गँग्ज आँफ वासेपूर: आपल्या मातीतला गँगस्टरपट

>> Monday, July 2, 2012


’गॉड इज इन द डिटेल्स’
---लुडविग मीज व्हान डर रोह
’आय टुक द फादर, नाउ आय विल टेक द सन’
---बिल द बुचर, गँग्स आँफ न्यू यॉर्क (२००२)

काही वर्षांपूर्वी क्वेन्टिन टेरेन्टिनोच्या सुप्रसिध्द चित्रद्वयीचा पहिला भाग ’किल बिल:व्हॉल्यूम १’ प्रदर्शित झाला आणि अनेक समीक्षकांच्या कपाळावर आठी उमटली. कारण तसं उघड होतं . आधी ठरल्याप्रमाणे ,हा चित्रपट विभागला जाणार नव्हता, तर गोष्ट सलगपणे (म्हणजे टेरेन्टिनो जितपत सलगपणे सांगू शकतो तितक्या सलगपणे)एकाच भागात सांगितली जाणार होती.चित्रीकरण पूर्ण झालेलं होतं मात्र चित्रपटाची वाढती लांबी पाहून निर्माती संस्था मिरामॅक्स आणि टेरेन्टिनो ,यांनी चित्रपटाचे दोन भाग करण्याचा एकत्रितपणे निर्णय घेतला ,संकलनादरम्यान.समीक्षकांचा सवाल होता तो हा, की चित्रपट एकत्रितपणे सादर करण्याची शक्यता असताना,आतुरतेने वाट पाहाणारा प्रेक्षक उपलब्ध असताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला भाग कथानकाला कोणताही समाधानकारक शेवट देऊ शकत नसताना ,या प्रकारची विभागणी योग्य आहे का? आणि नसेल तर लांबी थोडी मर्यादेत आणून थोडा मोठा ,पण एकच चित्रपट अधिक योग्य वाटला असता का?  काहीसा हाच प्रश्न अनुराग कश्यपच्या गँग्ज आँफ वासेपुर (का कोण जाणे, पण हा पहिला भाग असल्याचं जाहिरातीत लिहिलं जात नाही)बाबत देखील विचारणं शक्य आहे. आणि दोन्ही चित्रपटांबाबत येणारं या प्रश्नाचं उत्तरदेखील काही प्रमाणात एकसारखंच असेल.
किल बिल काय किंवा गँग्ज आँफ वासेपुर काय , या चित्रपटांची गोष्ट (काहीशा घाईघाईत) एका भागात सांगणं शक्य झालंही असतं,पण केवळ ढोबळमानाने गोष्ट सांगून टाकणं हा मुळातच या चित्रपटांचा हेतू नाही. गुन्हेगारी, सूड , रक्तपात यांना प्राधान्य देणा-या या दोन्ही चित्रपटांच्या गोष्टित वरवर पाहाता नावीन्य नाही.या प्रकारची सूडनाट्य आपण वेळोवेळी हिंदी इंग्रजी चित्रपटांमधून पाहिलेली आहेत. नावीन्य आहे, ते त्यांच्या रचनेत, कथनशैलीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तपशीलात.
अनुराग कश्यप हे नाव गेल्या काही वर्षात झपाट्याने वर आलेलं आणि सध्याच्या चित्रकर्त्यांमधे सर्वात महत्वाचं आहे, हे कोणालाही पटावं. आपल्या चित्रपटांच्या पारंपारिक कथन आणि दृश्यशैलीला सोडचिठ्ठी देउन नव्या पध्दतीचे, पाश्चिमात्य प्रभाव (पण नकलेकरता वापरला जाणारा नव्हे) असणारे, आशयाच्या वेगळ्या जागा शोधणारे, बॉक्स आँफिसवरल्या गणितावर यशापयश न मांडता प्रत्यक्ष गुणवत्तेचा विचार करायला लावणारे चित्रपट तो आपल्याला ,आपल्या सवयींचा,आवडीनिवडींचा विचार न करता देतो. प्रेक्षकांच्या बुध्दिमत्तेवर त्याचा विश्वास असावा आणि तो रास्त असल्याचं प्रेक्षकानी अजूनतरी सिध्द केलं आहे.
गुन्हेगारी, माफिया आणि राजकारण हे कश्यपच्या जिव्हाळ्याचे विषय . सत्या ,ब्लॅक फ्रायडे, पाँच, दॅट गर्ल इन यलो बूट्स, शैतान या आणि अशा चित्रपटांवर लेखक,दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांतून केलेल्या कामामधून त्याने ही आवड वेळोवेळी दाखवूनही दिली आहे.गँग्ज आँफ वासेपूरमधे तो ही आवड अधिक टोकाला नेतो आणि आपल्या चित्रपटसृष्टीत सर्वस्वी अनपेक्षित असा ,अभ्यासपूर्ण पण परिणामात कुठेही कमी न पडणारा गुन्हेगारीपट आपाल्याला देतो.
गँग्ज पूर्णपणे स्वतंत्र आहे यात वादच नाही. त्याच्या नावातलं ’गँग्ज आँफ’ हे उघडच मार्टिन स्कोर्सेसीच्या ’गँग्ज आँफ न्यू यॉर्क ’ची ओळख लावणारं आहे.बहुधा मूळ ’गँग्ज’ची ऐतिहासिक गुन्हेगारीपटाची प्रकृती, कथासूत्रातलं माफक साम्य आणि स्कोर्सेसीची कथेला दुय्यम लेखून स्थळकाळाला महत्व देण्याची प्रवृत्ती, याला हा सलाम असावा. कश्यपला चित्रपट बनवण्याची प्रेरणा कपोलाच्या गॉडफादरकडून मिळाली असण्याची शक्यता आहे. कारण त्या मालिकेच्याही ख-या महत्वाच्या पहिल्या दोन भागांत ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मांडलेली एका क्राईम लॉर्डच्या उदयास्ताची ,त्याच्या पुढल्या पिढिची, गुन्हेगारी टोळ्यांमधल्या संघर्षाची आणि राजकारणाची गोष्ट ,सामाजिक सत्याचा आधार घेत मांडली आहे. कपोलाचे चित्रपट आणि कश्यपचे चित्रपट यात दोन मोठे फरक आहेत. एक तर कपोलाच्या चित्रपटांची रचना मूळ कादंबरीवर आधारित असल्याने कदाचित ,पण बरीच सेल्फ कन्टेन्ड आहे. एका पूर्ण कलाकृतीचा अर्धा भाग पाहिल्यासारखं ते पाहाताना वाटत नाही, जे गँग्ज पाहाताना वाटतं. त्याखेरीज कपोला काळ आणि सामाजिक स्थित्यंतरांच्या फार बारीक तपशीलात न जाता व्यक्तिरेखा आणि घडामोडी यावर लक्ष केंद्रित करत असल्याने त्यातला पॉवर स्ट्रक्चरचा आलेख हा विशिष्ट काळ आणि जमातींपुरता मर्यादित न राहता अधिक युनिव्हर्सल स्वरुपाचा आशय मांडतो, तेदेखील इथे होत नाही. अर्थात आपण हे लक्षात घ्यायला हवं ,की हे फरक चुकून झालेले नाहीत ,तर तो दिग्दर्शकाने जाणूनबुजून घेतलेल्या निर्णयांचाच परिणाम आहे. कश्यपला आपला वेगळा चित्रपट बनवायचा आहे, गॉडफादरची आणखी एक आवृत्ती नाही.

आजकाल प्रादेशिक गुन्हेगारीपट बॉलिवुडमधे विपुल प्रमाणात पाहायला मिळतात. मध्यम बजेट, मधल्या पातळीवरले स्टार्स, नकारात्मक व्यक्तिरेखा ,उत्तम छायाचित्रण , चांगलं संगीत आणि संकलन असणारे पण प्रामुख्याने रंजनवादी असे हे चित्रपट असतात. यातल्या ब-याचशा घटकांचा वापर गँग्जमधेही आहे मात्र केवळ रंजनवादी सूडकथा मांडण्यात या चित्रपटाला रस नाही. त्याला शोध आहे, तो यात दिसणार््या ग्रामीण गुन्हेगारीच्या उगमाचा . ती कशी सुरू झाली, कशी फोफावत गेली, राजकीय वातावरणाचा त्यात नक्की काय हात होता, आणि आजच्या काळात तिचं स्वरूप काय हे पाहाण्याचा गँग्ज आँफ वासेपुरचा महत्वाकांक्षी अजेन्डा आहे. त्यात आपली करमणूक होण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, संकेत झुगारून देणा-या मारामा-या आणि अनपेक्षितपणे येणारा , मनुष्यस्वभावाच्या विक्षिप्तपणाशी जोडलेला विनोद या त्यातल्याच दोन.
बिहारमधे धनबाद आणि त्यातच समाविष्ट झालेल्या वासेपुर या गावात या चित्रपटाची गोष्ट घडते. राजकारणात वरपर्यंत पोचलेला रामाधीर सिंग (तिगमांशु धुलिया) आणि त्याचा तुल्यबळ शत्रू सरदार खान ( मनोज बाजपेयी) यांच्यातल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दुश्मनीची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांचा खून करणा-या रामाधीरला खलास करण्याची सरदार खानने घेतलेली शपथ, त्याची वाढत जाणारी सत्ता, रामाधीरचे बचावाचे पावित्रे , आणि पुढल्या पिढीवर पडणारं या शपथेचं ओझं असा या पहिल्या भागाचा अवाका आहे. मात्र प्रत्यक्ष कथानकाहून इथे महत्व आहे ते सर्व प्रकारच्या तपशीलांना.
धर्म-जातिभेदांमुळे पडलेली वैराची बिजं, स्वातंत्र्यानंतर या समाजात होत गेलेली स्थित्यंतरं , कोळसा- लोखंड यांच्या व्यापारातल्या गैरव्यवहारातून उपस्थित झालेल्या समस्या यासारखा तपशील बराच गुंतागुंतीचा आणि अनेक लहानमोठ्या व्यक्तिरेखांना उभं करणारा आहे. त्याचा अवाकाही मोठा असल्याने अनेकदा इथे निवेदन वापरण्याचीही गरज तयार होते.काहीशी माहितीपटाची झाक या भागावर पडलेली जाणवते. सरदार खानच्या व्यक्तिगत आयुष्याचे तपशील हा इथला दुसरा महत्वाचा भाग.त्याची दोन लग्न, पैसे कमवण्याचे उद्योग, सहका-यांचा कुटुंबातला समावेश,त्याचं वैर, मुलांबरोबरचे बदलते संबंध अशा अनेक पातळ्यांवर सरदार खानचं आयुष्य आपल्यापुढे येतं. यातला बराच भाग हा थेट प्रसंगांची मदत घेत झालं ते जसंच्या तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो.तिसरा तपशीलाचा धागा येतो ,तो बॉलिवुडकडून. आपली चित्रपटसृष्टी ही आपल्या आयुष्यावर किती खोलवर प्रभाव टाकते हे क्वचितच इतक्या प्रभावीपणे चित्रपटातून आलं असेल. सरदार खानने धंमकीच्या प्रसंगात केलेला ’कसम पैदा करने वाले की’ मधल्या गाण्याचा वापर अाणि सरदार खानच्या मुलाला पोस्टरपुढे उभं करून पडद्याचा प्रभाव दाखवणं, ही दोन उदाहरणंदेखील हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी व्हावीत.
गँग्जचा हा गोष्टिपलीकडे जाण्याचा प्रयत्न त्याला इतर चित्रपटांच्या तुलनेत वेगळा बनवतो ,आणि ’बदला ’ या हिंदी चित्रपटांमधल्या पारंपारिक प्लाॅट पाॅईन्टचा वापर करतानाही चित्रपटाला बाळबोध बनू देत नाही.
अनुराग कश्यपच्या या वेगळ्या गँगस्टरपटाला प्रेक्षकांनी गर्दी करणं ,ही प्रेक्षकांची चित्रपटाची जाण वाढत चालल्याचं लक्षण मानावं , का अखेर अनुराग कश्यपला क्रिटिकप्रूफ दिग्दर्शकाचा दर्जा मिळाल्याचं ,हे ठाउक नाही, पण चांगल्या ,नव्या प्रयत्नाला प्रेक्षकांनी मान्यता देणं ,हे एकूण चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने फाद्याचच म्हणावं लागेल.ही चित्रद्वयी आशयदृष्ट्या यशस्वी ठरते की नाही, हे पुढला भाग आल्यावरच नक्की ठरेल, पण निदान आज तरी आपण काही चांगलं पाहायला मिळालं यावर समाधान मानू शकतो.
 - गणेश मतकरी
(महाराष्ट्र टाइम्समध्ये जागेअभावी जाऊ न शकलेल्या भागासह विस्तारित)

13 comments:

lalit July 2, 2012 at 7:23 AM  

baghitala chitrapat ekada baghanya sarkha ahe tasa pan tumacha lekh avadala

साधक July 2, 2012 at 8:32 AM  

चित्रपट अजिबात आवडला नाही. नाविन्य वगैरे जे काही दिसले ते तुमच्या सारख्या समीक्षकांनाच काय ते. एक तर चित्रपटात "बदला" या विषयावर काही घडतच नाही. रामाधीर ची नेमकी सत्ता किती? तो जर सत्तेत होता तर त्याने गुंड पाळले नसावे का? असतील तर त्यांनी सरदार खानला वाढूच कसे दिले? पेट्रोलपंप लुटणे अशा छछोर गोष्टींमुळे बदला मिळतो का? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. एकंदरीत चित्रपट अंगावर येणारा व नवीन काहिच न देणारा वाटला. असो.

Pradip Patil July 2, 2012 at 11:56 AM  

didn't work for me at all.. most dialogs seemed forced, contrived.. most of the people seemed to enjoy cuss words only..
Everybody is talking about details, but which details?

Locations? language? which more than half of india has no way of judging, but still people choose to believe that it is authentic.

Even the coal mafia angle seems just for the sake of publicity. It could have been anything.
What about characters aging? Few characters age , few stay and look same.. what's with piyush mishra's character? he appears and disappears as per convenience..
Where are strong characters? Even if we accept that its more in the spirit of Scorsese's films, didn't he have very strong characters in his films?

Sardar khan comes across as a strong lunatic who succeeds not because he deserves but because of inactions of others.. Why does ramdheer do nothing but just whimper..
What was so ferocious about Sultan?

Meghana Bhuskute July 2, 2012 at 9:58 PM  

लेख खूप आवडला. सिनेमाही.
सिनेमाच्या शेवटी असलेली 'टू बी कंटिन्यूड'ची पाटी मला त्यातल्या विधानाचा एक भाग वाटली होती फक्त. पण खरंच त्याला अर्थ आहे, याचा उलगडा हा लेख वाचून झाला.

Rohit jd July 3, 2012 at 10:32 AM  

गणेश सर, या चित्रपटात केवळ घटना दाखविल्या गेल्या पण कथा नाही असं वाटलं. शिवाय
प्रेक्षकांनी चित्रपटातील बारकावे लक्षात न घेता केवळ शिव्या आणि जोक्स यांची मजा घेतली असं मला तरी वाटत.

ganesh July 3, 2012 at 8:13 PM  

Thanks all for the response.
its very interesting to see the response to this article, which is mixed ,to say the least. My regular readers may know that I am not an elitist critic and not in support of a particular kind of cinema ,commercial or parallel. in fact ,after seeing No smoking, I had almost put a personal ban on Kashyap which I lifted after Gulaal. I saw Dev D much later as well. the point being ,Iwas not always a great fan of Kashyap ,but I can see the effort to map a different cinema.still ,from the reactions I believe there is a need to elaborate on some of the points .not sure if I will have the time for it ,but will try to do so either in a long fb comment or note or blog response. lets see.
by the way ,meghana, the film actually has a trailer of second part at the end of the credits.

Anagha July 4, 2012 at 9:51 AM  

हा सिनेमा बघताना मला 'किल-बिल', गॉडफादर हे सिनेमे आठवत राहिले. 'गॉडफादर' ची एकेक फ्रेम ही अभ्यासाला घेण्यासारखी आहे.
कश्यपचा मी आधी पाहिलेला सिनेमा म्हणजे 'शैतान'. तो आवडला होता. त्यातला वेग हा गरजेचा वाटला होता. परंतु, 'वासेपूर' म्हणजे धाडधाड वाटला. माझ्या आयुष्याचे तीन तास मी कश्यपच्या ताब्यात दिले आणि त्यामुळे मी माझा जगण्याचा हक्कच गमावून बसल्यासारखं. एकही क्षण त्याने मला विचार करू दिला नाही, जगू दिला नाही. आणि हे मला नाही आवडलं. नाही पटलं.
मला आत्ता बॉलीवूडच्याच 'ओंकारा' ची आठवण झाली. तो सिनेमा जरी हिंसा दाखवत होता तरी माझे डोके स्थिर ठेवून मी 'ओंकारा', परिंदा जगू शकले होते.

ganesh July 4, 2012 at 11:11 AM  

anagha, one major difference between shaitan and GOW is that,the directors r different. shaitan was only produced by kashyap but was directed by bijou nambiar. GOW is directed by AK himself. u may have seen kashyap's dev d.

Anagha July 5, 2012 at 12:31 AM  

हे नव्हतं माहित. हो मी बघितलाय Dev D.

Suhrud Javadekar July 5, 2012 at 12:36 AM  

Enjoyed reading the article...as well as Pradip Patil's forthright comment above...I agree with all that he has said...Kashyap clearly has an eye for authenticity...but that's not enough for good cinema, right? Gangs of Wasseypur is a perfect example of a film losing focus in pursuit of authenticity...I guess when a filmmaker wants to cram in too much stuff and that too 'authentically', this is what happens...

हेरंब July 6, 2012 at 10:41 PM  

अजिबात अजिबात आवडला नाही. पटकथा आणि संकलन दोन्ही पूर्ण फसलंय असं वाटलं ! माझ्या मते अनुराग कश्यप फार फार ओव्हरहाईप्ड आहे. चित्रपट संपल्यावर मला कश्यपला एकच प्रश्न विचारावासा वाटत होता..... "And your point is....... ??"

attarian.01 July 9, 2012 at 3:11 AM  

चित्रपट आवडला , सगळ्यात जास्त रियल लोकेशन वर शूटिंग केलेले आवडले . काही प्रसंग कमी महत्वचे होते तेहि बारीक तपशील देऊन चांगले केले , दुसर्या भागाची ववत पाहतो आहे .

--

Unknown December 6, 2012 at 7:16 PM  

Hello Ganesh,I completely agree with you...
After watching Dev-D or Gulal i had felt that Kashyap is trying narrate stories which are not alien to us. He portrays the stories through real life background..
Gangs of Wasseypur i think was an amazing attempt where we can see beauty lies in details... the minute details that are captured in the movie are amazing... So it gives us satisfaction that this is a complete "our indian movie"
i totally agree with you....

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP