फिन्चर,फेसबूक आणि सोशल नेटवर्क

>> Sunday, October 31, 2010

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनानंतरच्या पार्टीत मी पोचलो तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. अर्थात पार्टीदेखील उशिराच सुरू झाली होती. डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘सोशल नेटवर्क’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर. चित्रपट आवडला असल्याने त्याविषयी बोलावंसं वाटत होतं, पण ओळखीचे चेहरे दिसेनात. बरोबरची मित्रमंडळीही आजूबाजूच्या गर्दीत अदृश्य झालेली. अशा वेळी ओळखी करून घेणं किंवा चर्चा- संभाषणात सामील होणं ही कला आहे, जी मला अजिबात जमत नाही. साहजिकच मी एक कोपरा पकडला, फोन उचलला आणि फेसबुक उघडलं. चित्रपटाविषयीच एक छोटा दोन ओळींचा स्टेटस अपडेट टाकला, तेव्हा अकरा वाजून चोवीस मिनिटं झाली होती. त्यावर पहिली कमेन्ट पडली ती बरोबर एका मिनिटाने. एका परीने हीदेखील संभाषणाची सुरुवातच!
फेसबुकच्या या एका गोष्टीचीच मला गंमत वाटते. वरवर पाहायचं तर ते उघडच ‘सोशल नेटवर्किंग टूल’ आहे. एक्स्ट्रोव्हर्ट लोकांसाठी, अधिकाधिक मित्र जमवणाऱ्या, गप्पा मारण्याची हौस असणाऱ्यांना आपला गोतावळा वाढवण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग झालेला, होत असलेला दिसून येतो. मात्र त्याच वेळी गप्पात फार न गुंतणाऱ्या, आपल्या कोषात राहणाऱ्या लोकांसाठीही ते संवादाचा एक समांतर मार्ग खुला करतं. फेसबुकचं हे अंग लक्षात घेतलं की या संपर्काच्या साधनाचा निर्माता मार्क झकरबर्ग हे स्वत:च्याच अवकाशात रमणारं, एकलकोंडं व्यक्तिमत्त्व आहे, याचं आश्चर्य वाटणार नाही. निदान सोशल नेटवर्क चित्रपट तरी हेच सांगतो.
फिन्चरचा ‘सोशल नेटवर्क’ फेसबुकच्या जन्मकथेवर आधारित आहे, हे बहुधा सर्वानाच माहीत आहे. निदान इंटरनेटवर सततचा वावर असलेल्यांना तरी त्याची नक्कीच कल्पना आहे. ही जन्मकथा शंभर टक्के प्रामाणिक आहे का? तर नसावी. कारण मुळात चित्रकर्त्यांचाच ती तशी असल्याचा दावा नाही. बेन मेझरिकच्या ‘दि अ‍ॅक्सिडेन्टल बिलिअनेअर्स’ या पुस्तकाचा त्याला आधार जरूर आहे. पण स्वत: पटकथा लेखक आरोन सोरकिनच्या म्हणण्यानुसार त्याचा भर आहे तो कथा सांगण्यावर. सत्यासत्यतेशी त्याला देणंघेणं नाही.
मला स्वत:ला ‘सोशल नेटवर्क’बद्दल खूपच कुतूहल होतं, ते डेव्हिड फिन्चर या चित्रपटाशी संबंधित असल्याने. फिन्चरचा मी दुस-या चित्रपटापासून फॅन आहे. एलिअन मालिकेचा तिसरा भाग असलेल्या आपल्या पहिल्या चित्रपटात त्याला नवीन करण्यासारखं काही नव्हतं, अर्थातच तो केवळ ठीकठाक होता. पण सेवन (१९९५) या आपल्या दुसऱ्या चित्रपटापासून त्याने आपली एक निश्चित शैली चित्रपटांना दिली. फिन्चरचा दिग्दर्शनाकडे वळण्याआधीचा बराच काळ हा जॉर्ज ल्युकसच्या ‘इंडस्ट्रियल लाइट अ‍ॅण्ड मॅजिक’ या स्पेशल इफेक्ट कंपनीत अन् नंतर जाहिराती, म्युझिक व्हिडीओ बनवण्यात गेला. साहजिकच प्रेक्षकांना गुंगवून सोडणारी शैलीदार दृश्यं अन् आशयात कमी-अधिक असूनही चमकदार लक्षवेधी प्रसंग, ही त्याच्या पहिल्या अनेक चित्रपटांची खासियत होती. सेवनमधल्या खुनांच्या दृश्यांसाठी वापरलेला मुन्श सारख्या चित्रकाराच्या रंगसंगतीचा प्रभाव, फाईट क्लबमधल्या प्रॉटॅगॉनिस्टच्या (एडवर्ड नॉर्टन) खोलीचं फर्निचर कॅटलॉगमध्ये होणारं रूपांतर. द गेमच्या अखेरीला निकोलस व्हॉन आर्टनने (मायकेल डग्लस) इमारतीच्या गच्चीतून घेतलेली जिवघेणी उडी, पॅनिक रूममधल्या बंदिस्त जागांना न जुमानणारा फिरता कॅमेरा अशा अनेक गोष्टी फिन्चरचं नाव घेताच डोळ्यासमोर उभ्या राहतात. फिन्चरच्या फिल्म्स कायम गडद- घुसमटवणा-या वातावरणात घडतात. एक प्रकारचा सोशल क्लॉस्ट्रोफोबिया त्याच्या चित्रपटांना व्यापून टाकताना दिसतो.
 २००७ च्या ‘झोडिअ‍ॅक’मध्ये फिन्चरने एक वेगळं वळण घेतलं, ज्या वळणाशी ‘सोशल नेटवर्क’देखील संबंधित असावा असं वाटतं. (या सगळ्यात, त्याचा क्युरिअस केस आँफ बेंजामिन बटन कुठे बसत नाही. आँस्कर वैगैरे ठीक आहे, पण फिन्चरच्या त्यातल्या त्यात सामान्य चित्रपटातला तो असल्याने आपण सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष करू) तर ‘झोडिअ‍ॅक’मध्ये  त्याने आपल्या शैलीतल्या दृश्य चमत्कृतीला बाजूला काढून एक सरळ कथानक मांडायचा प्रयत्न केला. कथानक होतं ते एका सीरिअल किलरच्या प्रत्यक्ष कारवायांचा आधार घेणारं, मात्र त्याचा फोकस हा गुन्हेगार नसून, तो कोण होता हा छडा लावायचा प्रयत्न करणा-या अन् त्यासाठी आय़ुष्य वेचणा-या, एका कार्टुनिस्टवर होता. एका विशिष्ट काळाची, त्यादरम्यानच्या अमेरिकन संस्कृतीची नोंद ठेवण्याचा प्रयत्न होता. तेव्हा गु्न्हेगारी, पत्रकारिता, सामाजिक घाडामोडी, बदलतं जीवनमान यांचा हा रेकॉर्ड होता. एका परीने इतिहासंच, पण शंभर टक्के खरा असल्याचा पुरावा नसणारा.
‘सोशल नेटवर्क’ ही देखील एक पुरावा नसणारी, पण एका सामाजिक बदलाची तपशीलवार घेतलेली नोंदच आहे. चित्रपट सुरू होतो तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या एका गजबजलेल्या कॅफेमध्ये कोणत्याही प्रस्तावनेशिवाय एका संभाषणाच्या मध्यावर. सुरुवातीचा कोलंबिया पिक्चर्सचा लोगो ही चित्रपटाची सुरुवात असल्याची एकमेव खूण. हा पहिला प्रसंग अन् त्याला जोडून येणारे काही प्रसंग, हा सोशल नेटवर्कचा सेटअप आहे. अनेक बाबतीत तो यातल्या दृश्य- ध्वनियोजनांबद्दल आपल्याला काही निश्चित सांगतो, आपल्या काळाची पुरती ओळख असणाऱ्या संवादांमधून यातल्या व्यक्तिरेखा झटपट उभ्या करतो, अन् प्रत्यक्षात फेसबुकच्या जन्माकडे निर्देश करणाऱ्या घटनांमधून आशयालाही मार्गी लावतो.
तर कॅफेतल्या प्रचंड गर्दीत अन् गोंगाटात आपल्यापुरत्या महत्त्वाच्या असतात त्या दोन व्यक्तिरेखा- मार्क झकरबर्ग (जेस आयझेनबर्ग) आणि एरिका ऑलब्राइट (रुनी मारा). संवाद ऐकायला थोडे कठीण. प्रत्यक्ष त्या कॅफेत शेजारच्या टेबलवर बसल्यासारखाच इतर गोंगाटही आपल्याला त्रासदायक होण्याइतका मोठय़ाने ऐकू येतो. मग आपण थोडे हुशारून बसतो. ऐकण्याचा प्रयत्न करायला लागतो. इथे आपल्या पटकन लक्षात येतं की मार्क अतिशय हुशार आहे. त्याच्या क्षेत्रात तो नक्कीच कोणीतरी मोठा होणार. मात्र, त्याला ‘टॅक्ट’ नावाचा प्रकार नाही. त्याच्यासमोर बसलेल्या मैत्रिणीकडे अन् आपल्या तिच्या नात्याकडे तो पूर्णपणे तर्कशुद्ध त्रयस्थ नजरेने पाहतो. साहजिकच तो स्वत:पुढे कोणालाच महत्त्व देत नसल्याचं एरिकाच्या ताबडतोब लक्षात येतं अन् एरिका निघून जाते. मार्क आपल्या खोलीवर जातो आणि एदुआर्दो (अ‍ॅण्ड्र गारफिल्ड) या आपल्या मित्राच्या मदतीने हार्वर्डच्या बऱ्याच मुलींचा एकत्रितपणे अपमान होईल अशी ‘फेसमॅश’ नावाची वेबसाइट तयार करतो. त्याआधी ब्लॉग लिहिताना तो पुन्हा एकदा एरिकाचा अपमान करायला विसरत नाही.
फेसमॅश हार्वर्डचा इंटरनेट ट्रॅफिक एवढा वाढवतं, की सव्‍‌र्हर कोलमडतो. बीअरच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवून मार्कने केलेल्या या पराक्रमाने जुळे भाऊ कॅमेरोन आणि टायलर विन्कलवॉस (आर्मी हॅमर) आणि त्यांचा मित्र दिव्या नरेन्द्र प्रभावित होतात. आणि आपल्या डोक्यातली सोशल नेटवर्किंगची कल्पना घेऊन मार्ककडे जातात. मार्क त्यावर काम करण्याचे मान्य करतो, पण आता त्याच्या डोक्यात वेगळंच काही घोळत असतं.
विन्कलवॉस बंधूंची कल्पनाच मार्कला फेसबुककडे घेऊन जाते का? आणि जात असल्यास या तशा जुन्याच कल्पनेसाठी फेसबुकच्या जन्माचं किती श्रेय या मंडळींकडे जावं, हा चर्चेचा विषय आहे. मात्र मार्क आणि एदुआर्दो फेसबुक मार्गाला लावतात हे खरं. पुढल्या थोडय़ाच काळात मार्क बिलिअनेअर झालेला असतो. अन् एक सोडून दोन खटल्यांना तोंड देत असतो. पहिला असतो विन्कलवॉस बंधूंनी आपल्या कल्पनेच्या चोरीसाठी केलेला, तर दुसरा- एदुआर्दोने फसवणुकीसाठी.
‘सोशल नेटवर्क’ची रचना म्हटली तर साधी सरळ आहे. एका क्रमाने घटना सांगणारी. मात्र वेळोवेळी कथानक काळाचं बंधन तोडतं अन् विन्कलवॉस- एदुआर्दो यांच्या खटल्यादरम्यान चाललेल्या साक्षीपुराव्यांमध्ये शिरतं. या साक्षीपुराव्यांदरम्यान होणारी चर्चा ही आपल्याला आधी घडत गेलेल्या घटनांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देते, एक संदर्भ देते.
मार्क आणि शॉन पार्कर (जस्टीन टिम्बरलेक) यांची पहिली भेट चित्रपट कशी दाखवतो, हे या रचनेचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहण्यासारखं आहे. शॉन हा ‘नॅपस्टर’च्या कर्त्यांपैकी एक होता, पण मार्कशी भेट झाल्यानंतर तो फेसबुकमध्येही सामील झाला, एदुआर्दोला त्याच्या नकळत बाजूला करून. एदुआर्दो खटल्यादरम्यान सांगतो, की शॉनचा इरादा नेक नसल्याची कल्पना आपल्याला या पहिल्या भेटीदरम्यानच आली होती. काही वर्षांच्या अंतराने घडणाऱ्या प्रत्यक्ष भेट आणि खटला या दोन प्रसंगांतलं चित्रपटांचं मागे-पुढे करणं हे पाहण्यासारखं आहे. इथला संगीताचा किंवा शॉनच्या बॉडी लॅंग्वेजचा वापर, शॉनचा युक्तिवादातला कळीचा शब्द (ए बिलिअन) खटल्यादरम्यान एदुआर्दोच्या तोंडी देणं, एदुआर्दोच्या प्रस्तावनेनंतर शॉनने वेबसाईटच्या नावात सुचवलेला बदल या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा संकल्पनेच्या पातळीवरच्या कोरिओग्राफीप्रमाणे आहे. या प्रकारची रचना चित्रपटात प्रत्यक्ष नसलेल्या अ‍ॅक्शनची जाणीव देते. त्याला वेग देते.
‘सोशल नेटवर्क’च्या संवादांचा मी मघा उल्लेख केला, पण ते नुसते चलाख आहेत असं मला म्हणायचं नाही. खास करून मार्कचं व्यक्तिमत्त्व उभं करण्यात त्यांचा महत्त्वाचा हात आहे. मार्क (खऱ्याबद्दल माहीत नाही, पण निदान पडद्यावरला) हा इमोशनली चॅलेंज्ड आहे. तो सगळ्या गोष्टी तर्कावर तोलून पाहतो. बराचसा वेळ कामात घालवतो. मित्रांशीही मोजकं बोलतो. एरिकाबरोबरच्या भांडणानंतरचा त्याचा उद्रेकदेखील शब्दात कमी व्यक्त होतो, तर कृती, ब्लॉगिंग आणि व्हॉइस ओव्हरमध्ये येणाऱ्या, मनातल्या विचारांच्या भरधाव सुटण्यातून दिसतो. हे सगळं संवादातून स्पष्ट होतं. ब्लॉगिंग किंवा मनातल्या विचारांचं मोकाट सुटणं हे व्हॉइस ओव्हरच्या गतीत दिसतं. त्याच्या वाक्यांची रचना ही बऱ्याच प्रमाणात युक्तिवादासारखी असते. तो बऱ्याचदा गप्प राहतो. बोलला तर समोरच्याच्या भावना समजण्यापेक्षा त्याचं बोलणं शब्दश: घेऊन त्यावर उत्तर देतो. या प्रकारचे संवाद हे प्रेक्षकांचं मत त्याच्याविषयी प्रतिकूल करण्याची शक्यता नक्कीच होती. ते इथे करत नाहीत. कारण ते मार्कच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर चपखल बसतात.
‘सोशल नेटवर्क’ फेसबुकविषयी अनेक गोष्टी (अगदी ‘एव्हरीथिंग यू ऑल्वेज वॉन्टेड टु नो, बट अफ्रेड टु आस्क’ छापाच्या) सांगतो, मात्र त्या फेसबुक काय आहे याचं स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे. यातली माहिती ही नकळत आलेली आहे, यातल्या व्यक्तिरेखांच्या विचारधारेला समजण्याचा एक प्रयत्न असल्यासारखी ती संवादात उतरलेली आहे. पण मला विचाराल तर ‘फेसबुक’ यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असूनही, हा फेसबुकविषयीचा चित्रपट नाही. तो एका पिढीविषयीचा चित्रपट आहे. आजच्या काळातले नवे उद्योग, नवी साहसं, नवे नायक पडद्यावर आणणारा. हिचकॉकच्याच भाषेत सांगायचं, तर फेसबुक हा ‘मॅकगफिन’ आहे. तो घटनांना पुढे नेतो, पण प्रत्यक्षात त्याचं असणं-नसणं त्यापलीकडे फार महत्त्वाचं नाही. एका संपूर्ण पिढीत असणारा संवाद-विसंवाद आणि त्याचं आजच्या घडीचं रूप दाखवणारं हे एक निमित्त आहे.
असं म्हणतात की, स्वत: झकरबर्गला हा चित्रपट, किंबहुना तो बनवलं जाणंच रुचलेलं नाही. ‘आय जस्ट विश्ड दॅट नोबडी मेड ए मूव्ही ऑफ मी व्हाइल आय वॉज स्टिल अलाइव्ह’, असं त्याने हल्लीच एका मुलाखतीत सांगितलं. पण खरं तर त्याला काळजीचं कारण नाही. चित्रपट त्याच्यावर टीका करत नाही. उलट तो त्याला आपलं म्हणतो. सर्व गुणदोषांसह आपल्या अ‍ॅन्टी-सोशल नायकाला उचलून धरणारा ‘सोशल नेटवर्क’ हॉलीवूड व्यक्तिचित्रणात काही नवे पायंडे पाडणारा ठरला, तर मला आश्चर्य वाटणार नाही.
-गणेश मतकरी. 
(लोकसत्तामधून- जागेअभावी
राहिलेल्या  भागासह.)

Read more...

किक-अ‍ॅसः नावाला जागणारा

>> Monday, October 4, 2010

किक-अ‍ॅस पाहताच पडणारा पहिला प्रश्न म्हणजे या चित्रपटाचा खरा प्रेक्षक कोण? सुपरहीरो मायथॉलॉजी हा या चित्रपटाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. या मायथॉलॉजीशी तुमची जवळीक जितकी अधिक, तेवढा तुम्हाला चित्रपट अधिक पटेल. बारीकसारीक संदर्भापासून मूलभूत रचनेपर्यंत अनेक गोष्टी कुठून आल्या, त्या कोणत्या दृष्टिकोनातून वापरल्या जातायत आणि त्यातून दिग्दर्शक काय सुचवतोय हे तुमच्या चटकन लक्षात येईल. पण त्यामुळे हा मुलांचा चित्रपट ठरणार नाही. मुलांना तो पाहायला जरूर आवडेल. पण जागरूक पालक त्यात दिसणा-या हिंसाचाराचं डोकं चक्रावून टाकणारं प्रमाण पाहाता त्याला आपल्या मुलांपासून दूरच ठेवतील. आता मोठ्यांना हा सुपरहीरोपट पाहायला आवडेल का ? तर सर्वांनाच आवडेल, याची खात्री नाही. ज्यांना आपले चित्रपट पोलिटीकली करेक्ट असणं गरजेचं वाटतं, ते तर या चित्रपटाच्या वा-यालाही उभे राहणार नाहीत, वर पारंपरिक चित्रपट मांडणीवर ठाम विश्वास असणारा प्रेक्षकही हा पाहून कपाळाला आठ्या घालेल.
`किक-अ‍ॅस` एकूणच सर्व प्रकारचे संकेत मोडण्यात पारंगत आहे. त्यात पडद्यावर येणारी बरीचशी मारहाण, त्यातले शाळकरी नायक- नायिका करतात, ज्यात एक चक्क अकरा वर्षांची गोड दिसणारी मुलगी आहे. यातला नायक आपला पुरूषार्थ दाखविण्याची संधी सोडून केवळ एका मुलीच्या सहवासासाठी `गे` असल्याचं नाटक करत राहतो, बाप आणि मुलीचं प्रेम हे शस्त्रास्त्रांच्या भाषेत व्यक्त होतं आणि माणसं मारायला मागे पुढे न पाहणारा खलनायक आपल्या मुलाबरोबर सिनेमाला जाताना उशिर न होण्याची काळजी घेतो. मग असा हा चमत्कारिक वळणाचा सिनेमा कोणाला आवडेल ? तर प्रामुख्याने कॉमिक्स -व्हिडीओगेम्स आणि हॉलीवूड यांच्या मिश्रणात चांगल्या मुरलेल्या, अन् कोणतीही गोष्ट पाहण्याआधी निषिध्द न मानणारा वीस ते चाळीस या वयोगटातला प्रेक्षक माझ्यामते किक-अ‍ॅसचा आदर्श प्रेक्षक आहे. गेल्या काही वर्षांत कॉमिक्स आपल्या आशयात, अन् व्हिडीओ गेम्स आपल्या दृश्य सादरीकरणात प्रौढांनाच अधिक टार्गेट करीत आलेले आहेत. त्यांच्यावर आधारित `व्ही फॉर व्हेन्डेटा`, `वॉन्टेड`, `वॉचमेन` किंवा `सायलेन्ट हिल`, `रेसि़डेन्ट इव्हिल` मालिका अशा चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवरलं यश, हे हा टारगेट वाचक-प्रेक्षक या आधारित चित्रपटांचाही हामखास प्रेक्षक बनल्याचं सिद्ध करतं.
किक-अ‍ॅस हा मार्क मिलरच्या याच नावाच्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे. पण अनेकदा जे पुस्तकात चालतं, ते पडद्यावर बदलावं लागतं. किक-अ‍ॅस .या प्रकारचे विवाद्य विषय टाळणारे कोणतेही बदल न करता एकूण एक कॉन्ट्रोव्हर्शिअल गोष्ट चित्रपटात जशीच्या तशी ठेवतो. तो जे बदल करतो ते तुलनेने कमी महत्त्वाचे आणि मूळ पुस्तकाचा परिणाम शक्य तितका तसाच ठेवणारे आहेत.
चित्रपटाचा मुख्य नायक आहे डेव्ह (आरोन जॉन्सन) . डेव्ह हा कॉमिक बुक फॅन आहे. त्याला प्रश्न पडतो की आजवर कोणी सुपरहीरो बनण्याचा प्रयत्न कसा केला नाही. सुपरहीरो बनण्यासाठी सुपर पॉवर लागतात हा त्याच्या मित्राने काढलेला मुद्दा डेव्हला फार महत्त्वाचा वाटत नाही. सर्वाधिक लोकप्रिय सुपर-व्यक्तिरेखांपैकी एक असणा-या बॅटमनला तरी कुठे पॉवर्स आहेत? हा त्याचा युक्तिवाद! डेव्हचा हेतू चांगला आहे. त्याला नाडलेल्यांना मदत करायची आहे. अन्यायाला विरोध करायचा आहे. जमल्यास एखादी चांगली मुलगीही पटवायची आहे. तशी एक त्याने बघूनही ठेवली आहे.
अखेर डेव्ह इंटरनेटवरून एक बरासा, सुपरहीरोचा वेश म्हणून चालण्याजोगा वेश विकत घेतो, अन् रस्त्यावर उतरतो. एकदा जबरदस्त मार खाऊन जवळजवळ मरायची वेळ आल्यावर दुस-या खेपेला मात्र त्याला हवी ती संधी मिळते. एका माणसाचा जीव वाचविण्यासाठी तीन चार गुंडांशी जमेल तशा लढणा-या डेव्हची मोबाईल चित्रफित इंटरनेटवर पोहोचते आणि किक-अ‍ॅस हा असली सुपरहीरो रातोरात लोकप्रिय होतो.
या लोकप्रियतेने त्याला काही अनपेक्षित मित्र मिळतात. तर काही शत्रू. बिग डॅडी (निकलस केज) आणि हिट गर्ल (क्लो मोरेत्झ) ही आधीपासूनच वेशांतर करून लढणारी बापमुलीची जोडी डेव्हला एका जीवावरच्या संकटातून वाचवते. मात्र या भानगडीत आपली माणसं मारली गेल्याने चिडलेला क्राईम बॉस फ्रॅन्क डिमिको, गैरसमजातून डेव्हच्या मागे लागतो. किक अ‍ॅसला हुडकून काढण्याचे प्रयत्न सुरू होतात अन् डेव्हचा मुखवटा फार काळ टिकणार नाही अशी चिन्ह दिसायला लागतात.
सुपरहीरोपट म्हणून किक अ‍ॅसचं वर्णन करणं योग्य नाही, कारण तो एकाचवेळी अनेक चित्रप्रकारांशी नातं सांगतो. त्याला मुळात कॉमे़डीचं अंग आहे, जे ब-याच प्रमाणात डेव्हच्या तिरकस निवेदनातून टिकवलं जातं. तो एकाच वेळी गोष्ट सांगतो, घडणा-या प्रसंगावर शेरेबाजी करतो आणि थेट प्रेक्षकाशी गप्पाही मारतो.
आपल्यातल्या उणीवांची खिल्ली उडवणं, आपण चित्रपटाचं निवेदन करतोय याची जाण ठेवून .योग्य ती टीका करणं, अन् स्वतःला महत्त्व न घेता वेळप्रसंगी दुय्यम भूमिका घेणं हे डेव्हचे निवेदक म्हणून विशेष आहेत. त्याला भोवतालच्या कॉमिक्स-गेम्स-हॉलीवूड युनिव्हर्सचंही उत्तम ज्ञान आहे. `विथ नो पॉवर, कम्स नो रिस्पॉन्सिबिलिटी` म्हणताना तो स्पायडरमॅनच्य़ा कॅचफ्रेजला (विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी) फिरवून वापरतो. जीवावरच्या संकटात असताना, केवळ आपण निवेदक असणं हाच त्या संकटातून सुटण्याचा पुरावा न मानण्याची सूचना प्रेक्षकाना करताना तो `अमेरिकन ब्युटी, सनसेट बुलेवार्ड, सिन सिटी`मधल्या मृत निवेदकांचे दाखले देतो. केवळ निवेदकाच्या सुरातूनच नव्हे, पण या प्रकारचं संदर्भाचं भांडार इथे प्रसंगाप्रसंगात आहे. सुपरहीरो या संकल्पनेची पहिल्याच प्रसंगात केलेली टिंगल, बिग डॅडीला जवळपस बॅटमॅनचा वेष देऊन वर बॅटमॅन टी.व्ही. मालिकेने प्रसिद्धी मिळालेल्या अ‍ॅडम वेस्टची केजने केलेली नक्कल, सुपरहीरोंचे वेश/लपवण्याच्या जागा/ सिक्रेट आयडेन्टिटी याबद्दल गप्पा, हिट गर्लच्या नाईट गॉगल्समधून दिसणा-या मारामारीच्या प्रसंगाला दिलेला `फर्स्ट पर्सन शूटर` परस्पेक्टीव अशा कितीतरी गोष्टी इथे सांगता येतील. अधेमधे पडद्यावर येणा-या `मीनव्हाईल` सारख्या कॅप्शन्स अन् छायाचित्रणात वापरलेले कॉमिक्ससारखे एक्स्ट्रिम परस्पेक्टीव देखील उल्लेखनीय.
किक-अ‍ॅसला सुपरहीरो संकल्पनेबद्दल आस्था आहे, पण आपला चित्रपट आजच्या काळातला आहे हे दिग्दर्शक मॅथ्यू वॉन विसरत नाही. त्यामुळे इंटरनेटचं विश्वव्यापी अस्तित्त्व आणि वैयक्तिक आवकाशाचा होणारा -हास हा कथानकातलाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे. डेव्ह सुपरहीरोचे कपडे घालून कामाला तर लागतो. पण जोवर त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर जात नाही, तोवर त्याला नायकाचं स्थान मिळत नाही. इथे पाठलाग प्रत्यक्ष होत नाहीत तर आय.पी अ‍ॅ़ड्रेसमार्फत होतात, निरोप देखील वेबसाईटकरवी पाठविले जातात आणि खलनायक मंडळींना नायकाचा पर्दा फाश करून सामान्य जनतेला धमकीवजा संदेश देण्यासाठीही इंटरनेटच निवडावं लागतं. किक-अ‍ॅस सुपरहीरो संकेतांप्रमाणे एखाद्या काल्पनिक विश्वात घडत नाही, तर तो आपल्याच जगात घडतो, अन् याची त्याला पुरेपूर जाणीव आहे.
किक-अ‍ॅसमधला व्हायलन्स हा कार्टून व्हायलन्स म्हणता येणार नाही, असा जरी प्रसिद्ध समीक्षक रॉजर एबर्ट यांचा दावा असला, तरी ते काही खरं नाही. व्हि़डीओ गेम्समधून एक्स्पोर्ट केलेला अन् टेरेन्टीनोच्या चित्रपटांशी नातं सांगणारा हिंसाचार यात आहे.
किक अ‍ॅसच्या विरोधात चिकार टीका झाली असली, तरी आर्थिक गणित सांगतं की तो चांगलाच यशस्वी झाला. प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या प्रेक्षकांना अस्वस्थ करण्याची तयारी असूनही अखेर त्याने आपला प्रेक्षकवर्ग मिळविलाच, अन आता त्याच्या पुढल्या भागाची तयारी सुरू आह,ग्राफिक नॉव्हेल आणि चित्रपट या दोन्ही रुपात. आपल्या सेन्सॉर बोर्डाला तो झेपेल असं दिसत नाही. पण आजच्या काळातल्या चाणाक्ष प्रेक्षकाला हवे ते चित्रपट मिळविण्याचा मार्ग मी सांगण्याची गरज आहे, असं वाटत नाही.

- गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP