला काही खटकलं नाही, एका गोष्टीचा अपवाद वगळता. ती म्हणजे चित्रपटाच्या पूर्वार्धात विविध प्रकारची, वेगवेगळ्या देशांमधील लोकेशन्स असूनही चित्रपट दृश्य भागात त्यांचा वापर करुन घेत नाही. बरचसं काम क्लोज अप्स, छोटे सेट, यावर होतं, घरांबाहेर आपण क्वचित पोचतो. कथानकाचा जो मोठा कॅनव्हास आहे, त्याची भव्यता काही अपवादात्मक प्रसंग वगळता आपल्यापर्यंत पोचत नाही. उत्तरार्धातल्या जेल सिक्वेन्स मधेही हे पात्रांच्या जवळ रहाणं आहे; तो दिग्दर्शकीय निर्णयच आहे,  पण तिथे प्रत्यक्ष तुरुंगाचं लोकेशन वेगवेगळ्या रितीने वापरलं जात असल्याने ते तितकं खटकत नाही. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबर येणारी तिसरी बाजू आहे ती लेखनाची, आणि इथे मात्र मोठीच अडचण आहे. कदाचित पटकथाकार वेगळा असता तर हूडा दिग्दर्शक म्हणून त्यावर नियंत्रण ठेवू शकला असता. पण इथे  दोन्ही ठिकाणी तोच असल्याने सारं हाताबाहेर गेलं आहे. 

 चित्रपट तीन तासांचा आहे आणि लांबीनुसार साधारण मध्यावर इन्टरमिशन आहे. त्याचे मांडलेल्या घटनाक्रमानुसार दोन भाग पडतात. सावरकरांच्या लहानपणापासून ते अंदमानला जाईपर्यंत पूर्वार्ध आहे, तर जेल आणि राजकारणातली अखेरची वर्ष, पतित पावन मंदीराची स्थापना, हिंदु महासभेतला सहभाग वगैरे उत्तरार्धात येतं. आता ही मांडणी लक्षात घेतली, तर सावरकरांनी केलेलं प्रत्यक्ष लढ्यातलं काम हे चित्रपटाच्या पूर्वार्धात सर्वाधिक दाखवलं जातं. नुसतं त्यांचं कामच नाही, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्यांनी केलेली कामं, स्वातंत्र्यलढ्यातल्या घडामोडी, लढ्यात त्या काळात सहभागी असलेले इतर जण, टिळक, गांधी यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तीरेखांचे त्या काळाशी सुसंगत संदर्भ, इंग्रजांना त्यांच्या कामाची लागलेली कुणकुण,असं करतकरत सावरकरांनी पॅरिसहून लंडनला पोचणं आणि स्वत:ला अटक करवून घेणं, वगैरे महत्वाचे अनेक प्रसंग या भागात येतात.

 मी आधी म्हणालो की सावरकरांचे विचार/काम माहीत आहे त्यांना चित्रपट नीट कळू शकेल याचं कारण म्हणजे पूर्वार्धातली घटनांची गर्दी. आपल्याला काही पार्श्वभूमी असेल तर आपल्याला हे कसं घडत गेलं हे नीट कळेल, पण नसल्यास आपल्याला खूप काही दिसलं, तरी आपण त्यामागचा कार्यकारणभाव नीट लक्षात घेऊ शकू असं नाही. हा भाग बराचसा विस्कळीत आहे. इथे सारंच दाखवण्याचा हट्ट बाजूला ठेवून महत्वाच्या जागा निवडून त्यांना अधिक महत्व द्यायला हवं होतं. भरधाव जाण्यापेक्षा सावरकरांनी काय प्रसंगी कोणता विचार केला, हे अधिक विस्ताराने येतं, तर आपल्याला त्यांच्या लढाऊ वृत्तीबरोबर त्यांची वैचारिक बाजू अधिक स्पष्टपणे कळली असती. उदाहरणार्थ सहकाऱ्यांचा विरोध असतानाही लंडनला जाऊन अटक करुन घेण्यामागे काय तर्क होता, हे चित्रपटात सावरकर थोडक्यात सांगतात, पण हे पुरेशा स्पष्टपणे येत नाही. सहकाऱ्यांनाही याबद्दल शंका होती, आणि प्रत्यक्षात त्यांना जे व्हायला हवं होतं ते झालं नाही. त्याशिवाय हा प्रसंग त्यांच्या पुढल्या आयुष्याला महत्वाचं वळण देणारा आहे, हे सर्व पहाता त्याची पार्श्वभूमी स्पष्ट हवी होती. ते होत नाही. वेळोवेळी असं होत राहिल्याने चित्रपट काही वेळा डिसजॉइन्टेड वाटतो. त्यांनी मांडलेले विचारही पुरेशा संदर्भाअभावी काही वेळा अतिशयोक्त वाटतात.

 उत्तरार्धात घटना विरळ झाल्याने असा गोंधळ उडत नाही. पण चित्रपट तुरुंगातल्या भागावर फार अधिक वेळ काढतो. सावरकरांच्या कारावासातल्या हाल अपेष्टा हा भाग चित्रपटासाठी नक्कीच महत्वाचा आहे, पण त्यात बरीच पुनरावृत्ती आहे. तसा रिपीटिटीव भाग कमी करुन वाचलेला वेळ पूर्वार्धात वापरला असता तर फायदा झाला असता.

 चित्रपटावर झालेली टिका ती प्रॉपगंडा फिल्म आहे अशी झालेली आहे, तसच चित्रपटाच्या उत्तरार्धात होणाऱ्या भगतसिंग भेटीसारखे काही प्रसंग काल्पनिक असल्याचे आरोपही झाले आहेत. प्रॉपगंडा फिल्म म्हणजे काय, तर प्रेक्षकाचं एका विशिष्ट विचारधारेच्या बाजूने मत तयार करणारा चित्रपट. आता ही प्रॉपगंडा फिल्म आहे का, तर प्रश्नच नाही. सावरकरांच्या बाजूने, हिंदुत्वाच्या बाजूने बोलणारा हा चित्रपट आहे. प्रॉपगंडा फिल्म या संकल्पनेत काही नवीन नाही आणि कायम अशा फिल्म येतच असतात. इथे महत्वाचं काय, तर आपली बाजू मांडताना चित्रपटकर्ते विरोधी विचाराला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात अथवा नाही.

 मला व्यक्तीश: चित्रपटातला भगतसिंग भेटीचा प्रसंग खटकला नाही. आता एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी, की मी सावरकरांचं चरित्र वाचलेलं नाही. भगतसिंग सावरकरांना मानत, त्यांनी सावरकरांचं १८५७च्या लढ्यावरचं पुस्तक वाचलं होतं असं मी ऐकलेलं आहे, जरी उद्या कोणी ते सिद्ध करायला सांगितलं तर मी काही ते करु शकणार नाही. पण ते योग्य मानलं, तर मला हा प्रसंग जे घडलं त्याहून काहीसा वेगळा पण आशयाला अधोरेखित करणारा वाटला ( मी ज्या इमोशनल ट्रूथबद्दल बोललो त्याच्याशी सुसंगत ) . चित्रपटातल्या गांधीजींच्या चित्रणाबद्दल मात्र मला तसं वाटलं नाही. हे चित्रण मला पटलं नाही. आयुष्यातल्या दर टप्प्यावर सावरकर आणि गांधी यांची तुलना अनावश्यक वाटली. त्यात गांधीजींचं चित्रण थोडं खलनायकी थोडं विदुषकी असं कॅरीकेचरीश दाखवणंही पटत नाही. जर अशी तुलना करायची होतीच, तर गांधीजींची भूमिका थोडी मोठी हवी होती, त्यांच्या भूमिकेत कॅरीकेचर वाटता पटेलसा कलावंत असण्याची गरज होती, संवाद अधिक जबाबदारीने लिहिण्याची गरज होती. गांधीजींना आजच्या काळात खलपुरुष करणं सोपं झालंय आणि कोणाला त्यात काही वावगं वाटत नाही हीदेखील खेदजनक गोष्ट आहे. हे कमी की काय , म्हणून चित्रपट शेवटी गांधीजी आणि नेहरुंचे लेडी माउंटबॅटन बरोबरचे सोशल मिडीआत नित्य चमकणारे वादग्रस्त कृष्णधवल फोटो एनॅक्ट करण्यापर्यंत पोचतो तेव्हा तर शंकेला जागा उरत नाही.

 पण हे सारं असूनही चित्रपट जरूर पहावा. प्रॉपगंडा असला, तरी चरित्रपट म्हणूनही हा एक अवघड प्रकल्प आहे.  तुमच्या विचारांना अनुसरुन तुम्हाला तो पटेल अथवा नाही . पण नाही पटला, तरी दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता या दोन्ही बाजूंनी तो पेलण्याचे प्रयत्न एका व्यक्तीने करणं ही सोपी गोष्ट नाही. चरित्र मांडताना रणदिप हूडाने भरपूर अभ्यास केलेला दिसतो. जरा जास्तच, कारण त्यामुळे आपल्याला जाणवलं ते सारं दाखवावं असं त्याला वाटलं असावं. त्याऐवजी कदाचित वेगळा पटकथाकार, वेगळा दिग्दर्शक अधिक योग्य निर्णय घेऊ शकला असता असं मी म्हणेन.

 चित्रपट संपला तेव्हा मला असंही वाटलं, की त्याकडे केवळ एका मोठ्या स्वातंत्र्यवीराचं कार्य म्हणून पहाण्याबरोबरच  मुख्य प्रवाहात काम करणाऱ्या एका व्यक्तीची प्रवाहाबाहेर फेकलं गेल्याने होणारी शोकांतिकाअसं पाहिलं, तर चित्रपटाची भेदकता अधिक जाणवण्यासारखी आहे. त्या दृष्टीने चित्रपटाचं कलात्मक यशही थोडं अधिक वाटतं, आणि रणदीप हूडाच्या अभिनयाचाही या यशात नक्कीच मोठा हात आहे. निदान मला तरी जाणवलं, ते हेच

 

- गणेश मतकरी


Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP