’अनदर अर्थ’ - बेस्ट ऑफ ऑल पॉसिबल वर्ल्डस ?

>> Tuesday, August 21, 2012




एखादा चित्रपट नक्की कशाविषयी आहे हे कसं समजायचं ? केवळ आपल्या परीचयाची काही कथासूत्र, संकल्पना , विचार हे एखाद्या विशिष्टं चित्रप्रकाराशी जोडलेले असणं ,हे ते असणारा दर चित्रपट त्याच चित्रप्रकाराच्या वर्गवारीत टाकण्यासाठी पुरेसं आहे का ? उदाहरणार्थ , चार्ल्स फॉस्टर केनने मृत्यूसमयी काढलेल्या उदगारामागच्या रहस्याचा चित्रपटभर पाठपुरावा केल्याने ’सिटिझन केन’ हा केवळ रहस्यपट होतो का? नाही , तो महत्वाकांक्षा आणि सत्तेच्या गुर्मीत ख-या आनंदाला मुकलेल्या एका बलाढ्य व्यक्तिरेखेची शोकांतिका ठरतो. जॉर्ज रोमेरोच्या परंपरेतल्या झॉम्बीजना पडद्यावर आणल्याने ’शॉन ऑफ द डेड’ हा केवळ भयपट होतो का? नाही, तो आज यंत्रवत होत चाललेल्या समाजजीवनावरची बोचरी पण अतिशय विनोदी टीका म्हणून पाहाता येतो. याच तर्कशास्त्राच्या आधारे पाहीलं , तर पृथ्वीसदृश दुस-या ग्रहाचा शोध , आंतरग्रहीय प्रवास यासारख्या घटकांचं अस्तित्व हे माइक काहील दिग्दर्शित ’अनदर अर्थ’ ला केवळ विज्ञानपट म्हणून ब्रँड करण्यासाठी पुरेसं आहे का? अर्थातच नाही.
’अनदर अर्थ’ हादेखील मिरांडा जुलाईच्या ’द फ्युचर’ सारखाच अमेरीकन इन्डीपेन्डन्ट सिनेमा, इन्डी चित्रपटांसाठी सुप्रसिध्द असणा-या सनडान्स फिल्म फेस्टीवलमधे यंदा पारितोषिक विजेता ठरलेला. लो बजेट, दिग्दर्शकाने स्वत:च छायाचित्रण आणि संकलनाची बाजू सांभाळून केलेला हा जवळजवळ द्विपात्री चित्रपट. त्यातल्या विज्ञानपटात शोभणा-या संकल्पनांचा कल्पक आणि वेगळा वापर करणारा, त्यांच्याशी निगडीत दृश्य शक्यतांना योग्य ते महत्व देणारा पण त्याच वेळी आपला पिंड सायन्स फिक्शन नसल्याची पुरेपूर जाणीव असणारा.
या चित्रपटाच्या नावातच असलेल्या ’दुस-या पृथ्वी’ला इथे महत्वाचं स्थान आहे. सुरुवातीलाच या प्रतिपृथ्वीचा शोध लागल्याचं आपल्याला सांगितलं  जातं आणि त्यानंतर येणा-या जवळपास प्रत्येक आउटडोअर चित्रचौकटीत दिसणा-या आकाशात ,या चंद्रापेक्षा कितीतरी मोठी जागा व्यापणा-या ग्रहाला प्रत्यक्ष दाखवलं जातं. एरवी सामान्य आयुष्य जगणा-या व्यक्तिरेखांच्या वास्तवदर्शी कथेत अन तशाच वास्तवदर्शी दृश्य रुपात, ही  फॅन्टसी प्रतिमा थोडा काव्यात्म अन काहीसा अचंबित करुन सोडणारा परिणाम साधते.
मात्र एक लक्षात ठेवावं लागेल, की इथलं दुस-या दुनियेचं अस्त्तित्व चित्रकर्त्याना काही वास्तववादी पध्दतीने सुचवायचं नाही. ते एक रुपक आहे. आयुष्याने आपल्याला देऊ केलेल्या संधी, आपण आयुष्यभर घेतलेले निर्णय , निवडलेली वाट ,याची चित्रपटातल्या पात्रांना ,अन आपल्यालाही , जाणीव करुन देण्याची एक क्लृप्ती आहे. आपण कसे जगलो याचा, अन कदाचित कसं जगायला हवं होतं याचाही विचार करायला भाग पाडणारं डिव्हाइस आहे. कदाचित त्यामुळेच, या ग्रहाच्या असण्यातून निर्माण होणा-या तात्विक अन तार्किक शक्यतांचा चित्रपट विचार करतो ,मात्र अशा प्रचंड ग्रहाच्या अचानक जवळ येण्यातून जी भौगोलिक संकटं उद्भवतील, त्यांचा विचार करणं पूर्णपणे टाळतो.
चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे -होडा विलीअम्स (ब्रिट मार्लिंग) ही हुशार अन उज्वल भवितव्याच्या शक्यता असलेली मुलगी. या शक्यता नाहीशा होतात जेव्हा ती थोड्या नशेत आणि नुकताच पृथ्वीच्या कक्षेत आलेला नवा ग्रह पाहाण्याच्या नादात एका गंभीर अपघाताचं कारण ठरते. एका कुटुंबातली पत्नी आणि लहान मुलगा ,या अपघातात जागीच मरतात, अन संगीतकार / प्राध्यापक असणारा पती, जॉन बरोज (विलीअम मेपोथर) कोमात जातो. काही वर्षानंतर सजा भोगून बाहेर आलेल्या -होडाचं आयुष्य पूर्वीपेक्षा पार बदलून जातं.डोक्याचा वापर करावा लागेलसं कोणतंही काम टाळून ती आपल्या जुन्या शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी धरते. बरोज जिवंत असल्याचं कळताच ती माफी मागण्यासाठी त्याच्या घरी पोहोचते ,पण खरं सांगायचा धीर न झाल्याने आपण घरकामासाठी माणसं पुरवणा-या कंपनीतर्फे मोफत साफसफाईची प्रमोशनल ऑफर घेउन आल्याचं सांगते.अजून माणसात न आलेला , काळवंडलेल्या गुहेसारख्या घरात एकटाच राहाणारा जॉन ऑफर स्वीकारतो आणि -होडा दर आठवड्याला त्याच्याकडे जायला लागते. माफिचा विचार बाजूला ठेउन त्याची सेवा करण्यातच पापक्षालन मानायला लागते. या सुमारास अर्थ -२ नावाने ओळखल्या जाणा-या नव्या ग्रहाबद्दल आश्चर्यकारक तपशील कळायला लागतात. हा ग्रह पृथ्वीची संपूर्ण प्रतिकृती असतो. तीदेखील माणसांसकट. सर्व पृथ्वीवासीयांची तर तिथे प्रतिकृती असतेच , वर ग्रहांना एकमेकांचा शोध लागेपर्यंत तर त्यांची आयुष्यही एकसारखी असतात. त्यानंतर मात्र त्यांचे मार्ग बदलण्या ची शक्यता असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज असतो. आता -होडाला आशा वाटायला लागते की निदान त्या ग्रहावर तरी आपल्या हातून घडलेला अपघात टळलेला असेल अन जॉनचं कुटुंब सुखी असेल. एव्हाना ब-याच सुधारलेल्या जॉनशी तिची चांगली मैत्री झालेली असते अन सत्याची कल्पना नसलेला तो, -होडाच्या प्रेमातही पडायला लागतो.
अनदर अर्थ मधली प्रेमकथा ही छोट्या आणि अनपेक्षित प्रसंगांमधून फुलंत जाते. दोघांनी बॉक्सिंगचा व्हिडीओगेम खेळण्याचा प्रसंग -ज्यात टिव्हीचा पडदा न दाखवता केवळ -होडा आणि जॉनच्या प्रतिक्रियांवर कॅमेरा स्थिरावतो, डोकं धरुन राहाणार्या जॉनला -होडाने सांगितलेली रशियन कॉस्मोनॉटची गोष्टं, मुळात संगीतकार असणा-या जॉनने आपल्या भावना व्यक्तं करताना केलेला करवतीमधून येणा-या सूरांचा वापर ,असे तपशील कथेला तोच तोचपणा येऊ देत नाहीत.
पटकथेकडे पाहून एक गोष्ट लगेच लक्षात येते आणि ती म्हणजे ,तिच्यात येणारे नाट्यपूर्ण टप्पे ,हे त्यातल्या वैज्ञानिक संकल्पनेशी थेट जोडलेले नाहीत. बरेच स्वतंत्र आहेत. चित्रपटाचं भावनिक केंद्र ,हे -होडा आणि जॉन मधल्या बदलत्या संबंधात आहे. प्रतिपृथ्वी ही जवळजवळ पार्श्वभूमीला राहाते आणि अखेरपर्यंत हे चित्र बदलत नाही.याचाच दुसरा अर्थ म्हणजे ,दुसरी पृथ्वी न दाखवताही हा चित्रपट पाउणहून अधिक प्रमाणात तसाच होउ शकला असता.मग तरीही ती दाखवून भावनिक नाट्यात अपरिचित असणारी विज्ञानपटात शोभणारी सूत्र घालण्यामागे कारण काय ,हा प्रश्न पडण्यासारखा आहे. त्याला कारण म्हणता येईल ते त्यामुळे कथानकातून दिसायला लागणा-या वैश्विक शक्यता हेच ,अशा शक्यता , ज्या कथेला विशिष्टं पात्रांपुरती अन एका घटनेपुरती  मर्यादित न ठेवता सार्वत्रिक स्वरुप देउ शकतात. मग संकल्पनेच्या पातळीवर ही कथा कोणाचीही असू शकते. आपल्या आयुष्यातली वळणं ही नेहमीच आपल्याला आश्चर्यचकीत करणारी अन आपण विशिष्ट वेळी घेतलेल्या निर्णयाबद्दल वा आपल्यापुढे येउन ठेपणा-या संधी  वा आपत्तीबद्दल पुढे कायमच आनंद वा खेद वाटायला लावणारी असतात.दुस-या दुनियेतल्या वेगळी पावलं उचलण्याची क्षमता असणा-या आपल्याच प्रतिकृती या त्या आनंदाला वा खेदाला पुन्हा आपल्यापुढे आणतात.हे सूत्रं अधोरेखीत होतं ते वेळोवेळी येणा-या निवेदनातून ,जे कथेशी थेट संबंधित नाही. त्रयस्थ आहे.
आयुष्यातल्या अनेक अन अनपेक्षित शक्यता दाखवणारा हा काही पहिला चित्रपट नाही. पोलिश दिग्दर्शक किसलोवस्कींचा ’ब्लाईंड चान्स’, जर्मन टॉम टायक्वरचा ’रन ,लोला,रन’ , अमेरिकन पीटर हॉविटचा ’स्लायडिंग डोअर्स’ अशी अनेक उदाहरणं जागतिक सिनेमात आपण पाहू शकतो, मात्र ही उदाहरणं हे बदलते रस्ते अधिक थेटपणे ,प्रसंगातून दाखवतात. ’अनदर अर्थ’ केवळ हे रस्ते सूचित करतो, त्यासाठी कथानकाला फाटे फोडणं टाळतो.
अभिनयाबरोबर इथे सहपटकथाकार आणि सहनिर्माती अशा इतर दोन महत्वाच्या भूमिका पार पाडणा-या मार्लिंगला या विषयाचं कुतुहल असणं स्वाभावीक आहे. चित्रपटात काम करण्यासाठी अर्थशास्त्रातल्या अधिक हुकूमी करियरवर पाणी सोडणं, अन केवळ बाहुलीवजा भूमिका नाकारुन अर्थपूर्ण भूमिकांच्या शोधात स्वत: पटकथाकार बनणं असे दोन मोठे बदल तिच्या स्वत:च्या आयुष्यातच घडलेले आहेत. तिच्या कल्पनेतल्या दुस-या दुनियेत कदाचित ती नावाजलेली अर्थतज्ञ वा अधिक मोठ्या बजेटच्या चित्रपटांत केवळ सुंदर दिसण्याचं काम करणारी स्टार झाली असेल कदाचित. मात्र तसं असूनही तिला हवं ते काम, हव्या त्या पध्दतीने करू देणारी ही दुनियाच तिच्यासाठी ’ बेस्ट ऑफ ऑल पॉसिबल वर्ल्डस ’असेल ,यांत शंका नाही.
- गणेश मतकरी 

(ब्लॉगमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे काढण्यात आलेले काही लेख या आठवड्यामध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहेत.त्यातला हा पहिला लेख)

1 comments:

हेरंब August 21, 2012 at 8:36 PM  

Exactly.. I was kinda sure that I've read this earlier... so wondering why you are publishing this one again?.. Got it now :)

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP