अभिजात कुरोसावा

>> Monday, February 4, 2008


कुरोसावा हा त्याच्या स‌मकालीन जपानी समीक्षकांना अन स‌मव्यावसायिकांनाही काही प्रमाणात उपरा वाटत असे. कारण त्याने आपल्या कामाला केवळ आपल्या प्रांताशी निगडीत ठेवलं नाही. पश्चिमेचा धार्जिणा असल्याची टीका त्याच्यावर होत गेली. त्याचे जगभरात पोहोचणे हे कदाचित त्याच्यावरल्या भिन्न सांस्कृतिक प्रभावांशी निगडीत असेल. कारण त्यामुळे त्याचा सिनेमा हा दृश्यात्मकता आणि आशय, या दोन्ही बाजूंमधून केवळ प्रादेशिक राहिला नाही.
त्याने आपल्यावरले प्रभाव हे दडवून ठेवले नाहीत. तर त्यांचा आपल्या चित्रपटांमधून मोकळेपणाने वापर केला. राशोमान आणि सेव्हन सामुराई यांचे नाव आपण कुरोसावाचे स‌र्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घेतो, ते उगाच नाही. एकाच घटनेला चार दृष्टिकोनातून मांडणारा राशोमान हा स‌त्य या संकल्पनेचा विचार नव्याने करायला लावतो आणि अखेर माणुसकीलाच स‌त्यापेक्षा किंवा प्रामाणिकपणापेक्षा वरचे स्थान बहाल करतो. त्याचा आशय हा कधीच जुना न होणारा जरुर आहे. मात्र इथे तो सांगण्यासाठी केलेला निवेदनात्मक प्रयोग हा इतका महत्त्वपूर्ण ठरला की पुढे हा प्रयोग थोडाफार बदलून अनेक वार वापरला गेला. वापरला जातो आहे. किस्लोवस्कीपासून टेरेन्टीनोपर्यंत अनेकांच्या कामावर राशोमानची छाया पसरलेली दिस‌ते आणि कोणताही दिग्दर्शक ती अमान्य करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत नाही.
राशोमान जसा त्यातल्या रचनेचा प्रभाव जागतिक चित्रपटसृष्टीवर टाकून आहे, तसाच सेव्हन सामुराई हा त्याच्या कथानकाचा आणि मांडणीचा.सामुराई इतकी थेट रुपांतरे इतर कोणत्याच चित्रपटांची झालेली असणे संभवत नाही. कुरोसावावर असलेला जॉन फोर्डसारख्या उत्तम वेस्टर्न चित्रपट बनविणाऱया दिग्दर्शकाचा प्रभाव हा सामुराईच्या मुळाशी जरूर आहे. किंबहूना त्यामुळेच त्याचा मँग्नेफिशन्ट सेव्हन नावाने स‌हज वेस्टर्न पट होऊ शकला. मात्र अमुक एका चित्रपटाची कुरोसावाने येथे नक्कल केली नाही. त्याच्यावरचा प्रभाव वेस्टर्नवरच्या प्रेमातून,या चित्रप्रकाराला आत्मसात करण्यामधून आलेला आहे. चिकटवलेला नाही.
सामुराई ज्याप्रकारे कुरोसावावरला एक पाश्चिमात्य प्रभाव दाखवतो. तसाच दुसरा प्रभाव आहे नाटककारांचा. मँक्झिम गाँर्कीच्या नाटकावर आधारित लोअर डेप्थ आणि शेक्सपिअरच्या मँकबेथचे सामुराई रूप थ्रोन आँफ ब्लड या चित्रपटांवर जाणवतो. कुरोसावा परकीय कल्पनांचा स‌ढळ हस्ते वापर करीत असलेला दिस‌ला तरी त्याने आपल्या संस्कृतीशी नाळ तोडलेली नाही. हे या चित्रपटांवरून स्पष्ट होते. काबुकी आणि नोह हे पारंपारिक जपानी नाट्यप्रकार किंवा जिवाई गेकी या सामुराईंच्या काळातल्या गोष्टी सांगणाऱया चित्रपट प्रकाराशी अस‌लेल्या नात्याबरोबरच जपानी स‌माजमनाचा, त्यांच्या मूल्यांचा आणि वर्तणुकीचा ताळमेळही येथे पाहायला मिळेल.
इकिरू (1952), रेड बियर्ड (1965) हे चित्रपट ताकाशी शिमोरा आणि तोशिरो मिफूने या कुरोसावाच्या चित्रपटांतून नित्य दिसणाऱया अभिनेत्यांची उत्तम कामगिरी असलेले चित्रपट आहेत. रेड बियर्ड हा कुरोसावा आणि मिफुने यांनी एकत्रितपणे केलेला अखेरचा चित्रपट असल्याने तो कुरोसावाच्या कारकिर्दीचा एक महत्वाचा टप्पाही अधोरेखित करतो. या चित्रपटानंतर कुरोसावाचा पुढला चित्रपट आला तो तब्बल पाच वर्षांनी दोदेस्कादेन. हा 1970चा चित्रपट व्यावसायिक दृष्टीने यशस्वी ठरला नाही. मात्र हा कुरोसावाचा पहिला रंगीत चित्रपट. दोदेस्कादेन कुरोसावाच्या इतर चित्रपटांप्रमाणेच पश्चिमेत डोक्यावर घेतला गेला. आणि अँकँडमी अँवार्ड नामांकनात स्थानही मिळवता झाला. मात्र जपानमधले. त्याचे अपयश कुरोसावाच्या जिव्हारी लागले. पुढच्याच वर्षी त्याने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नालाही हे अपयशच जबाबदार मानले जाते.
कुरोसावा हा खऱया अर्थाने एक उत्तम दिग्दर्शक होता. कलात्मकतेच्या प्रेमातून त्याने आपले चित्रपट कधीही दुर्बोध होऊ दिले नाहीत. ना प्रेक्षक मिऴविण्याच्या इच्छेतून नको त्या तडजोडी केल्या. आपला प्रांत गृहीत धरून जागतिक कलाविश्वाकडे इतक्या मोकळेपणाने पाहणारा आणि भाषा-संस्कृती- काळ यांच्यापलीकडे जाऊन प्रेक्षकांशी थेट संवाद साधू शकणारा दुसरा दिग्दर्शक क्वचित असेल.
-गणेश मतकरी ( वास्तव रूपवाणीमधील भाग)

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP