एक्झाम- एक खोली आणि आठ पात्रं
>> Monday, August 30, 2010
एक खोली. मध्यम आकाराची. फार मोठी नाही, पण आठ टेबलं, अन् अर्थातच आठ खुर्च्या ठीकठाक राहतील अशी. इन्टीरिअर कॉर्पोरेट सेट अप मधे शोभण्याजोगं. अंतराअंतरावर पुढे आलेले खांब, त्यावर लॅम्प शेड्स. भिंतीवर आडव्या पट्ट्या. पूर्ण खोलीचा रंग करडा. छतावर स्प्रिन्कलर्स, खोलीच्या मध्यभागी जमिनीवरून जाणारा एक ड्रेन. खोलीतल्या आठ टेबलांवर कॅन्डीडेट १ ते ८ यांच्यासाठी प्रश्नपत्रिका ठेवलेल्या. या प्रश्नपत्रिकांवर थेट प्रकाशझोत टाकणारे स्पॉटलाईट्स. टेबलांसमोरच्या भिंतीवर एक मोठा स्क्रीन किंवा काच. त्याखाली एक डिजीटल टायमर. आणि हो, खोलीतली प्रत्येक हालचाल मुद्रीत करता येणारा कॅमेरा.
खोलीचं एवढं तपशीलवार वर्णन करण्याचं कारण म्हणजे ही खोली `एक्झाम` (२००९) या चित्रपटातल्या एखाद्या व्यक्तिरेखेसारखी. पहिला पात्रपरिचय सोडता संपूर्ण चित्रपट या खोलीत घडतो. खोलीचा जवळपास प्रत्येक तपशील हा चित्रपटात वापरला जातो. इथली पात्रं आणि ही खोली यांमध्ये एक संवाद घडतो, एक नाट्य उलगडतं.
सुरुवातीलाच आठ जणांना या खोलीत आणलं जातं. या सा-यांनी एका मोठ्या कंपनीतल्या प्रतिष्ठित नोकरीसाठी अर्ज केलेला. अनेक परीक्षा-मुलाखतींना सामोरं गेल्यावर ही परीक्षा म्हणजे निवडप्रक्रियेचा अखेरचा टप्पा. आठ जणांमध्ये चार पुरूष, चार स्त्रिया. सर्वांची पार्श्वभूमी, वर्ण,शैक्षणिक पात्रता इत्यादी परस्परांपेक्षा पूर्णपणे वेगळी. सारे आपापल्या जागी येताच दरवाजात एक पिस्तुलधारी गार्ड येऊन उभा राहतो, अन् एक काळा सूट येऊन परीक्षेचे नियम पुरेशा गंभीरपणाने सांगतो. त्या सर्वांपुढे एक प्रश्न मांडण्यात येईल. त्याला एकच बिनचूक उत्तर असणं अपेक्षित आहे. परीक्षेदरम्यान त्याच्याशी वा गार्डशी बोलणारा परीक्षेतून बाद होईल आणि प्रश्नपत्रिकेचा कागद खराब करणाराही परीक्षेतून बाद होईल. टायमरवर ऐंशी मिनीटांचा वेळ सेट केला जातो आणि परीक्षा सुरू होते. पहिला धक्का लगेचंच बसतो. कॅन्डीडेट्स ज्याला प्रश्नपत्रिका समजत असतात तो कागद कोरा असतो. मुळात प्रश्न कोणता याचीच आठातल्या एकालाही कल्पना नसते.
ज्याप्रमाणे लॉक्ड रूम मिस्ट्रिज या कायम रहस्यकथाकारांना खुणावत आल्या आहेत, त्याचप्रमाणे एका बंदिस्त जागेत घडणारी कथानंक चित्रकर्त्यांना अनेक वर्षे खुणावत आली आहेत. १९४४मध्ये हिचकॉकने एका छोट्याशा बोटीवर घडणारा `लाईफबोट` केला होता. तर १९५७ मध्ये लुमेटने ज्युरी रूममध्ये `१२ अँग्री मेन` घडविला होता. टेरेन्टीनोचा `रिझरव्हॉयर डॉग्ज` हा पहिला चित्रपटही एका वेअरहाऊसमध्ये घडणारा होता. तर लिन्कलेटरचा `टेप` एका मोटेल मधल्या खोलीत.
हल्ली ब-याच प्रमाणात भय-रहस्याच्या मिश्रणासाठी या फॉर्म्युल्याचा वापर होताना दिसतो. क्युब (कॅनडा) मालेफिक (फ्रान्स), फरमॅट्स रुम (स्पेन), सॉ (अमेरिका) अशी जगभरातून या फॉर्म्युल्याला मागणी आलेली दिसते. (लवकरच येणारा एम.नाईट श्यामलनची निर्मिती असणारा `डेव्हिल` देखील याच प्रकारातला असावा, असं त्याच्या ट्रेलर्स पाहून वाटतं.) `एक्झाम` ही या फॉर्म्युल्याची ब्रिटिश आवृत्ती आहे.
एक्झामचा सर्वात चांगला भाग म्हणजे तो कायम प्रेक्षकांच्या एक पाऊल पुढे असतो, अन सतत काहीतरी अनपेक्षित घडविण्याचा प्रयत्न करीत असतो. खरं तर एकच जागा अन् त्याच व्यक्तिरेखा ठेवून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं, हे जोखमीचं काम आहे, पण इथली पटकथा ते करून दाखविते. सामान्यतः अशा चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखांची ओळख ही नेहमी एकमेकांपासून अन् प्रेक्षकांपासून लपवलेली असते. इथेही ती तशीच आहे. त्यामुळे व्यक्तिरेखांना डोकं लढविण्यासाठी इथे मुळात तीन गोष्टी तयार होतात. पहिली म्हणजे उत्तराचा- किंवा पर्यायाने प्रश्नाचा शोध, इतर स्पर्धकांच्या खरे-खोटेपणाचा तपास आणि आपण जिंकण्यासाठी इतरांना हरवायचा किंवा स्पर्धेतून बाद करण्याचा सततचा प्रयत्न. मुळात हा नोकरीसाठी होणा-या सिलेक्शन प्रोसेसचा भाग असल्याकारणाने इतर चित्रपटांप्रमाणे मृत्यूची भीती तयार करता येत नाही, वा सध्या भयपटात कायम हजेरी लावणारे किळसवाणे तपशीलही इथे वापरता येत नाहीत, वापरणं अपेक्षित नाही. त्याऐवजी कोणत्या वेगळ्या मार्गाने ही स्पर्धा शब्दशः जीवघेणी ठरेल हे लेखक- दिग्दर्शक स्टुअर्ट हेजलडीन उत्तम रीतीने पाहातो. टेरेन्टीनोप्रमाणेच आपल्या पहिल्या प्रयत्नांतच त्याने हे मोठं आव्हान यशस्वीपणे स्वीकारलं आहे. अशा चित्रपटांमध्ये अवकाशावर असलेली मर्यादा पाहाता छायाचित्रणाला खूप महत्त्व येतं. दिग्दर्शकाचं त्यावर असलेलं नियंत्रण अगदी सुरूवातीलाच दिसून येतं. पात्रपरिचयात दर व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य अधोरेखित करणं, अन् लगेचच त्याच संकल्पनेनुसार त्या खोलीची वैशिष्ट्यही दाखवत जाणं, पात्रांच्या प्रेमिंगमधला फोअरग्राउंड-बॅकग्राउंडचा वापर, निवेदनाच्या गतीबरोबर संतुलित होणारी कॅमेराची गती, वेगळेपणा आणण्यासाठी केलेला बदलत्या प्रकाशयोजनांचा उपयोग, या सर्वातून दिसून येतं की आपण काय करतोय याची दिग्दर्शकाला पूर्ण जाण आहे.
एक्झामचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. अन कारण आहे त्यातल्या कोड्याची उकल. यात महत्त्व आहे, ते उमेदवारांनी आपल्याला कोणता प्रश्न विचारण्यात येतोय हे ओळखण्याला. तो काय असेल याबद्दल बरीच चर्चा होते, मुळातच पुरेशा गांभीर्याने सुरू होणारा चित्रपट अधिकाधिक गंभीर होत जातो. हे असूनही, जेव्हा प्रश्नाविषयी अन् उत्तराविषयी जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, तेव्हा आपला विरस होतो. तपशिलाकडे पाहिलं तर चित्रपट फसवत नाही. ही उकल म्हटली तर रास्त आहे, पण आत्तापर्यंत चित्रपटाने स्वतःकडून ज्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत, त्याबरोबर जाणारी नाही. लहान मुलांच्या कोड्यात जसा दिशाभूल करणारा ट्रिक क्वेश्चन असतो, तसा हा आहे. या विशिष्ट कंपनीबद्दल आपल्याला जी माहिती आहे, ती पाहाता, हा प्रश्न तिच्याकडून विचारला जाणार नाही, त्यामुळेच तो आपलं समाधान करू शकत नाही.
अशा परिस्थितीतही, शेवटाकडे दुर्लक्ष करूनही `एक्झाम` पाहण्यासारखा आहे. त्यातली निवेदनाची पद्धत, वरवर साध्या वाटणा-या प्रसंगातून रहस्य उभं करणं, प्रेक्षकाला सतत विचार करत ठेवणं, केवळ धक्क्यांच्या गरजेसाठी बॉडी काउंट वाढवत न नेणं, व्यक्तिरेखांचा चांगला उपयोग करून घेणं, अशा अनेक बाबतीत तो अव्वल कामगिरी बजावतो. `एक्झाम`कडे जर या नव्या लेखक-दिग्दर्शकाची परीक्षा म्हणून पाहिलं तर त्याला फर्स्ट क्लास विथ डिस्टीन्क्शन मिळाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. कोड्याची याहून बरी उकल कदाचित त्याला गुणवत्ता यादीपर्यंतही घेऊन गेली असती.
-गणेश मतकरी. Read more...