क्रिस्टॉफ किसलोव्स्की आणि `थ्री कलर्सः रेड`

>> Tuesday, August 2, 2011

पोलिश दिग्दर्शक क्रिस्टॉफ किसलोव्स्की, हा निर्विवादपणे शतकातल्या सर्वोत्तम चित्रकर्त्यांमधला एक म्हणावा लागेल.  `माहितीपट` या सत्यकथनाचा मक्ता घेतलेल्या चित्रप्रकारातूनही सत्य मांडणं अडचणीचं व्हायला लागल्याने कल्पित चित्रपटांकडे तो वळला,  आणि वरवर आकर्षक, रेखीव आणि काव्यात्म वाटणा-या व्यक्तिनिष्ठ चित्रपटांतून अधिक गहिरे अर्थ सांगणारी कथानकं त्याने मांडली.  मानवाच्या अंतरंगातल्या मूलभूत जाणीवांशी संबंधित सत्य उलगडण्याचा प्रयत्न त्याने  केला. माहिती ते काव्यात्मता या दोन टोकाच्या शैली हाताळणारा किस्लोव्स्कीचा चित्रपट अखेर आहे समाजातल्या सामान्य घटकांविषयी आणि समाज प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या सामान्य माणसावर घडवून आणत असलेल्या परिणामांविषयी. आपली पार्श्वभूमी, आपली संस्कृती ही आपल्यावर काही एक प्रभाव टाकत असते. हा प्रभाव आपल्या नैसर्गिक जडणघडणीशी निगडित आहे का, आणि असलाच तर तो संबंध सकारात्मक म्हणावा की नकारात्मक हे किसलोव्स्की पडताळून पाहतो. त्याचा चित्रपट बदलतो. ते तो कोणत्या प्रकारचा प्रभाव पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतो आहे, या विचारातून. राजकीय, धार्मिक की सामाजिक.
 पोलान्स्की आणि वायदा या दोन जागतिक किर्तीच्या दिग्दर्शकांना पुढे आणणा-या लॉड्स या चित्रविद्यालयात किसलोव्स्कीचं शिक्षण झालं आणि तो बाहेर पडला माहितीपटांचा दिग्दर्शक म्हणून. पुढे त्याला चित्रपटांनी प्रसिद्धी मिळवून दिली असली, तरी सुरुवातीचा काळ किसलोव्स्कीने माहितीपट बनवण्याचं काम इमाने इतबारे केलं. किसलोव्स्कीचं शिक्षण पुरं झालं तो काळही या दृष्टीने महत्त्वाचा होता. पोलंडमधल्या राजकीय घ़डामोडींना उत आलेला होता. आणि सेन्सॉर बोर्ड या राजकीय खेळात सामील होऊन चित्रकर्त्यांना दमात ठेवण्याचा प्रयत्न करीत होतं. हे भारलेलं वातावरण या तरुण दिग्दर्शकाला विषय पुरवत गेलं. १९८० पर्यंत म्हणजे आपल्या करिअरची बारा वर्षे या दिग्दर्शकाने डॉक्युमेन्टरी फिल्ममेकर म्हणून काढली. या काळात छोट्या मोठ्या कुरबुरी अनेक झाल्या. पण जिव्हारी लागले ते दोन प्रसंग. १९७१ मधे कामगारांच्या आंदोलनावर बनवलेला `वर्कर्स ७१ः नथिंग अबाउट विदाउट अस` हा माहितीपट सेन्सॉरने मोठ्या प्रमाणात कापला आणि अखेर प्रदर्शित होऊ दिला नाही. दुसरा प्रसंग घडला तो १९८०मधे  `रेल्वे स्टेशन` या माहितीपटाच्या चित्रिकरणादरम्यान. यावेळी त्याने स्टेशनचं केलेलं चित्रिकरण पोलिसांनी ताब्यात घेतलं. एका संशयित गुन्हेगाराच्या हालचालींचा माग लागेलशी शंका आल्याने. या शंकेचं पुढे काही झालं नाही पण आपल्या कामाचा असा दुस-याच्या गळ्याला फास लावायला उपयोग होऊ शकतो हेच किसलोव्स्कीला सहन झालं नाही. त्याने वर्षभर आधी `कॅमेरा बफ` या चित्रपटात मांडलेल्या कल्पनेशी असलेलं या घटनेचं साम्यही त्याला हलवून गेलं, आणि माहितीपटांशी संबंध तोडण्याचं नक्की झालं. पुढला प्रवास हा चित्रपटांशी निगडित झाला. आणि कॅमेरा बफने जागतिक चित्रसृष्टीच्या लक्षात आलेलं या दिग्दर्शकाचं नाव अधिकाधिक मोठं होत गेलं.
१९८१मधे केलेल्या ब्लाईंड चान्समधे किसलोव्स्की एकाच घटनेच्या तीन आवृत्त्या आणि या तीनही आवृत्त्यांनी प्रमुख व्यक्तिरेखेच्या आयुष्यात होणारा जमीन-आस्मानाचा फरक दाखवतो. एका दृष्टीने ही या दिग्दर्शकाच्या पुढल्या काळातल्या चित्रपटांची चाहूल म्हणावी लागेल कारण समांतर आयुष्यं, योगायोग, घटनांची पुनरावृत्ती या आणि अशा घटकांनी किसलोव्स्कीचा पुढल्या काळातला चित्रपट भरलेला आहे. इतका की अ‍ॅनेट इन्सडॉर्फ या लेखिकेने किसलोव्स्कीच्या चित्रपटांवर लिहिलेल्या पुस्तकाचं नाव देखील `डबल लाईव्ज, सेकंड चान्सेस` असं आहे.
पुढल्या काळातल्या किसलोव्स्कीच्या सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे डेकेलॉग (१९८८) ही बायबलमधल्या टेन कमान्डमेन्टसवर आधारलेली दहा भागांची मालिका, त्यातल्याच दोन भागांचं वाढीव रुपांतर `ए शॉर्ट फिल्म अबाऊट लव्ह` (१९८८), `द डबल लाईफ ऑफ वेरोनिका` (१९८१)  आणि `थ्री कलर्स` (ब्लू, व्हाईट आणि रेड) ही चित्रत्रयी (१९९३/९४)
डेकेलॉगमधे ज्याप्रमाणे किसलोव्स्की बायबलमधल्या दैवी आज्ञांचा आजच्या सामान्य माणसांशी आणि त्यांच्या घाईगर्दीच्या आयुष्याशी संबंध लावू पाहतो तसाच तो थ्री कलर्समध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आदर्शवादी मुल्यांचा काळाबरोबर हरवत चाललेला संदर्भ शोधतो. जे रंग या मुल्यांचे प्रतिनिधित्व करतात (निळा - स्वातंत्र्य, पांढरा-समता आणि लाल-बंधुता) ते किसलोव्स्की आणि १९८५च्या `नो एन्ड`पासून त्याचा नित्याचा पटकथाकार असणा-या क्रिस्टोफ पिशेविज यांनी शोधले. फ्रान्सच्या तिरंग्यापासून फ्रेन्च राज्यक्रांतीचा आधार असलेल्या या मुल्यांना आज काही किंमत उरली आहे का, हे ही चित्रत्रयी पडताळून पाहते. स्वतः किसलोव्स्कीच्या मते ही मूल्ये माणसाच्या मूळ स्वभावतच न बसणारी आहेत आणि आज कुणालाच त्यांची गरज वाटत नाही. मात्र हे व्यक्तिगत मत चित्रत्रयीला पूर्वनियोजित दिशा मात्र देत नाही.
 `थ्री कलर्सः रेड` हा अखेरचा चित्रपट चित्रत्रयीचा आणि तिच्या कर्त्याचा देखील. नैतिक विषयाशी निगडित असूनही कुठेही उपदेश न करणारा, प्रेमाच्या विविध पैलूंच्या तपासणीबरोबरंच माणूस हा नियतीच्या हातचं बाहुलं आहे, हे दाखवणारा.
रेडमधे एक प्रसंग आहे. रात्रीच्या वेळी एक ट्रॅफिक सिग्नलच्या आसपास घडणारा. नायिका व्हॅलेन्टीन (आयरिन जेकब)ची गाडी या सिग्नलला येऊन थांबते. फ्रेमच्या कोप-यातून आपल्याला इथे लवकरंच लागणा-या एका प्रचंड होर्डिंगसाठी उभारलेली लाल चौकट दिसते. इथे लागणार असलेली जाहिरात आहे ती लाल पार्श्वभूमीवर असलेल्या व्हॅलेन्टीनच्या दुःखी चेह-याची. गाडी पुढे जाते आणि ऑगस्ट (जाँ -पीटर लॉरिट) हा न्यायाधीश होण्यासाठी परीक्षा देत असलेला तरुण रस्ता ओलांडू लागतो. ओलांडताना त्याच्या हातून काही पुस्तकं पडतात आणि एक पान उघडलं जातं. ऑगस्ट हा नियतीचा कौल मानतो आणि उघडलेल्या पानावरल्या प्रश्नाची खास तयारी करायला लागतो. पुढल्याच वळणावर व्हॅलेन्टीनच्या गाडीची धडक एका कुत्रीला बसते, जिच्या गळ्यातल्या पट्ट्यावर तिच्या मालकाचा पत्ता लिहिलेला असतो.
आता वरवर पाहिलं तर हा किती साधा प्रसंग. पण संपूर्ण चित्रपटभर या प्रसंगाचे धागेदोरे पसरलेले दिसतात. होर्डिंगची पूर्वसूचना जशी इथे असणारी लाल चौकट देते, तसंच हे होर्डिंग हीच मुळी पूर्वसूचना मानता येईल. व्हॅलेन्टीनच्या आयुष्यात पुढे होणा-या घटनेची. ऑगस्टच्या हातून पडलेली पुस्तकं ही केवळ ऑगस्टच्या दृष्टीने महत्त्वाची नाहीत, तर त्याचा संबंध लागतो तो जोसेफ कर्न (जाँ लुइस ट्रीन्टनिन्ट) या निवृत्त जज्जच्या व्यक्तिरेखेशी, जी योगायोगाने व्हॅलेन्टीनच्या गाडीखाली आलेल्या कुत्र्याची मालक देखील आहे.
