127 अवर्स- एकपात्री साहस

>> Sunday, February 13, 2011

`127 अवर्स` पाहताना मला स्टीवन किंगच्या दोन कथानकांची आठवण झाली. पहिली होती ती `स्केलेटन क्रू` कथासंग्रहात आलेली.`सर्व्हायवर टाईप` नावाची लघुकथा. या कथेचा नायक एका बेटावर अडकलेला. खाण्यापिण्याचे वांधे आणि एका पायानेही जायबंदी झालेला. जिवंत राहण्यासाठी तो स्वतःच्या शरीराचेच तुकडे करून खायला लागतो. किंगने निवेदनासाठी शैली वापरलीय, ती डायरी लिहिण्याची. ही डायरी कोणत्या क्षणी थांबते, ते मी सांगण्याची गरज नाही. दुसरी आहे त्याची `जिरार्डस गेम` ही कादंबरी. या कादंबरीची नायिका एका निर्मनुष्य जागी हातकडीने पलंगाला जखडलेली आहे. सोबतीला तिच्या नव-याचं मृत शरीर आहे, अन् भूतकाळाच्या आठवणी. काही वेळातच आठवणी आणि वर्तमान यांच्या चमत्कारिक मिश्रणात ती गुरफटली जाते. किंगच्या अनेक साहित्यकृतींप्रमाणेच या दोन देखील सामान्य माणसांनी अचानक चमत्कारिक परिस्थितीत सापडण्यावर आधारलेल्या, अन् जीवन-मृत्यूच्या प्रश्नाभोवती फिरणा-या आहेत. `भय` हा या लेखकाच्या साहित्यातील महत्त्वाचा घटक, या ठिकाणीदेखील दिसून येतो. 127 अवर्स पाहून हे आठवण्याचं कारण म्हणजे या दोन्ही कथांमधले घटक या चित्रपटात आहेत. अपरिचित ठिकाणी ओढवणारी विचित्र परिस्थिती आहे, ओळखीच्या जगाशी संपर्क तुटल्याचं जाणवल्याने उत्पन्न होणारी भीती आहे, परिस्थिती अन् संभाव्य मृत्यूच्या चाहुलीतून उदभवणारी मनःस्थिती आहे, भूतकाळाने वर्तमानावर केलेलं आक्रमण आहे आणि सर्व मार्ग खुंटल्यावर नाईलाजाने उचलावं लागणारं टोकाचं पाऊलही आहे. फरक इतकाच, की ही कोणा भयकथालेखकाच्या सुपीक डोक्यातून निघालेली कथा नसून गिर्यारोहक अ‍ॅरन राल्स्टन याच्या आयुष्यातील खरीखुरी घटना आहे. त्याच्या `बिट्वीन ए रॉक अँण्ड ए हार्ड प्लेस` या आत्मचरित्रावर आधारित हा चित्रपट आहे.
दिग्दर्शक डॅनी बॉईल, पटकथाकार सायमन बोफॉय, छायाचित्रकार अँथनी डॉड मेन्टर आणि संगीतकार ए.आर.रेहमान ही `स्लमडॉग मिलिअनेर`ची ऑस्कर विजेती टिम इथे पुन्हा एकत्र आली आहे. मात्र स्लमडॉग अन् `127 अवर्स` याच्यात काही म्हणता साम्य नाही. ना आशयात, ना चित्रप्रकारात, ना दृश्यशैलीत. स्लमडॉग आँस्करस्पर्धेत असताना, मी बॉईलच्या शैलीविषयी अनेक लेखात विस्तृत्तपणे लिहिले होते. ब्लॉगवर त्यातले बरेचसे लेख असल्याने पुनरावृत्ती टाळतो. पण एक मुद्दा सांगंणं आवश्यक आहे. बॉईल हा सामान्यतः वेगवेगळ्या जॉनरमधे, किंवा चित्रप्रकारात काम करतो. संकेत स्पष्ट झालेला एखादा चित्रप्रकार तो निवडतो. (उदा. स्लमडॉग हा त्याने बॉलीवूड शैलीसाठी निवडला होता.) अन् आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीने त्यात बदल घ़डवून आणतो. 127 अवर्सचा चित्रप्रकार हा सत्य घटनांवर आधारित साहसपटांचा आहे. टचिंग द व्हॉईड, एट बिलो यासारखे मानव विरुद्ध निसर्ग थाटाचे साहसपट आपल्याला अपरिचित नाहीत. बॉईलने आपला साहसपट रचलाय तो मात्र मुळातच एका जागी अडकून राहिलेल्या नायकाभोवती फिरणारा. अ‍ॅरन राल्स्टनभोवती.
या प्रकारच्या साहसपटांना मुळातच कथानक थोडकी असतात. कारण बाय डेफिनीशन ते एखाद्या महत्त्वाच्या घटनेभोवती गुंफलेले असतात. हा चित्रपट याचा अपवाद नाही. तो सुरू होतो , अ‍ॅरनच्या कॅन्यनलॅण्डस नॅशनल पार्कमधल्या प्रवेशापासून. हा सुरूवातीचा भाग हा जरा अधिकच प्लेझन्ट आहे, मूळच्या घटनांहूनही कितीतरी अधिक.
प्रत्यक्षात अ‍ॅरनची वाटेवर दोन मुलींशी गाठ पडली आणि त्याने त्या दोघींना पत्ता शोधायला मदत केली. चित्रपटात अ‍ॅरन या दोघींबरोबर चिकार फ्लर्ट तर करतोच वर त्यांच्याबरोबर त्या जात असलेल्या छुप्या तळ्यावर जाऊन त्यांच्याबरोबर डुंबतो देखील. हा भाग बॉईलने अधिक रंगवण्यामागचं कारण स्पष्ट आहे. एकतर तो अ‍ॅरनची व्यक्तिरेखा आपल्या मनात स्पष्टपणे उभी करायला मदत करतो. चित्रपटाचा उरलेला भाग आठवणींमधील थोडीबहुत दृश्य सोडता एकट्या अ‍ॅरनवर चित्रित होतो. अन् केवळ त्याचं स्वतःशी बोलणं हे त्याच्या व्यक्तिचित्रणासाठी पुरेसं नाही. दुसरं कारण म्हणजे अ‍ॅरन चित्रपटाचा बराचसा भाग एका जागी अडकून राहतो. तो अडकल्यानंतरच्या त्याच्या परिस्थितीशी विरोभास निर्माण होण्यासाठी सुरूवातीचा भाग वापरला जातो, ज्यात अ‍ॅरनच्या स्वैर बागडण्याबरोबरच रम्य निसर्गदृश्यांचाही अंतर्भाव आहे.
तळ्यावरून निघताना अ‍ॅरन त्याच्या दोन मैत्रिणींना निरोप देतो आणि आपल्या उद्दीष्टांकडे जायला निघतो. एका घळीत उतरताना त्याचा हात दगडाखाली सापडतो अन् अडकून राहतो. अ‍ॅरनला सुरूवातीला ही गोष्ट फार धोक्याची वाटत नाही. पण वेळ जायला लागतो आणि सूटकेची आशा हळूहळू मावळायला लागते.
या चित्रपटाची पटकथा स्वतः बॉईल आणि बोफॉय अशा दोघांनी लिहिलेली आहे. ती लिहायला कठीण आहे ती दोन कारणांसाठी. पहिलं म्हणजे त्यात म्हणण्यासारख्या घटना नाहीत. अ‍ॅरनला होणा-या भासांमधून थोडी व्हरायटी करणं शक्य आहे, पण तिचा कथेच्या आलेखावर परिणाम होत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या वेगात वा तणावात बदल संभवत नाही. दुसरं कारण थोडं अधिक महत्त्वाचं आहे. ते म्हणजे सामान्य प्रेक्षकाला चित्रपटाचा शेवट माहिती आहे. भारतीय प्रेक्षकाला कदाचित नसेल, पण चित्रपट मुळात ज्या अमेरिकन प्रेक्षकासाठी बनलेला आहे, त्याने २००३मध्ये सर्व वृत्तपत्रांमधून अन् न्यूज चॅनल्सवरून अ‍ॅरनला ज्या दिव्यातून जावं लागलं त्याचा वृत्तान्त ऐकला, पाहिलेला आहे. त्याला अ‍ॅरन जिवंत सुटला हे माहित तर आहेच वर त्यासाठी त्याने कोणता मार्ग पत्करला हे देखील बहुतेकांना तो किती दिवस अडकला होता हे देखील ठाऊक असेल, अन् ज्याना ते आठवत नसेल त्यांच्या सोयीसाठी चित्रपट आपल्या नावातच वेळेचा जमाखर्च स्पष्ट करतो. याचा अर्थ तो मुळातच पटकथेतून रहस्य अन् भय या गोष्टी बाजूला करतो.हे करून तो आपलं लक्ष केंद्रीत करतो, ते अ‍ॅरनच्या मनःस्थितीवर. त्याच्या मनात चाललेल्या आशा-निराशेचा खेळ, भास, आठवणी, कॅमेरावर आपल्या पालकांसाठी निरोप नोंदवणं (हे मुद्रीत फूटेज अस्तित्त्वात असल्याचं मानलं जातं. ते जाहीर नोंदीचा भाग नाही, मात्र चित्रकर्त्यांना ते अ‍ॅरनने दाखविल्याचं कुठेसं वाचलंय.
`ग्रिझली मॅन` डॉक्युमेन्टरीतल्या अखेरच्या अदृश्य फूटेजची आठवण यावेळी झाल्य़ाशिवाय राहत नाही. ग्रिझली मॅनच्या नायकाच्या आणि त्याच्या मैत्रिणीचा अस्वलानी घेतलेल्या बळीचं ध्वनीमुद्रण त्याच्याच कॅमेरावर झालेलं होतं. लेन्स झाकलेली असल्याने दृश्य मात्र लपली. प्रत्यक्ष माहितीपटात हे मुद्रण ऐकवलं जात नाही, पण माहितीपट बनवणारा हरझॉग ते पडद्यावर ऐकत असताना, त्याच्या चेह-यावरले हावभाव आपण पाहू शकतो. )
इथे अ‍ॅरन वाचला असल्याने फूटेज `त्या` फूटेजइतकं भयानक ठरत नाही. उलट या फूटेजचं प्रत्यक्ष चित्रण हाच पटकथेचा एक महत्त्वाचा भाग बनतो.) जीव वाचवण्यासाठी घ्याव्या लागणा-या किंमतीचा हिशेब मांडणं, या गोष्टी १२७ अवर्सला त्याचा आकार देऊ करतात. बॉईलच्या चित्रपटात हमखास दिसणारा ब्लॅक ह्यूमर इथेही हजेरी लावतो. अ‍ॅरनच्या स्वगतात येणारं गेम शो सदृश कोम्पिअरिन्ग , किंवा स्वप्नवत सुटकेचे मार्ग, यासारख्या जागांतून तो दिसत राहतो .हिंसाचार हा लार्ज स्केल नसला तरी काही जणांना तरी डोळे झाकायला लावण्याची ताकद त्याचात निश्चित आहे. पडद्यावरले रक्तरंजित दृश्य हे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं केवळ पुनःकथन आहे, हे देखील आपल्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेसं आहे. बॉईलचा ट्रेडमार्क म्हणण्याजोगी एक गोष्ट इथे नाही,अन् ती म्हणजे गती. चित्रपटाच्या चनेत, अन् प्रत्यक्ष प्रसंगातही गतीचा संपूर्ण अभाव इथे दिसून येतो. अर्थात कथाविषयाच्या दृष्टीने हे योग्यच आहे, आणि सुरूवातीच्या काही दृश्यांमधल्या गतीचा आभास वगळता बॉईलने ती लादण्याचा प्रयत्न न करणं, हे त्याच्या दिग्दर्शन कौशल्याबद्दल सांगतं.
स्लमडॉगनंतरचा बॉईलचा हा पुढला चित्रपट स्लम़डॉगप्रमाणेच ऑस्करच्या अनेक विभागात नॉमिनेटेड जरूर आहे, मात्र स्पर्धा पाहता यंदा त्याचं खातं रिकामं राहण्याची शक्यता अधिक दिसते. पण ते साहजिकच आहे. पारितोषिकासाठी विशिष्ट प्रकारचे चित्रपट लागतात. हा त्यातला नाही इतकंच. तो चित्रपट म्हणून उत्तम आहे, यात शंकाच नाही.

- गणेश मतकरी

13 comments:

सिद्धार्थ February 13, 2011 at 9:59 PM  

हा पाहायचा पाहायचा म्हणत होतो पण काहीसे मिक्स रिव्हू वाचायला मिळाले म्हणून टाळला. गेल्या काही दिवसापासून जाऊ दे पाहुया असं ठरवलं आहे. तुझी पोस्ट वाचून पाहुया +१ झालं. बघू कधी योग येतोय.
बाकी "एकपात्री साहस" ही टॅग लाइन आवडली.

Unknown February 14, 2011 at 1:00 AM  

A very good documentary. This one is about Aron Ralston, the man on whom 127 Hours has been made.

Part 1 - http://www.youtube.com/watch?v=SyPBTblkzBI
Part 2 - http://www.youtube.com/watch?v=8m5EkGuKgbs&feature=related
Part 3 - http://www.youtube.com/watch?v=St5F4-xOIYY&feature=related
Part 4 - http://www.youtube.com/watch?v=zgdNzM7XHm0&feature=related
Part 5 - http://www.youtube.com/watch?v=cvREto1-uYE&feature=related
Final Part - http://www.youtube.com/watch?v=wO_fieushVw&feature=related

Total playing time: 1.5 hrs (approx.)

आपला लेख आवडलाच ह्यात शंका नाही. आपण नमूद केलेले बाकीही चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करेन ! :)

ह्या चित्रपटाबद्दलचे माझेही एक मत

crazygamers February 14, 2011 at 3:48 AM  

I noticed an interesting fact..in that film. Aron Ralston's right hand..(Hand which was cut later on)
is purposefully not displayed much at d starting scenes..

jeetu February 14, 2011 at 4:07 AM  

KHUP CHHAN PARIKSHAN VATALE

jeetu February 14, 2011 at 4:08 AM  

khup chhan parikshan vatale.

प्रशांत दा.रेडकर February 14, 2011 at 5:22 AM  

आपला सिनेमास्कोप हा तुमचा ब्लॉग आवडला
उत्तम माहिती आहे. :-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/

mahesh February 14, 2011 at 5:30 AM  

sir tumcha blog khup
divas zale wachto ahe blog mule 'veglya' ani 'changlya' chitrapatanbaddal mahiti milte
mi nolan cha fan ahe tyachya "Larceny" ani "tarantella" ya short films kuthe available hotil sangu shakaal ka tyachi "doodlebug" navachi short film utube var available ahe kalyas pls sanga

ganesh February 14, 2011 at 12:24 PM  

thanks all
mercury, thats a good material .
crazygamers, it sure is interesting if it is deliberate, but why would it be deliberate? its not as if ralston is playing the role himself and the hand is prosthetic.its a real arm, and if anything, logic should prompt the director to show it more considering its fate.
mahesh , doodlebug piratebay ya torrent site war ahe. other 2 films r not available as far as i know.

lalit February 15, 2011 at 9:44 AM  

चित्रपट मी आधीच बघितला आहे ...मला आवडला ..आता नेहमी प्रमाणे तुमचा लेख वाचला आता परत एकदा बघायची इच्छा जाली आहे ..छान लिहिता तुम्ही

Anee_007 February 16, 2011 at 5:26 AM  

Most important thing of 127 hours was I think Pace of the movie;it was neither too fast nor too slow.That increased the complete effect of movie to extreme level.Especially I liked the Boyle's way of not showing gore when he cuts his arm,even though you feel his pain.I specially want to mention cinematography of movie,it was fantastic.And liked message Boyle gave to audience,"You need some extreme moments to understand what real mistakes and wrong things you did in past,and when you do that life your life is far more beautiful than ever"

Pratham February 18, 2011 at 11:34 AM  
This comment has been removed by the author.
Pratham February 18, 2011 at 11:51 AM  

गेल्याच आठवड्यात कॉलेजच्या शेड्युलमधून वेळ काढून पहिला.सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे अपघात परत एकदाच दाखवला आहे.तो पण नीट नाही. उगाचच नाट्यपूर्ण करायला वेगळे अँगल, स्लो-मो यांचा वापर टाळला आहे.कॅमेरा एक दोनदा वाळवंट पार करून त्याच्या गाडीत जातो, त्याचं राहिलेलं सामान दाखवायला, (जिथून आरोन निघतो आणि चित्रपट खरा चालू होतो. (BTW तो माझा आवडता क्षण आहे जेव्हा आरोन गाडीच्या टपावरून सायकल आणि गाडीच्या आतून कॅमेरा बाहेर येतो.)) ती आयडीया तर जबरच.जेम्स फ्रँकोने कमाल केली आहे.
चित्रपट बघायला एक कॉलेजचं टोळकं होता १२-१२ जणांचं.उगाचच आलेले आणि उगाचच हसत होते.म्हणून जमेल तेव्हा IMAX ला जायचा माझा प्रयत्न असतो.दूर असल्याने असे लोक बहुतेक वेळा नसतात.

PS : http://cache.daylife.com/imageserve/00np8Sudr55SD/610x.jpg नोलान, फिन्चर आणि कॅमेरोन एकत्र. :O :D DGA ला.
नोलानला ऑस्कर नामांकन नाही तर नेटकर आणि काही त्याचे सहकारी (including कॅमेरोन) भडकले आहेत.
Google search: Nolan Academy,Nolan Oscar, Nolan snub, Nolan best director snub

अपर्णा July 25, 2011 at 11:46 AM  

मला हा चित्रपट तसा नाही आवडला...म्हणजे एक तर discovery channel वर या पेक्षा चांगले एपिसोड पाहिलेत ज्यात लोकं अशी वाचलीत...आणि थोडी पटकथा अधिक सशक्त करून सादर केलं असतं तर जास्त परिणामकारक झाला असता..पण ऑस्करसाठी तर नक्कीच नाही..त्यातून मी आताच किंग्स स्पीच पहिला त्यावरून तर पातळीतला फरक लगेच लक्षात येतो...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP