अॅकेडमीचे गोदार प्रकरण
>> Monday, September 20, 2010
' ज्यॉ- लूक वोन्ट गो टू अमेरिका : ही इज गेटिंग ओल्ड फॉर दॅट काइन्ड ऑफ थिंग. वुड यू गो ऑल दॅट वे जस्ट फॉर ए बिट ऑफ मेटल?’ असं ज्याँ- लूक गोदारच्या पत्नीने- अॅन- मेरी मेविलने नुकतंच पत्रकारांशी बोलताना विचारल्याचं ऐकिवात आलं आहे. आता सामान्यत: म्हणजे गोदारचा अपवाद वगळता इतर कोणाच्याही बाबतीत या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल, यात शंकाच नाही. खासकरून जेव्हा ‘बिट ऑफ मेटल’ हा उल्लेख अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅन्ड सायन्सेस तर्फे देण्यात येणाऱ्या ‘ऑस्कर’ला उद्देशून करण्यात आला असेल तेव्हा! अॅकेडमीने चित्रपट कारकिर्दीसाठी सन्मान करताना फ्रेंच दिग्दर्शक गोदारची निवड करावी यात काहीच आश्चर्य नाही. अॅकेडमी ही हॉलिवूडची प्रातिनिधिक संस्था असल्याने तिचा अन् तिच्यातर्फे देण्यात येणाऱ्या प्रमुख पारितोषिकांचा भर हा जरी प्रामुख्याने रंजनात्मक, पलायनवादी, व्यावसायिक चित्रपट असला, तरी त्या जोडीला जगभरातून आशयघन कामगिरी बजावणाऱ्या चित्रकर्मीचा ही संस्था कायम सन्मान करत आलेली आहे. त्यांच्या प्रमुख पारितोषिकाबरोबर माहितीपट, लघुपट यांसारखे सन्मान किंवा परभाषिक चित्रपटासाठी होणारी निवड ही कायमच काही एक विचार, कलेची जाण डोक्यात ठेवून करण्यात आलेली दिसते. ‘लाइफ टाइम अचिव्हमेंट’साठीही त्यांनी आधी निवडलेल्या नावांमध्ये ज्याँ रेनोआर (१९७४), अकिरा कुरोसावा (१९८९), सत्यजित राय (१९९१), फेडेरिको फेलिनी (१९९२) अशा जागतिक चित्रपटातल्या महत्त्वाच्या नावांची वर्णी लागलेली दिसून येते. त्या दृष्टीने पाहाता फ्रेंच न्यू वेव्ह चळवळीतला एक महत्त्वाचा दिग्दर्शक असलेल्या आणि आयुष्यभर काही अर्थपूर्ण काम करू पाहणाऱ्या गोदारची निवड ही या सन्मानाला साजेलशीलच म्हणावी लागेल. मात्र, एरव्ही कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी टाळू पाहणाऱ्या अॅकेडमीने एक गोष्ट यावेळी विचारात घेतलेली दिसत नाही. ती म्हणजे गोदारचा स्वभाव. अमेरिकन समाज अन् हॉलिवूड यांच्याशी या दिग्दर्शकाची पहिल्यापासूनच लव्ह-हेट रिलेशनशिप आहे. त्यात त्याच्या मूळच्या विक्षिप्तपणाची भर घातली की, हा माणूस समारंभाला येईल की नाही? सन्मान स्वीकारेल की नाही? वा अॅकेडमीचाच अपमान करून बसेल का? असे प्रश्न सुरू होतात. त्यातून या वर्षीपासून कारकिर्दीचा गौरव करणारे सन्मान मूळ समारंभातून बाजूला करून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एका स्वतंत्र समारंभात देण्यात येणार आहेत, जेणेकरून मुख्य समारंभात त्या वर्षीच्या पारितोषिकांना अधिक वेळ देता येईल. गोदारने हादेखील व्यक्तिगत अपमान समजला असेच का, अशीही शक्यता अॅन-मेरीच्या एका प्रतिक्रियेवरून दिसून आली आणि गोदार- ऑस्कर प्रकरणात रंग भरायला लागला. गोदारने अॅकेडमीच्या पत्रव्यवहाराच्या सुरुवातीला उत्तर न दिल्याने अन् पुढे त्याच्या पत्नीने दिलेल्या उलटसुलट मुलाखतीने गोदारच्या उपस्थितीबद्दलच्या शंकांना पुष्टी मिळाली असली तरी शंका मुळात होत्याच. पारंपरिक चित्रपटाला कायम विरोध करणारा गोदार पारंपरिक चित्रपटांसाठीच नावाजलेल्या समारंभाच्या व्यासपीठावर येईल का, हा सवाल मुळातच त्याच्या कारकिर्दीमधूनच उपस्थित होताना दिसतो.
१९३० साली जन्मलेल्या गोदारची एकूण कारकीर्द पाहता लक्षात येईल, की ती कायमच चित्रपटांकडून असणाऱ्या पारंपरिक अपेक्षांना आव्हान देणारी, सतत काही वेगळं करण्याचा शोध घेणारी आहे. अनेक र्वष चित्रपट क्षेत्रांत ठळक, प्रभावी आणि विचारप्रवर्तक काम, पन्नासच्या वर जाणारी चित्रपटसंख्या आणि कारकिर्दीच्या दर टप्प्याला बदलत जाऊनही एका विशिष्ट दिशेने होणारं वाटचालीचं स्वरूप यामुळे गोदारचं नाव काहीसं आदराने तर काहीसं बिचकून घेतलं जातं. त्यातून त्याचा चित्रपट कळायला कठीण. किंबहुना तो कळणं अन् त्यातून एक कथानक सलगपणे मांडलं जाणं, हा या चित्रपटांचा हेतूही नाही. प्रेक्षकाला कल्पनाविलासात रमवण्यापेक्षा त्याला सतत जागरूक ठेवणं, विचार करायला लावणं, आपण पाहातोय ते मुकाट गृहीत धरण्यापेक्षा त्यावर प्रतिप्रश्न करायचा भाग पाडणं या दिग्दर्शकाला साधतं. त्याचे चित्रपट ही विविध कल्पनांची, विचारांची, तंत्र आणि दृश्य संकल्पनांची एक मोळी असते. त्यातली दृश्यं ही एका कथासूत्राप्रमाणे जोडलेली असावीत असा ना त्याचा आग्रह असतो; ना त्याची त्याला गरज भासते. या कल्पना एकत्र येतात त्या केवळ एक अर्थ बाहेर काढण्यापुरत्या नाहीत, तर आधुनिक चित्रकलेच्या स्वरूपाप्रमाणे त्यांचा भर हा वेगवेगळ्या गोष्टींवर असू शकतो. जर प्रेक्षकाने सवयीप्रमाणे उघड अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, तर हा दिग्दर्शक अगम्य वाटण्याचीच शक्यता अधिक.
गोदारचं दिग्दर्शक असणं हे मुळात त्याच्या समीक्षक म्हणून असणाऱ्या भूमिकेचं एक्स्टेन्शन असल्यासारखं आहे. फ्रान्समध्ये फिल्म सोसायटी चळवळीत कार्यरत असणाऱ्या गोदारने १९५० मध्ये एरिक रोमेर आणि जॅक्स रिबेट यांच्याबरोबर ‘ल गझेट टु सिनेमा’ या चित्रपटविषयक नियतकालिकाची स्थापना केली. आणि पुढे १९५१ मध्ये चित्रपटसमीक्षेत अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आंद्रे बाझँ यांनी त्यांच्या काइये दु सिनेमाची स्थापना केल्यामुळे गोदार तिथेही पोचला. दिग्दर्शकालाच चित्रपटाचा कर्ता धर्ता मानायला लावणाऱ्या ‘ओतर थिअरी’च्या मूळ संकल्पनेतही फ्रान्स्वा त्र्यूफोच्या बरोबरीने गोदारचा सहभाग होता. तत्कालीन व्यावसायिक फ्रेंच चित्रपटाला या मंडळींनी विरोध केला, अन् त्याउलट इटलीत एव्हाना विरत चाललेला नववास्तववाद आणि हॉलिवूड यांच्या प्रभावाला महत्त्व दिलं. त्र्युफोचा ‘400 blows’ आणि गोदारचा ‘ब्रेथलेस’ यांनी ‘फ्रेंच न्यू वेव्ह’ची सुरुवात झाली आणि तिचा परिणाम केवळ फ्रान्सपुरता मर्यादित राहिला नाही. ‘ब्रेथलेस’ची शैली लक्ष वेधून घेणारी ठरली आणि गोदार लवकरच महत्त्वाच्या दिग्दर्शकांत गणला जाऊ लागला.
‘ब्रेथलेस’ पाहताना काही गोष्टी लक्षात येतात. पहिली म्हणजे हॉलिवूडच्या गँगस्टरपटांचा त्यावरचा प्रभाव. चित्रपटाचा विषय, त्यातल्या व्यक्तिरेखा या सरळ कोणत्याही अमेरिकन चित्रपटात चालण्याजोग्या आहेत, पण वेगळी आहे ती त्यांची मानसिकता- या व्यक्तिरेखांची अन् त्यामागे असणाऱ्या दिग्दर्शकाचीही. ‘ब्रेथलेस’चा उलटा प्रभाव पुढल्या काळात हॉलिवूडच्या गँगस्टर पटांवर पडलेला दिसतो. १९६० नंतरचे हे चित्रपट आणि त्यामध्ये अल पचिनो, वॉरन बेटी, जॅक निकलसन यांसारख्या नव्या पिढीच्या स्टार्सनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये ज्याँ-पॉल बेलमोन्डोने रंगवलेला ‘ब्रेथलेस’चा विक्षिप्त नायक आपल्याला दिसत राहातो.
‘ब्रेथलेस’ हा एकाच वेळी हॉलिवूडचं ऋण मानतो अन् त्यावर टीकाही करतो. अमेरिकन चित्रपट किंवा अमेरिकन दृष्टीकोन यांचं प्रभावी असणं मान्य करूनही त्याला विरोध करण्याचं तंत्र गोदारने आपल्या पुढल्या अनेक चित्रपटांत वापरलेलं दिसतं.
आपल्या त्यातल्या त्यात मेन स्ट्रीम चित्रपटात, कन्टेम्प्ट (१९६३) मध्ये हॉलिवूडने व्यवहारापुढे कलेला कवडीमोल लेखणं किंवा माणसांना वस्तूप्रमाणे वापरणं दाखवताना तो हॉलिवूड निर्मात्याच्या व्यक्तिरेखेला (जॅक पलान्स) जवळजवळ विडंबनात्मक पद्धतीने उभं करतो. या चित्रपटातलं पटकथा लेखकाचं प्रमुख पात्र आणि निर्माता यांचा संघर्ष हा पडद्यामागे चाललेल्या गोदार अन् त्याच्या निर्मात्यांच्या (कार्लो पॉन्ती आणि जोसेफ इ. लिवाइन) संघर्षांचं प्रतिबिंब असल्याचंही मानण्यात आलं आहे. याच प्रकारची हॉलिवूडवरची थेट टीका त्याच्या ‘इन प्रेज ऑफ लव्ह’ (२००२) मध्येही दिसून येते; ज्यात स्पीलबर्गचं नाव घेऊन त्याची संस्था नाझी छळछावण्याच्या बळींचा आपल्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करत असल्याचं सुचवण्यात येतं. असं असूनही गोदार आपल्या चित्रपटाला अमेरिकेपासून पूर्णपणे मुक्त करताना दिसत नाही. ‘पिएरो-ल-फू’मध्ये त्यांच्या युद्धविषयक धोरणावर टीका करणारा गोदार आपल्या ‘आल्फा व्हिल’ किंवा ‘मेड इन यु.एस.ए.’साठी अमेरिकन तंत्राचा प्रभाव हा वापरतोच.
पुढल्या काळात गोदार आणि त्याचा चित्रपट अधिकाधिक तऱ्हेवाईक होत गेला. कथानकांची फार गरज त्याला भासलीच नव्हती, पण आता त्याने सिनेमा या माध्यमालाही तपासून पाहायला सुरुवात केली. त्याच्या व्यक्तिरेखांना अनेकदा त्या चित्रपटात असल्याची जाणीव असलेली दिसायला लागली आणि ती आपण काम करत असलेल्या चित्रपटाच्या गुणवत्तेविषयी टीकादेखील करायला लागली. थेट प्रेक्षकांशी बोलायला लागली, हळूहळू सामान्य प्रेक्षकांना गोदार कळेनासा झाला, पण त्याचबरोबर त्याचा स्वत:चा असा खास, पण छोटेखानी प्रेक्षकवर्गही तयार झाला.
गोदारचा ‘ब्रेथलेस’ (१९५९) ते ‘वीकएन्ड’ (१९६७) हा काळ आणि पुढे १९८० नंतरचा काळ त्यातल्या त्यात व्यावसायिक दृष्टीकोन असणारा मानला जातो. पण याचा अर्थ तो प्रेक्षक शरण होता असा मात्र नव्हे. गोदारचा चित्रपट नेहमीच आपला विक्षिप्तपणा टिकवून राहिला. आपल्या पहिल्या चित्रपटापासून ते या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फिल्म सोशलिझम’पर्यंत वैचारिक आणि दृश्यरचनात्मक शैलीदार वैविध्य हे गोदारने आपल्या सुपीक कल्पनाशक्तीद्वारे आपल्यापुढे आणले. स्वत:वरचे राजकीय, सामाजिक प्रभाव न नाकारता त्यांनाही त्याने आपल्या चित्रपटांतून आवाज दिला.
आपण घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबाबत गोदार केवळ स्वत:शी प्रामाणिक राहिला. आपण केलेल्या कामाच्या बऱ्या-वाईट असण्याची जबाबदारी त्याने स्वत:वर घेतली. त्यामुळेच ‘मान्यता’ किंवा ‘रेकग्निशन’ हा एरव्ही ऑस्करसंबंधात ग्राह्य मानला जाणारा मुद्दा त्याच्या लेखी गौण ठरतो. त्यामुळे त्याच्या अमेरिकावारीबाबत संभ्रमाचं वातावरण पसरलं, यात आश्चर्य काही नाही.
सध्या वातावरण थोडं निवळलेलं आहे. गोदारने अॅकेडमीला हाती लिहून पाठवलेल्या एका पत्रात ‘आपल्या कामातून वेळ झाल्यास, आपण लॉस एंजेलिसला हजर राहू’ असं आश्वासन दिलं आहे. अर्थात, या पत्रावरून तो येईल किंवा नाही हे सिद्ध होत नाही. पण केवळ त्याने साधलेला संपर्क हाच एक प्रकारे मान्यतेचा पुरावा मानता येईल. मात्र ही मान्यता अॅकेडमीने गोदारला दिलेली नसून गोदारने अॅकेडमीला दिलेली आहे, यातच सगळं आलं.
- गणेश मतकरी.
(लोकसत्तामधून)

2 comments:
गोदार जातो का बघायला पाहिजे.
सो कॉल्ड परफेक्शनिस्ट,इंटलेक्च्युअल आणि फिल्म फेअर अवॉर्डला अनफेअर म्हणणाऱ्या आमीरचा आता दुसरा सिनेमा ऑस्करला जातोय तो किती लॉबिइंग करतो पहायचं.
godard may actually go is what i believe. his soft corner for the fellow awardees and hollywood in general may help. aamir khans no mans land was anyway expected to go.but we should speculate after it gets in the nominations . we had even sent his taren zamin par. an ignorant choice ,on our part ,to be sure.lets see.
Post a Comment