रेड प्रथमच पाहताना हे नवनवे धागेदोरे हळूहळू उलगडत जातात. त्यामुळे आपण त्यातल्या प्रत्येक प्रसंगाकडे स्वतंत्रपणे लक्ष देत नाही. मात्र चित्रपट पुन्हा पाहिल्यावर त्यातल्या काळजीपूर्वक केलेल्या रचनेचं सौंदर्य आपल्या ध्यानात येतं. सिग्नलचा प्रसंग हा म्हटला तर फुटकळ, पण यातल्या प्रत्येक पात्राच्या आयुष्याला वेगळं वळण लावणारा. मात्र त्यामुळेच आपल्याला स्वतःच्या आयुष्याचाही पुनर्विचार करायला लावणारा.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना ही त्याला वेगळं वळण लावू शकते का, की सारंच एक प्रकारे पूर्वनियोजीत आहे, असा पेच किसलोव्स्की टाकतो, ज्याचं उत्तर तितकसं सोपं नाही. रेडचं कथानक हे प्रसंगांना काळानुसार मागे पुढे करत नसलं तरी सांकेतिक अर्थाने लिनिअर म्हणता येणार नाही. व्हॅलेन्टीन आणि जज्ज कर्न या इथल्या प्रमुख व्यक्तिरेखा. कुत्रीमुळे कर्नशी प्रथम गाठ पडलेल्या व्हॅलेन्टीनला लक्षात येतं की कर्न हा आपल्या शेजा-यांचे फोन टॅप करून त्यांची व्यक्तिगत संभाषणं चोरून ऐकतोय. या संभाषणांधलच एक आहे ऑगस्ट आणि त्याच्या मैत्रिणीचं. कर्नचं आयुष्य हे त्याच्या भूतकाळातल्या काही घटनांनी झपाटलंय आणि त्या वेगळ्या पद्घतीने घडल्या तर कर्न कुणी वेगळाच माणूस झाला असता. कदाचित अधिक समाधानी. किसलोव्स्की इथे कर्नचा भूतकाळ प्रत्यक्ष दाखवत नाही, तर ऑगस्टच्या वर्तमानात घडणा-या आयुष्याला कर्नच्या भूतकाळाशी समांतर योजतो. अखेर नियती या दोघांनाही व्हॅलेन्टीनच्या दिशेने खेचत राहते, पण ती काय प्रकारे हे घडवून आणते, ते पाहण्यासारखं तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन अंतर्मुख व्हायला भाग पाहणारं आहे.
रेडमधला दृश्य भाग हा लाल रंगाने व्यापून टाकलेला आहे. टेलिफोन केबल्स, गाड्यांचे दिवे, फोटोसाठी वापरलेली पार्श्वभूमी, बोलिंग अ‍ॅलीमधलं फर्निचर, ऑगस्टची गाडी, कपडे अशा असंख्य रुपांतून लाल रंग आपल्याला भेटतो आणि चित्रपटाच्या विषयाची आठवण करून देतो. मात्र हे कलर कोडिंग थेट नाही. म्हणजे प्रत्येकवेळी हा रंग अमुक अर्थाने वापरला जाईलसं नाही. मात्र आपल्या प्रत्येक रुपातल्या दर्शनाने तो रंग अधिक समृद्ध होतो आणि चित्रपटाला एक सशक्त पार्श्वभूमी देऊ करतो.
थ्री कलर्सच्या निर्मितीनंतर किसलोव्स्कीने आपण दिग्दर्शनातून निवृत्त झाल्याचं जाहीर केलं, आणि पुढे लवकरच हृदयविकाराच्या झटक्यानंतर केलेल्या ओपन हार्ट सर्जरीत त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान त्याने पेशिवीजबरोबर एका नव्या चित्रत्रयीची योजनाही आखली होती. दान्तेच्या डिव्हाईन कॉमेडीवर आधारित हेवन, हेल आणि पर्गटरी असे हे तीन चित्रपट असणार होते. संहिता जवळपास पूर्ण झालेला हेवन पुढे २००२मधे टॉम टायक्वरने (रन लोला रनचा दिग्दर्शक) पडद्यावर आणला. प्रत्यक्षात निर्मितीची वेळ आल्यावर किसलोव्स्की आपला सन्यास सोडून पुन्हा दिग्दर्शनात उतरला असता का, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच भेडसावतो. त्याचं उत्तर मात्र आता कुणीच देऊ शकणार नाही.
- गणेश मतकरी

7 comments:

vishal August 2, 2011 at 12:38 AM  

Jabardasta visheleshan ahe !

SUMITIMUS August 2, 2011 at 8:23 AM  

i had read abt Kislovski n da triology in an article by Vijay Padalkar , urs is also very wat to say energising article,

Anagha August 2, 2011 at 10:31 PM  

मी ह्यातील फक्त 'Blue' पाहिला आहे. थेटरात जाऊन. वेगळाच अनुभव होता तो ! अतिशय सुंदररित्या तुम्ही त्याचे परीक्षण केले आहे. आता हे चित्रपट बघताना अधिक आनंद घेता येईल. आभार.

Anee_007 August 3, 2011 at 12:19 AM  

Red was really the best from triolgy.Story of model and view to look at it was really excellent.Blue is my second favourite and then white actually.Hopefully you will write on both.Kieslowski's double life was also very good,again a must watch.I think his death so early was really a big loss to world cinema

ganesh August 3, 2011 at 3:22 AM  

Thanks vishal, sumit, anagha and anee. Sumit, i havent read padalkar's article on the subject. Was it a longer one ,or in his loksatta column( reprinted in cinemayache jadugar)? Anee, i dont think i will write about others in this format. The order of liking u describe is exactly same as mine and i think prasad namjoshi's article on one of the other films ( mostly blue, but not sure) is already on this blog. Even this one is not entirely about red but about kieslowski and red. I want to do a longer article about him which will mainly cover 3 colors, decalogue, blind chance and double life of veronique, but no idea when i will manage that.

Ninad August 7, 2011 at 11:32 AM  

tree of life baghitala ka?
would like to hear abt it from u..

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP