वेटींग- न घडण्यातलं नाट्य
>> Saturday, May 28, 2016
चित्रपटातला कथाभाग, त्यात सतत काहितरी घडवत ठेवणं हे किती ओव्हररेटेड आहे याची जाणीव आपल्याला वेटिंग पहाताना होते. आपण सुरुवात-मध्य-शेवटाच्या अॅरिस्टोटेलियन स्ट्रक्चरबद्दल एेकलेलं असतं, त्याच्या भारतीय व्हेरीएशनबद्दलही, शिवाय प्लाॅट पाॅइन्ट्सबद्दल, सिड फील्डच्या सांगण्यानुसार मिन्टाला एक पान या हिशेबाच्या पटकथेच्या गणितात मोठे बदल कुठे आले पाहिजेत याबद्द्ल, आणि उत्तम संहितेच्या इतर गुणधर्मांबद्दलही. 'वेटींग' ते सारे फोल ठरवतो.
पुढे काय घडणार याचं कुतुहल प्रेक्षकाला कथेत अडकवून ठेवतं, हा एक परिचित सिद्धांत, पण ज्याची कल्पना इतकी साधी आणि ट्रेलर पाहूनही स्पष्ट होणारी आहे, त्यात घडणार तरी काय आणि त्याबद्दल वेगळं कुतूहल तरी कसलं ? दोन पात्र, एक तरुण आणि एक वृद्ध, आपापल्या प्रिय व्यक्तीच्या अनिश्चित भविष्याची वाट पहात एकमेकांमधे आधार शोधतात. आता या कल्पनेवर आधारित चित्रपटाचा शेवट काय असणार, वा काय प्रकारचा असणार याचा अंदाज आपण आधीच बांधू शकतो ( चित्रपट तो काही प्रमाणात, निदान टोनमधे चुकवतो ही गोष्ट वेगळी) , पण त्यामुळे चित्रपटाची जबाबदारी अधिक वाढते.
केवळ वाट पहाणं या कल्पनेशी संपूर्ण प्रामाणिक असलेला वेटींग उघड घटनांमधून येणाऱ्या नाट्यपूर्णतेच्या शक्यता डेलिबरेटली टाळतो. इथे घडायचं , ते चित्रपट सुरु होण्याआधी घडून गेलय. ते कसं घडलं हे निवेदनात येतं, दाखवलं जात नाही. रिटायर्ड प्रोफेसर शिव नटराज ( नासीरुद्दीन शाह) ची पत्नी सिव्हीअर हार्ट अटॅकनंतर आठ महिन्यांपासूनच कोमा मधे आहे, कोची मधल्या एका इस्पितळात. त्याच्यासाठी हाॅस्पिटल हे दुसरं घरच झालेलं. वरवर अतिशय शांत, रॅशनल अशी ही व्यक्ती. त्याचं रुटीन ठरुन गेलय. कर्मचाऱ्यांना तो नावाने ओळखतो. तेही त्याला आदराने वागवतात. तिची केस पहाणाऱ्या डाॅक्टर निरुपमना ( रजत कपूर) मात्र तो टाळतो. कारण त्याची व्हेन्टीलेटरवर असलेली पत्नी ( सुहासिनी मणीरत्नम) रिकव्हर होण्याची त्याला स्वत:ला कितीही आशा असली तरी तसं होणार नाही हे शिव मनातून जाणतो. डाॅक्टरांना तशी खात्रीच आहे, त्यामुळे ते त्याचे शत्रू.
तारा देशपांडेला ( कलकी ) तिच्या नवऱ्याचा , रजतचा ( अर्जुन माथूर) अपघात झाल्याचं कळताच ती ताबडतोब मुंबईहून निघून कोचीला पोचते पण त्याची अवस्थाही बिकट असते. ताराला जवळचं कोणी नसतं, आणि वाट पहाण्यावाचून करण्यासारखं काही नसतं. तिच्या आणि शिवच्या वयात फरक असला, तरी त्यांचं समदु:खी असणं त्यांना एका पातळीवर आणतं. त्यांची मैत्री होते आणि एकदुसऱ्याला आधार देत त्यांची नवी वाटचाल सुरु होते.
वेटींग हा पटकथा ( अनु मेनन/ जेम्स रुझिका) आणि दिग्दर्शन ( अनु मेनन) या दोन्ही पातळ्यांवर करायला कठीण सिनेमा आहे. दोन प्रमुख पात्रांची मैत्री प्लेटोनिक असल्याने रोमान्सचा सोपा मार्ग निवडणं शक्य नाही. विषयाचं गांभीर्य खाली न आणता, कुठेही डिप्रेसिंग होणार नाही पण खोटी सकारात्मकताही येणार नाही हे पहाण्याचा चित्रपटाचा प्रयत्न आहे. शिव नटराजचंही कोचीत राहूनही शहराला परकं असणं , आणि ताराने घरच्यांशी संबंध तोडलेला असणं आपल्याला काही मोजक्या जागांमधून सुचवलं जातं आणि ते या दोन व्यक्तिरेखांना एका पातळीवर आणण्यात उपयोगी ठरतं. शिवच्या बोलण्यात सुरुवातीला आलेला ' फाईव स्टेजेस आॅफ ग्रीफ' चा उल्लेखही आवश्यक. कारण तो प्रेक्षकाला या पात्रांपर्यंत, त्यांच्या मनस्थितीपर्यंत पोचण्यासाठी मदत करतो.
वेटींगने निवडलेला टोन हा प्लेझन्ट आणि गंभीर यांच्या मधला आहे, आणि कधी तो किंचित एका बाजूला झुकतो, तर कधी दुसऱ्या. मध्यंतरापर्यंतचा भाग हा अधिक उजळ आहे, तर नंतरचा भाग अधिक गडद. पण तो उथळ, किंवा सोपी उत्तरं शोधणारा मात्र कुठेही नाही. संवादात विनोदाचा लक्षणीय वापर आहे, पण तो काळजीपूर्वक केलेला. कधी कधी तो पात्रांच्या असहाय्यतेतून आलेलाही आहे. ( उदा - पहिले ४८ तास क्रूशल असण्याबद्दलच्या वाक्यावरली टिका ) या वाक्यांना प्रेक्षक हसतो पण त्या हसण्याला गांभीर्याची किनार असते . तो पात्रांवर हसत नाही, परिस्थितीतून आलेल्या विसंगतीला हसतो. तो सतत विनोदाच्या वळणानेही जात नाही. वेळ आली की गंभीरही होतो.
चित्रपटाचा मोठा भर शिव आणि तारावर आहे हे खरं असलं तरी इतर लहान भूमिकातल्या पात्रांना तो लक्षवेधी पद्धतीने पण तरीही भूमिकांची लांबी नं वाढवता वापरतो. दोन व्यक्तीरेखांचे जोडीदार तर त्यात येतातच, वर रजतच्या आॅफिसमधला ताराला वेळोवेळी मदत करणारा सहकारी ( राजीव रविंद्रनाथन) , शिवला घरी जेवणाचा डबा पोचवणारी मुलगी , हाॅस्पिटलमधले काहीजण, हे सारे लक्षात रहातात.
डाॅक्टर निरुपमची व्यक्तिरेखा अधिक गुंतागुंतीची आहे, कारण तिला दुहेरी महत्व आहे. एका बाजूने ती या दोन व्यक्तिरेखांबरोबर कथा पुढे नेते ( दोघांना विरुद्ध प्रकारचे सल्ले देऊन) आणि दुसरं म्हणजे ती अशा प्रसंगांमधली डाॅक्टरची आदर्श भूमिका कशी असावी यावर कमेन्ट करते. निरुपमशी ही सारी लोकं वाद घालतात, टिका करतात, त्याला शिव्या देतात, पण तो काय करतो आणि त्याने काय करणं अपेक्षित आहे, हे चित्रपट वास्तवाचं भान ठेवत , काळजीपूर्वक आपल्यासमोर मांडतो. यातली सारी पात्र एका पटण्यासारख्या तर्कशास्त्राच्या आधाराने वागतात. त्यामुळे चित्रपट अधिक जवळचा वाटतो, जिवंत होतो. प्रेक्षक यातल्या व्यक्तिरेखांच्या सुखदु:खाशी, खरंतर दु:ख आणि आशा यांमधल्या भावनांशी समरस होतो. नासीर आणि कलकी यांच्या कामावर चित्रपटाचा मोठा भर आहे, त्यामुळे त्यांची कामं उत्तम हे वेगळं सांगायला नकोच. कलकीचा आपले टिपिकल नायिकांच्या शोधातले चित्रपट अजिबात योग्य वापर करुन घेत नाहीत, याबद्दल हे काम पहाताना वाईट वाटतं हे आणखी एक.
वेटींगचा शेवट हा खास उल्लेखनीय आहे. मी आधी म्हणाल्याप्रमाणेच आपण त्याचा अंदाज बांधू शकतो असं आपल्याला सुरुवातीपासून वाटतं. बहुधा एक पेशन्ट जगेल, दुसरा नाही हा आॅब्विअस अंदाज, पण चित्रपट त्यापलीकडे जातो. त्याविषयी तपशीलात सांगणं हे चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य होणार नाही, पण एवढं म्हणता येईल की तो कथानकाच्या एकूण स्पिरिटशी प्रामाणिक रहातो आणि अचूक, योग्य क्षणावर चित्रपट संपवतो. पहाणाऱ्यांनी त्याचा अधिक विचार करुन पाहिला, तर तो किती नाजूक गोष्टींवर तोलला आहे हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल. आशा आहे, की मध्यंतरी आलेल्या एका चित्रपटाप्रमाणे, याचा शेवट पटकन उघड केला जाणार नाही. वेटींग पहाताना टाॅक टू हर पासून आमोर पर्यंत विविध चित्रपटांची आठवण होत रहाते हे खरं. पण तो असा एखादी टेम्प्लेट घेऊन येत नाही. तो पूर्णत: स्वतंत्र आहे की नाही हा मुद्दा नाही, आपल्यापर्यंत तो पोचतो की नाही , इतकच लक्षात घ्यायचं.
चित्रपट पहाण्याच्या थोडा वेळ आधी मी थिएटरबाहेर एका मुलाला पाहिलं. त्याच्या टीशर्टवर दोन शब्द लिहिले होते. वर ' होप' असं लिहून त्यावर काट मारली होती आणि त्याखाली ' बिलीव्ह ' असं लिहीलं होतं. वेटींग पाहून परतताना मला त्या टी शर्टची आठवण वारंवार होत राहिली. आशावाद, हा या चित्रपटाच्या मुळाशी आहेच पण एक पाऊल पुढे जाऊन तो आपल्याला श्रद्धा ठेवायला सांगतो. मात्र ती ठेवताना आपण वास्तव विसरुन किंवा धीर सोडून चालत नाही, याचीही तो नोंद घेतो. मृत्यू जवळ असला तरी आपण जगणं विसरुन चालत नाही, हा त्याचा खरा संदेश आहे.
-- गणेश मतकरी Read more...