‘बालगंधर्व’- तीन तासात ‘आयुष्याचा’ आग्रह!
>> Monday, May 30, 2011
‘बालगंधर्व’ चित्रपटाचा नायक सुबोध भावे पूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलतो आणि त्यातल्या त्रुटी तेवढय़ापुरत्या दिसेनाशा होतात. ‘बालगंधर्व’ जमला असो की फसला, तरीही ती आजची महत्त्वाची निर्मिती आहे, हे मान्य करावंच लागेल..
‘चरित्रपट’ किंवा ‘बायोपिक’ म्हणजे नक्की काय आणि अशा चित्रपटाकडून कोणत्या अपेक्षा ठेवणं योग्य ठरेल? खरंतर चरित्रपट म्हणजे काय, हे नावातच स्पष्ट असल्याने त्याची वेगळी व्याख्या करण्याची गरजच नाही. एखाद्या व्यक्तीचं चरित्र, त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना, त्याच्या व्यक्तिरेखेला पूर्ण उलगडून दाखवता येईल अशा पद्धतीने मांडणारा, ती व्यक्ती ज्या सामाजिक वा वैचारिक पार्श्वभूमीतून पुढे आली, तिच्यावर प्रकाश टाकणारा, तिच्या अमूक एका पद्धतीने वागण्यामागची (मग ते योग्य असो वा अयोग्य) कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट म्हणजे ‘चरित्रपट’. चरित्रपट हा बहुधा वास्तववादी असणं अपेक्षित असतं. अर्थात या नियमालाही जॉर्ज क्लूनीच्या ‘कन्फेशन्स ऑफ ए डेन्जरस माइन्ड’ (२००२) सारखे अपवाद आहेत, पण ते अपवाद म्हणजे नियम नव्हे. बहुतेक चरित्रांचा मोठा आवाका ध्यानात घेता, बायोपिक्सनी प्रत्यक्ष घटना कमी, पण एक विशिष्ट फोकस येईल अशा पद्धतीने मांडण्याची अपेक्षा असते. त्यासाठी चित्रपटातल्या मुख्य घटनांचा कालावधी एका मर्यादेत ठेवून पुढल्या वा मागल्या घटनांकडे निर्देष करता येतो अथवा चरित्रनायकाची जी बाजू आपण दाखवतो आहोत, तिचा उठाव येईल या प्रकारे घटनांची निवड करावी लागते. मात्र निवड ही आवश्यक. सारंच काही दोन ते तीन तासांच्या मर्यादित वेळात मांडणं शक्य होईल अशी अपेक्षा चित्रकर्त्यांनी धरणं हा केवळ फाजील आत्मविश्वास नव्हे, तर तो चित्रपटावर अन् चरित्रनायकावर केलेला अन्यायही होऊ शकतो. नितीन चंद्रकांत देसाई कृत बालगंधर्वांवरल्या चरित्रपटात काहीसं हेच झालंय.
प्रसिद्ध दिग्दर्शक ‘फ्रॅंक काप्रा’ यांच्या आत्मचरित्राचं नाव ‘नेम अबाव द टायटल’ असं आहे. यावरूनही चित्रपटाच्या टायटलवरल्या नावाचं महत्त्व आणि मान लक्षात यावा. हा मान बहुधा दिग्दर्शकाकडे जावा अशी अपेक्षा असते, कारण तोच चित्रपटाला सर्वार्थाने जबाबदार असतो किंवा असायला हवा.
‘कृत’ हा शब्द ‘ए फिल्म बाय’ला समांतर आहे. त्यामुळे निर्मात्याने वा कलादिग्दर्शकाने हा हुद्दा घेणं हा चित्रपटाच्या कर्त्यांबद्दल संभ्रम उत्पन्न करणारा आहे. या संभ्रमात भर पडते, ती चित्रपटाच्या सुरुवातीच्या श्रेयनामावलीने. देसाईंच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आणि त्यांचं ‘नेम अबाव द टायटल’ असलेल्या दोन स्लाइड्स झाल्या की पहिली श्रेयनामावली संपते. तिथे इतर कुठलंच नाव येत नाही. दिग्दर्शक रवी जाधव नाही, छायाचित्रकार महेश लिमये नाही, वा प्रमुख भूमिका सुबोध भावे नाही. ही तीनही नावं महत्त्वाची आणि उद्योगात काही एक कर्तृत्व दाखवलेली आहेत. ती सुरुवातीला न दाखवणं हे केवळ असमर्थनीयच नाही, तर एक चुकीचा पायंडा पाडणारं ठरू शकेल. असो.
टिळकांनी छोटय़ा नारायण राजहंसला गाताना ऐकून दिलेल्या ‘बालगंधर्व’ या नावापासून चित्रपट सुरू होतो. पुढल्या एक-दोन प्रसंगात, नारायणाची किलरेस्कर नाटक कंपनीत कशी पाठवणी झाली हे स्पष्ट करतो, आणि तरुण वयातल्या, किर्लोस्कर कंपनीला नाव मिळवून देणाऱ्या बालगंधर्वापर्यंत (सुबोध भावे) येतो. माझा स्वत:चा बालगंधर्वाच्या चरित्राचा अभ्यास नाही. मात्र चित्रकर्त्यांचा तो असावा हे गृहीत आहे. त्या दृष्टीने पाहता गंधर्वाच्या चरित्रातले प्रमुख टप्पे असे- किर्लोस्कर कंपनीत मिळालेले नाव. आईच्या आग्रहावरून झालेलं लग्न, मात्र पत्नीचं कायम उपरं राहाणं. किर्लोस्कर कंपनीतल्या मतभेदावरून आपल्या सहकाऱ्यांसोबत बाहेर पडून स्थापन केलेली गंधर्व कंपनी. नाटकं उत्तम चालत असूनही खर्चिक स्वभाव, दुराग्रह आणि सहकाऱ्यांवरला खास करून पंडित (अविनाश नारकर) या मित्रावरला अंधविश्वास यातून कायमच आर्थिक संकटात राहणं. कंपनीला आलेले वाईट दिवस. गोहरबाईंबरोबरचे दिवस आणि सूचित होणारी, वाईट परिस्थितीतली अखेर.
नाटय़पूर्णतेच्या दृष्टीने पाहता चरित्रातलं सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे दैवी देणगी असूनही स्वभाव आणि चुकीच्या निर्णयामुळे बालगंधर्वाच्या परिस्थितीत होत जाणारा बदल तर तपशिलाच्या दृष्टीने अर्थातच नाटय़संगीताची अन् संगीत नाटकाची वैभवशाली परंपरा, प्रत्यक्ष गंधर्वाचं व्यक्तिमत्त्व, त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका, इत्यादी. बालगंधर्व चित्रपटाच्या पटकथेत हा त्यांच्या आयुष्याचा मूळ आलेख, प्रमुख सूत्र आणि तपशील हे सारं प्रभावीपणे यायला हवं, ही अपेक्षा होती. मात्र एखादी गोष्ट पुरेशा प्रभावीपणे मांडायची, तर त्याला विशिष्ट प्रमाणात वेळ देण्याची आवश्यकता असते. ‘बालगंधर्व’ हा वेळाच्या बाबतीत फार घाई करतो, असं वाटतं. यामागचं एक कारण म्हणजे आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करणाऱ्या घटना किंवा त्यांच्या आयुष्यावर खास परिणाम करणाऱ्या व्यक्ती यांचा वेगळा निश्चित विचार न करता माहिती असलेल्या एकूण एक गोष्टी चित्रपटात आणण्याचा तो प्रयत्न करतो. सर्वाचा विचार लोकशाही तत्त्वाने झाल्यावर कशालाच अधिक महत्त्व मिळत नाही. यादीतली अनेक नाटकं ही नावाची पाटी, सेटचा तुकडा, पदाची/ संवादाची एखादी ओळ, अशी झरझर पुढे सरकतात. व्यक्तींचंही तेच होतं. नारायणरावांचे कंपनीतले सहकारी, आई, पत्नी, आश्रयदाते, बाबूराव पेन्टर, व्ही. शांताराम यांसारखे समकालीन चित्रकर्ते, केशवराव भोसलेंसारखे कलावंत या आणि अशा इतर अनेक लोकांच्या गर्दीत स्वत: बालगंधर्वाचा अपवाद वगळता इतर कोणतीच व्यक्तिरेखा पुरेशा वजनाने उभी राहू शकत नाही. साऱ्यांच्या वाटय़ाला एखाददुसरा प्रसंग येतो, पण परिणामासाठी ते पुरेसं नाही.
गंधर्वाची पत्नी (विभावरी देशपांडे) तर याचा मोठाच बळी ठरते. गंधर्वाच्या चरित्रात इतर सर्व पात्र बालगंधर्वाकडे बाहेरून एक पब्लिक फिगर म्हणून पाहतात, केवळ त्यांची पत्नी अन् काही प्रमाणात गोहरबाई यांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. हा दृष्टिकोन कदाचित बालगंधर्वाना एक व्यक्ती म्हणून अधिक चांगल्या रीतीने समजून घ्यायला उपयोगी पडला असता, पण एकाच खोलीत थोडक्या वेळात येणारे मोजके प्रसंग हे पत्नीच्या पात्राला न्याय देत नाहीत, अन् गोहरबाईंचा विषय हा मुळातच थोडा वादग्रस्त असल्याने चित्रपट त्याला ढोबळ, नाटय़पूर्ण लकब देण्यापलीकडे जात नाही.
पटकथा अन् दिग्दर्शनाची ही एकूण स्ट्रॅटेजीच आहे. वादग्रस्तता टाळण्यासाठी तो मुळात स्त्रीपार्र्टी नटांची सेक्शुअल आयडेन्टिटी, तिचे सामाजिक पडसाद, बालगंधर्वाचा आपल्या भूमिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा सखोल विचार आणि तर्कशुद्ध युक्तिवाद अपेक्षित असलेल्या गोष्टी टाळतो आणि गंधर्वांच्या आयुष्याच्या परिचित, सोप्या बाजूवरच लक्ष केंद्रित करतो. या बाजू मात्र तो चांगल्या रीतीने मांडतो.
‘बालगंधर्व’ तो काळ उभा करतो, असं मी म्हणणार नाही. कारण काळ ही फार मोठी गोष्ट झाली. त्यासाठी एक मोठी सामाजिक पाश्र्वभूमी सूचित व्हायला हवी. सामाजिक/राजकीय घडामोडी, विचार या सगळ्याला स्थान हवं, जे इथे नाही. मात्र गंधर्वांसंबंधांतली अन् त्यांच्यावर पूर्णपणे केंद्रित होणारी दृक्श्राव्य चौकट मात्र तो चपखलपणे उभा करतो. देसाईंसारखा कला दिग्दर्शक आणि महेश लिमयेसारखा अनुभवी छायाचित्रकार दृश्य बाजूची काळजी घेतात, तर संगीतकार कौशल इनामदार आणि पाश्र्वगायक आनंद भाटे श्रवणाची बाजू सांभाळतात. मात्र त्यापलीकडे जाऊन बालगंधर्व प्रत्यक्ष उभा राहतो, तो सुबोध भावेंच्या अभिनयातून.
पटकथेतून निसटता वाटणारा अन् दिग्दर्शकाच्या कामातून ढोबळपणेच येणारा चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या श्रद्धांचा, समजांचा, विचारांचा, निराशेचा अन् मराठी नाटय़सृष्टीत अजरामर ठरणाऱ्या त्याच्या कर्तृत्वाचा पूर्ण समतोल हा सुबोध भावेंच्या पडद्यावरल्या वावरात आलेला आहे. सामान्य प्रेक्षकांसाठी चित्रपटात अभिनेता प्रथम येतो आणि दिग्दर्शनापासून इतर सर्व अंग ही दुय्यम, केवळ सबकॉन्शस पातळीवर नोंदवली जाणारी असतात. त्यामुळेच अभिनेता समर्थ नसेल, तर चित्रपट मुळातच धोक्यात येऊ शकतो. ‘बालगंधर्व’ला ही भीती नाही. इथला नायक पूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलतो आणि त्यातल्या त्रुटी तेवढय़ापुरत्या दिसेनाशा होतात. ‘बालगंधर्व’ जमला असो की फसला, तरीही ती आजची महत्त्वाची निर्मिती आहे, हे मान्य करावंच लागेल. एक म्हणजे मराठी सिनेमात पुन्हा एकदा होऊ पाहणाऱ्या अनिश्चित वातावरणात तो एका कठीण विषयावरची अवघड निर्मिती उत्साहाने करून दाखवतो. चांगल्या अर्थाने स्पर्धात्मक वातावरण तयार करतो. त्यापलीकडे जाऊन तो आपल्याकडच्या एका मोठय़ा अभिनेत्याच्या कामाची नोंद घेतो. याच चित्रपटात शांतारामबापूंनी म्हटल्याप्रमाणे ‘पडदा पडला की नाटक संपतं, पण चित्रपट अजरामर असतो.’ बालगंधर्वाच्या कामाला प्रत्यक्ष न पाहिलेल्या लोकांसाठी या चित्रपटाने घेतलेली ही नोंद आज खरोखरच महत्त्वाची, त्याच्या कामाला अजरामर ठरवणारी!
- गणेश मतकरी , रविवार लोकसत्तातून Read more...