मानापमान- काही मुद्दे

>> Monday, January 20, 2025




-------------------------------------------------------------
संगीत मानापमान पहायचा, तर का? नव्या पिढीसाठी आपल्या एका अभिजात नाट्यकृतीचा ( थेट नसला तरी ) परिचय, या गोष्टीला काही एक महत्व आहे. पाश्चात्य चित्रपटात वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे रिमेक, रुपांतरं होत रहातात आणि त्यातून साहित्य, रंगभूमी, चित्रपट हे पुन्हा एकदा नव्या पिढीच्या प्रेक्षकांपर्यंत पोचतात. हा हेतू व्हॅलिड आहे.
-------------------------------------------------------------------
गणेश मतकरी २०२५च्या सुरुवातीला आलेले दोन्ही मोठे मराठी चित्रपट हे जुन्या लोकप्रिय नाटकांवर आधारलेले असावेत ही गोष्ट मराठी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी काही फारशी उत्साहाची नाही. आता माध्यमांतरं असू नयेत असं बिल्कूल नाही, आणि कथा कादंबरी यांच्याप्रमाणेच नाटकांचीही चांगली माध्यमांतरं होऊ शकतात, झाली आहेत. प्रश्न तयार होतो जेव्हा ही दोन्ही नाटकं आपल्या चित्रपटीय आविष्कारातही आपल्या मूळ रुपाला विसरु शकत नाहीत तेव्हा. माझ्या मते परेश मोकाशीचा ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ (मूळ नाटक- परेश मोकाशी) आणि सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ (मूळ नाटक -कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, जरी चित्रपट त्यावर आधारित नसून प्रेरित आहे ) या दोन्ही चित्रपटांचं असं झालेलं आहे. एक गोष्ट आहे, की व्यक्तीश: मला हे सिनेमा पहाताना कंटाळा वगैरे आला नाही. मूळ कल्पनेची गंमत, काही प्रमाणात परफॉर्मन्स, काही पेलली गेलेली आव्हानं, अशा गोष्टी दोन्ही चित्रपटात होत्या. पण दोन्हीमधे नसलेली एक गोष्ट म्हणजे मूळ कल्पनेचा अवाका ओळखून माध्यमांतराने वरचा पल्ला गाठणं. चित्रपटात गृहीत असलेला वास्तवाचा आभास तसंच माध्यमबदलाने उपलब्ध करुन दिलेल्या कथा/पटकथाशक्यता लक्षात घेत दोन्ही कृतींना अपडेट करण्याची गरज वाटते, तसं झालेलं नाही. बोंबिलवाडीमधे प्रशांत दामलेला हिटलर म्हणून ज्या सहजपणे सादर केलंय त्याची गंमत मला वाटली, किंवा परफॉर्मन्सेस चित्रपटाच्या फार्सिकल वृत्तीशी सुसंगत राहीले हेदेखील जमलेलं, पण महायुद्धाशी, त्या काळाशी जोडलेल्या स्केलचं काय? हा काळ उभा रहाण्याचं काय? चित्रपटातही सारंच मोजून तीनचार स्थळांवर मोजक्या पात्रांमधे होणार असेल, तर मग तो नाटकापेक्षा वर कसा जाणार? हाच नाटकाच्या चौकटीत अडकून रहण्याचा प्रश्न मानापमानमधेही आहे. संग्रामपूर आणि शेजारचं नगर यांमधल्या वितुष्टाच्या पार्श्वभूमीवर ‘संगीत मानापमान’ चित्रपट घडतो. शेजारच्या नगराचा प्रमुख धीरेन (उपेंद्र लिमये ) आणि संग्रामपूरचा सेनापती (शैलेश दातार) यांच्यातल्या व्यूहरचना हा पटकथेचा एक भाग आहे. तर दुसरा भाग आहे, तो सेनापतीची कन्या भामिनी (वैदेही परशुरामी), तिचा बालपणीचा मित्र असलेला सध्याचा उपसेनापती चंद्रविलास (सुमीत राघवन) आणि नावाला जागणारा एक शूर गावकरी धैर्यधर ( सुबोध भावे ) यांच्या प्रेमत्रिकोणावर केंद्रीत झालेला. शीर्षकातल्या ‘मानापमान’ या शब्दाच्या अनेक अर्थछटा चित्रपटातल्या पात्रांमधे तयार होणाऱ्या वेगवेगळ्या नात्यांशी जोडलेल्या दिसतात. संग्रामपूर आणि शेजारचं नगर (की राज्य?) , तिथले गावकरी, तिथली नगररचना, दोन नगरांमधला भौगोलिक सांधा, सैन्याची, युद्धाची भव्यता, या साऱ्या गोष्टी मानापमान पडद्यावर आणताना दिसायला हव्या होत्या. इथे भव्यता दिसते तीदेखील वरवरची. वेषभूषा, काही प्रमाणात नेपथ्य, इतपत. संकल्पनांमधली भव्यता दृश्यात उतरलेली नाही. याला नेपथ्याच्या मर्यादेबरोबर व्हिज्युअल इफेक्ट्स कमी पडणंदेखील जबाबदार मानता येईल. त्याखेरीज अनेक बारकावे प्रेक्षकांनी समजून घेण्यावर सोडलेले आहेत. उदाहरणार्थ धैर्यधर जेव्हा सीमेवरल्या चौकीचं काम करतो, तेव्हा त्याची योजना नक्की काय आहे, चौक्यांचे आराखडे कसे महत्वाचे आहेत, सीमेवर हल्ला कसा होऊ शकतो, त्यासाठी सैन्यबळ काय लागेल, चौकीजवळ किती सैन्य तैनात आहे, अशा गोष्टींकडे आपण नाटकातल्या प्रवेशादरम्यान प्रोसिनीअम विंडोतून पहाताना दुर्लक्ष करु शकतो. पण सिनेमात आपण प्रत्यक्ष त्या स्थळी जाणं अपेक्षित असतं, आणि हा तपशील पडद्यावर प्रत्यक्ष दिसावा लागतो. तिथे लुटुपुटीच्या गोष्टी परिणामकारक ठरु शकत नाहीत. सुबोध भावेच्या ‘कट्यार काळजात घुसली’ मधे रुपांतर अधिक जमलं होतं कारण ते कथानक प्रामुख्याने इनडोअर कथानक होतं. राजवाडा, घरं, अशा जागांना तिथे महत्व होतं, आणि दिग्दर्शनात त्या जागांचा चांगला वापर करण्यात आला होता. मानापमानची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. ती पडद्यावर अस्सल उभी करायची, तर अधिक विचार, आणि मोठा खर्च, या गोष्टी आवश्यक. मराठी सिनेमाकडे बजेट कमी असतं हे आपल्याला माहीत आहे. पण चित्रपटात तसा डिस्क्लेमर देता येत नाही. सीमेवरचा हल्ला हा सीमेवरचा हल्लाच वाटायला हवा. अन्यथा नाटक आणि चित्रपट यात फरक तो काय राहिला ? या चित्रपटात नाटकातल्या वाटणाऱ्या अनेक जागा दिसतात. उदाहरणार्थ चित्रपटाच्या सुरुवातीला धैर्यधर नगरात काही संशयास्पद हालचाली पाहिल्याचं चंद्रविलासच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करतो. पुढे यातून झालेला घातपातही आपल्याला दिसतो. त्यामुळे धैर्यधरने नक्की काय पाहिलं या घटनेला अधिक महत्व येतं. पण चित्रपटात ती घटना प्रामुख्याने केवळ संवादात आलेली दिसते. पुढे एकदा चौक्यांच्या कामाची पहाणी करायला आलेला चंद्रविलास आणि वेषांतर करुन तिथे वनमालेच्या रुपात राहिलेली भामिनी या दोघांच्या एक प्रसंग आहे. हा प्रसंग उघड्यावर घडतो. प्रत्यक्षात कामानिमित्त आलेला राज्याचा उपसेनापती, आणि तिथे काम करणारी एक सर्वसामान्य बाई यांना उघड्यावर सहज बोलता येईल का? नाटकात हे सहज होऊ शकतं, पण सिनेमात ते घ्यायचं, तर चंद्रविलासने ते कसं जमवलं याबद्दलचं काहीएक स्पष्टीकरण असायला हवं. आता अशी शक्यता आहे की मुळात पटकथेत हे सारं होतं, पण लांबीमुळे चित्रपटात ठेवता आलं नाही. पण जेव्हा अशी नाटकसदृश मांडणी पुन्हा पुन्हा दिसते, तेव्हा प्रेक्षकाला 'सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ’ टिकवणं अवघड होतं. काहीजणांनी चित्रपटाबद्दल लिहिताना असा उल्लेख केलाय की धैर्यधर कधी ग्रामीण बाजाचं बोलतो, तर कधी प्रमाण भाषेत. शिवाय पदं/ गाणी सुरु झाली, तर तो अलंकारीक प्रतिमांचा वापरही करायला मागेपुढे पहात नाही. हा एक भाग आहे. पण मला त्याहूनही वेगळा एक प्रॉब्लेम जाणवला, तो म्हणजे अभिनयाच्या शैलीतला फरक. धैर्यधर आणि भामिनी बरेचसे आधुनिक पद्धतीचं काम करतात, तर चंद्रविलास आणि धीरेन क्लासिकल पद्धतीचं. नाटकीय वळणाचं. मुळातच खलनायकी भूमिकेत असलेल्या सुमीत राघवन आणि उपेंद्र लिमये यांचं काम शैलीतल्या तफावतीने अधिकच भडक वाटतं, तर वैदेही परशुरामी आणि सुबोध भावे यांचं संयत. यात चूक बरोबर काही नाही, मात्र जे काय करायचं ते एका पद्धतीने केलं असतं, तर ही विसंगती जाणवली नसती. चित्रपटात गाणी थोडी कमी असायला हरकत नव्हती. प्रासंगिक, संवादाची जागा घेणारी गाणी अधिकतर पाश्चात्य म्युझिकल्समधे असतात. इथे तशीही आहेत ज्यातली काही जमली आहेत तर काही नाही. पहिलं धैर्यधर आणि आई यांच्यातल्या संवादाचं गीत मला फार परिणामकारक वाटलं नाही. तिथे सर्वात खटकला तो नीनाताईंच्या व्यक्तीमत्वाशी विसंगत आवाज, पण इतर बाबतीतही या गाण्याचीच फार गरज वाटली नाही. याउलट चंद्रविलासच्या तोंडी येणारं ‘सांगू कसा मी तुला’ हे गाणं त्यातल्या रंगभूमीची वेगळ्या रीतीने आठवण करुन देणाऱ्या गिमिकसाठी, आणि एकूण सादरीकरणासाठी आवडलं. संगीताबाबत कट्यार अधिक उजवा होता. शिवाय तो प्रामुख्याने गायकीविषयीच असल्याने त्यावर बरंच काम झालं होतं. इथे गाण्यांची संख्या वाढली तरी परिणाम वरखाली झाल्याने त्यात सातत्य रहात नाही. मग असं सगळं असताना संगीत मानापमान पहायचा, तर का? मी म्हणेन की नव्या पिढीसाठी आपल्या एका अभिजात नाट्यकृतीचा ( थेट नसला तरी ) परिचय, या गोष्टीला काही एक महत्व आहे. पाश्चात्य चित्रपटात वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे रिमेक, रुपांतरं होत रहातात आणि त्यातून साहित्य, रंगभूमी, चित्रपट हे पुन्हा एकदा नव्या पिढीच्या प्रेक्षकांपर्यंत पोचतात. हा हेतू व्हॅलिड आहे. त्यामुळे रुपांतर रॅडीकली वेगळं वा अद्ययावत नसलं, तरी हा दृष्टीकोन ते पहाण्यामागचं एक कारण असू शकतो. दुसरी गोष्ट आहे ते कथानक, जे खूप वेगळं नसलं, तरी रंजक आहे. त्यातली वळणं आणि मानापमान या संकल्पनेचे विविध पैलू या गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. कलाकार चांगले आहेत. साऱ्यांची अभिनयाची पट्टी एक असती तर अधिक प्रभाव अधिक पडला असता हे मात्र खरं. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲक्शन वगळता खूप अपेक्षा न ठेवता गेलात, तर चित्रपट आवडू शकतो. बोंबिलवाडी आणि मानापमानच्या एन्ट्रीने २०२५ची दणक्यात सुरुवात होईल असं मला वाटलं होतं, तसं मात्र झालेलं नाही. त्यांचं काम आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद, या दोन्ही बाबतीत अपेक्षेइतकं यश या दोघांनाही मिळालेलं दिसलं नाही. सध्याच्या दाक्षिणात्य आक्रमणाने हिंदी सिनेमाही हवालदील झाला असताना ही बाब अधिकच चिंता वाटायला लावणारी आहे. मराठी चित्रपटाला आपलं आव्हान टिकवायचं असेल, तर पुढल्या दोनतीन महिन्यांत हा परफॉर्मन्स सुधारायला हवा. अन्यथा सुरु झालेली घसरण थांबवणं कठीण होईल.

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP